2 Corinthians

1:1 देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रषित झालेला पौल याजकडून, तसेच आपला बंधु तीमथ्य याजकडून, देवाची करिंथ येथील मंडळी आणि अखयातील संपूर्ण प्रदेशातील देवाच्या लोकांना 2 देव आपला पिता आणि प्रभु येशू ख्रिस्त याजकडून कृपा व शांति असो. 3 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, करुणायुक्त देवपिता. तो सांत्वन करणारा देव आहे. 4 तो आमच्या सर्व कठीण काळात आमचे सांत्वन करतो; यासाठी की, आम्ही इतर लोकांचे त्यांच्या अडचणीत सांत्वन करु शकू. देव जे सांत्वन आम्हाला देतो त्याच सांत्वनाने आम्ही इतरांचे सांत्वन करु शकतो. 5 आणि ख्रिस्ताच्या पुष्कळ दु:खामध्ये सहभागी होतो, त्याच प्रकारे ख्रिस्ताद्वारे आम्हांला पुष्कळ सांत्वन मिळते 6 जर आमच्यावर संकटे येतात तर ती संकटे तुमच्या सांत्वनासाठी आणि तारणासाठी आहेत, जर आमच्याकडे सांत्वन आहे तर ते तुमच्या सांत्वनासाठी आहे. यामुळे आम्हाला जे दु:ख आहे तशाच प्रकारचे दु:ख सहन करायला, धीराने सहन करायला मदत होते. 7 आमची तुमच्याविषयीची आशा बळकट आहे. कारण आम्हांला ठाऊक आहे की, जसे तुम्ही दु:खाचे भागीदार आहात तसे सांत्वनाचेही भागीदार आहात. 8 बंधूंनो, आशिया प्रांतात जो त्रास आम्ही सहन केला त्याविषयी तुम्ही अंधारात असावे अशी आमची इच्छा नाही. आम्हांला तेथे मोठे ओझे होते. आमच्या शक्तिपलीकडचे ते ओझे होते. आम्ही जीवनाविषयीची आशासुद्धा सोडून दिली होती. 9 खरोखर आम्हांला वाटत होते की, आम्ही मरु, पण आम्ही आपल्या स्वत:वर भरंवसा ठेवू नये, यासाठी हे घडले. हे यासाठी घडले की, जो मनुष्यांना मरणातून उठवितो त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा. 10 देवाने आम्हांला मरणाच्या मोठ्या संकटातून वाचविले. आणि देव आम्हांला पुढेदेखील वाचवील. आम्ही त्याच्यावर आमची आशा ठेवली आहे. यासाठी की, तो यापुढे ही आम्हांस सोडवील. 11 तुम्ही प्रार्थना करण्याने आम्हांला मदत करावी. मग पुष्कळ लोक आमच्यासाठी उपकार मानतील की त्यांच्या पुष्कळ प्रार्थनांमुळे देवाने आम्हाला आशीर्वादित केले आहे. 12 कारण आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सद्सद्विवेकबुद्धीची साक्ष होय. ती अशी की आम्ही मानवी ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामणिकपणे जगात व विशेषकरुन तुमच्याजवळ वागलो. 13 कारण ज्या गोष्टी तुम्ही वाचता किंवा मान्य करता, त्याशिवाय दुसऱ्या गोष्टी आम्ही तुम्हांस लिहित नाही. आणि शेवटपर्यंत तुम्ही नीट जाणून घ्याल अशी आशा धरतो. 14 आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्हांस काही अंशी जाणता की प्रभु येशूच्या दिवशी जसे आम्ही तुमच्याविषयी अभिमान बाळगतो तसे तुम्हीही आमच्याविषयी अभिमान बाळगता. 15 मला याविषयीची खात्री असल्याने तुम्हांला पहिल्याने भेटण्याची योजना केली, यासाठी की तुम्हांला फायदा व्हावा. 16 मी मासेदोनियाला जाताना तुम्हांला भेटण्याची योजना केली आणि मासेदोनियाहून परत येताना तुमच्याकडे येण्याचे ठरविले आणि त्यानंतर तुम्ही मला यहूदीयाला जाण्यासाठी मदत करावी. 17 जेव्हा मी असा बेत केला, तेव्हा तो मी गंभीरपणे विचार न करता केला काय? किंवा मी माझ्या योजना जगाच्या रीतीप्रमाणे करतो काय, म्हणजे मी एकाच वेळेला “होय, होय” आणि “नाही, नाही” असे म्हणतो काय? 18 पण देव खात्रीने विश्वासपात्र आहे, म्हणून तुम्हांजवळ आम्ही तुम्हांला होय किंवा नाही म्हणून असे वचन दिलेले नाही, असे नाही. 19 कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त जो आम्हांकडून, म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य यांजकडून तुम्हांमध्ये गाजविला गेला, तो होय किंवा नाही असा झाला नाही, तर तो फक्त होकारार्थीच आहे. 20 कारण देवाची वचने कितीही असली तरी ती त्याच्यामध्ये होकारार्थी आहेत, यामुळे त्याच्याद्वारे आम्हांकडून देवाचे गौरव व्हावे म्हणून त्याच्याद्वारे विशेष आशीर्वाद आहे (आमेन). 21 आता जो तुम्हांसहित आम्हांस ख्रिस्तामध्ये स्थिर करतो व ज्याने आम्हांस अभिषेक केला तो देव आहे. 22 मालकीपणाचा शिक्का आमच्यावर मारला व जो येणार आहे त्याबद्दलची खात्री म्हणून आपला आत्मा आमच्या अंतरंगात ठेव म्हणून ठेवला. 23 मी देवाला साक्षी होण्यासाठी हाक मारुन आपल्या जिवाची शपथ घेऊन सांगतो की तुमच्याशी कठोर व्यवहार करु नये म्हणून मी करिंथला आलो नाही. 24 आम्ही तुमच्या विश्वासावर स्वामित्व करतो असे नाही, पण तुमच्या आनंदासाठी आम्ही तुमच्याबरोबर काम करतो. कारण विश्वासाने तुम्ही स्थिर राहता.

2:1 म्हणून मी असा निश्चय केला की, मी पुन्हा तुमची दु:खदायक अशी भेठ घेणार नाही. 2 कारण जर मी तुम्हांला दु:ख देतो तर मला तुमच्याशिवाय आनंद कोण देईल? 3 आणि मी तुम्हांस हे यासाठी लिहिले की, मी आल्यावर ज्यांच्यापासून मी आनंदी व्हावे त्यांच्यापासून मला दु:ख होऊ नये. मला तुम्हा सर्वांविषयी विश्वास आहे की, माझा आनंद तो तुम्हा सर्वांचादेखील आहे. 4 कारण मी अत्यंत दु:खाने व कळवळून हे लिहित आहे पण तुम्हांला खिन्न करावे म्हणून नव्हे तर तुमच्याविषयी माझ्या मनात जी प्रीति आहे तिची खोली तुम्हांला समजावी म्हणून लिहित आहे. 5 जर कोणी कोणाला दु:ख दिले असेल तर त्याने फक्त मलाच ते दिले असे नाही, तर काही प्रमाणात तुम्हा सर्वांना दिले आहे. त्यासंबंधी मी फार कठीण होऊ इच्छित नाही. 6 अशा मनुष्यांना सगळ्यांनी मिळून दिलेली शिक्षा पुरे. 7 आता त्याऐवजी तुम्ही त्याला क्षमा केली पाहिजे आणि त्याचे सांत्वन केले पाहिजे. यासाठी की अति दु:खाने तो दबून जाऊ नये. 8 मी विनंति करतो, म्हणून तुमचे त्याच्यावरील प्रेम पुन्हा व्यक्त करा. 9 मी तुम्हांला लिहिण्याचे कारण हेच की तुम्ही परीक्षेत टिकता की नाही व प्रत्येक बाबतीत तुम्हा आज्ञाधारक राहता की नाही हे पाहावे. 10 जर तुम्ही एखाद्याला क्षमा करता तर मीसुद्धा त्याला क्षमा करीन. आणि ज्याची ज्या कशाची मी क्षमा केली आहे, आणि त्यातूनही जर काही क्षमा करण्याचे राहिले असेल - तर मी ख्रिस्ताच्या नजरेत तुमची क्षमा केली आहे. 11 यासाठी की सैतानाने आम्हांवर वरचढ होऊ नये. कारण त्याच्या योजना आम्हाला माहीत नाहीत असे नाही. 12 जेव्हा मी ख्रिस्ताच्या सुवार्तेकरिता त्रोवसास आलो तेव्हा प्रभूमध्ये मजसाठी दार उघडल्यावर, 13 माझा भाऊ तीत मला तेथे सापडला नाही, म्हणून माझ्या आत्म्याचे सामाधान झाले नाही. पण तेथील लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियास गेलो. 14 पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हांला विजयी करतो व त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध आमच्याद्धारे सगळीकडे पसरवितो. 15 कारण आम्ही, जे तारले जात आहोत व जे नाश पावत आहेत ते देवाला वाहिलेला ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत. 16 हरवलेल्यांसाठी आम्ही मरणाचा वास आहोत तर जे तारले गेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही जीवनाचा सुगंध आहोत. आणि या कामासाठी बरोबरीचा कोण आहे? 17 इतरांसारखे आम्ही फायद्यासाठी देवाच्या वचनाचे काम करीत नाही. याउलट ख्रिस्तामध्ये देवासमोर आम्ही देवाने पाठविलेल्या माणसांसारखे प्रामाणिकपणे बोलतो.

3:1 पुन्हा, आम्ही आमची प्रशंसा करायला लागलो काय? किंवा आम्हांला काही लोकांसारखी तुमच्याकडे येण्यास किंवा तुमच्याकडून येण्यास शिफारसपत्रांची आवश्यकता आहे काय? 2 तुम्ही स्वत:च आमची शिफारसपत्रे आहात. आमच्या अंत:करणावर लिहिलेले, प्रत्येकाने वाचलेले व प्रत्येकाला माहीत असलेले. 3 तुम्ही दाखवून देता की, तुम्ही ख्रिस्ताकडून आलेले पत्र आहात, आणि ते आमच्या सेवेचा परिणाम शाईने लिहिलेले पत्र नव्हे, तर जिवंत देवाच्या आत्म्याने लिहिलेले, दगडी पाट्यावर नव्हे तर मानवी हृदयाच्या पाट्यांवर लिहिलेले आहात. 4 देवासमोर ख्रिस्ताद्धारे अशा प्रकारचा आमचा विश्वास आहे. 5 असे नाही की आम्ही स्वत:हून आमच्यासाठी सर्वकाही करण्यास समर्य आहोत, तर आमचे सामर्थ्य देवापासून येते. 6 त्याने आम्हांला नव्या कराराचे सेवक म्हणून समर्थ बनविले आहे- पत्राने नव्हे तर आत्म्याने, कारण पत्र मारुन टाकते, पण आत्मा जीवन देतो. 7 आता जर सेवेमुळे मरण येते, जी दगडावर अक्षरांनी कोरलेली होती आणि जर ती सेवा गौरवाने आली, यासाठी की, इस्राएल लोकांना मोशेच्या चेहऱ्याचे तेजोवलय पाहता येऊ नये, जरी ते तेज कमी होत चालले होते. 8 तर आत्म्याची सेवा त्यापेक्षा गौरवी होणार नाही काय? 9 कारण जर सेवा जी माणसाचा निषेध करते ती गौरवी असेल, तर तिच्यापेक्षा कितीतरी गौरवी ती सेवा असेल जी नीतिमत्व आणते! 10 त्यात गौरव होते, पण जेव्हा त्यापेक्षा महान गौरवासमोर तुलना केली जाते, तेव्हा ते कमी होते. 11 आणि जर ते निस्तेज होत जाणारे गौरवाने आले तर जे टिकते त्याचे गौरव किती महान असेल! 12 म्हणून आम्हांला अशी आशा असल्यामुळे, आम्ही फार धीट आहोत. 13 आम्ही मोशेप्रमाणे नाही, ज्याने तोंडावर आवरण घेऊन त्याच्या चेहऱ्याच्या तेजामुळे (इस्राएली लोकांचे डोळे दिपून जाऊ नयेत) त्याचा चेहरा लोकांना दिसणार नाही म्हणून तोंड झाकून घेतले, जरी त्या वेळेला त्याचे तेज कमी होत चालले होते. 14 पण त्यांची मने मंद करण्यात आली होती. कारण आजपर्यंत तोच पडदा (आवरण) राहतो, जेव्हा जुना करार वाचला जातो. तो हटवण्यात आलेला नाही. कारण केवळ ख्रिस्तामध्येच तो बाजूला घेतला जाईल. 15 तरी आजपर्यंत जेव्हा मोशेचे ग्रंथ वाचतात तेव्हा त्यांच्या मनावर आच्छादन राहते. 16 पण जेव्हा केव्हा कोणी प्रभूकडे वळतो तेव्हा ते आवरण काढून घेतले जाते. 17 प्रभु आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपणा आहे. 18 तर आपण सर्वजण आवरण नसलेल्या चेहऱ्याने प्रभुचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता, प्रभु जो आत्मा याच्यापासून गौरवातून गौरवात असे त्याच्या प्रतिरुपात रुपांतरीत होत जातो.

4:1 म्हणून देवाच्या दयेद्वारे आम्हाला ही सेवा मिळाली आहे, आम्ही धीर सोडत नाही. 2 तर आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी सोडून दिल्या आहेत, आम्ही कपटाने वागत नाही. आणि कपटदृष्टीने देवाच्या वचनाचा उपयोग करीत नाही, तर देवासमोर खरेपण प्रगट करण्यास आम्ही आपणांसमोर सर्व लोकांच्या सद्सदविवेकबुध्दिला पटवितो. 3 आणि जरी आमचे शुभवर्तमान आवरण घातलेले आहे, जे नाश पावत आहेत अशांसाठी ते आच्छादित आहे. 4 या जगाच्या देवाने अविश्वासणाऱ्यांची मने आंधळी केली आहेत. यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांना पाहता येऊन नये. जो देवाच्या प्रतिमेचा आहे. 5 कारण आम्ही आमचीच सुवार्ता सांगत नाही तर ख्रिस्त येशू हाच प्रभु आहे अशी घोषणा करतो आणि आम्ही येशू ख्रिस्तासाठी तुमचे सेवक आहोत असे स्वत:विषयी सांगतो. 6 कारण देव, जो म्हणाला, “अंधारातून प्रकाश होवो.” त्याने तो प्रकाश, आमच्या अंत:करणात ख्रिस्ताच्या चेहेऱ्यात देवाच्या गौवाच्या ज्ञानात दाखवावा. 7 पण आमचा हा ठेवा मातीच्या भांड्यामध्ये आहे. यासाठी की, सामर्थ्याची पराकोटी देवापासून येते, आम्हांकडून नाही. 8 आम्हांवर चारी दिशांनी संकटे येतात, पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही, गोंधळलेलो आहोत, पण निराश झालो नाही. 9 छळ झालेले असे आहोत पण टाकून दिलेले असे आम्ही नाही, खाली पडलेलो असलो तरी आमचा नाश झालेला नाही. 10 आम्ही नेहमी येशूचे मरण आमच्या शरीरात घेऊन जात असतो. यासाठी की ख्रिस्ताचे जीवनही आमच्या शरीराद्वारे प्रकट व्हावे. 11 कारण आम्ही जे जिवंत आहोत ते आम्ही नेहमीच ख्रिस्ताकरिता मरणाला सोपविलेले आहोत. यासाठी त्याचे जीवन आमच्या मर्त्य शरीराद्वारे प्रकट व्हावे. 12 म्हणून मग, आमच्यामध्ये मृत्यू काम करीत आहे, पण तुमच्यामध्ये जीवन काम करीत आहे. 13 असे लिहिले आहे: “मी विश्वास ठेवला; म्हणून मी बोललो आहे.” विश्वासच्या त्याच आत्म्याने आम्हीसुद्धा विश्वास ठेवतो आणि म्हणून बोलतो. 14 कारण आम्हांला माहीत आहे ज्याने प्रभु येशूला उठविले, तो त्याच्याबरोबर आम्हांला उठवील व आम्हांला तुमच्याबरोबरच त्याच्यासमोर सादर करील. 15 कारण या सर्व गोष्टी तुम्हाकरिता आहेत. यासाठी की, पुष्कळांच्या द्धारे विपुल झालेली कृपा अनेकांच्या उपकारस्तुतीमुळे देवाचे भरघोस गौरव होण्याला कारण व्हावी. 16 म्हणून आम्ही धीर सोडीत नाही. जरी बाह्यदृष्ट्या आम्ही व्यर्थ ठरत आहोत तरी अंतरीकदृष्ट्या आम्ही दिवसेंदिवस नवीन होत आहोत. 17 कारण आमची हलकी व क्षणिक दु:खे ही आमच्यासाठी अनंतकळचे गौरव मिळवीत आहेत, जे दु:खापेक्षा कितीतरी मोठे आहे. 18 म्हणून आम्ही ज्या गोष्टी कायमस्वरुपात दिसत नाहीत तिकडे आमचे डोळे लावीत नाही पण जे दिसत नाही, पण अविनाशी आहे त्याकडे डोळे लावतो. कारण जे दिसते ते क्षणिक आहे, पण जे दिसत नाही, ते अनंतकालीक आहे.

5:1 आता आम्हांला माहीत आहे की, जेव्हा जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो, नष्ट झाले, तर आम्हाला देवापासून मिळलेले अनंतकाळचे घर स्वर्गात आहे. ते मानवी हातांनी बांधलेले नाही. 2 दरम्यान आम्ही कण्हतो, आमच्या स्वर्गीय निवासस्थानासह पोशाख करण्यास आम्ही आतुर झालो आहोत. 3 कारण जेव्हा आम्ही पोशाख करु, तेव्हा आम्ही नग्न दिसणार नाही. 4 कारण या घरामध्ये आम्ही असताना आम्ही कण्हतो, आणि ओइयाने दबले जातो. कारण वस्त्रहीन असण्याची आमची इच्छा नसते, पण आमची इच्छा आहे की, आमच्या स्वर्गीय निवासस्थानाने पोशाख करावा. यासाठी की जे मर्त्य आहेत ते जीवनाने गिळावे. 5 आता देवानेच आम्हांला नेमक्या याच कारणासाठी निर्माण केले, आणि हमी म्हणून पवित्र आत्मा दिला, जो येणार आहे त्याबद्दलची खात्री बाळगा. 6 म्हणून आम्हांला नेहमीच विश्वास असतो आणि माहीत असते की, जोपर्यंत आम्ही या शरीरात राहत आहोत, तोपर्यंत आम्ही प्रभुपासून दूर आहोत. 7 आम्ही विश्वासाने जगतो, जे बघतो त्याने 8 आम्हांला विश्वास आहे, मी म्हणतो, आणि शरीरापासून दूर राहण्याचे आम्ही पसंत करु. आणि प्रभुसंगती राहू. 9 म्हणून त्याला संतोषविणे हे आम्ही आमचे ध्येय करतो, आम्ही शरीराने जगत असलो किंवा प्रभुपासून दूर असलो तरी. 10 कारण आम्हांला सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहायचे आहे. आणि प्रत्येकाला त्याचे जे प्रतिफळ मिळणार आहे. म्हणजे शरीरात असताना ज्या वाईट किंवा चांगल्या गोष्टी केल्या त्याप्रमाणे बक्षिस मिळेल.देवाचे मित्र होण्यासाठी लोकांना मदत करणे 11 म्हणून आम्ही जाणतो की देवाचे भय कशासाठी धरायचे व त्यासाठी आम्ही मनुष्यांना वळविण्याचे प्रयत्न करतो. आम्ही जे आहोत ते देवासमोर स्पष्ट आहोत. आणि माझी आशा आहे की, तुमची सद्सद्विवेकबुध्दि आम्हांला जाणते. 12 आम्ही तुमच्यासमोर आमची पात्रता पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत नाही. पण आमच्याविषयी तुम्ही अभिमान बाळगावा यासाठी संधी देत आहोत, यासाठी की तुम्ही अशांना उत्तर द्यावे की जे पाहिलेल्या गोष्टीविषयी अभिमान बाळगतात आणि अंत:करणात जे आहे त्याविषयी बाळगत नाहीत. 13 जरी आम्ही वेडे असलो तरी ते ख्रिस्तासाठी, जर आम्ही आमच्या योग्य मन:स्थितीत असलो तर ते तुमच्यासाठी. 14 कारण ख्रिस्ताचे प्रेम आम्हाला भाग पाडते, कारण आमची खात्री झाली आहे की, जर एक सर्वांसाठी मेला आणि म्हणून सर्व मेले. 15 आणि तो सर्वांसाठी मेला, यासाठी की जे जगतात त्यांनी स्वत:साठीच जगू नये तर जो त्यांच्यासाठी मेला व पुन्हा उठला त्याच्यासाठी जगावे. 16 म्हणून आतापासून जगिक दृष्टीकोनातून आम्ही कोणाला मानत नाही, तरी एकेकाळी आम्ही ख्रिस्ताला अशाप्रकारे मानले. पण आता आम्ही तसे करीत नाही. 17 म्हणून, जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, तर तो नवी उत्पत्ति आहे. जुने गेल आहे. नवीन आले आहे! 18 हे सर्व देवापासून आहे त्याने ख्रिस्ताद्वारे आमच्याशी स्वत:चा समेट केला आणि आम्हांला समेटाची सेवा दिली. 19 देव ख्रिस्तामध्ये जगाशी स्वत:चा समेट करीत होता. मनुष्यांची पापे त्यांच्याविरुद्ध मोजत नव्हता. आणि त्याने आम्हांला समेटाचा संदेश दिला आहे. 20 म्हणून आम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहोत, जणू काय देव आमच्या द्वारे त्याचे आवाहन करीत होता. ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हांला विनंति करतो. देवाशी समेट करा. 21 ज्याच्याठायी पाप नव्हते त्याला आमच्यासाठी देवाने पाप केले. यासाठी की त्याच्यामध्ये आम्ही देवाचे नीतिमत्व व्हावे.

6:1 देवाचे सहकर्मचारी म्हणून आम्ही तुम्हांला विनंति करतो की, जी देवाची कृपा आपल्याला मिळते ती व्यर्थ घालवू नका. 2 कारण तो म्हणतो, “माझ्या सोयीच्या वेळी मी तुझे ऐकले आणि तारणाच्या दिवसात मी तुला मदत केली.” यशया 49:8मी तुम्हांला सांगतो, देवाच्या “सोयीची वेळ” आताच आहे. आताच “तारणाचा दिवस” आहे. 3 आमची सेवा दोषी ठरु नये यासाठी आम्ही कोणालाही दोष देत नाही. 4 उलट सर्व प्रकारच्या परिस्थितीत आम्ही देवाचे सेवक होतो हे आम्ही दाखवून दिले. मग आम्हांला त्रास सोसावा लागो, नाहीतर अडचणी येवोत, छळ होवो नाहीतर वेदना होवोत. छळात, आणि दु:खात 5 फटके खाण्यात, तुंरुगवासात आणि दंग्यात, कठोर श्रमात, जागून काढलेल्या रात्रीत, भुकेले असताना, 6 शुद्धतेत, समजूतदारपणात, सहनशीलतेत, आणि दयाळूपणात, पवित्र आत्म्याच्या आणि निर्व्याज प्रीतीमुळे, 7 सत्य बोलण्यात, आणि देवाच्या सामर्थ्यात, आक्रमक आणि संरक्षक पद्धतीने नीतिमत्वाच्या शस्त्रांसह, 8 गौरव व अपमानाद्वारे, आमच्याबद्दलच्या वाईट व चांगल्या बातमीने शहाणपणाने, तरीही फसविणारे ठरले गेलेलो. 9 जरी आम्ही प्रसिद्ध असलो, तरी अप्रसिद्ध असे समजले गेलेलो, मरत असलेले तरी जगत असलेलो, मारलेले तरी अजून ठार न केलेले, 10 दु:खी तरी नेहमी आनंद करीत, गरीब तरी पुष्कळांना श्रीमंत करणारे, जवळ काही नसलेले तरी सर्व काही जवळ असणारे असे आहोत. 11 आम्ही मोकळे पणाने तुमच्याशी बोललो, करिंथकरांनो, आणि आमची अंत:करणे तुमच्यासमोर अगदी पूर्णपणे रीतीने उघडी केली. 12 आम्ही तुमच्याबद्दल प्रेमभावना ठेवण्याचे थांबवले नाही, पण तुमची आमच्याबद्दलची प्रेमभावना मात्र थबकली आहे. 13 आपल्यातली देवाणघेवाण चांगली असावी म्हणून मी तुमच्याशी माइया मुलांप्रमाणे बोलतो. तुम्हीही तुमची अंत:करणे विशाल करा. 14 जे तुमच्या बरोबरीचे नाहीत त्यांच्याबरोबर एका जुवाखाली एकत्र येऊ नका. नाहीतर नीतिमान व दुष्टपणा यात काय फरक उरला? किंवा प्रकाश व अंधार यात कोणते साम्य आहे? 15 ख्रिस्त आणि बलियालयांचा सलोखा कसा होणार? विश्वासणाऱ्याचा अविश्वासणाऱ्या बरोबर काय सारखेपणा आहे? 16 देवाचे मंदिर आणि मूर्ति यांच्या मान्यता एक कशा असतील? कारण आम्ही जिवंत देवाचे मंदिर आहोत, ज्याप्रमाणे देवाने म्हटले आहे:“मी त्यांच्याबरोबर राहीन, आणि त्यांच्याबरोबर चालेन, मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.”लेवीय 26:11-12 17 “म्हणून त्यांच्यामधून बाहेर या आणि स्वत:ला त्यांच्यापासून वेगळे करा. प्रभु म्हणतो, अशुद्ध वस्तूला स्पर्श करु नका, आणि मी तुम्हांला स्वीकारीन.”यशया 52:11 18 “मी तुम्हांला पिता असा होईन, तुम्ही माझी मुले व कन्या व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभु म्हणतो”.2 शमुवेल 7:14; 7:8

7:1 प्रिय मित्रांनो, देवाची अभिवचने आमच्याकडे असल्याने जे शरीर व आत्म्याला दुषित करते त्या प्रत्येक गोष्टीपासून स्वत:ला शुद्ध ठेऊ या. देवाविषयी असलेल्या आदराने पवित्रतेत परिपूर्ण होऊ या. 2 तुमच्या अंत:करणात आमच्यासाठी जागा करा: आम्ही कोणाचेही वाईट केले नाही. आम्ही कोणाला भ्रष्ट केले नाही. आम्ही कोणाचा गैर फायदा घेतला नाही. 3 मी तुम्हांला तुमचा निषेध करावा म्हणून असे म्हणत नाही. मी तुम्हांला अगोदरही सांगितले आहे की, आमच्या अंत:करणात तुमच्याविषयी असे स्थान आहे की, आम्ही तुमच्याबरोबर जगू किंवा मरु. 4 मला तुमच्याविषयी मोठा विश्वास वाटतो, मला तुमच्याविषयी खूप अभिमान वाटतो, तुमच्या बाबतीत मी अधिक उत्तेजित झालो आहे. अनेक त्रास झाले तरी आमच्या सर्व त्रासात आमच्या आनंदाला उधाण आले आहे. 5 कारण जेव्हा आम्ही मासेदिनियाला आलो, तेव्हा आमच्या या शरीराला विसावा नव्हता. पण आम्हांला प्रत्येक ठिकाणी त्रास देण्यात आला, बाहेरुन भांडणे, आतून भीति होती. 6 पण जे हताश झाले आहेत त्याचे सांत्वन देव करतो, त्याने तीताच्या येण्याने आमचे सांत्वन केले. 7 त्याच्यामुळेच नव्हे तर तुम्ही त्याला दिलेल्या सांत्वनामुळेसुद्धा. तुमच्या आमच्याबद्दल असलेल्या ओढीबद्दल त्याने आम्हांला सांगितले आहे. तुमचे खोलवरचे दु:ख, माइयाबद्दलची तुमची असलेली तीव्र सदिच्छा याविषयी सांगितले, त्यामुळे माझा आनंद पूर्वीपेक्षा वाढला आहे. 8 जरी मी माझ्या पत्रामुळे तुम्हांला दु:खावले असले तरी त्याबद्दल मला खेद होत नाही, जरी मला खेद होत असला तरी मला आता जाणवले आहे की, माझ्या पत्रामुळे तुम्हांला दु:ख झाले, पण फक्त थोड्या वेळापुरते असावे. 9 तरी आता मी आनंदी आहे. यासाठी नाही की, तुम्हांला दु:खी केले, तर यासाठी की तुमच्या दु:खामुळे तुम्ही पशचात्ताप केला. कारण देवाने इच्छिल्याप्रमाणे तुम्ही दु:खी झाला आणि म्हणून आमच्याकडून कुणाची कोणत्याही प्रकारे हानि झाली नाही. 10 दैवी दु:ख तारणाप्रत नेणारा पश्र्चात्ताप आणते आणि कोणताही खेद बाळ्गीत नाही, पण जगिक दु:ख मरण आणते. 11 पहा दैवी दु:खामुळे तुमच्यात काय निर्माण झाले आहे: किती तरी गंभीरपणा आणि आत्मियता, स्वत:ला स्पष्ट करण्यासाठी किती उत्सुकता, किती संताप, किती सावधानता, किती ओढ, किती सदिच्छा व न्याय मिळवून देण्यासाठी किती तत्परता, या बाबतीत प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वत:ला निर्दोष असे सिद्ध केले. 12 म्हणून जरी मी तुम्हांला लिहिले तरी ते कोणी चूक केली म्हणून किंवा कोणी दूसऱ्याला दु:ख दिले म्हणून नाही तर उलट देवासमोर तुम्ही आमच्या बाबतीतील तुमची आत्मियता दाखवली हे तुम्हांला पाहता यावे. 13 यामुळे आम्हास उत्तेजन मिळाले.आमच्या स्वत:च्या उत्तेजनाशिवाय आणखी आम्ही विशेषत: तीताला आनंदीत पाहून आम्हांला आनंद झाला कारण त्याचा आत्मा तुम्हा सर्वांमुळे ताजातवाना झाला आहे. 14 मी त्याला तुमच्याविषयी अभिमानाने सांगितले आणि तुम्ही मला लज्जित केले नाही. पण जे सर्व काही आम्ही तुम्हांला सांगितले ते खरे खरे होते. तसा आमचा तुमच्याविषयीचा अभिमान जो तीताला सांगितला ह्याच रीतीने स्वत:चा खरेपणा सिद्ध केला. 15 आणि जेव्हा त्याला तुमचा आज्ञाधारकपणा आठवतो तेव्हा त्याचे तुमच्या विषयीचे प्रेम अधिकच वाढते. त्याचा स्वीकार तुम्ही भीत व कांपत केला. 16 मला आनंद वाटतो की मला तुमच्याविषयी पूर्ण विश्वास वाटू शकतो.

8:1 आणि आता, बंधूनो, आम्हांला असे वाटते की, तुम्ही हे जाणून घ्यावे की, मासेदिनियातील मंडळ्यांना देवाने कशी कृपा दिली. 2 अत्यंत खडतर अशी संकटे असली तरी त्यांचा ओसंडून वाहणारा आनंद आणि त्यांचे आत्यांतिक दारिद्य विशाल उदारतेत उभे राहिले. 3 कारण मी साक्ष देतो की, त्यांना जितके शक्य होते तितके त्यांनी दिले. आणि त्यांच्या क्षमतेपेक्षाही जास्त दिले. त्यांनी उत्सफूर्तपणे स्वत:ला दिले. 4 संतांच्या सेवेमुळे मिळणाऱ्या आशीर्वादामध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळावा म्हणून त्यांनी आस्थेवाईकपणे आम्हांला विनंति केली. 5 आणि आम्ही अपेक्षा केली त्याप्रमाणे त्यांनी केले नाही, तर त्यांनी स्वत:ला प्रथम देवाला दिले. आणि मग देवाच्या इच्छेला राखून आम्हांला दिले. 6 मग आम्ही तीताला विनंति केली, त्याने अगोदर जशी सुरुवात केली होती तशीच त्याने तुम्हामध्ये या कुपेची पूर्णताही करावी. 7 म्हणून जसे तुम्ही सर्व गोष्टीत, म्हणजे विश्वासात, बोलण्यात ज्ञानात व सर्व आस्थेत व आम्हांवरील आपल्या प्रीतीत वाढला आहा, तसे तुम्ही या कृपेतही फार वाढावे. 8 मी तुम्हांला आज्ञा करीत नाही, पण मला तुमच्या प्रेमच्या प्रामाणिकतेची तुलना इतरांच्या आस्थेशी करायची आहे. 9 कारण तुम्हांला आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा माहीत आहे की, जरी तो श्रीमंत होता तरी तुमच्याकरिता तो गरीब झाला, यासाठी की, त्याच्या गरीबीने तुम्ही श्रीमंत व्हावे. 10 आणि तुमच्या फायद्यासाठी माझा सल्ला असा आहे की, गेल्या वर्षी तुम्ही केवळ देण्यातच नव्हे तर तशी इच्छा करण्यात पहिले होता. 11 आता ते काम पूर्ण करा, यासाठी की कार्य करण्याची तुमची उत्सुकता ही ती तुमच्याकडे ज्या प्रमाणात आहे त्यानुसार पूर्ण करण्यात यावी. 12 कारण जर इच्छा असेल, तर एखाद्याकडे जे असेल तसे मान्य होईल. जर नसेल तर मान्य होणार नाही. 13 दुसऱ्याचे ओझे हलके करण्यासाठी तुमच्यावर ओझे लादावे असे नाही तर समानता असावी म्हणून. 14 सध्याच्या काळात तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी. यासाठी की नंतर त्याच्या विपुलतेमुळे तुमच्या गरजा भागविल्या जाव्यात. मग समानता येईल. 15 पवित्र शास्त्र म्हणते,“ज्याने पुष्कळ गोळा केले होते, त्याला जास्त झाले नाही. ज्याने थोडे गोळा केले होते, त्याला कमी पडले नाही.” निर्गम 16:18तीत आणि त्याचे सोबती 16 जी आस्था माझ्यामध्ये तुमच्याविषयी आहे ती आस्था देवाने तीताच्या अंत:करणात घातली याबद्दल मी देवाचे आभार मानतो, 17 कारण तीताने आमच्या आवाहनाचे स्वागतच केले असे नाही तर तो पुष्कळ उत्सुकनेने आणि त्याच्या स्वत:च्या मोठ्या आस्थेने तुमच्याकडे येत आहे. 18 आणि आम्ही त्याच्याबरोबर एका बंधूला ज्याची त्याच्या सुवार्तेबद्दलच्या मंडळ्यातील सेवेबद्दल वाहवा होत आहे, त्याला पाठवीत आहोत. 19 यापेक्षा अधिक म्हणजे मंडळ्यांनी आम्हासांगती दानार्पण घेऊन जाण्यासाठी त्याची निवड केली. जे आम्ही प्रभुच्या गौरवासाठी करतो आणि मदत करण्याची आमची उत्सुकता दिसावी म्हणून हे करतो. 20 ही जी विपुलता आम्हांकडून सेवेस उपयोगी पडत आहे तिच्या कामात कोणीही आम्हांवर दोष लावू नये म्हणून आम्ही काळजीपूर्वक वागत आहोत. 21 कारण जे प्रभुच्या दृष्टीने चांगले तेच आम्ही योजितो, एवढेच नाही तर माणसांच्या दृष्टीने जे चांगले ते योजितो. 22 त्याला सोडून आम्ही त्यांच्याबरोबर आमच्या बंधूलाही पाठवित आहोत. ज्याने आम्हाला स्वत:ला पुष्कळ बाबतीत आवेशी असल्याचे सिद्ध करुन दाखविले आहे आणि आता त्याला तुमच्याबद्दल वाटत असलेल्या विश्वासामुळे तो अधिक आवेशी झाला आहे. 23 तीताच्या बाबतीत सांगायाचे तर, तो तुमच्यामधील माझा एक सहकारी व सहकर्मचारी आहे, आमच्या इतर बंधूंच्या बाबतीत सांगायचे तर, ते ख्रिस्ताला गौरव व मंडळ्यांचे प्रतिनिधी आहेत. 24 म्हणून या लोकांना तुमच्या प्रेमाचा पुरावा द्या. आणि आम्हांला तुमच्याबद्दल वाटत असलेल्या अभिमानबद्दलचे समर्थन करा. यासाठी की, मंडळ्यांनी ते पाहावे.

9:1 या संताच्या सेवेसाठी मी तुम्हांला काही लिहावे याची गरज भासत नाही. 2 कारण मदत करण्याबद्दलची तुमची उत्सुकता मला माहीत आहे. आणि मी मासेदोनियातील लोकांना याविषयी अभिमानाने सांगत होतो की, गेल्या वर्षापासून अखयातील तुम्ही लोक देण्यासाठी तयार आहात आणि तुमच्या जोशामुळे पुष्कळ जण कृति करण्यास आवेशाने पुढे आले आहेत. 3 परंतु मी भावांना यासाठी पाठवीत आहे की, आमचा तुमच्याविषयी या बाबतीत अभिमान पोकळ ठरु नये. पण जसे आम्ही तुम्हांला सांगितले तसे तुम्ही तयार असावे. 4 कारण कोणी मासेदोनियाचा मनुष्य माझ्याबरोबर आला, आणि जर त्याने तुम्हांला तयार नसलेले पाहिले, तर तुम्ही लज्जित व्हाल असे आम्हाला म्हणायचे नाही. तर आम्ही लज्जित होऊ. 5 म्हणून मला हे आवश्यक आहे की, बंधूनी आम्हांला आगाऊ भेट देण्यासाठी त्यांना विंनति करावी आणि उदार देणगी जी तुम्ही देण्याचे अभिवचन दिले आहे, तिच्याविषयीची व्यावस्था संपवावी. मग ती उदारहस्ते दिलेली देणगी ठरेल व कुरकुर करीत दिलेले दान ठरणार नाही. 6 हे लक्षात ठेवा: जो हात राखून पेरतो तो त्याच मापाने कापणी करील, आणि जो उदार हाताने पेरील तो त्याच मापाने कापणी करील. 7 प्रत्येक माणसाने अंत:करणात ठरविल्याप्रमाणे द्यावे, खेदाने किंवा बळजबरीने देणे भाग पडते म्हणून देऊ नये. कारण आनंदाने देणाऱ्यावर देव प्रेम करतो. 8 आणि देव तुम्हाला कृपेने विपुल देण्यास समर्थ आहे. यासाठी की सर्व गोष्टीत सर्व वेळी, तुम्हांला विपुलता मिळेल आणि चांगल्या कामसाठी अधिक तत्पर व्हाल. 9 असे लिहिले आहे:“तो गरीबांना उदारहस्ते देतो, त्याची दया अनंतकाळपर्यंत राहील.”स्तोत्र. 112:9 10 जो पेरणाऱ्याला बी व खाणऱ्याला अन्न पुरवितो, तो तुम्हाला पेरायला बी पुरवील आणि ते अनेकपट करील. आणि तुमच्या नीतिमत्वाची फळे वाढवील. 11 सर्व प्रकारच्या उदारपणाकरिता प्रत्येक गोष्टीत धनवान व्हाल. यामुळे तुम्हीदेखील उदारपणे द्यावे ज्यामुळे देवाची स्तुति होईल. 12 कारण या अर्पणकार्याची ही सेवा संताच्या गरजा पुरविते. इतकेच केवळ नाही तर देवाला अनेक गोष्टी दिल्याने विपुलता येते. 13 कारण या सेवेमुळे तुम्ही स्वत:ला योग्य शाबित करता, आणि ते देवाचे गौरव करतात, तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता त्या ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला अधीन असल्याने तुमचे स्वीकारणे. 14 आणखी ते तुम्हाकरिता प्रार्थना करीत असता तुम्हावर देवाने जी विपुल कृपा केली आहे, त्यामुळे तुमची भेट व्हावी अशी उत्कंठा ते धरतात. 15 देवाच्या अनिर्वाच्य देणग्यांबद्दल त्याचे आभार मानतो.

10:1 ख्रिस्ताच्या नम्रतेने व सौम्यतेने मी तुम्हांला उत्तेजन देतो. मी, पौल, जेव्हा तुमच्या समोर येतो तेव्हा ‘भित्रा’ असतो पण जव्हा तुमच्यापासून दूर असतो तेव्हा “धीट” असतो! 2 मी आशा करतो की, जेव्हा मी येतो तेव्हा, काही लोक ज्यांना असे वाटते की आम्ही जगाच्या रीतीप्रमाणे जगतो त्यांच्याबाबतीत लोक जितकी अपेक्षा करतात, तितका मी धीट असणार नाही, जितकी मी अपेक्षा करतो. 3 कारण जरी आम्ही जगामध्ये राहत असलो, तरी जगाप्रमाणे लढाई करीत नाही. 4 ज्या शस्त्राने आम्ही लढाई करतो ती जगातल्या शस्त्रांसारखी नाहीत. उलट, त्यांच्यामध्ये दैवी शक्ति आहे ज्यामुळे शत्रूचे बुरुज नष्ट होतात. 5 आम्ही वाद आणि जे देवाविषयीच्या ज्ञानाविरुद्ध उभे राहते ते नष्ट करतो आणि प्रत्येक विचार पकडून त्याला ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला लावतो. 6 आणि तुमचा आज्ञाधारकपणा पूर्ण झाल्यावर आम्ही प्रत्येक आज्ञाभंगाच्या कृतीला शिक्षा करण्यास तयार असू. 7 तुम्ही वरवर बघता, जर कोणी तो ख्रिस्ताचा आहे याविषयी खात्री बाळगतो तर त्याने हे लक्षात घ्यावे की जितका तो ख्रिस्ताचा आहे तितके आम्हीसुद्धा आहोत. 8 आणि जो आमचा अधिकार प्रभुने आम्हांस खाली पाडण्यास नव्हे, तर तुमच्या वाढीसाठी दिला आहे त्याविषयी जरी काही विशेष अभिमान बाळगला, तरी मी लज्जित होणार नाही. 9 हे मी यासाठी बोलतो की, मी माझ्या पत्राद्वारे तुम्हांला भीति घालणारा असा वाटू नये. 10 कोणी म्हणतो की, त्याची पत्रे वजनदार आणि जोरदार आहेत पण व्यक्तिश: तो प्रभावहीन आणि बोलण्यात कमकुवत असा आहे. 11 अशा लोकांना हे समजावे की, जेव्हा आम्ही नसतो तेव्हा आम्ही आमच्या पत्रात जे असतो तसे जेव्हा आम्ही प्रत्याक्षात हजर राहू आमच्या कृतीमध्ये सुद्धा असू. 12 जे कित्येक स्वत:ची प्रशंसा करतात, त्यांच्याबरोबर आम्ही आपणांस समजायला किंवा त्यांच्याशी आपली तुलना करायचे धाडस करीत नाही, ते तर स्वत:स स्वत:कडून मोजत असता व स्वत:ची स्वत:बरोबर तुलना करीत असता बुध्दिहीन असे आहेत. 13 परंतु आम्ही आमच्या आम्हांला आखून दिलेल्या मर्यादेपलीकडच्या गोष्टीविषयी प्रशंसा करणार नाही. तर जी मर्यादा देवाने आम्हांस घालून दिली आहे, तिच्याप्रमाणे आम्ही प्रशंसा करुन घेतो. ती मर्यादा तर तुम्हापर्यंतही पोहोंचणारी आहे. 14 आमच्या अभिमान बाळगण्यामध्ये आम्ही फार दूर जात आहोत असे नाही. तसे असते तर आम्ही तुमच्याप्रत आलो नसतो. ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो. 15 आम्ही आपल्या मर्यादेपलीकडच्या गोष्टीविषयी, दुसऱ्याच्या श्रमाविषयी नावाजून घेत नाही. किंवा आम्हांला नेमून दिलेल्या कामापेक्षा जास्त करणार नाही, तर आम्हांस अशी आशा आहे की, तुमचा विश्वास वाढेल तेव्हा आम्ही आपल्या मर्यादेच्या प्रमाणात तुम्हांकडून अगदी विस्तर पावलेले असे होऊ. 16 यासाठी की, शुभवर्तमानाचा तुमच्या पलीकडील प्रदेशात प्रसार करु. कारण दुसन्या माणसाच्या प्रदेशात अगोदरच झालेल्या कामाविषयी अभिमान बाळगण्याचे आम्हाला काही कारण नाही. 17 पण “जो अभिमान बाळगतो, त्याने प्रभूमध्ये बाळगावा.” 18 कारण जो स्वत:ची प्रशंसा करतो तो योग्य नाही, पण ज्याची देव प्रशंसा करतो तो मान्य असतो.

11:1 माझी आशा आहे की, आपण माझा थोडासा मूर्खपणा माझ्यासाठी सहन कराल. पण तो तुम्ही करीतच आहा. 2 मला तुमचा हेवा वाटतो व तो दैवी हेवा वाटतो. मी तुम्हांला एक पती देण्याचे (म्हणजे) ख्रिस्ताला देण्याचे अभिवचन दिले होते. यासाठी की मला तुम्हांला शुद्ध कुमारिका असे त्याला सादर करता येईल. 3 पण मला भीति वाटते की जसे हळेला फसविण्यात आले व ते सर्पाच्या धुर्ततेने फसविण्यात आले, तसे तुमचे मनही कसेतरी तुमच्या प्रामाणिकपणापासून आणि ख्रिस्ताच्या शुद्ध भक्तीपासून दूर नेले जाईल. 4 कारण जर एखादा तुमच्याकडे येऊन आम्ही जो येशू गाजवितो त्यापेक्षा वेगळ किंवा तुम्ही जे शुभवर्तमान स्वीकारले, त्यापेक्षा वेगळे शुभवर्तमान स्वीकारले तर तुम्ही ते सहज सहन करता. 5 पण मला वाटते मी अति श्रेष्ठ प्रेषितांपेक्षा कुठल्या प्रकारे कमी आहे असे नाही. 6 मी प्रशिक्षित वक्ता नसेन. परंतु मला ज्ञान आहे. आम्ही हे तुम्हांला प्रत्येक प्रकारे पूर्णपणे स्पष्ट केले आहे. 7 तूम्ही उंच व्हावे म्हणून मी आपणांला नीच केले म्हणजे मी देवाचे शुभवर्तमान तुम्हांला फुकट सांगितले यात मी पाप केले काय? 8 तुमची सेवा करण्यासाठी मी दुसऱ्या मंडळ्यांकडून वेतन घेऊन त्यांना लुटले. 9 आणि मी तुम्हांजवळ होतो तेव्हा मला कमी पडले असतानाही मी कोणाला भार असा झालो नाही. कारण मासेदिनियाहून जे बंधु आले त्यांनी माझी गरज पुरविली. आणि सर्व गोष्टीत मी तुम्हांस ओझे होऊ नये म्हणून मी स्वत:स ठेवले आणि यापुढेही ठेवीन. 10 ख्रिस्ताचे खरेपण माझ्यामध्ये आहे म्हणून मी सांगतो की, अखया प्रांतात कुणीही माझ्या आभिमानास विरोध करणार नाही. 11 का? कारण मी तुम्हांवर प्रेम करीत नाही काय? देव जाणतो की, मी तुमच्यावर प्रेम करतो! 12 आणि मी जे करतो ते मी करीत राहीन यासाठी की, जे आमच्याबरोबर समानता साधण्याची संधी शोधत आहेत. ज्या गोष्टीविषयी ते अभिमान बाळगतात, त्यांना मी त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल असे करीन. 13 कारण असे लोक खोटे प्रेषित आहेत, ते फसविणारे कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रुप धारण करणारे आहेत 14 आणि यात आश्चर्य नाही, कारण सैतानदेखील प्रकाशाच्या दूताचे रुप धारण करतो. 15 म्हणून त्याचे सेवकही जर न्यायीपणाच्या सेवकाचे रुप धारण करतात, त्यामुळे त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, त्यांचा शेवट त्यांच्या कार्याप्रमाणे होईल. 16 मी पुन्हा म्हणतो: कोणीही मला मूर्ख समजू नये, पण जर तुम्ही समजता तर जसा मूर्खाचा तसा माझा स्वीकार करा. यासाठी की मी थोडासा अभिमान बाळगीन. 17 या आत्मप्रौढी मिरविण्याच्या प्रकारामध्ये मी जसा प्रभु बोलतो तसे बोलत नाही. तर मूर्खासारखे बोलतो. 18 जसे बरेच लोक जगिक गोष्टीविषयी प्रौढी मिरवितात, तशी मीही प्रौढी मिरवीन. 19 तुम्ही शहाणे असल्याने मूर्खांचे आनंदाने सहन करता! 20 वस्तुत: जे कोणी तुम्हाला गुलाम करते, किंवा छळ करते किंवा तुमचा गैर फायदा घेते किंवा स्वत: पुढे येण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्या तोंडावर मारते तरी तुम्ही त्यांचे सहन करता. 21 आम्ही जणू अशक्त असल्यासारखे मी लज्जेने बोलतो.पण ज्याविषयी कोणी अभिमान धरण्याविषयी धीट असेल त्याविषयी मीही धीट आहे (हे मी मूर्खापणाने बोलतो) 22 ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? (मी हे मूर्खासारखे बोलतो) मी अधिक आहे. 23 मी पुष्कळ कठीण काम केले आहे. सारखा तुरुंगात जात होतो, पराकाष्ठेचे फटके खाल्ले, पुन्हा आणि पुन्हा मरणाला सामोरे गेलो. 24 पाच वेळेला यहूंद्याकडून मला एकोणचाळीस फटके बसले. 25 तीन वेळा काठीने मारण्यात आले, एकदा मला दगडमार करण्यात आला, तीन वेळा माझे जहाज फुटले, खुल्या समुद्रात मी एक रात्र व एक दिवास घालविला. 26 मी सातत्याने फिरत होतो, नदीच्या प्रवासात धोका होता. लुटारुंकडून धोका होता. माझ्या स्वत:च्या देशबांधवांकडून धोका होता. विदेशी लोकांकडून, शहरांमध्ये धोका होता. डोंगराळ प्रदेशात धोका होता. समुद्रात धोका होता, खोठ्या बंधूंकडून धोका होता. 27 मी कष्ट केले आणि घाम गाळला, व पुष्कळ वेळा जागरण केले. मला भूक माहीत आहे. तहान माहीत आहे. पुष्कळ वेळा मी अन्नाशिवाय राहिलो, थंडीत व उघडा असा मी राहिलो, 28 या सर्व गोष्टीशिवाय मी दररोज मंडळ्याप्रती माझ्या असलेल्या आस्थेमुळे दबावाखाली होतो. 29 कोण अशक्त आहे, आणि मला अशक्तपणा माहीत नाही? कोण पापात पडला आहे? आणि मी माझ्यामध्ये जळत नाही? 30 जर मला अभिमान बाळगायचा असेल तर, माइया अशक्तपणा दाखविणान्या गोष्टीविषयी मी अभिमान बाळगीन. 31 देव आणि प्रभु येशूचा पिता, ज्याची अनंतकाळपर्यंत स्तुति केली पाहिजे, तो हे जाणतो की मी खोटे बोलत नाही. 32 दिमिष्कात अरीतास राजाचा राज्यपाल याने मला अटक करण्यासठी शहराला पहारा दिला होता. 33 पण मला दोपलीत बसवून खिडकीतून गावकुसावरुन उतरविण्यात आले आणि त्याच्या हातून मी निसटलो.

12:1 मी प्रौढी मिरविलीच पाहिजे. जरी त्यापासून कोणताही लाभ नाही. मी आता प्रभूचे दृष्टान्त व प्रकटीकरण याकडे वळतो 2 ख्रिस्तामधील एक माणूस मला माहीत आहे जो चौदा वर्षा पूवी तिसऱ्या स्वर्गात घेतला गेला. तो शरीरात किंवा शरीराबाहेर घेतला गेला हे मला माहीत नाही, देव जाणतो. 3 आणि मला माहीत आहे, हा मनुष्य शरीरात किंवा शरीराबाहेर मला माहीत नाही पण देव जाणतो. 4 तो सुखलोकात घेतला गेला, त्याने व्यक्त न करता येण्यासारख्या गोष्टी ऐकल्या. अशा गोष्टी, ज्या माणसांना सांगण्याची परवानगी नाही. 5 मी अशा माणसाविषयी प्रौढी बाळगीन. परंतु माइया अशक्तपणाशिवाय मी स्वत:विषयी अभिमान बाळगणार नाही. 6 जरी मी ख्रिस्ताचा अभिमान बाळगण्याचे निवडले. तरी मी मूर्ख असणार नाही. कारण मी सत्य बोलत असेन पण मी स्वत:ला आवरतो. यासाठी की कोणी माझ्या मागे जे काही पाहतो किंवा माइयापासून जे काही ऐकतो त्यापेक्षा कोणीही मला अधिक मानू नये. 7 आणि माझ्या प्रकटीकरणाच्या अतिशय मोठेपणामुळे मी खूप जास्त चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात रुतणारा काटा, (सैतानाचा दूत) मला ठोसे मारण्यासाठी ठेवण्यात आला. 8 तीन वेळा मी प्रभूला विनंति केली की, तो माइयातून काढून टाक. 9 पण तो मला म्हणाला, “माझी कृपा तुला पुरे, कारण माझे सामर्थ्य अशक्तपणात पूर्णत्वास येते.” म्हणून मी माझ्या अशक्तपणाबद्दल आनंदाने प्रौढी मिरवीन. यासाठी की ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर स्थिर राहावे. 10 या कारणासाठी ख्रिस्ताकरिता अशक्तपणात आनंद करतो. अपमानात, कठीण परिस्थितित, छळात, अडचणीच्या वेळी, कारण जेव्हा मी अशक्त, तेव्हा मी सशक्त असतो. 11 मी स्वत:च मूर्ख झालो पण तसे होण्यास तुम्ही मला भाग पाडले तुमच्याकडून माझी प्रशंसा व्हावयाची होती. जरी मी काही नसलो तरी अतिश्रष्ठ प्रेषितांपेक्षा मी कमी नव्हतो. 12 प्रेषितांची चिन्हे ही आहेत: चिन्हे, चमत्कार, अदभुत कृत्ये ही खरोखरच सर्व सहनशीलतेने मी तुम्हांमध्ये केली. 13 कारण मी तुम्हांला भार झालो नाही, ही गोष्ट सोडली तर, इतर मंडळ्यापेक्षा ही गोष्ट सोडली तर तुम्ही कशात उणे आहात? या चुकीबद्दल मला क्षमा करा. 14 पाहा, आता तिसन्यांदा तुम्हाकडे येण्यासाठी मी तयार आहे. आणि मी तुम्हांला भार होणार नाही. कारण मी तुमची संपत्ती मिळवायला येणार नाही. तर तुम्हांला मिळवण्यासाठी येणार आहे. शेवटी मुलांनी त्यांच्या आईवडिलांसाठी बचत करायची नसते तर आईवडिलांनी मुलांसाठी बचत करायची असते. 15 म्हणून मी फार आनंदाने माइयाकडे जे काही आहे, ते तुमच्यासाठी खर्च करीन आणि स्वत:देखील खर्ची पडेन. जर मी तुमच्यावर अधिक प्रेम करतो तर तुम्ही माझ्यावर कमी प्रेम कराल? 16 तर असो, मी चतुर असल्याने, मी तुमच्यासाठी ओझे झालो नाही, तर मी तुम्हांला चकविले व पकडले, असे खुशाल म्हणा. 17 ज्यांना मी तुमच्याकडे पाठविले त्यांच्यातील कोणाकडून तरी मी तुम्हांपासून काही फायदा घेतला आहे का? 18 मी तीताला तुमच्याकडे जाण्यास विनंति केली आणि मी त्याच्याबरोबर भावाला पाठविले. तीताने तुम्हांपासून काही फायदा करुन घेतला काय? आम्ही एकाच आत्म्याने जगत नाही काय? एका आत्म्याने एकाच मार्गाने चाललो नाही काय? 19 तुम्ही असा विचार करीत आहा काय की आम्ही आमचे समर्थन तुमच्यासमोर करीत आहोत? ख्रिस्तामध्ये असल्याप्रमाणे आम्ही देवासमोर बोलत आहोत. आणि प्रिय मित्रांनो, जे काही आम्ही करतो ते तुम्हांला बळकट करण्यासाठी. 20 कारण मला भय वाटते की, मी आल्यावर कदाचित जसे मी इच्छितो तसे तुम्ही मला आढळणार नाही. आणि जसे तुम्ही इच्छित नाही तसा असलेला मी तुम्हांस आढळेन. म्हणजे कदाचित भांडणे, मत्सर, राग, कलह, चहाड्या, कुजबूज रुसणे, अव्यवस्था ही दिसून येतील. 21 म्हणजे मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुम्हाजवळ नीच करील. आणि ज्यांनी पूर्वी पाप केले होते आणि आपण केलेल्या जारकर्माचा, अशुद्धपणाचा, व कामातुरपणाचा त्याग केला नाही, व त्यांच्याबद्दल पश्र्चात्ताप केला नाही, अशा अनेकांसाठी मला शोक करावा लागेल.

13:1 ही माझी तुम्हांला भेटण्याची तिसरी वेळ आहे. ‘प्रत्येक गोष्ट दोन किंवा तीन साक्षीदारांच्या साक्षीने सिद्ध करावी.’ 2 मी अगोदरच सूचना दिलेली होती जेव्हा दुसन्यावेळी मी तुमच्याबरोबर होतो. आता मी तुमच्यात नसताना ती सूचना पुन्हा सांगतो: माइया परत येण्याच्या वेळी अगोदर ज्यांनी पाप केले त्यांना मी सोडणार नाही किंवा दुसन्यांनाही नाही. 3 खिस्त माझ्याद्वारे बोलतो याविषयीच्या पुराव्याची तुम्ही मागणी करीत आहात. तुमच्याशी व्यावहार करताना तो अशक्त नाही तर सामर्थ्यशाली आहे. 4 कारण जरी तो अशक्तपणात वधस्तंभावर खिळला गेला तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत आहे, कारण आम्हीही त्याच्यामध्ये अशक्त आहोत. तरी देवाच्या सामर्थ्याने त्याच्याबरोबर तुमच्यासाठी आम्ही जिवंत असू. 5 तुम्ही विश्वासात आहा की नाही याविषयी स्वत:ची परिक्षा पाहा. पारख करा. ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, ह्याची जाणीव तुम्हांला होत नाही का? जर अर्थात तुम्ही परीक्षेत उतरला नाही तर. 6 आणि माझा विश्वास आहे की, तुम्ही हे शोधाल की, या परीक्षेत आम्ही अनुत्तीर्ण झालो नाही. 7 आता आम्ही देवाजवळ आशी प्रार्थना करतो की, तुम्ही काहीही चुकीचे करणार नाही. आम्ही परीक्षेत उत्तीर्ण व्हावे यासाठी नव्हे तर अशासाठी की, आम्ही जरी नाकारलेल्यासारखे असलो तरी तुम्ही चांगले काम करावे. 8 कारण खरेपणाविरुद्ध आम्हांस काही करता येत नाही. तर खरपणासाठी करता येते. 9 जेव्हा आम्ही अशक्त आहो आणि तुम्ही शक्तीमान आहा, तेव्हा आम्ही आनंद करतो. आणि आम्ही प्रार्थनाही करतो, मी अशी की, तुम्ही पूर्ण व्हावे. 10 यामुळे तुम्हापासून आम्ही दूर असताना हे तुम्हाला लिहितो, यासाठी की, प्रभुने जो अधिकार तुम्हांला खाली पाडून टाकण्यासाठी नव्हे तर वृद्धीसाठी मला दिला त्याप्रमाणे जवळ आल्यावर मी कठोर वागू नये. 11 शेवटी बंधूनो, आपण भेटू या, परिपूर्णतेकडे ध्येय असू द्या. जसे मी तुम्हांला सांगितले तसे करा. एका मनाचे व्हा, शांतीने राहा. आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर असेल. 12 पवित्र चुंबनाने एकमेकास भेटा. 13 सर्व संत आपणांस सलाम सांगतात. 14 प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा आणि देवाची प्रीति आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वाबरोबर असो.