Colossians

1:1 देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल आणि आमचा बंधु तीमथयी याजकडून, 2 ख्रिस्तामध्ये आमचे जे विश्वासू बंधु आहेत, त्या कलस्सै येथील देवाच्या पवित्र लोकांना: देव, आमचा पिता याजकडून तुम्हास कृपा व शांति असो. 3 आम्ही जेव्हा तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा आम्ही नेहमी देवाचे, जो आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता आहे त्याचे, आभार मानतो. 4 कारण आम्ही ख्रिस्त येशूवरील तुमच्या विश्वासाविषयी आणि देवाच्या सर्व लोकांविषयी तुम्हाला वाटत असलेल्या प्रेमाविषयी ऐकले आहे. 5 कारण स्वार्गमध्ये जी आशा तुमच्यासाठी राखून ठेवली आहे. तुम्ही पहिल्यांदा त्या आशेविषयी खऱ्या संदेशाद्वारे म्हणजेच सुवार्तेद्वारे ऐकले. 6 जी सुवार्ता तुमच्याकडे आली आहे, संपूर्ण जगातून त्या सुवार्तेचे फळ मिळत आहे व ती वाढत आहे. ज्याप्रमाणे ती तुमच्यामध्येसुद्धा तशीच वाढत होती व फळ देत होती, ज्या दिवसापासून तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले व ती खरोखर काय आहे हे समजून घेतले तेव्हापासून ती कार्य करीत आहे. 7 तुम्ही ते, आमचा सहसेवक एपफ्रास, जो आमच्या वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे, त्याच्याकडून शिकून घेतले आहे. 8 त्याने आम्हांला तुमचे प्रेम आत्म्यापासून आहे त्याविषयीही सांगितले. 9 या कारणासाठी, आम्हीसुद्धा तुमच्याविषयी ज्या दिवसापासून ऐकले, तेव्हापासून तुमच्यासाठी प्रार्थना करण्याचे थांबविले नाही. आम्ही प्रार्थना करीत आहोत की: तुम्ही देवाच्या इच्छेच्या सर्व प्रकारच्या ज्ञानाने आणि आध्यात्मिक समंजसपणाने भरले जावे. 10 यासाठी की, त्याला योग्य असे तुम्ही चालावे. आणि सर्व बाबतीत त्याला आनंद द्यावा; आणि तुम्ही देवाच्या ज्ञानात वाढावे; 11 त्याच्या गौरवी सामर्थ्यात त्याच्या महान सामर्थ्यामुळे समर्थ बनण्यासाठी तुम्हांला सहनशीलता व धैर्य प्राप्त व्हावे. 12 आणि आनंदाने पित्याला धन्यवाद द्यावेत, ज्याने तुम्हांला प्रकाशात राहणाऱ्या देवाच्या लोकांचे जे वतन आहे त्यात वाटा मिळण्यासाठी पात्र केले. 13 देवाने अंधाराच्या अधिपत्यापासून आमची सुटका केली आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले. 14 पुत्राद्वारे आम्हांला आमच्या पापांची क्षमा मिळाली. 15 तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे आणि निर्माण केलेल्या सर्व गोष्टीत तो प्रथम आहे. 16 कारण स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व काही त्याच्या सामर्थ्याने निर्माण केले गेले. जे काही दृश्य आहे आणि जे काही अदृश्य आहे, सिंहासने असोत किंवा सामर्थ्य असो, सत्ताधीश असोत किंवा अधिपती असोत सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण केले गेले. 17 सर्व गोष्टी निर्माण होण्याच्या अगोदरपासूनत तो अस्तित्वात आहे. सर्व गोष्टी त्याच्याद्वारे चालतात. 18 आणि तो शरीराचा म्हणजे मंडळीचा मस्तक आहे. तो प्रारंभ आहे, मृतांमधून पुनरुत्थान पावलेल्यांमध्ये तो प्रथम आहे. यासाठी की प्रत्येक गोष्टीत त्याला प्रथम स्थान मिळावे. 19 कारण देवाने त्याच्या सर्व पूर्णतेत त्याच्यामध्ये राहण्याचे निवडले. 20 आणि ख्रिस्ताद्वारे सर्व गोर्ष्टींचा स्वत:शी म्हणजे त्या पृथ्वीवरील गोष्टी असोत, किंवा स्वार्गांतील गोष्टी असोत समेट करण्याचे ठरविले. ख्रिस्ताने जे रक्त वधस्तंभावर सांडले त्याद्वारे देवाने शांति केली. 21 एके काळी तुम्ही परके होता आणि तुमच्या विचारांमुळे आणि तुमच्या दुष्ट कृत्यांमुळे तुम्ही देवाचे शत्रू होता. 22 परंतु आता, ख्रिस्ताच्या शरीरिक देहाने व त्याच्या मरणाने देवाने तुमचा त्याच्याशी समेट घडवून आणला आहे यासाठी की, त्याच्यासमोर पवित्र, निष्कलंक आणि दोषविरहीत असे सादर करावे. 23 तुम्ही तुमच्या विश्वासात दृढ व स्थिर असावे आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली आहे तिच्याद्वारे तुम्हांला दिलेल्या आशेपासून दूर जाऊ नये, ज्याचा मी पौल सेवक झालो. 24 आता, तुमच्यासाठी मला झालेल्या दु:खात मला आनंद वाटतो आणि माझ्या स्वत:च्या शरीरात मी ख्रिस्ताचे त्याच्या देहाचे म्हणजे मंडळीच्या वतीने ख्रिस्ताचे जे दु:ख कमी पडत आहे ते मी पूर्ण करीत आहे. 25 देवाच्या आज्ञेप्रमाणे मी एक त्यांच्यापैकी सेवक झालो. ती आज्ञा तुमचा फायदा व्हावा म्हणून दिली होती. ती म्हणजे देवाचा संदेश पूर्णपणे गाजवावा. 26 हा संदेश एक रहस्य आहे, जे अनेक युगांपासून आणि अनेक पिढ्यांपासून लपवून ठेवले होते. परंतु आता ते देवाने त्याच्या लोकांना माहीत करुन दिले आहे. 27 देवाला त्याच्या लोकांना माहीत करुन द्यायचे होते की, विदेशी लोकांमध्ये या वैभवी रहस्याची संपत्ती ख्रिस्त येशू जो तुम्हांमध्ये आहे आणि जो देवाच्या गौरवामध्ये सहभागी होण्याची आमची आशा आहे. 28 आम्ही त्याची घोषणा करतो. प्रत्येक व्यक्तीला सूचना देतो, व प्रत्येक व्यक्तीला शक्य ते ज्ञानाने शिकविण्याचा प्रयत्न करतो यासाठी की, आम्हांला प्रत्येक व्यक्ति ख्रिस्तामध्ये पर्ण अशी देवाला सादर करता यावी. 29 या उद्देशाने मी झगडत आहे. ख्रिस्ताच्या शक्तीच्या उपयोगाने, जी माझ्यामध्ये सामर्थ्यशाली रीतीने कार्य करीत आहे.

2:1 कारण माझी अशी इच्छा आहे की, तुमच्यावतीने जो महान झगडा मी करीत आहे आणि जे लावातिकीयात आहेत त्यांच्या वतीने आणि ज्यांची माझी व्यक्तिश: भेट झाली नाही अशा सर्वांसाठी जो महान झगडा मी केला तो तुम्हांला माहीत व्हावा. 2 यासाठी की, त्यांच्या मनाला समाधान वाटावे. आणि ते प्रेमाने एकत्र जोडले जावेत, आणि खात्रीची सर्व संपत्ती जी समजबुद्धीने येते ती मिळावी. तसेच देवाचे रहस्य जो ख्रिस्त त्याच्याविषयी पूर्ण ज्ञान मिळावे. 3 ज्यामध्ये ज्ञानाची आणि शहाणपणाची सर्व संपत्ती लपलेली आहे. 4 मी हे म्हणत आहे ते यासाठी की, तुम्हांला दिसायला चांगल्या पण खोट्या कल्पनांनी फसवू नये. 5 कारण मी जरी शरीराने तुम्हांपासून दूर असलो तरीही आत्म्यात मी तुम्हाबरोबर आहे आणि तुमच्या जीवनातील नीटनेटकेपणा आणि ख्रिस्तावरील विश्वासासाठी खंबीरता पाहून मी आनंदीत आहे. 6 म्हणून ज्याप्रमाणे तुम्हांला दिलेल्या शिक्षणाद्वारे तुम्हाला येशू ख्रिस्त व प्रभु म्हणून मिळाला, तसे त्याच्यामध्ये एक होत चला. 7 त्याच्यामध्ये मुळावलेले, त्याच्यावर उभारलेले, तुमच्या विश्वासात दृढ झालेले असे व्हा आणि देवाची उपकारस्तुति करीत ओसंडून जा. 8 मूलभूत शिक्षण जे ख्रिस्तापासून नाही व मनुष्यांनी हस्तांतरित केले आहे त्या मानवी तत्त्वज्ञानाने व पोकळ फसव्या कल्पनांनी तुम्हांला कोणीही कैद्यासारखे घेऊन जाऊ नये म्हणून सावध असा. 9 कारण देवाचे पूर्णत्व त्याच्यात शरीरात राहते. 10 आणि तो जो प्रत्येक सत्तेच्या व अधिकाराच्या उच्चस्थानी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण झाले आहात. 11 मानवी हातांनी न केलेल्या सुंतेने तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये सुंता झालेले आहात. ख्रिस्ताने केलेल्या सुंतेद्वारे तुम्ही तुमच्या पापाच्या सामर्थ्यापासून मुक्त झाला होता, 12 हे असेच घडले जेव्हा तुम्ही बाप्तिस्मा करण्याच्या कृतीमध्ये त्याच्याबरोबर पुरले गेला आणि तुम्ही त्याच्यामध्ये देवाच्या कृतीमध्ये तुमच्या विश्वासाद्वारे उठविले गेला, ज्याने (देवाने) ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठविले. 13 तुमच्या पापांमुळे आणि तुमची सुंता न झाल्याने तुम्ही आध्यात्मिकरीत्या मृत झाला होता, परंतु देवाने ख्रिस्ताबरोबर तुम्हाला जीवान दिले आणि त्याने आमच्या सर्व पापांची क्षमा केली. 14 त्याने आमच्याविरुद्ध असलेल्या आरोपपत्राचा निवाडा असलेला दस्तऐवज आणि ज्यात आम्हांला विरोध होता, तो त्याने आमच्यातून काढून घेतला, आणि वधस्तंभावर खिळ्यांनी ठोकून रद्द केला. 15 त्याने स्वत: वधस्तंभाद्वारे सत्ता आणि अधिकार हाणून पाडून त्यांवर विजय मिळविला आहे. 16 म्हणून कोणीहा तुमच्यावर खाण्याविषयी आणि पिण्याविषयी किंवा मेजवान्यांविषयी, नवचंद्रोउत्सवाविषयी किंवा शब्बाथ दिवसांविषयी टीका करु नये. 17 कारण ते फक्त येणाऱ्या गोष्टींची सावली आहेत. परंतु खरे शरीर ज्यामुळे सावली पडते ते तर ख्रिस्ताचे आहे. 18 कोणीही जो स्वत:चा अपमान, नम्रतेची कृत्ये व देवदूतांची उपासना यात समाधान मानून घेतो, त्याने तुम्हाला बक्षिसासाठी अपात्र ठरवू नये. असा मनुष्य नेहमी हे सर्व दृष्टान्त पाहिल्यासारखे बोलतो आणि कोणतेही कारण नसता त्याच्या आध्यात्मिक नसलेल्या अंत:करणामुळे गर्वाने फुगलेला असतो. 19 आणि असा मनुष्य ख्रिस्त जो मस्तक त्याला धरीत नाही. संपर्ण शरीर त्याच्या अस्थिबंधाचे स्नायू, स्नायूंनी आधार दिलेले आणि एकत्रित धरल्याने देवापासून होणारी वाढ यात वाढते त्याबद्दल त्याला धन्यवाद असो. 20 जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर मेला आहात व या जगाच्या प्राथमिक शिक्षणापासून मुक्त झाला आहात, तर मग का तुम्ही या जगाचे असल्यासारखे त्यांच्या नियमांच्या अधीन राहाता. 21 “याला स्पर्श करु नका!” “त्याची चव पाहू नका!” 22 या सर्व गोष्टी त्यांच्या वापराबरोबर नाहीशा होणार आहेत. अशा नियमांच्या अधीन होताना, तुम्ही मानवी नियम व शिकवणूक यांचे पालन करता. 23 खरोखर, मनुष्यांनो केलेला धर्म, स्वत:चा अपमान, नम्रतेची कृत्ये, शरीराचा छळ, या विषयीच्या ज्ञानाबद्दल त्यांची कीर्ति आहे, परंतु शरीराच्या समाधानाविरुद्ध लढताना ते काही किंमतीचे नाहीत.

3:1 म्हणून जसे तुम्हांला ख्रिस्ताबरोबर मेलेल्यामधून उठविले गेले आहे तर, स्वर्गतील म्हणजे ज्या वरील गोष्टी आहेत त्यासाठी प्रयत्न करा. जेथे ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे. 2 ज्या वरील (स्वर्गातील) गोष्टी आहेत त्याबद्दलचा विचार करा. ज्या गोष्टी पृथ्वीवरच्या आहेत त्यांचा विचार करु नका. 3 कारण तुम्ही मेलेले आहात आणि तुमचे नवे जीवन देवामध्ये ख्रिस्ताबरोबर लपलेले आहे. 4 जेव्हा ख्रिस्त. जो आमचे जीवन आहे. त्याच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेस प्रगट होईल. तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट व्हाल. 5 म्हणून तुमच्यामध्ये पृथ्वीतलावरील जे काही आहे ते सर्व जिवे मारा. जारकर्म, अशुद्धता, लोभ, दुष्ट इच्छा, अधाशीपणा, जी एक प्रकारची मूर्तिपूजा आहे. 6 कारण या गोष्टींमुळे देवाचा राग ओढवणार आहे. 7 तुम्हीसुद्धा असेच जीवन जगत होता जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करीत होता. 8 पण आता, तुम्ही या सर्व गोष्टी बाजूला केल्या पाहिजेत: राग, क्रोध, दुष्टता, निंदा आणि तुमच्या मुखातील लज्जास्पद बोलणे, या सर्व गोष्टी तुम्ही दूर केल्याच पाहिजेत. 9 एकमेकाशी लबाडी करु नका. कारण तुम्ही जुना मनुष्य त्याच्या कृतीसह काढून टाकला आहे. 10 आणि तुम्ही नवीन मनुष्य धारण केला आहे. हे नवे रुप त्याच्या निर्माणकर्त्याच्या प्रतिमेप्रमाणे सतत नवे होत जाते. यासाठी की या नव्या मनुष्याला देवाचे पूर्ण ज्ञान मिळावे. 11 परिणाम म्हणून यहूदी व विदेशी असा कोणताही फरक नाही. एखाद्याची सुंता झालेला किंवा एखाद्याची सुंता न झालेला, बेताल, व असंस्कृत, गुलाम आणि स्वतंत्र मनुष्य असा कोणताही फरक नाही, पण ख्रिस्त हाच सर्व काही आहे आणि तो सर्व विश्वासाणाऱ्यात आहे. 12 म्हणून, जसे देवाचे निवडलेले लोक जे पवित्र आहेत, तसे करुण, दयाळूपणा, नम्रता, सौम्यता, आणि धीर हे परिधान करावे. 13 एकमेकांचे सहन करा. जशी प्रभुने तुम्हांला क्षमा केली तशी एखाद्याविरुद्ध तक्रार असेल तर एकमेकांना क्षमा करा. 14 या सर्वांवर प्रीतिचे वस्त्र परिधान करा. जे त्या सर्वांना एकत्र ठेवते आणि त्यांना परिपूर्ण करते. 15 आणि ख्रिस्ताची शांति जिच्यासाठी तुम्ही जे एका देहातील लोक त्या तुम्हांला बोलाविले होते ती तुमच्या अंत:करणावर राज्य करो आणि नेहमी उपकार मानणारे व्हा. 16 ख्रिस्ताचा संदेश तुमच्यामध्ये त्याच्या सर्व वैभवाने राहावा. एकमेकांना महान असा शहाणपणाने शिकवा व बोध करा. स्तोत्रे, व गीते गा, आणि आध्यात्मिक गीते गाऊन उपकारस्तुतीसह आपल्या अंत:करणात देवाला गीते गा. 17 आणि प्रत्येक गोष्ट जी तुम्ही बोलता किंवा करता ते प्रभु येशूच्या नावात करावे. यामुळे तुम्ही देवपित्याचे त्याच्याद्धारे आभार मानता. 18 पत्नींनो, जसे प्रभूमध्ये योग्य आहे तसे तुम्ही आपल्या पतींच्या अधीन राहा. 19 पतींनो, आपल्या पत्नीवर प्रेम करा आणि त्यांच्याबरोबर कठीणतेने वागू नका. 20 मुलांनो, सर्व गोष्टीत आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा. कारण प्रभूच्या अनुयायांचे असे वागणे देवाला आनंद देणारे आहे. 21 वडिलांनो, आपल्या मुलाला चिडवू नका, म्हणजे ते निराश होणार नाहीत. 22 गुलामांनो, तुमच्या जगिक मालकाच्या सर्व आज्ञा पाळा आणि मनुष्याला संतोषविणाऱ्या, डोळ्यांनी देखरेख करण्यासाठी नव्हे तर त्याऐवजी पूर्ण मनाने प्रभूला भिऊन आज्ञा पाळा. कारण तुम्ही प्रभूचा आदर करता. 23 तुमच्या अंत:करणापासून काम करा. जणू काय तुम्ही प्रभूसाठी काम करीत आहात, मनुष्यांसाठी नव्हे असे काम करा. 24 लक्षात ठेवा, प्रभू तुम्हांला तुमच्या स्वर्गीय वारशाचे बक्षीस देईल. ख्रिस्त जो तुमचा खरा धनी त्याची सेवा करीत राहा. 25 कारणे जो कोणी वाईट करतो, त्याचेसुद्धा तसेच होईल. देव असेच वागवील कारण त्याच्याकडे पक्षपात नाही.

4:1 मालकांनो, आपल्या गुलामांना जे न्याय्य व योग्य ते द्या. 2 नेहमी प्रार्थना करीत राहा. उपकारस्तुति करीत त्यामध्ये दक्ष राहा. 3 त्याचवेळी आमच्यासाठीसुद्धा प्रार्थना करा, यासाठी की, ख्रिस्ताविषयीचे जे रहस्य देवाने आम्हांला कळविले, त्याविषयी बोलण्यासाठी, त्याचा संदेश ऐकण्यासाठी, देवाने आमच्यासाठी दार उघडावे. कारण त्या उपदेश करण्याने मी बंधनात आहे. 4 ते रहस्य ज्या रीतीने मी सांगावयास पाहिजे, त्याप्रकारे सांगण्यासाठी माझ्यासाठी प्रार्थना करा. 5 बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा आणि प्रत्येक संधीचा चांगला फायदा करुन घ्या. 6 तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त आणि मिठाने रुचकर केल्यासारखे असावे. यासाठी की प्रत्येक मनुष्याला कसे उत्तर द्यावे हे तुम्हांला कळावे. 7 तुखिक, प्रिय बंधु, विश्वासू सेवक आणि प्रभूमधील सहकारी तो तुम्हांला माझ्याविषयी सगळी माहिती देईल. 8 त्याला मी याच कारणाने पाठवीत आहे की, आमच्याविषयीची बातमी तुम्हांला कळावी आणि तुमची अंत:करणे उत्तेजित व्हावीत. 9 मी त्याला आमचा विश्वासू व प्रिय बंधु अनेसिम, जो तुमच्यातील एक आहे, याच्याबरोबर पाठवीत आहे, ते तुम्हांला येथे काय घडत आहे ते सांगतील. 10 अरिस्तार्ख, माझ्या सोबतीचा कैदी, तुम्हाला सलाम सांगतो, त्याचप्रमाणे बर्णबाचा चुलत भाऊ मार्क ज्याच्याविषयी तुम्हाला अगोदरच माहिती मिळाली आहे, तो जर तुमच्याकडे आला तर त्याचे स्वागत करा. 11 येशू ज्याला युस्त म्हणतात तोसुद्धा तुम्हाला सलाम सांगतो. यहूदी विश्वासणाऱ्यांपैकी फक्त हेच काय ते देवाच्या राज्याचा प्रसार करण्यात माझ्याबरोबर काम करीत आहेत. ते मला आधीच फार मोठा आधार आहेत. 12 एपफ्राससुद्धा तुम्हाला सलाम सांगतो, तो तुमच्यापैकीच ख्रिस्त येशूचा सेवक आहे. तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्क वाढलेले आणि देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात तुम्ही पूर्णपणे गुंतलेले असावे. 13 जे लवादिकीयात व हेरापल्लीत राहत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करीत आहे. याचा मी साक्षी आहे. 14 प्रिय वैद्य लूक आणि देमास तुम्हांला सलाम सांगतात. 15 लावदिकीयात राहणारे बंधु आणि नेफा आणि तिच्या घरी जमणारी मंडळी यांना सलाम सांगा. 16 आणि जेव्हा तुम्हाला हे पत्र वाचून दाखविले जाईल, तेव्हा ते लावदकीयाच्या मंडळीतसुद्धा वाचले जाते की नाही ते पाहा आणि तू सुध्दा माझे पत्र वाच. 17 आणि अर्खिप्पाला सांगा, “जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पुढे चालू ठेव.” 18 मी, पौल, हा सलाम माझ्या स्वत:च्या हस्तक्षरात लिहितो. मी तुरुंगात आहे हे लक्षात ठेवा. देवाची कृपा तुम्हांबरोबर असो.