Deuteronomy

1:1 2 होरेबा (सिनाई) पासून कादेश - बर्ण्यापर्यंतची वाट सेईर डोंगरांच्या मागे फक्त अकरा दिवसांची आहे. 3 पण इस्राएलांनी मिसर सोडले आणि ते या जागी आले याला चाळीस वर्षे लागली. तेव्हा चाळीसाव्या वर्षाच्या अकराव्या महिन्यातील पहिल्या दिवशी मोशे इस्राएल लोकांशी हे बोलला. परमेश्वराने जे जे काही सांगायची आज्ञा केली होती; ते सर्व र्त्यंने सांगितले. 4 अमोऱ्यांचा राजा सीहोन आणि बाशानचा राजा ओग यांना परमेश्वराने ठार मारल्यानंतरची ही गोष्ट आहे. (सीहोन अमोरी लोकांचा राजा होता. तो हेशबोनमध्ये राहात असे. ओग बाशानचा राजा होता. तो अष्टेरोथ व एद्रई येथे राहाणारा होता.) 5 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशे आता यार्देनच्या पूर्वेला मवाबच्या देशात नियमशास्त्राचे विवरण करु लागला. 6 “मोशे म्हणाला, आपला देव परमेश्वर होरेबात (सिनाई) आपल्याशी बोलला. त्याने सांगितले, ‘या डोंगरातील तुमचे वास्तव्य आता पुरे झाले. 7 आता तुम्ही इथून अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशात जा. आसपासच्या सर्व प्रदेशात प्रवास करा. यार्देनेच्या खोऱ्यात, अराबांच्या पहाडी प्रदेशात, पश्चिमेकडील उतारावर, नेगेवमध्ये समुद्रकिनारी जा. कनान आणि लबानोन मार्गे फरात या महानदीपर्यंत जा. 8 पाहा हा प्रदेश मी तुम्हाला देऊ करत आहे. जा आणि त्यावर ताबा मिळवा. अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजांना हा प्रदेश देण्याचे मी वचन दिले होते.”‘ 9 मोशे पुढे म्हणाला, “तेव्हा मी तुम्हाला सांगितले होते की मी एकटा तुमचा सांभाळ करु शकणार नाही. 10 आणि आता तर तुमची संख्या कितीतरी वाढली आहे. परमेश्वर देवाच्या कृपेने ती वाढून आकाशातील ताऱ्यांइतकी झाली आहे. 11 तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्या कृपेने ती आणखी वाढून आत्ताच्या हजारपट होवो आणि त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळो. 12 पण मी एकटा तुमचा सांभाळ करायला तसेच तुमची आपापसांतली भांडणे सोडवायला असमर्थ आहे. 13 म्हणून मी तुम्हाला सांगितले, ‘आपापल्या वंशातून अनुभवी, ज्ञानी व समंजस व्यक्तींची निवड करा. मी त्यांना प्रमुख म्हणून नेमतो.’. 14 “त्यावर ‘हे चांगलेच झाले’ असे तुम्ही म्हणालात. 15 “म्हणून मी त्या ज्ञानी व अनुभवी व्यक्तींना तुमचे प्रमुख म्हणून नेमले. हजारांच्या समूहावर एक अधिकारी, शंभरांवर एक, पन्नासावर, दहावर तसेच घराण्यावर अशा या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. 16 “या न्यायाधीशांना मी त्यावेळी सांगितले की तुमच्या भाऊबंदांतील वाद नीट ऐकून घ्या. निवाडा करताना पक्षपात करु नका. मग तो वाद दोन इस्राएलींमधला असो की एक इस्राएली व एक उपरा यांच्यातील असो. नीतीने न्याय करा. 17 कोणालाही कमी अधिक लेखू नका. सर्वांना समान लेखा. कोणाचीही भीती बाळगू नका. कारण तुम्ही दिलेला न्याय हा देवाचा आहे. एखादे प्रकरण तुम्हाला विशेष अवघड वाटले तर ते माझ्याकडे आणा. मी त्याचा निवाडा करीन. 18 तुमच्या इतर कर्तव्यांबद्दलही मी तेव्हाच तुम्हांला सांगितले होते.कनानात पाठवलेले हेर 19 “मग आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार आपण होरेबहून पुढे अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशाकडे निघालो. तेव्हा वाटेत आपल्याला ते विस्तीर्ण आणि भयंकर वाळवंट लागले. ते ओलांडून आपण कादेश-बर्ण्याला पोचलो. 20 तिथे मी तुम्हाला म्हणालो की पाहा, अमोऱ्यांच्या पहाडी प्रदेशात तुम्ही पोचलात. आपला देव परमेश्वर तुम्हाला हा प्रदेश देणार आहे. 21 हा प्रदेश तुमचाच आहे. तुमच्या पूर्वजांचा परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार तो हस्तगत करा. कचरु नका व कशाचीही भीती बाळगू नका. 22 पण तेव्हा तुम्ही सगळे मला म्हणालात की, आधी आपण काही जणांना त्या प्रदेशाच्या पाहाणीसाठी पुढे पाठवू. म्हणजे ते त्या देशाची माहिती मिळवून आपल्याला कोणत्या मार्गाने जावे लागेल, कोणकोणती नगरे तेथे लागतील याची खबर आणतील. 23 “मलाही ते पटले. म्हणून प्रत्येक घराण्यातून एक अशी बारा माणसे मी निवडली. 24 ते लोक मग निघाले व पहाडी प्रदेशात जाऊन अष्कोल ओढ्यापर्यंत पोचले. त्यांनी तो देश हेरला. 25 येताना त्यांनी तिकडे होणारी काही फळे बरोबर आणली. त्या प्रदेशाची माहित्ती सांगितली व ते म्हणाले की, आपला देव परमेश्वर देत असलेला हा भूभाग उत्तम आहे. 26 “पण तुम्ही तेथे जायचे नाकारलेत. आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेविरुद्ध बंड केलेत. 27 तुम्ही आपापल्या तंबूत जाऊन कुरकुर करत म्हणालात की परमेश्वर आमचा द्वेष करतो. अमोऱ्यांच्या हातून आमचा नाश व्हावा म्हणूनच आम्हाला त्याने मिसर देशातून बाहेर काढले. 28 आता आम्ही कुठे जाणार? आमच्या या भावांच्या (12 हेरांच्या) बातम्यांमुळे घाबरुन आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यांच्या खबरीनुसार हे लोक धिप्पाड व आमच्यापेक्षा उंच आहेत. तेथील नगरे मोठी असून त्यांची तटबंदी आकाशाला भिडली आहे. आणि तेथे अनाक वंशी महाकाय आहेत. 29 “तेव्हा मी तुम्हाला म्हणालो की हताश होऊ नका. त्या लोकांना घाबरु नका. 30 स्वत: परमेश्वर देव तुमचा पाठिराखा आहे. मिसर देशात तुमच्यादेखत त्याने जे केले तेच तो येथेही करील. तुमच्यासाठी लढेल. 31 तिकडे तसेच या रानातल्या वाटचालीतही, माणूस आपल्या मुलाला जपून नेतो तसे त्याने तुम्हांला येथपर्यंत सांभाळून आणले. 32 “तरीही तुम्ही आपल्या परमेश्वर देवावर विश्वास ठेवला नाही. 33 प्रवासात तो तुमच्यासाठी मुक्कामाचे ठिकाण शोधायला तसेच रात्री अग्नीत व दिवसा मेघात प्रकट होऊन तुम्हाला मार्गदर्शन करायला तुमच्यापुढे चालत असे. 34 “परमेश्वराने तुमचे बोलणे ऐकले व तो संतापला. कठोरपणे शपथपूर्वक तो म्हणाला, 35 ‘तुमच्या पूर्वजांना कबूल केलेला हा उत्तम प्रदेश या कृतन्घ पिढीतील एकाच्याही दृष्टीस पडणार नाही. 36 यफुन्नेचा मुलगा कालेब मात्र तो पाहील. त्याचे पाय या भूमीला लागले आहेत. त्याला व त्याच्या वंशजांना मी ही भूमी देईल. कारण तो परमेश्वराचा खरा अनुयायी आहे.’ 37 “तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावरही कोप झाला. तो म्हणाला, ‘मोशे, तूही या प्रदेशात प्रवेश करणार नाहीस. 38 पण तुझ्या सेवेस हजर राहणारा, नूनाचा मुलगा यहोशवा तेथे जाईल. त्याला तू प्रोत्साहन दे कारण इस्राएलांना तोच देश वतन म्हणून मिळवून देईल.’ 39 “परमेश्वर पुढे आपल्याला म्हणाला, ‘शिवाय आपले शत्रू आपल्या मुलाबाळांना पळवतील असे तुम्ही म्हणालात. ती मात्र या देशात जातील. मी मुलांवर तुमच्या चुकांचे खापर फोडत नाही. कारण बरे वाईट ठरविण्याइतकी ती मोठी नाहीत. 40 पण तुम्ही - तुम्ही मात्र परत फिरुन तांबड्या समुद्राच्या वाटेने रानाकडे कूच करा.’ 41 “मग तुम्ही मला म्हणालात की आमच्या हातून पाप घडले आहे. आपल्या परमेश्वर देवाच्या आज्ञेनुसार आम्ही वर जाऊन लढू. मग तुम्ही शस्त्रास्त्रे घेऊन सज्ज झालात. तो डोंगराळ भाग सर करणे सहज जमेल असे तुम्हांला वाटले. 42 “पण परमेश्वर मला म्हणाला, ‘त्यांना तेथे जाऊन युद्ध करण्यापासून परावृत कर. कारण मी त्यांच्या बाजूचा नाही. शत्रू त्यांना पराभूत करेल.’ 43 “त्याप्रमाणे मी त्यांना सांगितले. पण तुम्ही ऐकले नाही. तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळली नाहीत. आणि धिटाई करुन त्या डोंगराळ प्रदेशात चढून गेलात. 44 तेव्हा तेथील अमोरी तुमच्याशी सामना करायला सामोरे आले. आणि चवताळलेल्या मधमाश्यांप्रमाणे त्यांनी सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हाला पिटाळून लावले. 45 मग तुम्ही परत येऊन परमेश्वराकडे मदतीसाठी याचना केलीत. पण त्याने तुमचे काहीही ऐकले नाही. 46 तेव्हा तुम्ही कादेश येथे बरेच दिवस राहिलात.

2:1 “मग परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे आपण मागे फिरुन तांबड्या समुद्राच्या वाटेने रानात निघालो आणि बरेच दिवस सेईर डोंगराभोवती फिरत राहिलो. 2 परमेश्वर तेव्हा मला म्हणाला, 3 ‘या डोंगराभोवती तुम्ही फार दिवस फिरत राहिला आहात. आता उत्तरेकडे वळा. 4 आणि लोकांना आणखी एक सांग. म्हणावे, की तुम्हाला वाटेत सेईर लागेल. ती भूमी एसावच्या वंशाजांची, तुमच्या भाऊबंदांची आहे. त्यांना तुमची भीती वाटेल. तेव्हा सांभाळा. 5 त्यांच्याशी भांडू नका. त्यांच्यातली तसूभरही जमीन मी तुम्हाला देणार नाही. कारण सेईर डोंगर मी एसावला वतन म्हणून दिला आहे. 6 तुमच्या अन्नपाण्याचा खर्च तुम्ही त्यांना द्या. 7 तुमच्या सर्व कार्यात तुमचा देव परमेश्वर याचे तुम्हाला आशीर्वाद आहेत. तुमच्या या रानातील वाटचालीकडे त्याचे लक्ष आहे. गेली चाळीस वर्षे तुमचा देव परमेश्वरा ह्याने तुम्हाला साथ दिली आहे. तुम्हाला कशाचीही वाण पडली नाही. 8 “तेव्हा एसावचे वंशज राहात असलेल्या सेईर वरुन आपण गेलो. एलाथ आणि एसयोन - गेबर वरुन येणारा अराबाचा मार्ग आपण सोडला आणि मवाबच्या रानातल्या रस्त्याला आपण वळलो. 9 “परमेश्वराने मला सांगितले, ‘मवाबाला उपद्रव पोचू देऊ नका. त्यांना युद्धाला प्रवृत करु नका. त्यांच्यातली जमीन मी तुम्हाला देणार नाही. कारण आर नगर मी लोटच्या वंशजांना इनाम दिले आहे.”‘ 10 पूर्वी तेथे एमी लोक राहात असत. ते बहुसंख्य, धिप्पाड व अनाकी लोकांप्रमाणे महाकाय होते. 11 या एमींना लोक अनाकी यांच्यासारखे रेफाई समजत असत. पण मवाबी लोक त्यांना एमी म्हणतात. 12 पूर्वी सेईरात होरी लोकही राहात असत. पण एसावांनी त्यांची जमीन बळकावली, होरींचा संहार केला व तेथे स्वत: वस्ती केली. परमेश्वराने त्यांना दिलेल्या देशाचे इस्राएलांनी जसे केले तसेच त्यांनी इथे केले.) 13 “मग परमेश्वराने मला जेरेद ओढ्यापलीकडे जायला सांगितले. त्याप्रमाणे आपण जेरेद ओढ्यापलीकडे गेलो. 14 कादेश-बणर्या सोडून जेरेद ओढ्यापलीकडे पोहोंचेपर्यंत अडतीस वर्षे उलटली होती. तोपर्यंत आपल्या गोटातील सर्व लढवय्ये मरण पावले होते. परमेश्वराने हे भाकित केलेच होते. 15 त्यांचे समूळ उच्चाटन होईपर्यंत परमेश्वराचा त्यांच्यावर कोप होता. 16 “ती पिढी नामशेष झाल्यावर 17 परमेश्वर मला म्हणाला, 18 “तुला आज मवाबची सीमा ओलांडून आर नगरापलीकडे जायचे आहे. 19 तेथे अम्मोनी लोक भेटतील. त्यांना उपद्रव देऊ नको. त्यांच्याशी युध्द करु नको. त्यांच्या जमिनीतील वाटा मी तुला देणार नाही. कारण ते लोटाचे वंशज असून त्यांना मी ती वतन दिली आहे.”‘ 20 त्या भागाला रेफाई देश असेही म्हणतात. पूर्वी तेथे रेफाई लोकांची वस्ती होती. अम्मोनी त्यांना जमजुम्मी म्हणत. 21 जमजुम्मी संख्येने पुष्कळ व सशक्त होते. अनाकी लोकांप्रमाणे ते धिप्पाड होते. पण त्यांच्या संहार करायला अम्मोनी लोकांना परमेश्वराचे साहाय्य होते. आता त्या जमिनीचा ताबा घेऊन अम्मोनी तेथे राहतात. 22 एसावाच्या वंशजांनाही देवाचे असेच पाठबळ होते. पूर्वी सेईर येथे होरी लोक राहात असत. पण एसावाच्या वंशजांनी होरींचा संहार केला व आजतागायत ते तेथे राहतात. 23 कफतोरी लोकांबद्दलही हेच म्हणता येईल. त्यांचा कफतोराहून आलेल्या लोकांनी उच्छेद करुन त्यांची भूमी बळकावली आणि आता ते तेथे राहात आहेत. 24 “पुढे परमेश्वर मला म्हणाला, ‘आता उठा व आर्णेनचे खोरे ओलांडून जा. हेशबोनचा अमोरी राजा सीहोन याच्याबरोबरच्या युद्धात मी तुम्हाला यश देईन. त्याचा देश ताब्यात घ्या. 25 तुमच्याविषयी मी सर्व लोकांच्या मनात दहशत निर्माण करीन. तुमचे नाव ऐकताच ते भयभीत होतील.’ 26 “मग मी कदेमोथच्या रानातून हेशबोनचा राजा सीहोन याच्याकडे दंतूकरवी सलोख्याचा निरोप पाठवला की, 27 तुमच्या देशातून आम्हाला जाऊ दे. आमची वाट सोडून आम्ही डावी उजवीकडे वळणार नाही. आम्हाला खायला प्यायला लागेल ते आम्ही चांदीच्या मुद्रा देऊन विकत घेवू. 28 आम्हाला फक्त इथून पलीकडे जाऊ दे. 29 यार्देनपलीकडे आमचा देव परमेश्वर आम्हाला देणार असलेल्या जमिनीपर्यंत आम्हाला जायचे आहे. सेईरच्या एसाव लोकांनी आणि आर येथील मवाबी लोकांनी आम्हाला जाऊ दिले तसेच तूही कर. 30 “पण हेशबोनचा राजा सीहोन आपल्या देशातून जाऊ देईना. आपण त्याला पराभूत करावे म्हणूनच तुमचा देव परमेश्वर ह्याने त्याला अडेलतट्ठु केले. आज तुम्ही पाहातच आहात की तो देश आपल्या हाती आहे. 31 “परमेश्वर मला म्हणाला, ‘सीहोन राजा आणि त्याचा देश हे मी तुमच्या हवाली करत आहे. त्यांचा ताबा घ्या. 32 आणि अशा वेळी सीहोन व त्याची प्रजा याहस येथे लढाईसाठी सज्ज झाले. 33 3पण आमच्यावर परमेश्वर परमेश्वर देवाची कृपा होती म्हणून आम्ही त्याचा, त्याच्या मुलांचा व प्रजेचा पराभव करु शकलो. 34 त्याच्या कक्षेतील सर्व नगरांचा आम्ही ताबा घेतला. कोणालाही जिवंत ठेवले नाही. 35 तेथील पशुधन आणि मौल्यवान चिजा मात्र आम्ही आमच्यासाठी घेतल्या. 36 आर्णेन खोऱ्याच्या कडेला वसलेले अरोएर नगर, खोऱ्याच्या मध्यावरील एकनगर तसेच आर्णेन खोरे ते गिलाद या टापूतील सर्व नगरे, परमेश्वर आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही जिंकून घेतली. आम्हाला दुर्गम असे एकही नगर नव्हते. 37 अम्मोन्यांचा प्रदेश वगळता फक्त यब्बोक नदीच्या किनाऱ्यावर तसेच डोंगराळ प्रदेशातील नगरांकडे आम्ही मोर्चा वळवला नाही. कारण आमच्या परमेश्वराने तेथे जाण्यास बंदी केली होती.

3:1 “मग आपण वळसा घेऊन बाशानच्या वाटेने निघालो. तेव्हा एद्राई येथे बाशानचा राजा ओग आणि त्याची सेना युद्धासाठी सामोरी आली. 2 परमेश्वर मला म्हणाला, ‘ओगला भिऊ नका. तो, त्याची प्रजा आणि त्याची भूमी मी तुमच्याच हाती सोपवणार आहे. हेशबोनवर राज्य करणारा अमोऱ्यांचा राजा सीहोन याचा पराजय केलात तसाच याचाही कराल.’ 3 “आमचा देव परमेश्वर ह्याने बाशानचा राजा ओग आणि त्याची प्रजा आमच्या हाती दिली. आम्ही त्यांचा असा समाचार घेतला की त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिले नाही. 4 मग ओगच्या अखत्यारीतील सर्वच्या सर्व साठ नगरे म्हणजे अर्गेाबचा सारा प्रदेश घेतला. बाशानातले ओगचे राज्य ते हेच. 5 या सर्व नगरांना भक्कम तटबंदी होती. त्यांना उंच भिंती, वेशी, मजबूत अडसर होते. याशिवाय तट नसलेली गावे पुष्कळच होती. 6 हेशबोनच्या सीहोन राजाच्या नगरांप्रमाणेच येथेही आम्ही संहार केला. पुरुष, बायका, मुलंबाळं-कोणालाही म्हणून शिल्लक ठेवल नाही. 7 गुरंढोर आणि किंमती लूट मात्र घेतली. 8 “अशाच पद्धतीने अमोऱ्यांच्या दोन राजांच्या ताब्यातला प्रदेशही आपण घेतला. तो म्हणजे यार्देनच्या पूर्वेकडचा, आर्णोन खोऱ्यापासून हर्मोन पर्वतापर्यंतचा. 9 (सीदोनी लोक या हर्मोन पर्वताला सिर्योन म्हणतात. पण अमोरी लोक सनीर म्हणतात.) 10 माळावरील सर्व नगरे, सगळा गिलाद प्रांत तसेच बाशानच्या ओगच्या राज्यातील सलका व एद्रई सकट सर्व प्रांत आपण काबीज केला.” 11 रेई लोकांपैकी बाशानचा राजा ओग तेवढा अजून जिवंत होता. त्याचा पलंग लोखंडाचा होता. तो पलगं तेरा फूट लांब आणि सहा फूट रुंद होता. अम्मोन्यांच्या रब्बा नगरात तो अजूनही आहे.) 12 “तेव्हा ती जमीन आम्ही काबीज केली. रऊबेनी आणि गादी यांना त्यातील काही भाग मी दिला. तो असा - आर्णोन खोऱ्यातल अरोएर नगरापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग व त्यातील नगरे. 13 गिलादाचा उरलेला अर्धा भाग आणि संपूर्ण बाशान मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिले.”(बाशान म्हणजे ओगचे राज्य. त्याच्या एका भागाला अर्गोब म्हणतात. ह्यालाच रेफाईचा देशही म्हणतात. 14 मनश्शेचा मुलगा याईर याने गशूरी आणि माकाथी ह्यांची सीमेपर्यंत अर्गोबचा सर्व प्रदेश हस्तगत केला. त्याच्या नावानेच तो भाग ओळखला जात असे. म्हणून आजही लोक त्याला याईरची नगरेच म्हणतात.) 15 “आणि गिलाद मी माखीराला दिला. 16 त्याचा पुढचा प्रदेश रऊबेनी आणि गादी यांना दिला. आर्णोन खोऱ्याच्या मध्यभागापासून अम्मोन्यांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत त्याची सरहद्द ठरवली. 17 पश्चिमेला यार्देन नदी. उत्तरेला गालिल सरोवर, पूर्वेला पिसागाची उतरण व त्याच्या तळाशी दक्षिणेला मृत समुद्र म्हणजेच क्षार समुद्र. 18 “त्यावेळी मी त्या सर्वांना आज्ञा दिली की यार्देन नदीच्या अलीकडचा हा प्रदेश तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हवाली केला आहे. पण तुमच्यापैकी सर्व लढाऊ पुरुषांनी पुढाकार घेऊन, हत्यारबंद होऊन आपल्या इस्राएली भाऊबंदाना पलीकडे घेऊन जावे. 19 तुमच्या बायका, मुलेबाळे आणि गायीगुरे (ती बरीच आहेत हे मला माहीत आहे) इथेच मी दिलेल्या प्रदेशात राहतील. 20 यार्देन नदी पलीकडचा प्रदेश इस्राएली बांधवांनी ताब्यात घेईपर्यंत त्यांना मदत करा. परमेश्वराच्या कृपेने ते तुमच्या प्रमाणे स्थिरस्थावर झाले की मग तुम्ही आपापल्या प्रदेशात परत या. 21 “मग मी यहोशवाला सांगितले, ‘या दोन राजांचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले हे तू पाहिलेच. पुढेही ज्या ज्या राज्यात तू जाशील त्या सर्वांचे परमेश्वर असेच करील. 22 तेथील राजांना घाबरु नका. कारण युद्धात तुमचा देव परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे.’ 23 “मग मी माझ्यासाठी काहीतरी विशेष करण्यासाठी परमेश्वराची आळवणी केली. मी म्हणालो, 24 ‘परमेश्वर, मी तुझा दास आहे. तुझ्या थक्क करुन टाकणाऱ्या पराक्रमाची तू मला फक्त चुणूक दाखवली आहेस. तुझ्यासारखे थोर प्रताप करणारा स्वर्गात किंवा पृथ्वीवर दुसरा कोण आहे? 25 तेव्हा कृपा करुन मला यार्देन नदी पलीकडची सुपीक भूमी, चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन पाहू दे.’ 26 “पण तुमच्यापायी परमेश्वर माझ्यावर रुष्ट झाला होता. त्याने माझे म्हणणे ऐकले नाही. तो म्हणाला, ‘पुरे, आता एक शब्दही बोलू नको. 27 पिसगाच्या शिखरावर जा. आणि तेथून पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा चारी दिशांना बघ. तेथून तुला सर्व काही दिसेल पण यार्देनच्या पलीकडे तू पाऊल ठेवू शकणार नाहीस. 28 यहोशवाला मात्र तू सूचना दे. त्याला उत्तेजन देऊन समर्थ कर. कारण तोच लोकांना पलीकडे नेईल. तू तो देश पाहशील पण यहोशवाच त्यांना ती जमीन राहाण्यासाठी मिळवून देईल.’ 29 “आणि म्हणून आम्ही बेथ - पौराच्या समोरच्या खोऱ्यात राहिलो.”

4:1 “इस्राएल लोकहो, आता मी जे नियम आणि आज्ञा सांगतो ते नीट ऐकून घ्या. त्यांचे पालन केलेत तर जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला देणार आहे त्याचा ताबा घ्याल. 2 माझ्या आज्ञांमध्ये तुम्ही अधिक - ऊणे करु नका. या तुमचा देव ह्याच्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे. त्या तुम्ही पाळा. 3 “बाआल पौराच्या जे नादी लागले त्यांना परमेश्वराने नष्ट केले. 4 पण परमेश्वराशी एकनिष्ठ राहिलेले तुम्ही आज जिवंत आहा. 5 “परमेश्वराने आज्ञा दिली त्याप्रमाणे विधी आणि नियम मी तुम्हाला शिकवले. तुम्ही जो देश ताब्यात घ्यायला जात आहात तेथे तुम्ही ते पाळावेत म्हणून मी ते सांगितले. 6 त्यांचे काटेकोरपणे पालन करा. म्हणजे तुम्ही सूज्ञ व समजूतदार आहात हे इतर देशवासियांना कळेल. ते हे नियम ऐकून म्हणतील, ‘खरंच, हे महान राष्ट्र (इस्राएल) बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे.’ 7 “आपण आपला देव परमेश्वर ह्याचा धावा करतो तेव्हा तो आपल्या जवळच असतो, असे कोणत्या राष्ट्राचे आहे बरे? 8 ज्या विधी आणि नियमांची शिकवण मी तुम्हाला दिली तसे नियमशासत्र असणारे दुसरे राष्ट्र तरी कोठे आहे? 9 पण तुम्ही हे डोळ्यांत तेल घालून जपले पाहिजे. नाही तर तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्या विसरुन जाल. आपल्या मुला नातवंडांना त्याची माहिती द्या. 10 तुम्ही सर्व होरेब पर्वतापाशी परमेश्वरासमोर उभे होतात तो दिवस आठवा. परमेश्वर मला म्हणाला होता, ‘मला काही सांगायचे आहे तेव्हा सर्वांना एकत्र बोलाव. म्हणजे आयुष्यभर ते माझ्याबद्दल आदर बाळगतील. आपल्या मुलबाळांनाही तशीच शिकवण देतील.’ 11 मग तुम्ही जवळ आलात व पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिलात. तेव्हा डोंगर उभा पेटला होता व त्याच्या ज्वाळा आकाशाला भिडल्या होत्या. सर्वत्र काळेकुट्ठ ढग आणि अंधार पसरला होता. 12 परमेश्वर त्या अग्नीतून तुमच्याशी बोलला. तुम्हाला आवाज ऐकू आला पण दिसले काहीच नाही. फक्त वाणी ऐकू आली. 13 परमेश्वराने आपला पवित्र करार तुम्हाला सांगितला. त्याने तुम्हाला दहा आज्ञा सांगितल्या व त्यांचे पालन करण्याविषयी तुम्हाला आज्ञा दिली. त्याने त्या आज्ञा दोन दगडी पाट्यांवर लिहून दिल्या. 14 त्याचवेळी तुम्ही ज्या देशात वस्ती करणार होतात तेथे पाळण्यासाठी आणखीही काही विधी नियम परमेश्वराने मला तुम्हाला शिकवण्यास सांगितले. 15 “होरेब पर्वतावरुन अग्रीतून परमेश्वर तुमच्याशी बोलला. त्या दिवशी तो तुम्हाला दिसला नाही. कारण त्याला कोणताही आकार नव्हता. 16 तेव्हा जपून असा. कोणत्याही सजीवाची प्रतिमा किंवा खोटी दैवते उभारण्याचे पाप करुन स्वत:ला बिघडवू नका. स्त्री किंवा पुरुषासारखी दिसणारी मूर्ती करु नका. 17 जमिनीवरील प्राणी किंवा आकाशात उडणारा पक्षी, 18 जमिनीवर सरपटणारा जीव किंवा समुद्रातील मासा अशासारखीही मूर्ती करु नका. 19 तसेच आकाशातील सूर्य, चंद्र, तारे आणि इतर गोष्टी पाहाताना सावध राहा. त्यांच्यापुढे लोटांगण घालून त्यांची उपासना करु नका. या गोष्टी तो जगातील इतरांना करु देतो. 20 पण तुम्हाला त्याने मिसर देशाबाहेर आणले आणि तुम्हाला स्वत:चे खास लोक केले. जणू तापलेल्या लोखंडी भट्ठीतून त्याने तुम्हाला बाहेर काढले आणि तुम्ही आता त्याचे खास लोक आहा! 21 “तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावर कोप झाला व त्याने निश्चयाने सांगितले की मी यार्देन नदीपलीकडे पाऊल ठेवू शकणार नाही. परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या ज्या सुपीक भूमीत तुम्ही प्रवेश करणार आहात, तेथे मला मज्जाव आहे. 22 त्यामुळे मी येथेच देह ठेवणार आहे. मी यार्देन नदीपलीकडे येऊ शकत नसलो तरी तुम्ही तो चांगला प्रदेश ताब्यात घ्या व राहा. 23 तेथे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्याशी केलेला पवित्रकरार विसरु नका व त्याच्या आज्ञा पाळा. कुठल्याही प्रकारे कोणत्याही आकाराची मूर्ती करु नका. 24 कारण मूर्तीपूजेचा त्याला तिटकारा आहे. परमेश्वर देव ईर्ष्यावान् असून तो क्षणात भस्म करणारा अग्नी आहे. 25 “त्या देशात तुम्ही दीर्घकाळ राहाल. तुमचा वंश वाढेल. तुम्ही म्हातारे व्हाल. आणि मग तुम्ही स्वत:चा नाश ओढवून घ्याल तुम्ही सर्व तऱ्हेच्या मूर्ती कराल. या तुमच्या कृत्यामुळे देव क्रुद्ध होईल. 26 म्हणून मी आत्ताच तुम्हाला सावध करत आहे. स्वर्ग आणि पृथ्वी याला साक्ष आहेत. ही नीच गोष्ट कराल तर तुमचा नाश त्वरीत होईल. तुम्ही त्या प्रदेशात वस्ती करायला यार्देन नदी पार करत आहात. पण मूर्ती केल्यात तर मात्र तुम्ही तेथे फार काळ राहणार नाही. नव्हे, तुमचा सर्वस्वी नायनाट होईल. 27 परमेश्वर देव तुम्हांला वेगवेगळ्या राष्ट्रात विखरुन टाकील. आणि जेथे जेथे तो पाठवील तेथे तुमची संख्या अगदीच अल्प राहील. 28 तेथे तुम्ही माणसांनी घडवलेल्या दगडी, लाकडी दैवातांची - जे पाहू शकत नाहीत, ऐकत नाहीत, खात नाहीत की वास घेत नाहीत अशांची सेवा कराल. 29 2परंतु तेथूनही तुम्ही परमेश्वराला, आपल्या देवाला काया वाचा मने शरण गेलात तर तो तुम्हाला पावेल. 30 या सर्व गोष्टी घडतील, तुम्ही संकटात असाल तेव्हा तुम्ही पुन्हा त्याच्या कडेच परतून याल व त्याला शरण जाल. 31 आपला परमेश्वर देव दयाळू आहे. तो तुम्हाला अंतर देणार नाही. तो तुमचा सर्वनाश होऊ देणार नाही. तो तुमच्या पूर्वजांशी त्याने केलेला पवित्रकरार तो विसरणार नाही. 32 “असा चमत्कार कधी घडला आहे का? कधीच नाही. पूर्वीचे आठवून बघा. तुमच्या जन्मा आधीपासूनच्याही सर्व गोष्टी आठवा. देवाने पृथ्वीवर माणूस निर्माण केला. तेव्हापासून आजपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या सर्व गोष्टी पाहा. असा महान चमत्कार कोणाच्या ऐकिवात तरी आहे का? 33 साक्षात अग्नीमधून देव तुमच्याशी बोलला, ते तुम्ही ऐकले आणि तरीही तुम्ही जिवंत आहात. असे कधी दुसऱ्या राष्ट्राच्या बाबतील घडले आहे? 34 दुसऱ्या राष्ट्रात जाऊन त्यातून एक राष्ट्र आपलेसे करायचे असा दुसऱ्या कुठल्या परमेश्वराने प्रयत्न तरी केला आहे का? नाही ना? पण आपल्या परमेश्वर देवाने या महान गोष्टी केल्याचे तुम्ही स्वत: पाहिले आहे. त्याने आपले सामर्थ्य व प्रताप तुम्हाला दाखवले आहेत. कसोटी पाहणाऱ्या प्रसंगांतून तुम्ही गेलात. तुम्ही अनेक चमत्कार व नवलपूर्ण गोष्टी पाहिल्यात. तसेच युद्ध आणि भयानक घटनाही पाहिल्यात. 35 परमेश्वर हाच खरा देव आहे हे तुम्हाला कळावे म्हणून त्याने तुम्हाला हे दाखवले. त्याच्यासारखा दुसरा देव नाही. 36 3तुम्हाला शिकवण द्यावी म्हणून त्याने आकाशातून आपली वाणी ऐकवली. पृथ्वीवर आपला महान अग्नी त्याने दाखवला व त्यातून त्याचे शब्द तुम्ही ऐकले. 37 “त्याचे तुमच्या पूर्वजांवर प्रेम होते. म्हणून त्याने तुमची निवड केली. त्यामुळेच त्याने तुम्हाला आपल्या महान सामर्थ्याने मिसर देशातून बाहेर आणले. तो तुमच्या पाठीशी राहिला. 38 तुम्ही जसे पुढे जाल तसे त्याने तुमच्यापेक्षा मोठ्या व समर्थ राष्ट्रांना हुसकून लावले आणि तेथे तुमचा शिरकाव करुन दिला. त्यांचा प्रदेश त्याने तुम्हाला राहाण्यासाठी दिला. आजही तो हे करत आहे. 39 तेव्हा, वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर परमेश्वर हाच देव आहे, दुसरा कोणीही नाही. हे आज तुम्ही नीट समजून घ्या व लक्षात ठेवा. 40 आज मी तुम्हाला त्याचे नियम व आज्ञा सांगणार आहे, त्या पाळा. त्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे भले होईल. तुमच्या परमेश्वर देवाने दिलेल्या प्रदेशात तुमचे वास्तव्य दीर्घकाळ राहील. तो प्रदेश कायमचा तुमचाच होईल. 41 मग मोशेने यार्देन नदीच्या पूर्वेला तीन नगरांची निवड केली. 42 अशासाठी की, पूर्वी काही वैर नसताना, न जाणता एखाद्याने कोणाची चुकून हत्या केली तर त्याला ह्यातल्या एखाद्या नगराचा आसरा घेता यावा. मृत्युदंडाला सामोरे जावे लागू नये. 43 ती नगरे अशी: रऊबेनींसाठी रानातील माळावरचे बेसेर. गादींसाठी गिलादमधील रामोथ आणि मनश्शे लोकांसाठी बाशान मधील गोलान. 44 इस्राएल लोक मिसर देशातून बाहेर पडल्यावर मोशेने त्यांना हे नियमशास्त्र, शिकवण दिली. 45 46 मोशेने हे निर्बंध त्यांना सांगितले तेव्हा ते बेथपौरच्या समोरच्या खोऱ्यात यार्देन नदीच्या पूर्वेला होते. म्हणजेच हेशबोनचा अमोऱ्यांना राजा सीहोन याला पराजित केले त्याच्या देशात. (मोशे आणि इस्राएलच्या लोकांनी मिसरातून बाहेर पडल्यावर सीहोनचा पराभव केला होता.) 47 त्यांनी हा देश आणि बाशानचा राजा ओग याचाही देश ताब्यात घेतला. अमोऱ्यांचे हे दोन्ही राजे यार्देन नदीच्या पूर्वेकडे राहात असत. 48 आर्णोन खोऱ्याच्या सीमेवरील अरोएर नगरापासून थेट सिर्योन (म्हणजेच हर्मोन) पर्वतापर्यंत हा प्रदेश पसरलेला आहे. 49 यार्देन नदीच्या पूर्वेकडील संपूर्ण खोरे, दक्षिणेला अराबा (मृत) समुद्रापर्यंतचा विस्तार, आणि पूर्वेला पिसगा पर्वताच्या पायथ्यापर्यंत एवढा हा प्रदेश त्यांनी काबीज केला होता.

5:1 मोशेने सर्व इस्राएल लोकांना एकत्र बोलवून सांगितले, “इस्राएल लोकहो, आज मी जे विधी आणि नियम सांगतो ते ऐका. ते नीट समजून घ्या आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करा. 2 होरेब पर्वताजवळ असताना तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्याबरोबर कारार केला होता. 3 हा पवित्र करार आपल्या पूर्वजांशी नव्हता तर आपल्याशीच-आज ह्यात असणाऱ्या आपल्या सर्वांशी केला होता. 4 त्या पर्वतावर प्रत्यक्ष आपल्यासमोर उभे राहून, अग्नीतून त्याने आपल्याशी संवाद केला. 5 पण त्या अग्नीच्या भीतीने तुम्ही तो पर्वत चढला नाहीत. तेव्हा त्याचे म्हणणे तुमच्यापर्यंत पोचवायला मी तुम्हा दोघांच्यामध्ये उभा राहिलो. परमेश्वर तेव्हा म्हणाला, 6 मी परमेश्वर, तुमचा देव आहे. मिसरमध्ये तुम्ही गुलामीत होतात तेथून मी तुम्हाला बाहेर काढले. तुम्ही आता या आज्ञा पाळा. 7 “माझ्याखेरीज दुसऱ्या कोणाचीही तुम्ही उपासना करता कामा नये. 8 “तुम्ही कोणतीही मूर्ती करु नका. आकाश, पृथ्वी किंवा पाणी यातील कोणाचीही प्रतिमा किंवा मूर्ती करु नका. 9 कोणत्याही प्रकारच्या मूर्तीची पूजा किंवा सेवा करु नका. कारण मी तुमचा देव परमेश्वर आहे. माझ्या लोकांनी इतर देवांची पूजा करावी ह्याचा मला द्वेष आहे.जे माझ्याविरुध्द पाप करतात ते माझे शत्रू बनतात. त्यांना मी शासन करीन. एवढेच नव्हे तर त्यांची मुले, नातवंडे अशा व पतंवडे चार पिढ्यांना शासन करीन. 10 पण जे माझ्यावर प्रेम करतील आणि माझ्या आज्ञा पाळतील त्यांच्यावर मी दया करीन. त्यांच्या हजारो पिढ्यांवर माझी कृपा राहील. 11 “तुमचा देव परमेश्वर ह्याच्या नावाचा तुम्ही गैरवापर करु नका. जो गैरवापर करील तो दोषी ठरेल. मग परमेश्वर त्याची गय करणार नाही. 12 “शब्बाथ दिवस तुमचा देव परमेश्वरा ह्याच्या आज्ञेप्रमाणे विशेष दिवस म्हणून पाळा. 13 आठवड्यातील सहा दिवस काम करा. 14 पण सातवा दिवस हा तुमचा देव परमेश्वरा ह्याच्या सन्मानार्थ विश्रांतीचा दिवस आहे. म्हणून त्या दिवशी कोणीही काम करता कामा नये. तुम्ही तुमची मुलं, मुली, अतिथी किंवा दास-दासी, एवढेच नव्हे तर तुमचे बैल, गाढव इत्यादी पशू यांनी सुद्धा काम करु नये. तुमच्या गुलामांनाही तुमच्या सारखाच विसावा घेता आला पाहिजे. 15 मिसर देशात तुम्ही गुलाम होता याचा विसर पडू देऊ नका. तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या सामर्थ्याने तुम्हाला तेथून बाहेर आणले, त्याने तुम्हाला मुक्त केले. म्हणून शब्बाथ नेहमी विशेष दिवस म्हणून पाळा, ही तुमचा देव परमेश्वर ह्याचा आज्ञा आहे. 16 “आपल्या आईवडलांचा आदर ठेवा. ही तुमचा देव परमेश्वर ह्याची आज्ञा आहे. हिचे पालन केले तर तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल. तुम्हाला दिलेल्या प्रदेशात तुमचे कल्याण होईल. 17 “कोणाचीही हत्या करु नका. 18 “व्यभिचार करु नका. 19 “चोरी करु नका. 20 “आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्षदेऊ नका. 21 “दुसऱ्याच्या पत्नीची अभिलाषा बाळगू नका. दुसऱ्याचे घर, शेत, दास दासी, गुरे-गाढवे, कशाचीही हाव बाळगू नका.” 22 पुढे मोशे, म्हणाला, “ही वचने परमेश्वराने अग्नी, मेघ आणि घनदाट अंधार यातून तुम्हाला मोठ्या आवाजात सांगितली. तेव्हा तुम्ही त्या पर्वताशी एकत्र जमला होता. एवढे सांगितल्यावर अधिक न बोलता त्याने ती दोन दगडी पाट्यांवर लिहून माझ्याकडे दिली. 23 “पर्वत धगधगून पेटलेला असताना तुम्ही त्याची वाणी काळोखातून ऐकलीत. तेव्हा तुमच्या वंशातील वडीलधारे आणि प्रमुख माझ्याकडे आले. 24 आणि म्हणाले, ‘आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हाला त्याचे तेज आणि महानता दाखवली आहे. त्याला प्रत्यक्ष अग्नीतून बोलताना आम्ही ऐकले. देव माणसाशी बोलला तरी माणूस जगू शकतो हे आम्ही पाहिले आहे. 25 पण पुन्हा परमेश्वर देव आमच्याशी बोलला तर आम्ही नक्की मरु. तो भयंकर अग्नी आम्हाला बेचिराख करील. आणि आम्हाला मरायचे नाही. 26 साक्षात देवाला अग्नीतून बोलताना ऐकूनही नंतर जिवंत राहिला आहे, असा आमच्याखेरीज कोणी ही नाही. 27 तेव्हा मोशे, तूच आपला देव परमेश्वर ह्याच्या जवळ जाऊन त्याचे म्हणणे ऐकून घे. आणि मग ते आम्हाला सांग. आम्ही ते ऐकून त्याप्रमाणे वागू.’ 28 “हे तुमचे बोलणे परमेश्वराने ऐकले. तो मला म्हणाला, ‘मी सर्व ऐकलेले आहे आणि ते ठीकच आहे. 29 ते माझ्याशी आदराने वागले, माझ्या आज्ञा मनापासून पाळल्या तर त्यांचे व त्यांच्या वंशजांचे निरंतर कल्याण होईल. एवढेच मला त्यांच्याकडून हवे आहे.’ 30 “त्यांना म्हणावे तुम्ही परत आपापल्या जागी जा. 31 पण मोशे तू इथेच थांब. त्यांना द्यायच्या सर्व आज्ञा, विधी नियम मी तुला सांगतो. त्यांना मी जो देश वतन म्हणून देत आहे तेथे त्यांनी ते पाळावे.’ 32 “तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपले आचरण राहील याची खबरदारी घ्या. त्यालाच अनुसरा. 33 तुमचा देव परमेश्वर ह्याने दाखवलेल्या मार्गानेच चाला. म्हणजे तुम्हाला वतन दिलेल्या प्रदेशात तुम्ही सुखाने व दीर्घकाळ रहाल.

6:1 “तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला सांगण्यासाठी सांगितलेले विधी, नियम व आज्ञा त्या ह्याच. ज्या प्रदेशात तुम्ही राहण्यासाठी जात आहात तेथे हे नियम पाळा. 2 तुम्ही व तुमची मुले नातवंडे-सर्वांनी आमरण आपल्या परमेश्वराचा आदर बाळगा. त्याने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे वागा, म्हणजे दीर्घायुषी व्हाल. 3 इस्राएल लोकहो, काळजीपूर्वक ऐका व हे नियम पाळा. मग तुमचे भले होईल. तुम्हाला भरपूर संतती होईल आणि तुमच्या देशात दुधामधाचे पाट वाहतील. परमेश्वर देवाने कबूल केल्याप्रमाणे सर्वकाही मिळेल. 4 “हे इस्राएल लोकहो, ऐका! परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे. 5 आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत:करणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा. 6 मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. 7 त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकावा. घरी, दारी, झोपता-उठताना, त्याविषयी बोलत राहा. 8 त्या लिहून आठवणीसाठी हाताला बांधा व कपाळावर चिकटवा. 9 दरवाजाच्या खांबांवर व फाटकांवर त्या लिहून ठेवा. 10 “अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना तुम्हांला हा देश देण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने वचन दिले होते. तो तुम्हांला मिळेल. तुम्ही स्वत: वसवलेली नाहीत अशी मोठी, समृध्द नगरे तो तुम्हाला देईल. 11 उत्तम वस्तूंनी भरलेली घरे परमेश्वर तुम्हाला देईल. तुम्हाला खोदाव्या न लागलेल्या विहिरी परमेश्वर तुम्हांला देईल. तुम्ही लागवड न केलेले द्राक्षांचे आणि जैतून वृक्षांचे मळे तुम्हाला देईल. आणि मुबलक अन्नधान्याने तुम्ही तृप्त व्हाल. 12 “पण सावध राहा! परमेश्वराला विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता पण तेथून त्याने तुम्हांला बाहेर आणले. 13 त्यामा आदर ठेवा व त्याचीच सेवा करी. शपथ घेताना त्याच्या नावाने शपथ वाहा, खोट्या देवांच्या नावाने घेऊ नका. 14 तुमच्या आसपासच्या राष्ट्रातील लोकांच्या दैवतांच्या नादी लागू नका. 15 तुमचा देव परमेश्वर सतत तुमच्या बरोबर आहे. त्याच्या लोकांनी इतर दैवतांची पूजा केलेली परमेश्वराला आवडत नाही. भलत्याच दैवतांची तुम्ही पूजा केल्यास त्याचा कोप होईल. त्या क्रोधाने तो तुम्हाला पृथ्वीच्या पाठीवरुन नष्ट करील. 16 “मस्सा येथे तुम्ही आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहिलीत, तसे इथे करु नका. 17 त्याच्या आज्ञा कटाक्षाने पाळा. त्याच्या शिकवणीचे व नियमांचे पालन करा. 18 उचित आणि चांगले आहे तेच करा. त्यानेच परमेश्वर प्रसन्न होतो. त्याने तुमचे कल्याण होईल. परमेश्वराने जो चांगला प्रदेश तुम्हांला द्यायचे तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे, त्यात तुमचा प्रवेश होईल. 19 परमेश्वराने कबूल केल्याप्रमाणे, तुम्ही आपल्या शत्रूंना हुसकावून लावाल. 20 “आपल्या परमेश्वर देवाने जी शिकवण दिली, विधी नियम सांगितले त्याचा अर्थ काय असे पुढे तुमची मुले विचारतील. 21 तेव्हा त्यांना सांगा की आम्ही मिसरमध्ये फारोचे गुलाम होतो. परंतु परमेश्वराने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हाला तेथून बाहेर आणले. 22 त्याने मिसरी लोक, फारो व त्याचे कुटुंब यांच्याविरुद्ध मोठे प्रभावी चमत्कार करुन दाखवले ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहेत. 23 आपल्या पूर्वजांना कबूल केलेला प्रदेश आपल्याला द्यायला त्याने आम्हांला मिसरमधून बाहेर आणले. 24 ही सर्व शिकवण पाळायची आज्ञा परमेश्वराने आम्हाला दिली आहे. आपण आपला देव परमेश्वर ह्याचा आदर बाळगला पाहिजे. मग तो आपल्याला कायम जीवंत ठेवील व भले करील. 25 जर आपण काळजीपूर्वक परमेश्वराचे सर्व नियम पाळले तर आपण फार चांगली गोष्टकेली आहे असे तो म्हणेल.

7:1 “जो देश वतन करुन घ्यायला तुम्ही निघाला आहात तेथे तुमचा देव परमेश्वर तुम्हाला नेईल. आणि हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबूसी अशा तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलाढ्य अशा सात राष्ट्रांना तेथून घालवून देईल. 2 तुमचा देव परमेश्वर त्यांना तुमच्या अधिपत्याखाली आणेल आणि तुम्ही त्यांचा पराभव कराल तेव्हा तुम्ही त्यांचा समूळ विध्वंस करा. त्यांच्याशी कुठलाही करार करु नका. त्यांना दया दाखवू नका. 3 त्यांच्याशी सोयरीक जुळवू नका. आपल्या मुली त्यांना देऊ नका. त्याच्या मुली आपल्या मुलांना करुन घेऊ नका. 4 कारण हे लोक तुमच्या मुलांना माझ्यापासून विचलीत करतील. त्यामुळे तुमची मुले अन्य दैवतांचे भजनपूजन करतील. अशाने परमेश्वराचा तुमच्यावर कोप होईल व तो तात्काळ तुमचा नाश करील.खोट्या देवांचा नाश करा 5 “त्या देशात तुम्ही असे करा. त्यांच्या वेद्या पाडून टाका. त्यांचे स्मारकस्तंभ फोडून टाका. अशेरा दैवताचे स्तंभउपटून टाका, मूर्ती जाळून टाका. 6 कारण तुम्ही परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. जगाच्या पाठीवरील सर्व लोकांमधून त्याने आपली खास प्रजा म्हणून तुमचीच निवड केली आहे. 7 परमेश्वराने प्रेमाने तुम्हालाच का निवडले? तुम्ही एखाद्या मोठ्या राष्ट्रातील होता म्हणून नव्हे. उलट तुम्ही संख्येने सगळ्यात कमी होता. 8 पण सर्व सामर्थ्यानिशी तुम्हाला दास्यातून मुक्त करुन परमेश्वराने तुम्हाला मिसर बाहेर आणले, फारोच्या अंमलातून सुटका केली. याचे कारण हेच की तुमच्यावर त्याचे प्रेम आहे आणि तुमच्या पूर्वजांना दिलेले वचन त्याला पाळायचे होते. 9 “तेव्हा लक्षात ठेवा तुमचा देव परमेश्वर हाच एक देव आहे. त्यावर विश्वास ठेवा. तो आपला करार पाळतो. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्याच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांवर व त्यांच्या पुढच्या हजार पिढ्यांवर तो दया करतो. 10 पण त्याचा द्वेष करणाऱ्यांना तो शासन करतो. तो त्यांचा नाश करील. त्याचा द्वेष करणाऱ्यांना शासन करण्यास तो विलंब करणार नाही. 11 जेव्हा ज्या आज्ञा व विधी, नियम आज मी सांगितले त्यांचे काळजीपूर्वक पालन करा. 12 “हे नियम तुम्ही नीट ऐकून त्यांचे काटेकोर पालन केलेत तर तुमच्या पूर्वजांशी केलेला प्रेमाचा पवित्र करार तो पाळेल. 13 तो तुमच्यावर प्रेम करील, तुम्हाला आशीर्वाद देईल. तुमच्या राष्ट्राची तो वाढ करील. तो तुमच्या मुलाबाळांना आर्शीवाद देईल. तुमची शेते पिके तो आशीर्वादीत करील. तो तुम्हाला धान्य, नवीन द्राक्षारस व तेल देईल. तुमची गाया बैले, वासरे मेंढ्या व कोंकरे ह्यांना तो आशीर्वाद देईल. तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या प्रदेशात हे सर्व आशीर्वाद तो तुम्हाला देईल. 14 इतरांपेक्षा तुम्ही जास्त आशीर्वादीत व्हाल. प्रत्येक दांपत्याला मुलंबाळं होतील. गाई वासरांना जन्म देतील. 15 परमेश्वर सर्व आजार काढून टाकील. मिसर देशात तुम्हाला माहीत असलेली कोणतीही भयंकर रोगराई इथे होणार नाही. हे रोग परमेश्वर तुमच्या शत्रूंवर आणील. 16 तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हाती सोपवलेल्या सर्वांचा तुम्ही पराभव करुन विध्वंस करा. त्यांच्याबाबतीत वाईट वाटून घेऊ नका. त्यांच्या दैवतांची पूजा करु नका. कारण ती दैवते म्हणजे तुम्हाला अडकवणारा सापळा आहे. त्याने तुमच्या आयुष्याचा नाश होईल. 17 “हे देश आपल्यापेक्षा बलवान आहेत, त्यांना आम्ही कसे घालवून देऊ असा विचारही मनात आणू नका. 18 त्यांची मुळीच भीती बाळगू नका. आपल्या परमेश्वर देवाने फारोचे आणि मिसर देशाचे काय केले ते आठवा. 19 त्यांच्यावर कशी भयंकर संकटे आणली, काय चमत्कार केले हे तुम्ही पाहिलेले आहे. तुम्हाला मिसरबाहेर काढतानाचे त्याचे प्रताप व सामर्थ्य तुम्हाला माहीत आहेत. ज्या लोकांची तुम्हाला भीती वाटते आहे त्यांच्याविरुध्द तुमचा देव परमेश्वर असेच सामर्थ्य वापरील. 20 “याशिवाय, जे तुमच्या तावडीतून निसटतील, लपून बसतील त्यांच्या मागावर परमेश्वर आपला देव गांधील माश्या पाटवील. त्यामुळे त्यांचाही नाश होईल. 21 तेव्हा त्यांना घाबरु नका. कारण परमेश्वर आपला देव तुमच्या बरोबर आहे. तो महान आणि भययोग्य देव आहे. 22 त्या राष्ट्रांना आपला देव परमेश्वर हळूहळू घालवून देईल. त्यांचा तुम्ही एकाच वेळी विध्वंस करणार नाही. कारण तसे झाले तर वन्यपशूंची संख्या प्रमाणाबाहेर वाढेल. 23 पण त्या राष्ट्रांचा बिमोड करण्यात तुमचा देव परमेश्वर तुम्हाला साहाय्य करील. युद्धात त्यांच्यात गोंधळ माजवील आणि शेवटी त्यांचा नाश होईल. 24 परमेश्वराच्या मदतीने तुम्ही त्यांच्या राजांचा पराभव कराल, त्यांना ठार कराल आणि जगाच्या आठवणीतूनही ते पुसले जातील. कोणीही तुम्हांला अडवू शकणार नाही. तुम्ही सर्वांचा विध्वंस कराल! 25 “त्यांच्या दैवतांच्या मूर्ती तुम्ही आगीत टाकून जाळून टाका. त्या मूर्तीवरच्या चांदीसोन्याचा मोह धरु नका, ते घेऊ नका. कारण तो सापळाच आहे. त्याने तुमचे आयुष्य बरबाद होईल. परमेश्वर आपला देव मूर्तिद्वेष्टा आहे. 26 त्या अमंगळ, हानिकारक मूर्ती तुम्ही घरीही आणू नका. त्यांची घृणा बाळगा आणि त्या नष्ट करुन टाका.’

8:1 “आज मी दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करा. कारण त्याने तुम्ही जगाल, आणि वाढून एक महान राष्ट्र बनाल. तुमच्या राष्ट्राची भरभराट होईल. तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने कबूल केलेला प्रदेश तुम्ही ताब्यात घ्याल. 2 तसेच गेली चाळीस वर्षे आपल्या परमेश्वर देवाने तुम्हाला रानावनातून कसे चालवले, त्या प्रवासाची आठवण ठेवा. परमेश्वर तुमची परीक्षा पाहात होता. तुम्हाला नम्र करावे, तुमच्या अंत:करणातील गोष्टी जाणून घ्याव्या, तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता की नाही ते बघावे म्हणून त्याने हे केले. 3 परमेश्वराने तुम्हाला लीन केले, तुमची उपासमार होऊ दिली आणि मग, तुम्ही अन् तुमचे पूर्वज यांना माहीत नसलेला मान्ना तुम्हाला खाऊ घातला. माणूस फक्त भाकरीवर जगत नाही तर परमेश्वराच्या मुखातील वचनाने जगतो हे तुम्हाला कळावे म्हणून त्याने हे सर्व केले. 4 गेल्या चाळीस वर्षात तुमचे कपडे झिजले-फाटले नाहीत की तुमचे पाय सुजले नाहीत. का बरे? कारण परमेश्वराने तुमचे रक्षण केले. 5 तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या आहेत ह्याची आठवण तुम्ही ठेवलीच पाहिजे. बाप आपल्या मुलाला शिकवतो, त्याच्यावर संस्कार करतो तसा तुमचा देव परमेश्वर तुम्हाला आहे. 6 “तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळा, त्याला अनुसरा आणि त्याच्याबद्दल आदर बाळगा. 7 तुमचा देव परमेश्वर तुम्हाला उत्तम देशात घेऊन जात आहे. ती भूमी सुजला, सुफला आहे. तेथे डोंगरात उगम पावून जमिनीवर वाहणारे नद्यानाले आहेत. 8 ही जमीन गहू, जव, द्राक्षमळे, अंजीर, डाळिंब यांनी समृद्ध आहे. येथे जैतून तेल, मध यांची रेलचेल आहे. 9 येथे मुबलक धान्य आहे. कोणत्याही गोष्टीची तुम्हाला उणीव नाही. येथील दगड लोहयुक्त आहोत. तुम्हाला डोंगरातील तांबे खणून काढता येईल. 10 तेव्हा तुम्ही खाऊन तृप्त व्हावे आणि असा चांगला प्रदेश दिल्याबद्दल तुमचा देव परमेश्वर ह्याचे गुणगान गावे. 11 “सावध असा! तुमचा देव परमेश्वर याचा विसर पडू देऊ नका! मी दिलेल्या आज्ञा नियम, विधी, यांचे कटाक्षाने पालन करा. 12 त्यामुळे तुम्हाला अन्न धान्याची कमतरता पडणार नाही. चांगली घरे बांधून त्यात राहाल. 13 तुमची गायीगुरे आणि शेळ्या मेंढ्या यांची संख्या वाढेल. सोनेरुपे आणि मालमत्ता वाढेल. 14 या भरभराटीने उन्मत्त होऊ नका. आपला देव परमेश्वराला विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता. परंतु मिसरमधून परमेश्वराने तुमची सुटका केली व बाहेर आणले. 15 विषारी नाग आणि विंचू असलेल्या निर्जल, रखखीत अशा भयंकर रानातून त्याने तुम्हाला आणले. त्याने तुमच्यासाठी खडकातून पाणी काढले. 16 तुमच्या पूर्वजांनी कधीही न पाहिलेला मान्ना तुम्हाला खायला घालून पोषण केले. परमेश्वराने तुमची परीक्षा पाहिली. शेवटी तुमचे भले व्हावे म्हणून परमेश्वराने तुम्हांला नम्र केले. 17 हे धन मी माझ्याट बळावर आणि कुवतीवर मिळवले असे चुकूनसुद्धा मनात आणू नका.’ 18 तुमचा देव परमेश्वर याचे स्मरण ठेवा. त्यानेच तुम्हाला हे सामर्थ्य दिले हे लक्षात ठेवा. त्याने तरी हे का केले? कारण आजच्याप्रमाणेच त्याने तुमच्या पूर्वजांशी पवित्रकरार केला होता, तोच तो पाळत आहे. 19 “तेव्हा आपला देव परमेश्वर ह्याला विसरु नका. इतर दैवतांना अनुसरु नका. त्यांची पूजी किंवा सेवा करु नका. तसे केलेत तर तुमचा नाश ठरलेलाच ही ताकीद मी आत्ताच तुम्हाला देऊन ठेवतो. 20 त्याचे म्हणणे तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या देखत इतर राष्ट्रांचा नाश परमेश्वराने केला तसाच तो तुमचाही करील!

9:1 “हे इस्राएलांनो ऐका, तुम्ही आज यार्देन नदी पलीकडे जाणार आहात. तुमच्यापेक्षा मोठी आणि शक्तिशाली अशी राष्ट्रे ताब्यात घेणार आहात. तेथील नगरे मोठी आहेत. त्यांची तटबंदी आकाशाला भिडलेली आहे. 2 तेथील अनाकी वंशाचे लोक उंच आणि धिप्पाड आहेत. हे तुम्हाला माहीत आहेच. त्यांचा पाडाव कोणी करु शकणार नाही असे त्यांच्याबद्दल आपल्या हेरांनी म्हटलेले तुम्ही ऐकलेले आहे. 3 पण तुमचा देव परमेश्वर नदी उतरुन आधी तुमच्यापुढे जाणार आहे ह्याची खात्री बाळगा. आणि विध्वंस करणाऱ्या अग्नीसारखा तो आहे. तो राष्ट्रांचा विध्वंस करील. त्या राष्ट्रांना तुमच्यापुढे नमवेल. मग तुम्ही त्यांना घालवून द्याल, त्यांचा तात्काळ पराभव कराल. हे घडणार आहे, असे परमेश्वराने वचनच दिले आहे. 4 “तुमचा देव परमेश्वर त्या राष्ट्रांना तुमच्यापुढून हुसकावून लावेल. पण ‘आमच्या पुण्याईमुळेच परमेश्वराने हा प्रदेश आमच्या ताब्यात दिला’ असे मनात आणू नका. कारण ते खोटे आहे. परमेश्वराने त्यांना घालवले ते त्यांच्या दुष्टपणामुळे, तुमच्या सात्विकपणामुळे नव्हे. 5 तुम्ही फार चांगले आहा आणि योग्य मार्गाने जगता म्हणून तुम्ही येथे राहायला जाणार आहात असे नाही. त्यांच्या दुष्टपणामुळे तुमचा देव परमेश्वर त्यांना घालवून देत आहे आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या पूर्वजांना दिलेला शब्द तो पाळत आहे. 6 तेव्हा तुमचा चांगूलपणा याला कारणीभूत नाही. उलट, खरे सांगायचे तर तुम्ही फार हटृ लोक आहात. 7 “रानात असताना तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाचा कोप ओढवून घेतला होता. मिसर सोडल्या दिवसापासून ते इथे येईपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध बंड करीत आलेले आहात. 8 होरेबात तुम्ही त्याला क्रुद्ध केलेत. तेव्हाच तो तुमचा नाश करणार होता. 9 त्याचे असे झाले. परमेश्वराने तुमच्याशी केलेला पवित्र करार दगडी पाट्यांवर खोदून शब्दबद्ध केला होता. त्या पाट्या आणायला मी डोंगरावर चढून गेलो. तेथे मी चाळीस दिवस अन् चाळीस रात्री अन्नपाणी न घेता राहिलो. 10 परमेश्वराने त्या पाट्या माझ्या हवाली केल्या. परमेश्वराने आपल्या हाताने त्या पाट्यांवर त्याच्या आज्ञा लिहिल्या. तुम्ही पर्वतापाशी जमलेले असताना देव अग्नीतून तुमच्याशी जे बोलला ते सर्व त्याने लिहिले 11 “चाळीस दिवस, चाळीस रात्रीअखेर त्याने त्या आज्ञापटाच्या पाठ्या मला दिल्या. 12 तो म्हणाला, ‘ऊठ आणि ताबडतोब खाली जा. मिसरहून तू आणलेले लोक बिघडले आहेत. इतक्यातच ते माझ्या आज्ञांपासून ढळले आहेत. त्यांनी सोने वितळवून मूर्ती केली आहे.’ 13 “तो असेही म्हणाला, ‘त्यांचे मी एक पाहून ठेवले आहे. ते फार हट्टी आहेत. 14 त्यांची नावनिशाणीही राहणार नाही असा मला त्यांचा नाश कुरु दे. मग मी तुझे, त्यांचाहून श्रेष्ठ आणि समर्थ असे दुसरे राष्ट्र उभारीन.’ 15 “मग मी मागे फिरुन डोंगर उतरुन आलो. डोंगरावर आग धगधगत होती. माझ्या हातात आज्ञापटाच्या दोन पाट्या होत्या. 16 “मी पाहिले की तुमचा देव परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध वागून तुम्ही पाप केले होते. तुम्ही वासराची सोन्याची ओतीव मूर्ती केली होती. तुम्ही परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळण्याचे थांबविलेत! 17 तेव्हा मी धरलेल्या त्या आज्ञापटाच्या पाट्या हातातून फेकून दिल्या आणि तुमच्या समोर त्यांच्या ठिकाऱ्या ठिकाऱ्या केल्या. 18 मग मी परमेश्वरापुढे जमिनीवर डोके टेकून पूर्वीप्रमाणेच चाळीस दिवस अन् चाळीस रात्र पालथा पडून राहिलो. तुमच्या घोर पापामुळे मी हे केले. परमेश्वराच्या दृष्टिने तुम्ही हे फार वाईट केले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतलात. 19 परमेश्वराच्या कोपाची मला भिती वाटत होती कारण संतापाच्या भरात त्याने तुमचा संहार केला असता. पण या ही वेळी परमेश्वराने माझे ऐकले. 20 अहरोनला तर तो संतापाने ठारच करणार होता. पण मी त्याच्यांसाठी प्रार्थना केली. 21 मग तुमचे ते पापीकृत्य-तुम्ही केलेली वासराची मूर्ती-मी आगीत जाळून टाकली. नंतर तिचे तुकडे तुकडे करुन भस्म करुन टाकले व डोंगरावरुन वाहाणाऱ्या ओढ्यात फेकून दिले. 22 “नंतर तबेरा, मस्सा व किब्रोथ-हत्तव्वा येथेही तुम्ही परमेश्वराला संतप्त केलेत. 23 परमेश्वराने तुम्हाला कादेश-बर्ण्या सोडण्यास सांगितले तेव्हाही तुम्ही त्याचे ऐकले नाहीत. त्याने तुम्हाला तो देत असलेला प्रदेश काबीज करायला सांगितले पण त्याचे सांगणे ऐकले नाहीत. त्याच्यावर भरवसा ठेवला नाहीत. त्याची आज्ञा पाळली नाहीत. 24 जेव्हापासून मी तुम्हाला ओळखतो तेव्हापासून तुम्ही परमेश्वराचे ऐकण्यासाठी नेहमीच नकार दिलेला आहे. 25 “तेव्हा मी त्याच्या पायाशी चाळीस दिवस अन् चाळीस रात्री पडून राहिलो. कारण तुमचा नाश करीन असे तो म्हणाला होता. 26 मी त्याची विनवणी केली की हे प्रभो तुझ्या प्रजेचा नाश करु नकोस. ती तुझीच आहे. तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना मिसरमधून मुक्त करुन बाहेर आणले आहेस. 27 अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुझ्या सेवकांना तू शब्द दिला आहेस तो आठव. त्यांचा ताठरपणा विसरुन जा. त्यांची पापे किंवा दुराचार यांच्याकडे दुर्लक्ष कर. 28 तू त्यांना शासन केलेस तर मिसरमधील लोकं म्हणतील, ‘परमेश्वर त्यांना स्वत:च कबूल केलेल्या प्रदेशात नेऊ शकला नाही. त्यांचा तो द्वेष करत होता. म्हणून मारुन टाकण्यासाठीच त्याने त्यांना रानात आणले.’ 29 पण हे लोक तुझेच आहेत. तू त्यांना महासामर्थ्याने आपण होऊन मिसर मधून बाहेर आणले आहेस.

10:1 “तेव्हा हुबेहूब पहिल्यासारख्या दोन सपाट दगडी पाट्या परमेश्वराने मला घडवायला सांगितल्या. ‘त्या घेऊन माझ्याकडे डोंगरावर ये आणि एक लाकडी पेटीही कर’ असे ही सांगितले. 2 तो पुढे म्हणाला, ‘तू फोडून टाकलेल्या पाट्यांवर होता तोच मजकूर मी या पाट्यांवर लिहीन मग तू या नवीन पाट्या पेटीत ठेव.’ 3 “मग मी बाभळीच्या लाकडाची पेटी केली. पहिल्यासारख्याच दोन दगडी पाट्या केल्या आणि डोंगरावर गेलो. पाट्या माझ्या हातातच होत्या. 4 मग, डोंगरावर सर्व जमले होते तेव्हा ज्या दहा आज्ञा परमेश्वराने अग्नीतून तुम्हाला दिल्या त्याच त्याने पहिल्या लेखाप्रमाणे या पाट्यांवर लिहिल्या आणि त्या माझ्या स्वाधीन केल्या. 5 मी डोंगर उतरुन खाली आलो. त्या पाट्या मी केलेल्या पेटीत ठेवल्या. त्या तशा ठेवायला मला परमेश्वराने सांगितले होते. आणि अजूनही त्या तिथे आहेत.” 6 इस्राएल लोक प्रवास करत बनेयाकान विहिरींवरुन मोसेरा येथे आले. तेथे अहरोन मरण पावला. त्याला तेथेच दफन केले. त्याच्या जागी त्याचा मुलगा एलाजार याजकाचे काम करु लागला. 7 इस्राएल लोक मग मोसेराहून गुदगोधा येथे आणि तेथून पुढे थाटबाधा या नद्यांच्या प्रदेशात आले. 8 त्यावेळी परमेश्वराने एका खास कामगिरीसाठी लेवीचा वंश इतरांपेक्षा वेगळा केला. परमेश्वराच्या आज्ञापटाची ती पेटी वाहून नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. याजक म्हणून परमेश्वराची सेवा करणे, परमेश्वराच्या वतीने लोकांना आशीर्वाद देणे ही त्यांची कामे होती. ती ते अजूनही करतात. 9 त्यामुळेच लेवींना इतरांसारखा जमिनीत वाटा मिळाला नाही. परमेश्वराने कबूल केल्याप्रमाणे त्यांची मालमत्ता म्हणजे खुद्द परमेश्वरच आहे.) 10 “मी पहिल्यावेळेप्रमाणेच चाळीस दिवस आणि रात्र डोंगरावर राहिलो. याहीवेळी परमेश्वराने माझे ऐकले व तुमचा नाश न करायचे ठरविले. 11 त्याने मला सांगितले, ‘ऊठ आणि लोकांना पुढच्या प्रवासाला घेऊन जा. म्हणजे मी त्यांच्या पूर्वजांना जो प्रदेश द्यायचे वचन दिले तेथे ते जाऊन राहतील.’ 12 “आता, हे इस्राएल लोकांहो तुमच्या परमेश्वराची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे ते आता ऐका. परमेश्वराची अशी इच्छा आहे की तुम्ही त्याचा मान राखावा आणि तो म्हणतो त्याप्रमाणे करावे तुम्ही त्याच्यावर प्रेम करावे आणि संपूर्ण अंत:करणाने व जीवाने त्याची सेवा करावी. 13 तेव्हा तुमच्या भल्यासाठीच मी आज परमेश्वराचे नियम आणि आज्ञा सांगतो, ते ऐका व पाळा. 14 “सर्वकाही तुमचा देव परमेश्वर ह्याचे आहे. आकाश, आकाशापलीकडचे आकाश, पृथ्वी व पृथ्वीवरचे सर्व काही परमेश्वर देवाचे आहे. 15 त्याचे तुमच्या पूर्वजांवर फार प्रेम होते. त्या प्रेमाखातर त्याने इतरांना वगळून तुम्हांला आपले मानले. आजही वस्तूस्थिती तीच आहे. 16 “तेव्हा हट्टीपणा सोडा. आपली अंत:करणे परमेश्वराला द्या. 17 कारण परमेश्वर तुमचा देव आहे तो देवांचा देव व प्रभुंचा प्रभु आहे. तो महान परमेश्वर आहे. तो विस्मयकारी आहे. त्याला सर्व जण सारखेच आहेत. तो पक्षपात करत नाही की लाच घेत नाही. नवीन दगडी पाट्या 18 अनाथांना, विधवांना इतकेच काय शहरात आलेल्या नवख्यांनाही साहाय्य करतो. त्यांना अन्न वस्त्र पुरवतो. 19 म्हणून तुम्ही परक्यांशी प्रेमाने वागले पाहिजे. कारण मिसर देशात तुम्हीही उपरेच होतात. 20 तुम्ही फक्त तुमचा देव परमेश्वर याचीच सेवा करा. त्याच्याबद्दल आदर बाळगा. त्याला धरुन राहा. शपथ वाहाताना त्याच्याच नावाने शपथ घ्या. 21 फक्त परमेश्वराची स्तुती करा. तो तुमचा देव आहे. त्याने केलेले चमत्कार आणि थोर कृत्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहिली आहेत. 22 तुमचे पूर्वज खाली मिसरमध्ये गेले तेव्हा ते फक्त सत्तरजण होते. आता तुमच्या परमेश्वराच्या कृपेने तुम्ही त्याच्या कितीतरी पट, आकाशातील ताऱ्यांइतके आहात.

11:1 “म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्यावर प्रेम करा. त्याच्या आज्ञेप्रमाणे वागा. त्याने घालून दिलेल्या नियमांचे, आज्ञांचे पालन करा. 2 त्याने तुमच्यासाठी केलेले सर्व प्रताप आज आठवा. हे मी तुम्हांलाच सांगत आहे. तुमच्या मुलाबाळांना नव्हे. कारण त्यांनी यापैकी काहीच पाहिले, अनुभवले नाही. त्याची थोरवी, त्याचे सामर्थ्य व पराक्रम तुम्ही पाहिलेले आहे. 3 मिसरचा राजा फारो व त्याचा सर्व देश यांच्या विरुध्द त्याने कोणती कृत्ये केली हे तुम्ही पाहिलेच आहे. 4 मिसरचे सैन्य, त्यांचे घोडे, रथ यांची कशी दैना झाली, तुमचा ते पाठलाग करत असताना त्यांच्यावर तांबड्या समुद्राच्या पाण्याचा लोंढा कसा आणला हेही तुम्ही पाहिले. परमेश्वराने त्यांना पूर्ण नेस्तनाबूत केले. 5 तुम्ही येथे येईपर्यंत रानावनातून तुम्हाला त्याने कसे आणले हे तुम्हाला माहीत आहेच. 6 त्याचप्रमाणे रऊबेनाचा मुलगा अलीयाब याच्या दाथान व अबीराम या मुलांचे देवाने काय केले ते तुम्हांला माहीत आहे. त्यांना आणि त्यांचे कुटुंबिय, त्यांचे तंबू, नोकरचाकर व गायीगुरे यांना सर्व इस्राएलीदेखत पृथ्वीने आपल्या पोटात घेतले. 7 परमेश्वराची ही महान कृत्ये तुमच्या मुलांनी नाही, तर तुम्ही पाहिलीत. 8 “तेव्हा आज मी देतो ती प्रत्येक आज्ञा कटाक्षाने पाळा त्यामुळे तुम्ही बलशाली व्हाल, यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घ्यायला तुम्ही सिद्ध झाला आहात तो हस्तगत कराल. 9 त्या देशात तुम्ही चिरकाल राहाल. तुमच्या पूर्वजांना व त्यांच्या वंशजांना हा प्रदेश द्यायचे परमेश्वराने वचन दिले आहे. या प्रदेशात सुबत्ता आहे. 10 तुम्ही जिथे जाणार आहात तो प्रदेश तुम्ही सोडून आलेल्या मिसरसारखा नाही. तेथे तुम्ही पेरणी झाल्यावर भाजीचा मळा शिंपावा तसे पायाने कालव्याचे पाणी ओढून देत होता. 11 पण आता मिळणारी जमीन तशी नाही. इस्राएलमध्ये डोंगर आणि खोरी आहेत. आकाशातून पडणाऱ्या पावसाचे पाणी या भूमीला मिळते. 12 तुमचा देव परमेश्वर या जमिनीची काळजी राखतो. वर्षांच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याची या जमिनीवर कृपादृष्टी असते. 13 “परमेश्वर म्हणतो, ‘ज्या आज्ञा मी आज तुम्हांला देत आहे त्यांचे तुम्ही काटेकोरपणे पालन करा. मन:पूर्वक तुमचा देव परमेश्वर याची सेवा करा. त्याच्यावर प्रेम करा. 14 तसे वागलात तर तुमच्या भूमिवर मी योग्य वेळी पाऊस पाडीन. म्हणजे तुम्हाला धान्य, नवीन द्राक्षारस, तेल यांचा साठा करता येईल. 15 माझ्यामुळे तुमच्या गुराढोरांना कुरणात गवत मिळेल. तुम्हाला खाण्याकरीता पुष्कळ असेल.’ 16 “पण सांभाळा, गाफील राहू नका. या देवापासून परावृत होऊन इतर दैवतांचे भजन पूजन करु नका. 17 तसे केलेत तर परमेश्वराचा कोप होईल. तो आकाश बंद करील आणि मग पाऊस पडणार नाही. जमिनीत पीक येणार नाही. जो चांगला देश परमेश्वर तुम्हांला देत आहे त्यात तुम्हांला लौकरच मरण येईल. 18 “म्हणून सांगतो या आज्ञा लक्षात ठेवा. त्या ह्दयात साठवून ठेवा. त्या लिहून ठेवा. आणि लक्षात राहण्यासाठी हातावर बांधा व कपाळावर लावा. 19 आपल्या मुलाबाळांना हे नियम शिकवा. घरीदारी, झोपताना, झोपून उठताना त्याविषयी बोलत राहा. 20 घराच्या फाटकांवर, आणि दारांच्या खांबांवर ही वचने लिहा. 21 म्हणजे जो देश परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला त्या देशात तुम्ही आणि तुमची मुलेबाळे पृथ्वीवर आकाशाचे छप्पर असेपर्यंत राहाल. 22 “मी सांगतो त्या सर्व आज्ञा नीट पाळा. परमेश्वर तुमचा देव ह्याजवर प्रेम करा. त्याने सांगितलेल्या मार्गाने जा. त्याच्यावरच निष्ठा ठेवा. 23 म्हणजे तुम्ही जाल तेव्हा तेथील इतर राष्ट्रांना तो तेथून हुसकावून लावेल. तुमच्यापेक्षा मोठ्या आणि सामर्थ्यवान राष्ट्रांवर तुम्ही ताबा मिळवाल. 24 जेथे जेथे तुम्ही पाय ठेवाल ती जमीन तुमची होईल. दक्षिणेतील वाळवंटापासून उत्तरेला लबानोन पर्यंत आणि पूर्वेला फरात नदीपासून पश्चिमेला समुद्रापर्यंत एवढा प्रदेश तुमचा होईल. 25 कोणीही तुमचा सामना करु शकणार नाही. परमेश्वर देवाने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, तुम्ही जेथे जेथे जाल तेथे लोकांना तुमची दहशत वाटेल. 26 “आज मी तुमच्यापुढे आशीर्वाद आणि शाप हे पर्याय ठेवत आहे. त्यातून निवड करा. 27 आज मी तुमचा देव परमेश्वर ह्याचा ज्या आज्ञा तुम्हाला सांगितल्या त्या नीट लक्षपूर्वक पाळल्यात तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल. 28 पण या आज्ञा न ऐकता भलतीकडे वळलात तर शाप मिळेल. तेव्हा आज मी सांगितल्या मार्गानेच जा. इतर दैवतांच्या मागे लागू नका. परमेश्वराला तुम्ही ओळखता पण इतर दैवतांची तुम्हाला ओळख नाही. 29 “तुमचा देव परमेश्वर तुम्हाला त्या प्रदेशात घेऊन जाईल. तुम्ही लौकरच तो प्रदेश ताब्यात घ्याल. तेथे गेल्याबरोबर तुम्ही गरिज्जीम डोंगरावर जा, व आशीर्वाद उच्चारा. मग तेथून एबाल डोंगरावर जाऊन शापवाणीचा उच्चार करा. 30 हे डोंगर यार्देन नदीच्या पलीकडे, अराबात राहाणाऱ्या कनानी लोकांच्या प्रदेशात, पश्चिमेकडे गिलगाल शहराजवळच्या मोरे येथील ओक वृक्षांजवळ आहेत. 31 तुम्ही यार्देन नदी पार करुन जाल. तुमचा देव परमेश्वर देत असलेली जमीन तुम्ही ताब्यात घ्याल. ती तुमची असेल. त्यात वस्ती कराल तेव्हा 32 मी आज सांगितलेले नियम, विधी यांचे पालन करा.

12:1 “परमेश्वर हा तुमच्या पूर्वजांचा देव आहे. त्याने दिलेल्या प्रदेशात तुम्ही हे विधी व नियम यांचे पालन काटेकोरपणे करा. 2 आता तेथे असलेल्या राष्ट्रांना घालवून तुम्ही ती जमीन ताब्यात घेणार आहात. तेथील लोकांची सर्व पूजास्थळे तुम्ही नेस्तनाबूत करुन टाका. उंच पर्वत, टेकड्या, हिरवीगार झाडी अशा बऱ्याच ठिकाणी ही पूजास्थळे विखुरलेली आहेत. 3 तुम्ही तेथील वेद्या मोडून टाका, दगडी स्मारकस्तंभांचा विध्वंस करा. अशेरा मूर्ती जाळा, त्यांच्या दैवतांच्या मूर्तीची मोडतोड करा. म्हणजे त्या ठिकाणी त्यांची नावनिशाणीही उरणार नाही. 4 “ते लोक करतात तशी तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची उपासना करु नका. 5 तुमचा देव परमेश्वर तुमच्या सर्व वसाहतीतून एक विशिष्ट स्थान निवडून घेईल. आपल्या नावाची स्थापना तेथे करील. ते त्याचे खास निवासस्थान असेल. तेथे तुम्ही उपासनेसाठी जात जा. 6 तेथे तुम्ही आपापले होमबली, यज्ञबली, आपल्या पिकांचा व जनावरांचा एक दशांश हिस्सा, काही खास भेटी, नवस फेडण्याच्या वस्तू, खुशीने अर्पण करायच्या वस्तू तसेच आपल्या पाळीव प्राण्यांना झालेला पहिला गोऱ्हा तुम्ही आणा. 7 आपल्या कुटुंबियासमवेत तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात तुम्ही तेथे भोजन करा. तुम्ही कष्ट करुन जे मिळवलेत त्याच्या आनंदात तेथे तुम्ही सर्वजण सामील व्हा. तुमचा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने तुम्हाला सर्व गोष्टी मनासारख्या मिळत आहेत याची आठवण ठेवा. 8 “आतापर्यंत आपण सगळे जशी उपासना करत आलो तशी आता करु नका. इतके दिवस आपण प्रत्येकाच्या मनाला येईल त्याप्रमाणे देवाची उपासना करत आलो. 9 कारण तुमचा देव परमेश्वर देत असलेले हे विसाव्याचे ठिकाण अजून मिळाले नव्हते. 10 पण आता तुम्ही यार्देन नदी पलीकडे परमेश्वर देणार असलेल्या देशात जाऊन राहणार आहात. तेथे तुम्हाला सर्व शत्रूंपासून अभय मिळेल. तुम्हाला स्वस्थता लाभेल. 11 मग परमेश्वर एक ठिकाणी आपले खास निवासस्थान निवडेल. त्याला तो आपले नाव देईल. तिथे तुम्ही मी सांगतो त्या सर्व वस्तू घेऊन जा-होमबली, यज्ञबली, धान्याचा व प्राण्यांचा दहावा हिस्सा,परमेश्वराला अर्पण करायच्या वस्तू, नवस फेडायच्या वस्तू आणि पाळीव पशुपक्षी यांचा पहिला गोऱ्हा. 12 येताना आपली मुलेबाळे, नोकरचाकर, या सर्वांना या ठिकाणी घेऊन या. तुमच्या वेशींच्या आत राहणाऱ्या लेवींनाही बरोबर आणा (कारण त्यांना जमिनीत तुमच्याबरोबर वाटा नाही.) सर्वांनी मिळून तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात आनंदात वेळ घालवा. 13 आपले होमबली निष्काळजीपणाने वाटेल त्या ठिकाणी अर्पण करु नका. 14 परमेश्वर तुमच्या वसाहतीत कुठेतरी एक पवित्र जागा निवडील. तेथेच तुम्ही हे होमबली अर्पण करा व ज्या इतर गोष्टी करायला सांगितल्या त्या करा. 15 “तथापी, तुम्ही राहता तेथे हरीण, सांबर असे कोणतेही चांगले प्राणी मारुन खाऊ शकता. देवदयेने मिळतील तितके आणि हवे तितके खा. हे मांस शुद्ध, अशुद्ध अशा कोणत्याही लोकांनी खावे. 16 फक्त त्यातले सक्त तेवढे खाऊ नका. ते पाण्यासारखे जमीनीवर ओतून टाका. 17 आपण राहतो तेथे काही गोष्टी खाणे निषिद्ध आहे. त्या म्हणजे, देवाच्या वाट्याचे धान्य, नवीन द्राक्षारस, तेल, कळपातील पहिला गोऱ्हा, देवाला अर्पण करायच्या वस्तू नवस फेडण्याच्या गोष्टी, आणखी काही देवाला अर्पण करायच्या खास गोष्टी वगैरे. 18 या गोष्टी तुमचा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच आणि त्याच्या समवेत खाव्या. आपली मुलेबाळे, दासदासी, वेशीच्या आतील लेवी यांना बरोबर घेऊन तिथे जाऊन त्या खा. जी कामं पार पाडली त्याबद्दल तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात आनंद व्यक्त करा. 19 या देशात राहाल तितके दिवस या सगळ्यात लेवींना न चुकता सामील करुन घ्या. 20 “तुमच्या देशाच्या सीमा वाढवायचे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला वचन दिले आहे. तसे झाले की त्याने निवडलेली जागा तुमच्या राहत्या घरापासून लांब पडेल. तेव्हा मांसाची गरज पडली की जे मिळेल ते मांस तुम्ही खा. परमेश्वराने दिलेल्या पशुपक्ष्यांच्या कळपातील कोणताही प्राणी मारलात तरी चालेल. मी आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही राहत्या जागी हे मांस हवे तेव्हा खा. 21 22 हरीण किंवा सांबर यांच्याप्रमाणेच हे खा. शुद्ध, अशुद्ध कोणीही व्यक्तिने ते खावे. 23 पण रक्त मात्र खाण्यात येऊ देऊ नका. कारण रक्त म्हणजे जीवन आहे. ज्या मांसात जीवनाचा अंश आहे ते खाणे कटाक्षाने टाळा. 24 रक्त सेवन करु नका. ते पाण्यासारखे जमिनीवर ओतून टाका. 25 परमेश्वराच्या दृष्टिने जे योग्य तेच तुम्ही करावे म्हणजे तुमचे व तुमच्या वंशजांचे कल्याण होईल. 26 “देवाला काही विशेष अर्पण करायचे ठरवले तर तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या त्याच्या जागी तुम्ही जावे. नवस बोललात तर तो फेडायलाही तेथे जा. 27 आपले होमबली म्हणजे मांस व रक्त तेथे वेदीवर अर्पण करा. इतर बळींचे रक्त वेदीवर वाहा. मग त्याचे मांस खा. 28 मी दिलेल्या या सर्व आज्ञांचे पालन काळजीपूर्वक करा. जे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टिने चांगले व उचित आहे ते केल्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे निरंतर कल्याण होईल. 29 “तुम्ही दुसऱ्यांच्या जमिनीवर ताबा मिळवणार आहात. तुमचा देव परमेश्वर तुमच्यासाठी त्यांचा पाडाव करील. तेव्हा तेथील लोकांना हुसकावून तुम्ही तेथे राहाल. 30 एवढे झाल्यावर एक खबरदारी घ्या. त्यांचा पाडाव झाल्यावर तुम्हालाच त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होईल. आणि त्यांच्या देवांच्या भजनी लागाल. तेव्हा सावध. त्यांच्या दैवतांच्या नादी लागू नका. ‘या लोकांनी ज्याप्रकारे पूजा केली तशीच मी आता करतो’ असे मनात आणू नका. 31 तुमचा देव परमेश्वर याच्या बाबतीत तसे करु नका. कारण परमेश्वराला ज्या गोष्टींचा तिटकारा आहे त्या सर्व गोष्टी हे लोक करतात. ते देवाप्रीत्यर्थ आपल्या मुलाबाळांचा होमसुद्धा करतात. 32 “तेव्हा मी सांगतो तेच कटाक्षाने करा. त्यात अधिक उणे करु नका.

13:1 “स्वप्नांचे अर्थ सांगणारा एखादा भोंदू संदेष्टा तुमच्याकडे एखाद्या वेळी येईल. आपण काही चिन्ह, किंवा चमत्कार दाखवतो असे तो म्हणेल. 2 कदाचित् त्या चिन्हाचा तुम्हाला पडताळा येईल किंवा चमत्कार खराही ठरेल. मग तो, तुम्हाला अपरिचित अशा इतर दैवतांची सेवा करायला सुचवेल. 3 पण त्याचे ऐकू नका. कारण तुमचा देव परमेश्वर तुमची परीक्षा पाहात असेल. हे लोक आपल्यावर मनापासून प्रेम करतात की नाही हे परमेश्वराला पाहायचे असेल. 4 तेव्हा तुम्ही आपल्या परमेश्वर देवालाच अनुसरा. त्याच्याविषयी आदर बाळगा. त्याच्या आज्ञा पाळा. आणि त्याने सांगितलेले ऐका. त्याची सेवा करा. त्याचा त्याग करु नका. 5 तसेच त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न सांगणाऱ्याला ठार मारा. कारण तो तुम्हाला तुमच्या परमेश्वर देवापासून विचलीत करतो आहे. तुम्ही मिसर देशात गुलाम होतात तेव्हा आपल्या परमेश्वरानेच तुम्हाला तेथून सोडवले आहे. परमेश्वर देवाने आज्ञा देऊन नेमून दिलेल्या जीवनमार्गापासून हा माणूस तुम्हाला दूर नेतो म्हणून आपल्यामधून तुम्ही त्याचे निर्मूलन करा. 6 “तुमच्या निकटची एखादी व्यक्ती हळूच तुम्हांला दुसऱ्या दैवताच्या भजनी लावायचा प्रयत्न करील. ही व्यक्ति म्हणजे तुमचा सख्खा भाऊ, मुलगा, मुलगी, प्रिय पत्नी, किंवा जिवलग मित्रही असू शकतो. तो म्हणेल, ‘चल आपण या दुसऱ्या दैवताची पूजा करु.’ (तुझ्या किंवा तुझ्या पूर्वजांच्या ऐकिवातही नसलेले हे दैवत असेल 7 तुमच्या भोवताली जवळपास किंवा लांब राहणारे जे लोक आहेत त्यांचे हे दैवत होत.) 8 त्या व्यक्तीच्या म्हणण्याला मान्यता देऊ नका. त्याचे ऐकू नका. त्याची कणव येऊ देऊ नका. त्याला मोकळा सोडू नका. तसेच त्याला संरक्षण देऊ नका. 9 त्याला ठार करा. त्याला दगडांनी मारा. पहिला दगड तुम्ही उचला आणि मारायला सुरुवात करा. मग इतर जण त्याला दगडांनी मारतील. कारण मिसरमधून ज्याने तुम्हाला दास्यातून सोडवले त्या परमेश्वर देवापासूनच हा तुम्हाला बहकवायचा प्रयत्न करत आहे. 10 11 ही गोष्ट सर्व इस्राएलांच्या कानावर गेली की ते ही धास्ती घेतील, आणि अशी दुष्कृत्ये करायला धजावणार नाहीत. 12 “तुम्हाला राहाण्याकरता तुमचा देव परमेश्वर नगरे देईल. त्यापैकी एखाद्या नगरातून तुमच्या कानावर वाईट बातमी येईल. ती अशी की 13 तुमच्यापैकीच काही नीच माणसे आपल्यापैकी काही जणांना कुमार्गाला लावत आहेत. ‘आपण अन्य दैवतांची सेवा करु या’ असं म्हणून ते इतरांना बहकवत आहेत. (ही दैवते तुम्हाला अपारिचित असतील.) 14 असे काही कानावर आल्यास ते खरे आहे की नाही याचा आधी पूर्ण शहानिशा करुन घ्या. ते खरे निघाले, असे काही भयंकर घडल्याचे सिद्ध झाले 15 तर त्या नगरातील लोकांना त्याचे शासन द्या. त्या सर्वांचा वध करा. त्यांच्या जनावरांनाही शिल्लक ठेवू नका. ते शहर पूर्णपणे उध्वस्त करा. 16 मग तेथील सर्व मौल्यवान वस्तू गोळा करुन शहराच्या मध्यभागी आणा. आणि त्याचबरोबर सर्व शहर बेचिराख करुन टाका. तो आपल्या परमेश्वराचा होमार्पण असेल. ते शहर पुन्हा कधी ही वसवता कामा नये. 17 ते नगर नाश करायला परमेश्वराच्या हवाली केले जावे म्हणून त्यातील कोणतीही वस्तू स्वत:साठी ठेवून घेऊ नका. ही आज्ञा ऐकलीत तर परमेश्वराचा तुमच्यावरचा क्रोध ओसरेल. त्याला तुमची दया येईल तुमच्याबद्दल प्रेम वाटेल तुमच्या पूर्वजांना त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याच्याकृपेने तुमच्या देशाची भरभराट होईल. नगरे उध्वस्त करण्याविषयी 18 तुमचा देव परमेश्वर याचे ऐकलेत, त्याच्या आज्ञा पाळल्यात तरच हे घडेल. तेव्हा तुमचा देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे योग्य तेच तुम्ही करा.

14:1 “तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहात. तेव्हा कोणी मरण पावले तर शोक प्रदर्शित करायला अंगावर वार करुन घेणे, क्षौर करणे असे करु नका. 2 कारण इतरांपेक्षा तुम्ही वेगळे आहात. तुम्ही परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. आपली खास प्रजा म्हणून त्याने जगभरातून तुमची निवड केली आहे. 3 “परमेश्वराला ज्यांची घृणा वाटते असे काही खाऊ नका. 4 गाय-बैल, शेळ्या, मेंढ्या, सांबर, हरीण, भेकर, चितळ, रोही, गवा, रानमेंढा हे खाऊ शकता. 5 6 दुभंगलेल्या खुरांचाआणि रवंथ करणारा कोणताही प्राणी खाण्यास योग्य आहे. 7 पण उंट, ससा व शाफान खाऊ नका. कारण ते रवंथ करणारे असले तरी त्यांचे खूर दुभंगलेले नाहीत. तेव्हा ते खाण्यास अशुद्ध समजावेत. 8 डुक्करही खाऊ नये. त्याचे खूर दुभंगलेले आहेत पण तो रवंथ करत नाही. तेव्हा तोही अशुद्ध होय. त्याचे मांस खाऊ नका, तसेच मेलेल्या डुकराला स्पर्शही करु नका. 9 “जलचरांपैकी पंख आणि खवले असलेला कोणताही मासा खा. 10 पण ज्यांना पंख आणि खवले नाहीत असा मासा खाऊ नका. ते अशुद्ध अन्न होय. 11 “कोणताही शुद्ध पक्षी खा. 12 पण गरुड, लोळणारा गीध, मत्स्यमाऱ्या, 13 गीध, ससाणा, वेगवेगळ्या जातीच्या घारी, 14 कोणत्याही जातीचा कावळा, 15 शहामृग, गवळणा, कोकीळ, बहिरी ससाणा, 16 पिंगळा, मोठे घुबड व पांढरे घुबड, 17 पाणकोळी, गिधाड, करढोख, 18 बगळा, सर्व प्रकारचे करकोचे, टिटवी, वाघूळ यापैकी कोणताही पक्षी खाऊ नये. 19 “पंख असलेले कीटक खाण्यास अशुद्ध होत. तेव्हा ते खाऊ नयेत. 20 पण कोणताही शुद्ध पक्षी खायला हरकत नाही. 21 “नैसर्गिक मृत्यू आलेला कोणताही प्राणी खाऊ नका. तो तुम्ही नगरात आलेल्या परक्या पाहुण्याला देऊ शकता. त्याला तो खायला हरकत नाही. किंवा त्याला तुम्ही तो विकू शकता. पण तुम्ही मात्र तो खाऊ नका. कारण तुम्ही परमेश्वर तुमचा देव ह्याची पवित्र प्रजा आहात.“करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नका. 22 “दरवर्षी तुमच्या शेतात पिकवलेल्या धान्याचा एक दशांश हिस्सा काढून ठेवा. 23 मग परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या वस्तीच्या ठिकाणी, त्याचा सहवास मिळावा म्हणून जा. धान्य, नवी, द्राक्षारस, तेल यांचा दहावा भाग, गुराढोरांचा पहिला गोऱ्हा यांचे तेथे सेवन करा. असे केल्याने तुमच्या परमेश्वर देवाबद्दल तुमच्या मनात सतत आदर राहिल. 24 पण एखादेवेळी हे ठिकाण फार दूर असेल तर हे सर्व तेथपर्यंत वाहून नेणे तुम्हाला शक्य होणार नाही. असे झाले तर, 25 तेवढा भाग तुम्ही विकून टाका. तो पैसा गाठिला बांधून परमेश्वराने निवडलेल्या जागी जा. 26 त्या पैशाने तुम्ही गायीगुरे, शेळ्या मेंढ्या, द्राक्षारस, मद्य किंवा कोणताही खाद्यपदार्थ विकत घ्या. आणि सहकुटुंब सहपरिवार त्याचा आनंदाने उपभोग घ्या. 27 हे करताना तुमच्या नगरातील लेवींना वगळू नका. त्यांनाही यात सामील करुन घ्या. कारण तुमच्याप्रमाणे त्यांना जमिनीत वाटा मिळालेला नाही. 28 दर तीन वर्षांनी त्या वर्षांच्या उत्पन्नातील दहावा भाग काढून ठेवा. गावातील इतरांसाठी म्हणून हे धान्य गावात वेगळे साठवून ठेवा. 29 लेवींना तुमच्यासारखे वतन नाही म्हणून त्यांनी तसेच इतर गरजूंनीही यातून धान्य घ्यावे. नगरात आलेले परकीय, विधवा, अनाथ मुले यांच्यासाठीही ते आहे. असे वागलात तर तुमचा देव परमेश्वर तुम्हाला सर्व कार्यात आशीर्वाद देईल.

15:1 “दर सात वर्षांच्या शेवटी तुम्ही कर्ज माफ करुन टाकावे. 2 त्याची पद्धत अशी: प्रत्येकाने आपल्या इस्राएल बांधवाला दिलेले कर्ज रद्द करुन टाकावे. त्याला परतफेड करायला सांगू नये. कारण परमेश्वरानेच त्यावर्षी कर्जमुक्ती जाहीर केली आहे. 3 परक्याकडून वसुली करावी, पण इस्राएलाला कर्जमाफी द्यावी. 4 तुमच्या देशात कोणी गरीब असता कामा नये. कारण ही भूमी तुम्हाला परमेश्वराने दिली आहे आणि तो तुम्हाला भरभरुन आशीर्वाद देणार आहे 5 पण त्यासाठी तुम्ही तुमचा देव परमेश्वर याच्या आज्ञेत राहिले पाहिजे. मी आज सांगितलेल्या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळा. 6 मग तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमचे कल्याण करील. तुम्ही इतर राष्ट्रांना उसने द्याल पण उसने घ्यायची तुमच्यावर वेळ येणार नाही. तुम्ही इतर राष्ट्रांवर सत्ता चालवाल पण तुमच्यावर इतरांची सत्ता चालणार नाही. 7 “तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देणार असलेल्या या देशात एखादा माणूस गरीब असेल, त्याला मदत करायला हात आखडता घेऊ नका, स्वार्थीपणाने वागू नका. 8 त्याच्यासाठी हात सैल सोडा आणि त्याच्या गरजेपुरते उसने द्या. 9 “कर्जमाफीचे वर्ष (सातवे वर्ष) आता जवळच आले आहे अशा मतलबी विचाराने कुणाला मदत नाकारु नका. गरजूंच्या बाबतीत असे क्षुद्र विचार मनात आणू नका. त्याच्या बाबतीत अनुदार राहू नका. तसे केले तर ते तुमच्याविरुद्ध परमेश्वराकडे गाऱ्हाणे गातील. आणि तुम्हांला पाप लागेल. 10 “तेव्हा तुम्हांला शक्य आहे ते त्यांना द्या. उदार अंत:करणाने द्या. या सत्कृत्याबद्दल तुम्हांला परमेश्वर देवाचा आशीर्वाद मिळेल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हांला यश मिळेल. 11 गरीब लोक तर देशात नेहमीच असणार म्हणून मी म्हणतो की त्यांना मदत करायला तयार राहा. आपल्या देशातील गरजवंतांना सढळ हाताने मदत करा. 12 “एखादी इब्री बाई किंवा पुरुष तुम्ही दास म्हणून विकत घेतलेला असेल तर सहा वर्षे चाकरी झाल्यावर, सातव्या वर्षी त्याला मुक्त करा. 13 पण त्याला रिक्त हस्ताने जाऊ देऊ नका. 14 त्याला आपल्यातील काही गुरं, धान्यधुन्य, द्राक्षारस द्या. तुमचा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने तुम्हाला भरभरुन मिळाले आहे. तेव्हा तुमच्या दासालाही सढळ हाताने द्या. 15 आपणही मिसरमध्ये दास होतो व तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला मुक्त केले हे लक्षात ठेवा. त्यासाठीच मी तुम्हाला आज ही आज्ञा देत आहे. 16 “तुमच्या कुटुंबाचा लळा लागल्यामुळे आणि आनंदात असल्यामुळे तुमचा एखादा दास तुम्हाला सोडून जायला तयार होणार नाही. 17 तेव्हा दरवाजा जवळ धरुन आरीने त्याचा कान टोचा. तो तुमचा कायमचा दास आहे हे त्यावरुन कळेल. दासीच्या बाबतीतही असेच करा. 18 “दासांना मुक्त करुन जाऊ देताना तुम्हाला जड वाटू नये. पगारी नोकराला तुम्हाला द्यावे लागले असते त्याच्या निम्म्या पैशातच याने तुमची सेवा केली आहे हे लक्षांत ठेवा. असे केलेत तर तुम्ही जे जे कराल त्यात देव तुम्हाला आशीर्वाद देईल. 19 “तुमच्या कळपातील सर्व जनावरांचा पहिला गोऱ्हा पवित्र मानून तो परमेश्वराला अर्पण करा. पहिल्या गोऱ्हाला कामाला जुंप नका. पहिल्या मेंढराची लोकर कातरु नका. 20 दरवर्षी या सगळ्या गोऱ्हांना तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या जागी घेऊन जा. तेथे सर्व कुटुंबियां समवेत परमेश्वरासमोर त्याचे मांस खा. 21 “पण यापैकी एखाद्या जनावरात लंगडेपणा, आंधळेपणा असे काही व्यंग असेल तर तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा बळी देऊ नका. 22 वाटल्यास घरीच त्याचे मांस खा. हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे अशुद्ध व शुद्ध कोणीही ते खावे. 23 फक्त त्याचे रक्तसेवन करु नये. ते तेवढे पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून टाकावे.

16:1 “अबीब महिन्यात लक्षात ठेवून तुमचा देव परमेश्वराप्रित्यर्थ वल्हांडण हा सण साजरा करा. कारण याच महिन्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला रात्रीच्या वेळी मिसरमधून बाहेर काढले. 2 परमेश्वराने आपल्या निवासासाठी निवडलेल्या जागी जा. तेथे वल्हांडणाचा यज्ञपशू परमेश्वराला अर्पण करा. शेळ्या मेंढ्या किंवा गाय बैल यापैकी हा पशू असावा. 3 त्यावेळी खमीर घातलेली भाकर खाऊ नका. बेखमीर भाकरी तुम्ही सात दिवस खावी. ही भाकरी म्हणजे ‘संकटाची भाकर’ होय. त्याने तुम्हाला मिसरमधील संकटांची जन्मभर आठवण राहील. किती गडबडीने तुम्हाला तो देश सोडावा लागला होता! त्याचा तुम्ही आमरण विसर पडू देऊ नका. 4 तेव्हा या सात दिवसात देशभर कुणाच्याही घरी खमीर असता कामा नये. तसेच पहिल्या दिवशी संध्याकाळी जो बळी द्याल तो उजाडायाच्या आत खाऊन संपवून टाका. 5 “वल्हांडणाच्या पशूचे यज्ञार्पण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला वस्तीसाठी दिलेल्या कोणत्याही नगराच्या आत करु नका. 6 देव आपले निवासस्थान निवडील तेथेच व सुर्य अस्त होण्याच्या वेळीच ते केले पाहिजे. मिसरमधून परमेश्वराने तुम्हाला बाहेर काढल्याप्रित्यर्थ हा सण आहे. 7 परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच हा यज्ञपशू शिजवून खा. मग सकाळी आपापल्या घरी परत जा. 8 सहा दिवस खमीर विरहीत भाकर खा. सातव्या दिवशी कोणतेही कामकाज करु नये. या दिवशी सर्वांनी एकत्र येऊन तुमचा देव परमेश्वर ह्याप्रित्यर्थ पवित्र मेळा भरवावा. 9 “पीक काढल्यापासून सात आठवडे मोजा. 10 मग, आपल्या इच्छेनुसार एखादी विशेष भेटवस्तू आणून आपला देव परमेश्वर याच्यासाठी सप्ताहांचा सण साजरा करा. आपल्याला परमेश्वर देवाच्या कृपेने किती मिळाले याचा अंदाज घेऊन किती द्यायचे ते ठरवा. 11 परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या विशेष निवासस्थानी जा. तेथे तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात सहकुटुंब सहपरिवार आनंदात वेळ घालवा. आपली मुलेबाळे, दास, लेवी गावातील पांथस्थ, अनाथ, विधवा या सर्वांना बरोबर घ्या. 12 तुम्ही मिसरमध्ये दास होता हे विसरु नका. तेव्हा हे नियम न चुकता पाळा. 13 “खळयातील आणि द्राक्षकुंडांमधील उत्पन्न जमा केल्यावर सात दिवसांनी मंडपाचा सण साजरा करा. 14 हा सणही मुलंबाळं, नोकरचाकर, लेवी, शहरातील वाटसरु, अनाथ, विधवा, यांच्यासह साजरा करा. 15 तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या निवासस्थानी, त्याच्या सन्मानार्थ सात दिवस हा सण साजरा करा. तुमच्या पिकांवर आणि तुम्ही घेतलेल्या कष्टांवर तुमचा देव परमेश्वर याची कृपादृष्टि आहे. तेव्हा आनंदात राहा. 16 “तुमचा देव परमेश्वर याच्या पवित्र निवासस्थानी तुम्हातील सर्व पुरुषांनी वर्षातून तीनदा एकत्र जमले पाहिजे. बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मंडपाचा सण हे ते तीन प्रसंग होत. येताना प्रत्येकाने भेटवस्तू आणली पाहिजे. 17 प्रत्येकाने यथाशक्ति दिले पाहिजे परमेश्वराने आपल्याला काय दिले याचा विचार करुन आपण काय द्यायचे ते ठरवावे. 18 “तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिलेल्या नगरांमध्ये आपापल्या वंशाप्रमाणे न्यायाधीश व अधिकारी यांच्या नेमणुका कराव्यात. या व्यक्तींनी नीतीने न्यायदान करावे. 19 त्यांनी नेहमी नि:पक्षपाती असले पाहिजे. त्यांनी लाच घेऊन न्यायनिवाडा करता कामा नये. पैसे पाहून भल्या भल्यांचेही डोळे फिरतात व ते निरपराध लोकांच्या म्हणण्याचा विपर्यास करतात. 20 चांगुलपणा आणि नि:पक्षपातीपणा यांचीच नेहमी कास धरावी. म्हणजे तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिलेला हा प्रदेश संपादन करुन तेथे तुम्ही सुखाने राहाल. 21 “जेव्हा तुमचा देव परमेश्वर यासाठी तुम्ही वेदी उभाराल तेव्हा तिच्याशेजारी अशेरा देवीच्या सन्मानार्थ लाकडी स्तंभ उभारु नका. 22 कोणत्याही खोट्या दैवतांसाठी स्तंभ उभारु नका. तुमचा देव परमेश्वर ह्याला अशा गोष्टींचा तिरस्कार वाटतो.

17:1 “यज्ञात अर्पण करायचा गोऱ्हा किंवा मेंढरु यांच्यात कोणतेही व्यंग असता कामा नये. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा तिटकारा आहे. 2 “तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या प्रदेशात राहायला लागल्यावर एखाद्या नगरात दृष्कृत्ये घडल्याचे तुमच्या कानावर येईल. परमेश्वराच्या कराराचा भंग केल्याचे पाप एखाद्या बाईच्या किंवा पुरुषाच्या हातून झाल्याचे कळेल. परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध 3 त्याने इतर दैवतांची पूजा केली, किंवा सूर्य, चंद्र, तारे यांना देवपण दिले अशा स्वरुपाचे ते असेल. मी जी परमेश्वराची आज्ञा तुम्हाला दिली त्याच्या हे विरुद्ध आहे. 4 अशी बातमी कानावर आली की तुम्ही त्याबाबतीत कसून चौकशी करा. हे भयंकर कृत्ये इस्राएलमध्ये खरोखर घडले आहे याबद्दल तुमची बालंबाल खात्री झाली पाहिजे. हे खरे असल्याचे सिद्ध झाले 5 तर ही दुष्कृत्ये करणाऱ्याला स्त्री असो वा पुरुष तुम्ही शिक्षा करा. नगराच्या वेशीजवळ भर चौकात त्या व्यक्तीला आणून तिला दगड धोंड्यांनी मरेपर्यंत मगारा. 6 त्या व्यक्तिच्या दुष्कृत्याला दोन किंवा तीन साक्षीदार असले पाहिजेत. एकच साक्षीदार असेल तर मात्र अशी शिक्षा करु नका. 7 प्रथम साक्षीदारांनी मारायला हात उचलावा, मग इतरांनी मारावे. अशाप्रकारे आपल्यामधून अमंगळपणा निपटून काढावा. 8 “एखादे खुनाचे प्रकरण, दोन व्यक्तीमधील वाद, किंवा मारामारीत एखादा जखमी होणे अशा सारख्या काही खटल्यांमध्ये न्यायानिवाडा करणे तुम्हाला आवाक्या बाहेरचे वाटेल. या वादांची सुनावणी चाललेली असताना उचित काय ते ठरवणे न्यायाधीशांना जड जाईल. अशा वेळी परमेश्वराने निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जावे. 9 तेथे लेवी वंशातील याजक व त्यावेळी कामावर असलेला न्यायाधीश यांचा सल्ला घ्या. या समस्येची सोडवणूक ते करतील. 10 परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी ते आपला निर्णय तुम्हाला सांगतील. त्यांचे म्हणणे ऐकून तसे करा. ते जे जे करायला सांगतील ते ते सर्व कुचराई न करता अंमलात आणा. 11 त्यांचा निवाडा शिरोधार्य मानून त्यांच्या सूचनांमध्ये काडीमात्र बदल न करता त्यांच्या सूचना पाळा. 12 “जो याजकाचे व न्यायाधीशाचे ऐकणार नाही त्याला चांगले शासन करा. त्याला मृत्युदंड द्या. इस्राएलमधून या नीच माणसाचे उच्चाटन करा. 13 हे ऐकून इतरांना दहशत बसेल व घाबरुन ते पुढे उन्मत्तपणा करणार नाहीत. 14 “तुमचा देव परमेश्वर देत असलेल्या प्रदेशात तुम्ही जात आहात. त्याचा ताबा घेऊन तुम्ही तेथे राहाल. मग इतर राष्ट्रांप्रमाणे आपणही आपल्यावर राजा नेमावा असे तुम्हाला वाटेल. 15 तेव्हा परमेश्वराने निवड केलेल्या व्यक्तिची तुम्ही राजा म्हणून नेमणूक करा. राजा हा तुमच्यापैंकीच असला पाहिजे, परदेशी असता कामा नये. 16 त्याने स्वत:साठी अधिकाधिक घोडे बाळगता कामा नयेत. घोडदळ वाढवण्यासाठी त्याने मिसरमध्ये माणसे पाठवता कामा नयेत. कारण, ‘तुम्ही पुन्हा माघारी फिरता कामा नये,’ असे परमेश्वराने बजावले आहे. 17 तसेच त्याला बऱ्याच बायका असू नयेत. कारण त्याने तो परमेश्वरापासून परावृत होईल. सोन्या-रुप्याचाही फार साठा त्याने करु नये. 18 “राज्य करायला लागल्यावर त्याने स्वत:साठी नियमशास्त्राची एक नक्कल वहीत लिहून ठेवावी. याजक, लेवी यांनी आपल्या जवळ ठेवलेल्या पुस्तकातून ती करावी व जन्मभर त्याचे अध्ययन करावे. 19 नियमशास्त्रातील सर्व आज्ञांचे त्याने पालन करावे व अशा रीतीने परमेश्वर देवाचा आदर ठेवावा. 20 म्हणजे आपल्या प्रजेपेक्षा, भाऊबंदापेक्षा आपण कोणी उच्च आहोत अशी जाणीव त्याला स्पर्श करणार नाही. तो नियमांपासून विचलीत होणार नाही. अशाप्रकारे वागल्यास तो व त्याचे वंशज इस्राएलांवर दीर्घकाळ राज्य करतील.

18:1 “लेवी वंशातील लोकांना इस्राएलमध्ये जमिनीत वाटा मिळणार नाही. ते याजक म्हणून काम करतील. परमेश्वरासाठी अग्नीत अर्पण केलेल्या बलींवर त्यांनी निर्वाह करावा. तोच त्यांचा वाटा. 2 इतर वंशांप्रमाणे लेवींना जमिनीत वाटा नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे खुद्द परमेश्वरच त्यांचा वाटा आहे. 3 “यज्ञासाठी गोऱ्हा किंवा मेंढरु मारताना त्या जनावराचा खांद्याचा भाग, गालफडे व कोथळा याजकाला द्यावा. 4 धान्य, नवीन द्राक्षारस व तेल या आपल्या उत्पन्नातील पहिला वाटाही त्यांना द्यावा. तसेच मेंढरांची पहिल्यांदा कातरलेली लोकरही लेवींना द्यावी. 5 कारण तुम्हा सर्वांमधून लेवी व त्याच्या वंशजांना तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या निरंतर सेवेसाठी निवडून घेतले आहे. 6 “प्रत्येक लेवीच्या मंदिरातील सेवेच्या ठराविक वेळा असतील. पण दुसऱ्या कुठल्या वेळेला त्याला काम करायचे असल्यास तो करु शकतो. इस्राएलमध्ये कुठल्याही नगरात राहणारा कुणीही लेवी घर सोडून परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी येऊ शकतो. हे केव्हाही करायची त्याला मुभा आहे. 7 आपल्या इतर बांधवांप्रमाणे त्यानेही तेथे सेवा करावी. 8 त्याला इतरांप्रमाणेच वाटा मिळेल. शिवाय आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात त्याचा वाटा असेलच. 9 “तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या या प्रदेशात राहायला जाल तेव्हा तिकडच्या राष्ट्रातील लोकांप्रमाणे भयंकर कृत्ये करु नका. 10 आपल्या पोटच्या मुलाबाळांचा यज्ञाची वेदीवर बळी देऊ नका. ज्योतिषी, चेटूक करणारा, मांत्रिक यांच्या नादी लागू नका. 11 वशीकरण करणाऱ्याला थारा देऊ नका. मध्यस्थ, मांत्रिक तुमच्यापैकी कोणी बनू नये. मृतात्म्याशी संवाद करणारा असू नये. 12 अशा गोष्टी करणाऱ्यांचा तुमचा देव परमेश्वर ह्याला तिरस्कार आहे. म्हणून तर तो इतर राष्ट्रांना तुमच्या वाटेतून बाजूला करत आहे. 13 तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशी विश्वासू असा. 14 “इतर राष्ट्रांना आपल्या भूमीतून हुसकावून लावा. ते लोक मांत्रिक, चेटूककरणारे अशांच्या नादी लागणारे आहेत. पण तुमचा देव परमेश्वर तुम्हाला तसे करु देणार नाही. 15 तो तुमच्यासाठी संदेष्ट्याला पाठवील. तुमच्यामधूनच तो उदयाला येईल. तो माझ्यासारखा असेल. त्याचे तुम्ही ऐका. 16 तुमच्या सांगण्यावरुनच देव असे करत आहे. होरेब पर्वताशी तुम्ही सर्व जमलेले असताना तुम्हाला या पर्वतावरील अग्नीची आणि देववाणीची भीती वाटली होती. तेव्हा तुम्ही म्हणालात, ‘पुन्हा हा आमचा देव परमेश्वर ह्याचा आवाज आमच्या कानी न पडो. तसा अग्नीही पुन्हा दृष्टीस न पडो, नाहीतर खचितच आम्ही मरु.!’ 17 “तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘यांचे म्हणणे ठिकच आहे. 18 मी यांच्यामधूनच तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन. माझी वचने त्याच्या मुखाने ऐकवीन. माझ्या आज्ञेप्रमाणे तो लोकांशी बोलेल. 19 हा संदेष्टा माझ्या वतीने बोलेल. तेव्हा जो कोणी ते ऐकणार नाही त्याला मी शासन करीन.’ 20 “पण हा संदेष्टा मी न सांगितलेले ही काही माझ्या वतीन बोलला, तर त्याला मृत्युदंड दिला पाहिजे. इतर दैवतांच्या वतीने बोलणारा संदेष्टाही कदाचित् निपजेल. त्यालाही ठार मारले पाहिजे. 21 तुम्ही म्हणाल की अमुक वचन परमेश्वराचे नव्हे हे आम्हाला कसे कळणार? 22 तर, परमेश्वराच्या वतीने म्हणून तो संदेष्टा काही बोलला व ते प्रत्येक्षात उतरले नाही तर समजा की ते परमेश्वराचे बोलणे नव्हे, तो संदेष्टा स्वत:चेच विचार बोलून दाखवत होता. त्याला तुम्ही घाबरायचे कारण नाही.

19:1 “लेवी वंशातील लोकांना इस्राएलमध्ये जमिनीत वाटा मिळणार नाही. ते याजक म्हणून काम करतील. परमेश्वरासाठी अग्नीत अर्पण केलेल्या बलींवर त्यांनी निर्वाह करावा. तोच त्यांचा वाटा. 2 इतर वंशांप्रमाणे लेवींना जमिनीत वाटा नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे खुद्द परमेश्वरच त्यांचा वाटा आहे. 3 “यज्ञासाठी गोऱ्हा किंवा मेंढरु मारताना त्या जनावराचा खांद्याचा भाग, गालफडे व कोथळा याजकाला द्यावा. 4 धान्य, नवीन द्राक्षारस व तेल या आपल्या उत्पन्नातील पहिला वाटाही त्यांना द्यावा. तसेच मेंढरांची पहिल्यांदा कातरलेली लोकरही लेवींना द्यावी. 5 कारण तुम्हा सर्वांमधून लेवी व त्याच्या वंशजांना तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या निरंतर सेवेसाठी निवडून घेतले आहे. 6 “प्रत्येक लेवीच्या मंदिरातील सेवेच्या ठराविक वेळा असतील. पण दुसऱ्या कुठल्या वेळेला त्याला काम करायचे असल्यास तो करु शकतो. इस्राएलमध्ये कुठल्याही नगरात राहणारा कुणीही लेवी घर सोडून परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी येऊ शकतो. हे केव्हाही करायची त्याला मुभा आहे. 7 आपल्या इतर बांधवांप्रमाणे त्यानेही तेथे सेवा करावी. 8 त्याला इतरांप्रमाणेच वाटा मिळेल. शिवाय आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात त्याचा वाटा असेलच. 9 “तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या या प्रदेशात राहायला जाल तेव्हा तिकडच्या राष्ट्रातील लोकांप्रमाणे भयंकर कृत्ये करु नका. 10 आपल्या पोटच्या मुलाबाळांचा यज्ञाची वेदीवर बळी देऊ नका. ज्योतिषी, चेटूक करणारा, मांत्रिक यांच्या नादी लागू नका. 11 वशीकरण करणाऱ्याला थारा देऊ नका. मध्यस्थ, मांत्रिक तुमच्यापैकी कोणी बनू नये. मृतात्म्याशी संवाद करणारा असू नये. 12 अशा गोष्टी करणाऱ्यांचा तुमचा देव परमेश्वर ह्याला तिरस्कार आहे. म्हणून तर तो इतर राष्ट्रांना तुमच्या वाटेतून बाजूला करत आहे. 13 तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशी विश्वासू असा. 14 “इतर राष्ट्रांना आपल्या भूमीतून हुसकावून लावा. ते लोक मांत्रिक, चेटूककरणारे अशांच्या नादी लागणारे आहेत. पण तुमचा देव परमेश्वर तुम्हाला तसे करु देणार नाही. 15 तो तुमच्यासाठी संदेष्ट्याला पाठवील. तुमच्यामधूनच तो उदयाला येईल. तो माझ्यासारखा असेल. त्याचे तुम्ही ऐका. 16 तुमच्या सांगण्यावरुनच देव असे करत आहे. होरेब पर्वताशी तुम्ही सर्व जमलेले असताना तुम्हाला या पर्वतावरील अग्नीची आणि देववाणीची भीती वाटली होती. तेव्हा तुम्ही म्हणालात, ‘पुन्हा हा आमचा देव परमेश्वर ह्याचा आवाज आमच्या कानी न पडो. तसा अग्नीही पुन्हा दृष्टीस न पडो, नाहीतर खचितच आम्ही मरु.!’ 17 “तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘यांचे म्हणणे ठिकच आहे. 18 मी यांच्यामधूनच तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन. माझी वचने त्याच्या मुखाने ऐकवीन. माझ्या आज्ञेप्रमाणे तो लोकांशी बोलेल. 19 हा संदेष्टा माझ्या वतीने बोलेल. तेव्हा जो कोणी ते ऐकणार नाही त्याला मी शासन करीन.’ 20 “पण हा संदेष्टा मी न सांगितलेले ही काही माझ्या वतीन बोलला, तर त्याला मृत्युदंड दिला पाहिजे. इतर दैवतांच्या वतीने बोलणारा संदेष्टाही कदाचित् निपजेल. त्यालाही ठार मारले पाहिजे. 21 तुम्ही म्हणाल की अमुक वचन परमेश्वराचे नव्हे हे आम्हाला कसे कळणार? 22 तर, परमेश्वराच्या वतीने म्हणून तो संदेष्टा काही बोलला व ते प्रत्येक्षात उतरले नाही तर समजा की ते परमेश्वराचे बोलणे नव्हे, तो संदेष्टा स्वत:चेच विचार बोलून दाखवत होता. त्याला तुम्ही घाबरायचे कारण नाही.

20:1 “तुम्ही शत्रूवर चाल करुन जाल तेव्हा त्यांचे घोडे, रथ आणि तुमच्यापेक्षा मोठे सैन्य पाहून घाबरुन जाऊ नका. कारण ज्याने तुम्हाला मिसरमधून बाहेर काढले तो परमेश्वर देव तुमचा पाठीराखा आहे. 2 “तुम्ही युद्धावर जाल तेव्हा तुमच्या याजकाने आपल्या सैन्याशी बातचीत करावी. 3 ती अशी, ‘इस्राएल लोकहो, ऐका. तुम्ही आज शत्रूवर चाल करुन जात आहात. तेव्हा आपले धैर्य गमावू नका. भयभीत होऊ नका. उभारी कायम ठेवा. शत्रूला घाबरु नका. 4 कारण तुम्हाला देव परमेश्वर ह्याची साथ आहे. शत्रू विरुद्ध लढाई करायला तसेच विजय मिळवायला तो तुम्हाला मदत करणारा आहे.’ 5 “मग लेवी अधिकाऱ्यांनी सैन्याला उद्धेशून असे सांगावे, ‘नवीनघर बांधून अजून गृह प्रवेश केला नाही असा कोणी तुमच्यात आहे का? त्याने परत जावे. कारण तो युद्धात प्राणाला मुकल्यास दुसरा कोणी गृहप्रवेश करील. 6 द्राक्षमळा लावून अजून त्याची तोडणी केली नाही, फळ चाखले नाही असा कोणी आहे काय? त्याने माघारी जावे कारण तो युद्धात मरण पावल्यास दुसराच कोणी त्याच्या मळ्यातील फळे खाईल. 7 तसेच, वाडग निश्चय होऊन अजून लग्न झालेले नाही असा कोणी असल्यास त्याने परत जावे. कारण तो युद्धात कामी आल्यास त्याच्या वाग्दत्त वधूशी दुसरा कोणी लग्न करील.’ 8 “त्या लेवी अधिकाऱ्यांनी पुढे हेही सांगावे की युद्धाच्या भीतीने कोणी गलितगात्र झालेला असल्यास त्याने घरी परत जावे. नाहीतर त्याच्यामुळे इतरांचेही अवसान गळेल. 9 अशाप्रकारे सैन्याशी संभाषण केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सेनापतींची नेमणूक करावी. 10 “तुम्ही एखाद्या नगरावर चाल करुन जाल तेव्हा प्रथम शांततेच्या तहाची बोलणी करुन पाहा. 11 त्यांनी तुमच्या बोलण्याला मान्यता देऊन नगराचे दरवाजे उघडले तर तेथील सर्व प्रजा तुमची गुलाम होईल व तुमची सेवाचाकरी करील. 12 पण त्यांनी तुमची तहाची बोलणी फेटाळून लावली आणि ते युद्धाला सज्ज झाले तर मग नगराला वेढा घाला. 13 आणि तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देईल तेव्हा तेथील सर्व पुरुषांना ठार करा. 14 पण तेथील बायका, मुले, गुरेढोरे इत्यादी लूट स्वत:साठी घ्या. तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या या लुटीचा उपभोग घ्या. 15 तुमच्यापासून फार लांब असणाऱ्या व तुमच्या प्रदेशाबाहेर असणाऱ्या नगरांबाबत असे करण्यात यावे. 16 “पण तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशातील नगरे तुम्ही ताब्यात घ्याल तेव्हा तिथे मात्र कोणालाही जिवंत ठेवू नका. 17 हत्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबूसी अशा एकूण एक सर्वांचा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे समूळ नाश करा. 18 नाहीतर आपापल्या दैवतांची पूजा करताना ते ज्या अमंगळ गोष्टी करतात त्या ते तुम्हाला शिकवतील आणि तसे करणे आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने पाप आहे. 19 “युद्धात एखाद्या नगराला तुम्ही फार काळ वेढा घालून राहिलात तर तेथील फळझाडांवर कुऱ्हाड चालवू नका. त्यांची फळे अवश्य खा पण झाडे तोडू नका. त्यांच्याशी युद्ध पुकारायला ती झाडे काही तुमची शत्रू नाहीत. 20 पण ज्यांना फळ येत नाहीत ती झाडे तोडलीत तरी चालतील. युद्ध चालू असेपर्यंत युद्धासाठी लागणारी शस्त्र बनवायला त्या लाकडाचा उपयोग हवा तर करा.

21:1 “तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात एखाद्याचा उघड्यावर खून झालेला आढळला आणि मारेकऱ्याचा पत्ता लागला नाही 2 तर तुमच्यापैकी वडीलधारे आणि न्यायाधीश यांनी पुढे येऊन मृतदेहापासून सभोवर पसरलेल्या गावांचे अंतर मोजावे. 3 मग जो गाव प्रेताच्या सर्वात जवळचा असेल तेथील वडिलधाऱ्यांनी आपल्या कळपातील एक गाय निवडावी. कधीही कामाला न जुंपलेली व अजून न व्यायलेली अशी ती गाय असावी. 4 मग तिला वाहता झरा असलेल्या खोऱ्यांत आणावी. हे खोरे कधी पेरणी, नांगरणी न झालेले असावे. अशा ठिकाणी त्या गायीची मान कापावी. 5 लेवी वंशातील याजकांनी या वेळी तिथे असावे. (आपली सेवा करुन घ्यायला आणि आपल्या वतीने लोकांना आशीर्वाद द्यायला तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांची याजक म्हणून निवड केली आहे. प्रत्येक वादात किंवा मारामारीत ते निवाडा करतील.) 6 त्या खोऱ्यात, मृताच्या जवळच्या नगरातील वडील माणसांनी, गाय मारल्यावर तिच्या मानेतून वाहणाऱ्या रक्ताने आपले हात धुवावे. 7 व म्हणावे ‘या व्यक्तीला आमच्या हातून मरण आले नाही. ही घटना घडताना आम्ही पाहिली नाही. परमेश्वरा तू इस्राएलाल वाचवलं आहेस. 8 आम्हाला तू आपलस केल आहेस. आमचा उद्धार केला आहेस. आम्हाला शुद्ध कर. एका निरपराध व्यक्तीच्या हत्त्येबद्दल आम्हाला दोषी धरु नकोस. असे केले असता त्या निरपराध व्यक्तीच्या हत्येचे पाप या लोकांना लागणार नाही.’ 9 याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टिने जे योग्य ते करुन तुम्ही आपल्यामधून या पापाचा निचरा करा. 10 “शत्रूशी युद्ध करायला गेल्यावर तुमचा देव परमेश्वर ह्याच्या साहाय्याने तुम्ही शत्रूला पराभूत कराल व त्याच्या सैनिकांना बंदीवान कराल. 11 तेव्हा बंदिवानात एखादी सुंदर स्त्री पाहून तिच्याशी लग्न करावे असे एखाद्याला वाटेल. 12 तेव्हा त्याने तिला आपल्या घरी आणावे. तिने आपले केशवपन करावे व नखे कापावी. 13 तिचे पहिले, युद्धकैदीचे द्योतक असलेले वस्त्रही काढून टाकावे. आपल्या आईवडलांपासून दुरावल्याबद्दल तिने पूर्ण महिनाभर त्याच्या घरी शोक करावा. मग त्याने तिच्याजवळ जावे. म्हणजे तो तिचा पती व ती त्याची पत्नी होईल. 14 पुढे त्याला ती आवडली नाही तर त्याने घटस्फोट देऊन तिला मुक्त करावे. पण तिची विक्री करु नये. तिला गुलाम म्हणूनही त्याने वागवता कामा नये. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवला होता. 15 “एखाद्याला दोन बायका असतील आणि त्याचे एकीवर दुसरीपेक्षा जास्त प्रेम असेल. दोघींना मुले असतील. पण नावडतीचा मुलगा सगळ्यात मोठा असेल. 16 अशा परिस्थितीत, आपल्या मालमत्तेची वाटणी करताना ज्येष्ठ मुलाच्या वाटणीचे, आवडतीच्या मुलाला देऊ नये. 17 त्याने आपल्या ज्येष्ठ पुत्राचा नावडतीचा मुलगा असला तरी स्वीकार केला पाहिजे. तसेच आपल्या एकंदर मालमत्तेतील दुप्पट वाटा त्याला दिला पाहिजे. कारण तो ज्येष्ठ पुत्र आहे. व त्यालाच जेष्ठपणाचा हक्क आहे. 18 “एखाद्याचा मुलगा हट्ठी अजिबात न ऐकणारा, आईबापांना न जुमानणारा निघतो. शिक्षा केली तरी काही फरक पडत नाही. 19 अशावेळी आईवडलांनी त्याला गावच्या चावडीवर वडीलधाऱ्यांपुढे न्यावा. 20 त्यांनी सांगावे की, हा उद्दाम आहे. आमचे ऐकत नाही. तसेच तो खादाड व मद्यपी आहे. 21 यावर त्या गावातील माणसांनी या मुलाला दगडांनी मरेपर्यंत मारावे. असे केल्याने तुम्ही हे पाप आपल्यामधून काढून टाकाल. इस्राएलमधील इतर लोकांच्या कानावर ही गोष्ट गेली की ते घाबरुन राहतील. 22 “एखाद्याचा अपराध मुत्युदंड मिळण्याइतका मोठा असेल. अशावेळी त्याच्या देहान्ता नंतर लोक त्याचे प्रेत झाडाला टांगतील. 23 तेव्हा ते रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नका. त्याचदिवशी कटाक्षाने त्याचे दफन करा. कारण झाडाला टांगलेल्या त्या मृतदेहाला देवाचा शाप असतो. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेली भूमी अशी विटाळू नका.

22:1 “आपल्यापैकी कोणाचा बैल किंवा मेंढरु मोकाट सुटलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष न करता ते त्याच्या मालकाकडे पोंचते करा. 2 तो मालक जवळपास राहात नसला किंवा कोण ते माहीत नसला तर त्या जनावराला आपल्या घरी आणा. त्याचा मालक शोध करत आला की त्याचे त्याला परत करा. 3 कोणाचे गाढव, कपडे किंवा इतर कोणतीही वस्तू अशी इकडे तिकडे दिसली तरी असेच करा. व त्या शेजाऱ्याला मदत करा. 4 “कोणाचे गाढव किंवा बैल रस्त्यात पडलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष करु नका. त्याला उठवून उभे राहायला मदत करा. 5 “बायकांनी पुरुषांचा किंवा पुरुषांनी बायकोचा पेहेराव करु नये. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने ते निंद्य आहे. 6 “वाटेत तुम्हाला झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे घरटे आढळले आणि मादी अंडी उबवत किंवा पिल्लांवर बसलेली दिसली तर पिल्लांसकट तिला नेऊ नका. 7 हवी तर फक्त पिल्ले घ्या पण आईला सोडा. हे नियम पाळलेत तर तुमचे कल्याण होईल व तुम्ही चिरायु व्हाल. 8 “नवीन घर बांधलेत तर त्याच्या छताला कठडाअवश्य करा. म्हणजे वरुन तोल जाऊन कोणी पडल्यास त्याच्या हत्येचे पातक तुम्हाला लागणार नाही. 9 “द्राक्षमळ्यात इतर धान्याचे बियाणे पेरु नये. पेरलेत तर सारेच वाया जाईल. धान्य आणि द्राक्षं यापैकी काहीच तुम्हाला वापरता येणार नाही. 10 “बैल आणि गाढव एका नांगराला जुंपू नका. 11 “लोकर आणि ताग यांच्या मिश्र विणीचे वस्त्र वापरु नका. 12 “वेगवेगळे धागे एकत्र करुन त्यांचे गोंडेआपल्या पांघरायच्या वस्त्राला चारीही टोकांना लावा. 13 “एखाद्या माणसाला लग्न केल्यावर बायकोशी शरीरसंबंध ठेवल्यावर काही काळानंतर बायको आवडेनाशी झाली आणि 14 “मी या बाईशी लग्र केले पण ती कुमारी नसल्याचे आमच्या शरीरसंबंधाच्या वेळी मला आढळून आले’ असा खोटा आरोप त्याने तिच्यावर ठेवला तर लोकांमध्ये तिची बदनामी होईल. 15 अशा वेळी त्या मुलीच्या आईवडिलांनी तिच्या कौमार्याचा पुरावा घेऊन गावच्या चावडीवर वडीलधाऱ्या पंचाकडे जावे. 16 ‘मी या पुरुषाशी माझ्या मुलीचे लग्न लावून दिले आहे. पण आतां ती त्याला नकोशी झाली आहे. 17 त्याने तिच्यावर भलते सलते आरोप केले आहेत. आणि हा म्हणतो की कौमार्याची लक्षणे तिच्या ठायी आढळली नाहीत. पण हा घ्या माझ्या मुलीच्या कौमार्याचा पुरावा,’ असे मुलीच्या वडलांनी नेथे सांगून, त्या मंडळींना ती चादर दाखववावी. 18 यावर गावच्या पंचानी त्या नवऱ्याला धरुन शिक्षा करावी. 19 त्याला चाळीस औंस चांदीदंड करावा. एका इस्राएल कन्येवर ठपका ठेवून तिची बदनामी केल्याबद्दल ही रक्कम त्याने मुलीच्या वडीलांना द्यावी. त्याने बायको म्हणून तिचा स्वीकार केला पाहिजे. तसेच जन्मभर त्याने तिचा त्याग करता कामा नये. 20 पण बायकोबद्दल नवऱ्याने केलेला आरोप खराही असू शकतो. तिच्या कौमार्याचा पुरावा तिचे आईवडील दाखवू शकले नाहीत तर 21 गावातील ज्येष्ठ मंडळींनी तिला आपल्या वडिलांच्या घराच्या दारापाशी आणावी आणि गावकऱ्यांनी तिला मरेपर्यंत दगडांनी मारावे. कारण तिने इस्राएलमध्ये ही लाजिरवाणी गोष्ट केली आहे. आपल्या वडलांच्या घरी असतानाचे तिचे वर्तन वेश्येसमान आहे. हा कलंक आपल्यामधून तुम्ही धुवून काढलाच पाहिजे. 22 “एखाद्या पुरुषाचे दुसऱ्या विवाहित स्त्री बरोबर लैंगिक संबंध असतील तर दोघांनाही मृत्युदंड द्यावा. आणि इस्राएलमधून या दुराचाराचे निमूर्लन करावे. 23 “एखाद्या कुमारिकेचा वाङनिश्चय झालेला असताना गावातील दुसऱ्या एखाद्या पुरुषाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवलेले आढळले तर 24 त्या दोघांना गावाच्या वेशीपाशी भर चौकात आणून दगडांनी मरेपर्यंत मारावे-ती दुसऱ्याची बायको होणार होती. तिच्याशी शरीरसंबधं ठेवल्याबद्दल पुरुषाला आणि गावांत असून मदतीसाठी आरडाओरडा केला नाही म्हणून त्या मुलीला मरेपर्यंत दगडांनी मारावे. अशाप्रकारे आपल्या लोकांमधून हा दुराचार निपटून टाकवा. 25 “पण अशा वाग्दत्त मुलीला एखाद्याने रानात गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला तर मात्र फक्त त्या पुरुषाला मारावे. 26 त्या मुलीला काही करु नये. देहान्तशासन व्हावे असे तिने काही एक केले नाही. कोणी आपल्या शेजाऱ्यावर चालून जाऊन त्याचा जीव घ्यावा तसेच हे झाले. 27 त्याला ही मुलगी रानात आढळली. त्याने तिच्यावर हात टाकला. कदाचित् तिने मदतीसाठी हाका मारल्याही असतील पण तिच्या बचावासाठी तिथे कोणी नव्हते. तेव्हा तिला शिक्षा करु नये. 28 “जिचा वाङनिश्चय झालेला नाही अशी कुमारिका कोणाला आढळली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला हे लोकांनी पाहिल्यास 29 त्याने मुलीच्या वडीलांना वीस औंस चांदीद्यावी. आता ती त्याची बायको झाली. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचे पाप केले आहे. तो आता तिचा जन्मभर त्याग करु शकत नाही. 30 “आपल्या वडलांच्या बायकोशी गमन करुन कोणी त्यांच्या तोंडाला काळे फासू नये.”

23:1 “जो भग्नांड किंवा छिन्नेंद्रिय आहे त्याला परमेश्वराच्या उपासनेत सहभागी होण्यास मनाई आहे. 2 ज्यांच्या आईवडीलांचा रीतसर विवाह झालेला नाही त्यानेही उपासनेत सहभागी होऊ नये. त्याच्या दहाव्या पिढीपर्यंत ही मनाई आहे. 3 “अम्मोनी आणि मवाबी यांनी व त्यांच्या पुढच्या दहा पिढ्यांनीही इस्राएलांबरोबर उपासनेत सामील होवू नये. 4 कारण तुमच्या मिसरपासूनच्या प्रवासात तुम्हाला अन्नपाणी देण्यास त्यांनी नकार दिला होता. तसेच बलामला पैसे चारुन त्यांनी त्याला तुम्हांला शाप द्यायला लावले. (मेसोपोटेमियातील पथोर नगरामधला बौर याचा बलाम हा मुलगा.) 5 तुमचा देव परमेश्वर ह्याने मात्र बलामचे ऐकले नाही. उलट त्या शापाचे रुपांतर आशीर्वादात केले. कारण तुमचा देव परमेश्वर याचा तुमच्यावर लोभ आहे. 6 या अम्मोनी किंवा मवाबी लोकांबरोबर कधीही सलोखा करु नका. तुम्ही जिवंत असेपर्यंत त्यांच्याशी मैत्री करु नका. 7 “अदोमी लोकांचा कधीही तिरस्कार करु नका. कारण ते तुमचे आप्त आहेत. तसेच मिसरींचा द्वेष करु नका. कारण त्यांच्या देशात तुम्ही उपरे होतात. 8 अदोमी आणि मिसरी यांच्या तिसऱ्या पिढीपासूनच्या लोकांना इस्राएलांबरोबर परमेश्वराच्या प्रार्थनेत सहभागी व्हायला हरकत नाही. 9 “युद्धावर छावणीत असताना जे जे म्हणून अशुद्धकारक त्यापासून दूर राहा. 10 एखाद्याला रात्री स्वप्नावस्था झाल्यास त्याने छावणीच्या बाहेर जावे. छावणीत राहू नये. 11 मग संध्याकाळी स्नान करावे. आणि सूर्यास्त झाल्यावरच परत छावणीत यावे. 12 “प्रातर्विधींसाठी छावणीच्या बाहेर एक जागा असावी. 13 आपल्या शस्त्रास्त्रांबरोबरच खणण्यासाठी म्हणून एक कुदळ असावी. प्रातर्विधीस बसण्यापूर्वी एक खड्डा खणावा व विधी आटोपल्यावर त्यावर माती पसरुन तो झाकून टाकावा. 14 कारण तुमच्या संरक्षणासाठी आणि तुमच्याहातून शत्रूचा पराभव करण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबरच राहणार आहे. तेव्हा छावणी पवित्र असावी. नाहीतर काही किळसवाण्या गोष्टी पाहून तो तुम्हांला सोडून जायचा. 15 “एखादा गुलाम कधी त्याच्या मालकाकडून पळून जाऊन तुमच्याकडे आला तर त्याला मालकाच्या स्वाधीन करु नका. 16 त्याला तुमच्या वेशीमध्ये हव्या त्या गावात राहू द्या. त्याला जाच करु नका. 17 “इस्राएलच्या स्त्रीपुरुषांपैकी कोणीही देवळातील वेश्या होऊ नये. 18 पुरुष किंवा स्त्रीवेश्येच्या कमाईचा पैसा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या पवित्र निवासस्थानी, नवस फेडण्याच्या कामासाठी वापरला जाणार नाही याची दक्षात घ्या. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने अशा व्यक्ती तिरस्करणीय आहेत. 19 “आपल्या इस्राएल बांधवांपैकी कोणाला काही उसने दिल्यास त्यावर व्याज लावू नका. पैसा, अन्नधान्य किंवा कोणत्याही व्याजी लावता येण्यासारख्या गोष्टीवर व्याज आकारु नका. 20 परक्याकडून व्याज घेतले तरी चालेल. पण आपल्याच बांधवाला व्याज लावू नका. हे नियम पाळलेत तर, ज्या प्रदेशात तुम्ही राहणार आहात तेथे हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हांला तुमचा देव परमेश्वर ह्याचा आशीर्वाद मिळेल. 21 “तुमचा देव परमेश्वर ह्याला नवस बोललात तर तो फेडायला उशीर करु नका. कारण तुमचा देव परमेश्वर तुम्हाला त्याचा जाब विचारील. नवस फेडला नाहीत तर पाप लागेल. 22 पण नवस बोललाच नाहीत तर पाप लागणार नाही. 23 जे वचन तुम्ही देता ते पाळत जा. देव काही तुम्हाला ‘नवस बोला’ असे म्हणत नाही. तुम्ही स्वखुशीने तो बोलता तेव्हा त्याप्रमाणे वागा. 24 “दुसऱ्याच्या द्राक्षमळ्यातून जात असताना वाटल्यास हवी तितकी द्राक्षे खा पण टोपलीत घालून बरोबर घेऊन जाऊ नका. 25 कोणाच्या शेतातून जाताना धान्याची कणसे खुडून खाऊ शकता पण विळ्याने कापून नेऊ नका.

24:1 “एखाद्याला लग्नानंतर आपल्या बायकोच्या संबंधाने एखादी न आवडणारी गुप्त गोष्ट कळली व ती त्याला आवडेनाशी झाली तर त्याने तिला घटस्फोट लिहून द्यावा. मग तिला घराबाहेर काढावे. 2 त्याच्या घरातून बाहेर पडल्यावर हवे तर तिने दुसरे लग्न करावे. 3 त्यातून समजा असे झाले की या नवऱ्याचीही तिच्यावर इतराजी झाली आणि त्याने तिला घटस्फोट दिला तर मात्र त्याने तिला सोडल्यावर पुन्हा पहिल्या नवऱ्याने तिच्याशी लग्न करु नये. किंवा हा दुसरा नवरा वारला तरी पहिल्या नवऱ्याने पुन्हा तिच्याशी लग्न करु नये. कारण ती आता भ्रष्ट झालेली आहे. तिच्याशी पहिल्या नवऱ्याने पुन्हा लग्न करणे हे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दुष्टीने निंद्य आहे. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या या प्रदेशात असे पाप करु नका. 4 5 “एखाद्याचे नुकतेच लग्न झाले असेल तर त्याला सैन्यात मोहिमेवर पाठवू नये. तसेच त्याच्यावर विशेष कामगिरी सोपवू नये. नववधूला सुखी ठेवण्यासाठी वर्षभर घरीच राहण्याची मोकळीक त्याला द्यावी. 6 “कोणाला काही उसने दिल्यास त्याबद्दल जाते किंवा जात्याची तळी तारण म्हणून ठेवून घेऊ नये. नाहीतर त्याच्या तोंडचा घासच काढून घेतल्यासारखे होईल. 7 “कोणी आपल्या इस्राएली बांधवाला पळवले आणि गुलाम म्हणून त्याची विक्री केली तर त्या पळवणाऱ्या माणसाला ठार करावे व आपल्यामधून अशा दुष्कृत्याचे निर्मूलन करावे. 8 “कोणाला महारोग झाल्याचे आढळले तर लेवी याजकाने सांगितलेल्या सर्व गोष्टींचे काटेकोर पालन करा. माझ्या आज्ञेप्रमाणे याजक सांगतील, ते ऐका. 9 मिसरमधून बाहेर पडल्यावर पुढच्या प्रवासात मिर्यामेचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले ते चांगले लक्षात असू द्या. 10 “तुम्ही कोणाला कर्ज द्याल तेव्हा तारण मिळवायला त्याच्या घरात शिरु नका. 11 बाहेरच थांबा. मग तो आत जाऊन गहाण ठेवण्याची वस्तू घेऊन येईल. 12 तो फार गरीब असला तर दुसरे काहीच त्याच्याजवळ गहाण ठेवण्यासारखे नसल्यामुळे आपले गरम कपडे आणील. तर ते रात्रभर तुम्ही स्वत:जवळ ठेवू नका. 13 त्याला रोजच्या रोज संध्याकाळ झाली की देत जा म्हणजे त्याला पुरेसे अंथरुन पांघरुण मिळेल. त्याबद्दल तो तुम्हाला दुवा देईल. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने हे तुमचे वागणे न्यायीपणाचे व उचित होय. 14 “तुमच्याकडे काम करणाऱ्या गरीब आणि गरजू नोकरांचे शोषण करु नका. मग तो इस्राएली बांधव असो की तुमच्या गावात राहणारा कोणी परकीय असो. 15 त्याला रोज सूर्यास्तापूर्वी त्याचा रोजगार देत जा. कारण हातावर पोट असल्यामुळे त्याचा उदरनिर्वाह या पैशावरच होतो. तुम्ही मजुरी दिली नाहीत तर तो परमेश्वराकडे आपले गाऱ्हाणे सांगेल आणि तुम्ही पापाचे धनी व्हाल. 16 “मुलांच्या वागणुकीची शिक्षा म्हणून आईवडलांना देहान्तशासन होऊ नये. तसेच आईवडलांच्या दुष्कृत्याची सजा म्हणून मुलांना ठार करु नये. ज्याच्या त्याच्या दुष्कृत्याची सजा ज्याला त्याला मिळावी. 17 “गावातील परकीय आणि अनाथ यांना उचित वागणूक मिळावी. विधवेचा कपडालत्ता गहाण ठेवून घेऊ नये. 18 मिसरमध्ये तुम्ही गरीब गुलाम होतात आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला तेथून सोडवून मुक्त केले हे लक्षात ठेवा. दीन दुबळ्यांशी असे वागा हे मी एवढ्यासाठी तुम्हाला सांगत आहे. 19 “शेतातील पीक कापताना एखादी पेंढी तिथेच राहिली तर ती आणायला परत जाऊ नका. अनाथ, उपरे विधवा ह्यांच्यासाठी ती राहू द्या. त्यांना थोडे धान्य मिळाले तर तुम्हांला तुमच्या प्रत्येक कार्यात तुमचा देव परमेश्वर ह्याचा आशीर्वाद मिळेल. 20 जैतून वृक्षांची फळांसाठी झाडणी कराल तेव्हा डहाळ्यांमध्ये कुठे फळे राहिली आहेत का हे पुन्हा पुन्हा तपासू नका. उरलेली फळे अनाथ, परकीय, विधवा यांच्यासाठी राहू द्या. 21 द्राक्षमळ्यातून द्राक्षे खुडताना उरली सुरली द्राक्षेही त्यांच्यासाठीच राहू द्या. 22 तुम्हीही मिसरमध्ये गरीब गुलाम होता म्हणून मी तुम्हाला हे करायला सांगत आहे. त्याची आठवण ठेवा आणि गरिबांसाठी एवढे करा.

25:1 “दोन व्यक्तिमंध्ये वाद झाल्यास त्यांनी न्याय मागण्यासाठी न्यायाधीशांकडे जावे. वादाचा निवाडा न्यायाधीश करील. 2 दोषी व्यक्ति फटक्यांच्या शिक्षेला पात्र ठरल्यास न्यायाधीशाने त्याला पालथे पाडावे व आपल्या समक्ष त्याला फटके मारुन घ्यावेत. फटक्यांची संख्या गुन्हा्याच्या प्रमाणात असावी. 3 चाळीस फटक्यांच्यावर कोणालाही शिक्षा होऊ नये. त्याच्यापेक्षा अधिक मारल्यास त्याचा जीव तुमच्या लेखी, महत्त्वाचा नाही असा त्याचा अर्थ होईल. 4 “धान्याची मळणी करताना बैल धान्यात तोंड घालील या भीतीने त्याच्या मुसक्या बांधू नका. 5 “दोन भाऊ एकत्र राहात असले आणि त्यातला एक मूलबाळ व्हायच्या आधीच वारला तर त्याच्या बायकोने कुटुंबाबाहेरच्या कोणा परपुरुषाशी लग्न करु नये. दिरानेच तिच्याशी लग्न करावे व दिराचे कर्तव्य बजावावे. 6 यानंतर तिला जो पहिला मुलगा होईल त्याने तिच्या मृत पतीचे नाव पुढे चालवावे. म्हणजे त्याचे नाव इस्राएलमधून नामशेष होणार नाही. 7 त्या मृत व्यक्तीच्या भावाने आपल्या विधवा भावजयीशी लग्न करण्याचे नाकारले तर तिने गावाच्या वेशीपाशी वडीलधाऱ्या पंचांकडे जावे व सांगावे की आपला दिर त्याच्या भावाचे नाव इस्राएलमध्ये राखायला राजी दिसत नाही. दिराच्या कर्तव्याला अनुसरुन तो माझ्याशी वागत नाही. 8 अशावेळी पंचानी त्याला बोलावून त्याच्याशी बोलावे. यावरही तो ऐकायला तयार नसेल, तिच्याशी लग्न करायला तयार नसेल 9 तर सर्वांसमोर त्याच्यापुढे येऊन तिने त्याच्या पायातला जोडा काढावा. त्याच्या तोंडावर थुकावे आणि म्हणावे, ‘जो कोणी आपल्या भावाचा वंश वाढवत नाही त्याचे असेच करावे.’ 10 ‘जोडा काढून घेतलेल्याचे घराणे,’ अशी मग त्याची इस्राएलभर ख्याती होईल. 11 “दोन पुरुषांच्या मारामारीमध्ये त्यातील एकाची बायको आपल्या नवऱ्याच्या मदतीसाठी मध्ये पडली असता तिने दुसऱ्याचे नाजूक इंद्रिय पकडू नये. 12 तसे केल्यास दयामाया न दाखवता तिचा हात तोडावा. 13 “बनावट तराजू वापरुन लोकांची फसवणूक करु नये. वजने अती जड किंवा अती हलकी नसावीत. 14 आपल्या जवळची मापे फार मोठी किंवा फार लहान असू नयेत. 15 आपली वजने मापे अचूक आणि योग्य असावीत. म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही दीर्घकाळ राहाल. 16 खोट्या वजनमापांनी लोकांची फसवणूक करणाऱ्यांचा, अनुचित वागणाऱ्यांचा तुमचा परमेश्वर देव तिरस्कार करतो. 17 “तुम्ही मिसरमधून येत असताना अमालेक येथील लोक तुमच्याशी कसे वागले ते आठवा. 18 त्यांना देवाविषयी आदर नव्हता. तुम्ही दमले भागलेले असताना त्यांनी तुमच्यावर हल्ला केला. दमून मागे पडलेल्या तुमच्यातील दुर्बळांना त्यांनी ठार केले. 19 म्हणून अमालेकांची आठवण सुद्धा तुम्ही पृथ्वीच्या पाठीवरुन पुसून टाकली पाहिजे. देव तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात प्रवेश केल्यावर तुम्ही हे अंमलात आणा. इतर शत्रूंपासून तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला विसावा दिल्यावर अमालेकांचा न विसरता समाचार घ्या.

26:1 “लौकरच तुम्ही तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात पाऊल टाकून तेथील जमिनीचा ताबा घेऊन, तेथे राहाल. 2 तेथील परमेश्वराने दिलेल्या शेतजमिनीचे सर्व उत्पन्न गोळा कराल. तेव्हा पहिले पीक टोपल्यात भरुन त्या घेऊन तुमचा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या त्याच्या पवित्र निवासस्थानी जा. 3 त्यावेळी जो याजक असेल त्याच्याकडे जाऊन सांगा की परमेश्वराने आमच्या पूर्वजांना आम्हांला जमीन देण्याचे वचन दिले होते. त्याप्रमाणे मी येथे पोहोंचलो आहे, हे सांगायला मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दारी आलो आहे! 4 “मग तो याजक तुमच्या हातून ती टोपली घेईल. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या वेदीसमोर तो ती खाली ठेवील. 5 तेव्हा तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्यासमोर असे म्हणावे, ‘आमचा पूर्वज हा भटकणारा अरामी होता, तो खाली मिसरमध्ये जाऊन राहिला. तिथे पोहोंचला तेव्हा त्याचा परिवार लहान होता. पण मिसरमध्ये त्याचे महान व सामर्थ्यशाली राष्ट्र बनले. 6 तेथे मिसरी लोकांनी आम्हाला वाईट वागणूक दिली. आम्हाला गुलाम बनवले. जबरदस्तीने कष्टाच्या कामाला जुंपले व छळ केला. 7 मग आम्ही परमेश्वर जो आमच्या पूर्वजांचा देव ह्याचा धावा केला. त्यांच्या बद्दलची गाऱ्हाणी सांगितली. परमेश्वराने आमचे ऐकले. त्याने आमचा त्रास, आमचे कष्ट आणि छळ त्याने पाहिले. 8 मग त्याने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हाला मिसरमधून बाहेर आणले. तेव्हा त्याने मोठे चमत्कार प्रताप दाखवले आणि उत्पात घडवले. 9 आणि येथे आम्हाला आणून ही दुधामधाचे पाट वाहणारी भूमी आम्हाला दिली. 10 आता हे परमेश्वरा, त्या भूमीतील पहिले उत्पन्न आम्ही आणले आहे.’“मग तो उत्पन्नाचा वाटा परमेश्वरासमोर ठेवून परमेश्वराला वंदन करा. 11 त्यानंतर सर्वजण एकत्र भोजन करा. तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कृपेने जे जे चांगले मिळाले त्याबद्दल आनंद व्यक्त करा. यात लेवी आणि गावातील परकीय यांनाही सामील करुन घ्या. 12 “दर तिसरे वर्ष हे दशांश देण्याचे वर्ष होय. यावर्षी आपल्या उत्पन्नाचा दहावा हिस्सा लेवी, गावातील परकीय विधवा अनाथ यांना द्या म्हणजे तेही तृप्त होतील. 13 या वेळी तुमचा देव परमेश्वर ह्याला सांगा की माझ्या घरातून मी हा उत्पन्नाचा पवित्र हिस्सा आणला आहे. लेवी, परकीय, विधवा, अनाथ या सर्वांना द्यायचे ते मी दिले आहे. तुझ्या सर्व आज्ञांचे न चुकता पालन केले आहे. कोणत्याही आज्ञेचे उल्लंघन केलेले नाही. 14 मी दु:खीमन:स्थितीत यातील काही खाल्लेले नाही. तसेच अशुद्ध असताना यातील काही खाल्लेले नाही. मृतांना यातील काही अर्पण केले नाही. मी तुझे ऐकले आहे. तुझ्या आज्ञांप्रमाणे वागलो आहे. 15 आता तू तुझ्या पवित्र निवासस्थानातून, स्वर्गातून आम्हा इस्राएल लोकांना आशीर्वाद दे. आम्हाला दिलेल्या भूमिला आशीर्वाद दे. ही दुधामधाची रेलचेल असलेली भूमी आम्हाला द्यायचे तू आमच्या पूर्वजांना कबूल केले होतेस. 16 “तुम्ही हे सर्व नियम व विधी पाळावे अशी तुमचा देव परमेश्वर ह्याची तुम्हाला आज आज्ञा आहे. ते सर्व तुम्ही मन:पूर्वक पाळा. 17 परमेश्वर हाच तुमचा देव असे आज तुम्ही म्हणाला आहात. त्याच्या मार्गाने चालायचे तुम्ही मान्य केले आहे. त्याच्या शिकवणीनुसार वागायचे त्याचे नियम व आज्ञा पाळायचे तुम्ही वचन दिले आहे. तो जे जे सांगेल त्याप्रमाणे आचरण ठेवायचे तुम्ही कबूल केले आहे. 18 परमेश्वराने आज तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपली खास प्रजा म्हणून आपलेसे केले आहे. माझ्या सर्व आज्ञा पाळाव्या असेही तुम्हाला त्याने सांगितले आहे. 19 इतर सर्व राष्ट्रांपेक्षा तो तुम्हाला महान करणार आहे. तो तुम्हाला प्रशंसा, नावलौकिक, सन्मान बहाल करील. आणि त्याच्याच सांगण्याप्रमाणे तुम्ही त्याची खास प्रजा व्हाल.”

27:1 मोशे आणि इस्राएलमधील वडीलधारे, लोकांशी बोलले. मोशे म्हणाला, “आज मी देणार असलेल्या सर्व आज्ञा पाळा. 2 तुमचा देव परमेश्वर देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही लौकरच यार्देन नदी ओलांडून जाणार आहात. त्यादिवशी मोठ्या शिला उभारा. त्यांना गिलावा करा. 3 त्यावर या आज्ञा आणि शिकवण लिहून काढा. यार्देन नदी उतरुन जाल त्या दिवशी हे करा. नंतरच परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, तो देणार असलेल्या त्या धनधान्यसंपन्न भूमीत पाऊल टाका. परमेश्वर, तुमच्या पूर्वजांचा देव ह्याने हा प्रदेश तुम्हाला देण्यासाठी वचन दिले आहे. 4 “यार्देन नदी ओलांडून गेल्यावर माझ्या आजच्या आज्ञा पाळा. एबाल पर्वतावर या गिलावा केलेल्या शिला उभारा. 5 तसेच तुमचा देव परमेश्वर ह्यासाठी दगडी वेदी तयार करा. दगड फोडण्यासाठी लोखंडी हत्यार वापरु नका. 6 वेदी अखंड, न घडलेल्या दगडाची असावी. आणि त्यावर होमबली अर्पण करा. 7 तेथे शांत्यार्पणांचे यज्ञ करुन भोजन करा. सर्वजण आनंदाने एकत्र जमून हे करा. 8 मग शिलांवर ही वचन सुवाच्य अक्षरात लिहा.” 9 मोशे आणि याजक इस्राएल लोकांशी बोलले. मोशे म्हणाला, “हे इस्राएला, शांत रहा! आणि ऐक! आज तू तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रजेतील झालास. 10 तेव्हा तो सांगतो त्याप्रमाणे वागा. मी आज देतो त्या त्याच्या आज्ञा आणि नियम पाळा. 11 त्याच दिवशी मोशेने लोकांना हे ही सांगितले, 12 ते यार्देन नदी पार करुन जातील तेव्हा शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, योसेफ व बन्यामीन यांनी आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम डोंगरावर उभे राहावे. 13 तसेच रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान व नफताली यांनी शाप वाचून दाखवण्यासाठी एबाल डोंगरावर उभे राहावे. 14 “लेवींनी सर्वांना मोठड्याने असे सांगावे, 15 “मूर्ती घडवून तिची गुप्तपणे स्थापना करणारा शापित असो. या मूर्ती म्हणजे कोणा कारागिराने लाकूड, दगड किंवा धातू यांच्यापासून घडवलेल्या असतात. परमेश्वराला अशा गोष्टींचा तिटकारा आहे! “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे. 16 “नंतर लेवींनी लोकांना सांगावे ‘आपल्या आईवडीलांचा अनादर दाखवणारी कृत्ये करतो तो शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे. 17 “परत लेवींनी म्हणावे, ‘शेजाऱ्याच्या शेताची हद्द दाखवणारी खूण जो सरकवतो तो शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे. 18 “लेवींनी म्हणावे, ‘आंधळ्याला फसवून त्याचा रस्ता चुकवणारा शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे. 19 “लेवींनी म्हणावे ‘परकीय, अनाथ, आणि विधवा यांच्याबाबतीत न्यायीपणाने न वागणारे शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे. 20 “लेवींनी म्हणावे ‘वडीलांच्या बायकोशी (सख्ख्या किंवा सावत्र आईशी) शरीरसंबंध ठेवून वडीलांच्या तोंडाला काळे फासणारा शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे. 21 “लेवींनी म्हणावे ‘पशूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे. 22 “लेवींनी म्हणावे, ‘सख्क्या अथवा सावत्र बहिणीशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे. 23 “लेवींनी म्हणावे, ‘सासूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे ‘आमेन.’ 24 “लेवींनी म्हणावे, ‘दुसऱ्याचा खून करणारा तो जरी पकडला गेला नाही तरी शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे ‘आमेन.’ 25 “लेवींनी म्हणावे, ‘निरपराध व्यक्तीला ठार मारण्यासाठी जो पैसे घेतो तो शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे ‘आमेन.’ 26 “लेवींनी म्हणावे, “जो ही नियमशात्राची वचने मान्य करीत नाही, आचरणात आणत नाही तो शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे ‘आमेन.’

28:1 “आज, मी दिलेल्या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळल्यात तर तुमचा देव परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उच्चस्थानी नेईल. 2 तुमचा देव परमेश्वर ह्याचे ऐकलेत तर तुम्हांला हे आशीर्वाद मिळतील: 3 “तुम्हाला तुमच्या नगरात आणि शेतात परमेश्वराचे आशीर्वाद मिळतील. 4 परमेश्वराच्या आशीर्वादाने तुम्हाला भरपूर मुलेबाळे होतील. त्याच्या आशीर्वादाने तुमची भूमी सफल होईल. तुमच्या पाळीव प्राण्यांना परमेश्वराच्या आशीर्वादाने भरपूर पिल्ले होतील व ह्या वासरा-करडांवर परमेश्वराचे आशीर्वाद राहतील. 5 तुमच्या धान्याच्या टोपल्या आणि पिठाच्या पराती परमेश्वराच्या आशीर्वादाने सदोदित भरलेल्या राहतील. 6 तुम्ही आत याल आणि बाहेर जाल तेव्हा तुम्हाला सदासर्वकाळ परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल. 7 “तुमच्यावर चाल करुन येणाऱ्या शत्रूला पराभूत करण्यास तुम्हाला परमेश्वराचे साहाय्य होईल. एका वाटेने आलेला शत्रू सात वाटांनी सैरावैरा पळत सुटेल. 8 “परमेश्वराच्या कृपेने तुमची कोठारे भरलेली राहतील. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहे त्यात तुमची भरभराट होईल. 9 परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवलेत आणि त्याच्या आज्ञा पाळल्यात तर आपल्या वचनाला जागून तो तुम्हाला आपली पवित्र प्रजा करुन घेईल. 10 परमेश्वराच्या नावाने तुम्ही ओळखले जाता हे पाहिल्यावर इतर राष्ट्रातील लोकांना तुमचा धाक वाटेल. 11 “परमेश्वराने द्यायचे कबूल केलेल्या या देशात तुम्हाला भरपूर संतती होईल. गाईचे खिल्लार वाढेल. पीक चांगले येईल. 12 आपले आशीर्वादाचे भांडार तो तुमच्यासाठी खुले करील. योग्यवेळी तुमच्या भूमीवर पाऊस पडेल. तुमच्या सर्व कामात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुम्ही इतर राष्ट्रांना कर्ज द्याल पण तुम्हाला कर्ज काढावे लागणार नाही. 13 आज मी सांगितलेल्या तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञांप्रमाणे वागलात तर तुम्ही नेते व्हाल, अनुयायी होणार नाही, उच्चस्थानी जाल, तळाला जाणार नाही. तेव्हा काळजीपूर्वक या नियमांचे पालन करा. 14 या शिकवणीपासून परावृत होऊ नका. डावी उजवी कडे वळू नका. इतर दैवतांची उपासना करु नका. 15 “पण तुमचा देव परमेश्वर ह्याचे ऐकले नाहीत, त्याच्या ज्या आज्ञा आणि विधी मी आज सांगत आहे त्यांचे पालन केले नाहीत तर पुढील सर्व वाईट गोष्टी तुमच्याबाबतीत घडतील. 16 “नगरात आणि शेतात तुम्ही शापित व्हाल. 17 तुमच्या धान्याच्या टोपल्या आणि पिठाच्या पराती शापित होतील आणि त्या रिकाम्या राहतील. 18 परमेश्वराच्या शापाने तुम्हाला फार संतती होणार नाही, जमिनीत पीक चांगले येणार नाही, गुराढोरांचे खिल्लार फार वाढणार नाही. वासरे - करडे शापित होतील. 19 बाहेर जाताना आणि आत येताना परमेश्वर तुम्हाला शाप देईल. 20 “तुम्ही दुष्कृत्ये करुन परमेश्वरापासून परावृत झालात तर तुमच्यावर संकटे कोसळतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात अडचणी येतील व तुम्ही हताश व्हाल. तुमचा विनाविलंब समूळ नाश होईपर्यंत हे चालेल. परमेश्वराच्या मार्गापासून विचलित होऊन तुम्ही भलतीकडे गेल्यामुळे असे होईल. 21 जो प्रदेश काबीज करायला तुम्ही जात आहात तेथून तुम्ही पूर्णपणे नष्ट होईपर्यंत परमेश्वर तुम्हाला भयंकर रोगराईने ग्रस्त करील. 22 परमेश्वर तुम्हाला रोग, ताप, सूज यांनी शिक्षा करील. उष्णता भयंकर वाढेल आणि अवर्षण पडेल. पिके होरपळून आणि कीड पडून करपून जातील. तुमचा नाश होईपर्यंत ही संकटे तुमच्या पाठीस लागतील. 23 आकाशात ढग दिसणार नाही. आकाश लखलखीत पितळेसारखे तप्त आणि पायाखालची जमीन लोखंडासारखी घट्ट होईल. 24 परमेश्वर पाऊस पाडणार नाही. आकाशातून फक्त धूळ आणि वाळू यांचा वर्षाव होईल. तुमचा नाश होईपर्यंत हे चालेल. 25 “शत्रू तुम्हांला पराभूत करतील. शत्रूवर तुम्ही एका दिशेने चढाई कराल आणि सात दिशांनी पळ काढाल. तुमच्यावरील संकटे पाहून पृथ्वीवरील इतर लोक भयभीत होतील. 26 तुमच्या प्रेतांवर जंगली श्र्वापदे आणि पक्षी ताव मारतील आणि त्यांना हुसकावून लावायला कोणी असणार नाही. 27 “परमेश्वराने पूर्वी मिसरच्या लोकांना गळवांनी पीडित केले तसेच तो यावेळी तुम्हाला करील. गळवे, वाहणारी खरुज, सतत कंड सुटणारा नायटा अशा गोष्टींनी तो तुम्हांला शासन करील. 28 वेड, अंधत्व, भांबावलेपण यांनी तुम्ही ग्रस्त व्हाल. 29 भर दिवसा आंधळ्यासारखे चाचपडत चालाल. प्रत्येक कामात अपयशाचे धनी व्हाल. लोक तुम्हाला एकसारखे नागवतील, दुखावतील. आणि तुम्हाला कोणी त्राता राहणार नाही. 30 “तुमचे जिच्याशी लग्न ठरले आहे, तिचा उपभोग दुसरा कोणी घेईल. तुम्ही घर बांधाल पण त्यात राहणार नाही. द्राक्षमळा लावाल पण त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही. 31 लोक तुमच्यादेखत तुमच्या गायी कापतील पण त्याचे मांस तुम्हाला खायला मिळणार नाही. तुमची गाढवे लोक पळवून नेतील आणि परत करणार नाही. तुमच्या शेळ्या मेंढ्या शत्रूच्या हाती जातील आणि तुम्हाला कोणी सोडवणारा नाही. 32 “तुमच्या मुला-मुलींचे इतर लोक अपहरण करतील. दिवसामागून दिवस तुम्ही त्यांचा शोध घ्याल. वाट पाहता पाहता तुमचे डोळे शिणतील. पण ती सापडणार नाहीत. आणि देव तुमच्या मदतीला येणार नाही. 33 “तुमच्या जमिनीचे उत्पन्न आणि तुमच्या साऱ्या श्रमाचे फळ एखादे अपरिचित राष्ट्र बळकावेल. लोक तुमची उपेक्षा करतील. 34 जे दृष्टीस पडेल त्याने तुम्ही चक्रावून जाल. 35 तुमच्या गुडघ्यांवर, पायांवर, पावलांपासून डोक्यापर्यंत सर्व शरीरावर ठसठसणारी बरी न होणारी गळवे उठतील. अशा रीतीने परमेश्वर तुम्हाला शासन करील. 36 “तुम्ही तुमच्या पूर्वजांनी कधी न पाहिलेल्या अशा देशात तुमची व तुमच्या राजाची रवानगी परमेश्वर करील. तुम्ही तेथे काष्ठ पाषाणाच्या अन्य देवतांची पूजाअर्चा कराल. 37 तुमच्यावर येणारी संकटे पाहून तेथील लोक विस्मयचकित होतील. त्यांच्या चेष्टेचा आणि निंदेचा तुम्ही विषय व्हाल. 38 “तुमच्या शेतात भरपूर पीक येईल पण त्यातले तुमच्या पदरात थोडेच पडेल. कारण बरेचसे टोळधाड फस्त करील. 39 तुम्ही द्राक्षमळा लावून त्यात खूप मेहनत कराल. पण द्राक्षं किंवा द्राक्षारस तुम्हाला मिळणार नाही. कारण कीड ते खाऊन टाकील. 40 तुमच्या जमिनीत जैतून वृक्ष जिकडे तिकडे येतील पण त्यांचे तेल मात्र तुम्हाला मिळणार नाही. कारण फळ जमिनीवर गळून, तेथेच सडून जातील. 41 तुम्हाला मुलं-बाळं होतील पण ती तुम्हाला लाभणार नाहीत. त्यांचे अपहरण होईल. 42 टोळधाडीने तुमच्या झाडांचे, शेतातील उभ्या पिकाचे नुकसान होईल. 43 तुमच्या गावात राहाणाऱ्या परकीयांची उन्नती होईल आणि तुमची अधोगती होईल. 44 ते तुम्हाला कर्ज देतील, तुमच्याजवळ त्यांना उसने द्यायला काही असणार नाही. सर्व शरीरावर मस्तकाचे नियंत्रण असते त्याप्रमाणे ते तुमच्यावर नियंत्रण ठेवतील. तुम्ही जणू तूच्छ बनून राहाल. 45 “तुमचा देव परमेश्वर ह्याने जे सांगितले ते तुम्ही ऐकले नाही, त्याच्या आज्ञा आणि नियम यांचे पालन केले नाही तर हे सर्वशाप तुमचा नायनाट होईपर्यंत तुमचा पिच्छा पुरवतील. 46 तुम्हाला व तुमच्या वंशजांना हे परमेश्वराचे शाप कायमचे भोवतील. ते पाहून इतर लोक आश्चर्यचकित होतील. 47 “सर्व तऱ्हेची समृद्धी असताना तुम्ही आनंदाने व उत्साहित मनाने तुमचा देव परमेश्वर ह्याची सेवा केली नाही म्हणून 48 परमेश्वराने पाठविलेल्या शत्रूसमोर तुम्हाला नतमस्तक व्हावे लागेल. तुम्ही तहान भूकेने गांजलेले दीन, सर्व तऱ्हेने वंचित असे व्हाल. परमेश्वर तुमच्या मानेवर जोखंड ठेवील. ते तुम्हाला बाजूला करता येणार नाही. तुमच्या अंतापर्यंत ते तुम्हांला वागवावे लागेल. 49 “दूरच्या राष्ट्रातील शत्रूला परमेश्वर तुमच्यावर पाठवील. त्यांची भाषा तुम्हाला समजणार नाही. गरुडांसारखे ते झेपावत येतील. 50 ते क्रूर असतील. वृद्धांचा ते मान राखणार नाहीत. लहानांना दया दाखवणार नाहीत. 51 तुमची जनावरे आणि तुम्ही काढलेले पीक ते नेतील. तुम्ही नष्ट होईपर्यंत ते तुमची लूट करतील. धान्य, द्राक्षारस, तेल, गुरेढोरे, शेळ्यामेंढ्या काही म्हणता काही तुम्हाला उरणार नाही. 52 “ते राष्ट्र तुमच्या नगरांना वेढा घालून हल्ला करील. आपल्या नगराभोवती असणारी उंच आणि भक्कम तटबंदी आपले रक्षण करील असे तुम्हाला वाटेल. पण ती तटबंदी कोसळून पडेल. तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देणार असलेल्या प्रदेशातील तुमच्या सर्व नगरांना शत्रू वेढा घालेल. 53 “तुम्हाला फार यातना भोगाव्या लागतील. शत्रू वेढा घालून तुमची रसद तोडेल. त्यामुळे तुमची उपासमार होईल. तुम्ही भुकेने व्याकुळ होऊन, तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या पोटी घातलेल्या मुलाबाळांनाच तुम्ही खाल. 54 “तुमच्यामधील अत्यंत संवेदनशील आणि हळव्या मनाचा माणूससुध्दा क्रूर बनेल, मग इतरांची काय कथा! क्रौर्याने त्याची नजर इतरांकडे वळेल. आपली प्रिय पत्नी, अजून जिवंत असलेली मुले ही त्यातून सुटणार नाहीत. 55 खायला काहीच शिल्लक उरणार नाही तेव्हा तो आपल्या मुलांचाच घास करेल. आणि त्या मांसात तो कोणालाही-अगदी आपल्या घरातल्यांनाही-वाटेकरी होऊ देणार नाही. शत्रूच्या वेढ्यामुळे आणि छळामुळे असे विपरीत घडेल. 56 “तुमच्यामधील अतिशय कोमल ह्दयाची आणि नाजूक बाईसुद्धा क्रूर बनेल. नाजुकपणाची कमाल म्हणजे आजतागायत तिने चालायला जमिनीवर पावलेही टेकवली नसतील. पण आता आपला प्राणप्रिय पती, आपली लाडकी मुले यांच्याबद्दलही ती निष्ठुर होईल. 57 पण लपूनछपून मुलाला जन्म देऊन ते नवजात बालक व प्रसूतिसमयी बाहेर पडणारे सर्व काही ती भुकेने व्याकुळ झाल्यामुळे खाऊन टाकील. जेव्हा तुमचा शत्रू तुमच्या शहरांना वेढा घालील आणि यातना सहन करायला लावील, त्यावेळी वरील सर्व वाईट गोष्टी घडून येतील. 58 “या ग्रंथातील सर्व शिकवण व आज्ञा तुम्ही पाळा. प्रतापी आणि विस्मयकारी तुमचा देव परमेश्वर ह्याचा आदर करा. याप्रमाणे आचरण ठेवले नाहीत तर 59 तुमच्यावर व तुमच्या वंशजांवर संकटे कोसळतील, भयंकर रोगराई पसरेल. 60 अशा रोगराईला आणि उपद्रावांना तुम्ही मिसरमध्ये तोंड दिलेले आहे. त्यांची तुम्हाला धास्ती वाटत असे. त्या सगळ्यातून तुम्हाला पुन्हा जावे लागेल. 61 या ग्रंथात नसलेले उपद्रव आणि रोगसुद्धा परमेश्वर तुमच्या मागे लावील. तुमचा समूळ नाश होईपर्यंत तो हे करील. 62 आकाशातील ताऱ्यांइतके तुम्ही संख्येने विपुल असलात तरी तुमचा देव परमेश्वर ह्याचे न ऐकल्यामुळे त्यापैकी फारच थोडे शिल्लक राहाल. 63 “तुमची भरभराट करायला आणि तुमची संरव्या वाढवायला जसा त्याला आनंद वाटत होता तसाच आनंद त्याला तुमचा नाश करायला आणि तुम्हांला रसानळाला न्यायला वाटेल. तुम्ही जो देश काबीज करायला जात आहात तेथून तुम्हाला हुसकावून लावले जाईल. 64 परमेश्वर तुम्हाला पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्व लोकांमध्ये विखरुन टाकील. तेथे तुम्ही काष्ठपाषाणाच्या मूर्तीची उपासना कराल. तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना माहीत नसलेल्या खोट्यानाट्या देवांची उपासना कराल. 65 “या इतर राष्ट्रांमध्ये तुम्हाला शांती लाभणार नाही. परमेश्वर तुमचे मन काळजीने पोखरुन टाकील. तुमचे डोळे शीणतील तुम्ही बेचैन व्हाल. 66 तुम्ही नेहमी संकटग्रस्त आणि धास्तावलेले राहाल. तुम्हाला जिवाची खात्री वाटणार नाही. रात्रंदिवस तुम्ही झुरणीला लागाल. 67 सकाळी तुम्ही म्हणाल, ‘ही रात्र असती तर बरे! आणि रात्री म्हणाल, ‘ही सकाळ असती तर किती बरे!’ तुमच्या मनातील भीती आणि डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी यामुळे असे होईल. 68 परमेश्वर तुम्हाला जहाजातून पुन्हा मिसरला पाठवील. जेथे तुम्हाला पुन्हा कधी परतून जावे लागणार नाही असे मी म्हणालो होतो तेथे परमेश्वर तुमची रवानगी करील. मिसरमध्ये तुम्ही शत्रूंचे दास म्हणून स्वत:ची विक्री करु बघाल पण कोणीही तुम्हाला विकत घेणार नाही.

29:1 इस्राएलांशी होरेब पर्वताजवळ परमेश्वराने पवित्र करार केला होता. त्याखेरीज, मवाबात आणखी एक पवित्र करार करायची परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली. तो हा पवित्र करार होय. 2 मोशेन सर्व इस्राएलांना जवळ बोलावले. तो त्यांना म्हणाला, “मिसरमध्ये परमेश्वराने जे जे केले ते सर्व तुम्ही पाहिले आहे. फारो, त्याचे सेवक आणि त्याचा देश यांचे परमेश्वराने काय केले ते तुम्ही पाहिले आहे. 3 ती संकटे, चमत्कार आणि विस्मयकारक गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत. 4 पण नेमके काय झाले हे तुम्हांला आजही समजू शकलेले नाही. तुम्ही जे पाहिलेत आणि ऐकलेत त्याचे खरे आकलन परमेश्वराने तुम्हाला होऊ दिलेले नाही. 5 परमेश्वराने तुम्हांला वाळवंटातून चाळीस वर्षे चालवले. पण एवढ्या कालावधीत तुमचे कपडे विरले नाहीत की जोडे झिजले नाहीत. 6 तुम्हीं भाकरी खाल्ली नाही की द्राक्षारस अथवा मद्य प्यायले नाही. पण परमेश्वराने तुमची काळजी वाहिली. हा परमेश्वरच तुमचा देव आहे हे तुम्हांला कळावे म्हणून त्याने असे केले. 7 “तुम्ही येंथे आलात आणि हेशबोनचा राजा सीहोन आणि बाशानचा राजा ओग आपल्यावर चढाई करुन आले. पण आपण त्यांचा पराभव केला. 8 त्यांचा देश आपण घेऊन तो रऊबेनी, गादी व मनश्शेचे अर्धे घराणे यांना ते इनाम म्हणून दिला. 9 या करारातील सर्व आज्ञा तुम्ही पाळल्यात तर तुम्हाला सर्व कार्यात असेच यश मिळत राहील. 10 “आज तुम्ही सर्वजण म्हणजेच तुमच्यातील अंमलदार वडीलधारे, प्रमुख आणि सर्व इस्राएल तुमचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर उभे आहात. 11 तुमची बायकामुले तसेच लाकूड तोड्यापासून पाणक्यापर्यंत तुमच्यातील सर्व उपरे हे ही इथे आहेत. 12 तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशी करारबद्ध व्हायला तुम्ही इथे जमलेले आहात. परमेश्वर तुमच्याशी पवित्र करार करणार आहे. 13 त्याद्वारे तो तुम्हांला आपली खास प्रजा करणार आहे आणि तो तुमचा परमेश्वर बनणार आहे. त्याने हे तुम्हांला आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे. 14 हा शपथपूर्वक पवित्र करार फक्त आपल्याशी-आज इथे उपस्थित असलेल्यांबरोबरच नव्हे तर आज आपल्यामध्ये या ठिकाणी हजर नसलेल्या आपल्या वंशजांसाठीही आहे. 15 16 आपण मिसरमध्ये कसे राहात होतो ते तुम्हांला आठवत आहेच. वेगवेगळ्या राष्ट्रातून येथपर्यंतचा आपण प्रवास कसा केला याचीही तुम्हांला आठवण आहे. 17 त्या लोकांच्या लाकूड, पाषाण, चांदी, सोने यापासून बनवलेल्या आपल्याला तिरस्करणीय असलेल्या मूर्तीही पाहिल्यात. 18 आपल्या परमेश्वर देवापासून परावृत होऊन त्यांच्या दैवतांच्या भजनी लागलेला कोणी पुरुष, बाई, एखादे कुटुंब किंवा कूळ येथे नाही ना याची खात्रीकरुन घ्या. अशी माणसे विषवल्लीसमान असतात. 19 “एखादा हे बोलणे ऐकूनही, ‘मी मला हवे तेच करणार. माझे काहीही वाकडे होणार नाही’ असे स्वत:चे समाधान करुन घेत असेल. पण त्याने हे लक्षात ठेवावे की त्याचा त्याला त्रास तर होईलच पण सुक्याबरोबर ओले ही जळते या न्यायाने निरपराध्यांनाही त्रास होईल. 20 परमेश्वर अशा माणसाला क्षमा करणार नाही. परमेश्वराचा त्याच्यावर कोप होईल. इतर सर्व इस्राएलापासून अलग करुन परमेश्वर त्याची नावनिशाणी पुसून टाकील. या ग्रंथातील सर्व शापांचा प्रत्यय त्या माणसाला स्वत:च्या बाबतीत येईल. या नियमशास्त्राच्या ग्रंथातील कराराचा हा एक भाग आहे. 21 22 “या देशाची कशी वाट लागली हे पुढे तुमचे वंशज आणि दूरदूरच्या देशातील परकीय पाहतील. या देशातील विपत्ती आणि परमेश्वराने पसरवलेले रोग ते पाहतील. 23 येथील भूमी गंधक आणि खार यांच्यामुळे जळून वैराण होईल. तिच्यात गवताचे पाते देखील उगवणार नाही. सदोम, गमोरा, अदमा व सबोयीम ही शहरे परमेश्वराच्या कोपाने उद्ध्वस्त झाली तसेच या देशाचे होईल. 24 “‘परमेश्वराने या देशाचे असे का केले? त्याचा एवढा कोप का झाला?’ असे इतर राष्ट्रातील लोक विचारतील. 25 त्याचे उत्तर असे की, आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याशी केलेला करार इस्राएलांनी धुडकावून लावल्यामुळे परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. मिसरमधून या लोकांना बाहेर आणल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी पवित्र करार केला होता तो यांनी मोडला. 26 हे इस्राएल इतर दैवतांची पूजा करु लागले. यापूर्वी त्यांना हे देव माहीत नव्हते. तसेच इतर दैवतांची पूजा करु नये असे परमेश्वराने त्यांना बजावले होते. 27 म्हणून त्यांच्यावर तो क्रुद्ध झाला व या ग्रंथातील शापवाणी त्यांच्या बाबतीत खरी करुन दाखवली. 28 क्रोधायमान होऊन परमेश्वराने त्यांचे या देशातून उच्चाटन केले व आज ते जेथे आहेत तेथे त्यांची रवानगी केली? 29 “काही गोष्टी आमचा देव परमेश्वर ह्याने गुप्त ठेवलेल्या आहेत. त्या फक्त त्यालाच माहीत. पण हे बाकी सर्व त्याने उघड केले आहे. आपल्याला व आपल्या पुढील पिढ्यांसाठी शिकवण देऊन ती नित्य पाळायला सांगितले आहे.

30:1 “मी सांगितलेल्या या सर्व गोष्टी तुमच्याबाबतीत घडतील. आशीर्वाद तसेच शापही खरे होतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हांला इतर राष्ट्रांमध्ये हद्दपार करील. तेव्हा तुम्हांला या सर्व गोष्टींची आठवण होईल. 2 तेव्हा तुम्ही तुमचे वंशज तुमचा देव परमेश्वर ह्याचा धावा कराल. त्याला मन:पूर्वक शरण जाल. आणि मी आज दिलेल्या सर्व आज्ञांचे नीट पालन कराल. 3 तेव्हा तुमचा देव परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होईल, आणि तो तुम्हांला मुक्त करील. तुमची त्याने जेथे जेथे पांगापांग करुन टाकली होती तेथून तो तुम्हाला परत आणील. मग ते देश किती का लांबचे असेनात! 4 5 पुन्हा आपल्या पूर्वजांच्या देशात तुम्ही याल आणि तो देश तुमचा होईल. परमेश्वर तुमचे कल्याण करील आणि पूर्वजांना मिळाले त्यापेक्षा कितीतरी अधिक तुम्हांला मिळेल. पूर्वी कधी नव्हती एवढी तुमची लोकसंख्या वाढेल. 6 तुमचा देव परमेश्वर तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना आपल्याकडे वळवील आणि त्याच्यावर तुम्ही मन:पूर्वक प्रेम कराल व सुखाने जगाल. 7 “मग त्या संकटांनी तुमचा देव परमेश्वर तुमच्या शत्रूंना जेरीला आणील. कारण ते तुमचा द्वेष करुन तुम्हाला अडचणीत आणायचा प्रयत्न करतील. 8 आणि तुम्ही पुन्हा परमेश्वराचे ऐकाल. आज मी देत असलेल्या सर्व आज्ञा तुम्ही पाळाल. 9 मी तुम्हाला सर्व कार्यात यश देईल. त्याच्या आशीर्वादाने तुम्हाला भरपूर संतती होईल. गायांना भरपूर वासरे होतील. शेतात भरघोसपीक येईल. तुमचा देव परमेश्वर तुमचे भले करील. तुमच्या पूर्वजांप्रमाणेच तुमचे कल्याण करण्यात त्याला आनंद वाटेल. 10 पण तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवले पाहिजे. नियमशास्त्रातील ग्रंथात सांगितलेल्या आज्ञा व नियम यांचे कसोशीने पालन केले पाहिजे. संपूर्ण अंत:करणाने व संपूर्ण जीवाने तुमचा देव परमेश्वर ह्याला अनुसरले पाहिजे. तर तुमचे कल्याण होईल. 11 “जी आज्ञा मी आता तुम्हांला देत आहे ती पाळायला फारशी अवघड नाही. ती तुमच्या आवाक्याबाहेर नाही. 12 ती काही स्वर्गात नाही, की आम्ही ती पाळावी म्हणून कोण स्वर्गात जाऊन ती आमच्यापर्यंत आणील व आम्हांला ऐकवील? असे तुम्हांला म्हणावे लागणार नाही. 13 ती समुद्रापलीकडे नाही. ‘आम्ही ती पाळावी म्हणून कोण समुद्र पार करुन जाईल व तेथून आणून आम्हांला ऐकवील?’ असे म्हणावे लागणार नाही. 14 हे वचन तर अगदी तुमच्याजवळ आहे. ते तुमच्याच मुखी आणि मनी वसत आहे. म्हणून तुम्हांला ते पाळता येईल. 15 “आज मी तुमच्यापुढे जीवन आणि मृत्यू, चांगले आणि वाईट हे पर्याय ठेवले आहेत. 16 तुमच्या परमेश्वर देवावर प्रेम करा, त्याच्या मार्गाने जा व त्याच्या आज्ञा, नियम पाळा अशी माझी तुम्हांला आज्ञा आहे. म्हणजे तुम्ही जो प्रदेश आपलासा करायला जात आहात तेथे दीर्घकाळ राहाल, तुमच्या देशाची भरभराट होईल, तुम्हांला तुमचा देव परमेश्वर ह्याचे आशीर्वाद मिळतील. 17 पण तुम्ही परमेश्वराकडे पाठ फिरवलीत, त्याचे ऐकले नाहीत, इतर दैवतांचे भजनपूजन केलेत तर 18 मात्र तुमचा नाश ठरलेलाच हे मी तुम्हांला बजावून सांगतो. यार्देन नदी पलीकडच्या प्रदेशात मग तुम्ही फार काळ राहणार नाही. 19 “आज स्वर्ग आणि पृथ्वीच्या साक्षीने मी तुम्हाला जीवन आणि मृत्यू या दोहोतून एकाची निवड करायला सांगत आहे. जीवनाचा पर्याय स्वीकारलात तर आशीर्वाद मिळेल. दुसऱ्याची निवड केलीत तर शाप मिळेल. तेव्हा जीवनाची निवड करा म्हणजे तुम्ही व तुमची मुलेबाळे जिवंत राहातील. 20 तुमचा देव परमेश्वर ह्याजवर प्रेम करा. त्याच्या आज्ञा पाळा. त्याला सोडू नका. कारण परमेश्वर म्हणजेच जीवन. तसे केलेत तर अब्राहाम, इसहाक, व याकोब या तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे परमेश्वर तुम्हांला त्या प्रदेशात दीर्घायुष्य देईल.”

31:1 मग मोशेने सर्व इस्राएलांना ह्या गोष्टी सांगितल्या. 2 तो म्हणाला, “मी आता एकशेवीस वर्षाचा आहे. माझ्याने आता तुमचे नेतृत्व होत नाही. शिवाय ‘यार्देन नदीपलीकडे जायचे नाही असे,’ परमेश्वरानेही मला सांगितले आहे. 3 तुमचा देव परमेश्वर हा तुम्हांला साथ देईल. तुमच्यासाठी तो इतर राष्ट्रांना पराभूत करील. त्यांच्याकडून तुम्ही त्या प्रदेशाचा ताबा घ्याल. पण परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे यहोशवा तुमचे नेतृत्व करील. 4 “अमोऱ्यांचे राजे सीहोन आणि ओग यांचा परमेश्वराने संहार केला. तसेच तो याही वेळी तुमच्यासाठी करील. 5 या राष्ट्रांचा पराभव करण्यात परमेश्वराचे तुम्हाला साहाय्य होईल. पण त्यावेळी, मी सांगितले तसे तुम्ही वागले पाहिजे. 6 शौर्य दाखवा. खंबीर पणाने वागा. त्या लोकांची भीती बाळगू नका! कारण प्रत्यक्ष तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तो तुम्हाला अंतर देणार नाही, तुमची साथ सोडणार नाही” 7 मग मोशेने यहोशवाला बोलावले. सर्वांसमक्ष त्याला सांगितले, “खंबीर राहा आणि शौर्य गाजव. या लोकांच्या पूर्वजांना परमेश्वराने जी भूमी द्यायचे कबूल केले आहे, तेथे तू त्यांना नेणार आहेस. ती काबीज करायला या इस्राएलांना तू मदत कर. 8 परमेश्वर तुमच्या सोबतीला तुमच्यापुढेच चालणार आहे. तो तुम्हाला सोडून जाणार नाही, तुम्हाला अंतर देणार नाही. तेव्हा खचून जाऊ नका आणि निर्भय व्हा.” 9 नंतर मोशेने सर्व नियमशास्त्र लिहून याजकांना दिले. हे याजक लेवी वंशातील होते. परमेश्वराच्या कराराचा पवित्र कोश वाहण्याचे काम त्यांचे होते. इस्राएलच्या वडिलधाऱ्या लोकांनाही मोशेने हे नियमशास्त्र दिले. 10 मग मोशे वडीलधाऱ्या लोकांशी बोलला. तो म्हणाला, “दर सात वर्षांच्या अखेरीला म्हणजेच कर्ज माफीच्या ठराविक वर्षी मंडपाच्या सणाच्या वेळी ही शिकवण तुम्ही सर्वांना वाचून दाखवा. 11 यावेळी सर्व इस्राएलांनी तुमचा देव परमेश्वर ह्याने त्याच्यासाठी निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जमावे. तेव्हा त्यांना ऐकू जाईल अशा पद्धतीने तुम्ही हे नियमशास्त्र वाचून दाखवावे. 12 पुरुष, बायका, लहान मुले, गावातील परकीय अशा सर्वांना यावेळी एकत्र आणावे. त्यांनी ही शिकवण ऐकावी, परमेश्वर देवाचा आदर करावा. शिकवणीचे जीवनात आचरण करावे. 13 ज्या पुढच्या पिढीला ही शिकवण माहीत नव्हती त्यांना ती माहीत होईल. लौकरच तुम्ही जो देश आपलासा करायला चालला आहात तेथे ही मुलेबाळेही तुमचा देव परमेश्वर ह्यच विषयी आदर बाळगतील.” 14 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा मृत्यू आता समीप आला आहे. यहोशवाला घेऊन दर्शनमंडपात ये. म्हणजे मी त्याला आज्ञा देईन.” तेव्हा मोशे व यहोशवा दर्शन मंडपात गेले. 15 दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वारी असलेल्या मेघस्तंभात परमेश्वर प्रगट झाला. 16 तो मोशेला म्हणाला, “तू आता लौकरच मरण पावशील व आपल्या पूर्वजांना भेटशील. तेव्हा हे लोक माझ्यापासून परावृत होतील. ते माझ्याशी केलेला पवित्र करार मोडतील. माझी साथ सोडून त्या देशातील इतर खोट्या दैवतांची पूजा करायला लागतील. 17 तेव्हा माझा त्यांच्यावर कोप होऊन मी त्यांना सोडून जाईन. मी त्यांना मदत करायचे नाकारल्याने त्यांचा नाश होईल. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यांच्यावर संकटे कोसळतील. तेव्हा ते म्हणतील की आपल्याला परमेश्वराची साथ नाही म्हणून आपल्यावर आपत्ती येत आहेत. 18 पण त्यांनी इतर दैवतांची पूजा केल्याने, दुष्कृत्ये केल्यामुळे मी त्यांना मदत करणार नाही. 19 “तेव्हा तुम्ही हे गीत लिहून घ्या व इस्राएल लोकांना शिकवा. त्यांच्याकडून ते तोंडपाठ करुन घ्या. म्हणजे इस्राएल लोकांविरुद्ध ही माझ्याबाजूने साक्ष राहील. 20 त्यांच्या पूर्वजांना कबूल केलेल्या भूमीत मी त्यांना नेणार आहे. ही भूमी दुधामधाने समृद्ध आहे. तेथे त्यांची अन्नधान्याची चंगळ होईल. ते संपन्न जीवन जगतील. पण मग ते इतर दैवतांकडे वळतील व त्यांची पूजा करतील. माझ्यापासून ते परावृत होतील व कराराचा भंग करतील. 21 त्यामुळे त्यांच्यावर आपत्ती कोसळतील. त्यांना अनेक अडचणी येतील. त्याही वेळी हे गीत त्यांच्यामुखी असेल आणि त्यांच्या चुकीची साक्ष त्यांना पटेल. मी त्यांना त्या भूमीत अजून नेलेले नाही. पण त्यांच्या मनात तेथे गेल्यावर काय काय करायचे या बद्दल जे विचार चालू आहेत ते मला अगोदरच माहीत आहेत.” 22 तेव्हा त्याचदिवशी मोशेने ते गीत लिहून काढले, आणि इस्राएल लोकांना ते शिकवले. 23 मग नूनचा मुलगा यहोशवा याला परमेश्वर म्हणाला, “हिंमत धर, खंबीर राहा. मी वचनपूर्वक देऊ केलेल्या प्रदेशात तू या इस्राएलांना घेऊन जाशील. मी तुझ्याबरोबर राहील.” 24 मोशेने सर्व शिकवण काळजीपूर्वक लिहून काढल्यावर 25 लेवींना आज्ञा दिली. (लेवी म्हणजे परमेश्वर कराराचा कोश वाहणारे लोक.) मोशे म्हणाला, 26 “हा नियमशास्त्राचा ग्रंथ घ्या आणि परमेश्वराच्या कराराच्या कोशात ठेवा. तुमच्याविरुद्ध हा साक्ष राहील. 27 तुम्ही फार ताठर आहात हे मला माहीत आहे. तुम्ही आपलाच ठेका चालवता. मी तुमच्याबरोबर असतानाही तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड केले आहे. तेव्हा माझ्यामागेही तुम्ही तेच कराल. 28 तुमच्या कुळातील अंमलदार व महाजन यांना येथे बोलवा. स्वर्ग आणि पृथ्वीच्या साक्षीने त्यांना मी चार गोष्टी सांगीन. 29 माझ्या मृत्यूनंतर तुम्ही दुराचरण करणार आहात हे मला माहीत आहे. मी सांगितलेल्या मार्गापासून तुम्ही ढळणार आहात. त्यामुळे भविष्यात तुमच्यावर संकटे कोसळतील. कारण परमेश्वराने निषिद्ध म्हणून सांगितलेल्या गोष्टी तुम्ही करणार आहात. तुमच्या दुष्कृत्याने तुम्ही परमेश्वराचा राग ओढवून घ्याल.” 30 सर्व इस्राएल लोक एकत्र जमल्यावर मोशेने हे संपूर्ण गीत त्यांच्यासमोर म्हटले

32:1 “हे आकाशा, ऐक मी काय म्हणतो ते. वसुंधरे ऐक शब्द माझ्या मुखातले. 2 पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाचा वर्षाव होईल. तो बोध असेल जमिनीवरुन खळाळणाऱ्या पाण्यासारखा. हिरवळीवर झिमझिमणाऱ्या पावसासारखा. झाडाझुडुपांवर पडणाऱ्या पावसाच्या सरींसारखा. 3 घोषणाकरीन मी परमेश्वराच्या नावाची. तुम्हीही परमेश्वराची महती गा! 4 “तो आहे दुर्ग आणि त्याची कृती परिपूर्ण! कारण चोखाळतो तो उचित मार्ग! देवच खरा आणि विश्वासू न्यायी आणि सरळ. 5 तुम्ही त्याची मुले नाहीत. तुमची पापे त्याला मळीन करतील. तुम्ही लबाड आहात. 6 मूर्ख आणि निर्बुद्ध जन हो, परमेश्वराशी असे वागता? तो तर तुमचा पिता, निर्माता कर्ता आणि धर्ता तोच. 7 “आठवा पूर्वी काय घडले ते अनेक वर्षा पूर्वी काय काय झाले ते ध्यानात आणा आपल्या बापाला विचारा, तो सांगेल. महाजनांना विचारा, ते सांगतील. 8 परात्पर देवाने लोकांची विभागणी केली, राष्ट्रा राष्ट्रांमध्ये. प्रत्येक राष्ट्राला स्वतंत्र भूभाग दिला. देवाने इस्राएल सीमा आखल्या. देवदूतांइतकी राष्ट्रे त्याने बनविली. 9 परमेश्वराचा वाटा त्याचे लोक होय. याकोब परमेश्वराचा आहे. 10 “याकोब (इस्राएल) त्याला सापडला वाळवंटात भणभणत्या वाऱ्याच्या वैराण प्रदेशात. परमेश्वराने त्याला आपल्या कवेत घेतले आणि डोळ्यात तेल घालून त्याला सांभाळले. 11 इस्राएलाला परमेश्वर गरुडासारखा आहे. गरुड पक्षीण आपल्या पिलांना उडायला शिकवताना घरट्यातून ढकलते. त्यांच्या संरक्षणार्थ त्यांच्याबरोबर तीही उडते. पिले पडली झडली तर धरता यावे म्हणून पंख पसरते आणि पंखावर बसवून त्यांना सुरक्षित जागी आणते. तसा परमेश्वर इस्राएलला जपतो. 12 “परमेश्वरानेच इस्राएलला पुढे आणले. दुसरा कोणी देव मदतीला नव्हता. 13 परमेश्वराच्याच पुढाकाराने त्याने या डोंगराळ प्रदेशाचा ताबा घेतला. मग याकोबाने शेतात भरपूर पीक घेतले. परमेश्वराने त्याला खडकातून मध दिला, त्या कठीण खडकातून त्याच्यासाठी तेलही काढले. 14 गाईम्हशींचे, शेळ्यामेंढ्याचे लोणी, आणि दूध, पुष्ट मेंढ्या व कोकरे, बाशानचे उत्तम प्रतीचे बकरे, उत्कृष्ट गहू हे परमेश्वराने त्यांना दिले. द्राक्षाची लाल मदिराही इस्राएलांनो, तुम्ही प्यायलात. 15 “पण यशुरुन (इस्राएल) माजला आणि उन्मत्त बैलासारखा लाथा झाडू लागला. खाऊन पिऊन तो धष्ट पुष्ट झाला! आणि त्याने आपल्या कर्त्या देवाचा त्याग केला! आपले तारण करणारा दुर्गासारखा परमेश्वर तुच्छ मानला. 16 परमेश्वराच्या या प्रजेने इतर दैवतांची पूजा करायला सुरुवात केली आणि परमेश्वराची इर्ष्या जागवली. मूर्ती त्याला मान्य नाहीत, तर या लोकांनी मूर्ती केल्या व परमेश्वराचा कोप ओढवला. 17 खरे देव नव्हेत अशा दैवतांना त्यांनी यज्ञार्पणे केली. अपरिचित दैवतांची पूजा केली. आपल्या पूर्वजांना पूर्वी कधी माहीत नसलेल्या दैवतांची पूजा केली. 18 आपल्या निर्माणकर्त्याचा दुर्गाचा त्यांनी त्याग केला. जीवनदायी परमेश्वराला ते विसरले. 19 “परमेश्वराने हे पाहिले व आपल्या प्रजेचा धिक्कार केला. कारण प्रजेनेच त्याला क्रुद्ध केले होते! 20 तो म्हणाला, ‘मी आता त्यांच्यापासून तोंड फिरवतो. त्यांचा शेवट कसा होणार आहे ते मला माहीत आहे. ही माणसे बंडखोर आहेत. अभ्यास न करणाऱ्या मुलांप्रमाणे आहेत. 21 मूर्तीपूजा करुन यांनी माझा कोप ओढवला. मूर्ती म्हणजे देव नव्हेत. क्षुल्लक मूर्ती करुन त्यांनी मला क्रुद्ध केले. तेव्हा त्यांना मत्सर वाटेल असे मी करीन. जे एकसंध राष्ट्र नाही अशा लोकांमार्फत, मूढ राष्ट्राच्या योगे मी यांना इर्ष्येस पेटवीन. 22 माझा क्रोध धगधगणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे. अधोलोकाच्या तळापर्यंत तो जाळत जातो. पृथ्वी व तिच्यावरील वनस्पती, पर्वतांचे पायथे यांनाही तो भस्मसात करतो. 23 “मी इस्राएलांवर संकटे आणील. त्यांच्यावर मी माझ्या बाणांचा नेम धरीन. 24 भुकेने ते कासावीस होतील. भयंकर रोगराईने ते नेस्तनाबूत होतील. वन्यपशू त्यांच्यावर सोडीन. विषारी साप व सरपटणारे प्राणी त्यांना दंश करतील. 25 रस्त्यावर सैन्य त्यांना मारेल व घरात ते भयभीत होतील. तरुण पुरुष, स्त्रिया, लहानमुले व वृद्ध सर्वांना सैन्य ठार करेल. 26 लोकांच्या स्मृतीतून ते पुसले जातील इतका मी या इस्राएलांचा नाश केला असता. 27 पण त्यांचा शत्रू काय म्हणेल हे मला माहीत आहे. ‘आम्ही आमच्या सामर्थ्याने जिंकलो. इस्राएलांचा नाश काही परमेश्वरामुळे झाला नाही,’ अशी ते बढाई मारतील.”‘ 28 “इस्राएल राष्ट्र विचारशून्य आहे, त्याला समज म्हणून नाहीच. 29 ते शहाणे असते तर त्यांना समजले असते. त्यांनी पुढच्या परिणामांचा विचार केला असता. 30 एक माणूस हजारांचा पाठलाग करु शकेल काय? दोघेजण दहाहजारांना सळो की पळे करुन सोडू शकतील का? परमेश्वरानेच या जमावला आपल्या शत्रूच्या हवाली केले तरच ते शक्य आहे. खंद्या दुर्गासमान असणाऱ्या परमेश्वराने त्यांना गुलामांसारखे विकले तरच असे घडेल. 31 आपल्या शत्रूंचा दुर्ग म्हणजे परमेश्वर आपल्या अभेद्य किल्यासारख्या परमेश्वराच्या तोडीचा नाही हे तेही कबूल करतात. 32 सदोम आणि गमोरा येथल्याप्रमाणे शत्रूंचे द्राक्षमळे आणि शेते जमिनदोस्त केली जातील. 33 त्यांची द्राक्षे कडू जहर आणि द्राक्षारस सापाच्या विषारी गरळासमान आहे. 34 “परमेश्वर म्हणतो अर्थात ही शिक्षा सध्या मी राखून ठेवली आहे. माझ्या भांडारात ती बंदीस्त ठेवली आहे. 35 अनवधानाने त्यांच्याहातून काही दुष्कृत्ये घडायची मी वाट पाहात आहे. त्यांनी काही वावगे केले की त्यांचा संकटकाळ आलाच म्हणून समजा मी त्यांना शिक्षा करीन.’ 36 “परमेश्वर आपल्या प्रजेची कसोटी पाहील. आपल्या सेवकांवर दया दाखवील. पण गुलाम तसेच स्वतंत्र यांना तो सत्ताहीन, असहाय्य करुन सोडील. 37 परमेश्वर म्हणेल, ‘कोठे आहेत ते खोटे देव? तुम्ही आश्रयासाठी ज्याच्याकडे धाव घेतलीत तो कुठे आहे तुमचा ‘दुर्ग’? 38 त्या खोट्या दैवतांनी तुमच्या यज्ञातील लोणी तेवढे गट्ट केले, तुम्ही अर्पण केलेल्यातील द्राक्षारस प्राशन केला. तेव्हा त्या दैवतांनीच उठून याव तुमच्या रक्षणाला! 39 “तेव्हा आता पाहा, मीच खरा आणि एकमेव देव आहे. अन्य कोणी नाही. लोकांचा तारक मी आणि मारकही मीच, त्यांना घायाळ करणारा मी आणि त्यातून बरे करणाराही मीच. माझ्या समर्थ हातांमधून कोणीही कोणालाही सोडवू शकत नाही! 40 आकाशाकडे बाहू उभारुन मी हे वचन देत आहे. मी सनातन आहे हे सत्य असेल तर या गोष्टी ही खऱ्या होतील. 41 माझी लखलखाती तलवार परजून मी शत्रूंना शासन करीन. ते याच शिक्षेला पात्र आहेत. 42 माझे शत्रू ठार होतील. त्यांचा पाडाव होईल ते कैद होतील. माझ्या बाणांची टोके त्यांच्या रक्ताने माखतील आणि माझे तलवारीचे पाते शत्रू सैन्याचा शिरच्छेद करील. 43 “समस्त राष्ट्रांनो, देवाचा प्रजेचा जयजयकार करा. कारण हा देव आपल्या सेवकांच्या बाजूने उभा राहतो. आपल्या सेवकांचा संहार करु पाहणाऱ्यांना शासन करतो. शत्रूला योग्य अशी सजा देतो. आणि आपली प्रजा आणि प्रदेश निर्मळ करतो.” 44 मोशेने या गीताचे शब्द सर्व इस्राएलांना ऐकू जातील असे ऐकवले. नूनचा पुत्र यहोशवाही मोशेबरोबर होता. 45 ही शिकवण देऊन झाल्यावर 46 मोशे लोकांना म्हणाला, “मी ज्या गोष्टी आज सांगतो त्या लक्षपूर्वक ऐका. आपल्या मुलाबाळांनाही या नियमशास्त्राचे काटेकोरपणे पालन करायला सांगा. 47 4त्यांचे महत्व कमी लेखू नका. या आज्ञांवरच तुमचे जीवन अंवलबूंन आहे. त्यायोगेच तुम्ही आपल्याला मिळणार असलेल्या त्या यार्देन नदीपलीकडच्या प्रदेशात दीर्घकाळ वास्तव्य कराल.” 48 त्याच दिवशी परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, 49 “मवाब देशात, यरीहो शहराच्या समोर अबारीम पर्वतांमध्ये जो नबो डोंगर आहे त्या डोंगरावर जा. मी इस्राएलांना जो कनान देश देणार आहे तो तू तेथून पाहू शकशील. 50 या डोंगरावर तुझे निधन होईल. तुझा भाऊ अहरोन हा जसा होर डोंगरावर मृत्यू पावल्यावर स्वजनांना मिळाला तसेच तुझे होईल. 51 कारण तुम्ही दोघांनीही माझ्याविरुद्ध पाप केले आहे. कादेश जवळच्या मरीबा झऱ्यापाशी तुम्ही होता. सीन वाळवंटातील ही गोष्ट आहे. तेथे इस्राएलांसमोर तुम्ही माझा मान राखला नाही तसेच मला पवित्र मानले नाही. 52 तेव्हा मी इस्राएलांना देणार असलेली भूमी तू पाहू शकतोस पण तुझे तेथे जाणे होणार नाही.”

33:1 देवाचा भक्त मोशे याने इस्राएल लोकांना आपल्या मृत्युपूर्वी असा आशीर्वाद दिला, मोशे म्हणाला. 2 “परमेश्वर सीनाय येथून आला. उष:कालच्या प्रकाशाप्रमाणे तो सेईर वरुन आला, पारान डोंगरावरुन प्रकाशला दहाहजार देवदूतांसमवेत आला देवाचे समर्थ सैनिकत्याच्याबरोबर होते. 3 परमेश्वराचे आपल्या लोकांवर खरंच फार प्रेम आहे. त्याची पवित्र प्रजा त्याच्या हातात आहे. ते लोक त्याच्या पायाशी बसून त्याच्याकडून शिकवण घेतात. 4 मोशेने आम्हाला नियमशास्त्र दिले. ती शिकवण याकोबच्या लोकांची ठेव आहे. 5 इस्राएलचे सर्व लोक आणि त्यांचे प्रमुख आले तेव्हा परमेश्वर यशुरुनचा राजा झाला. 6 “रऊबेनचे लोक मोजकेच असले तरी ते जगोत, त्यांना मरण न येवो.” 7 मोशेने यहूदाला हा आशीर्वाद दिला:“परमेश्वरा, यहूदा तुझ्याकडे मदत मागेल तेव्हा त्याचे ऐक. त्याच्या लोकांची व त्यांची गाठभेट करुन दे. त्याला शक्तिशाली कर आणि शत्रूला पराभूत करण्यात त्याला साहाय्यकारी हो.” 8 लेवींविषयी मोशे असे म्हणाला,“लेवी तुझा खरा अनुयायी आहे. तो थुम्मीम व उरीम बाळगतो. मस्सा येथे तू लेवींची कसोटी पाहिलीस. मरीबाच्या झऱ्याजवळ, ते तुझेच आहेत याची तू कसोटी करुन घेतलीस. 9 हे परमेश्वरा, आपल्या कुटुंबियांपेक्षाही त्यांनी तुला आपले मानले. आपल्या आईवडीलांची कदर केली नाही. भाऊबंदांना ओळख दाखवली नाही. पोटच्या पोरांची पर्वा केली नाही. पण तुझ्या आज्ञांचे पालन केले. तुझा पवित्र करार पाळला. 10 ते तुझे विधी याकोबाला, नियमशास्त्र इस्राएलला शिकवतील. तुझ्यापुढे धूप जाळतील. तुझ्या वेदीवर होमबली अर्पण करतील. 11 परमेश्वरा, जे जे लेवींचे आहे त्याला आशीर्वाद दे. ते जे करतील त्याचा स्वीकार कर. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा संहार कर. त्यांच्या शत्रूंना पार नेस्तनाबूत करुन टाक.” 12 बन्यामीन विषयी मोशे म्हणाला, “बन्यामीन परमेश्वराला प्रिय आहे. तो परमेश्वरापाशी सुरक्षित राहील. देव त्याचे सदोदित रक्षण करील. आणि परमेश्वराचे वास्तव्य त्याच्या प्रदेशात राहील.” 13 योसेफा विषयी तो म्हणाला,“योसेफच्या भूमीवर परमेश्वराची कृपादृष्टी असो. परमेश्वरा, त्यांच्या देशात आकाशातून पावसाचा वर्षाव कर आणि त्यांच्या भूमीतून मुबलक पाणी दे. 14 सूर्यामुळे उत्कृष्ट फलित त्यांच्या पदरात पडो. आणि प्रत्येक महिना आपली उत्कृष्ट फळे त्याला देवो. 15 टेकड्या आणि पुरातन पर्वत यांच्यातील अमूल्य जिन्नस त्यांना मिळोत. 16 धरतीचा उत्तमातील उत्तम ठेवा योसेफला मिळो. योसेफची आपल्या भाऊबंदापासून ताटातूट झाली होती. तेव्हा जळत्या झुडुपांतून, परमेश्वराचा दुवा त्याला मिळो. 17 योसेफ माजलेल्या बैलासारखा आहे. त्याचे दोन पुत्र बैलाच्या शिंगांप्रमाणे आहेत. ते लोकांवर चढाई करुन त्यांना पृथ्वीच्या सीमेपर्यंत ढकलतील. असे मनश्शेचे हजारो आणि एफ्राइमचे लाखो आहेत.” 18 मोशे जबुलूनबद्दल म्हणाला,“जबुलूना, बाहेर जाल तेव्हा आनंद करा. इस्साखारा आपल्या डेऱ्यात आनंदाने राहा. 19 ते लोकांना आपल्या डोंगरावर बोलावतील. तेथे ते योग्य यज्ञ करतील. समुद्रातील धन आणि वाळूतील खजिना हस्तगत करतील.” 20 गादविषयी मोशे म्हणाला,“गादाचा विस्तार करणारा देव धन्य होय. गाद सिंहासारखा आहे. तो आधी दबा धरुन बसतो. आणि सावजावर हल्ला करुन त्याच्या चिंधड्या करतो.” 21 स्वत:साठी तो उत्तम भाग ठेवतो. राजाचा वाटा स्वत:ला घेतो. लोकांचे प्रमुख त्याच्याकडे येतात. जे परमेश्वराच्या दृष्टीने न्यायाने, ते तो करतो. इस्राएलच्या लोकांसाठी जे उचित तेच करतो.’ 22 दान विषयी मोशे म्हणाला, “दान म्हणजे सिंहाचा छावा. तो बाशान मधून झेप घेतो.” 23 नफताली विषयी मोशेने सांगितले, नफताली, तुला सर्व चांगल्या गोष्टी “भरभरुन मिळतील. तुझ्यावर परमेश्वराचा आशीर्वाद राहील. गालील तलावाजवळचा प्रदेश तुला मिळेल.” 24 आशेर विषयी मोशने असे सांगीतले, “आशेरला सर्वात अधिक आशीर्वाद मिळोत. तो आपल्या बांधावांना प्रिय होवो. त्याचे पाय तेलाने माखलेले राहोत. 25 तुमच्या दरवाजांचे अडसर लोखंडाचे व पितळेचे असोत. तुमचे सामर्थ्य आयुष्यभर राहो.” 26 “हे यशुरुन! देवासारखा कोणी नाही. तुझ्या साहाय्यासाठी, मेघांवर आरुढ होऊन तो आपल्या प्रतापाने आकाशातून तुझ्या मदतीला येतो. 27 देव सनातन आहे. तो तुझे आश्रयस्थान आहे. देवाचे सामर्थ्य सर्वकाळ चालते!. तो तुझे रक्षण करतो. तुझ्या शत्रूंना तो तुझ्या प्रदेशातून हुसकावून लावेल. ‘शत्रूंना नष्ट कर’ असे तो म्हणतो. 28 “म्हणून इस्राएल सुरक्षित राहील. याकोबची विहीर त्यांच्या मालकीची आहे. धान्याने व द्राक्षारसाने संपन्न अशी भूमी त्यांना मिळेल. त्या प्रदेशावर भरपूर पाऊस पडेल. 29 इस्राएला, तू आशीर्वादीत आहेस. इतर कोणतेही राष्ट्र तुझ्यासारखे नाही. परमेश्वराने तुला वाचवले आहे. भक्कम ढालीप्रमाणे तो तुझे रक्षण करतो. परमेश्वर म्हणजे तळपती तलवार. शत्रूंना तुझी दहशत वाटेल. त्यांची पवित्र स्थाने तू तुडवशील!”

34:1 मवाबातील यार्देन खोऱ्यातून पिसग पर्वताच्या माथ्यावरील नबो नामक शिखरावर मोशे चढून गेला. यरीहो समोरील यार्देन पलीकडचा हा भाग. परमेश्वराने मोशेला गिलादपासून दानपर्यंत सर्व प्रदेश दाखवला. 2 नफताली, एफ्राईम व मनश्शेचा सर्व प्रदेश दाखवला. पश्चिमेकडल्या भूमध्य समुद्रापर्यंतचा यहूदाचा सर्व प्रदेश दाखवला. 3 तसेच नेगेव आणि सोअरा पासून यरीहो या खजुराच्या झाडांच्या नगरापर्यंतचे खोरे हे ही दाखवले. 4 परमेश्वर मोशेला म्हणाला, “अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना कबूल केलेला हाच तो प्रदेश. त्यांच्या वंशजांना तो द्यायचे मी त्यांना वचन दिले आहे. तुला मी तो पाहू दिला पण तू येथे जाणार नाहीस.” 5 मग परमेश्वराचा सेवक मोशे त्या मवाबाच्या प्रदेशात मरण पावला. असे घडणार हे परमेश्वराने त्याला सांगितले होतेच. 6 मवाबात मोशेचे परमेश्वराने दफन केले. बेथ-पौरासमोरच्या खोऱ्यात हा भाग आला. पण मोशेची कबर नेमकी कोठे आहे हे आजतागायत कोणाला कळलेले नाही. 7 मोशे वारला तेव्हा एकशेवीस वर्षाचा होता. तेव्हाही त्याची तब्बेत ठणठणीत होती व दृष्टी चांगली होती. 8 इस्राएल लोकांनी त्याच्यासाठी तीस दिवस शोक केला. त्या काळात ते मवाबातील यार्देन खोऱ्यात राहिले. 9 मोशेने यहोशवावर आपले हात ठेवून त्याला नवा नेता म्हणून नेमले होते. त्यामुळे नूनचा पुत्र यहोशवा याला ज्ञानाचा आत्मा प्राप्त झाला होता. म्हणून इस्राएल लोक त्याच्या आज्ञेत वागू लागले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी आचरण ठेवले. 10 इस्राएलला मोशे सारखा दुसरा संदेष्टा मिळाला नाही. परमेश्वराला मोशेचा प्रत्यक्ष परिचय होता. 11 मिसरमध्ये महान चमत्कार करुन दाखवायला परमेश्वराने मोशेला पाठवले. मिसरमध्ये फारो, त्याचे सेवक व सर्व लोकांनी हे चमत्कार पाहिले. 12 मोशेने करुन दाखवले तसे चमत्कार व आश्चर्यकारक गोष्टी दुसऱ्या कोणा संदेष्ट्याने करुन दाखवल्या नाहीत. इस्राएलच्या सर्व लोकांनी त्याची ही कृत्ये पाहिली.