Genesis

1:1 देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. 2 सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती; पृथ्वीवर काहीही नव्हते. अंधाराने जलाशय झाकलेले होते; आणि देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता 3 नंतर देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश चमकू लागला. 4 देवाने प्रकाश पाहिला आणि त्याला कळले की तो चांगला आहे. नंतर देवाने अंधारापासून प्रकाश वेगळा केला. 5 देवाने प्रकाशाला “दिवस” व अंधाराला “रात्र” अशी नावे दिली.संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला पहिला दिवस. 6 नंतर देव बोलला, “जलांस दुभागण्याकरिता जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो.” 7 तेव्हा देवाने अंतराळ केले आणि अंतराळावरच्या व खालच्या जलांस वेगळे केले. 8 देवाने अंतराळास “आकाश” असे नांव दिले.संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला दुसरा दिवस. 9 नंतर देव बोलला, “अंतराळाखालील पाणी एकत्र गोळा होवो व कोरडी जमीन दिसून येवो.” आणि तसे घडले, 10 देवाने कोरड्या जमिनीस “भूमि” आणि एकत्र झालेल्या जलसंचयास “समुद्र” अशी नावे दिली. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे. 11 मग देव बोलला, “गवत, बीज देणाऱ्या वनस्पती आणि फळे देणाऱ्या वनस्पती पृथ्वीवर वाढोत. फळझाडे बिया असलेली फळे तयार करतील आणि प्रत्येक वनस्पती आपल्या जातीच्याच बिया तयार करील अशा वनस्पती पृथ्वीवर वाढोत.” आणि तसे झाले. 12 गवत, आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळ झाडे भूमीने उपजविली. देवाने पाहिले की हे चांगले आहे. 13 संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला तिसरा दिवस. 14 मग देव बोलला “दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योति होवोत व त्या विशेष चिन्हे, आणि विशेष मेळावे, ऋतू, दिवस, आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत. 15 पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशात त्या ज्योति होवोत.” आणि तसे झाले. 16 देवाने दोन मोठ्या ज्योति निर्माण केल्या. दिवसावर सत्ता चालविण्यासाठी मोठी ज्योति सूर्य आणि रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी लहान ज्योति, चंद्र, आणि त्याने तारेही निर्माण केले. 17 देवाने त्या ज्योति पृथ्वीवर प्रकाश पाडण्यासाठी आणि दिवसावर व रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी आकाशात ठेवल्या. त्या ज्योतींनी प्रकाश व अंधार वेगळे केले. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे. 18 19 संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला चौधा दिवस. 20 मग देव बोलला, “जलामध्ये जीवजंतूचे थवेच्या थवे उत्पन्न होवोत. आणि पृथ्वीवर आकाशात पक्षी उडोबागडोत” - 21 समुद्रातील प्रचंड जलचर म्हणजे पाण्यात फिरणारे व अनेक जातीचे व प्रकारचे जलप्राणी देवाने उत्पन्न केले. तसेच आकाशात उडणारे निरनिराळड्या जातीचे पक्षीही देवाने उत्पन्न केले आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे. 22 देवाने त्यांना आशीर्वाद दिला, “फलद्रूप व्हा, वाढा, समुद्रातील पाणी व्यापून व भरुन टाका आणि पक्षी बहुगुणित होवोत व पृथ्वी व्यापून टाकोत.” 23 संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली हा होता पाचवा दिवस. 24 मग देव बोलला, “निरनिराळया जातीचे पशू, मोठे प्राणी वेगवेगळड्या जातीचे सरपटणारे व रांगणारे लहान प्राणी असे जीवधारी प्राणी पृथ्वीवर उत्पन्न होवोत. ते आपापल्या जातीचे अनेक प्राणी निर्माण करोत.” आणि तसे सर्व झाले. 25 असे देवाने वनपशू, पाळीव जनावरे, सरपटत जाणारे लहान प्राणी व वेगवेगळया जातीचे जीवधारी प्राणी निर्माण केले. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे. 26 मग देव बोलला, “आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करु; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशू, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर ते सत्ता चालवितील.” 27 तेव्हा देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली. 28 देवाने त्यांना आशीर्वाद दिला; देव त्यांना म्हणाला, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका; ती आपल्या सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा.” 29 देव म्हणाला, “धान्य देणाऱ्या सर्व वनस्पती आणि आपापल्या फळामध्येच वृक्षाचे बीज असलेली सर्व फळझाडे मी तुम्हांस दिली आहेत. ही तुम्हांकरिता अन्न होतील. 30 तसेच पृथ्वीवरील सर्व पशू, आकाशातील सर्व पक्षी आणि जमिनीवर सरपटत जाणारे सर्व प्राणी यांच्याकरिता अन्न म्हणून मी हिरव्या वनस्पती दिल्या आहेत.” आणि सर्व तसे झाले. 31 आपण केलेले सर्वकाही फार चांगले आहे असे देवाने पाहिले.संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला सहावा दिवस.

2:1 याप्रमाणे पृथ्वी, आकाश आणि त्यांतील सर्वकाही पूर्ण करुन झाले. 2 देवाने आपण करीत असलेले काम संपवले म्हणून सातव्या दिवशी त्याने काम करण्यापासून विसावा घेतला. 3 देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला व विशेष ठरविला कारण त्या दिवशी जग निर्माण करताना त्याने केलेल्या सर्व कामापासून विसावा घेतला. 4 हा आकाश व पृथ्वी निर्माण केल्याचा इतिहास आहे. देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली त्या वेळी जे जे घडले त्यांच्या उत्पत्ति क्रमाविषयीचा हा वृत्तान्त आहे. 5 त्यापूर्वी पृथ्वीवर वनस्पती नव्हती, शेतात काही उगवले नव्हते. कारण परमेश्वराने अद्याप पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता. 6 पृथ्वीवरुन धुके वर जात असे व त्याने सर्व जमिनीवर पाणी शिपंडले व पसरले जात असे. 7 नंतर परमेश्वर देवाने जामिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जीवंत प्राणी झाला. 8 मग परमेश्वर देवाने पूर्वेकडे एदेन नावाच्या जागेत एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्याला ठेवले. 9 परमेश्वर देवाने सुदंर दिसणारी अन्नासाठी उत्तम अशी सर्व जातीची झाडे बागेमध्ये उगवली आणि बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्यावाईटाचे ज्ञान देणारे झाड अशी झाडे लावली. 10 एदेन बागेत एक नदी उगम पावली व तिने सर्व बागेला पाणी पुरवले. नंतर ती नदी विभागून तिच्या चार वेगळया नद्या झाल्या. 11 पहिल्या नदिचे नाव पीशोन होते. ही सर्व हवीला देशाला वेढा घालून वाहाते 12 त्या देशात चांगल्या प्रतीचे सोने सांपडते. तेथे मोती व गोमेद ही रत्ने सापडतात 13 दुसऱ्या नदीचे नाव गीहोन आहे, ही सगळ्या कूश म्हणजे इथिओपिया देशाभोवती वाहते. 14 तिसऱ्या नदिचे नाव हिद्दकेल. ही अश्शूर म्हणजे असीरिया देशाच्या पूर्वेस वहात जाते. चौथ्या नदीचे नाव फरात म्हणजे युफ्रेटीस असे आहे. 15 परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत तिची मशागत करण्यासाठी व बागेची काळजी घेण्यासाठी ठेवले. 16 परमेश्वराने मनुष्याला ही आज्ञा दिली; परमेश्वर म्हणाला, “बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तू खुशाल खाऊ शकतो. 17 परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करुन देणाऱ्या झाडाचे फुळ तू खाऊ नको; जर त्या झाडाचे फळ तू खाशील तर तू नक्की मरशील.” 18 नंतर परमेश्वर बोलला, “मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी योग्य मदतनीस निर्माण करीन.” 19 परमेश्वराने मातीतून शेतातील सर्व जातीचे प्राणी आणि आकाशातील सर्वजातीचे पक्षी उत्पन्न केले आणि त्यांना मनुष्याकडे नेले आणि मनुष्याने म्हणजे आदामाने त्या सर्वांना नावे दिली. 20 आदामाने सर्व पाळीव प्राणी, आकाशातील सर्वपक्षी आणि सर्व वनपशू म्हणजे जंगलातील, रानावनातील जनावरे यांना नावे दिली. आदामाने हे सर्व पशू - पक्षी पाहिले परंतु त्याला त्यांच्यात आपणासाठी योग्य असा मदतनीस सापडला नाही. 21 तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला गाढ झोप लागू दिली. आणि तो झोपला असता परमेश्वराने आदामाच्या शरीरातून एक फासळी काढली व ती जागा चमडचाने बंद केली. तेव्हा ती मांसाने भरुन आली. 22 परमेश्वराने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. 23 2तेव्हा आदाम म्हणाला,“आता ही मात्र माझ्यासारखी आहे. तिची हाडे माझ्या हाडा पासून व तिचे शरीर माझ्या शरीरापासून बनवले आहे. मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो. कारण ती नरापासून बनवलेली आहे.” 24 म्हणून मनुष्य आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ते दोघे एक देह होतील. 25 एदेन बागेत आदाम व त्याची बायको ही दोघे नग्न होती. परंतु त्यांना कसलीच लाज वाटत नव्हती.

3:1 परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वन्य प्राण्यांमध्ये सर्प हा अतिशय धूर्त आणि हुषार होता. त्याला स्त्रीची फसवणूक करायची होती. त्यावेळी सर्प त्या स्त्रीशी बोलला व तो तिला म्हणाला, “स्त्रिये, बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नको असे देवाने तुला खरोखरच सांगितले आहे काय?” 2 स्त्रीने सर्पाला उत्तर दिले, “नाही. देवाने तसे म्हटले नाही बागेतल्या झाडांची फळे आम्ही खाऊ शकतो. 3 परंतु असे एक झाड आहे की ज्याचे फळ आम्ही खाता कामा नये देवाने आम्हाला सांगितले, ‘बागेच्या मधोमध असलेल्या झाडाचे फळ तुम्ही मुळीच खाऊ नका. त्या झाडाला स्पर्शही करु नका. नाहीतर तुम्ही मराल.” 4 परंतु सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुम्ही खरोखर मरणार नाही. 5 कारण देवाला हे माहीत आहे की जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल तर बरे व वाईट काय आहे हे तुम्हांला समजेल आणि तुम्ही देवासारखे व्हाल.” 6 स्त्रीने पाहिले की ते झाड दिसण्यात सुंदर, त्याचे फळ खाण्यास चांगले व शहाणपण देणारे आहे म्हणून तिने त्या झाडाचे फळ तोडून घेतले व खाल्ले. तिचा नवरा तिच्याबरोबर तेथे होता; तेव्हा तिने त्या फळातून त्याला थोडे दिले व त्याने ते खाल्ले. 7 तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण नग्न आहो असे त्यांस समजले; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपासाठी काही वस्त्रे तयार केली व ती घातली. 8 संध्याकाळी परमेश्वर बागेत फिरत होता. त्यावेळी आदामाने आणि त्याच्या बायकोने परमेश्वराचा आवाज ऐकला. आणि त्याच्या नजरेस पडू नये म्हणून ती दोघे परमेश्वरापासून बागेच्या झाडात लपली. 9 तेव्हा परमेश्वराने आदामाला हाक मारुन म्हटले, “तू कोठे आहेस?” 10 तो म्हणाला, “बागेत मी तुझ्या चालण्याचा आवाज ऐकला व मला भीती वाटली कारण मी नग्न होतो आणि म्हणून मी लपलो.” 11 परमेश्वर त्याला म्हणाला, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या विशेष झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?” 12 आदाम म्हणाला, “तू ही स्त्री माझ्यासाठी मदतनीस म्हणून दिलीस. तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि म्हणून मी ते खाल्ले.” 13 मग परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाला, “तू हे काय केलेस?”ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घालून फसविले व म्हणून मी ते फळ खाल्ले.” 14 म्हणून परमेश्वर सर्पाला म्हणाला,“तू हे फार वाईट केलेस म्हणून तुझे पण वाईट होईल. तू हे केलेस म्हणून इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा तू अधिक शापित आहेस. तू पोटाने सरपटत चालशील आणि आयुष्यभर तू माती खाशील 15 तू व स्त्री, यांस मी एकमेकांचे शत्रु करीन. तुझी संतती आणि तिची संतती एकमेकाचे शत्रू होतील तिच्या संततीच्या पायाची तू टाच फोडशील पण तो तुझे डोके ठेचील 16 नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाला,“तू गरोदर असताना तुला त्रास होईल आणि मुलांना जन्म देते वेळी तुला खूप वेदना होतील. तरी तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील; आणि तो तुझ्यावर अधिकार चालवील.” 17 नंतर परमेश्वर देव आदामाला म्हणाला,“त्या विशेष झाडाचे फळ खाऊ नको अशी मी तुला आज्ञा दिली होती परंतु तू तुझ्या बायकोने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यास आणि त्या झाडाचे फळ खाल्लेस. तेव्हा मी तुझ्यामुळे भूमीला शाप देत आहे. तू तिजपासून अन्न मिळविण्यासाठी जन्मभर अतिशय कष्ट करशील; 18 जमीन तुझ्यासाठी काटेकुटे वाढवेल आणि शेतातल्या रानटी वनस्पती तुला खाव्या लागतील. 19 तू अतिशय श्रम करुन निढळाच्या घामाने भाकर मिळविशीलं तू मरायच्या दिवसापर्यंत अतिशय काम करशील. आणि नंतर तू पुन्हा माती होशीलं मी तुला मातीतून उत्पन्न केले आहे; आणि तू मरशील तेव्हा परत मातीला जाऊन मिळशील.” 20 आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले. या जगात जन्म घेणाऱ्या सर्व माणसांची ती आई आहे म्हणून आदामाने तिला हे नाव दिले. 21 परमेश्वराने आदाम व त्याची बायको हव्वा यांच्यासाठी जनावराच्या चामड्यांची वस्त्रे केली; आणि ती त्यांना घातली. 22 परमेश्वर म्हणाला, “पाहा, मनुष्य आपल्या सारखा झाला आहे. त्याला बरे व वाईट समजते. तर आता कदचित जीवनांच्या झाडावरुन तो फळ घेईल आणि जर का तो ते फळ खाईल तर मग सदासर्वकाळ तो जीवंत राहील.” 23 तेव्हा परमेश्वराने मनुष्याला ज्या जमिनीतून उत्पन्न केले होते तिची मशागत करण्यासाठी एदेन बागेतून बाहेर घालवून दिले. 24 परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बाग सोडण्याठी भाग पाडले. नंतर परमेश्वराने एदेन बागेची राखण करण्यासाठी बागेच्या पूर्वेकडे करुब देवदूतांना पहारा करण्यास ठेवले. तसेच तेथे जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गचे रक्षण करण्यासाठी गरगर फिरणारी अरनीची एक तलवार ठेवली.

4:1 आदाम आणि त्याची बायको हव्वा यांचा लैगिक संबंध आला; हव्वा गर्भवती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला. त्या मुलाचे नाव काइन असे ठेवले.तेव्हा हव्वा म्हणाली, “परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुषसतांन लाभले आहे.” 2 त्यानंतर हव्वेने आणखी एका बाळाला जन्म दिला. हा मुलगा म्हणजे काइनाचा भाऊ हाबेल होता. हाबेल मेंढपाळ झाला; काइन शेतकरी झाला. 3 काही काळानंतर हंगामाचे वेळी काइनाने परमेश्वराला आदराने दान देण्यासाठी आपल्या शेतातील उत्पन्नातून काही अर्पण आणले. 4 हाबेलानेही आपल्या कळपातील काही मेंढरे देवाला अर्पण म्हणून आणली. त्याने मेंढरांचे सर्वात उत्तम भाग आणले.परमेश्वराने हाबेलाचे अर्पण स्वीकारले. 5 परतुं काइन आणि त्याचे अर्पण स्वीकारले नाही. यामुळे काइन फार दु:खी झाला व त्याला फार राग आला 6 परमेश्वराने काइनाला विचारले, “तू का रागावलास? तुझा चेहरा दु:खी का दिसत आहे? 7 तू जर चांगल्या गोष्टी करशील तर तुझे माझे संबंध चांगले राहतील, मग मी तुझा स्वीकार करीन; परंतु तू जर वाईट रीतीने चालशील तर ते पाप तुझ्यात राहील व ते पाप तुझ्यावर सत्ता चालवू पाहील; पण तू त्या पापावर सत्ता चालवली पाहिजेस.” 8 काइन आपला भाऊ हाबेल यास म्हणाला, “चल, आपण जरा शेतात जाऊ या. “तेव्हा काइनाने हाबेलाला बाहेर शेतात नेले. तेव्हा काइनाने आपला भाऊ हाबेल यावर हल्ला केला व त्याला ठार मारले. 9 काही वेळाने परमेश्वर काइनास म्हणाला, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?”काइनाने उत्तर दिले, “मला माहीत नाही; माझ्या भावावर नजर ठेवणे व त्याची काळजी घेणे हे माझे काम आहे काय?” 10 नंतर परमेश्वर म्हणाला, “तू हे काय केलेस? 11 तू तुझ्या भावाला ठार केलेस. त्याचे रक्त मला जमिनीतून हाका मारीत आहे; त्याचे रक्त तुझ्या हातातून घेण्यास भूमीने आपले तोंड उघडले आहे. ह्याच कारणाने तू शापित आहेस. भूमी तुला नकारेल. 12 पूर्वी तू जमिनीची मशागत केलीस आणि तिने तुला चांगले पीक दिले. पण आता तू मशागत करशील तरी ती भूमी तुला पीक देणार नाही. तू पृथ्वीवर एका ठिकाणी घर करुन राहणार नाहीस तर तू भटकत राहशील व परागंदा होशील.” 13 मग काइन म्हणाला, “ही शिक्षा मी सहन करु शकणार नाही इतकी भारी आहे. 14 पहा तू मला ह्या माझ्या भूमिवरुन दूर पाठवीत आहेस, मी तुला पाहू शकणार नाही किंवा तुझ्या जवळ मला येता येणार नाही; मला घरदार असणार नाही. या पृथ्वीवर तू मला ठिकठिकाणी भटकणे व परागंदा होणे लादले आहेस. मी जर कोणाच्या हाती सापडेन तर तो मला ठार मारुन टाकेल.” 15 मग परमेश्वर काइनास म्हणाला, “मी असे घडू देणार नाही. कारण तुला जर कोणी ठार मारील तर त्याला मी कितीतरी अधिक पटीने शिक्षा देईन.” मग काइनाला कोणी मारु नये म्हणून परमेश्वराने त्याच्यावर एक विशिष्ठ खूण केली. 16 काइन परमेश्वरा समोरुन निघून गेला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशात जाऊन राहिला. 17 काइन आपल्या पत्नीजवळ जाऊन निजला तेव्हा ती गर्भवती होऊन तीने हनोख नावाच्या मुलाला जन्म दिला; काइनाने एक नगर बांधले तेव्हा त्याने त्या नगराला आपल्या मुलाचेच हनोख हे नाव दिले. 18 हनोखाला हराद नावाचा मुलगा झाला; हरादाला महूयाएल झालां महूयाएलास मथुशाएल झाला; आणि मथुशाएलास लामेख झाला. 19 लामेखाने दोन बायका केल्या. पहिलीचे नाव आदा व दुसरीचे नाव सिल्ला. 20 आदाने याबालास जन्म दिला; तो तंबूत राहाणाऱ्या व गुरेढोरे पाळणाऱ्या लोकांचा मूळ पुरुष झाला. 21 आदाला आणखी एक मुलगा झाला. (त्याचे नाव युबाल; हा याबालाचा भाऊ); युबाल तंतुवाद्दे, व वायुवाद्दे म्हणजे वीणा व बासरी वाजविणाऱ्या कलावंताचा मूळ पुरुष झाला. 22 सिल्ला हिला तुबल - काइन झाला; तो तांब्याची व लोखंडाची कामे करणाऱ्या लोकांचा मूळ पुरुष झाला. तुबल काइनास नामा नावाची बहीण होती. 23 लामेख आपल्या बायकांना म्हणाला,“आदा आणि सिल्ला माझी वाणी ऐका; लामेखाच्या बायकांनो, मी ज्या गोष्टी बोलतो तिकडे कान द्दा; एका माणसाने मला जखमी केले, तेव्हा मी त्याला ठार मारले, एका तरुणाने मला मारले म्हणून मी त्याला ठार केले. 24 काइनाला मारणाऱ्याला खूप खूप शिक्षा होईल तर मग मला मारणाऱ्याला त्याहीपेक्षा आधिकात अधिक शिक्षा होईल.” 25 आदाम पुन्हा पत्नीजवळ गेला. आणि तिला मुलगा झाला. त्यांनी त्याचे नाव शेथ असे ठेवले हव्वा म्हणाली, “काइनाने हाबेलास ठार केले म्हणून देवाने मला दुसरा मुलगा दिला.” 26 शेथलाही मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश ठेवले; त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करु लागले.

5:1 आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य आपल्या प्रतिरुपाचा म्हणजे आपल्या सारखा निर्माण केला. 2 देवाने त्यांस नर व नारी असे उत्पन्न केले. देवाने त्यांस ज्या दिवशी उत्पन्न केले त्याच दिवशी देवाने त्यांस आशीर्वाद दिला व त्यांस “आदाम” म्हणजे मनुष्य हे नाव दिले. 3 आदाम एकशेतीस वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्या प्रतिरुपाचा म्हणजे हुबेहूब त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले; 4 शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशें वर्षे जगला आणि या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या. 5 अशा रीतीने आदाम एकंदर नऊशेतीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला. 6 शेथ एकशेंपाच वर्षांचा झाल्यावर त्याला अनोश नांवाचा मुलगा झाला. 7 अनोशच्या जन्मानंतर शेथ आठशेंसात वर्षे जगला, त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 8 शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला. 9 अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्याला केनान नावाचा मुलगा झाला; 10 केनान जन्मल्यानंतर अनोश आठशेंपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 11 अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला. 12 केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर त्याला महललेल नावाचा मुलगा झाला; 13 महललेल झाल्यावर केनान आठशेंचाळीस वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 14 केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला; नंतर तो मरण पावला. 15 महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला यारेद नावाचा मुलगा झाला; 16 यारेद जन्मल्यानंतर महललेल आठशेंतीस वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 17 महललेल एकंदर आठशें पंच्याण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला. 18 यारेद एकशें बासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास हनोख नावाचा मुलगा झाला; 19 हनोख झाल्यावर यारेद आठशें वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 20 यारेद एकंदर नऊशे बासष्ट वर्षे जगला; त्या नंतर तो मरण पावला. 21 हनोख पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला मथुशलह झाला; 22 मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशें वर्षे देवाबरोबर चालला व त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 23 हनोख एकंदर तीनशें पासष्ट वर्षे जगला; 24 एके दिवशी हनोख देवाबरोबर चालत होता; नंतर तो नाहिसा झाला कारण देवाने त्याला नेले. 25 मथुशलह एकशे सत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला लामेख नावांचा मुलगा झाला; 26 लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशेंब्याऐंशी वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 27 मथुशलह एकंदर नऊशें एकुणसत्तर वर्षे जगला; त्यानांतर तो मरण पावला. 28 लामेख एकशें ब्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला एक मुलगा झाला; 29 त्याने त्याचे नाव नोहा (म्हणजे विसावा) असे ठेवले. लामेख म्हाणाला, “देवाने भूमिला शाप दिल्यामुळे आपल्याला शेतकरी म्हणून खूप काष्ट करावे लागतात; परंतु नोहा आपल्याला विसावा देईल.” 30 नोहा झाल्यावर लामेख पाचशें पंच्याण्णव वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 31 लामेख एकंदर सातशें सत्याहत्तर वर्षे जगला; नंतर तो मरण पावला. 32 नोहा पाचशें वर्षांचा झाल्यावर त्याला शेम, हाम व याफेथ नावाचे मुलगे झाले.

6:1 पृथ्वीवरील मनुष्यांची संख्या वाढतच राहिली आणि त्यांना मुली झाल्या; 2 त्या मुली सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, म्हणून आपल्या आवडी निवडी प्रमाणे त्यांनी त्यांच्याशी लग्न केले. 3 या स्त्रीयांनी मुलांना जन्म दिला, त्या काळी व त्यानंतर पृथ्वीवर नेफिलिम लोक राहात होते. ते फार नामांकित होते. ते प्राचीन काळापासूनचे महावीर होते. 4 नंतर परमेश्वर म्हणाला, “मनुष्य हा देहधारी आहे, तो भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची सत्ता त्यांच्या ठायी सर्वकाळ राहणार नाही; म्हणून मी माझ्या आत्म्याला त्याच्यापासून सतत - त्रास होऊ देणार नाही; तर मी त्यांस एकशेंवीस वर्षांचेच आयुष्य देईन.” 5 परमेश्वराने पाहिले की पृथ्वीवरील लोक दुष्ट आहेत; त्यांचे विचार नेहमी वाईट असतात. 6 म्हणून पृथ्वीवर मनुष्य निर्माण केल्याबद्दल परमेश्वरला वाईट वाटले; 7 आणि तो मनात फार दु:खी झाला; तेव्हा तो म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवास पृथ्वीतलावरुन नष्ट करीन; तसेच माणसे, पशू, सरपटणारे प्राणी, व आकाशातील पक्षी या सर्वांचा मी नाश करीन कारण या सर्वांना उत्पन्न केल्याचे मला दु:ख होत आहे.” 8 परंतु परमेश्वराला आनंद देणारा एक माणूस पृथ्वीवर होता तो म्हणजे नोहा. 9 ही नोहाच्या घराण्याची कहाणी आहे. नोहा आयुष्यभर त्या पिढीतला नीतिमान माणूस होता. तो नेहमी देवाच्या आज्ञांप्रमाणे चालला 10 नोहाला शेम, हाम व याफेथ नावाचे तीन मुलगे होते. 11 देवाने पृथ्वीकडे पाहिले तेव्हा माणसांनी ती भ्रष्ट केली आहे असे त्याला आढळले. 12 जिकडे तिकडे हिसांचार चालू होते; लोक वाईट व क्रूर झाले होते; त्यांनी पृथ्वीवर आपल्या जीवनाचा नाश करुन घेतला होता. 13 म्हणून देव नोहाला म्हणाला, “मनुष्यांनी सर्व पृथ्वी संतापांने व हिंसेने भरुन टाकली आहे; म्हणून मी उत्पन्न केलेल्या सर्व प्राण्यांचा नाश करीन; त्यांचा पृथ्वी तलावरुन नायनाट करीन 14 तेव्हा आपणासाठी सायप्रस म्हणजे गोफेर झाडाच्या लाकडाचे एक तारु कर; त्यात खोल्या कर आणि त्याला सर्वत्र म्हणजे आतून व बाहेरुन डांबर लाव.” 15 देव म्हणाला, “तारवाचे मोजमाप मी सांगतो त्याप्रमाणे असावे. ते 300 क्यूबिट लांब, 50क्यूबिट रुंद, आणि 30 क्यूबिट उंच असावे; 16 तारवाला छतापासून सुमारे 18इंचावर एक खिडकी कर; तारवाच्या एका बाजूस दार ठेव; तसेच तारवाला वरचा, मधला व खालचा असे तीन मजले कर. 17 “मी सांगतो ते समजून घे. मी पृथ्वीवर जलप्रलय आणीन. मी पृथ्वीवरील सर्वलोक आणि सर्व सजीव प्राण्यांना नष्ट करीन. 18 मी तुझ्याशी एक विशेष करार करतो; तू आपले मुलगे, आपली बायको व आपल्या सुना यांस घेऊन तारवात जा. 19 तसेच पृथ्वीवरील प्रत्येक जातीतील सजीव प्राण्यापैकी एक नरमादीची जोडी तू तारवात ने, त्यांना तुझ्याबरोबर तारवात जिवंत ठेव. 20 पक्षी, पशू आणि भूमीवर रांगणारे प्राणी या पैकी प्रत्येकाच्या जातीतून नरमादी असे दोनदोन तुझ्याबरोबर तरवात ने; त्यांना तुझ्याबरोबर तारवात जिवंत ठेव. 21 तसेच तुला व त्यांना लागणारे पृथ्वीवरील सर्व प्रकारचे अन्न तारवात साठवून ठेव.” 22 देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे नोहाने सर्व काही केले.

7:1 नंतर परमेश्वर नोहाला म्हणाला, “या काळातील दुष्ट लोकात माझ्यासमोर तूच एक नीतिमान माणूस आहेस असे मला आढळले आहे; तेव्हा तुझ्या कुटुंबातील सर्वांना घेऊन तारवात जा. 2 अर्पणासाठी वरील प्रत्येक जातीच्या शुद्ध प्राण्यापैकी नरमाद्यांच्या सात जोड्या, इतर अशुद्ध प्राण्यापैकी नरमादी अशी एकच जोड़ी, 3 आणि पक्षांच्या नरमादी अशा सात जोड्या तुझ्याबरेबर तारवात नें. पृथ्वीवर त्यांचे बीज राहील 4 आतापासून सात दिवसांनी मी पृथ्वीवर चाळीस दिवस व चाळीस रात्र प्रचंड पाऊस पाडीन; त्यामुळे पृथ्वीवर मी निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीचा नाश होईल.” 5 परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे नोहाने सर्वकाही केले. 6 पाऊस आला तेव्हा नोहा सहाशे वर्षांचा होता. 7 जलप्रलयातून तरुन जावे म्हणून नोहा व त्याचे सह त्याचे कुटुंब म्हणजे त्याची बायको, त्याचे मुलगे व सुना हे तारवात गेले. 8 तसेच पृथ्वीतलावरील सर्व शुद्ध व अशुद्ध पशूपक्षी, सरपटणारे व रांगणारे प्राणी 9 हे सर्व देवाने सांगितल्याप्रमाणे नर व मादी अशा जोडी जोडीने नोहाबरोबर तारवात गेले. 10 मग सात दिवसानंतर पृथ्वीवर पाऊस पडण्यास व जलप्रलय येण्यास सुरवात झाली. 11 दुसऱ्या महिन्याच्या सतराव्या दिवशी पृथ्वीतील पाण्याचे सर्वझरे फुटले व पाणी उफाळून वर आले व जमिनीवरुन वाहू लागले; त्याच दिवशी मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली; जणू काय आकाशाच्या खिडक्या उघडल्या; चाळीस दिवस व चाळीस रात्र मुसळधार पाऊस पडला. त्याच दिवशी नोहा, त्याची बायको, त्याचे मुलगे शेम, हाम व याफेथ व त्यांच्या बायका ही सर्वमंडळी तारवात गेली. त्यावेळी नोहा सहाशे वर्षांचा होता. 12 13 14 नोहाचे कुटुंब आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राणी म्हणजे सर्व जातीची गुरेढोरे इतर पशू जमिनीवर सरपटणारे आणि आकाशात उडणारे पक्षी हे तारवात होते. 15 आणि ज्यांच्या जीवात प्राण आहे असे सर्व प्रकारचे प्राणी दोन दोनच्या गटाने तारवात गेले. 16 देवाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे हे जीवंत प्राणी जोडीने नर व मादी असे तारवात गेले आणि मग परमेश्वराने दार बंद केले पाणी वाढू लागले आणि त्याने जमिनीवरुन तारु उचलले. 17 चाळीस दिवस पृथ्वीवर महापुर पाणी आले; 18 पाणी एक सारखे चढतच गेले आणि त्यामुळे तारु जमिनीपासून उंचावर तरंगू लागले; 19 पाणी इतके वर चढत गेले की उंच उंच पर्वत देखील पाण्यात बुडून गेले; 20 पाणी सर्वात उंच पर्वत शिखरावर वीस फुटा पेक्षा अधिक उंच इतके वर चढले. 21 पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राणी, म्हणजे सर्व स्त्री, पुरुष, तसेच सर्व पक्षी, गुरेढोरे, ग्रामपशू, वनपशू सरपटणारे प्राणी हे सर्व जीव जंतू मरुन गेले. 22 23 अशा रीतीने देवाने पृथ्वीच्या पाठीवरील सर्वकाही म्हणजे मानव, पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशातील पक्षी अशा सर्व जीवधारी प्राण्यांचा नाश केला; जे वाचले ते म्हणजे नोहा, त्याचे कुटुंब आणि तारवात त्याच्या सोबत असलेले प्राणी, फक्त एवढेच. 24 पाण्याने एकशे पन्नास दिवस पृथ्वीला झाकून ठेवले होते.

8:1 पण देव नोहाला विसरला नाही; त्याने नोहाची व त्याच्या सोबत तारवात असलेल्या सर्व प्राण्यांची आठवण केली; देवाने पृथ्वीवर वारा वाहवला. आणि पाणी दिसेनासे होऊ लागले. 2 आकाशातून मुसळधार पडणारा पाऊस थांबला; आणि पृथ्वीच्या पोटातून उफाळून वर येणारे सर्व झऱ्यांचे पाणी वाहाण्याचे थांबले, 3 पृथ्वी भरुन टाकलेले पाणी ओसरुन खाली खाली जाऊ लागले. दिडशे दिवसानंतर पाणी इतके खाली आले की त्यामुळे 4 5 सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारु आरारात पर्वताजवळ थांबून पुन्हा जमिनीवर टेकले; पाणी सतत ओसरत राहिले आणि दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वताची शिखरे दिसू लागली. 6 चाळीस दिवसांनंतर नोहाने तयार केलेली तारवाची खिडकी उघडली 7 आणि एक कावळा बाहेर सोडला; तो पाणी संपून जमीन कोरडी होईपर्यंत इकडे-तिकडे उडत राहिला. 8 जमिनीच्या पृष्टभागावरुन पाणी उतरले आहे का नाही हे जाणून घेण्याकरिता नोहाने एका कबुतरालाही बाहेर सोडले. 9 जमीन अजून पाण्याने झाकलेली असल्यामुळे कबुतराला टेकायला जागा मिळाली नाही. म्हणून ते तारवाकडे परत आले तेव्हा नोहाने हात बाहेर काढून त्याला धरले व तारवाच्या आत घेतले. 10 सात दिवसानंतर नोहाने पुन्हा कबुतराला बाहेर सोडले; 11 तेव्हा ते दुपारी नोहाकडे परत आले तेव्हा त्याच्या चोचींत आँलीव्ह वृक्षाचे (म्हणजे जैतून झाडाचे) कोवळे पान होते. यावरुन जमीन सुकली असल्याचे नोहाला समजले, 12 आणखी सात दिवसांनी नोहाने कबुतराला पुन्हा बाहेर सोडले परंतु यावेळी मात्र ते परत आले नाही. 13 त्यानंतर नोहाने तारवाचे दार उघडले. जमीन सुकून गेली आहे असे होता नोहाला दिसले. हा वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस होता. नोहा तेव्हा 601 वर्षांचा होता. 14 दुसऱ्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवसापर्यंत जमीन खडखडीत कोरडी झाली होती. 15 नंतर देव नोहाला म्हणाला, 16 “तू, तुझी बायको, मुले व सुना यांना घेऊन आता तारवाच्या बाहेर नीघ; 17 तुझ्या बरोबर सर्वपक्षी, पशू जमिनीवर रांगणारे प्राणी या सर्वांना तारवातून बाहेर आण; ते प्राणी आपापल्या जातीची भरपूर संतती उत्पन्न करतील व पुन्हा पृथ्वी भरुन टाकतील.” 18 तेव्हा नोहा आपले पुत्र, बायको व सुना यांना घेऊन तारवातून बाहेर निघाला; 19 त्याच्या बरोबरचे सर्व पशू, रांगणारे प्राणी व पक्षी जातवारीने जोडीजोडीने तारवातून बाहेर निघाले. 20 त्यानंतर नोहाने परमेश्वराकरिता एक वेदी बांधली आणि देवाने अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्व शुद्ध पक्षी व सर्व शुद्ध पशू यांतून काही अर्पणासाठी घेतले आणि त्याने देवासाठी देणगी म्हणून त्यांचे वेदीवर होमार्पण केले. 21 परमेश्वराने त्या अर्पणाचा सुवास घेतला आणि त्याने त्याला आनंद झाला; परमेश्वर स्वत:स म्हणाला, “मानवास शिक्षा करण्याकरिता मी पुन्हा कधीही भूमिला असा शाप देणार नाही; आपल्या लहानपणापासूनच मानव दुष्ट आहे; तेव्हा येथून पुढे कधीही मी पृथ्वीवरुन सर्वसजीव सृष्टीचा नाश करणार नाही पुन्हा; 22 जोपर्यंत पृथ्वी राहील तो पर्यंत पेरणी व कापणी, थंडी व ऊन, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र व्हावयाची थांबणार नाहींत.”

9:1 देवाने नोहाला व त्याच्या मुलांना 2 शीर्वाद दिला. तो त्यांना म्हणाला, “पुष्कळ मुलांबाळांना जन्म द्या; आणि तुमच्या संततीने पृथ्वी भरुन टाका. 2पृथ्वीवरील सर्व पशू, आकाशातील प्रत्येक पक्षी, जमिनीवर सरपटणारा प्रत्येक प्राणी आणि समुद्रातील सर्व मासे, तुमचे भय धरतील; ते सर्व तुमच्या सत्तेखाली असतील. 3 ह्या आधी मी तुम्हाला, खाण्याकरिता हिरव्या वनस्पती दिल्या; आता सर्व प्राणीही तुमचे अन्न होतील. मी पृध्वीवरील सर्व काही तुमच्या हाती देतो. ते सर्व तुमचे आहे. 4 पण मी तुम्हांस एक आज्ञा देतो की रक्तासकट मांस तुम्ही खाऊ नका कारण रक्त हे त्याचे जीवन आहे; 5 तसेच मी तुमच्या जीवाबद्दल रक्ताची मागणी करीन म्हणजे माणसाला ठार मारणाऱ्या कोणत्याहीं पशूच्या जीवाची मी मागाणी करीन आणि माणसाचा जीव घेणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जीवाची मी मागणी करीन. 6 “देवाने माणूस आपल्या प्रतिरुपाचा उत्पन्न केला आहे. म्हणून जर एखादी व्यक्ति एखाद्या व्यक्तिद्वारे ठार मारली गेली तर ती व्यक्तिपण त्याच व्यक्तिद्वारेच ठार केली जाईल. 7 “नोहा, तू व तुझी मुले तुम्हाला भरपूर संतती होवो व तुमच्या लोकांद्वारे पृथ्वी भरली जावो.” 8 मग देव नोहाला व त्याच्या मुलांना म्हणाला, 9 “मी आता तुम्हाशी व तुमच्या मागे तुमच्या संततीशी एक करार करतो; 10 तसेच तुमच्या सोबत जे पक्षी, गुरेढोरे, पशू आणि इतर जे प्राणी तारवातून बाहेर आले त्यांच्याशीही एक करार करतो म्हणजे सर्व सजीव सृष्टीशी मी करार करतो; 11 तो करार असा: पृथ्वीवरील सर्वप्राणीमात्र जलप्रलयामुळे नष्ट झाले पण येथून पुढे तसे कधीच होणार नाही, व सर्व सजीव सृष्टीचा नाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी येणार नाहीं.” 12 आणि देव म्हणाला, “मी तुम्हाशी हा करार केल्याची काही तरी खूण तुम्हाला देतो त्या खुणेवरुन (पुराव्यावरुन) मी तुम्हाशी व सर्व सजीव सृष्टीशी करार केल्याचे दिसेल. हा करार पिढ्यानपिढ्या व युगानुयुग कायम राहील. 13 मी ढगात साप्तरंगी धनुष्य ठेवले आहे; ते सर्व पृथ्वी व माझ्यामध्ये केलेल्या कराराचा पुरावा म्हणून राहील. 14 मी जेव्हा पृथ्वीवरील ढग आणेल तेव्हा तुम्हाला ढगात सप्तरंगी धनुष्य दिसेल 15 जेव्हा मी ते पाहीन तेव्हा मी तुमच्याशी व पृथ्वीवरील सर्व प्राण्यांशी केलेल्या माझ्या कराराची मला आठवण होईल, ह्या कराराप्रमाणे जलप्रलय पृथ्वीवरील जीवनांचा पुन्हा कधीही नाश करणार नाही. 16 आणि ते धनुष्य पाहून कराराची मला आठवण होईल मी पृथ्वीवरील प्रत्येक जिवंत प्राण्याशी चिरंतन काळासाठी केलेल्या कराराची मला आठवण होईल.” 17 तेव्हा देव नोहाला म्हणाला, “ते रंगीत धनुष्य माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्वसजीव प्राण्यामध्ये झालेल्या कराराचा पुरावा आहे.” 18 नोहाबरोबर त्याचे मुलगे तारवाबाहेर आले; त्यांची नावे शेम, हाम व याफेथ अशी होती; (हाम हा कनानाचा बाप होता 19 हे नोहाचे तीन मुलगे होते; यांच्या पासूनच पृथ्वीवर लोकवस्ती झाली. 20 नोहा शेतकरी झाला व त्याने एक द्राक्षमळा लावला; 21 त्याने द्राक्षारस तयार केला व तो भरपूर प्याला; तो द्राक्षारसाने धुंद झाला व आपल्या तंबूत उघडानागडा पडला. 22 तेव्हा कनानाचा बाप हाम याने आपला बाप उघडानागडा पडलेला असल्याचे पाहिले व त्याने तंबूच्या बाहेर येऊन ते आपल्या भावांना सांगितले; 23 मग शेम व याफेथ यांनी एक झगा घेतला व तो आपल्या पाठीवर ठेवून ते पाठमोरे तंबूत गेले. अशा प्रकारे त्यांनी आपल्या वडिलांची नग्नता झाकली; पाठमोरे असल्यामुळे ती त्यांना दिसली नाहीं. 24 नंतर नोहा जागा झाला, (तो द्राक्षारसाच्या नशेमुळे झोपला होता) तेव्हा आपला धाकटा मुलगा हाम याने काय केले हे त्याला समजले. 25 तेव्हा नोहा म्हणाला,“कनान शापित होवो, तो आपल्या भावाच्या गुलामातील सर्वात खालचा गुलाम होवो.” 26 नोहा आणखी म्हणाला, “शेमचा परमेश्वर देव धन्यवादित असो! कनान शेमचा गुलाम होवो. 27 देव याफेथाला अधिक जमीन देवो! देव शेमच्या तंबूत राहो, आणि कनान त्यांचा गुलाम होवो.” 28 जलप्रलया नंतर नोहा साडेतीनशे वर्षे जगला; 29 नोहा एकूण साडे नऊशे वर्षे जगला; मग त्यानंतर तो मरण पावला.

10:1 शेम, हाम व याफेथ ह्मा नोहाच्या तीन मुलांना जलप्रलयानंतर पुष्कळ मुलगे झाले; त्यांची वंशावळ येणे प्रमाणे:याफेथाचे वंशज 2 याफेथाचे मुलगे; गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख व तीरास हे होते. 3 गोमरचे मुलगे; आष्कनाझ, रीपाथ व तोगार्मा, हे होते. 4 यावानाचे मुलगे; अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम. 5 भूमध्यासमुद्रच्या किनाऱ्याच्या आसपास जी राष्ट्रे झाली ती सर्व याफेथाच्या संततीपासून होती; प्रत्येक मुलाला स्वत:ची जमीन होती ही सर्व कुळे वाढत गेली व त्यांची वेगवेगळी राष्ट्रे झाली. प्रत्येक राष्ट्राची भाषा वेगळी होती. 6 हामचे मुलगे याप्रमाणे होते: कूश, मिस्राईम, पूट व कनान 7 कुशाचे मुलगे: सबा, हवीला, साब्ता, रामा, व साव्तका; आणि रामाचे मुलगे शबा व ददान हे होते. 8 कुशाला निम्रोद नावाचा मुलगा होता, तो पृथ्वीवर महाबलवान व पराक्रमी असा वीरपुरुष होता. 9 तो परमेश्वरापुढे बलवान शिकारी झाला म्हणून इतर माणसांची निम्रोदाशी तुलना करुन “तो माणूस, परमेश्वरासमोर बलवान निम्रोद शिकाऱ्यासारखा आहे” असे म्हणण्याची प्रथा आहे. 10 शिनार प्रांतातील बाबेल, एरक, अक्काद व कालहने ही निम्रोदाच्या राज्यातील सुरवातीची शहरे होती. 11 तेथून तो अश्शुरालाही गेला व तेथे त्याने निनवे, रहोबोथ, ईरकालह व रेसन ही शहरे वसवली 12 (रेसन हे शहर, निनवे व मोठे शहर कालह यांच्या दरम्यान आहे.) 13 मिस्राईम याला लूद, अनामीन, लहाकीम, नाप्तुहीम 14 पात्रुस कास्लूह व कप्तोरी हे मुलगे झाले. कास्लूहपासून पलिष्टी लोक आले. 15 कनानाचा पहिला मुलगा सीदोन हा होता; कनान हा हेथचाही बाप होता. कनानापासून उदयास आलेली राष्ट्रे, 16 यबूसी, अमोरी, गिर्गाशी, 17 हिव्वी, आकर्ी, शीनी 18 अर्वादी, समारी व हमाथी ही होती. पुढे कनानाची कुळे जगाच्या वेगवेगळ्या भागात पसरली. 19 कनान्यांची सीमा उत्तरे कडील सीदोनापासून दक्षिणेकडील गरारापर्यंत व पश्चिमेकडील गाजापासून तर पूर्वेस सदोम व गमोरा पर्यंत तसेच आदमा पासून व सबोईम पासून व लेशापर्यंत पसरली होती. 20 ही सर्व हाम याची वंशजे होती; हया सर्व वंशजांना स्वत:ची भाषा व देश होते; ती सर्व वेगवेगळी राष्ट्रे झाली. 21 शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो इब्री लोकांचा मुळ पुरुष होता. 22 शेम याचे मुलगे; एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम; 23 अरामाचे मुलगे: ऊस, हूल, गेतेर व मश हे होते; 24 अर्पक्षदास शेलह झाला, शेलहास एबर झाला: 25 एबर यास दोन मुलगे झाले; एकाचे नाव पेलेग होते. पेलेग म्हणजे वाटणी; कारण याच्याच हयातीत पृथ्वीची वाटणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते. 26 यक्तानास अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह, 27 हदोराम, ऊजाल, दिक्ला 28 ओबाल, अबीमाएल, शबा, 29 ओफीर, हवीला व योबाब असे मुलगे झाले; हे सगळे यक्तानाचे मुलगे; 30 ते मेशापासून पूर्वेकड़ील डोंगराळ भागात राहात होते. मेशा सफारच्या देशाकडे होते. 31 हे शेमाचे वंशज होते. कुळे, भाषा, देश व राष्ट्रे याप्रमाणे त्यांची विभागणी अशी आहे. 32 ही नोहाच्या मुलांची व त्यांच्या वंशजांची, पिढ्या व कुळाप्राणे यादी आहे; त्यांच्या राष्ट्रांप्रमाणे ती आखलेली आहे; जलप्रलयानंतर त्यांची पृथ्वीवर वेगवेगळी राष्ट्रे झाली.

11:1 जलप्रलयानंतर पृथ्वीवरील सर्व लोकांची एकच भाषा व एकच बोली होती, 2 लोक पूर्वेकडून पुढे निघाले तेव्हा जाता जाता शिनार देशात त्यांना एक मोठे मैदान लागले आणि मग त्यांनी तेथेच वस्ती केली. 3 लोक म्हणाले, “चला, आपण विटा करु व त्या विस्तवात भाजू म्हणजे त्या खूप कठीण होतील; “तेव्हा लोकांनी घरे बांधण्यासाठी दगडाऐवजी विटांचा आणि चुन्याऐवजी डांबराचा उपयोग केला. 4 मग लोक म्हाणाले, “चला, आपण आपणासाठी नगर बांधू; आणि आकाशाला भिडणारा उंचच उंच बुरुज बांधू; असे केले तर मग आपण नावाजलेले लोक होऊ व आपण पांगले जाणार नाहीं तर एके जागी एकत्र राहू.” 5 परमेश्वर ते नगर व तो उंच बुरुज पाहण्यासाठी खाली आला. लोक ते बांधीत आहेत असे परमेश्वराने पाहिले. 6 तेव्हा परमेश्वर म्हणाला, “हे सर्व लोक एकच भाषा बोलतात आणि हे बांधणीचे काम करण्यासाठी ते सगळे एकत्र जमले आहेत, ते काय करु शकतात त्याची ही तर नुसती सुरवात आहे; लवकरच ते त्यांना जे पाहिजे ते करु शकतील, 7 तेव्हा आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करुन टाकू; मग मात्र त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाहीं,” 8 तेव्हा परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली म्हणून नगर व बुरुज बांधण्याचे काम तसेच राहिले. 9 ह्याच ठिकाणी परमेश्वराने सर्व पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा केला म्हणून त्या नगराला बाबेल म्हटले आहे. अशा रीतीने परमेश्वराने त्या ठिकाणापासून इतरत्र पसरण्यास लोकांना भाग पाडले. 10 शेमच्या कुळाची वंशावळ येणे प्रमाणे: जलप्रलयानंतर दोन वर्षांनी शेम शंभर वर्षांचा झाल्यावर त्याचा मुलगा अर्पक्षद जन्मला; 11 त्यानंतर शेम पाचशे वर्षे जगला, आणि त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या. 12 अर्पक्षद पस्तीस वर्षांचा असताना त्याचा मुलगा शेलह जन्मला 13 शेलहच्या जन्मानंतर अर्पक्षद चारशेतीन वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या. 14 शेलह तीस वर्षांचा असताना त्याला एबर झाला; 15 एबर झाल्यावर शेलह चारशेतीन वर्षे जगला व त्याच्या हयातीत त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या. 16 एबर चौतीस वर्षांचा झाल्यावर त्याला पेलेग झाला. 17 पेलेग झाल्यावर एबर चारशेतीस वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या. 18 पेलेग तीस वर्षांचा झाल्यावर त्याला रऊ झाला; 19 रऊ झाल्यावर पेलेग दोनशे नऊ वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या. 20 रऊ बत्तीस वर्षांचा झाल्यावर त्याला सरुग झाला; 21 सरुग झाल्यावर रऊ दोनशे सात वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या. 22 सरुग तीस वर्षांचा झाल्यावर त्याला नाहोर झाला. 23 नाहोर झाल्यावर सरुग दोनशें वर्षे जगला आणि त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या. 24 नाहोर एकूणतीस वर्षांचा झाल्यावर त्याला तेरह झाला; 25 तेरह झाल्यावर नाहोर आणखी एकशें एकोणीस वर्षे जगला आणि त्याला इतर मुलगे व मुली झाल्या. 26 तेरह सत्तर वर्षांचा झाल्यावर त्याचे मुलगे अब्राम, हारान व नाहोर हे जन्मले. 27 तेरहच्या कुळाची वंशावळ येणेप्रमाणे: तेरहाला अब्राम, नाहोर व हारान हे मुलगे होते. हारानाचा मुलगा लोट. 28 हारान, आपला बाप तेरह जिवंत असताना आपली जन्मभूमी खास्द्यांचे ऊर अथवा बाबेल गांव येथे मरण पावला. 29 अब्राम व नाहोर या दोघांनीही लग्न केले; अब्रामाच्या बायकोचे नाव साराय आणि नाहोरच्या बायाकोचे नाव मिल्का होते; मिल्का ही हारानाची मुलगी होती; हा हारान मील्का व इस्का यांचा बाप होता. 30 साराय वांझ होती, तिला मूलबाळ नव्हते. 31 मग तेरह आपले कुटुंब घेऊन म्हणजे आपला मुलगा अब्राम, आपला नातू म्हणजे (हारानाचा मुलगा) लोट, आणि आपली सून म्हणजे (अब्रामाची बायको) साराय यांना बरोबर घेऊन बाबीलोनिया मधील म्हणजे खास्द्यांच्या ऊर येथून कनान देशास जाण्यासाठी निघाला: आणि प्रवास करीत ते हारान शहरात आले व तेथेच स्थायिक होण्याचे त्यांनी ठरविले. 32 तेरह दोनशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो हारान येथे मरण पावला.

12:1 परमेश्वर अब्रामाला म्हणाला,“तू आपला देश, आपले गणगोत व आपल्या बापाचे घर सोड; आणि मी दाखवीन त्या देशात जा. 2 मी तुला आशीर्वाद देईन; तूझ्या पासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुझे नाव मोठे करीन, लोक तुझ्या नावाने इतरांना आशीर्वाद देतील, 3 जे लोक तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, आणि जे लोक तुला शाप देतील त्यानां मी शाप देईन. तुझ्यामुळे पृथ्वीवरील सर्वलोक आशीर्वादित होतील.” 4 तेव्हा अब्रामाने परमेश्वराची आज्ञा मानली. त्याने हारान सोडले लोट त्याच्या बरोबर गेला. या वेळी अब्राम पंच्याहत्तर वर्षांचा होता. 5 हारान सोडताना तो एकटा नव्हता तर त्याने आपली बायको साराय, पुतण्या लोट आणि हारानमध्ये त्यांनी मिळवलेली मालमत्ता तसेच गुलाम या सर्वांना बरोबर घेऊन त्याने हारान सोडले व तो कनान देशाच्या प्रवासास निघाला आणि कनान देशात आला. 6 अब्राम कनान देशातून प्रवास करीत शखेम गावला आला आणि मोरेच्या मोठ्या वृक्षांपर्यंत गेला. याकाळी त्या देशात कनानी लोक राहात होते. 7 परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या वंशाजांना देईन.”ज्या जागेवर परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिले त्या जागी त्याने परमेश्वराची उपासना करण्यासाठी एक वेदी बांधली. 8 मग अब्राम तेथून निघाला आणि प्रवास करीत तो बेथेलच्या पूर्वेस डोंगराळ भागात पोहोंचला व त्याने तेथे तळ दिला; तेथून बेथेल पश्चिमेस होते आणि आय शहर पूर्वेस होते; तेथे त्याने परमेश्वरासाठी दुसरी वेदी बांधली आणि देवाची उपासना केली. 9 त्यानंतर अब्राम पुन्हा पुढच्या प्रवासास निघाला व नेगेबकडे गेला. 10 त्या काळी त्या प्रदेशात मोठा दुष्काळ पडला; तेथे पाऊस पडला नाही आणि अन्नधान्य उगवले नाही. म्हणून अब्राम मिसरमध्ये राहाण्यास गेला. 11 आपली बायको साराय फार सुंदर आहे असे अब्रामाने पाहिले; तेव्हा मिसर देशाच्या हद्दीत शिरण्यापूवी अब्राम साराय हिला म्हणाला, “मला माहीत आहे की तू अतिशय सुंदर व रुपवान स्त्री आहेस, 12 म्हणून मिसरचे लोक जेव्हा तुला पाहतील तेव्हा ते म्हणतील ‘ही त्याची बायको आहे.’ आणि मग तुझ्या साठी ते मला मारुन टाकतील; 13 तर तू माझी बहीण आहेस असे तू लोकांस सांग म्हणजे मग ते मला मारणार नाहींत; ते माझ्यावर दया करतील; अशा रीतीने तू माझा जीव वाचवशील.” 14 मग अब्राम मिसर देशात गेला; तेथील लोकांनी पाहिले की साराय ही फार सुंदर स्त्री आहे. 15 मिसरच्या राजवाड्यातील सरदारांनी सारायला पाहिले व त्यांनी आपला राजा फारो याच्या जवळ तिच्या सौंदर्याची वाखाणणी केली; आणि त्यांनी तिला राजाच्या घरी नेऊन ठेवले. 16 अब्राम सारायचा भाऊ आहे असे समजल्यावर फारो राजाने त्याजवर दया केली व त्याला मेंढरे, गुरेढोरे, व गाढवे दिली तसेच अब्रामाला दास, दासी व उंटही मिळाले. 17 अब्रामाची बायको साराय हिला फारोने नेले म्हणून परमेश्वराने फारो व त्याच्या घरातील लोकाना भयंकर रोगाची पीडा भोगावयास लावली. 18 तेव्हा फारोने अब्रामास बोलावले. तो म्हणाला. “तू माझ्याबाबत फार वाईट गोष्ट केलीस, साराय तुझी बायको आहे, हे तू मला सांगितले नाहीस का? 19 ‘ती माझी बहीण आहे’ असे तू का म्हणालास? मला बायको करण्यासाठी मी तिला नेले होते परंतु मी आता तुझी बायको तुला परत करतो; तिला घे व येथून निघून जा.” 20 मग अब्रामाची मिसरमधून बाहेर रवानगी करावी अशी फारोने आपल्या सरदारांना आज्ञा दिली; तेव्हा अब्राम व त्याची बायको साराय यांनी आपले सर्व काही बरोबर घेऊन मिसर सोडले.

13:1 अशा रीतीने अब्रामाने मिसर देश सोडला व तो आपली बायको साराय, पुतण्या लोट आणि त्यांची सर्व मालमत्ता घेऊन नेगेब मधून प्रवास करीत गेला. 2 त्या काळी अब्राम फार श्रीमंत झाला होता; त्याच्याजवळ पुष्कळ गुरेढोरे, शेरेडेमेंढरे, गाढवे व उंट तसेच सोने चांदी इत्यादी भरपूर होते. 3 अब्राम इकडेतिकडे सतत प्रवास करीत राहिला; त्याने नेगेब सोडले व तो पुन्हा मागे बेथेलला गेला; बेथेल व आय यांच्या दरम्यान याच ठिकाणी त्याने त्याच्या कुटुंबासह तळ दिला होता व 4 परमेश्वराची उपासना करण्याकरिता त्याने एक वेदी बांधली होती, म्हणून त्याच ठिकाणी अब्रामाने परमेश्वराची उपासना केली.अब्राम व लोट वेगळे होतात 5 या काळात लोट अब्रामाबरोबर प्रवास करीत होता. लोट याजकडे खूप, गुरेढोरे व तंबू होते 6 अब्राम व लोट यांची गुरेढोरे इतकी वाढली की त्या दोघांना एकत्र राहाण्यास ती जागा व तो प्रदेश पुरेना, 7 शिवाय अब्राम व लोट यांच्या गुराख्यांची एकसारखी भांडणे होऊ लागली; त्याकाळी त्या देशात कनानी व परिज्जी लोकांची वस्ती होती. 8 तेव्हा अब्राम लोटास म्हणाला, “तुझ्या माझ्यामध्ये तसेच तुझे व माझे गुराखी यांच्यामध्ये भांडणतंटा नसावा, कारण आपण सगळे भाऊबंद आहोत. 9 तेव्हा आपण वेगळे व्हावे हे आपल्यासाठी बरे आहे तुला पाहिजे तो प्रदेश तू निवड; तू जर डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, आणि तू जर उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.” 10 लोटाने यार्देन दरीकडे नजर टाकली तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी असल्याचे त्याला दिसले (परमेश्वराने सदोम व गमोरा या नगरांचा नाश केला त्याच्या आधीची ही घटना आहे. त्यावेळी थेट सोअरापर्यंत पसरलेले यार्देन नदीचे खोरे परमेश्वराच्या बागे सारखे सुंदर होते मिसर मधील प्रदेशाप्रमाणे ही भूमी चांगली होती.) 11 तेव्हा लोटाने यार्देन नदीच्या खोऱ्यात राहाणे निवडले; मग ते दोघे वेगळे झाले आणि लोटाने पूर्वेकडे प्रवास करण्यास सुरवात केली; 12 अब्राम कनान देशातच राहिला आणि लोट यार्देनेच्या तळवटीतील शहरातून राहिला; लोट दक्षिणेकडे दूर सदोमाला गेला आणि तेथेच त्याने आपला तबू ठोकला. 13 सदोम नगराचे लोक अतिशय दुष्ट व वाईट असल्याचे परमेश्वराला माहित होते. 14 लोट निघून गेल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तुझ्या अवतीभोवती, उत्तरेकडे व दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे दूरवर नजर टाकून पाहा; 15 तू पाहातोस हा सगळा प्रदेश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या संततीला कायमचा देईन. 16 मी तुझी संतती या पृथ्वीवरील धुळीच्या कणाइतकी करीन, ती इतकी करीन की जर कोणाला ते कण मोजता येतील तर तुझ्या संततीचीही गणना होईल. 17 तर उठून जा व या तुझ्या प्रदेशातून फिरुन ये; हा सर्व प्रदेश मी आता तुला देत आहे.” 18 तेव्हा अब्रामाने आपले तंबू हलविले व हेब्रोन शहरजवळील मम्रेच्या मोठया वृक्षांत तो राहावयास गेला; परमेश्वराची उपासना करण्यासाठी त्याने तेथे वेदी बांधिली.

14:1 शिनाराचा राजा अम्रफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचाराजा कदार्लागोमर आणि गोयीमाचा राजा तिदाल, 2 यांनी सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिर्शा, अदमाचा राजा शिनाब, सबोयिमाचा राजा शमेबर आणि बेलाचा म्हणजे सोअराचा राजा यांच्यांशी युद्ध केले. 3 या सर्व राजांनी आपले सैन्य सिद्दीम खोऱ्यात एकत्र जमविले. (हे खोरे म्हणजे आताचा क्षार समुद्र) 4 या सर्व राजांनी बारा वर्षे कदार्ला गोमर राजाची सेवा केली, पंरतु तेरव्या वर्षी ते त्याच्या विरुद्ध उठले. 5 तेव्हा चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या बरोबरचे राजे लढाई करण्यास चालून आले आणि त्यांनी अष्टरोथ कर्णईम येथे रेफाई लोकांचा, हाम येथे लूजी लोकांचा, शावेह किर्याथाईम येथे एमी लोकांचा आणि, सेईर म्हणजे ईदोम डोंगराळ प्रदेशात होरी लोकांचा आणि, सेईर म्हणजे ईदोम डोंगराळ प्रदेशात होरी लोकांचा पराभव केला आणि त्यांना एलपारान (हे वाळवंटा जवळ आहे) जवळ असलेल्या रानापर्यंत पिटाळून लावले. 6 7 त्यानंतर कदार्लागोमर राजा उत्तरेकडे वळाला व एन मिशपात म्हणजे कादेश येथे जाऊन त्याने अमालेकी लोकांचा पराभव केला; तसेच हससोन - तामार येथे राहणाऱ्या अमोरी लोकांचाही पराभव केला. 8 त्यावेळी सदोमाचा राजा, गमोराचा, राजा, अदमाचा सबोयिमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा यांनी आपले सैन्य एकत्र केले व आपल्या शत्रूशी लढण्याकरिता ते सिद्दीम खोऱ्याकडे गेले. 9 एलामाचा राजा कदार्लागोमर, गोयीमाया राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एलामाचा राजा अर्योक यांच्या विरुद्ध ते लढले; असे चार राजे पांच राजांविरुद्द लढले. 10 सिद्दीम खोऱ्यात डांबराने भरलेल्या अनेक खाणी होत्या. सदोम व गमोराचे राजे सैन्यासह पळून जाताना बरेच सैनिक खाणीत पडले परंतु बाकीचे डोंगराकडे पळून गेले. 11 तेव्हा त्यांच्या शत्रुनी सदोम व गमोरा येथील लोकांची सर्व मालमत्ता, अन्न व वस्त्र सामग्री लुटून नेली त्यांनी त्यांच्या सर्व वस्तू ही नेल्या. 12 अब्रामाचा पुतण्या लोट सदोमात राहात होता. त्याला शत्रूनीं पकडले व त्याच्या मालकीच्या सर्व मालमत्तेसह त्याला कैद करुन ते घेऊन गेले. 13 या लढाईत पकडला न गेलेला एक मनुष्य अब्राम इब्रीकडे पळून गेला व त्याने त्याला हे वर्तमान सांगितले त्यावेळी अब्राम मम्रे अमोरी वृक्षांजवळ तळ देऊन राहिला होता; मम्रे, अष्कोल व आनेर ह्यांनी एकमेकांना व अब्रामाला मदत करण्याचा करार केला. 14 लोटाला कैद करुन नेल्याचे वर्तमान अब्रामाला समजले, तेव्हा त्याने आपल्या कुटुंबात जन्मलेल्या सर्वांना एकत्र बोलावले व त्यांच्यातून लढाईच्या कामात कसलेले असे तीनशे अठरा तरबेज लढवैय्ये घेऊन त्याने थेट दान नगरापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला. 15 त्या रात्री त्याने आपल्या सैनिक दासासह शत्रूसैन्यावर अचानक हल्ला चढवला; त्यांनी शत्रू सैन्याचा पराभव केला व दिमिष्काच्या म्हणजे दमास्कसच्या उत्तरेस असलेल्या होबा पर्यंत त्यांचा पाठलाग केला. 16 तेव्हा शत्रुने लुटलेली सगळी मालमत्ता तसेच आपला पुतण्या लोट याची मालमत्ता, स्त्रिया आणि दास अब्रामाने परत आणले. 17 मग कदार्लागोमर व त्याच्याबरोबरचे राजे यांचा पराभव केल्यावर अब्राम आपल्या घरी गेला; तेव्हा सदोमाचा राजा शावेच्या खोऱ्यात त्याला भेटावयास गेला. (त्या खोऱ्याला आता राजाचे खोरे असे म्हणतात.) 18 आणि परात्पर देवाचा याजक असलेला शालेमाचा राजा मलकीसदेकही भाकर व द्राक्षारस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला. 19 मलकीसदेकाने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले,“अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता परात्पर देव तुला आशीर्वाद देवो. 20 त्या परात्पर देवाने तुझ्या शत्रूंचा पराभव करण्यास तुला मदत केली त्या परात्पर देवाचा आम्ही धन्यवाद करतो.”तेव्हा अब्रामाने लढाईच्या काळात त्याच्याजवळून जे जे घेतले होते त्याचा दहावा भाग मलकीसदेकाला दिला. 21 मग सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला, “मला फक्त कैद करुन नेलेले माझे लोक द्या आणि त्यांची मालमत्ता तुम्ही तुमच्यासाठी ठेवा.” 22 परंतु अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “आकाश व पृथ्वीचा निर्माणकर्ता परमेश्वर, परात्पर देव याला मी वचन देतो की, 23 मी तुझे असलेले काहीही ठेवणार नाहीं, एखादे सूत वा जोड्याचा बंधही ठेवणार नाही ‘मी अब्रामाला श्रीमंत केले’ असे तू म्हणावे असे मला वाटत नाही. 24 माझ्या या तरुण माणसांनी जे अन्न खाल्ले आहे तेवढ्याचाच मी स्वीकार करतो; परंतु इतर लोकांना लढाईतून मिळालेल्यापैकी त्यांचा वाटा घेऊ दे, आणि त्यातून काही आनेर, अष्कोल व मम्रे यांस दे, कारण त्यांनी लढाईत मला खूप मदत केली.”

15:1 या सर्व गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टांन्तात परमेश्वराचे वचन आले. देव म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको; मी तुझे रक्षण करीन आणि तुला आनंद होईल असे मी तुला मोठे प्रतिफळ देईन.” 2 परंतु अब्राम म्हणाला, “परमेश्वर देवा, असे काहीही प्रतिफळ नाही की जेणे कडून मला आनंद होईल, कारण मला मुलगा नाही; म्हणून माझ्या मरणानंतर माझे सर्वकाही दिमिष्कातील माझा गुलाम, अलिएजर यालाच मिळेल.” 3 अब्राम पुढे म्हणाला, “तू मला मुलगा दिला नाहीस म्हणून माझ्या घरात जन्मलेला माझा गुलामच माझ्या सगळ्या मालमत्तेचा वारस होईल.” 4 परमेश्वर अब्रामाशी बोलला, तो म्हणाला, “तुझे सर्वकाही त्या तुझ्या गुलामाला मिळणार नाही; तर तुला मुलगा होईलआणि तोच तुझ्या सगळ्या मालमत्तेचा वारस होईल.” 5 मग देवाने अब्रामाला रात्रीचे आकाश दाखविण्यासाठी बाहेर नेले. देव म्हणाला, “ह्या आकाशातील ताऱ्यांकडे पाहा, तुला मोजता येणार नाहीत इतके ते आहेत; येथून पुढच्या काळात तुझी संततीही त्या ताऱ्यांइतकी अगणित होईल.” 6 अब्रामाने देवावर विश्वास ठेवला देवाने त्याची प्रामाणिकांता गणना केली प्रमाणिक जीवन जगण्यास योग्य असा त्याचा विश्वस होता. 7 देव अब्रामाला म्हणाला, “हा देश तुला वतन करुन देण्याकरिता खास्द्यांच्या ऊर नगरातून तुला आणणारा मीच परमेश्वर आहे.” 8 परंतु अब्राम म्हणाला, “परमेश्वरा, माझ्या स्वामी, हा देश कायमचा वतन करुन मला मिळेल, याची खात्री मला कशी यावी?” 9 देव अब्रामाला म्हणाला, “माझ्यासाठी तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका तसेच एक होला व एक पारव्याचे पिल्लू आण.” 10 अब्रामाने तीं सर्व देवाकडे आणली अब्रामाने त्यांना चिरुन त्या प्रत्येकाचे दोन दोन अर्धे तुकडे केले; व ते समोरा समोर ठेवले; पक्षी मात्र त्याने दोन अर्धे चिरले नाहीत; 11 मग कापलेल्या प्राण्यांचे मांस खाण्याकरिता हिंस्र पक्ष्यांनी उडून त्यावर झडप घातली; परंतु अब्रामाने त्यांना हाकलून लावले. 12 नंतर त्या दिवशी सूर्य मावळू लागला, तेव्हा अब्रामाला गाढ झोप लागली म्हणून तो झोपला; तो झोपेत असताना अती भयंकर अंधार त्याच्यावर पडला; 13 मग परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तुला या गोष्टी समजल्या पाहिजेत; तुझे वंशज परक्या देशात राहतील ते तेथे परके असतील, ते तेथे गुलाम होतील आणि 400 वर्षे त्यांचा छळ होईल, त्यांच्यावर जुलूम केला जाईल; 14 परंतु चारशे वर्षानंतर ज्याने त्यांना गुलाम बनवले त्या राष्ट्राला मी शिक्षा करीन, आणि मग आपल्या बरोबर पुष्कळ धन घेऊन ते त्या देशातून निघतील. 15 “तू स्वत: फार म्हातारा होऊन शांतीने मरण पावशील आणि तुझे पूर्वज जेथे पुरलेले आहेत तेथे तुला मूठमाती देतील. 16 मग चार पिढ्यानंतर तुझे लोक या देशात माघारे येतील. त्यावेळी ते येथे राहाणाऱ्या अमोरी लोकांचा पराभव करतील, अमोरी लोकांना शिक्षा करण्यासाठी मी तुझ्या लोकांचा उपयोग करीन. (हे काही काळानंतर घडेल कारण अमोरी लोकांचा दुष्टपणा अद्याप शिगेला पोहोंचला नाहीं.)” 17 सूर्य मावळल्यानंतर गडद अंधार पडला; मारलेल्या जनावरांच्या तेथेच पडलेल्या धडांच्या दोन दोन अर्ध्या तुकड्यांमधून धुराचा लोट आणि अग्नी निघून गेला. 18 म्हणून त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाला वचन दिले व त्याच्याशी करार केला. परमेश्वर म्हणाला, “मिसर देशाच्या नदी पासून फरात म्हणजे युफ्रेटीस या महानदीपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या वंशजांना देतो; 19 केनी, कनिजी, कदमोनी, 20 हित्ती, परिजी, रफाईम, 21 अमोरी, कनानी, गिर्गाशी व यबूसी या लोकांचा प्रदेश मी तुम्हाला देतो.”

16:1 अब्राम व त्याची बायको साराय यांना मुलबाळ नव्हते. साराय हिची हागार नावाची एक मिसरी म्हणजे मिसर देशाची एक दासी होती. 2 साराय अब्रामाला म्हणाली, “परमेश्वराने मला मुले होण्यापासून रोखले आहे तेव्हा तुम्ही माझ्या दासीपाशी जा, तिच्यापोटी जन्मलेले मूल माझेच मूल आहे असे समजून मी ते स्वीकारीन.”अब्रामाने आपली बायको साराय हिचे म्हणणे मान्य केले. 3 कनान देशात अब्राम दहा पर्षे राहिल्यावर हे झाले आणि सारायने आपली मिसरी मोलकरीण हागार आपला नवरा अब्राम याला बायको म्हणून दिली. 4 हागार अब्रामापासून गरोदर राहिली; आपण गरोदर आहो हे पाहून आपण आपली मालकीण साराय हिच्यापेक्षा अधिक चांगल्या आहो असे हागारेला वाटू लागले व तिला गर्व झाला; 5 परंतु साराय अब्रामाला म्हणाली, “माझी दासी हागार आता मला तुच्छ लेखते; त्या बद्दल मी तुम्हाला दोष देते, कारण मीच स्वत: तिला तुमची उपपत्नी होण्याचा मान दिला म्हणून ती गरोदर राहिली आणि आता ती माझ्यापेक्षा चांगली व विशेष आहे असे तिला वाटू लागले; परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करो.” 6 परंतु अब्राम सारायला म्हणाला, “तू हागारेची मालकीण आहेस, तुला काय पाहिजे तसे तू तिचे कर.” तेव्हा सारायने तिचा छळ केला म्हणून हागार पळून गेली.” 7 शूर गांवाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हागार एका परमेश्वराच्या देवदूताला आढळलीं. 8 देवदूत तिला म्हणाला, “सारायचे दासी हागारे, तू येथे का आलीस? तू कोठे जात आहेस?”हागार म्हणाली, “माझी मालकीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.” 9 परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “साराय तुझी मालकीण आहे, तू तिच्याकडे घरी परत जा आणि तिच्या आज्ञेत राहा.” 10 परमेश्वराचा दूत आणखी म्हणाला, “तुझ्यापासून इतकी संतती होईल की ती मोजणे शक्य होणार नाहीं.” 11 परमेश्वराचा दूत पुढे आणखी म्हणाला,“तू आता गरोदर आहेस आणि तुला मुलगा होईल त्याचे नांव तू इश्माएल म्हणजे ‘परमेश्वर एकतो’ असे ठेव कारण प्रभूने तुझ्या दु:खविषयी ऐकले आहे; (तो तुझे सहाय्य करील.) 12 “इश्माएल जंगली गाढवासारखा रानटी आणि स्वतंत्र असेल. तो सर्वाविरुद्द व सर्व त्या विरुद्ध होतील; तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या भावांच्या जवळ तळ देत फिरेल, परंतु तो त्यांच्या विरुद्व असेल.” 13 परमेश्वर हागारेशी बोलला; हागारेने देवासाठी नवे नाव वापरायला सुरवात केली. ती म्हणाली, “ती म्हणाली, “तू ‘मला पाहणारा देव’ आहेस,” कारण “मला समजते की या ठिकाणीही देव मला भेटतो व माझी काळजी करतो.” 14 तेव्हा तेथील विहिरीला बैर - लहाय - रोईअसे नांव पडले; ती विहीर कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे. 15 हागारेला अब्रामापासून मुलगा झाला; अब्रामाने त्याचे नाव इश्माएल ठेवले. 16 त्या वेळी अब्राम शह्यांशी वर्षांचा होता.

17:1 अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याच्याशी बोलला परमेश्वर म्हणाला, “मी सर्वशक्तिमान देव आहे; माझ्यासाठी पुढील प्रमाणे गोष्टी कर: माझ्या आज्ञा पाळ, आणि योग्य मार्गाने चाल व सात्विकतेने राहा. 2 तू असे करशील तर मी आपणामध्ये एक करार करीन; मी तुला अगणित पटीत वाढवीन असे अभिवचन देतो.” 3 मग अब्रामाने देवाला लवून नमन केले; देव त्याला म्हणाला, 4 “आपल्या करारातील माझा भाग हा असा; मी तुला अनेक राष्ट्रांचा महान पिता करीन; 5 मी तुझे नाव बदलतो; तुझे नाव अब्राम असणार नाहीं तर तुझे नाव अब्राहाम होईल; मी तुला हे नाव देत आहे कारण तू अनेक राष्ट्रांचा पिता होशील. 6 मी तुला भरपूर संतती देईन; तुझ्यापासून नवीन राष्ट्रे उदयास येतील, आणि राजे उत्पन्न होतील. 7 आणि मी तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये एक करार करतो हा करार तुझ्या वंशजानांही पिढ्यानपिढ्या कायम लागू राहिल; मी तुझा व तुझ्या वंशजांचा देव होईन. 8 ज्या प्रदेशामधून तू जात आहेस तो म्हणजे कनान देश मी तुला व तुझ्या वंशजाला कायमचा देईन आणि मी तुमचा देव होईन.” 9 आणि देव अब्राहामाला पुढे म्हणाला, “आता ह्या करारतील तुझा भाग हा असा: तू व तुझ्या वंशजांनी पाळावयाचा माझा करार हा 10 की तुझ्या वंशजात जन्मलेल्या प्रत्येक पुरुषांची सुंता करुन घ्यावी. 11 तू हा करार पाळीत असल्याची खूण म्हणून आपली सुंता करुन घ्यावीस. 12 जन्मलेल लहान मुलगा आठ वर्षांचा होईल तेव्हा तू त्याची सुंता करावी; तुझ्या कुटुंबात जन्मलेल्या तसेच दुझ्या दासाच्या किंवा गुलामांच्या कुटुंबात जन्मलेल्या हरएक पुरुषाची सुंता करावी; 13 अशा रीतीने तुझ्या राष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक पुरुषांची सुंता करावी, मग तो तुझ्या कुटुंबातील असो किंवा विकत घेतलेल्या गुलामाच्या कुटुंबात जन्मलेला असो; तुझ्या व माझ्यामध्ये केलेला करार या खुणेवरुन कायम राहील; 14 ज्या कोणाची सुंता झाली नाही त्याला समाजातून बाहेर टाकावे; कारण त्याने माझा करार मोडला आहे.” 15 देव अब्राहामाला म्हणाला, “तुझी बायको साराय हिला मी नवीन नाव देतो, तिचे नाव सारा असे होईल. 16 मी तिला आशीर्वादीत करीन; मी तिला मुलगा देईन आणि तू बाप होशील. सारा अनेक राष्ट्रांची माता होईल राष्ट्रांचे राजे तिच्या पासून निपजतील.” 17 अब्राहामाने देवाला लवून नमन केले, परंतु स्वत:शीच हसून तो म्हणाला, “मी शंभर वर्षांचा आहे; मला मुलगा होणे शक्य नाहीं; आणि सारा नव्वद वर्षांची आहे; तिला मूल होऊ शकणार नाहीं.” 18 मग अब्राहाम देवाला म्हणाला, “इश्माएल जगेल व तुझी सेवा करील अशी मला आशा वाटते.” 19 देव म्हणाला, “नाही, मी सांगितले की तुझी बायको सारा हिला मुलगा होईल; त्याचे नाव तू इसहाक ठेव; मी त्याच्याशी करार करीन; तो करार त्याच्या वंशजांसाठी चिरंनतर असेल. 20 “तू मला इश्माएल विषयी विचारलेस ते मी ऐकले; मी त्याला आशीर्वाद देईन; त्याला भरपूर संतती होईल; बारा महान सरदारांचा तो पिता होईल; त्याचे कुटुंब म्हणजे एक मोठे राष्ट्र होईल; 21 पण मी इसहाका बरोबर माझा करार करीन, साराला मुलगा होईल तो इसहाक असेल; तो मुलगा पुढल्या वर्षी याचवेळी जन्मेल.” 22 देवाचे अब्राहामाशी बोलणे संपल्यावर देव अब्राहामाला सोडून वर (स्वर्गात) गेला, व अब्राहाम तेथे एकटाच राहीला; 23 तेव्हा अब्राहामाने आपला मुलगा इश्माएल व आपल्या घरी जन्मलेल्या गुलामांना व मोल देऊन विकत घेतलेल्या मुलानां एकत्र केले, आणि देवाने सांगितल्याप्रमाणेच त्याच्या घरातले सर्वपुरुष व मुलगे यांची त्याच दिवशी सुंता करण्यात आली. 24 अब्राहाम नव्याण्णव वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली; 25 आणि त्याचा मुलगा इश्माएल तेरा वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली. 26 सगळ्या गुलामांची एकाच दिवशी सुंता झाली; 27 आणि त्याच्या घरी जन्मलेले व त्याने विकत घेतलेले असे त्याच्या घरचे सगळे पुरुष यांचीही त्याच्या बरोबर सुंता झाली.

18:1 काही काळानंतर परमेश्वराने अब्राहामाला पुन्हा दर्शन दिले. अब्राहाम तेव्हा मम्रेच्या एलोन झाडांच्या राईत राहात होता. एके दिवशी भर दुपारी कडक उन्हाच्या वेळी अब्राहाम आपल्या तंबूच्या दाराशी बसला होता. 2 अब्राहामाने वर पाहिले तों आपल्या समोर तीन पुरुष उभे असलेले त्याला दिसले; त्यांना पाहून अब्राहाम धावत त्यांना सामोरा गेला आणि त्याने त्यांना लवून नमन केले; 3 अब्राहाम त्यांचे स्वागत करुन म्हणाला, “माझ्या स्वामीनों, मी जो आपला सेवक त्या माझ्या सोबत कृपा करुन काही वेळ राहा; 4 तुमचे पाय धुण्यासाठी मी पाणी घेऊन येतो; तुम्ही झाडा खाली सावलीत अमळ विसावा घ्या; 5 मी तुम्हासाठी थोडी भाकर आणतो; तुम्हाला पाहिजे तेवढे जेवा; मग पुढील प्रवास चालू करा.”ते तीन पुरुष म्हणाले, “बरं, हे तर ठीक आहे आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो.” 6 अब्राहाम लगेच घाईने पळत तंबूत गेला व साराला म्हणाला, “तिघांना तीन भाकरी पुरतील एवढे पीठ ताबडतोब मळ, त्याच्या भाकरी कर.” 7 नंतर अब्राहाम आपल्या गुरांच्या कळपाकडे पळत गेला, आणि त्यातून त्याने उत्तम कोवळे वासरु घेतले; ते दासाजवळ देऊन त्याने त्याला लवकर कापून जेवणासाठी रांधण्यास सांगितले; 8 अब्राहामाने त्या तीन पुरुषांना वासराचे शिजवलेले मांस, तसेच दूध व लोणी खाण्यासाठी त्यांच्यापुढे वाढले आणि त्यांचे जेवण संपेपर्यंत अब्राहाम राईत झाडाखाली त्यांच्या जवळ त्यांची सेवा करण्याकरीता उभा राहिला. 9 ते पुरुष अब्राहामाला म्हणाले, “तुझी बायको सारा कोठे आहे?”अब्राहाम म्हणाला, “ती तंबूत आहे.” 10 मग परमेश्वर म्हणाला, “मी पुढल्या वसंत ऋ तूत येईन त्या वेळी तुझी बायको सारा हिला मुलगा होईल.”सारा तंबूच्या तोंडाशी उभी राहून कान देत होती म्हणून या गोष्टी तिने ऐकल्या. 11 अब्राहाम व सारा वयाने फार म्हातारे झाले होते. साराचे मुले होण्याजोगे वय निघून गेले होते. 12 म्हणून साराने जे ऐकले त्यावर विश्वास ठेवला नाहीं. ती स्वत:शीच हसून म्हणाली, “मी म्हातारी झाली आहे, आणि माझा नवराही म्हातारा झाला आहे मी इतकी म्हातारी झाली आहे की आता मला मूल होणे शक्य नाही.” 13 तेव्हा परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, “सारा का हसली? मी आता म्हातारी झाली आहे म्हणून मला मुलगा होईल काय असे ती का म्हणाली. 14 परमेश्वराला काही अशक्य आहे का? येत्या वसंतऋ तूत सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येईन तेव्हा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल.” 15 परंतु सारा म्हणाली, “मी हसलेच नाही!” (ती असे म्हणाली कारण ती फार घाबरली होती.)परंतु परमेश्वर म्हणाला, “नाही, मला माहीत आहे की हे खरे नाहीं; तू नक्की हसलीसच.” 16 नंतर ते पुरुष उठले व सदोम नगराकडे वळून ते तिकडे जाण्यास निघाले; अब्राहाम त्यांना वाटेस लावण्यासाठी त्यांच्या बरोबर थोडा रस्ता चालून गेला. 17 परमेश्वर आपणा स्वत:शीच बोलला, “मी आता जे काही करणार आहे त्या विषयी अब्राहामाला सांगावे काय? 18 कारण अब्राहामापासून एक मोठे व शक्तीमान राष्ट्रे नक्की निर्माण होईल, आणि पृथ्वीवरील सगळी राष्ट्रे त्याच्यामुळे आशीर्वादित होतील. 19 मी अब्राहामाबरोबर एक विशेष करार केलेला आहे, तो यासाठी की त्याने आपल्या मुलांना व वंशजाना देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याची आज्ञा करावी आणि त्यांनी न्यायनीतीने चालावे; मग मी परमेश्वर त्याला मी दिलेल्या वचनाप्रमाणे जे द्यायचे ते देईन.” 20 मग परमेश्वर म्हणाला, “सदोम व गमोरा येथील लोक फार दुष्ट आहेत असे मी पुष्कळ वेळा ऐकले आहे. 21 म्हणून मी स्वत: प्रत्यक्ष जाऊन परिस्थीती पाहीन व मग त्यांची दुष्ट करणी ऐकल्याप्रमाणे खरोखर आहे की काय हे मला नक्की समजेल.” 22 मग ते पुरुष सदोमाकडे वळून चालू लागले, परंतु अब्राहाम परमेश्वरा पुढे तसाच उभा राहिला. 23 मग अब्राहामाने परमेश्वराजवळ जाऊन विचारले, “परमेश्वर तू दुष्ट लोकांचा नाश करताना चांगल्या लोकांचाही नाश करणार काय? 24 आणि जर कदाचित त्या नगरात पन्नास लोक चांगले व नीतिमान असतील तर? तरी ही त्या नगराचा तू नाश करणार काय? तू खात्री ने नगरात राहाणाऱ्या पन्नास नीतिमान लोकांसाठी नगराचा बचाव करशील. 25 तू नक्की नगराचा नाश करणार नाहीस; दुष्ट लोकांना मारण्यासाठी तू पन्नास नीतिमान लोकंना मारणार नाहीस; आणि जर तसे झाले तर मग चांगले व वाईट अशा लोकांची गत सारखीच होणार; त्या दोन्ही प्रकारच्या लोकांना शिक्षा होणार; तू सर्व पृथ्वीचा न्यायाधीश आहेस, तू योग्य तेच करशील हे मला माहीत आहे.” 26 नंतर परमेश्वर बोलला, “या सदोम शहरात मला पन्नास चांगले लोक आढळले तर त्यांच्यासाठी मी संपूर्ण शहराची गय करीन, व सर्व शहर वाचवीन.” 27 मग अब्राहाम म्हणाला, “हे प्रभु, तुझ्या तुलनेने मी केवळ धूळ व राख आहे, तरी तुला एक प्रश्न विचारु दे; 28 समजा कदाचित् जर पाच लोक कमी असतील म्हणजे फक्त पंचेचाळीसच चांगले लोक असतील तर? त्या पाच कमी असलेल्या लोकांकरिता तू सर्व नगराचा नाश करशील काय?”परमेश्वर म्हणाला, “मला पंचेचाळीस लोक चांगले आढळले तर मी नगराचा नाश करणार नाही.” 29 पुन्हा अब्राहाम परमेश्वराला म्हणाला, “आणि जर तेथे तुला चाळीसच चांगले लोक आढळले तर? संपूर्ण शहराचा तू नाश करशील काय?”परमेश्वर म्हणाला, “जर मला चाळीसच लोक चांगले आढळले तर मी शहराचा नाश करणार नाही.” 30 मग अब्राहाम म्हणाला, “प्रभु, कृपा करुन माझ्या बोलण्याचा तुला राग न यावा; मला आणखी विचारण्याची परवानगी असावी; तेथे फक्त तीसच लोक चांगले असतील तर? तू त्या नगराचा नाश करशील काय?”परमेश्वर म्हणाला, “जर तीस चांगले लोक असतील तर मी तसे करणार नाही.” 31 मग अब्राहाम म्हणाला, “प्रभु, थोडा त्रास देऊन पुन्हा विचारु का? समजा तेथे कदचित् वीसच लोक चांगले असतील तर?परमेश्वराने उत्तर दिले, “जर तेथे वीसच लोक चांगले असतील तर त्या वीसा करिता मी नगराचा नाश करणार नाही.” 32 अब्राहाम म्हणाला, “प्रभु, कृपा करुन माझ्यावर रागावू नकोस, परंतु शेवटी एकदाच थोडा त्रासदायक प्रश्न विचारण्यास परवानगी असावी, कदाचित् तुला तेथे दहाच लोक चांगले आढळले तर तू काय करशील?”परमेश्वर म्हणाला, “जर मला नगरात दहाच लोक चांगले आढळले तर त्या दहाकरिता मी नगराचा नाश करणार नाहीं.” 33 मग अब्राहामाशी बोलणे संपविल्यावर परमेश्वर निघून गेला आणि अब्राहाम आपल्या तंबूकडे परत गेला.

19:1 त्या दिवशी संध्याकाळी ते दोन देवदूत सदोम नगरात आले. नगराच्या वेशी जवळ बसलेल्या लोटाने त्यांस पाहिले; लोट उठून त्यांस सामोरा गेला आणि त्याने त्यांस आदराने लवून नमल केले. 2 लोट त्यांस म्हणाला, “माझे स्वामी महाराज, कृपया माझ्या घरी या; मला आपली सेवा करु द्या; तेथे तुम्ही आपले पाय धुवा, आजची रात्र रहा; मग उद्या तुमच्या पुढील प्रवासास निघा.”त्या देवदूतांनी उत्तर दिले, “नाही नाही, आम्ही रात्री वेशीजवळील चौकात मुक्काम करु.” 3 परंतु लोट त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करीतच राहिला; तेव्हा देवदूतांनी त्याची विनंती मान्य केली व ते त्याच्या घरी मुक्कामास गेले. लोट याने त्यास पिण्यास पाणी दिले, त्याने त्यांच्यासाठी भाकरी केल्या व ते जेवले. 4 त्या रात्री झोपण्याच्या वेळेपूर्वी त्या नगराच्या सर्व भागातून पुरुष तरुण आणि वृध्द असे सर्वच पुरुष लोटाच्या घरी आले; त्या सदोमकर पुरुषांनी लोटाच्या घराला गरडा घातला व त्यांनी लोटाला हाक मारत म्हटले. 5 “आज रात्री तुझ्या घरी आलेले ते दोन पुरुष (देवदूत) कोठे आहेत? त्यांना आमच्याकडे बाहेर आण; म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करु.” 6 लोट घरातून बाहेर आला व त्याने आपल्यामागे घराचे दार बंद केले. 7 लोट त्या सदोमकर लोकांना म्हणाला, “नाही, नाही, माझ्या बंधूनो! मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही असे भयंकर वाईट काम करु नका. 8 पाहा, माझ्या दोन मुली आहेत; त्यांचा अद्याप कोणाही पुरुषाशी संबंध आला नाही; त्या शुद्ध कुमारी आहेत; मी त्यांना तुमच्या स्वाधीन करतो. तुमच्या मर्जीस येईल तसे तुम्ही त्यांच्याशी वागा; परंतु ह्या पुरुषांना (देवदूतांना) काहीही करु नका; ते माझ्या घरी पाहुणे म्हणून आले आहेत आणि त्यांचे रक्षण करणे माझे प्रथम कर्तव्य आहे.” 9 तेव्हा सभोंवतालचे घेरा टाकलेले लोक म्हणाले, “चल हो बाजूला.” नंतर ते आपापसात म्हणू लागले, “हा लोट आमच्या नगरात पाहुणा म्हणून आला आणि आता आम्ही काय करावे हे हा उपरा आम्हाला शिकवू पाहतो काय?” मग ते लोक लोटाला म्हणाले, “अरे, आम्ही त्या पाहुण्यांशी जेवढे दुष्टपणे वागूं त्यापेक्षा अधिक दुष्टतेने व वाईट रीतीने तुझ्याशी वागू, समजलास!” तेव्हा ते लोक लोटाच्या अधिक जवळ जवळ येऊ लागले व घराचा दरवाजा तोडण्यास ते पुढे सरसावले. 10 परंतु लोटाच्या घरातील त्या दोन पाहुण्यांनी दार उघडले व लोटाला मागे ओढून घरात घेतले, आणि दार बंद केले. 11 त्या दोन पुरुषांनी दारा बाहेरील लोकांस आंधळे केले; म्हणून घरात घुसण्याचा प्रयत्न करणारे ते सर्व तरुण व म्हातारे आंधळे झाले, त्यामुळे अखेर पर्यंत त्यांना घराचे दार सापडलेच नाहीं. 12 ते दोन पुरुष लोटाला म्हणाले, “तुझ्या कुटुंबातील व नात्यातील इतर कोणी लोक म्हणजे तुझे जांवई, मुलगे, मुली किवां इतर नातेवाईक या नगरात आहेत काय? तसे कोणी असतील तर त्यांना आता ताबडतोब हे शहर सोडून बाहेर पडण्यास सांग; 13 कारण आम्ही या नगराचा नाश करणार आहोत. हे नगर किती वाईट आहे ते परमेश्वराने ऐकले आहे आणि म्हणून त्याने आम्हाला या नगराचा नाश करण्यासाठी पाठवले आहे.” 14 म्हणून मग लोट बाहेर गेला व आपल्या जावयांस भेटला. तो त्यांना म्हणाला, “चला उठा, त्वरा करा, व हे शहर सोडून लवकर बाहेर पडा; कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे.” परंतु लोट गंमत करीत आहे असे त्याच्या जावयांस वाटले. 15 दुसऱ्या दिवशी पहाटे ते दूत लोटाला घाईकरुन म्हणालें, “उठ, ह्या नगराला ताडण होणार आहे; तेव्हा तू तुझी बायको व तुझ्या जवळ असलेल्या तुझ्या दोन मुली यांस घेऊन ताबडतोब येथून नीघ; म्हणजे मग या नगराबरोबर तुमचा नाश होणार नाही, तर तुम्ही आपले जीव वाचवाल.” 16 परंतु लोट एकदम गोंधळून गेला व दिरंगाई करु लागला; तेव्हा त्या दोन पुरुषांनी (देवदूतांनी) लोट, त्याची बायको आणि त्याच्या दोन मुली यांचे हात धरुन त्यांस सुरक्षितपणे नगराबाहेर नेले. परमेश्वराने अशा रीतीने लोट व त्याच्या कुटुंबियावर दया केली. 17 नगराबाहेर आल्यावर त्या देवदूतापैकी एक जण म्हणाला, “आता पळा व तुमचे जीव वांचवा, नगराकडे मागे वळून पाहू नका आणि या खोऱ्यात कोणत्याही ठिकाणी थांबू नका; पर्वतावर जाईपर्यंत पळत राहा जर का मधे कोठे थांबला, तर नगराबरोबर तुमचाही नाश होईल.” 18 परंतु लोट त्या दोन देवदूतांना म्हणाला, “प्रभू! इतके दूर पळत जाण्याची माझ्यावर सक्ती करु नका, 19 मी तर तुमच्या दासासारखा आहे; पण मला वांचविण्यासाठी तुम्ही माझ्यावर खूप दया केली आहे. मी डोंगरापर्यंत पळत जाऊ शकणार नाहीं; जर मी अगदी सावकाश पळू लागलो तर काहीतरी विपरीत व वाईट घडेल व मी मरुन जाईन. 20 परंतु पाहा, येथे जवळच फार लहान गांव आहे; तेथे जाण्याची मला परवानगी असावी, त्या गावापर्यंत पळत जाऊन मी सुरक्षित राहू शकतो.” 21 तेव्हा देवदूत लोटाला म्हणाला, “ठीक आहे, मी तसेही करण्यास तुला परवानगी देतो; मी त्या नगराचा नाश करणार नाही; 22 पण तेथे लवकर पळत जा. तू तेथे सुरक्षितपणे जाऊन पोहोंचेपर्यंत मला सदोम नगराचा नाश करता येणार नाही.” (लहान असल्यामुळे त्या गांवाला तेव्हापासून सोअर असे नाव पडले.) 23 लोट सोअर गांवात पाऊल टाकीत असताना सकाळ झाली व सूर्य तेजाने प्रकाशू लागला, 24 आणि परमेश्वराने सदोम व गमोरा या नगरांचा नाश करायला सुरुवात केली; त्याने आकाशातून त्या नगरावर गंधक व अग्नी यांचा वर्षाव केला; 25 अशा रीतीने परमेवराने सदोम व गमोरा या नगरांचा तसेच त्या सगळ्या खोऱ्याचा म्हणजे त्या तळवटीत राहाणाऱ्या सगळ्या माणसांचा, पशूंचा व वनस्पतींचा नाश केला. 26 लोट व त्याचे कुटुंबीय नगरातून पळून जात असताना लोटाच्या बायकोने मागे वळून जळणाऱ्या नगराकडे पाहिले तेव्हा तत्काळ ती मिठाचा खांब झाली. 27 त्याच दिवशी पहाटे अब्राहाम उठला आणि आदल्या दिवशी तो परमेश्वरासमोर ज्या ठिकाणी उभा राहिला होता तेथे गेला. 28 त्याने तेथून सदोम व गमोरा नगराकडे व संबंध खोऱ्यातील तळवटीच्या प्रदेशाकडे नजर टाकली तेव्हा तो अवघा प्रदेश म्हणजे भल्यामोठ्या अग्नीच्या ज्वालांनी व धुराच्या लोटांनी भरलेला त्याला दिसला. 29 देवाने त्या खोऱ्यातील नगरांचा अशा रीतीने नाश केला परंतु तो करीत असताना, अब्राहामाने त्याला विचारलेल्या गोष्टींची त्याने आठवण ठेवली; लोट (अब्राहामचा पुतण्या) दरीतील नगरांत राहात होता. पण नगरांचा नाश करण्यापूर्वी देवाने लोटाला तेथून दूर पाठवून दिले होते. 30 या नंतर अधिक काळ सोअरात राहण्यास लोटाला भीती वाटली; तेव्हा तो त्याच्या मुलींना घेऊन डोंगरात एका गुहेत जाऊन राहिला. 31 एके दिवशी वडील मुलगी धाकटीला म्हणाली, “पृथ्वीवर जिकडे तिकडे स्री पुरुष लग्न करुन राहतात, आपले वडील म्हातारे होत राहिले आहेत; आणि या भागात आपल्याबरोबर लग्न करण्यास एकही पुरुष नाही; 32 तर आता आपणाला मुले होण्याकरिता आपण आपल्या वडिलांचा उपयोग करु, तेव्हा आपण आपल्या वडिलाकडे जाऊन त्यांना भरपूर द्राक्षमद्य पाजू आणि मग त्यांच्यापाशी निजू म्हणजे मग त्यामुळे आपला वंश चालू राहील.” 33 त्याच रात्री त्या दोघी मुली वडिलांकडे गेल्या आणि त्यांना त्यानी द्राक्षमद्य पाजले; नंतर वडील मुलगी आपल्या वडिलांच्या बिछान्यात गेली व त्यांच्याजवळ निजली; पण द्राक्षमद्याच्या नशेमुळे ती आपल्याजवळ निजली हे लोटाला कळले नाही. 34 दुसऱ्या दिवशी वडील बहीण धाकट्या बहिणीला म्हणाली, “मी काल रात्री आपल्या वडिलाजवळ निजले, तर आज रात्री पुन्हा आपण वडिलांना द्राक्षमद्य पाजू या, मग रात्री तू वडिलांच्या बिछान्यात जाऊन त्याच्याजवळ नीज. अशा प्रकारे आपण त्याना मुले होऊ देऊ व आपल्या वडिलांचा वंश चालविण्यास त्यांचा उपयोग करु.” 35 तेव्हा त्या रात्री त्या दोन मुलींनी आपल्या वडिलानां द्राक्षमद्य पाजला; नंतर धाकटी मुलगी आपल्या वडिलांच्या बिछान्यात गेली व त्यांच्याजवळ निजली; यावेळी ही नशेमुळे आपली मुलगी आपल्याजवळ निजली हे लोटाला समजले नाहीं. 36 अशा रीतीने लोटाच्या दोन्हीही मुली गरोदर राहिल्या. त्यांचे वडीलच त्यांच्या बांळांचे वडील होते. 37 थोरल्या मुलीला मुलगा झाला, तेव्हा तिने त्याचे नाव मवाब ठेवले; आजतागायत राहात असलेल्या मवाबी लोकांचा हा मूळ पुरुष, 38 धाकट्या मुलीलाही मुलगा झाला; तिने त्याचे नाव बेनअम्मी असे ठेवले; आजमितीला जे अम्मोनी लोक आहेत त्यांचा हा मूळ पुरुष.

20:1 अब्राहामाने ते ठिकाण सोडले व तो नेगेबकडे म्हणजे यहूदा प्रांताच्या दक्षिणेकडील वाळवंटाच्या भागाकडे प्रवास करीत गेला, आणि कादेश व शूर यांच्या दरम्यान असलेल्या गरार नगरात त्याने वस्ती केली; गरारात असताना 2 अब्राहामाने सारा आपली बहीण असल्याचे लोकांना सांगितले. गराराचा राजा अबीमलेख याने हे ऐकले. त्याला सारा हवी होती म्हणून त्याने काही माणसे पाठवून तिला राजवाड्यात आणले. 3 परंतु रात्री देव अबीमलेखाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “तू आता नक्की मरशील कारण तू आणलेली स्त्री विवाहित आहे.” 4 अबीमलेखाने अद्याप साराला स्पर्श केला नव्हता. तेव्हा अबीमलेख म्हणाला, “प्रभु, मी दोषी नाही, मग एका निरपराध माणसाला तू मारुन टाकणार काय? 5 कारण अब्राहामाने स्वत: मला सांगितले की, ‘ही स्त्री माझी बहीण आहे,’ आणि त्या स्त्रीने ही सांगितले की, ‘हा माझा भाऊ आहे,’ तेव्हा मी निरपराधी आहे; मी काय करीत होतो हे मला कळले नाही.” 6 मग देव अबीमलेखाला स्वप्नात म्हणाला, “होय! मला माहीत की तू निरपराधी आहेस आणि तसेच तू काय करत होता हे तुला कळले नाहीं; म्हणूनच मी तुला वाचविले आणि माझ्या विरुद्ध तू पाप करु नयेस म्हणून मी तुला आवरले; आणि मीच तुला साराला स्पर्श करु दिला नाही. 7 तेव्हा आता तू अब्राहामाची बायको त्याची त्याला परत दे; अब्राहाम माझ्या वतीने बोलणारा संदेष्टा आहे; तो तुझ्यासाठी प्रार्थना करील व तू वाचशील; परंतु तू सारेला अब्राहामाकडे परत पाठवले नाहीस तर मग मी सांगतो की तू आणि तुझ्या बरोबर तुझे सर्व कुटुंबीय खात्रीने मराल.” 8 दुसऱ्या दिवशी पहाटे अबीमलेखाने आपल्या सर्व सेवकांना बोलावून त्याने स्वप्नात पाहिलेल्या सर्वगोष्टी त्यांना सांगितल्या; ते सर्वजण फार घाबरले. 9 मग अबीमलेखाने अब्राहामास बोलावून आणले व म्हटले, “तू हे असे आम्हाला का केलेस? मी तुझे काय वाईट केले? मी तुझ्याविरुद्व काय गैर वागलो? तू असे खोटे का बोललास की ती तुझी बहीण आहे? तू माझ्या राज्यावर मोठे संकट आणलेस; तू माझ्याशी अशा गोष्टी करायच्या नव्हत्या. 10 तुला कशाची भीती वाटली? अशा रीतीने तू माझ्याशी का वागलास?” 11 मग अब्राहाम म्हणाला, “मला भीती वाटली येथील कोणीही लोक देवाचे भय धरीत नाहीत असे मला वाटले आणि म्हणून माझी बायको सारा मिळविण्यासाठी कोणीही मला ठार मारील असे मला वाटले. 12 ती माझी बायको आहे हे खरे आहे, तरी पण ती माझी नात्याने बहीण लागते हे ही तितकेच खरे आहे; कारण ती माझ्या बापाची मुलगी आहे पण माझ्या आईची ती मुलगी नाही. 13 देवाने मला माझ्या बापाच्या घरापासून दूर नेले आणि बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी भटकायला लावले; आणि असे झाले तेव्हा मी साराला सांगितले, ‘माझ्यासाठी एवढे कर की आपण जिकडे जाऊ तिकडे तू माझी बहीण आहेस असे लोकांना सांग.”‘ 14 हे समजल्यावर अबीमलेखाने अब्राहामाला सारा परत दिली; तसेच त्याने त्याला मेंढरे, बैल व दास दासीही दिल्या. 15 अबीमलेख म्हणाला, “तुझ्या अवती भोवती चौफेर नजर टाक; हा सर्व माझा देश आहे; तुला पाहिजे तेथे तू राहा.” 16 अबीमलेख सारेला म्हणाला, “तुझा भाऊ अब्राहाम याला मी एक हजार चांदीची नाणी दिली आहेत; यासाठी की तेणेकडून, ह्या ज्या गोष्टी घडल्या त्या सर्वाबद्दल मला दु:ख होत आहे, हे इतरास समजावे आणि माझा न्यायीपणा व निरपरधीपणा व तुझी शुद्धता सर्व लोकांना कळावीत.” 17 परमेश्वराने अबीमलेखाच्या कुटुंबातील सर्व स्त्रियांची गर्भाशये त्यांना मुले होऊ नयेत म्हणून बंद केली होती; देवाने हे केले कारण अबीमलेखाने अब्राहामाची बायको सारा हिला त्याच्या घरी नेले होते; परंतु अब्राहामाने देवाची प्रार्थना केली आणि देवाने अबीमलेख, त्याची बायको आणि त्याच्या दासी यांना मुले न होण्याच्या दोषापासून बरे केले. 18

21:1 परमेश्वराने साराला दिलेले वचन पाळले व पूर्ण केले. 2 सारा गरोदर राहिली आणि अब्राहामाच्या म्हातारपणी तिने त्याला मुलगा दिला. ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे अगदी जशाच्या तशाच घडून आल्या. 3 अब्राहामापासून साराला मुलगा झाला आणि त्याने त्याचे नाव इसहाक ठेवले. 4 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राहामाने इसहाक आठ दिवसांचा झाल्यावर त्याची सुंता केली. 5 इसहाक जन्मला तेव्हा अब्राहाम शंभर वर्षांचा होता. 6 आणि सारा म्हणाली, “परमेश्वर देवाने मला हास्य म्हणजे आनंदीआनंद दिला आहे. ज्या कोणाला हे समजेल त्या प्रत्येकाला माइयाबरोबर आनंद होईल. 7 मला आता ह्या वयात अब्राहामापासून मूल होईल असे कोणाला वाटले असते काय? परंतु अब्राहाम म्हातारा झाला असताना देखील मी त्यास मुलगा दिला आहे.” 8 इसहाक वाढत राहिला, तो दुधाऐवजी जेवण घेण्याइतक्या वयाचा झाला तेव्हा त्याचे दूध तोडण्याच्या प्रसंगी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली. 9 ह्याच्या आधी साराची मिसर देशाची दासी हागार हिने अब्राहामापासून एका मुलाला जन्म दिला होता; अब्राहाम त्याचाही बाप होता. परंतु आता साराने पाहिले की तो आधीचा मुलगा इसहाकाला चिडवत होता. 10 तेव्हा सारा अब्राहामाला म्हणाली, “त्या दासीला व तिच्या मुलाला येथून बाहेर घालवून द्या; आपल्या मरणानंतर आपल्या मालमत्तेचा वारस इसहाक होईल; या दासीचा मुलगा इसहाकाबरोबर आपल्या मालमत्तेचा वाटेकरी व तुमचा वारस होणार नाही.” 11 ह्या गोष्टीमुळे अब्राहामाला वाईट वाटले व त्याला इश्माएलाची चिंता वाटू लागली; 12 परंतु देव अब्राहामाला म्हणाला, “त्या मुलाबद्दल बिलकूल चिंता करु नकोस, तसेच त्या दासीचीही चिंता करु नकोस. साराच्या इच्छेप्रमाणे कर. इसहाकच तुझा एकटाच वारस होईल. 13 परंतु मी त्या दासीच्या मुलालाही आशीर्वाद देईन; तो तुझा मुलगा आहे म्हणून त्याच्या कुटुंबांपासूनही मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन.” 14 दुसऱ्या दिवशी सकाळी अब्राहामाने भाकरी व पाण्याची पिशवी आणून हागारेला दिली; ती शिदोरी व आपला मुलगा घेऊन हागार तेथून निघाली आणि अब्राहामाने तिची रवानगी केली; हागार तेथून निघून बैर - शेबाच्या वाळवंटात भटकत राहिली. 15 काही वेळाने पिशवीतील सर्व पाणी संपले, एक थेंबही पिण्यासाठी राहिला नाही; तेव्हा हागारेने आपल्या मुलाला एका झुडपाखाली ठेवले; 16 आणि तेथून काही अंतर ती चालून गेली व थांबून तेथे बसली. आपला मुलगा पाण्यावाचून मरेल असे तिला वाटले; त्याचा मृत्यू आपल्याला पाहवणार नाही असे समजून ती तेथे दूर अंतरावर बसली, व हंबरडा फोडून रडू लागली. 17 देवाने मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला; आणि देवाचा दूत स्वर्गातून हागारेला हाक मारुन म्हणाला, “हागारे, तुला काय झाले? भिऊ नकोस; तुझ्या मुलाचे रडणे परमेश्वराने ऐकले आहे 18 ऊठ मुलाला उचलून घे; त्याचा हात धर व त्याला घेऊन पुढे चल; मी त्याच्या पासून एक मोठे राष्ट्र निर्माण करीन.” 19 मग देवाने हागारेला पाण्याची विहीर दिसू दिली. तेव्हा हागार त्या विहिरीपाशी गेली आणि तिने मसक पाण्याने भरली, नंतर आपल्या तहानलेल्या मुलाला तिने पाणी पाजिले. 20 तो मुलगा वाढत असताना देव सतत त्याच्याबरोबर राहिला; इश्माएल वाळवंटात लहानाचा मोठा होऊन शिकारी झाला; तो धनुष्यबाण मारावयास शिकला व तरबेज तिरंदाज झाला; 21 नंतर त्याच्या आईने त्याला मिसर देशातील मुलगी बायको करुन दिली. ते पारानच्या वाळवंटात राहिले. 22 त्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापति पीकोल यांनी अब्राहामाशी बोलणी केली; ते अब्राहामास म्हणाले, “तू जे काही करतोस त्यात देव तुझ्याबरोबर असतो; 23 तेव्हा आता देवासमोर येथे मला वचन दे की तू माझ्याशी व माझ्यामागे माझ्या संतानाशी न्यायनीतीने वागशील असा माझ्याशी करार कर; तू माझ्याशी व ज्या ह्या माझ्या देशात तू राहिलास त्या देशाशी दयाळूपणे राहशील, असे वचन दे, तसेच मी जसा तुझ्याशी दयाळूपणाने वागलो तसाच तूही माझ्याशी दयाळूपणाने राहशील असे वचन तू मला दे, व असा करार तू माझ्याशी कर.” 24 आणि अब्राहाम म्हणाला, “मी असे वचन देतो की जसा तू माझ्याशी दयाळूपणे वागलास तसाच मी ही तुझ्याशी वागेन.” 25 मग अबीमलेखाच्या सेवकांनी पाण्याची विहीर बळकावली म्हणून अब्राहामाने अबीमलेखाकडे तक्रार केली. 26 परंतु अबीमलेख म्हणाला, “असे कोणी केले आहे ते मला माहीत नाही. ह्या पूर्वी तू हे मला कधीही सांगितले नाहीस” 27 अशा रीतीने अब्राहाम व अबीमलेख यांनी आपसात करार केला. अब्राहामाने अबीमलेखाला काही मेंढरे व बैल, कराराचा पुरावा म्हणून दिले; 28 अब्राहामाने अबीमलेखा पुढे मेंढ्याच्या सात माद्या ठेवल्या. 29 अबीमलेखाने अब्राहामाला विचारले, “या सात मेंढ्या तू अशा बाजूला का काढल्यास?” 30 अब्राहामाने उत्तर दिले, “जेव्हा तू ह्या मेंढया माझ्याकडून स्वीकारशील तेव्हा ही विहीर मी खाणली असा तो पुरावा होईल.” 31 तेव्हा त्यानंतर त्या विहिरीला बैर - शेबा असे नाव पडले, कारण त्या ठिकाणी अब्राहाम व अबीमलेख यांनी एकमेकांना वचन देऊन करार केला. 32 त्यांनी बैर शेबा येथे करार केल्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पलिष्ट्यांच्या देशात परत गेले. 33 अब्राहामाने बैर - शेबा येथे एक विशेष प्रकारचे झाड लावले, आणि त्याच जागी, जो निरंतर राहतो अशा परमेश्वराची प्रार्थना केली; आणि तो बराच काळ पलिष्ट्यांच्या देशात राहिला. 34

22:1 या गोष्टी घडल्यानंतर देवाने अब्राहामाच्या विश्वासाची कसोटी घेण्याचे ठरवले. देवाने अब्राहामाला हाक मारली, “अब्राहाम”,आणि अब्राहाम म्हणाला, “मी येथे आहे” 2 देव म्हणाला, “तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसहाक याला घेऊन तू मोरिया देशात जा आणि तेथे, मी सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमार्पण कर.” 3 तेव्हा अब्राहाम पहाटेस उठला, त्याने खोगीर घालून आपले गाढव तयार केले; इसहाकाला व दोन सेवकांना आपल्या बरोबर घेतले तसेच होमार्पणाकरिता लाकडे घेतली आणि मग ते सर्व देवाने सांगितलेल्या ठिकाणी गेले. 4 तीन दिवस प्रवास केल्यानंतर अब्राहामाने वर पाहिले तेव्हा काही अंतरावर त्याला जेथे जायचे होते ते ठिकाण दिसले. 5 मग अब्राहाम आपल्या सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवा जवळ थांबा; मी माझ्या मुलाला घेऊन त्या समोरच्या जागी जातो, व देवाची उपासना करुन आम्ही माघारी येतो.” 6 अब्राहामाने लाकडे घेऊन मुल्याच्या खांद्यावर ठेवली; एक खास सुरा (बळी देण्याकरिता) आणि विस्तव घेतला. मग तो व त्याचा मुलगा असे दोघे जण देवाची उपासना करण्यासाठी होमार्पणाच्या जागेकडे संगती निघाले. 7 इसहाकाने आपल्या बापास हाक मारली, “बाबा!”अब्राहामाने उत्तर दिले, “काय माझ्या प्रिय मुला?”इसहाक म्हणाला, “मला लाकडे व विस्तव दिसतात, परंतु होमार्पणासाठी कोंकरु? ते कोठे आहे?” 8 अब्राहामाने उत्तर दिले, “माझ्या लाडक्या बाळा, होमार्पणासाठी लागणारे कोंकरु देव आपल्याला योग्यवेळी देईल.”तेव्हा अब्राहाम व त्याचा मुलगा संगती निघाले 9 व देवाने सांगिलेल्या ठिकाणी ते जाऊन पोहोंचले, तेथे अब्राहामाने एक वेदी बांधली, त्याने वेदीवर लाकडे रचली; नंतर त्याने आपला पुत्र इसहाक याला बांधून वेदीवरील लाकडावर ठेवले; 10 मग अब्राहामाने आपल्या मुलाचा बळी देण्यासाठी हातातील सुरा उंचावला. 11 परंतु तेवढ्यात, त्याच क्षणाला परमेश्वराच्या दूताने त्याला थांबवले; तो स्वर्गातून ओरडून त्याला म्हणाला,“अब्राहामा! अब्राहामा!”अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.” 12 देवदूत म्हणाला, “तू आपल्या मुलाला मारु नकोस, किंवा त्याला कोणत्याही प्रकारची इजा करु नकोस; कारण आता मला खात्रीने समजले की तू देवाला घाबरतोस आणि त्याचा आदर करतोस; कारण तू माझ्यासाठी आपल्या एकुलत्या एका लाडक्या पुत्रालाही, अर्पण करावयास मागेपुढे न पाहता तयार झालास.” 13 आणि मग अब्राहामाने वर दृष्टि करुन सभोंवार पाहिले तेव्हा त्याला एका झुडपात शिंगे अडकलेला एक एडका दिसला; मग त्याने जाऊन तो घेतला व परमेश्वराला होमार्पणासाठी त्याचा बळी दिला. अशा रीतीने अब्राहामाचा मुलगा इसहाक वांचला. 14 तेव्हा अब्राहामाने त्या जागेला, “याव्हे यिरे” असे नाव दिले; आणि आजवर देखील, “या डोंगरावर परमेश्वर दिसू शकतो असे लोक बोलतात.” 15 नंतर स्वर्गातून परमेश्वराच्या दूताने अब्राहामास दुसऱ्यांदा हाक मारली. 16 तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो की तू माझ्यासाठी तुझ्या एकुलत्या एका लाडक्या मुलाचा बळी द्यावयांस मागे पुढे न पाहता तयार झालास म्हणून मी परमेश्वर स्वत:ची शपथ घेऊन तुला वचन देती की 17 मी खरोखर तुला आशीर्वाद देईन व तुझी वाढ करीन; मी तुला असंख्य वंशज देईन; तुझी संतती आकाशातील ताऱ्याइतकी, समुद्रकिनाऱ्यावरील वाळू इतकी होईल असे मी करीन; आणि तुझी संतनी आपल्या सर्व शत्रुंचा पराभव करुन त्यांना जिंकेल. 18 पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्र तुझ्या वंशजाद्वारे आशीर्वाद पावेल; तू माझ्या सर्व आज्ञा पाळल्यास म्हणून मी हे करीन.” 19 मग अब्राहाम आपल्या सेवकाकडे मागे आला आणि अब्राहाम, इसहाक व त्याचे सेवक असे सर्व मिळून प्रवास करीत मागे बैरशेबाला गेले; आणि अब्राहामाने बैर - शेबा येथे वस्ती केली. 20 या सर्व गोष्टी घडल्यानंतर अब्राहामाला असा निरोप आला, “पाहा तुझा भाऊ नाहोर व त्याची बायको मिल्का यांनाही आता मुले झाली आहेतच. 21 त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव ऊस, दुसऱ्याचे बूज, तिसऱ्याचे कमुवेल - हा आरामाचा बाप; 22 त्यानंतर केसेद, हजो, पिलदाश, यिदलाप आणि बथुवेल अशी त्यांची नावे आहेत” 23 बथुवेल रिबकाचा बाप होता. अब्राहामाचा भाऊ नाहोर याजपासून मिल्केला हे आठ मुलगे झाले; 24 आणि त्याची स्त्रीगुलाम रेऊमा हिलाही त्याच्या पासून तेबाह, गहाम, लहश व माका हे चार मुलगे झाले.

23:1 सारा एकशें सत्तावीस वर्षे जगली; 2 ती कनान देशातील किर्याथ - आरबा (म्हणजे होब्रोन) येथे मरण पावली; तेव्हा अब्राहाम फार दु:खी झाला व त्याने तिच्यासाठी रडून खूप शोक केला. 3 मग अब्राहाम आपल्या मृत बायको जवळून उठला व तो हेथी लोकांस भेटण्यास गेला. तो म्हणाला, 4 “मी या देशाचा रहिवासी नाही, तर परदेशी आहे; म्हणून माझ्या बायकोला पुरण्यासाठी मला जागा नाही; तेव्हा मला जागेची गरज आहे, ती मला द्या.” 5 ते हेथी लोक अब्राहामाला म्हणाले, 6 “स्वामी, परमेश्वराच्या महान नेत्यांपैकी आपण एक आम्हामध्ये आहा; आम्हाकडे असलेल्या जागांपैकी चांगल्यातली चांगली जागा आपल्या मयतासाठी आपण घेऊ शकता; आमच्या कफनाच्या जागांपैकी तुम्हाला हवी ती जागा तुम्ही घेऊ शकता. अशा ठिकाणी आपल्या पत्नीला पुरण्यास आम्ही कोणीही मना करणार नाही.” 7 अब्राहाम उठला व अदबीने त्या लोकांना नमन करुन म्हणाला, 8 “तुम्हाला जर माझ्या मयत बायकोला पुरण्यासाठी खरोखर मला मदत करावी असे वाटत असेल तर मग माझ्यातर्फे सोहराचा मुलगा एफ्रर्न याच्याकडे शब्द टाका; 9 त्याच्या मालकीच्या शेताच्या एका टोकाला असलेली मकपेला येथील गुहा विकत घेणे मला आवडेल; मी तिची पुरेपूर किंमत त्याला देतो, व ती माझ्या मालकीची स्मशानभुमि म्हणून विकत घेतो; त्या बद्दल तुम्ही सर्वजण साक्षी असावे.” 10 त्या वेळी तेथे एफ्रोन हित्ती हा हेथी लोकान बसलेला होता; तो त्या सर्वांच्या देखत अब्राहामाला म्हणाला, 11 “नाही, नाही! माझे स्वामी, मी पैसे घेणार नाही; येथे माझ्या लोकांसमक्ष ते शेत व ती गुहा मी तुम्हाला देतो; तुम्ही तुमच्या बायकोला तेथे पुरा.” 12 मग अब्राहामाने हेथी लोकांस नमन केले; 13 अब्राहाम सर्व लोकांसमक्ष एफ्रोनास म्हणाला, “परंतु मला त्या शेताची पूर्ण किंमत तुला देऊन ते विकत घ्यायचे आहे; त्याचे पैसे माझ्याकडून घे आणि मग मी आपल्या मयतास तेथे मूठमाती देईन.” 14 एफ्रोनाने अब्राहामास उत्तर दिले, 15 “माझे स्वामी, माझे जरा ऐका; जमिनीची किंमत 10 पौंडचांदी आहे ही किंमत तुम्हाला व मला म्हणजे काय मोठे? तेव्हा त्यापेक्षा सरळ माझे शेत ताब्यात घ्या व तेथे तुमच्या बायकोला मूठमाती द्या.” 16 अब्राहामाने ही किंमतच असल्याचे समजून घेतले व त्याने एफ्रोनला त्यांच्या पद्धतीप्रमाणे चांदीची दहा नाणी (म्हणजे चारशे शेकेल भार रुप्याची नाणी) तोलून दिली. 17 या प्रमाणे मम्रेच्या पूर्वेला असलेले मकपेला येथील शेत, गुहा व त्यातील सर्व झाडी यांवरील एफ्रोनाचा मालकी हक्क बदलून तो अब्राहामाला मिळाला; 18 एफ्रोन व अब्राहाम यांच्यामध्ये ही मालकी हक्काची अदलाबदल नगरातील सर्व लोकांसमक्ष झाली; 19 त्यानंतर मम्रे (म्हणजे कनान देशातील हेब्रोन) जवळील त्या शेतातील गुहेत अब्राहामाने आपली बायको सारा हिला पुरले. याप्रमाणे ते शेत, गुहा इत्यादि हित्तीकडून विकत घेतल्यामुळे ती 20 अब्राहामाची मालमत्ता झाली आणि त्याने त्या जागेचा आपल्या मयतासाठी स्मशानभूमि म्हणून उपयोग केला.

24:1 अब्राहाम आता फार म्हातारा झाला होता; परमेश्वराने अब्राहामाला व त्याने जे जे केले त्या सर्व गोष्टीना आशीर्वादित केले होते. 2 अब्राहामाचा सर्वात म्हातारा सेवक होता; तो त्याच्या सर्व मालमत्तेचा व घरदाराचा कारभार पाहणारा मुख्य कारभारी होता. एकदा अब्राहामाने त्याला बोलावून म्हटले, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव 3 आणि आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ता परमेश्वर याजसमोर मला वचन दे की माझा मुलगा इसहाक याला तू कनान देशातील कोणत्याच मुलीबरोबर लग्न करु देणार नाहीस; आपण या कनान देशात राहतो हे खरे परंतु या देशातील कोणत्याच मुलीबरोबर त्याला लग्न करु देणार नाहीस. 4 माझ्या देशाला, माझ्या लोकांकडे जा आणि तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी नवरी शोधून तिला येथे आण.” 5 त्याचा सेवक त्याला म्हणाला, “यदा कदाचित ती स्त्री माझ्याबरोबर या देशात येण्यास तयार होणार नाही, तर मग माझ्याबरोबर तुमच्या मुलास ज्या देशातून तुम्ही आला त्या देशात घेऊन जाऊ काय?” 6 अब्राहाम त्याला बजावून म्हणाला, “नाही, नाही, माझ्या मुलास त्या देशाला घेऊन जाऊ नकोस. 7 स्वर्गाच्या ज्या परमेश्वराने मला माझ्या बापाच्या घरातून व आमच्या वंशजांच्या जन्मभूमीतून काढून वचन देऊन येथे आणले व ही येथील नवीन भूमी मला व माझ्या वंशजास वतन म्हणून दिली तो परमेश्वर तू तेथे जाऊन पोहोंचण्यापूर्वी त्याचा दूत पाठवील आणि तू तेथून माझ्या मुलाकरीता नवरी आणशील. 8 परंतु ती मुलगी तुझ्याबरोबर येथे येण्यास कबूल झाली नाही तर मग तू माझ्या शपथेतून मोकळा होशील; परंतु काहीही झाले तरी माझ्या मुलाला तिकडे बिलकूल घेऊन जाऊ नकोस. 9 तेव्हा त्याच्या सेवकाने आपल्या धन्याच्या मांडीखाली हात ठेवून तशी शपथ घेतली. 10 अब्राहामाचे दहा उंट घेऊन त्याचा सेवक निघाला; त्याने आपल्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर व मोलवान वस्तू देणग्या देण्यासाठी घेतल्या; तो अराम - नहाराईम मेसोपोटेमीयातील (म्हणजे मसोपटेम्या) नाहोर राहात असलेल्या नगरात गेला. 11 तो सेवक नगराबाहेरच्या विहिरीजवळ गेला संध्याकाळी पाणी नेण्यासाठी बायका तेथे येत असत. त्याने उटांना विसावा घेण्यासाठी तेथे बसवले. 12 सेवक म्हणाला, “हे परमेश्वर देवा, तू माझा स्वामी अब्राहाम याचा परमेश्वर आहेस,; आजच त्याच्या मुलासाठी मला मुलगी सापडावी असे कर; कृपया, माझा मालक अब्राहाम ह्याच्यावर एवढी दया कर. 13 मी येथे या विहिरीजवळ उभा राहात आहे. 14 मी तर इसहाकासाठी योग्य मुलगी निवडण्याकरिता काही विशेष खुणेचा शोध करीत आहे; तर असे घडू दे, की मी ज्या मुलीस म्हणेन, ‘मुली तुझी पाण्याची घागर उतरुन मला प्यायला पाणी दे,’ आणि ती जर असे म्हणेल, ‘प्या बाबा, आणि मी तुमच्या उंटांसही पाणी पाजते;’ जर असे घडून येईल तर मग तीच इसहाकासाठी योग्य नवरी असल्याचे तू सिद्ध केले आहेस असे होईल आणि तू माझ्या स्वामीवर दया केली आहेस असे मला कळेल.” 15 मग त्या सेवकाची प्रार्थना संपली नाहीं तोंच अब्राहामाचा भाऊ नाहोर याजपासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची कन्या, रिबका नावाची एक तरुणी खांद्यावर घागर घेऊन विहिहीपाशी आली; 16 ती फार देखणी व सुंदर मुलगी होती; ती कुमारी होती; ती पुरुषाबरोबर कधीच निजली नव्हती. विहिरीत उतरुन तिने घागर भरली. 17 तेव्हा सेवक धावत जाऊन तिला म्हणाला, “मुली, तुझ्या घागरीतून मला थोडे पाणी पाज.” 18 तेव्हा ताबडतोब रिबकेने आपल्या खांद्यावरील घागर उतरुन त्याला पाणी पाजले; ती म्हणाली, “प्या बाबा;” 19 त्याचे पुरेसे पाणी पिऊन झाल्यावर ती म्हणाली, “तुमच्या उंटांनाही भरपूर पाणी पाजते.” 20 मग तिने लगेच उंटासाठी घागर डोणीत ओतली आणि आणखी पाणी आणण्याकरिता ती धावत विहिरीकडे गेली, या प्रमाणे तिने सगळ्या उंटांना भरपूर पाणी पाजले. 21 तेव्हा तो सेवक अचंबा करुन तिच्याकडे पाहात राहिला; परमेश्वराने आपल्या प्रार्थनेचे उत्तर देऊन आपला प्रवास यशस्वी केला की काय अशी खात्री करण्याकरिता तो शांतपणे विचार करीत उभा राहिला. 22 उंटाचे पाणी पिणे झाल्यावर त्या सेवकाने रिबकेला पांच औंस भाराची (म्हणजे अर्धा शेकेल भाराची) सोन्याची आंगठी दिली; तसेच त्याने प्रत्येकी पाच शेकेल भाराच्या दोन (म्हणजे दहा शेकेल भाराच्या दोन) सोन्याच्या बांगड्या तिला दिल्या. 23 त्याने तिला विचारले, “मुली, तू कोणाची मुलगी आहेस? तुझ्या बापाचे नाव काय? तुझ्या बापाच्या घरी आम्हा सर्वांना उतरुन रात्री मुक्काम करावयास जागा आहे काय?” 24 रिबकेने उत्तर दिले, “नाहोर व मिल्का यांचा मुलगा बथुवेल याची मी कन्या;” आणखी ती पुढे म्हणाली, 25 “हो, तुमच्या उंटासाठी आमच्यापाशी भरपूर गवत व पेंढा आहे आणि तुमच्या सर्वांसाठी मुक्काम करण्यास माझ्या बापाच्या घरी भरपूर जागा आहे.” 26 तेव्हा सेवकाने नमन करुन परमेश्वराची उपासना केली. 27 तो म्हणाला, “माझ्या स्वामीचा, अब्राहामाचा परमेश्वर धन्यवादित आहे; त्याची माझ्या स्वामीवर प्रेमदया आणि निष्ठा आहे, माझ्या स्वामिच्या, पुत्रासाठी योग्य अशा मुलीकडेच परमेश्वराने मला नेले आहे.” 28 नंतर रिबका धावत घरी गेली व तिने या सर्व गोष्टी आपल्या आईस व घरच्या सर्वांस सांगितल्या; 29 रिबकेला लाबान नावाचा भाऊ होता; सेवक तिच्याशी ज्या गोष्टी बोलला त्या तिने त्याला सांगितल्या; या सगळ्या तो शांतपणे ऐकत होत; आणि जेव्हा त्याने आपल्या बहिणीच्या बोटातील सोन्याची आंगठी, व हातातील सोन्याच्या बांगड्या पाहिल्या तेव्हा तो घरातून निघून पळत विहिरीकडे गेला; तेव्हा उंटा जवळ उभा असलेला तो सेवक त्याला विहिरीपाशी दिसला. 30 31 लाबान त्याला म्हणाला, “स्वामी येथे बाहेर याप्रमाणे उभे राहाण्याची गरज नाही; परमेश्वराचे आशीर्वादित स्वामी, आम्ही तुमचे स्वागत करतो, तुम्ही सर्व आमच्या घरी या. मी तुमच्या मुक्कामासाठी खोली तयार करुन ठेवली आहे; तसेच तुमच्या उंटांसाठी ही जागा केली आहे.” 32 तेव्हा अब्राहामाचा सेवक त्याच्या घरी गेला; लाबानाने उटांना सोडवीण्यास त्याला मदत केली आणि गवत व पेंढा दिले; 33 आणि त्याच्या पुढे जेवण वाढले; परंतु अब्राहामाच्या सेवकाने जेवण घेण्याचे नाकारले; तो म्हणाला, “मी येथे येण्याचे कारण तुम्हाला सांगितल्याशिवाय जेवणार नाही.”तेव्हा लाबान म्हणाला, “ठीक आहे, तुम्ही येथे कशासाठी आला ते आम्हाला सांगा.” 34 तो सेवक म्हणाला, “मी अब्राहामाचा सेवक आहे; 35 परमेश्वराने माझ्या स्वामीला सर्व बाबतीत आशीर्वाद देऊन त्याचे कल्याण केले आहे. माझा स्वामी आता एक थोर माणूस झाला आहे; परमेश्वराने त्याला मेंढरांचे कळप, गुराढोरांची खिल्लारे तसेच खूप सोने. चांदी, दासदासी, उंट व गाढवे दिली आहेत. 36 सारा, ही माझ्या स्वामीची पत्नी, स्वामीने त्याची सगळी मालमत्ता आपल्या मुलास दिली आहे. 37 माझ्या स्वामीने सक्तीने माझ्याकडून वचन घेतले; तो म्हणाला, ‘आपण या कनान देशात राहतो खरे, परंतु माझ्या मुलासाठी येथील कनानी मुलीतून कोणतीच मुलगी बायको करुन देऊ नकोस; 38 माझ्या स्वामीने मला शपथ घ्यावयास लावले व सांगितले, तू माझ्या बापाच्या देशात माझ्या आप्ता कडे, गणगोताकडे जा व तेथून माझ्या मुलाकरिता तू नवरी शोधून आण.’ 39 मी माझ्या स्वामीला म्हणालो, ‘यदा कदाचित तर नवरी मुलगा माझ्याबरोबर या देशात येण्यास कबूल झाली नाही तर?’ 40 परंतु स्वामी, म्हणाले, ‘ज्या परमेश्वराची मी सेवा करतो तो त्याच्या दूताला तुझ्याबरोबर पाठवील व तो तुला मदत करील आणि तेथील माझ्या आप्तांतून तू माझ्या मुलाकरिता नवरी आणशील; 41 परंतु माझ्या बापाच्या देशात त्याच्या घरी तू जाशील आणि ते माझ्या मुलाकरीता नवरी मुलगी द्यावयाचे नाकारतील तर मग तू माझ्या शपथेतून मोकळा होशील.’ 42 “आज मी या विहिरीपाशी आलो आणि परमेश्वराला प्रार्थना केली, ‘हे माझ्या स्वामीच्या अब्राहामच्या परमेश्वरा, ही माझ्या प्रवासाची फेरी सफळ कर; 43 पाहा, मी येथे या विहिरीजवळ उभा राहतो; येथे पाणी भरण्यास येणाऱ्या तरुण मुलीची वाट पाहतो; ती आल्यावर मी तिला विचारीन, “मुली, कृपा करुन तुझ्या घागरीतून मला थोडे पाणी पाज!” 44 तेव्हा ती योग्य मुलगी विशेष प्रकारे असे उत्तर देईल, ती म्हणेल, “प्या बाब! आणि मी तुमच्या उंटासाठी ही पाणी आणते,” असे घडेल तेव्हा ती मुलगी माझ्या धन्याच्या मुलाकरिता परमेश्वराने निवडलेली नवरी आहे असे मी समजेन.’ 45 “माझी प्रार्थना संपण्याच्या आत रिबका खांद्दावर घागर घेऊन पाणी भरण्यास विहिरीवर आली; तिने विहिरीत उतरुन पाणी आणले; मी तिला म्हणालो, ‘मुली, कृपा करुन मला थोडे पाणी व्यावयाला दे.’ 46 तेव्हा तिने लगेच खांघावरुन घागर उतरवली आणि माझ्यासाठी पाणी ओतीत ती म्हणाली, ‘बाबा, हे पाणी प्या आणि तिने माझ्या उंटांनाही पाणी पाजले;’ 47 मग मी तिला विचारले, ‘तू कोणाची मुलगी आहेस? तुझ्या बापाचे नाव काय?’ तिने उत्तर दिले, ‘नाहोरापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची मी कन्या;’ तेव्हा मग मी तिला सोन्याची आंगठी आणि हातात घालण्यासाठी सोन्याच्या दोन बांगडयादिल्या; 48 त्यावेळी मी मस्तक लववून माझ्या धन्याच्या परमेश्वराची उपकारस्तुती केली, कारण त्याने मला माझ्या स्वामीच्या भावच्या मुलीला त्याच्या मुलाकडे नेण्याचा योग्य मार्ग दाखवला; 49 तेव्हा आता तुम्ही मला सांगा; तुम्ही माझ्या धन्याशी खरेपणाने आणि दयाळूपणाने वागाल का? आणि तुमची मुलगी त्याला देता का? की मुलगी देण्यास नकार देता? बोला, काय करता हे मला नक्की सांगा म्हणजे मग मी काय करावे हे मला समजेल.” 50 मग लाबान व बथुवेल यांनी उत्तर दिले, “आपण परमेश्वराच्या प्रेरणेने आला आहा हे आम्ही समजतो; जे त्याच्या इच्छेप्रमाणे घडलेच पाहिजे ते आम्ही बदलू शकत नाही; 51 पाहा, रिबका तुमची आहे; तिला तुम्ही घेऊन जा आणि तिला तुमच्या स्वामीच्या मुलाशी लग्न करु द्या.” 52 अब्राहामाच्या सेवकाने हे शब्द ऐकले आणि भूमिपर्यंत लवून परमेश्वराला नमन केले; 53 त्याने नवरीसाठी आणलेल्या मोलवान भेटवस्तू म्हणजे हिरेमाणके यांनी मढवलेले सोन्याचांदीचे दागदागिने व बरीच सुंदर वस्त्रे रिबकेला दिली; त्याचप्रमाणे त्याने तिचा भाऊ व तिची आई यांना ही मोलवान देणग्या दिल्या. 54 मग त्याने व त्याच्या बरोबराच्या माणसांनी त्यांचे खाणेपिणे झाल्यावर रात्री तेथेच मुक्काम केला; दुसऱ्या दिवशी उठल्यावर ते म्हणाले, “आता आम्ही आमच्या स्वामीकडे माघारी जाण्यास निघतो.” 55 तेव्हा रिबकेची आई व भाऊही म्हणाला, “रिबकेला आमच्याजवळ थोडे दिवस म्हणजे निदान दहा दिवस तरी राहू द्या; मग ती येईल.” 56 परंतु तो सेवक त्यांना म्हणाला, “कृपा करुन मला थांबवून घेऊ नका; परमेश्वराने ही माझी फेरी सफळ केली आहे, तेव्हा आता मला धन्याकडे परत जाऊ द्या.” 57 तेव्हा रिबकेचा भाऊ व आई म्हणाली, “आम्ही रिबकेला बोलावून तिची काय इच्छा आहे ते विचारतो;” 58 मग त्यांनी तिला बोलावून विचारिले, “अब्राहामाच्या या सेवकाबरोबर तू आता जाण्यास तयार आहेस काय?”ती म्हणाली, “होय, मी तयार आहे.” 59 तेव्हा त्यांनी रिबकेला अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे यांच्या सोबत जाण्यास परवानगी दिली; रिबकेचा लहानपणापासून सांभाळ करणारी तिची दाईही त्यांच्याबरोबर गेली; 60 ते सर्व जाण्यास निघाले तेव्हा त्यांनी तिला निरोप देताना आशीर्वाद देऊन म्हटले,“आमचे भगिनी, तू लाखो लोकांची माता हो; तुझी संतती त्यांच्या शत्रुंचा बिमोड करुन त्यांची नगरे जिकूंन त्यांचा ताबा घेवोत.” 61 मग रिबका व तिच्या दाई - दासी उंटावर बसल्या आणि अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे यांच्या मागे निघाल्या; अशा रीतीने तो सेवक रिबकेला घेऊन माघारे आपल्या घराकडे प्रवासास निघाला. 62 ह्या वेळी इसहाक बैर - लहाय - रोई सोडून नेगेबात राहात होता. 63 तो एका संध्याकाळी ध्यानमनन करण्यास शेतात गेला असता त्याने नजर वर करुन पाहिले तेव्हा त्याला दूर अंतरावरुन उंट येताना दिसले; 64 रिबकेने नजर वर करुन इसहाकाला पाहिले तेव्हा ती उंटावरुन खाली उतरली. 65 तिने सेवकाला विचारले, “शेतातून आपल्याला भेटावयास सामोरा येत असलेला तरुण पुरुष कोण आहे?”सेवकाने उत्तर दिले, “तो माझ्या स्वामीचा पुत्र आहे.” तेव्हा रिबकेने बुरख्याने आपले तोंड झाकून घेतले. 66 सेवकाने इसहाकाला काय काय घडले त्याविषयी सविस्तर सांगितले; 67 6मग इसहाकाने मुलीला आपल्या आईच्या तंबूत आणले; त्या दिवशी रिबका त्याची बायको झाली; इसहाकाचे रिबकेवर फार प्रेम जडले; त्यामुळे आपल्या आईच्या मरणानंतर रिबकेमुळे त्याला समाधान मिळाले.

25:1 अब्राहामाने पुन्हा लग्न केले, त्याच्या दुसऱ्या बायकोचे नाव कटूरा होते. 2 कटुरेला जिब्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शुह ही मुले झाली; 3 यक्षानास शबा व ददान ही दोन मुले होती; अश्शूरी व लऊमी लदूशी लोक हे ददानाचे वंशज होते; 4 एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे मिद्यानाचे मुलगे होते; ही सर्व मुले अब्राहामापासून कटूरेला झाली. 5 मरण्यापूर्वी अब्राहामाने आपल्या गुलाम स्त्रियांच्या मुलांसाठी काही देणग्या दिल्या; त्याने या मुलांना इसहाकापासून वेगळे करुन दूर पूर्वेकडील देशात पाठवून दिले; नंतर त्याने आपली सगळी मालमत्ता इसहाकाला दिली. 6 7 अब्राहाम एकशे पंच्याहत्तर वर्षे जगला; 8 त्याला दीर्घकाळ सुखी व समाधानी जीवन लाभले; मग तो अशक्त होऊन मरण पावला व आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला; 9 इसहाक व इश्माएल या त्याच्या मुलांनी त्याला सोहराचा मुलगा एप्रोन हित्ती याच्या मम्रेच्या पूर्वेकडे असलेल्या शेतातील मकपेला गुहेत सारेच्या जवळ पुरले; 10 अब्राहामाने हित्ती लोकांकडून विकत घेतलेली हीच ती गुहा. 11 अब्राहामाच्या मृत्यूनंतर परमेश्वराने त्याचा मुलगा इसहाक याला आशीर्वादित केले आणि त्यानंतर ही इसहाक बैर - लहाय - रोई येथेच राहू लागला. 12 अब्राहामापासून सारेची दासी हागार हिला झालेल्या इश्माएलाची ही वंशावळ; 13 इश्माएलाच्या मुलांची नावे अशी. नबायाथ हा त्याचा पहिला मुलगा; नंतर केदार जन्मला, मग अदबील, मिबसाम, 14 मिश्मा, दुमा, मस्सा, 15 हदद, तेमा, यतूर, नापीश व केदमा; 16 अशी इश्माएलाच्या पुत्रांची नावे होती; प्रत्येक मुलाच्या परिवार गटाचा एक तळ होता; पुढे त्याचेच एक गांव बनले; हे बारा पुत्र आपापल्या लोकासहीत बारा वंशाचे संस्थापक सरदार झाले. 17 इश्माएल एकशें सदतीस वर्षे जगला नंतर तो मेला आणि आपल्या पूर्वजांमध्ये गोळा झाला; 18 त्याचे वंशज सर्व वाळवंट भागात तळ देत राहिले; हा भाग मिसर जवळील हवीलापासून शूरपर्यंत आहे आणि तो शूरपासून पार अश्शूरपर्यंत जातो. अश्शूर इश्माएलाचे वंशज अधूनमधून आपल्याच भाऊबंदावर हल्ला करीत असत. 19 इसहाकाची घराणी अशी अब्राहामाला इसहाक नावाचा मुलगा होता. 20 तो चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पदन अराम येथील अरामी बथुवेलाची कन्या व लाबान याची बहीण रिबका इजशी लग्न केले. 21 इसहाकाच्या बायकोला मूलबाळ होईना म्हणून इसहाकाने रिबकेसाठी परमेश्वराची प्रार्थना केली; परमेश्वराने इसहाकाची प्रार्थना ऐकली आणि रिबका गर्भवती झाली. 22 ती गरोदर असताना तिच्या उदरातील दोन मुले एकमेकांशी झगडू लागली; तेव्हा परमेश्वराची प्रार्थना करुन ती म्हणाली, “परमेश्वरा, मला हे असे का होत आहे?” 23 परमेश्वर तिला म्हणाला, “दोन राष्ट्राचे राज्यकर्ते तुझ्या उदरातून जन्म घेतील; एक मुलगा दुसऱ्यापेक्षा बलवान होईल; वडील मुलगा धाकट्याची सेवा करील.” 24 मग रिबकेची प्रसूतीची वेळ आली तेव्हा तिला जुळी मुले झाली; 25 पहिला मुलगा तांबूस रंगाचा होता, त्याचे अंग जणूकाय केसाळ झग्यासारखे होते; म्हणून त्याचे नाव एसाव (म्हणजे केसाळ) असे ठेवले. 26 पाठोपाठ दुसरा मुलगा जन्मला तेव्हा त्याने एसावाची टाच हाताने घट्ट धरली होती; म्हणून त्याचे नाव याकोब असे ठेवले. रिबकेला ही जुळी मुले झाली तेव्हा इसाहक साठ वर्षांचा होता. 27 ही जुळी मुले वाढत जाऊन मोठी झाली तेव्हा एसाव तरबेज शिकारी झाला; शेताशेतातून व रानावनातून फिरण्याची त्याला आवड होती. पण याकोब शांत होता तो त्याच्या तंबूत राहिला. 28 एसाव इसहाकाचा आवडता होता; त्याने शिकार करुन आणलेल्या प्राण्यांचे मांस खाणे इसहाकाला आवडत असे; परंतु याकोब रिबकेचा आवडता होता. 29 एके दिवशी एसाव शिकारीहून परत आला; तो फार थकलेला होता व भुकेने अगदी गळून गेला होता. याकोब मसुरीच्या लाल डाळीचे वरण शिजवीत होता. 30 तेव्हा एसाव याकोबाला म्हणला, “मी भुकेने व्याकूळ झालो आहे तर मला थोडे तांबड्या डाळीचे वरण खावयास घेऊ दे;” यावरुन लोक त्याला अदोम (म्हणजे तांबडा) म्हणत. 31 परंतु याकोब म्हणाला, “त्याबद्दल तू मला आजच तुझा ज्येष्ठपणाचा हक्क दिला पाहिजेस.” 32 एसाव म्हणाला, “भुकेने माझा प्राण चालला आहे, मी जर मेलो तर माझ्या बापाची मालमत्ता मला काय उपयोगाची? तेव्हा मी माझ्या ज्येष्टपणाचा हक्क तुला देतो.” 33 परंतु याकोब म्हणाला, “तर प्रथम, तू तुझा ज्येष्ठपणाचा वारसा हक्क मला देशील अशी शपथ माझ्याशी वाहा.” तेव्हा एसावाने तशी शपथ वाहिली; अशा रीतीने एसावाने आपल्या बापाकडून मिळणाऱ्या सगळ्या मालमत्तेचा व ज्येष्टपणाचा आपला वारसा हक्क आपला धाकटा भाऊ याकोब याला मोबदला म्हणून दिला. 34 मग याकोबाने त्याला भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले. एसावाने ते खाल्ले व पाणी पिऊन झाल्यावर तो तेथून निघून गेला. अशा रीतीने आपल्या बापाकडून मिळणाऱ्या ज्येष्ठपणाच्या हक्काची एसावाने बेपर्वाईने कदर केली नाहीं.

26:1 पूर्वी अब्राहामाच्या काळात मोठा दुष्काळ पडला होता त्यासारखा दुसरा दुष्टकाळ आताही पडला; तेव्हा इसहाक पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख याजकडे गरार नगरात गेला. 2 परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, “तू मिसर देशात जाऊ नकोस; तर मी सांगितलेल्या देशातच राहा; 3 तू तेथे राहा आणि मी तेथे तुझ्याबरोबर असेन; मी तुला आशीर्वादित करीन; ही सर्व भूमी मी तुला आणि तुझ्या वंशजांना देईन; तुझा बाप अब्राहाम याला मी जे जे देण्याचे वचन दिले आहे ते सर्व मी पूर्ण करीन. 4 मी तुमची संतनी आकाशातील ताऱ्यांइतकी करीन आणि हे सर्व देश मी तुमच्या वंशजांस देईन; तुमच्या वंशजांमुळे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे मी आशीर्वादीत करीन; 5 कारण तुझा बाप अब्राहाम याने माझ्या आज्ञा, नियम व कायदे पाळले आणि मी सांगितलेल्या गोष्टी केल्या.” 6 म्हणून मग इसहाक गरार नगरातच वस्ती करुन राहिला. 7 इसहाकाची बायको रिबका अतिशय देखणी होती. तेथील लोकांनी रिबके विषयी इसहाकाला विचारले तेव्हा, “ती माझी बहीण आहे,” असे त्याने उत्तर दिले; “ती माझी बायको आहे.” असे सांगण्याची इसहाकाला भीती वाटली कारण रिबका मिळविण्यासाठी कोणीही त्याचा घात केला असता. 8 बराच काळ तेथे राहिल्यावर एकदा खिडकीतून बाहेर पाहताना इसहाक रिबकेशी प्रेमाचे खेळ खेळण्यात रंगल्याचे अबीमलेखाला दिसले. 9 तेव्हा त्याने इसहाकाला बोलावून विचारले, “ही स्त्री तुझी बायको आहे ना? मग ती तुझी बहीण आहे असे तू आम्हाला का सांगितलेस?”इसहाक म्हणाला, “मला अशी भीती वाटली की तिला मिळविण्याकरिता तुम्ही कोणीही मला मारुन टाकाल.” 10 अबीमलेख म्हणाला, “तू आम्हाशी असे वागून ही वाईट गोष्ट केलीस; कारण आमच्या लोकातून कोणीही तुझ्या बायको बरोबर निजला असता आणि त्यामुळे त्याच्या माथी मोठे पाप लागून तो अपराधी ठरला असता.” 11 म्हणून अबीमलेखाने सर्व लोकांना हुकूम देऊन बजावून ठेवले; तो म्हणाला, “या माणसाला किंवा याच्या बायकोला कोणीही हात लावू नये आणी जर कोणी तसे करील तर त्याला जिवे मारण्यात येईल.” 12 इसहाकाने त्या देशात धान्य पेरले; आणि त्या वर्षी त्याला भरमसाट पीक आले. परमेश्वराने त्याला भरपूर आशीर्वाद दिला. 13 इसहाकाने भरपूर संपत्ती मिळवली आणि तो खूप श्रीमंत झाला; 14 त्याच्याकडे शेरड्यामेंढ्यांचे कळप व गुराढोरांची खिल्लारे पुष्कळ होती; त्यावरुन पलिष्टी लोक त्याचा हेवा करु लागले; 15 म्हणून त्याचा बाप अब्राहाम याच्या हयातीत पूर्वी त्याच्या नोकरांचाकरानी खणलेल्या सर्व विहिरी पलिष्टी लोकांनी मातीने बुजवून सपाट केल्या; 16 तेव्हा अबीमलेख इसहाकास म्हणाला, “आता तू आमचा देश सोडून निघून जा कारण आमच्यापेक्षा तू अधिक शक्तीमान झाला आहेस.” 17 म्हणून इसहाकाने तो देश सोडला व गराराच्या एका लहान नदीजवळ त्याने तळ दिला आणि तेथेच त्याने वस्ती केली. 18 याच्या बरेच वर्षे आधी अब्राहामाने आपल्या हयातीत बऱ्याच विहिरी खणल्या होत्या; परंतु अब्राहामाच्या मरणानंतर त्या पलिष्टी लोकांनी मातीने बुजविल्या होत्या; त्यामुळे इसहाकाने मागे जाऊन त्या परत खणून घेतल्या त्या विहिरींना त्याच्या वडीलांनी दिलेली नावच पुन्हा त्याने दिली. 19 त्याच्या नोकरांनी एक विहीर नदीजवळ खणली; तेव्हा त्या विहिरीत त्यांना एक जीवंत पाण्याचा झरा लगला; 20 परंतु गरार खोऱ्यातील गुराख्यांनी इसहाकाच्या गुराख्यांशी हुज्जत घातली; ते म्हणाले, “हे पाणी आमचे आहे.” त्या लोकांनी आपल्याशी त्या जागी भांडण केले म्हणून इसहाकाने त्या विहिरीचे नाव ‘एसेक’ ठेवले. 21 मग इसहाकाच्या नोकरांनी दुसरी विहीर खणली; तेथील लोकही तिच्यावरुन भांडले म्हणून इसहाकाने त्या विहिरीचे नाव ‘सितना’ ठेवले. 22 इसहाक तेथुन पुढे गेला आणि त्याने आणखी एक विहीर खणली; तेव्हा मात्र कोणीही भांडण करावयास आले नाही म्हणून इसहाकाने तिचे नाव ‘रहोबोथ’ ठेवले. इसहाक म्हणाला, “आता मात्र परमेश्वराने आम्हासाठी जागा शोधून दिली आहे; आता या देशात आमची भरभराट होईल; आणि आम्हाला यश मिळेल.” 23 तेथून इसहाक बैर - शेबा येथे गेला; 24 त्याच रात्री परमेश्वराने इसहाकाला दर्शन देऊन म्हटले, “इसहाका, तुझा बाप अब्राहाम याचा देव मी आहे; तर भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी आपला सेवक अब्राहाम याच्याकरिता तुला आशीर्वादित करीन.” आणि तुझा वंश खूप वाढवीन. 25 तेव्हा इसहाकाने परमेश्वरा करिता तेथे एक वेदी बांधली व परमेश्वराची उपासना व उपकार स्तुती केली; व त्याने तेथे आपला तळ दिला; तेथेच त्याच्या नोकरांनी एक विहीर खणली. 26 त्यानंतर एके दिवशी अबीमलेख राजा आपला सल्लागार अहुज्जाथ व आपला सेनापती पीकोल यांना बरोबर घेऊन गरार येथून इसहाकाला भेटावयास आला. 27 इसहाकाने विचारले, “तुम्ही या अगोदर माझ्याशी मित्रासारखे वागला नाही, एवढेच नव्हे तर माझ्यावर जोर करुन तुम्ही मला तुमचा देश सोडणे भाग पाडले; मग आता माझ्याकडे का आलात?” 28 त्यांनी उत्तर दिले, “परमेश्वर तुझ्याबरोबर आहे हे आम्हाला आता पूर्णपणे समजले आहे; आम्हाला असे वाटते की आपण आता आपल्यामध्ये एक करार करावा; तू आम्हाला वचन द्यावे अशी आमची इच्छा आहे; 29 आम्ही तुला त्रास दिला नाही त्याच प्रमाणे आता तुही आम्हाला त्रास देणार नाही असा तू आमच्याशी करार करावा; आम्ही तुला घालवून दिले हे खरे आहे, परंतु तुला आम्ही शांतीने जाऊ दिले; परमेश्वराने तुला आशीर्वादित केले आहे ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे.” 30 तेव्हा इसहाकाने त्यांना मेजवानी दिली; त्यांनी आनंदाने भरपूर खाणे पिणे केले, 31 दुसऱ्या दिवशी सकाळी त्या प्रत्येकाने वचन दिले आणि शपथ वाहिली; नंतर ते लोक शांतीने आपल्या घरी गेले. 32 त्याच दिवशी इसहाकाच्या नोकरांनी येऊन त्यांनी खणलेल्या विहीरी विषयी त्याला सांगितले. ते म्हणाले, “त्या विहिरीत आम्हांस मुबलत पाणी लागले आहे;” 33 तेव्हा इसहाकाने त्या विहिरीचे नांव ‘शेबा’ ठेवले; आणि त्या नगराला अजूनही ‘बैर शेबा’ म्हटले जाते. 34 एसाव चालीस वर्षांचा झाल्यावर त्याने दोन हेथी स्त्रियांशी लग्ने केली, एकीचे नांव होते यहूदीथ, ही बैरी हित्तीची मुलगी, आणि दुसरीचे नांव होते बासमथ, ही एलोन हित्तीची मुलगी; 35 हेथी बायकांमुळे इसहाक व रिबका दु:खाने अस्वस्थ झाले.

27:1 इसहाक म्हातारा झाल्यावर त्याची दृष्टि मंद झाली व त्याला स्पष्ट दिसेनासे झाले; एके दिवशी त्याने आपला वडील मुलगा एसाव याला बोलावून म्हटले,“एसावा, माझ्या मुला;”आणि एसाव म्हणाला, “मी येथे आहे” 2 इसहाक म्हणाला, “पाहा, मी आता म्हातारा झालो आहे, कदाचित लवकरच मी मरेन; 3 तेव्हा तू तुझे धनुष्य व बाणांचा भाता घेऊन शिकारीस जा आणि माझ्यासाठी शिकार घेऊन ये. 4 आणि त्या शिकारीचे मला आवडणारे रुचकर जेवण तयार करुन माझ्याकडे आण म्हणजे मग मी ते खाईन व मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईन.” 5 त्याप्रमाणे एसाव शिकारीस गेला.इसहाक एसावला या गोष्टी सांगत असताना रिबका ऐकत होती. 6 ती आपला मुलगा याकोब याला म्हणाली, “नीट लक्ष देऊन ऐक; तुझा बाप एसावाशी बोलताना मी ऐकले; 7 तुझा बाप म्हणाला, “माझ्यासाठी शिकार घेऊन ये आणि त्याचे रुचकर जेवण करुन माझ्याकडे घेऊन ये म्हणजे मी ते खाईन आणि मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईन.’ 8 तेव्हा ऐक, आणि मी सांगते ते कर; 9 चटकन आपल्या कळपाकडे जा आणि त्यातून दोन चांगले करडे घेऊन मला आणून दे; मी त्यांचे तुझ्या बापाच्या आवडीचे जेवण तयार करते, 10 मग ते जेवण तुझ्या बापाकडे घेऊन जा, म्हणजे मग ते खाऊन तुझा बाप मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईल.” 11 परंतु याकोब आपली आई रिबका हिला म्हणाला, “माझा भाऊ केसाळ अंगाचा आहे; मी त्याच्या सारखा केसाळ अंगाचा नाही; 12 माझ्या बापाने जर मला चाचपून पाहिले तर मग मी एसाव नाही हे त्यांना समजेल आणि मग फसवणूक केल्याबद्दल माझा बाप मला आशीर्वादाच्या ऐवजी शाप देईल.” 13 तेव्हा रिबका त्याला म्हणाली, “जर काही गडबड झाली तर त्याबद्दलचा दोष मी माझ्या स्वत:वर घेईन, मी सांगते ते कर; लवकर जाऊन दोन करडे माझ्याकडे घेऊन ये.” 14 तेव्हा त्याने जाऊन ते करडे आईकडे आणले; मग तिने त्यांचे त्याच्या बापाच्या विशेष आवडीचे रुचकर जेवण तयार केले; 15 नंतर तिने एसावाच्या आवडीचे कपडे काढले आणि ते धाकट्या मुलाच्या म्हणजे याकोबाच्या अंगावर चढवले; 16 तसेच तिने करडांचे कातडे याकोबाच्या हातावर व मानेवर लावले; 17 मग तिने स्वत: इसहाकासाठी तयार केलेले विशेष रुचकर जेवण आणून याकोबाला दिले; 18 ते घेऊन याकोब आपल्या बापाकडे गेला आणि त्याने बापाला हाक मारली, “बाबा!”त्याचा बाप म्हणाला, “काय मुला; तू कोण आहेस?” 19 याकोब म्हणाला, “मी तुमचा वडील मुलगा एसाव आहे; तुम्ही सांगतिल्याप्रमाणे सर्वकाही करुन मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो आहे; तेव्हा आता उठून जेवावयास बसा व तुमच्यासाठी शिकार करुन आणलेले मांस खा आणि मग मला आशीर्वाद द्या.” 20 परंतु इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, “एवढया लवकर तुला शिकार कशी काय मिळाली?”याकोब म्हणाला, “कारण तुमच्या परमेश्वराने मला लवकर शिकार मिळू दिली.” 21 मग इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, “माझ्या मुला, जरा माझ्याजवळ ये, म्हणजे मी तुला चाचपून पाहतो, मग चाचपण्यावरुन तू खरेच एसाव आहेस का? ते मला समजेल” 22 तेव्हा याकोब आपल्या बापाजवळ गेला; त्याला चाचपून इसहाक म्हणाला, “तुझा आवाज तर याकोबाच्या आवाजासारख आहे परंतु तुझे हात मात्र एसावाच्या हातासारखे केसाळ आहेत.” 23 तो याकोब आहे असे इसहाकाला समजले नाही कारण त्याचे हात एसावाच्या हाता सारखे केसाळ होते; म्हणून त्याने याकोबाला आशीर्वाद दिला. 24 तो म्हणाला, “तू खरेच माझा मुलगा एसावच आहेस काय?”याकोबाने उत्तर दिले, “होय बाबा, मी एसावच आहे.” 25 मग इसहाक म्हणाला, “तू जेवण माझ्याकडे आण, मी ते खाईन, मग तुला आशीर्वाद देईन.” तेव्हा याकोबाने आपल्या बापाला जेवण दिले; ते त्यानी खाल्ले, त्याने त्यांना द्राक्षमद्यही दिले, आणि ते ते प्याले. 26 मग इसहाक त्याला म्हणाला, “माझ्या मुला जरा माझ्याजवळ ये व मला मुका दे.” 27 मग याकोब आपल्या बापाजवळ गेला आणि त्याने बापाचे चुंबन घेतले; इसहाकाला एसावाच्या कपडयांचा वासा आला; तेव्हा त्याने त्याला आशीर्वाद दिला; तो म्हणाला,परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या, पिकाने भरलेल्या शेताच्या सुगंधासारख माझ्या मुलाचा सुगंध दरवळत आहे. 28 परमेश्वर तुला भरपूर पाऊस देवो म्हणजे हंगामाच्या वेळी तुझी सुपीक शेते तुला भरपूर धान्य व द्राक्षारस देतील. 29 सर्व लोक तुझी सेवा करोत; राष्ट्रे तुझ्यापुढे नमोत; तू तुझ्या भावांवर राज्य करशील; ते तुला वंदन करतील व तुझ्या आज्ञा पाळतील; तुला शाप देणारे शापित होतील आणि तुला आशीर्वाद देणारे आशीर्वादित होतील.” 30 इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देण्याचे संपविले. त्यानंतर याकोब आपल्या बापापासून निघून गेला तोंच एसाव शिकारीहून आला. 31 त्याने आपल्या बापाच्या विशेष आवडीचे रुचकर भोजन तयार केले, व तो ते घेऊन आपल्या बापाकडे आला, तो बापाला म्हणाला, “बाबा, उठा आणि तुमच्या मुलाने शिकार करुन आणलेल्या मृग मांसाचे हे रुचकर जेवण खा; आणि मग मला आशीर्वाद द्या.” 32 परंतु इसहाक त्याला म्हणाला, “तू कोण आहेस?”त्याने उत्तर दिले, “बाबा, मी तुमचा मुलगा, वडील मुलगा एसाव आहे.” 33 मग इसहाक अतिशय अस्वस्थ झाला; तो म्हणाला, “तर मग तू येण्याअगोदर ज्याने जेवण तयार करुन मला आणून दिले तो कोण होता? मी ते सर्व जेवण खाल्ले आणि त्याला आशीर्वादही दिला. तो आशीर्वाद मागे घेण्यास आता फार उशीर झाला आहे; तो त्याला मिळणार.” 34 एसावाने आपल्या बापाचे शब्द ऐकले तेव्हा त्याला फार राग आला व तो खिन्न झाला; हंबरडा फोडून तो बापाला म्हणाला, “तर मग मला ही आशीर्वाद द्या हो बाबा!” 35 इसहाक म्हणाला, “तुझ्या भावाने मला फसवले; तो आला व तुझा आशीर्वाद घेऊन गेला.” 36 एसाव म्हणाला, “त्याचे नाव याकोब (म्हणजे युक्तीबाज, किंवा युक्तीने हिरावून घेणारा) असे आहे ते त्याला योग्यच आहे; त्याने मला दोनदा फसवले; आहे त्याने माझा ज्येष्ठपणाचा हक्क हिरावून घेतला आणि आता त्याने माझा आशीर्वादही काढून घेतला आहे.” मग एसाव पुढे म्हणाला, “बाबा माझ्याकरिता तुम्ही काही आशीर्वाद राखून ठेवला आहे काय?” 37 इसहाकाने उत्तर दिले, “नाही बाळा, आता फार उशीर झाला आहे; मी याकोबाला तुझ्यावर धनीपणा करण्याचा अधिकार दिला आहे, आणि तुझे बंधू तुझे सेवक होतील असाही आशीर्वाद दिला आहे; त्याच प्रमाणे त्याला भरपूर धान्य व द्राक्षारस मिळावा असाही आशीर्वाद दिला आहे; तेव्हा माझ्या बाळा, आता तुला द्यावयाला काही राहिले नाही.” 38 परंतु एसाव आपल्या बापाला दिनवणी करीतच राहिला; तो म्हणाला, “बाबा तुमच्याकडे एकच आशीर्वाद होता काय? बाबा, माझे बाबा, मलाही आशीर्वाद द्या हो!” असे म्हणत तो टाहो फोडून रडू लागला!” 39 तेव्हा इसहाक म्हणाला,“तुला चांगल्या सुपीक जमिनीवर राहावयास मिळणार नाही व तुला भरपूर पाऊसही मिळणार नाही; 40 जगण्यासाठी तुला झगडावे लागेल; आणि तु तुझ्या भावाचा गुलाम होशील, परंतु तू स्वतंत्र होण्यासाठी लढशील आणि तुझ्या भावाचे नियंत्रण झुगारुन देशील व त्याच्या पासून वेगळा होशील.” 41 त्यानंतर आपला आशीर्वाद हिरावून घेतल्याबद्दल एसाव याकोबाचा द्वेष करु लागला; एसाव विचार करुन स्वत:शीच म्हणाला, “लवकरच माझा बाप मरुन जाईल आणि बापाच्या वियोगामुळे मला दु:ख होईल; परंतु त्यानंतर मात्र मी याकोबाला ठार मारीन.” 42 याकोबाला ठार मारण्याचा बेताचा रिबकेला सुगावा लागला; तेव्हा तिने त्याला बोलावून घेतले; मग ती त्याला म्हणाली, “माझ्या बाळा, ऐक, तुझा भाऊ तुला ठार मारण्याचा बेत करीत आहे; 43 तेव्हा बाळा, मी सांगते ते कर; हारान प्रांतात माझा भाऊ लाबान राहत आहे, त्याच्याकडे जाऊन तू लपून राहा. 44 तुझ्या भावाचा राग शांत होईपर्यंत थोडा काळ त्याजकडे राहा. 45 तू त्याला काय केलेस हे थोडया काळाने तो विसरुन जाईल; मग सेवक पाठवून मी तुला मागे बोलावून घेईन एकाच दिवशी मी माझ्या दोन्हीही मुलांना अंतरावे असे न होवो.” 46 मग रिबका इसहाकाला म्हणाली, “तुमचा मुलगा एसाव याने हेथी स्त्रीयांशी लग्न केले, मला त्यांच्यामुळे जीव नकोसा झाला आहे, कारण त्या काही आपल्यापैकी नाहीत; जर याकोबाने ही यांच्या सारख्या स्थानिक स्त्रीयांशीं लग्न केले तर मात्र मी मेलेलीच बरी.”

28:1 नंतर इसहाकाने याकोबाला बोलावून त्याला आशीर्वाद दिला नंतर त्याने त्याला बजावून आज्ञा दिली; तो म्हणाला, “तू कनानी मुलीपैकी कोणत्याच मुलीशी लग्न करता कामा नये; 2 तेव्हा तू आता येथून नीघ, व पदल अरामात बथुवेल तुझ्या आईचे वडील बथुवेल याच्या कडे जा. तुझ्या आईचा भाऊ लाबान तेथे राहातो आणि त्याच्या मुलीपैकीच एकीशी लग्न कर. 3 मी सर्वसमर्थ देवयाची प्रार्थना करतो की त्याने तुला आशीर्वादित करावे; आणि तुला खूप मुले द्यावीत तू महान राष्ट्राचा पिता व्हावे अशी प्रार्थना करतो. 4 तसेच परमेश्वराने अब्राहामाला व त्याच्या संततीला जसा आशीर्वाद दिला तसाच आशीर्वाद त्याने तुला व तुझ्या संततीलाही द्यावा अशी मी प्रार्थना करतो; आणि मी आणखी अशी ही प्रार्थना करतो की जो हा देश परमेश्वराने अब्राहामाला दिला व ज्यात तू राहातोस त्या देशाचा त्याने तुला मालक करावे.” 5 अशी रीतीने इसहाकाने याकोबाला पदन अराम येथे पाठवले; तेव्हा याकोब पदन अराम येथील अरामी बथूवेलाचा मुलगा व आपली आई रिबका हिचा भाऊ, लाबान याच्याकडे गेला. 6 एसावाला कळले की आपला बाप इसहाक याने याकोबला आपला आशीर्वाद दिला, व याकोबाने कोणत्याच कनानी स्त्रिशी लग्न करु नये अशी आज्ञा दिली, तसेच बायको शोधण्यासठी त्याने याकोबाला पदन अराम येथे पाठवून दिले; 7 आणि याकोबही आपल्या आईबापाची आज्ञा मानून पदन अरामास गेला ह्या ही गोष्टी एसावास कळाल्या; 8 या सर्व गोष्टींवरुन आपल्या बापाला आपल्या मुलांनी कोणत्याच कनानी मुलीशी लग्न करु नये असे वाटते हे एसावाला उमगले 9 एसावाला अगोदरच दोन कनानी बायका होत्या, म्हणून तो इश्माएलाकडे गेला आणि त्याने आणखी एका स्त्रीशी म्हणजे इश्माएलाची मुलगी महलथ हिच्याशी लग्न केले, इश्माएल अब्राहामाचा मुलगा होता आणि महलथ नबायोथाची बहीण. 10 याकोबाने बैर - शेबा सोडले व तो हारानाला गेला; 11 प्रवास करताना सूर्य मावळला म्हणून त्याने एके जागी रात्रीं मुक्काम केला; तेथे रात्रीं झोंपताना त्याला एक धोंडा दिसला तो उशास घेऊन तो रात्रीं तेथेच झोंपला; 12 तेव्हा त्याला एक स्वप्न पडले; स्वप्नात एक उंच शिडी आहे, तिचे एक टोक जमिनीवर व दुसरे टोक वर स्वर्गापर्यंत पाहोचलेले आहे असे त्याने पाहिले; 13 याकोबाने पाहिले की देवदूत शिडीवर चढत व उतरत आहेत. शिडीवरती परमेश्वर उभा असल्याचे त्याला दिसले; परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझे आजोबा अब्राहाम व तुझे वडील इसहाक यांचा मी परमेश्वर व देव आहे; तू ज्या भूमिवर झोंपला आहेस ती भूमि म्हणजे तो देश मी तुला व तुझ्या वंशजांना देईन 14 तसेच मी तुला भरपूर वंशज देईन; तुझे वंशज पृथ्वीवरील मातीच्या कणाइतके अगणित होतील; ते उत्तर व दक्षिण, पूर्व व पश्चिम या दिशांकडील देशात पसरतील; तुझ्यामुळे व तुझ्या वंशजांमुळे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील. 15 “मी सतत तुझ्याबरोबर आहे आणि तू ज्या ज्या ठिकाणी जाशील त्या प्रत्येक ठिकाणी मी तुझे रक्षण करीन आणी तुला या देशात परत आणीन; मी हे माझे वचन पूर्ण करीपर्यंत तुला अंतर देणार नाही.” 16 मग याकोब झोपेतून जागा झाला व म्हणाला, “खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे हे मला समजले आहे; परंतु झोंपून उठेपर्यंत ते मला कळले नाही.” 17 याकोबाला भीती वाटली, तो म्हणाला, “हे फार महान ठिकाण आहे, हे देवाचे निवासस्थान, त्याचे घर व स्वर्गाचे दार आहे.” 18 याकोब पहाटे लवकर उठला; त्याने उशास घेतलेला धोंडा एका टोकावर उभा करुन जमिनीत रोवला; मग त्याने त्यावर तेल ओतले. अशा प्रकारे त्याने त्या धोंड्याचे देवाचे स्मारक केले. 19 त्या ठिकाणाचे नाव लूज होते परंतु याकोबाने त्याचे नाव बेथेल ठेवले. 20 मग याकोबाने शपथ वाहून नवस केला; तो म्हणाला, “जर देव माझ्याबरोबर राहील; आणि जेथे जेथे मी जाईन तेथे तो माझे रक्षण करील; आणि जर तो मला खावावयास अन्न व ल्यावयास वस्त्र पुरवील; 21 आणि जर मी शांतीने माझ्या बापाच्या घरी परत येईन जर देव या सर्वगोष्टी करील तर मग तो माझा परमेश्वर होईल; 22 मी हा धोंडा या ठिकाणी स्मारकस्तंभ म्हणून उभा करुन ठेवतो, त्यावरुन परमेवराकरिता हे पवित्र ठिकाण आहे असे दिसेल आणि देवाने मला दिलेल्या सर्वाचा दशांश म्हणजे दहावा भाग मी देवाला अर्पण करीन.”

29:1 नंतर याकोबाने आपला प्रवास पुढे चालून ठेवला. तो पूर्वेकडील प्रदेशात गेला. 2 त्याने समोर पाहिले तेव्हा त्याला एका शेतात एक विहीर दिसली; त्या विहिरी जवळ शेरडामेंढराचे तीन कळप बसलेले होते; ही विहीर त्यांची पाणी पिण्याची जागा होती. या विहिरीचे तोंड एका मोठया दगडाने झाकलेले होते; 3 जेव्हा सर्व कळप तेथे जमत तेव्हा मेंढपाळ विहिरीच्या तोंडावरील मोठा दगड ढकलून बाजूला सारीत मग सर्व कळपांचे पाणी पिऊन झाल्यावर ते तो दगड परत त्याच जागेवर ठेवीत. 4 याकोब त्या मेंढपाळांना म्हणाला, “माझ्या बंधूंनो, तुम्ही कोठून आलात?”ते म्हणाले, “आम्ही हारानाहून आलो आहोत.” 5 मग याकोब म्हणाला, “नाहोराचा मुलगा लाबान याला तुम्ही ओळखता का?”ते म्हणाले, “होय, आम्ही त्याला ओळखतो.” 6 याकोबाने त्यांना विचारले, “तो बरा आहे काय?”त्यानी उत्तर दिले, “तो बरा व खुशाल आहे आणि त्याचे सर्वकाही चांगले आहे. ती पाहा त्याची मुलगी राहेल, त्याची मेंढरे घेऊन इकडे येत आहे.” 7 याकोब म्हणाला, “हे पाहा, अद्याप दिवस बराच आहे आणि सूर्य मावळण्यास अजून बराच वेळ आहे; तसेच रात्रीसाठी कळपांना गोळा करण्यास अजून बराच अवकाश आहे; तेव्हा त्यांना पाणी पाजा, आणि चरण्यासाठी त्यांना परत शेतात जाऊद्या.” 8 परंतु ते म्हणाले, “आम्हाला तसे करता येत नाही, कारण सर्व कळप एकत्र आल्यावरच आम्ही विहिरीवरील दगड बाजूला सारतो व मग सर्व कळपांना पाणी पाजतो.” 9 याकोब मेंढपाळांशी बोलत असतानाच राहेल आपल्या बापाची मेंढरे घेऊन आली; (कारण शेरडा मेंढराना चारण्याचे व त्यांची निगा राखण्याचे काम ती करीत असे.) 10 राहेल ही याकोबाच्या मामाची म्हणजेच याकोबाची आई रिबका हिचा भाऊ लाबान याची मुलगी होती. याकोबाने जेव्हा राहेलीस पाहिले तेव्हा त्याने जाऊन विहिरीच्या तोंडावरील दगड लोटला आणि आपल्या मामच्या मेंढरास पाणी पाजले. 11 नंतर त्याने राहेलीचे चुंबन घेतले आणि तो खूप रडला; 12 आपण तिच्या बापाच्या आप्तातील असल्याचे म्हणजे तिच्या बापाची धाकटी बहीण रिबका हिचा मुलगा असल्याचे त्याने राहेलीस सांगितले; तेव्हा राहेल धावत घरी गेली आणि या गोष्टी तिने आपल्या बापाला सांगितल्या. 13 आपला भाचा याकोब आल्याचे वर्तमान लाबानाने ऐकले तेव्हा लाबान धावत त्याला भेटावयास गेला; त्याने याकोबला मिठी मारली व त्याची चुंबने घेतली आणि त्याला आपल्या घरी आणले; मग याकाबाने घडलेल्या सर्व गोष्टी आपला मामा लाबान याला सांगितल्या. 14 मग लाबान म्हणाला, “हे आश्चर्य आहे की आपले रक्ताचे नाते आहे;” तेव्हा त्यानंतर याकोब एक महिनाभर लाबानापाशी राहिला. 15 5एके दिवशी लाबान याकोबाला म्हणाला, “तू माझ्या घरी, काही मोबदला न घेता गुलामासारखे काम करीत राहावेस हे योग्य नाही; तू माझा नातलग आहेस; तर तुला मी काय वेतन द्यावे ते सांग.” 16 लाबानाला दोन मुली होत्या; थोरल्या मुलीचे नाव होते लेआ आणि धाकटीचे राहेल. 17 लेआचे डोळे अधू आणि निस्तेज होते. परंतु राहेल सुडौल बांध्याची व दिसावयास सुंदर होती; 18 याकोबाचे राहेलीवर प्रेम जडले होते; म्हणून याकोब लाबानमामास म्हणाला, “तुम्ही मला तुमच्या धाकट्या मुलीशी राहेलीशी लग्न करण्याची परवानगी देणार असाल तर मी तुमच्या घरी सात वर्षे तुमची सेवाचाकरी करीन.” 19 लाबान म्हणाला, “परक्या कोणापेक्षा तिने तुझ्याशी लग्न करावे हे तिच्यासाठी चांगले आहे; म्हणून तू आता माझ्यापाशी राहा.” 20 म्हणून मग याकोब आपल्या मामापाशी राहिला आणि त्याने सात वर्षे त्याची सेवाचाकरी केली; परंतु राहेलीवरील गाढ प्रेमामुळे ती वर्षे त्याला फार थोड्या दिवसासारखी वाटली. 21 सात वर्षेनंतर याकोब लाबानाला म्हणाला, “आता मला राहेल द्या म्हणजे मी तिच्याशी लग्न करीन कारण तुमच्या सेवा चाकरीचा माझा वेळ संपलेला आहे.” 22 तेव्हा लाबानाने तेथील सर्वलोकांस मेजवानी दिली; 23 त्या रात्री लाबानाने आपली थोरली मुलगी लेआ याकोबाच्या स्वाधीन केली; त्या रात्री याकोब व त्याची बायको लेआ यांनी एकत्र निजून विवाहाच्या जीवनाचा आनंद उपभोगला; 24 (लाबानाने आपली दासी जिल्या आपल्या मुलीची दासी म्हणून तिला दिली.) 25 दुसऱ्या दिवशी सकाळी याकोबाने लेआला पाहिले तेव्हा आपण रात्री लेआबरोबर एकत्र निजलो असे त्याला समजले; मग याकोब लाबानाला म्हणाला, “तुम्ही मला फसवले; मला राहेलीशी लग्न करता यावे म्हणून मी अतिशय काबाडकष्ट केले; तुम्ही मला असे का फसवले?” 26 लाबान म्हणाला, “आमच्या देशातील रीतीरिवाजा प्रमाणे आधी थोरल्या मुलीचे लग्न झाल्या शिवाय आम्ही धाकटया मुलीचे लग्न करुन देत नाहीं; 27 तरी परंतु हा लग्न विधी सप्ताह सोहळा साजरा करण्यात सहभागी हो म्हणजे मग मी तुला लग्न करण्यासाठी राहेलही देतो; परंतु त्यासाठी तू आणखी सात वर्षे माझी सेवाचाकरी केली पाहिजेस.” 28 त्याप्रमाणे याकोबाने आठवडाभर तो सर्व लग्न सोहळा पूर्ण केला; मग लाबानाने त्याची धाकटी कन्या राहेल त्याला बायको करुन दिली; 29 (लाबानाने आपली दासी बिल्हा, आपली कन्या राहेल हिला दासी म्हणून दिली.) 30 तेव्हा मग याकोब राहेलीशीही एकत्र निजला; आणि याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम होते, म्हणून लाबानाकडे याकोबाने राहेलीसाठी आणखी सात वर्षे सेवा चाकरी केली. 31 परमेश्वराने पाहिले की याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम आहे, म्हणून परमेश्वराने लेआला मुले होऊ दिली परंतु राहेलीस मूलबाळ दिले नाही; 32 लेआला मुलगा झाला; तिने त्याचे नाव रऊबेन ठेवले; कारण ती म्हणाली, “परमेश्वराने माझे दु:ख पाहिले आहे; कारण माझा नवरा माझ्यावर प्रेम करीत नाही; परंतु आता कदाचित तो माझ्यावर प्रेम करील.” 33 लेआ पुन्हा गरोदर राहिली आणि तिला आणखी एक मुलगा झाला; ह्या मुलाचे नाव तिने शिमोन ठेवले, कारण ती म्हणाली, “माझ्या नवऱ्याचे माझ्यावर प्रेम नाही हे परमेश्वराने ऐकले आहे म्हणून त्याने मला हा मुलगा दिला आहे.” 34 लेआ आणखी गर्भवती झाली व तिला मुलगा झाला; तेव्हा तिने त्याचे नाव लेवी असे ठेवले; कारण ती म्हणाली, “आता मात्र माझा नवरा माझ्यावर नक्की प्रेम करील कारण मी त्यांना तीन मुलगे दिले आहेत.” 35 त्यानंतर लेआला आणखी एक मुलगा झाला; तिने त्याचे नाव यहूदा ठेवले; करण ती म्हणाली, “आता मी परमेश्वराची स्तुति करीन.” नंतर तिचे जनन थांबले.

30:1 याकोबापासून आपल्याला मुले होत नाहीन हे पाहिल्यावर राहेल आपली बहीण लेआ हिचा मत्सर करु लागली; तेव्हा राहेल याकोबला म्हणाली, “मला मुले देणारी करा नाही तर मी मरेन.” 2 याकोब राहेलीवर रागावला; तो म्हणाला, “तुला पुत्रवती करायला मी काय देव आहे? देवानेच तुला मुले होऊ नयेत असे करुन ठेवले आहे.” 3 मग राहेल म्हणाली, “तुम्ही माझी दासी बिल्हा उपपत्नी म्हणून घ्या; तुम्ही तिच्याजवळ निजा; मग ती माझ्या मांडीवर बाळंत होईल व तिजपासून मला मूल मिळेल; तिच्यामुळे मग मलाही मुलगा होईल आणि मी आई होईन.” 4 तेव्हा राहेलीने बिल्हा आपला नवरा याकोब ह्याला उपपत्नी म्हणून दिली; आणि याकोब तिजपाशी गेला; 5 तेव्हा बिल्हा याकोबापासून गरोदर राहिली व तिला मुलगा झाला. 6 राहेल म्हणाली, “देवाने माझी प्रार्थना ऐकली आहे. त्याने मला मुलगा देण्याचे ठरवले;” म्हणून तिने त्याचे नाव दान ठेवले. 7 बिल्हा पुन्हा गर्भवती झाली व तिला याकोबापासून दुसरा मुलगा झाला; 8 राहेल म्हणाली, “मी माझ्या बहिणीशी जिद्दीने स्पर्धा करुन कठीन लढा दिला आहे व जय मिळवला आहे.” तेव्हा तिने त्याचे नाव नफताली ठेवले. 9 लेआने असे पाहिले की, आता आपल्याला आणखी मुले होणार नाहीत; तेव्हा तिने आपली दासी जिल्पा हीला आपला नवरा याकोब याला उपपत्नी म्हणून दिली. 10 नंतर जिल्पाला मुलगा झाला; 11 तेव्हा लेआ म्हणाली, “मी कितीतरी भाग्यवान आहे;” तेव्हा तिने त्याचे नाव गाद ठेवले. 12 जिल्पाला आणखी एक मुलगा झाला; 13 तेव्हा लेआ म्हणाली, “आता मला खूप आनंद झाला आहे! इतर स्त्रिया मला धन्य म्हणतील” मग तिने त्याचे नाव आशेर ठेवले. 14 गव्हाच्या हंगामाच्या दिवसात रुबेन शेतात गेला असता त्याला काही विशेष प्रकारची फुले सांपडलीत्याने ती फुले आपली आई लेआ हिच्याकडे आणून दिली; परंतु राहेल लेआला म्हणाली, “तुझा मुलगा रुबेन याने आणलेल्या पुत्रदात्रीच्या फुलातून काही फुले कृपा करुन मला दे.” 15 लेआने उत्तर दिले, “अगोदरच तू माझा नवरा घेतलास तर घेतलास, आणि आता माझ्या मुलाने आणलेली पुत्रदात्रीची फुलेही तू माझ्याकडून घेण्याचा प्रयत्न करतेस काय?”परंतु राहेल म्हणाली, “जर तुझ्या मुलाने आणलेली पुत्रदात्रीची फुले मला देशील तर त्यांच्या मोबदल्यात आज रात्री तुला याकोबापाशी निजावयाला मिळेल.” 16 याकोब शेतावरुन त्या रात्री घरी आला; लेआने त्याला पाहिले व ती त्याला भेटावयास बाहेर गेली; व ती म्हणाली, “आज रात्री तुम्ही माझ्याजवळ निजणार आहात कारण माझ्या मुलाने आणलेली पुत्रदात्रीची फुले राहेलीस देऊन मी त्यांचा मोबदला भरुन दिला आहे.” तेव्हा याकोब त्या रात्रीं लेआपाशी निजला. 17 तेव्हा देवाने लेआची कूस फलदायी केली व ती पुन्हा गर्भवती होऊन तिला पाचवा मुलगा झाला; 18 लेआ म्हणाली, “देवाने माझ्या कृत्याचे मला बक्षीस दिले आहे कारण मी माझी दासी माझ्या नवऱ्याला दिली.” तेव्हा लेआने आपल्या मुलाचे नाव इस्साखार ठेवले. 19 लेआ पुन्हा गरोदर राहिली व तिला सहावा मुलगा झाला. 20 ती म्हणाली, “देवाने मला उत्तम देणगी दिली आहे; आता मात्र माझा नवरा प्रेमाने माझा स्वीकार करील कारण मी त्याला सहा मुलगे दिले आहेत;” म्हणून लेआने त्याचे नाव जबुलून ठेवले. 21 त्यानंतर लेआला एक मुलगी झाली; तिने तिचे नाव दीना ठेवले 22 मग देवाने राहेलीची प्रार्थना ऐकली; देवाने तिला मुल होणे शक्य केले; 23 म्हणून राहेल गर्भवती झाली व तिला मुलगा झाला; 24 राहेल म्हणाली, “देवाने माझी लाजीरवाणी स्थिती दूर करुन मला मुलगा दिला आहे.” म्हणून राहेलीने त्याचे नाव योसेफ ठेवले. 25 मग योसेफाच्या जन्मानंतर याकोब लाबानाला म्हणाला, “आता मला माझ्या स्वत:च्या घरी जाऊ द्या. 26 मला माझ्या बायका व माझी मुले द्या; मी कष्टाने तुमची सेवाचाकरी करुन ती मिळवली आहेस, मी चौदा वर्षे तुमची चांगली सेवा केली आहे हे तुम्ही जाणता.” 27 लाबान म्हणाला, “थांब, तुझी इच्छा असेल तर मला थोडे बोलू दे. परमेश्वराने केवळ तुझ्यामुळे मला आशीर्वादित केले आहे हे मी जाणतो. 28 तर मी तुला काय वेतन देऊ हे मला सांग म्हणजे ते मी तुला देईन.” 29 याकोबाने उत्तर दिले, “मी अतिशय कष्टाने तुमची सेवाचाकारी केली आहे हे तुम्ही जाणता; आजपर्यंत मी काळजी घेतल्यामुळे तुमचे कळप वाढले आहेत व ते चांगले पोसलेले आहेत; 30 मी जेव्हा तुमच्याकडे आलो तेव्हा तुम्हापाशी फार थोडी शेरडेमेंढरे होती; परंतु आता तुम्हापाशी किती तरी कळप आहेत; ज्या ज्या वेळी मी तुमच्यासाठी काही केले त्या प्रत्येक वेळी परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केले आहे. आता मात्र मी स्वत:साठी काही करण्याची व माझ्यासाठी घर बांधण्याची वेळ आली आहे. 31 लाबानेने विचारले, “तर मग मी तुला काय देऊ?”याकोबाने उत्तर दिले, “तुम्ही मला काही द्यावे असे मला नको आहे. मला फक्त मी केलेल्या सेवाचाकरीचा मोबदला पाहिजे; एकढी एकच गोष्ट करा, म्हणजे मग मी पूर्वीप्रमाणे आपले कळप चारीन व सांभाळीन; 32 परंतु आजच मला तुमच्या सगळ्या कळपात जाऊ द्या म्हणजे त्यांच्यात फिरुन त्यातील मेंढरापैकी ठिबकेदार व पट्टे असलेली मेंढरे व बकरे आणि काळ्या रंगाची मेंढरे तसेच शेरडांपैकी ठिबकेदार व पट्टे असलेली शेरडे मी बाजूला करीन; हेच माझे वेतन असेल. 33 त्यानंतर कधीही तुम्ही पाहाल तर मी प्रामाणिक आहे किंवा नाही हे सहज तुम्हाला दिसेल, तुम्ही कधीही येवून माझे कळप पाहू शकात; जर त्यात तुम्हाला ठिबकेदार व पट्टे नसलेली शेरडे व काळी नसलेली मेंढरे आढळली तर ती मी चोरली असे तुम्हाला समजेल.” 34 लाबानाने उत्तर दिले, “ठीक आहे, हे मी मान्य करतो; तू म्हणतोस तसे आपण करु;” 35 परंतु त्याच दिवशी लाबानाने ठिबकेदार व बांडे एडके तसेच ठिबकेदार व बांड्या शेळ्या आणि मेंढरापैकी काळी मेंढरे कळपातून काढून लपवली; गुपचूप ती आपल्या मुलांच्या हवाली केली व त्यांवर लक्ष ठेवून त्यांना सांभाळण्यास सांगितले; 36 तेव्हा त्याच्या मुलांनी ती ठिबकेदार व पट्टे असलेली सर्व जनावरे घेऊन मजला करीत तीन दिवसांच्या अंतरावरील दुसऱ्या जागी नेली; याकोब मात्र मागे राहून उरलेली म्हणजे ठिबके पट्टे व काळी नसलेली जनावरे सांभाळीत राहिला. 37 मग याकोबाने हिवर व बदाम या झाडांच्या हिरव्या कोवळ्या फांद्या कापून घेतल्या; त्याने त्यांच्या साली, त्याचे आतील पांढरे पट्टे दिसेपर्यंत त्या सोलून काढल्या; 38 त्याने त्या पांढऱ्या काळ्या किंवा पांढरे फोक कळपांच्या समोर पाणी पिण्याच्या पन्हाळात व कुंड्यात ठेवले जेव्हा शेळ्या मेंढ्या पाणी पिण्यास तेथे येत तेव्हा त्यांच्यावर त्याचे नर उडत व त्या फळत 39 तेव्हा त्यांना ठिबकेदार, पांढऱ्या पट्टयांची किंवा काळी करडे कोकरे होत असत. 40 याकोब कळपातील इतर जनावरातून ठिबकेदार, पांढऱ्या पट्टयांची व काळी करडे कोंकरे लाबानाच्या कळपापासून वेगळी करुन ठेवत असे. 41 जेव्हा जेव्हा कळपातील चांगली पोसलेली जनावरे फळत असत तेव्हा तेव्हा याकोब त्या पांढऱ्या फांद्या त्यांच्या नजरे समोर ठेवी आणि मग ती जनावरे त्या फांद्या समोर फळत; 42 परंतु जेव्हा दुर्बल, अशक्त जनावरे फळत तेव्हा याकोब त्यांच्या नजरे समोर त्या झाडांच्या फांद्या ठेवत नसे; म्हणून मग अशक्त नरमाद्यापासून झालेली करडी कोंकरे लाबानाची होत; आणि सशक्त नरमाद्यापासून झालेली करडी कोंकरे लाबानाची होत; 43 अशा प्रकारे याकोब अतिशय श्रीमंत झाला; त्याच्यापाशी शेरडेमेंढरे, उंट, गाढवे व दासदासी हे सर्व भरपूर होते.

31:1 एके दिवशी लाबानाचे मुलगे आपसात बोलत असताना याकोबाने ऐकले; ते म्हणाले, “आपल्या बापाच्या मालकीचे सर्वकाही याकोबाने घेतले आहे आणि ती धनदौलत घेतल्यामुळे तो श्रीमंत झाला आहे.” 2 तेव्हा लाबान पूर्वी आपल्याशी जसा मित्राप्रमाणे प्रेमाने वागत आला होता तसा तो आता वागत नसल्याचे याकोबाच्या लक्षात आले; 3 परमेश्वर याकोबाला म्हणाला, “तुझे पूर्वज ज्या देशात राहिले त्या तुझ्या देशास तू परत जा, आणि मी तुझ्याबरोबर असेन.” 4 तेव्हा याकोबाने राहेल व लेआ यांना, तो आपले शेरडामेंढरांचे कळप राखीत होता तो तेथे येऊन त्याला भेटण्यास सांगितले; 5 याकोब, राहेल व लेआ यांना म्हणाला, “तुमचा बाप माझ्यावर रागावला असल्याचे मला समजले आहे; पूर्वी तुमचा बाप माझ्याशी नेहमी मित्राप्रमाणे फार प्रेमाने वागत होता, परंतु आता ते तसे वागत नाहीत; परंतु माझ्या वडिलांचा देव माझ्याबरोबर आहे. 6 तुम्हां दोघींनाही माहीत आहे की जेवढे कष्ट घेणे मला शक्य होते तेवढे कष्ट घेऊन मी तुमच्या बापासाठी काम केलेले आहे; 7 परंतु तुमच्या बापाने मला फसवले; त्यानी माझ्या वेतनात दहा वेळा बदल केलेला आहे; परंतु या सर्व काळात लाबानाच्या फसवणूकीच्या कारवाया पासून देवाने माझे रक्षण केले. 8 “एकदा लाबान म्हणाला, ‘सर्व ठिबकेदार शेळ्या तू ठेवून घे, त्या तुला वेतनादाखल होतील,’ त्याने असे म्हटल्यानंतर सर्व शेळ्यांना ठिबकेदार करडे होऊ लागली; तेव्हा अर्थात् ती सर्व माझी झाली; परंतु मग लाबान म्हणाला, ‘तू बांड्या बकऱ्या घे; त्या तुला वेतना दाखल होतील;’ त्याने असे म्हटल्यानंतर सर्व बकऱ्यांना बांडी करडे होऊ लागली, 9 तेव्हा अशा रीतीने देवाने तुमच्या बापाच्या कळपातून जनावरे काढ्न घेऊन ती मला दिलेली आहेत. 10 “जेव्हा माद्यावर नर उडत होते त्या ऋतूत मला स्वप्न पडले त्यात मी असे पाहिले की फक्त ठिबकेदार व बांडे असलेलेच नर उडत होते; 11 देवदूत माझ्याशी बोलला; त्याने मला, ‘याकोब’ म्हणून हाक मारली.मी उत्तर दिले, ‘काय आज्ञा आहे?’ 12 “देवदूत म्हणाला, ‘पाहा, फक्त ठिबकेदार व बांडे असलेलेच नर माद्यांवर उडत आहेत! हे मी घडवून आणीत आहे. लाबान तुझ्याशी अन्यायाच्या गोष्टी कशा करीत आहे ते मी पाहिलेले आहे; म्हणूनच मी हे करीत आहे की त्यामुळे तुला नवीन जन्मलेली सर्व करडे मिळावीत. 13 बेथेलमध्ये जो मी तुझ्याकडे आला तो मी देव; आहे; त्या ठिकाणी तू वेदी बांधलीस, तिच्यावर तेल ओतलेस आणि तू मला वचन दिलेस आता तू ज्या देशात जन्मलास त्या आपल्या मायदेशी परत जाण्यास तयार असावेस अशी माझी इच्छा आहे.” 14 राहेल व लेआ यांनी याकोबाला उत्तर दिले, “आमच्या बापाच्या मरणानंतर आम्हास वारसा म्हणून मिळण्याकरिता त्यांच्याजवळ काही नाही; 15 आम्ही परक्या असल्यासारखे त्यानी आम्हाला वागवले त्याने आम्हांस तुम्हाला विकून टाकले आहे आणि आमचे सर्व पैसे खर्च करुन टाकले. 16 देवाने ही सर्व संपत्ती आमच्या बापाकडून घेतली आणि आता ती आपली व आपल्या मुळाबाळांची संपत्ती झाली आहे; तेव्हा देवाने तुम्हास जे करावयास सांगितले आहे ते करा!” 17 तेव्हा याकोबाने आपल्या प्रवासाची तयारी केली; त्याने आपल्या बायकामुलांना उंटावर बसवले; 18 नंतर आपला बाप राहात होता त्या कनान देशास परत जाण्यासाठी त्यांनी प्रवास सुरु केला; याकोबाच्या मालकीच्या जनावरांचे कळप त्यांच्यापुढे चालले, पदन अराम येथे राहात असताना त्याने मिळवलेली सर्व मालमत्ता त्याने आपल्या बरोबर नेली. 19 त्याच वेळी लाबान आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यास गेला होता; तो गेला असताना राहेल त्याच्या घरात गेली आणि तिने आपल्या बापाच्या कुलदेवतांच्या मूर्ती चोरल्या. 20 याकोबाने अरामी लाबानास फसवले; कारण आपण येथून निघून आपल्या देशाला जात आहो हे त्याने लाबानास सांगितले नाही; 21 याकोब आपली बायकांमुले व सर्व चीजवस्तू घेऊन ताबडतोब निघाला; त्यांनी फरात नदी ओलांडली आणि ते गिलाद डोंगराळ प्रदेशाकडे निघाले. 22 तीन दिवसानंतर याकोब पळून गेल्याचे लाबानास कळाले. 23 तेव्हा त्याने आपली माणसे एकत्र जमवली आणि याकोबाचा पाठलाग सुरु केला. सात दिवसांनतर गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाजवळ त्याला याकोब सापडला. 24 त्या रात्री देव लाबानाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “लाबाना, सावधान! तू याकोबाशी बोलताना प्रत्येक शब्द संभाळून वापर.” 25 दुसऱ्या सकाळी लाबानाने याकोबाला गाठले; याकोबाने डोंगरावर आपला तळ दिला होता म्हणून लाबानानेही आपल्या बरोबरच्या माणसासह गिलादाच्या डोंगराळ भागात आपला तळ दिला. 26 लाबान याकोबाला म्हणाला, “तू मला का फसवलेस? युद्धात धरुन नेलेल्या स्त्रियां प्रमाणे तू माझ्या मुलींना का घेऊन आलास? 27 तू मला न सांगता का पळून गेलास? तुला जायचे आहे असे तू मला सांगितले असतेस तर नाचगाणी बजावणी व संगिताची धामधूम या सहित मी तुला मेजवानी दिली असती; 28 अरे, तू मला माझ्या लाडक्या नातवांचा व माझ्या प्रिय मुलींचा निरोप घेण्याची संधी ही दिली नाहीस की त्यांची चुंबने घेण्यास सवड दिली नाहींस! तू हा अगदी मूर्खपणा केलास! 29 खरे तर अपाय करण्याची माझ्यात ताकद आहे परंतु गेल्या रात्री तुझ्या बापाचा देव माझ्या स्वप्नात आला आणि मी तुला कोणत्याच प्रकारे अपाय करु नये म्हणून त्याने मला ताकीद दिली आहे; 30 तुला तुझ्या बापाच्या घरी जायचे आहे हे मला माहीत आहे आणि म्हणूनच तू जाण्यास निघालास परंतु तू माझ्या घरातील कुलदेवाता का चोरल्यास?” 31 याकोबाने उत्तर दिले, “मी तुम्हाला न सांगता निघालो कारण मला भीती वाटली; मला विचार आला की तुम्ही तुमच्या मुली माइयापासून घेऊन जाल; 32 परंतु मी तुमच्या कुलदेवता मुळीच चोरल्या नाहीत. जर येथे माझ्याबरोबर असणाऱ्या कोणी तुमच्या कुलदेवता घेतल्या आहेत असे तुम्हाला आढळले तर ती व्यक्ती ठार केली जाईल; तुमची माणसे या बाबतीत माझे साक्षी असतील; तुमच्या कोणत्याही चीजवस्तूसाठी तुम्ही झडती घेऊ शकता; जे काही तुमचे असेल ते घेऊन जा.” (राहेलीने लाबानाच्या कुलदेवाता चोरल्या होत्या ते याकोबास माहीत नव्हते.) 33 म्हणून मग लाबानाने याकोबाच्या छावणीची झडती घेतली; त्याने याकोबाच्या तंबूची व नंतर लेआच्या तंबूची झडती घेतली; त्यानंतर त्याच्या घरातील कुलदेवता सापडल्या नाहीत. त्यानंतर लाबान राहेलीच्या तंबूत गेला. 34 राहेलीने त्या कुलदेवता आपल्या उंटाच्या कंठाळीत लपवून ठेवल्या होत्या आणि ती त्यांच्यावर बसली होती. लाबानाने सगळा तंबू शोधून पाहिला परंतु त्या कुलदेवता कोठेही सापडल्या नाहीत. 35 आणि राहेल आपल्या बापाला म्हणाली, “बाबा, मी आपल्यासमोर उभी राहू शकत नाही म्हणून माझ्यावर रागावू नका, कारण माझा मासिक धर्म आला आहे.” अशी रीतीने लाबानाने तळाची कसून तपासाणी केली परंतु त्याला कुलदेवता सापडल्या नाहीत. 36 मग याकोबाला फार राग आला. तो म्हणाला, “मी काय वाईट केले आहे? मी कोणता करार मोडला आहे? माझा पाठलाग करण्याचा आणि मला थांबविण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? 37 माझ्या मालकीच्या सर्व चीजवस्तू तुम्ही तपासून पाहिल्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या मालकीची एकही चीजवस्तू आढळली नाही; जर तुम्हाला तुमचे काही मिळाले असेल तर ते मला दाखवा; ते या ठिकाणी समोर ठेवा म्हणजे तुमची आमची माणसे ते बघतील. तुमच्या व माझ्यामध्ये कोण खरा आहे हे या माणसांना ठरवू द्या. 38 मी तुमची वीस वर्षे सेवाचाकरी केलेली आहे. त्या सर्व काळात एकही करडू किंवा कोकरु मेलेले जन्मले नाहीं; आणि तुमच्या कळपातील एकही एडका मी खाल्या नाही. 39 एखाद्या वेळी जर एखादी मेंढी जनावरांनी ठार मारली तर ती मी नेहमीच माझ्या कळपातून भरुन दिली. मी कधीही मेलेले जनावर तुमच्याकडे घेऊन आलो नाही आणि यात माझा काही दोष नाही असे म्हणालो नाही. दिवसा व रात्री मी तुमच्या कळपाची काळजी घेतली. 40 दिवसा सूर्याच्या उन्हातापाने माझी शक्ती क्षीण होई व रात्री थंडीगारठ्यामुळे माझ्या डोळ्यातील झोंप काढून घेतली जाई. 41 वीस वर्षे एखाद्या गुलामासारखी मी तुमची सेवाचाकरी केली; पाहिली चौदा वर्षे तुमच्या दोन मुली जिंकण्यासाठी आणि शेवटची सहा वर्षे तुमचे कळप वाढावेत म्हणून मी कष्ट केले; आणि त्या काळात दहा वेळा तुम्ही माझ्या वेतनात फेरबदल केला; 42 4परंतु माझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव आणि इसाहाकाचा देव (म्हणजे ‘भय’) माझ्या संगती होता. जर देव माझ्याबरोबर नसता तर तुम्ही मला रिकामेच माझ्या घरी पाठवले असते; परंतु देवाने मला झालेला त्रास पाहिला; देवाने मी कष्टाने केलेले काम पाहिले आणि काल रात्री देवाने सिद्ध करुन दाखवले की मी रास्त माणूस आहे.” 43 3लाबान याकोबाला म्हणाला, “ह्या मुली माझ्या कन्या आहेत आणि त्यांची मुले माझ्या ताब्यात आहेत आणि ही जनावरेही माझीच आहेत; येथे तू जे पाहतोस ते सर्व माझे आहे; परंतु माझ्या मुली व त्यांची मुले यांना ठेवून घेण्यासंबंधी मी काही करु शकत नाही. 44 म्हणून मी तुझ्याशी करार करण्यास तयार आहे. आपण करार केला आहे हे दाखविण्यासाठी खूण म्हणून येथे दगडांची रास रचू.” 45 तेव्हा याकोबास एक मोठा धोंडा सापडला. तो त्याने करार केला होता हे दाखविण्यासाठी तेथे ठेवला. 46 त्याने त्याच्या माणसांना आणखी काही दगड शोधून त्यांची रास करण्यास सांगितले. नतर त्या दगडांच्या राशीशेजारी बसून ते जेवले. 47 लाबानाने त्या जागेचे नाव यगर सहादूथा ठेवले; परंतु याकोबाने त्या जागेचे नाव गलेद ठेवले. (गलेद हे गिलादाचे दुसरे नाव, हिब्रू भाषेत ‘कराराची - दगडांची रास’) 48 लाबान याकोबास म्हणाला, “ही दगडांची रास आपण केलेल्या कराराची आठवण ठेवण्यास आपणा दोघास मदत करील.” म्हणूनच याकोबाने त्या जागेचे नाव गलेद ठेवले. 49 मग लाबान म्हणाला, “आपण एकमेकापासून अलग होत असताना परमेश्वर आपणावर लक्ष ठेवो.” म्हणून त्या जागेचे नाव मिस्पा ठेवण्यात आले. 50 नंतर लाबान म्हणाला, “जर का तू माझ्या कन्यांना दु:ख देशील तर देव तुला शिक्षा करील हे लक्षात ठेव. जर का तू इतर स्त्रियांशी लग्न करशील तर देव पाहात आहे हे लक्षात ठेव. 51 आपणामध्ये येथे साक्षी म्हणून मी ही दगडांची रास ठेवली आहे आणि हा येथे विशेष स्तंभ आहे त्यावरुन आपण येथे करार केला हे दिसेल. 52 ही रास व हा स्तंभ ही दोन्ही आपल्यातील कराराची आपणास आठवण देण्यास मदत करोत ही ओलांडून मी तुझ्या विरुद्व भांडणतंटा करण्यास तुझ्याकडे कधीही जाणार नाही आणि तू ही माझ्याविरुद्व भांडणतंटा करण्यास माझ्या बाजूकडे, ही ओलांडून कधीही येऊ नये. 53 जर आपण हा करार मोडल्याचा दोष करु तर अब्राहामाचा देव, नाहोराचा देव आणि त्यांच्या पितरांचा देव आमचा न्याय करो व आम्हास दोषी ठरवो.”याकोबाचा बाप, इसहाक देवाला “भय” म्हणत असे म्हणून याकोबाने “भय” हे नाव वापरुन शपथ घेतली. 54 मग याकोबाने त्या डोंगरावर एक पशू मारला व तो देवाला देणगी म्हणून अर्पण केला आणि त्याने आपल्या सर्व माणसांना भोजनासाठी येऊन सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. भोजन संपल्यावर त्यांनी ती रात्र डोंगरावरच घालवली. 55 दुसऱ्या दिवशी लाबान पहाटेस उठला. त्याने आपल्या कन्या व आपली नातवंडे यांची चुंबने घेऊन त्यांचा निरोप घेतला. त्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि मग तो आपल्या घरी परत गेला.

32:1 याकोबानेही ते ठिकाण सोडले. तो प्रवास करीत असताना त्याला देवदूत भेटले. 2 जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले तेव्हा तो म्हणाला, “हा देवाचा तळ आहे.” म्हणून त्याने त्या जागेचे नाव ‘महनाइम’ ठेवले. 3 याकोबाचा भाऊ एसाव सेइर नावाच्या देशात राहात होता. हा देश म्हणजे अदोमाचा डोंगराळ प्रांत होता. याकोबाने एसावाकडे निरोपे पाठवले. 4 त्याने त्यांना सांगितले “तुम्ही या सर्व गोष्टी माझे स्वामी एसाव त्यांना सांगा, ‘आपला सेवक याकोब असे म्हणतो की आजपर्यंत अनेक वर्षे मी लाबानाकडे राहिलो; 5 माझ्यापाशी पुष्कळ गाईगुरे, गाढवे, शेरडामेंढराचे कळप आणि दास व दासी आहेत. महराज, आपण आमचा स्वीकार करावा अशी विंनती करण्यासाठी मी आपणाकडे हा निरोप पाठवीत आहे.”‘ 6 निरोपे याकोबाकडे मागे आले आणि म्हणाले, “आम्ही आपला भाऊ एसाव याजकडे गेलो व त्यांस भेटलो तो आपणाला भेटावयास येत आहे; त्याच्या बरोबर चारशे माणसे आहेत.” 7 त्या निरोपामुळे याकोब घाबरला. आपल्या जवळच्या लोकांच्या त्याने दोन टोळ्या केल्या. तसेच शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि उंट गाढवे यांच्याही त्याने दोन टोळ्या केल्या. 8 त्याने विचार केला, “जर एसाव आला व त्याने एका टोळीचा नाश केला तर दुसरी टोळी पळून जाईल व वाचवली जाईल.” 9 याकोब म्हणाला, “माझे वडील अब्राहाम, इसहाक यांच्या देवा! परमेश्वरा! तू मला माझ्या देशात व माझ्या कुटुंबात परत येण्यास सांगितलेस; तसेच तू माझे कल्याण करशील असेही तू म्हणालास. 10 तू माझ्यावर दया केली आहेस आणि माझ्या करिता अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेस हे मी जाणतो. मी पहिल्याच वेळी यार्देन नदी उतरुन प्रवास केला तेव्हा माझ्याजवळ एका काठी शिवाय माझ्या मालकीचे काहीही नव्हते; परंतु आता माझ्या मालकीच्या, भरपूर वस्तूंच्या व माणसांच्या पूर्ण दोन टोळ्या आहेत. 11 मी तुझी प्रार्थना करतो की कृपाकरुन तू माझा भाऊ एसाव याच्यापासून मला वाचव; मला त्याची भीती वाटते, की तो येऊन आम्हा सर्वांस ठार मारील; मुलांच्या मातांनाही लेंकरासकट तो मारुन टाकील. 12 परमेश्वरा! तू मला वचन दिलेस, ‘मी तुझे भले करीन; मी तुझी संतनी वाढवीन आणि ती समुद्राच्या वाळू इतकी करीन; त्याची गणती करता येणार नाही एवढी ती करीन.” 13 त्या रात्री याकोब त्या ठिकाणी राहिला. त्याने एसावाला देणगी म्हणून देण्यासाठी काही गोष्टींची भेट तयार केली. 14 त्याने दोनशे शेळ्या व वीस बोकड, दोनशें मेंढ्या व वीस एडके, 15 तसेच तीस साडणी व त्यांची बछडी, चाळीस गाई व दहा खोंड, वीस गाढवी व दहा गाढवे घेतली व एवढ्यांचे वेगवेगळे कळप केले. 16 त्याने प्रत्येक कळप एकेका नोकराच्या ताब्यात दिला; मग तो नोकरांना म्हणाला, “प्रत्येक कळप वेगळा करा आणि कळपाकळपात थोडे अंतर ठेवून माझ्यापुढे चाला.” 17 याकोबाने चाकरांना आज्ञा दिल्या; जनावरांच्या पहिल्याच टोळीच्या चाकराला तो म्हणाला, “जेव्हा माझा भाऊ एसाव तुझ्याकडे येईल व विचारील, ‘ही कोणाची जनावरे आहेत? तू कोठे चाललास? तू कोणाचा नोकर आहेस?’ 18 तेव्हा तू त्याला असे उत्तर दे, ‘ही जनावरे आपला सेवक याकोब याच्या मालकीची आहेत. याकोबाने ही स्वामी आपल्याला भेट म्हणून पाठवली आहेत आणि याकोब आमच्या पाठोपाठ येत आहे.” 19 याकोबाने दुसऱ्या तिसऱ्या आणि इतर सर्व चाकरांना अशीच आज्ञा करुन अशाच प्रकारे उत्तर देण्यास सांगितले. तो म्हणाला, “तुम्हाला जेव्हा एसाव भेटेल तेव्हा तुम्ही असेच करावे. 20 तुम्ही म्हणावे, ‘ही आपणाकरिता भेट आहे आणि आपला दास याकोब आमच्या मागून येत आहे.”‘याकोबाने विचार केला, “जर मी ही माणसे भेटीसह पुढे पाठवली तर कदाचित एसाव मला क्षमा करील व माझा स्वीकार करील.” 21 म्हणून त्याप्रमाणे याकोबाने भेट पुढे पाठवली परंतु तो त्या रात्री तळावरच मागे राहिला. 22 मग याकोब रात्रीचाच उठला. त्याने आपल्या दोन्ही बायका, दोन्ही दासी आणि अकरा मुले यांस बरोबर घेतले आणि तो यब्बोक नदीच्या उतारापाशी नदी पार करुन गेला. 23 त्याने आपल्या कुटुंबातील सर्वांस नदी पार करुन पाठवले; नंतर त्याचे जे काही होते तेही सर्व त्याने नदी प करुन पलीकडे पाठवले. 24 नदी उतरुन पलीकडे जाण्यात याकोब सर्वात शेवटी होता; परंतु नदी उतरुन जाण्यापूर्वी तो अद्याप एकटाच असताना एक पुरुष आला व त्याने याकोबाशी झोंबी केली. सूर्य उगवेपर्यंत त्याने त्याच्याशी झोंबी केली 25 त्या माणसाने पाहिले की आपण याकोबावर मात करुन त्याचा पराभव करु शकत नाही म्हणून त्याने याकोबाच्या जांघेस स्पर्श केला तेव्हा याकोबाचा पाय जांघेच्या सांध्यातून निखळला. 26 मग तो पुरुष याकोबास म्हणाला, “आता मला जपरंतु याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिलाच पाहिजेस नाहीतर मी तुला जाऊ देणार नाही.” 27 तो पुरुष त्याला म्हणाला, “तुझे नाव काय आहे?”आणि याकोब म्हणाला, “माझे नाव याकोब आहे.” 28 तेव्हा तो पुरुष म्हणाला, “तुझे नाव याकोब असणार नाही. येथून पुढे तुझे नांव इस्राएल असेल. मी हे नांव तुला देत आहे कारण तू देवाशी व माणसांशी झोंबी केली आहेस आणि तू हरला नाहीस तर जिंकलास.” 29 मग याकोबाने त्याला विचारले, “कृपया तुझे नाव मला सांग.”परंतु तो पुरुष म्हणाला, “तू माझे नाव का विचारतोस?” त्यावेळी तेथेच त्या पुरुषाने याकोबाला आशीर्वाद दिला. 30 म्हणून याकोबाने त्या जागेचे नाव पनीएल ठेवले. याकोब म्हणाला, “ह्या ठिकाणी मी देवाला तोंडोतोंड पाहिले आहे परंतु माझा जीव वाचवला गेला.” 31 मग पनीएलाहून तो पुढे निघाला तेव्हा सूर्य उगवला. याकोब आपल्या पायामुळे लंगडत चालत होता. 32 म्हणून आजपर्यंत इस्राएल लोक जनावरांच्या जांघेच्या सांध्याजवळचा स्नायू खात नाहीत कारण याच स्नायूपाशी याकोबाला दुखापत झाली होती.

33:1 याकोबाने वर पाहिले आणि त्याला एसाव येताना दिसला; त्याच्या बरोबर चारशे माणसे होती. तेव्हा याकोबाने आपल्या कुटुंबाचे चार गट पाडले. लेआ व तिची मुले यांचा एक गट, राहेल व योसेफ यांचा आणखी एक गट, आणि त्याच्या दोन दासी व त्यांची आपली मुले यांचे वेगळे दोन गट होते. 2 याकोबाने त्याच्या दासी व त्यांची मुले यांना आघाडीला त्यानंतर त्याच्यामागे लेआ व तिची मुले आणि राहेल व योसेफ यांना सर्वात शेवटी ठेवले. 3 याकोब स्वत: एसावा पुढे सामोरा गेला म्हणून एसावा समोर पुढे आलेला तोच पहिला होता; आपला भाऊ एसाव याला सामोरा जात असताना त्याने सात वेळा भूमिपर्यंत लवून त्याला नमन केले. 4 एसावाने जेव्हा याकोबाला पाहिले तेव्हा त्याला भेटण्यास तो धावत गेला आणि आपल्या बाहुंचा विळखा त्याच्या भोवती टाकून त्याने गळयात गळा घालून याकोबाला मिठी मारली. त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले. 5 एसावाने आपल्या समोरील स्त्रिया व मुले पाहून विचारले, “तुझ्या बरोबर ही कोण मंडळी आहे?”याकोबाने उत्तर दिले, “देवाने मला दिलेली ही मुले आहेत, देवाने माझे कल्याण केले आहे.” 6 मग याकोबाच्या दोन दासी आपल्या मुलांबरोबर पुढे गेल्या आणि त्यांनी एसावाला लवून नमन केले. 7 त्यानंतर लेआ व तिची मुले, मग राहेल व योसेफ, एसावापुढे गेली आणि त्यांनी त्याला लवून नमन केले. 8 एसावाने विचारले, “इकडे येताना मला दिसले ते लोक कोण? व त्यांच्या बरोबरची जनावरे कशासाठी?”याकोबाने उत्तर दिले, “आपण माझा स्वीकार करावा म्हणून देणगी दाखल मी आपणाला दिलेली ही भेट आहे.” 9 परंतु एसाव म्हणाला, “माझ्या बंघु तू मला काही भेट द्यावयाची नाही, मला माझ्याकरिता भरपूर आहे.” 10 याकोब म्हणाला, “नाही नाही; मी आपणाला आग्रहाची विनंती करतो, आपण जर खरोखर माझा स्वीकार करिता तर मग कृपाकरुन मी आपणाला देतो त्या भेटीचा स्वीकार करा; आपले तोंड मला पुन्हा पाहावयास मिळाले म्हणून मला फार आनंद होत आहे; जणू काय मला देवाचे मुख पाहावयास मिळाले आहे. आपण माझा स्वीकार करिता म्हणूनही मला अतिशय आनंद वाटतो; 11 म्हणून मी आग्रहाची विनंती करतो की मी आपणाला भेट देतो तिचा स्वीकार करा. देवाने माझे कल्याण केले आहे. माझ्यापाशी माझ्या गरजा पुरुन उरेल एवढे आहे.” या प्रमाणे भेटी दाखल दिलेल्या देणग्या घेण्यासाठी याकोबाने एसावास आग्रहाची विनवणी केली म्हणून मग एसावाने त्या देणग्यांचा स्वीकार केला. 12 मग एसाव म्हणाला, “आता तू वाटेस लाग व तुझा प्रवास पुढे चालू ठेव; मीही तुझ्याबरोबर चालतो.” 13 परंतु याकोब त्याला म्हणाला, “माझी मुले नाजुक आहेत हे आपणाला माहीत आहे; आणि माझ्या कळपातली दुभती जनावरे व त्यांची कच्ची बच्ची, करडे कोंकरे, वासरे यांची मला काळजी घेतली पाहिजे. मी जर त्यांच्यावर एकाच दिवशी अधिक दौड लादली तर सगळी जनावरे मरुन जातील; 14 तर माझे स्वामी आपण पुढे निघा; मी माझी गायीगुरे, शेरडेमेंढरे इत्यादी जनावरांना जितके चालवेल आणि माझी लहानमुलेही थकणार नाहीत अशा चालीने चालेन व आपणास सेईर येथे येऊन भेटेन.” 15 तेव्हा एसाव म्हणाला, “मग मी माझ्या माणसातून काही माणसे तुला मदत करण्यासाठी मागे ठेवितो;”परंतु याकोब म्हणाला, “ही तर माझ्या स्वामीची माझ्यावर कृपा आहे; परंतु माणसे ठेवण्याची तशी गरज नाही.” 16 तेव्हा त्याच दिवशी एसाव सेईरास परत जाण्यास निघाला. 17 याकोब गांवास गेला; तेथे त्याने स्वत:साठी घर बांधले आणि गुरांढोरांसाठी खोपट्या बांधल्या म्हणून त्या ठिकाणाचे नाव सुक्कोथ पडले. 18 याकोबाने पदन आरामपासून सुरु केलेला प्रवास कनान देशातील शखेमला सुखरुपपणे संपवला व त्या नगराजवळील एका शेतात आपला तळ दिला. 19 ते शेत त्याने शखेमाचा बाप हमोर याच्या वंशजाकडून शंभर कसिटा (चांदीची नाणी) देऊन विकत घेतले; 20 देवाची उपासना करण्यासाठी त्याने तेथे एक वेदी बांधली. त्याने त्या ठिकाणाचे नाव “एल, इस्राएलाचा देव ठेवले.”

34:1 दीना ही लेआ व याकोब यांची मुलगी होती. एके दिवशी ती त्या देशाच्या स्त्रियांना पाहाण्यास बाहेर गेली. 2 तेव्हा त्या देशाचा राजा हमोर याचा मुलगा शखेम याने दीनाला पाहिले आणि तो तिला बळजबरीने घेऊन गेला व तिच्या बरोबर निजून त्याने तिला भ्रष्ट केले. 3 शखेमाचे दीनावर प्रेम जडले आणि तिने त्याच्याशी लग्न करावे म्हणून त्याने तिची मनधरणी केली. 4 शखेमाने आपल्या बापास सांगितले, “कृपा करुन ही मुलगी मला मिळवून द्या; मला तिच्याशी लग्न करावयाचे आहे.” 5 आपल्या मुलीशी त्या मुलाने भयंकर वाईट कर्म करुन तिला भ्रष्ट केले हे याकोबास समजले परंतु त्याची सर्व मुले गुरांढोरांबरोबर रानात होते म्हणून ते घरी येईपर्यंत त्याने या बाबतीत काहीही केले नाही. 6 त्याच वेळी इकडे शखेमाचा बाप हमोर संबंधीत बोलणी करण्यासाठी याकोबाकडे गेला. 7 नगरात जे काही घडले त्या विषयीची बातमी याकोबाच्या मुलांनी शेतात ऐकली तेव्हा त्यांचा राग भयंकर भडकला, इतका की ते रागाने वेडे झाले, कारण याकोबाच्या मुलीशी केलेल्या वाईट कर्मामुळे शखेमाने इस्त्राएलाची अब्रू घेतली होती; म्हणून मग ते सगळे भाऊ शेतातून घरी आले. 8 परंतु हमोर त्या भावांशी बोलला. तो म्हणाला, “माझा मुलगा शखेम दीनाशी लग्न करावयास फार आतुर झाला आहे. 9 ह्या लग्नामुळे तुमच्या आमच्यामध्ये विशेष करार झाल्याचे दिसून येईन. मग त्यामुळे आमचे पुरुष तुमच्या स्त्रियांशी व तुमचे पुरुष आमच्या स्त्रियांशी लग्ने करु शकतील. 10 तसेच त्यामुळे तुम्ही ह्याच देशात आमच्या बरोबर राहूं शकाल; येथील जमीनजुमला विकत घेऊन येथे वतन मिळविण्यास व येथेच व्यापार उदीम करण्यास तुम्हाला मोकळीक मिळेल.” 11 शखेम देखील याकोबाशी व दीनाच्या भावांशी बोलला; तो म्हणाला, “कृपा करुन माझा स्वीकार करा; तुम्ही जे काही करण्यास मला सांगाल ते मी जरुर करीन; 12 तुम्ही मला फक्त दीनाशी लग्न करण्यास परवानगी द्या मग तुम्हाला पाहिजे ते म्हणजे रीतीप्रमाणे बायको साठी द्यावयाचे ते किंवा तुम्ही जे काही मागाल ते मी जरुर देईन.” 13 याकोबाच्या मुलांनी शखेम व त्याचा बाप यांच्याशी खोटेपणाने वागावयाचे ठरवले. आपल्या बहिणीला भ्रष्ट केल्यामुळे ते भाऊ अद्याप संतापाने वेडे झाले होते. 14 तेव्हा ते भाऊ त्याला म्हणाले, “आम्ही तुला आमच्या बहिणीशी लग्न करु देणे शक्य नाही कारण अद्याप तुझी सुंता झालेली नाहीं. आमच्या बहिणीने तुझ्याशी लग्न करणे चुकीचे, अनीतीचे व कलंक लावणारे होईल; 15 पण तू जर एवढी एक गोष्ट करशील तर मग आम्ही तुला तिच्याशी लग्न करु देऊ: ह्या नगरातील सगळ्या पुरुषांची आमच्या प्रमाणे सुंता झाली पाहिजे; 16 मग तुमचे पुरुष आमच्या स्त्रियांशी व आमचे पुरुष तुमच्या स्त्रियांशी लग्न करु शकतील आणि मग आपण सर्व एक राष्ट्र होऊ. 17 पण जर तुम्ही सुंता करावयास नकार द्याल तर मग मात्र आम्ही दीनाला घेऊन जाऊ.” 18 ह्या करारामुळे हमोर व शखेम यांना फार आनंद झाला. 19 दिनाच्या भावांनी जे सांगितले ते लवकर करण्यास शखेमाला तर फारच उत्साह व आनंद वाटला.शखेम त्यांच्या घराण्यात सर्वांत आदरणीय होता. 20 हमोर व शखेम त्या नगरातील वेशीपाशी गेले व नगरातील लोकांशी बोलले. ते म्हणाले, 21 “ह्या इस्राएल लोकांची आपल्याशी मैत्रीचे संबंध ठेवावयाची खरोखरच इच्छा आहे. त्यांना आपणामध्ये आपल्या देशात राहू द्यावे. व व्यापार करु द्यावा. त्यांनी आमच्याशी शांततेने राहावे असे आपल्यालाही वाटते; आपल्या सर्वांना पुरेल एवढा आपला देश मोठा आहे. त्यांच्या स्त्रियांशी लग्ने करण्यास आपणास मोकळीक आहे आणि आपल्या स्त्रिया त्यांना लग्नात देण्यात आपल्यालाही आनंद आहे. 22 परंतु त्यांची एक अट पूर्ण करण्याचे आपण सर्वांनी कबूल केले पाहिजे; ती म्हणजे आपण सगळ्या पुरुषांनी या इस्राएल लोकांप्रमाणे सुंता करुन घेण्याचे मान्य केले पाहिजे. 23 जर हे आपण करु तर मग त्यांची शेरडेमेंढरे गुरेढोरे व संपत्ती आपल्याला मिळाल्याने आपण श्रीमंत होऊ; म्हणून आपण त्यांच्याशी असा करार केला पहिजे मग ते आपल्या बरोबर येथेच वस्ती करुन राहतील.” 24 तेव्हा वेशीतून येणाऱ्या सर्वांनी हे ऐकले व हमोर आणि शखेम यांचे म्हणणे मान्य केले; आणि त्यावेळी तेथील सर्व पुरुषांनी सुंता करुन घेतली. 25 तीन दिवसानंतर सुंता केलेले लोक जखमांच्या वेदनांनी बेजार झालेले असताना, याकोबाची दोन मुले शिमोन व लेवी यांना माहीत होते की ते लोक आता दुर्बल व कमकुवत असणार म्हणून मग ते नगरात गेले व त्यांनी तेथील सर्व पुरुषांना ठार मारले. 26 दीनाच्या त्या दोन भावांनी शिमोन आणि लेवी यांनी हमोर व त्याचा मुलगा शखेम यांनाही ठार मारले. नंतर दीनाला शखेमाच्या घरातून बाहेर काढून ते तिला घेऊन तेथून निघाले. 27 नंतर याकोबाची सर्व मुले नगरात गेली आणि त्यांनी तेथील सर्व चीज वस्तू लुटल्या, कारण त्यांच्या बहिणीला शखेमाने भ्रष्ट केल्याने त्यांच्या रागाचा पारा अद्याप खूपच चढलेला होता. 28 तेव्हा त्यांनी त्या लोकांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे, गाढवे इत्यादी सर्व जनावरे आणि घरातील व शेतातील सर्व वस्तू लुटल्या; 29 तसेच त्यांनी तेथील लोकांच्या मालकीची धनदौलत, मालमत्ता व सर्व चीजवस्तू आणि त्यांच्या बायका व मुलेबाळे देखील घेतली. 30 परंतु याकोब, शिमोन व लेवी यांना म्हणाला, “तुम्ही मला खूप त्रास देऊन संकटात टाकले आहे; आता या देशाचे रहिवासी कनानी व परिज्जी माझा द्वेष करतील व माझ्या विरुद्ध उठतील; आपण थोडकेच लोक आहोत. या देशातील सर्वलोक एकत्र होऊन आपल्या विरुद्ध जर लढावयास आले तर मग माझ्याजवळच्या आपल्या सर्वांचा माझ्याबरोबर नाश केला जाईल.” 31 परंतु ते भाऊ म्हणाले, “आम्ही त्या लोकांना आमच्या बहिणीशी एखाद्या वेश्येप्रमाणे वागू द्यावे काय? नाही, कदापि नाही! त्या लोकांनी आमच्या बहिणीशी असे वागणे चुकीचे व अनीतीचे होते!”

35:1 देव याकोबाला म्हणाला, “तू बेथेल या नगरात जाऊन राहा; आणि तुझा भाऊ एसाव याजपासून तू पळून जात असताना त्या ठिकाणी ज्याने तुला दर्शन दिले त्या ‘एल’ (म्हणजे इस्राएलाचा देव) याची आठवण कर व त्याच देवाची उपासना करण्यासाठी तेथे एक वेदी बांध.” 2 तेव्हा याकोब आपल्या घरच्या मंडळीस व आपल्याबरोबरच्या सगळ्या दासांना म्हणाला, “तुमच्या जवळ असलेले लाकडांचे व धातूंचे परके देव फोडून तोडून टाका; तुम्ही स्वत:ला शुद्ध करा; स्वच्छ कपडे घाला; 3 आपण येथून निघून बेथेलास जाऊ; मी त्रासात व संकटात असताना ज्याने मला मदत केली त्या देवासाठी मी तेथे तेथे माझ्याबरोबर असत आला आहे.” 4 तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या जवळ असलेले सर्व परके देव आणून याकोबाला दिले आणि त्यांनी आपल्या कानातील कुंडलेही काढून दिली; तेव्हा याकोबाने त्या सर्व वस्तू शखेम नावाच्या नगराजवळील एका एला झाडाच्या खाली पुरुन टाकल्या. 5 याकोब व त्याची मुले यांनी ठिकाण सोडले. त्या भागात राहाणाऱ्या लोकांना त्याचा पाठलाग करुन त्यांना ठार मारावयास पाहिजे होते परंतु त्यांना फार भीती वाटलीम्हणून त्यांनी याकोबाचा पाठलाग केला नाही. 6 अशा रीतीने याकोब व त्याचे लोक कनान देशात लूज येथे पोहोंचले; त्यालाच आता बेथेल म्हणतात. 7 याकोबाने तेथे एक वेदी बांधली, व त्या ठिकाणाचे नाव “एल बेथेल” असे ठेवले; याकोबाने या जागेसाठी हे नाव निवडले कारण आपला भाऊ एसाव याजपासून पळून जाताना ह्याच जागी प्रथम देवाने त्याला दर्शन दिले होते. 8 रिबकेची दाई दबोरा ह्या ठिकाणी मरण पावली तेव्हा त्यांनी तिला बेथेल येथे एका एला झाडाच्या खाली पुरले; त्या जागेचे नाव त्यांनी अल्लोन बाकूथ’ असे ठेवले. 9 पदन अराम येथून याकोब परत आल्यावर देवाने त्याला पुन्हा दर्शन देऊन आशीर्वाद दिला. 10 देव याकोबाला म्हणाला, “तुझे नाव याकोब आहे मी ते बदलतो; तुला आता याकोब म्हणणार नाहीत तर तुझे नवे नाव इस्राएल’ असे असेल;” आणि म्हणून देवाने त्याला इस्राएल हे नाव दिले. 11 देव त्याला म्हणाला, “मी सर्व शक्तिमान देव आहे; तुला भरपूर संतती होवो आणि त्यांची वाढ होऊन त्यांचे एक महान राष्ट्र बनो. तसेच तुझ्यातून इतर राष्ट्रे व राजे निर्माण होवोत; 12 मी अब्राहाम व इसहाक यांना जो काही विशिष्ट देश दिला, तो आता मी तुला व तुझ्यामागे राहणाऱ्या तुझ्या संततीला देतो.” 13 मग देव तेथून निघून गेला. 14 मग याकोबाने तेथे स्मारक म्हणून दगडाचा एक स्तंभ उभा केला त्याने त्यावर पेयार्पण म्हणून द्राक्षारस व तेल ओतून तो पवित्र केला. तेव्हा हे एक विशेष ठिकाण झाले कारण येथेच देव याकोबाशी बोलला आणि म्हणून याकोबाने त्या ठिकाणाचे नाव बेथेल ठेवले. 15 16 याकोब व त्याच्या बरोबराचा लवाजमा म्हणजे त्याची, घरची मंडळी व इतर माणसे हे सर्व बेथेल येथून निघाले, ते इफ्राथ (म्हणजे बेथलहेम) गांवाच्या अगदी जवळ आले असताना तेथे पोहोंचण्यापूर्वी राहेलीस प्रसूती वेदना सुरु झाल्या. 17 परंतु राहेलीस यावेळी प्रसूती वेदनांचा अतिशय त्रास होत होता; त्याचवेळी राहेलीची सुईण तिची कठीण अवस्था पाहून तिला म्हणाली, “भिऊ नकोस राहेल, तू आणखी एका मुलास जन्म देत आहेस.” 18 त्या मुलास जन्म देताना राहेल मरण पावली परंतु मरण्यापूर्वी तिने त्याचे नाव बेनओनी’ असे ठेवले; परंतु याकोबाने त्याचे नांव बन्यामीन’ असे ठेवले. 19 एक्राथ (म्हणजे बेथलहेम) गांवाला जाणाऱ्या वाटेजवळ राहेलीस पुरले 20 आणि याकोबाने तिच्या सन्मानाकरिता तिचे स्मारक म्हणून तिच्या कबरेवर एक दगडी स्तंभ उभा केला; तो स्तंभ आजपर्यंत तेथे कायम आहे. 21 त्यानंतर इस्राएलाने (याकोबाने) आपला पुढचा प्रवास चालू केला; आणि एदेर बुरुजाच्या अगदी दक्षिणे कडे आपला तळ दिला. 22 इस्राएल तेथे थोडा काळ राहिला, त्यावेळी रऊबेन, इस्राएलाची म्हणजे आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी निजला या विषयी इस्राएलाने ऐकले तेव्हा तो अतिशय संतापला.याकोब (इस्राएल) यास बारा मुलगे होते. 23 लेआ हिचे मुलगे - याकोबाचा पाहिला मुलगा रऊबेन आणिशिमोन, लेवी, यहुदा, इस्साखार व जबुलून; 24 राहेल हिचे मुलगे - योसेफ व बन्यामीन; 25 राहेलीची दासी बिल्हा हिचे मुलगे - दान व नफताली; 26 आणि लेआची दासी जिल्पा हिचे मुलगे गाद आशेर पदन अरामात झाले. 27 याकोब मग ‘किर्याथ अरबा’ (म्हणजे ‘हेब्रोन) येथीन मम्रे या ठिकाणी आपला बाप इसहाक याजकडे गेला. येथेच अब्राहाम व इसहाक हे राहिले होते. 28 इसहाक एकशे ऐंशी वर्षे जगला. 29 आणि दीर्घ आयुष्यानंतर तो अशक्त होऊन मरण पावला. त्याचे मुलगे एसाव व याकोब यांनी त्याला त्याच्या बापाला पुरले होते त्याच जागी पुरले.

36:1 एसाव (म्हणजे ‘अदोम’) याची वंशावळ 2 एसावाने कनानी मुलींशी लग्ने केली; त्याच्या बायका येणे प्रमाणे - एलोन हित्ती याची मुलगी आदा; सिबोन हिळी याचा मुलगा अना, त्याची मुलगी ओहोलीबामा 3 आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमथ. 4 एसावापासून आदेला झालेल्या मुलाचे नाव अलीपाज व बासमथला झालेल्या मुलाचे नाव रेऊल होते. 5 आणि ओहोलीबामेस, यऊश, यालाम व कोरह हे तीन मुलगे होते. हे एसावाचे मुलगे; हे त्याला कनान देशात झाले. 6 याकोब व एसाव यांच्या कुटुंबांची एवढी वाढ झाली की कनान देश सर्वांना पुरेनासा झाला म्हणून एसाव आपला भाऊ याकोब याजपासून बाजूला निघाला; तो आपल्या बायका, मुले, मुली तसेच सर्व नोकर चाकर, गाईगुरे व इतर जनावरे आणि कनान देशात त्याने मिळवलेली धनसंपत्ती व मालमत्ता हे सर्व घेऊन सेईर या डोंगराळ प्रदेशाकडे गेला. 7 8 9 एसाव हा अदोमी लोकांचा मुळ पुरुष होय. सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहाणाऱ्या एसावाची वंशावळ: 10 एसावाच्या मुलांची नाव-एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमाथ यांचा मुलगा रेऊल. 11 अलीपाजाला पांच मुलगे होते; तेमान, ओमार, सपो, गाताम व कनाज; 12 अलीपाज याची तिम्ना नावांची एक गुलामस्त्री होती; तिम्ना व अलीपाज यांना एक मुलगा झाला; त्याचे नाव अमालेक. 13 रेऊलास चार मुलगे होते. त्यांची नाव-नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा ही एसावाची नातवंडे होती.बासमथाच्या पोटी झालेल्या रगुवेलाची ही मुले. 14 सिबोनाचा मुलगा अना याची मुलगी अहलीबामा ही एसावाची तिसरी बायको होती. यऊश, यालाम व कोरह हे एसाव व अहलीबामा यांचे मुलगे होते. 15 एसावाचे मुलगे आपापल्या कुळांचे प्रमुख झाले ते हे -एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे मुलगे; तेमान, ओमार, सपो, कनाज 16 कोरह, गाताम व अमालेख;हे आपापल्या कुळांचे प्रमुख एसावास त्याची बायको आदा हिच्या पोटी झाले. 17 एसावाचा मुलगा रेऊल याचे मुलगे हे - नाहथ, जेरह, शाम्मा व मिज्जा;हे सर्व कूळप्रमुख एसावास त्याची बायको बासमथ हिच्या पोटीं झाले. 18 एसावाची बायको अनाची मुलगी अहलीबामा हिचे मुलगे-यऊश, यालाम व कोरह; हे तिघे जण आपापल्या कुळांचे प्रमुख झाले; 19 हे सर्व पुरुष एसावापासून (अदोमपासून) झालेल्या कुळांचे नेते होत. 20 एसावापूर्वी अदोममध्ये सेईर नावाचा एक होरी माणूस होता. त्याचे मुलगे हे - लोटन, शोबाल, सिबोन, 21 अना, दीशोन, एसर व दिशान; हे सेईराचे मुलगे होरी वंशातील आपापल्या कुळांचे प्रमुख झाले. 22 लोटानाचे मुलगे होते होरी व हेमाम. (तिम्ना ही लोटानाची बहीण होती.) 23 शोबालाचे मुलगे अलवान, मानहाथ, एबाल, शपो व ओनाम. 24 सिबोनाचे दोन मुलगे होते; अय्या व अना (आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे सांपडले तोच हा अना.) 25 अनाचा मुलगा दिशोन व अनाची मुलगी अहलीबामा. 26 दीशोनाला चार मुलगे होते;हेमदान, एश्बान, यित्रान व करान. 27 एसराला बिल्हान, जावान व अकान हे तीन मुलगे होते. 28 दीशानाला ऊस व अरान हे दोन मुलगे होते. 29 होरी कुळांचे जे प्रमुख झाले त्यांची नावे अशी - लोटान, शोबाल, सिबोन, अना, 30 दीशोन, एसर व दीशान, यहूदा प्रांताच्या पूर्वे कडील सेईर (अदोम) प्रदेशात राहाणाऱ्या आपापल्या कुळांचे हे प्रमुख झाले. 31 इस्राएलने राज्य करण्यापूर्वी अदोमला राजे होते. 32 बौराचा मुलगा बेला याने अद्रोमावर राज्य केले; दिन्हाबा नगर ही त्याची राजधानी होती. 33 बेला मेल्यावर बस्रा येथील जेरहाचा मुलगा योबाब हा त्याच्या जागी राजा झाला. 34 योबाब मेल्यावर तेमानी लोकांच्या देशाचा हुशाम याने त्याच्या जागी राज्य केले. 35 हुशाम मेल्यावर बदाद याचा मुलगा हदाद याने त्याच्या जागी राज्य केले. (यानेच मवाब देशात मिघानांचा पराभव केला) अवीत नगर ही त्याची राजधानी होती. 36 हदाद मेल्यावर मास्त्रेका येथील साम्ला याने त्या देशावर राज्य केले. 37 साम्ला मेल्यावर फरात (युफ्रेटीस) नदीवर असलेल्या रहोबोथ येथील शौल याने त्या देशावर राज्य केले. 38 शौल मेल्यावर अकबोराचा मुलगा बाल - हानान याने त्या देशावर राज्य केले. 39 बाल-हानान मेल्यावर हदार याने त्या देशावर राज्य केले. पाऊ हा त्याची राजधानी होती. त्याच्या बायकोचे नाव महेटाबेल होते; ही मे-जाहाबाची मुलगी मात्रेद हिची मुलगी होती. 40 एसावाच्या वंशातील कुळांप्रमाणे त्या त्या कुळांच्या प्रमुखांची नावे-तिम्ना, आल्वा, यतेथ, अहलीबामा, एला, पीनोन, कनाज तेमान, मिब्सार, माग्दीएल व ईराम हयातील प्रत्येक कूळ त्या कुळाचे नाव दिलेल्या प्रदेशात राहिले. 41 42 43

37:1 याकोब कनान देशात वस्ती करुन राहिला; येथेच त्याचा बापही राहिला होता. 2 याकोबाच्या वंशाचा हा वृत्तान्त आहे.योसेफ सतरा वर्षांचा उमदा तरुण होता. शेळ्यामेढ्यांचा सांभाळ करणे हे त्याचे काम होते. आपल्या भावांबरोबर (म्हणजे आपल्या बापाच्या बायका बिल्हा व जिल्पा यांच्या मुलांबरोबर) तो हे काम करीत असे; त्या भावांनी केलेल्या वाईट गोष्टीविषयी त्याने आपल्या बापाला सांगितले. 3 इस्राएल (याकोब) सर्व मुलांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करीत असे कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने योसेफाला एक विशेष सुंदर पायघोळ झगा दिला होता. 4 आपला बाप आपल्या इतर भावांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतो हे त्याच्या भावांना दिसले म्हणून ते योसेफाचा द्वेष करु लागले. यासेफाशी चांगल्या रीतीने बोलणे देखील त्यांनी सोडून दिले. 5 एकदा योसेफास एक विशेष स्वप्न पडले; नंतर त्याने ते स्वप्न आपल्या भावांना सांगितले; त्यानंतर तर त्याचे भाऊ त्याचा अधिक द्वेष करु लागले. 6 योसेफ, म्हणाला, “मला असे स्वप्न पडले. 7 आपण सर्वजण शेतात गव्हाच्या पेंढ्या बांधण्याचे काम करीत होतो; तेव्हा माझी पेंढी उठून उभी राहिली आणि तुम्हा सर्वांच्या पेंढ्या तिच्या भोवती गोलाकार उभ्या राहिल्या व त्यांनी माझ्या पेंढिला खाली वाकून नमन केले.” 8 हे ऐकून त्याचे भाऊ त्याला म्हणाले, “याचा अर्थ तू आमचा राजा होऊन आमच्यावर राज्य करणार असे तुला वाटते काय?” त्याच्या त्यांच्याविषयीच्या या स्वप्नामुळे तर त्याचे भाऊ आता त्याचा अधिकच द्वेष करु लागले. 9 नंतर योसेफाला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, “मला आणखी एक स्वप्न पडले; सूर्य चंद्र व अकरा तारे यांनी मला खाली वाकून नमन केलेले पाहिले.” 10 योसेफाने आपल्या बापालाही या स्वप्नाविषयी सांगितले; परंतु त्याच्या बापाने त्याबद्दल टीका करुन म्हटले, “असले कसले रे स्वप्न आहे हे? तुझी आई, तुझे भाऊ व मी आम्ही भूमीपर्यंत लवून तुला नमन करु असे तुला वाटते काय?” 11 योसेफाचे भाऊ त्याचा हेवा करीतच राहिले; परंतु योसेफाच्या बापाने या गोष्टी संबंधी खूप विचार केला आणि या गोष्टींचा काय अर्थ असावा या विषयी आश्चर्य करीत त्याने ते विचार आपल्या मनात ठेवले. 12 एके दिवशी योसेफाचे भाऊ आपल्या बापाची मेंढरे चारावयास शखेम येथे गेले. 13 याकोब योसेफाला म्हणाला, “तुझे भाऊ शखेम येथे आपल्या मेंढाराबरोबर आहेत; तू तेथे जा.”योसेफ म्हणाला, “बर, मी जातो.” 14 योसेफाचा बाप म्हणाला, “शखेमाला जा; आणि तुझे भाऊ सुखरुप आहेत का?; व माझी मेंढरे ठीक आहेत का ते पाहा व मागे येऊन मला त्यांच्या संबंधी सांग.” अशा रीतीने योसेफाच्या बापाने त्याला हेब्रोन दरीतून शखेमास पाठवले. 15 शखेमाजवळ योसेफ वाट चुकला; तो शेतात इकडे तिकडे भटकताना एका माणसाला आढळला त्या माणसाने त्याला विचारले, “तू कोणाला शोधत आहेस?” 16 योसेफाने उत्तर दिले, “मी माझ्या भावांना शोधत आहे; आपल्या मेंढरांबरोबर ते कोठे आहेत ते आपण मला सांगू शकाल का?” 17 तो माणूस म्हणाला, “ते अगोदरच येथून गेले आहेत; आपण दोथानास जाऊ असे त्यांस बोलताना मी ऐकले.” म्हणून मग योसेफ आपल्या भावांमागे गेला व ते त्याला दोथानात सांपडले. 18 योसेफाच्या भावांनी योसेफाला दुरुन येताना पाहिले आणि कट करुन त्याला ठार मारण्याचे ठरवले. 19 ते एकमेकांस म्हणाले, “हा पाहा, एकामागे एक स्वप्ने पडणारा योसेफ इकडे येत आहे. 20 आता आपल्याला शक्य आहे तोंवर याला आपण ठार मारुन टाकावे त्याचे शरीर एका कोरड्या खाड्यात फेकून देऊ आणि त्याला कोणाएका हिंस्र पशूने मारुन टाकले असे आपल्या बापाला सांगू; मग त्याची स्वप्ने काही कामाची नाहीत हे आपण त्याला दाखवून देऊ.” 21 परंतु रऊबेनास योसेफाला वाचवावयाला पाहिजे होते; म्हणून रऊबेन म्हणाला, “आपण त्याला ठार मारू नये; 22 त्याला काहीही इजा न करता, त्याला आपण एखाद्या खाड्यात टाकून देऊ;” आपल्या भावांच्या हातातून सोडवून योसेफाला वाचवावयाचे व त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावयाचे असा रऊबेनाचा बेत होता. 23 योसेफ त्याच्या भावजवळ येऊन पोहोंचला तेव्हा त्यांनी त्याच्यावर हल्ला केला; त्यांनी त्याचा विशेष सुंदर पायघोळ झगा फाडून टाकला. 24 नंतर त्यांनी त्याला एका खोल कोरड्या खाड्यात टाकून दिले. 25 योसेफ खाड्यात असताना त्याचे भाऊ भाकरी खावयास बसले. त्यांनी वर नजर करुन पाहिले तेव्हा त्यांना दुरुन एक उंटांचा तांडा दिसला; ते आपल्या, उंटांवर मसाल्याचे अनेक पदार्थ व वनस्पती इत्यादी भारी किंमतीचे पदार्थ लादून गिलादाहून मिसरकडे चालले होते. 26 तेव्हा यहूदा म्हणाला, “आपल्या भावाला ठार मारुन आणि त्याचा खून लपवून ठेवून आपल्याला काय फायदा? 27 आपण त्याला जर ह्या इश्माएली व्यापाऱ्यांना विकून टाकले तर आपल्याला अधिक लाभ होईल; आणि आपल्या स्वत;च्या भावाला ठार मारल्याचा दोषही आपणावर येणार नाहीं;” इतर भावांना हे म्हणणे पटले. 28 ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खाड्यातून बाहेर काढले व त्या इश्माएली व्यापाऱ्यांस वीस चांदीची नाणी घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफास मिसर देशास घेऊन गेले. 29 इतका वेळपर्यंत रऊबेन आपल्या भावाबरोबर तेथे नव्हता, म्हणून त्यांनी योसेफाला विकून टाकल्याचे त्याला माहीत नव्हते; रऊबेन त्या खाड्याकडे परत गेला तेव्हा त्यात त्याला योसेफ दिसला नाही; तेव्हा त्याला अतिशय दु:ख झाले; अतिशोकामुळे त्याने आपली वस्त्रे फाडली; 30 तो शोक करीत आपल्या भावांकडे जाऊन म्हणाला, “बधूनो, आपला धाकटा भाऊ योसेफ खाड्यात नाही, हो! तर आता मी काय करु!” 31 त्या भावांनी एक तरुण बकरा मारुन त्याचे रक्त योसेफाच्या सुंदर पायघोळ झग्याला लावले. 32 नंतर तो रक्ताने भरलेला झगा आपल्या बापाला दाखवून ते म्हणाले, “आम्हाला हा झगा सांपडला; हा झगा योसेफाचा आहे की काय?” 33 त्यांच्या बापाने तो झगा पाहिला आणि तो योसेफाचाच आहे हे ओळखले! तेव्हा त्याचा बाप म्हणाला, “होय! मुलांनो, हा त्याचाच झगा आहे! हिंस्र पशूने त्याला खाऊन टाकले असावे. माझा मुलगा योसेफ याला हिंस्त्र पशूने खाऊन टाकले आहे यात संशय नाही.” 34 याकोबाला आपल्या मुलाबद्दल अतिशय दु:ख झाले, एवढे की त्याने आपली वस्त्रे फाडली आणि कंबरेस गोणताट गुंडाळले आणि कितीतरी दिवस आपल्या मुलासाठी शोक केला. 35 याकोबाच्या सर्व मुलांनी व मुलीनीं त्याचे सांत्वन करण्यास खूप प्रयत्न केला खरा परंतु तो कधीही समाधान पावला नाही; तो म्हणाला, “मी मरेपर्यंत माझ्या मुलासाठी शोक करीत राहीन व अधोलोकात माझ्या मुलाकडे जाईन.” असा त्याच्या बापाने योसेफाकरिता अतिशय शोक केला. 36 त्या मिद्यानी व्यापाऱ्यांनी योसेफास मिसर देशात नेऊन पोटीफर नांवाचा फारो राजाचा अधिकारी, गारद्यांचा सरदार होता त्यास विकून टाकले.

38:1 त्याच सुमारास यहूदा आपल्या भावांना सोडून अदुलाम नगरातील हीरा नावाच्या माणसाबरोबर त्याच्या घरी राहावयास गेला. 2 तेथे यहूदाला शूवा नावाच्या एक कनानी माणसाची मुलगी भेटली. तेव्हा यहूदाने तिच्याशी लग्न केले. 3 त्या कनानी मुलीला एक मुलगा झाला. त्यांने त्याचे नाव एर ठेवले. 4 त्यानंतर तिला आणखी एक मुलगा झाला त्यांनी त्याचे नाव ओनान ठेवले. 5 त्यानंतर तिला शेला नावाचा आणखी एक मुलगा झाला. तिसरा मुलगा झाला तेव्हा यहूदा कजीब येथे राहात होता. 6 यहूदाने आपला पहिला मुलगा एर याच्यासाठी बायको म्हणून तामार नावाच्या स्त्रीची निवड केली. 7 परंतु एर याने बऱ्याच वाईट गोष्टी केल्या मुळे परमेश्वर त्याच्यावर खुश नव्हता म्हणून परमेश्वराने त्याला ठार मारले. 8 मग यहूदा, एर याचा भाऊ ओनान याला, म्हणाला, “तू जाऊन तुझ्या मरण पावलेल्या भावाच्या बायकोपाशी नीज; आणि तू तिचा नवरा असल्याप्रमाणे तिच्याशी वाग जर तुझ्यापासून तिला मुले झाली तर ती तुझ्या भावाची मुले समजली जातील व त्याचा वंश पुढे चालवितील:” 9 आपल्या भावाजयीपाशी निजल्यावर ह्या मीलनातून होणारी मुले आपले नाव धारण करुन चालणार नाहीत हे ओनानला माहीत होते म्हणून जेव्हा तो त्याच्या भावजयीपाशी निजे तेव्हा तो आपले वीर्य बाहेर जमिनीवर पाडत असे. 10 परंतु त्याच्या हया वागण्याचा परमेश्वराला राग आला, म्हणून त्याने ओनानलाही मारुन टाकले. 11 मग यहूदा आपली सून तामार हिला म्हणाला, “तू तुझ्या बापाच्या घरी जाऊन तेथे राहा, पण माझा मुलगा शेला लग्नाच्या वयाचा होईपर्यंत लग्न करु नको;” कारण शेलाही आपल्या दोन भावाप्रमाणे मारला जाईल अशी यहूदाला भीती वाटली; म्हणून मग तामार आपल्या बापाच्या घरी जाऊन राहिली. 12 काही काळानंतर यहूदाची बायको म्हणजे शूवाची मुलगी मरण पावली. तिच्यासाठी शोक करण्याचे दिवस संपल्यानंतर तो अदुल्लाम येथील आपला मित्र हिरा याच्याबरोबर 13 आपल्या मेंढरांची लोकर कातरवून घेण्याकरिता तिम्ना येथे जात होता हे तामारला समजले. 14 तामार नेहमीच आपल्या विधवादशेतील वस्त्रे घालीत असे; तेव्हा तिने आता वेगळी वस्त्रे घातली आणि बुरखा घेऊन आपले तोंड झाकले. नंतर तिम्ना जवळच्या एनाईम गांवाला जाणाऱ्या रस्त्याच्याजवळ ती बसून राहिली. यहूदाचा मुलगा शेला आता लग्न करण्याच्या वयाचा झाला आहे हे तामारला माहीत होते; परंतु त्याच्याशी तिचे लग्न लावून देण्याविषयी यहूदा काहीच योजना करीत नव्हता. 15 यहूदा रस्त्याने चालला होता. त्याने तिला पाहिले परंतु ती एक वेश्या असावी असे त्याला वाटले; (कारण वेश्या जसे आपले तोंड झाकतात तसे तिने आपले तोंड बुरख्याने झाकले होते.) 16 तेव्हा यहूदा तिच्या जवळ जाऊन म्हणाला, “मला तुझ्यापाशी निजू दे.” (ती तामार आहे, म्हणजे आपली सून आहे हे यहूदाला माहीत नव्हते.)ती म्हणाली, “तुम्ही मला त्याबद्दल काय मोबदला द्याल?” 17 यहूदा म्हणाला, “मी तुला माझ्या कळपातून एक चांगला तरणाबांड बकरा पाठवून देईन.”ती म्हणाली, “ठीक आहे, मी मान्य करिते, परंतु तो पाठवून देई पर्यंत प्रथम माझ्याजवळ काय हडप ठेवाल?” 18 यहूदा म्हणाला, “मी तुला बकरा पाठवून देईन त्यासाठी पुरावा म्हणून तुझ्यापाशी मी काय हडप ठेवावे अशी तुझी इच्छा आहे?”तामार म्हणाली, “तुम्ही कागदपत्रे, करार वगैरेवर उमटवयासाठी व सीलबंद करण्यासाठी जो शिक्का व जी दोरी वापरता ती मला द्या.” तेव्हा यहूदाने त्या वस्तू तिला दिल्या. मग तो तिजपाशी जाऊन निजला. आणि त्यामुळे ती गरोदर राहिली. 19 मग घरी गेल्यावर तामारने आपले तोंड झाकण्याचा बुरखा काढून टाकला आणि पुन्हा पहिल्या सारखी विधवेची वस्त्रे घातली. 20 आपण कबूल केल्याप्रमाणे त्या वेश्येला बकरा देण्यासाठी यहुदाने आपला मित्र हीरा याला एनाईम गांवाला त्या वेश्येकडे पाठवले. त्याचप्रमाणे आपण तिला दिलेल्या, शिक्का, दोरी व काही वस्तू तिजकडून घेऊन येण्यास सांगितले, परंतु हीराला ती वेश्या सांपडली नाही. 21 त्याने एनाईम गांवातील काही लोकांना विचारले, “येथे ह्या रस्त्याच्या बाजूला होती ती वेश्या कोठे आहे?”तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “येथे कधीच कोणीही वेश्या नव्हती.” 22 तेव्हा यहूदाचा मित्र त्याच्याकडे परत गेला व म्हणाला, “ती वेश्या मला काही सांपडली नाही, तेथे राहाणारे लोक म्हणाले की तेथे कोणीही वेश्या कधीच नव्हती.” 23 तेव्हा यहूदा म्हणाला, “जाऊ दे, त्या वस्तू तिला ठेवून घेऊ दे. अधिक चौकशी केल्यास लोकांकडून आपलीच नालस्ती होईल आणि लोकांकडून आपले हंसे व्हावे अशी माझी इच्छा नाही. मी कबूल केल्याप्रमाणे तिला बकरा देण्याचा प्रयत्न केला, परंतु ती आपणांस सापडली नाही. झाले एवढे पुरे आहे.” 24 या नंतर जवळ तीन महिन्यांनी कोणीतरी यहूदाला सांगितले, “तुझ्या सुनेने वेश्येप्रमाणे पापकर्म केले आणि त्या जारकर्मामुळे ती आता गरोदर राहिली आहे.”तेव्हा मग यहूदा रागाने म्हणाला, “तिला खेचून बाहेर काढा व जाळून टाका.” 25 त्याप्रमाणे काही लोक तामारला ठार मारण्याकरिता तिजकडे गेले, परंतु तिने आपल्या सासऱ्यासाठी एक निरोप पाठवला. तामार म्हणाली, “मला गर्भवती करणारा पुरुष ह्या वस्तूंचा मालक आहे. या वस्तूंकडे नीट पाहा; कोणाच्या आहेत या वस्तू? कोणाची आहे ही मोहोर व ही दोरी? कोणाची आहे ही काठी? सांगा;” 26 यहूदाने त्या वस्तू ओळखल्या आणि तो म्हणाला, “तिचे बोलणे अगदी बरोबर आहे; माझेच चुकले आहे; मी तिला वचन दिल्याप्रमाणे तिचे माझ्या मुलाशी लग्न लावून दिले नाही.” आणि त्यानंतर मात्र त्याने तिच्याशी पुन्हा कधीच शरीर संबंध केला नाही. 27 तामार हिची बाळंत होण्याची वेळ जवळ आली. तिला जुळे होणार असे लोकांना वाटले. 28 बाळंत होते वेळी एका बाळाचा हात बाहेर आला. तेव्हा सुईणीने त्याच्या हाताला लाल धागा बांधला व ती म्हणाली, “हा आधी जन्मला;” 29 परंतु त्या बाळाने आपला हात आखडून घेतला. त्यानंतर मग दुसरे बाळ प्रथम जन्मले; म्हणून मग ती सुईण म्हणाली, “हं! मग तू प्रथम वाट काढून जन्मलास तर!” म्हणून त्यांनी त्याचे नाव पेरेस (म्हणजे हिब्रू भाषेप्रमाणे ‘वाट काढणारा’) असे ठेवले. 30 त्यानंतर हाताला लाल धागा बांधलेले ते दुसरे बाळ जन्मले. त्यांनी त्याचे नाव जेरह (म्हणजे हिब्रू भाषेप्रमाणे तेजस्वी किंवा तेजाने प्रकाशणारा) असे ठेवले.

39:1 योसेफाला विकत घेतलेल्या व्यापाऱ्यांनी त्याला मिसरला नेले व फारो राजाचा एक अधिकारी गारद्यांचा म्हणजे संरक्षक दलाचा सरदार पोटीफर यास विकले. 2 परंतु परमेश्वराने योसेफाला सहाय्य केले म्हणून तो यशस्वी पुरुष झाला. योसेफ आपला स्वामी मिसरचा रहिवासी पोटीफर याच्यास घरी राहात असे. 3 परमेश्वर योसेफा बरोबर आहे आणि म्हणून त्याच्या हर एक कामात तो त्याला यश देतो हे पोटीफरला दिसून आले. 4 म्हणून पोटीफर योसेफावर फार खुष होता. त्याने योसेफाला आपल्या घरचा कारभार पाहाण्यात मदत करण्यास सांगितले. 5 तेव्हा पोटीफराच्या सर्व कारभाराचा अधिकारी नेमल्यावर परमेश्वराने योसेफामुळे पोटीफराचे घरदार, शेतीबाडी इत्यादी त्याच्या मालकीच्या सर्व मालमत्तेस आशीर्वाद दिला. 6 याप्रमाणे पोटीफराने आपल्या घरादाराचा सर्व कारभार योसेफाच्या हवाली केला; म्हणून पोटीफर फक्त पुढ्यात वाढलेले भोजन घेई, त्या पलीकडे कशाचीही जबाबदारी त्याच्यावर नव्हती.योसेफ फार देखणा व बांधेसूद तरुण होता. 7 काही काळानंतर पोटीफराच्या बायकोला तो आवडू लागला. एके दिवशी ती त्याला म्हणली, “माझ्याबरोबर नीज” 8 परंतु तसे करण्यास योसेफाने तिला नकार दिला. तो म्हणाला, “पाहा, या घराच्या सर्व कारभाराबद्दल माझ्या स्वामीचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हा खेरीज येथील सर्व गोष्टी त्याने माझ्या ताब्यात देऊन त्यांची सर्व जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. 9 माझ्या स्वामीने मला या घरात जवळ जवळ त्याच्या समान मोठपणा दिला आहे; असे असताना अशा उदार स्वामीच्या बायकोपाशी निजणे मला योग्य नाही. ते चुकीचे आहे; ते परमेश्वराच्या विरुद्ध घोर पाप आहे!” 10 पोटीफराची बायको दररोज योसफाबरोबर बोलत असे परंतु त्याने तिच्याबरोबर निजण्यास स्पष्ट पणे नकार दिला. 11 एके दिवशी योसेफ आपले काही काम करण्याकरिता आतल्या घरात गेला. तो तेथे अगदी एकटाच होता व घरात दुसरे कोणीही नव्हते. 12 अशावेळी त्याच्या स्वामीच्या बायकोने त्याचे वस्त्र धरुन त्याला म्हटले “तू माझ्यापाशी नीज.” परंतु योसेफ ते वस्त्र तिच्या हातात सोडून आतल्या घरातून बाहेर पळून गेला. 13 तेव्हा योसेफ आपले वस्त्र आपल्या हाती सोडून पळून गेला हे तिने पाहिले. खोटे बोलून या घटनेचा अर्थ उलट करायचा असे तिने ठरवले. 14 आणि तिने आरडा ओरडा करुन बाहेरील माणसांना बोलावले. ती म्हणाली, “पाहा, हा इब्री तरुण गुलाम आमच्या घरच्या माणसांची अब्रू घेण्यासाठी येथे आणून ठेवला आहे. त्याने आत येऊन माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी मोठयाने आरडा ओरडा केला; 15 त्यामुळे घाबरुन हे त्याचे वस्त्र माइयापाशी टाकून तो पळून गेला.” 16 तेव्हा तिने आपला नवरा, योसेफाचा स्वामी घरी येईपर्यंत ते वस्त्र आपल्याजवळ सांभाळून ठेवले. 17 आणि आपला नवरा घरी आल्यावर तिने त्याला तीच गोष्ट सांगितली. ती म्हणाली, “तुम्ही हा जो इब्री तरुण गुलाम घरी आणून ठेवला आहे त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. 18 परंतु तो माझ्याजवळ आल्यावर मी आरडा ओरडा केला म्हणून तो घाबरून आपले वस्त्र टाकून पळून गेला;” 19 आपल्या बायकोचे बोलणे एकल्यावर योसेफाच्या स्वामीचा राग खूप भडकला. 20 राजाच्या शत्रूंना डांबण्यासाठी एक तुरुंग होता. तेव्हा पोटीफराने योसेफाला त्या तुरुंगात टाकले. योसेफ त्या तुरुंगात राहिला. 21 परंतु परमेश्वर योसेफाबरोबर होता; आणि योसेफावर परमेश्वराची दया सतत राहिली; काही काळानंतर तुरुंगाच्या अधिकाऱ्यास योसेफ आवडूं लागला. 22 त्या अधिकाऱ्याने तुरुंगातील सर्व कैद्यांना योसेफाच्या स्वाधीन केले योसेफ; त्यांचा प्रमुख होता तरी पण तोही त्यांच्या सारखेच काम करी. 23 तुरुंगाच्या अधिकाऱ्याने तुरुंगातील सर्व गोष्टीसाठी योसेफावर विश्वास ठेवला; परमेश्वर योसेफाबरोबर होता म्हणून हे सर्व काही झाले. योसेफ जे काही करी त्यात परमेश्वर त्याला यश देई.

40:1 काही दिवसानंतर फारोच्या नोकराकडून काही अपराध घडला. हे नोकर म्हणजे एक आचारी व दुसरा प्यालेबरदार हे होते. 2 म्हणून फारो राजा त्यांच्यावर रागावला. 3 तेव्हा फारोने त्यांना योसेफ ज्या तुरुंगात होता त्यातच डांबून टाकले. फारोच्या गारदयाचा सरदार पोटीफर हा त्या तुरुंगाचा मुख्य अधिकारी होता. 4 त्या सरदाराने त्या दोघाही अपराध्यांना योसेफाच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. ते दोघे काही काळपर्यंत तुरुंगात अटकेत राहिले. 5 एके रात्री त्या दोघांही अपराध्यांना एकेक स्वप्न पडले, आणि प्रत्येकाच्या स्वप्नाचा विशेष अर्थ होता. 6 दुसऱ्या दिवशी सकाळी योसेफ त्यांच्याकडे गेला तेव्हा ते त्याला दु:खी व चिंतेत असलेले दिसले. 7 तेव्हा योसेफाने त्यांना विचारले, “तुम्ही आज एवढे काळजीत का दिसता?” 8 त्या दोघांनी उत्तर दिले, “आम्हा दोघांना रात्री एक एक स्वप्न पडले; परंतु त्यांचा अर्थ आम्हाला समजत नाही; त्यांचा अर्थ सांगणारा किंवा उलगडा करणारा कोणी नाही.” योसेफ त्यांना म्हणाला, “एकच म्हणजे केवळ देवच स्वप्नांचा अर्थ सांगू शकतो किंवा उलगडा करु शकतो; म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला तुमची स्वप्ने सांगा.” 9 तेव्हा प्यालेबरदाराने योसेफाला आपले स्वप्न सांगितले. तो म्हणाला, “मी माझ्या स्वप्नात एक द्राक्षवेल पाहिला. 10 त्याला तीन फाटे होते. त्या फाटयांना फुले आली व नंतर त्यातून द्राक्षे तयार झाली असे मी पाहिले. 11 मी फारो राजाचा मद्याचा प्याला धरुन उभा होतो; तेव्हा मी ती द्राक्षे घेऊन त्या प्यालात पिळली; आणि मग द्राक्षारसाचा तो प्याला मी फारोच्या हातात दिला.” 12 नंतर योसेफ म्हणाला, “ह्या तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी तुला उलगडून सांगतो; ते तीन फाटे म्हणजे तीन दिवस. 13 हे तीन दिवस संपण्यापूर्वी फारो राजा तुझ्या अपराधाची तुला क्षमा करील व तुला पुन्हा तुझ्या पूर्वीच्या कामावर परत घेईल. तू आतापर्यंत फारोचे जे काम करीत होतास तेच काम तू करशील. 14 परंतु तुला तुरुंगातून सोडल्यावर माझी आठवण कर, व माझ्यावर कृपा करुन मला मदत कर. माझ्या संबंधी फारोला सांग म्हणजे मग मी ह्या तुरुंगातून सुटेन. 15 मला माझ्या घरातून व माझ्या मायदेशातून म्हणजे माझ्या इब्री लोकांच्या देशातून येथे बळजबरीने आणले गेले; वास्तविक मला येथे तुरुंगात अटकेत राहाण्याची शिक्षा मिळावी असा मी कोणाचा काहीच अपराध केला नाही.” 16 आचाऱ्याने पाहिले की दुसऱ्या बंदीवान सेवकाचे स्वप्न चांगले आहे; म्हणून तो योसेफाला म्हणाला, “मला ही एक स्वप्न पडले, ते असे; माझ्या डोक्यावर रोट्यांच्या तीन टोपल्या होत्या. 17 सगळ्यात वरच्या टोपलीत फारो राजासाठी सर्व प्रकारची पक्वाने होती; परंतु त्या पक्वान्नातील पदार्थ पक्षी खात होते.” 18 योसेफाने उत्तर दिले, “तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी उलडून सांगतो त्या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस. 19 तीन दिवस संपण्याच्या आत फारो राजा तुला या बंदीवासातून सोडवील आणि तुझे शीर उडवून टाकील व तुझे धड झाडाला टांगील; आणि पक्षी तुझ्या धडाचे मांस तोडून खातील.” 20 तीन दिवसानंतर फारो राजाचा वाढदिवस होता. तेव्हा त्याने आपल्या सर्व सेवक वर्गाला एक मेजवानी दिली; त्यावेळी त्याने त्या आचाऱ्याला व प्यालेबरदाराला तुरुंगातून सोडले. 21 फारोने प्यालेबरदाराची सुटका केली व त्याला पुन्हा पूर्वीप्रमाणे त्याच्या कामावर ठेवले; आणि प्यालेबरदाराने मद्याचा प्याला फारो राजाच्या हातात दिला. 22 परंतु फारोने आचाऱ्याला फाशी दिले.; तेव्हा जे होईल असे योसेफाने सांगितले होते ते थेट तसेच घडून आले. 23 परंतु त्या प्यालेबरदाराने योसेफासंबंधी तो काहीच बोलला नाही. अशा रीतीने त्या प्याले बरदाराला योसेफाविषयी विसर पडला.

41:1 दोन वर्षानंतर फारो राजाला स्वप्न पडले;ते असे की तो नाईल नदीच्या काठी उभा राहिला होता. 2 तेव्हा त्याने सात गाई नाईल नदीतून बाहेर येताना पाहिल्या. त्या धुष्टपुष्ट व सुंदर होत्या. त्या तेथे उभ्या राहून गवत खात होत्या. 3 त्यानंतर आणखी सात रोड व कुरुप गाई नदीतून बाहेर आल्या व त्या सात धष्टपुष्ट व सुंदर गाईच्या बाजूला उभ्या राहिल्या. 4 आणि त्या सात दुबळ्या व कुरुप गाईनी त्या सात सुंदर व धष्टपुष्ठ गाईना खाऊन टाकले. त्या नंतर फारो राजा जागा झाला. 5 मग फारो राजा पुन्हा झोपल्यावर त्याला दुसऱ्यांदा स्वप्न पडले; त्यात त्याने पाहिले की एकाच ताटाला सात भरदार कणसे आली. 6 त्या नंतर त्या ताटाला सात खुरटलेली व करपलेली अशी सात कणसे आली. 7 नंतर त्या सात खुरटलेल्या व करपलेल्या कणसांनी ती सात चांगली व टपोऱ्या दाण्यांची भरदार कणसे गिळून टाकली; तेव्हा फारो पुन्हा जागा झाला आणि ते तर स्वप्न असल्याचे त्याला समजले. 8 दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर फारो राजा त्या स्वप्नामुळे चिंतेत पडून बेचैन झाला व त्याने पंडितांना बोलावले; फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली; परंतु त्यांतील कोणालाच त्या स्वप्नांच अर्थ सांगता आला नाही किंवा त्याचा उलगडा करता आला नाही. 9 तेव्हा प्यालेबरदाराला योसेफाची आठवण आली. तो फारोस म्हणाला, “माझ्या बाबतीत जे घडले त्याची मला आठवण येत आहे; 10 आपण माझ्यावर व आचाऱ्यावर संतापला होता आणि आपण आम्हांस तुरुंगात टाकले होते. 11 तेव्हा तुरुंगात असताना एकाच रात्री आम्हा दोघांना स्वप्ने पडली. प्रत्येक स्वप्नाचा अर्थ वेगळा होता. 12 तेथे कोणी इब्री तरुण आमच्या बरोबर कैदेत होता. तो गारदद्यांच्या सरदाराचा दास होता. त्याला आम्ही आमची स्वप्ने सांगितली त्याने त्यांचे स्पष्टीकरण केले आणि त्याने आमच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला व उलगडा केला. 13 1आणि त्याने सांगितलेला अर्थ खरा ठरला. तो म्हणाला की माझी सुटका होईल व मला पूर्वीप्रमाणे माझ्या कामावर पुन्हा घेतले जाईल आणि अगदी त्याप्रमाणे खरेच घडून आले; आणि तो म्हणाला की आचारी मरेल आणि त्याप्रमाणे तेही खरे झाले.” 14 मग फारोने योसेफाला तुरुंगातून आणण्यास बोलावणे पाठवले. तेव्हा गारद्यांनी योसेफाल ताबडतोब तुरुंगातून बाहेर आणले. योसेफ दाढी करुन व स्वच्छ कपडे बदलून फारोपुढे येऊन उभा राहिला. 15 मग फारो योसेफास म्हणाला, “मला स्वप्न पडले आहे, परंतु त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की जो कोणी तुला स्वप्न सांगतो तेव्हा तू लगेच स्वप्नांचा अर्थ सांगतोस.” 16 योसेफ म्हणाला, “मी माझ्या कौशल्याने किंवा हुशारीने स्वप्नांचा अर्थ सांगतो असे नाही, तर केवळ देवालाच हे सामर्थ्थ आहे आणि तो देवच फारोच्या स्वप्नांचा अर्थ सांगेल.” 17 मग फारो योसेफला म्हणाला, “स्वप्नामध्ये मी नाईल नदीच्या काठी उभा होतो. 18 तेव्हा नदीतून सात धष्टपुष्ट व सुंदर गाई बाहेर आल्या व गवत खाऊ लागल्या असे मी पाहिले. 19 त्यानंतर सात रोड व कुरुप गाई नदीतून बाहेर येताना मी पाहिल्या. त्यांच्या सारख्या दुबळ्या व कुरुप गाई मी सबंध मिसर देशात कधीच पाहिल्या नव्हत्या. 20 त्या रोड व कुरुप गाईनी आधीच्या धष्टपुष्ट व सुंदर गाई गिळून टाकल्या. 21 तरीही त्या रोड व कुरुपच राहिल्या, त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांनी त्या सात गाई गिळून टाकल्या असे वाटत नव्हते; त्या पूर्वी इतक्याच अशक्त व रोड दिसत होत्या मग मी जागा झालो. 22 “त्यानंतर दुसऱ्या स्वप्नात एकाच ताटाला सात चांगली भरदार व टपोऱ्या दाण्यांची भरगच्च कणसे आली, 23 मग त्यांच्या मागून त्या ताटाला आणखी दुसरी करपटलेली, कुरुप व गरम वाऱ्याच्या झळयामुळे करपलेली सात कणसे आली. 24 व त्यांनी ती चांगली सात कणसे गिळून टाकली.“ही माझी स्वप्ने मी माझ्या जादुगारांना, ज्योतिष्यांना व पंडितांना सांगितली; परंतु त्यांचा अर्थ कोणालाही सांगता आला नाही; तेव्हा त्यांचा अर्थ काय आहे?” 25 मग योसेफ फारोला म्हणाला, “महाराज, ह्या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकसारखाच आहे; लवकरच काय होणार आहे हे देव आपणास सांगत आहे; 26 त्या सात चांगल्या गाई आणि ती सात चांगली कणसे म्हणजे सात चांगली वर्षे. दोन्हीही स्वप्ने सारखीच आहेत; 27 त्या दुसऱ्या सात रोड गाई व ती सात रोड कणसे म्हणजे अवघ्या देशावर येणाऱ्या दुष्काळाची सात वर्षे. ती सात वर्षे चांगल्या सात वर्षानंतर येतील. 28 लवकरच काय घडणार आहे हे देवाने आपणास दाखवले आहे. मी संगितल्याप्रमाणेच हे घडून येईल. 29 सात वर्षांच्या सुबत्तेच्या काळात चांगले व भरपूर पीक येईल व मिसर देशभर भरपूर खावयास असेल. 30 परंतु सुकाळाच्या सात वर्षांनंतर सर्व देशभर दुष्काळाची अशी सात वर्षे येतील की त्यामुळे मिसर देशभर पिकलेले धान्य विसरले जाईल; आणि हा दुष्काळ देशाचा नाश करील. 31 आणि भरपूर धान्य असतानाचे दिवस कसे होते याचा लोकांना विसर पडेल. 32 “तेव्हा फारो महाराज, एकाच गोष्टीविषयी आपणाला दोन स्वप्ने पडली ते यासाठी की देव हे सर्व लवकरच व नक्की घडवून आणील, हे आपणास दाखवावे. 33 तेव्हा, फारो महाराज, आपण एखाद्या चतुर व शहाण्या पुरुषाची निवड करुन त्याला सर्व मिसर देशावर प्रशासक म्हणून नेमावे; 34 त्या नंतर शेतकऱ्याकडून धान्य गोळा करण्यासाठी इतर अधिकारी निवडावेत; येत्या सात वर्षांच्या सुकाळात प्रत्येकाने आपल्या धान्याच्या उत्पन्नाचा पांचवा हिस्सा सरकारला द्यावा. 35 अशा रीतीने ही माणसे सुकाळाच्या सात वर्षात पुष्कळ अन्न गोळा करतील आणि गरज पडेपर्यंत नगरात साठवून ठेवतील अशा प्रकारे, फारो, हे अन्न तुझ्या नियंत्रणात राहील. 36 येणाऱ्या दुष्काळातील सात वर्षांच्या काळात त्या धान्याचा उपयोग होईल. तेव्हा मग दुष्काळाच्या सात वर्षात मिसराच नाश होणार नाही.” 37 फारो राजाला ही कल्पना फार चांगली वाटली व पटली; तसेच त्याच्या सर्व सेवकांनी एकमताने तिला संमती दिली. 38 फारोने म्हटले, “योसेफापेक्षा अधिक चांगला व योग्य, दुसरा कोणी पुरुष सापडेल काय? देवाचा आत्मा त्याच्यात असल्यामुळे त्याला शहाणपण येते!” 39 तेव्हा फारो योसेफास म्हणाला, “देवाने तुला या सर्व गोष्टी दाखवल्या आहेत, म्हणून तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. 40 म्हणून मी तुला या देशाचा (मिसरचा) अधिपती म्हणजे सर्वात उच्च अधिकारी म्हणून नेमतो. सर्व लोक तुझ्या सर्व आज्ञा पाळितील; या देशात केवळ राजासना पुरता म्हणजे नामधारी राजा म्हणून काय तो मी एक तुझ्यापेक्षा मोठा असेन.” 41 मग फारो योसेफास म्हणाला, “मी तुला आता अवघ्या मिसर देशाचा प्रशासक म्हणून नेमितो.” 42 मग फारोने राजमुद्रा असलेली आपल्या बोटातील अंगठी योसेफाच्या बोटात घातली; तलम तागाच्या वस्त्राचा पोशाख त्याला घातला आणि त्याच्या गाळ्यात एक सोन्याची साखळी घातली. 43 नंतर फारोने योसेफाला संचलनातील दुसऱ्या रथात बसण्यास सांगितले; खास नेमलेले गारदी पुढे चालले होते; ते ललकारून जाहीरपणे सांगत होते, “लोक हो! आपल्या देशाच्या प्रशासक योसेफ, याला लवून मुजरा करा.”अशी रीतीने योसेफाला मिसर देशाचा प्रशासक (प्रमुख अधिकारी) नेमले. 44 फारो योसेफाला म्हणाला, “मी मिसराचा राजा आहे खरा, परंतु तुझ्या हुकुमाशिवाय कोणी आपला हात किंवा पाय हलवू शकणार नाहीं.” 45 फारोने योसेफाला सापनाथ-पानेह असे दुसरे नाव दिले. फारोने ओन शहराचा याजक पेटीफरा याची मुलगी आसनथ ही योसेफाला बायको करुन दिली. अशा रीतीने योसेफ सर्व मिसर देशावर प्रशासक झाला. 46 योसेफ मिसर देशाचा राजा फारो याची सेवा करु लागला तेव्हा तो अवघा तीस वर्षांचा होता; योसेफाने मिसर देशभर दौरा करुन देशाची पाहणी केली. 47 सुकाळाच्या सात वर्षात सर्व देशभर भरपूर पीक आले. 48 योसेफाने सुकाळाच्या सात वर्षात अन्न गोळा करुन त्या त्या शेतातले धान्य जवळच्याच नगरोनगरी साठवून ठेवले. 49 योसेफाने जणू काय समुद्राच्या वाळू इतके धान्य गोळा करुन साठवून ठेवले; ते इतके होते की त्याचे मोजमाप करता येत नव्हते. 50 योसेफाची बायको ही ओन नगराचा याजक पोटीफरा याची मुलगी होती. दुष्काळाच्या सात वर्षांपैकी पहिले वर्ष येण्याअगोदर योसेफ व आसनथ यांना दोन मुलगे झाले. 51 पाहिल्या मुलाचे नाव मनश्शे होते; योसेफाने त्याला हे नांव दिले कारण तो म्हणाला, “देवाने मला झालेला त्रास व माझ्यावर झालेला अन्याय, तसेच माझ्या घराकडील सर्व काही यांचा मला विसर पडू दिला.” 52 योसेफाने दुसऱ्या मुलाचे नाव एफ्राईम असे ठेवले कारण तो म्हणाला, “माझ्यावर संकटे आली परंतु देवाने मला सर्वबाबतीत सफल केले.” 53 सात वर्षापर्यंत मिसरमध्ये भरपूर अन्न होते पण ती वर्षे संपली. 54 परंतु सात वर्षानंतर अगदी योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली; तेव्हा कोणत्याच देशात कोठेही कसलेच पीक आले नाही; आणि लोकांना खावयास धान्य मिळेना; परंतु मिसरमध्ये मात्र योसेफाने धान्य साठवल्यामुळे लोकांपाशी खावयास भरपूर अन्न होते. 55 दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली, तेव्हा लोकांनी धान्यासाठी फारोकडे ओरड केली; तेव्हा फारो मिसरच्या लोकांना म्हणाला, “योसेफाला विचारा व तो सांगले ते करा.” 56 तेव्हा चोहीकडे दुष्काळ पडल्यावर योसेफाने मिसरच्या लोकांना धान्य भांडारातून धान्य विकत दिले. मिसरमध्ये फार वाईट प्रकारचा दुष्काळ पडला होत. 57 मिसरच्या सभोवतालच्या देशातून लोक धान्य विकत घेण्यासाठी योसेफाकडे येऊ लागले कारण त्यावेळी जगाच्या त्या भागात दुष्काळ पडला होता.

42:1 या सुमारास कनानमध्ये ही दुष्काळ पडला होता परंतु मिसरमध्ये धान्य असल्याचे याकोबाला समजले. तेव्हा याकोब आपल्या मुलांना म्हणाला, “आपण येथे काही न करता स्वस्थ का बसलो आहोत. 2 मिसर देशात धान्य मिळते असे मी ऐकले आहे. तुम्ही जाऊन आपणासाठी धान्य विकत आणा म्हणजे आपण जगू, मरणार नाही.” 3 तेव्हा योसेफाचे दहा भाऊ धान्य विकत घेण्यासाठी मिसरला गेले. 4 याकोबाने, योसेफाचा सख्खा भाऊ बन्यामीन याला त्याच्या भावाबरोबर पाठवले नाही; कारण योसेफाप्रमाणे बन्यामीनावरही काही वाईट प्रसंग ओढवेल अशी त्याला भीती वाटली. 5 कनान देशात फारच तीव्र दुष्काळ पडला होता, म्हणून कनानातून पुष्कळ लोक धान्य विकत घ्यावयास मिसराला गेले त्या लोकांत इस्राएलाचे मुलगेही होते. 6 त्या वेळी योसेफ मिसरचा प्रशासक म्हणजे प्रमुख अधिकारी होता. बाहरेच्या देशातून धान्य विकत घ्यावयास मिसरमध्ये येणाऱ्या लोकांना धान्य विकण्याचा अधिकार केवळ योसेफालाच होता; म्हणून योसेफाचे भाऊ त्याजकडे आले आणि त्यांनी त्याला लवून नमन केले. 7 योसेफाने आपल्या भावांना पाहिल्याबरोबर ओळखले परंतु ते कोण आहेत हे माहित नसल्यासारखे दाखवून तो त्यांच्याशी कठोरपणाने बोलला त्याने त्यांना विचारले, “तुम्ही कोठून आला?”त्याच्या भावांनी उत्तर दिले, “महाराज, आम्ही कनान देशातून धान्य विकत घेण्यासाठी आलो आहो.” 8 योसेफाने आपल्या भावांना ओळखले परंतु त्यांनी त्याला ओळखले नाही. 9 आणि मग योसेफाला आपल्या भावांविषयी पडलेली स्वप्ने आठवली.योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “तुम्ही हेर आहात! तुम्ही धान्य खरेदी करण्यास नव्हे तर आमच्या देशाचा कमजोरपणा हेरण्यास आला आहात.” 10 परंतु त्याचे भाऊ म्हणाले, “नाही नाही, महाराज! आम्ही आपले दास खरोखर केवळ धान्य विकत घ्यावयास आलो आहोत. 11 आम्ही सर्व भाऊ एका पुरुषाचे मुलगे आहोत. आम्ही प्रमाणिक म्हणजे खरेपणाने बोलणारे व चालणारे सरळ माणसे आहोत. आम्ही खरेच धान्य खरेदी करण्यास आलो आहोत.” 12 नंतर योसेफ त्यांना म्हणाला, “नाही, तुम्ही आमचा कमकुवतपणा पाहण्यास आलेले हेर आहात.” 13 परंतु ते भाऊ म्हणाले, “नाही नाही महाराज! आम्ही सर्व भाऊच आहोत. आमच्या कुटुंबातील आम्ही एका बापाचे बारा मुलगे आहोत. आमचा सर्वात धाकटा भाऊ घरी बापाजवळ आहे. आणि आमचा दुसरा एक भाऊ फार पूर्वी मरण पावला. कनान देशातले आम्ही सर्व आपल्या दासासमान आहोत.” 14 परंतु योसेफ त्यांना म्हणाला, “नाही, माझे म्हणणे अगदी बरोबर आहे. तुम्ही हेरच आहात; 15 परंतु तुम्ही खरे बोलत आहा हे पटवून देण्याची मी तुम्हाला एक संधी देतो; फारोची शपथ! मी वचन देतो की तुमचा धाकटा भाऊ येथे येईपर्यंत तुम्हाला येथून जाता येणार नाही. 16 तेव्हा तुम्हातील एकाने मागे घरी जाऊन तुमच्या धाकटया भावाला येथे घेऊन यावे, आणि तो पर्यंत तुम्ही इतरांनी येथे तुरुंगात राहावे; मग तुम्ही कितपत खरे बोलता हे आम्हास कळेल. परंतु माझी खात्री आहे की तुम्ही हेरच आहात.” 17 मग योसेफाने त्या सर्वांना तीन दिवस तुरुंगात अटकेत ठेवले. 18 तीन दिवसानंतर योसेफ त्यांना म्हणाला, “मी देवभिरु माणूस आहे. म्हणून मी सांगतो तसेच करा, म्हणजे तुमच्या धाकट्या भावाला येथे आणून तुमचा खरेपणा पटवून द्या; मग मी तुम्हाला वाचवू शकेन. 19 तुम्ही जर खरेच प्रामाणिक असाल तर मग तुम्हातील एका भावास येथे तुरुंगात ओलीस ठेवा व बाकीचे तुम्ही तुमच्या घरच्या माणसांकरिता धान्य घेऊन जा. 20 मग तुमच्या धाकट्या भावास येथे माझ्याकडे घेऊन या. यावरुन तुम्ही माझ्याशी खरे बोलता किंवा नाही याची मला खात्री पटेल.” आणि तुम्हाला मरावे लागणार नाही.”तेव्हा तसे करण्यास ते भाऊ कबूल झाले. 21 ते एकमेकांस म्हणाले, “आपला धाकटा भाऊ योसेफ याच्याशी आपण वाईट रीतीने वागलो त्याचा बदला म्हणून आपणास ही शिक्षा होत आहे. त्याने त्याला सोडून द्यावे व त्याचा जीव वाचवावा म्हणून काकुळतीने रडून आपणास विनंती केली परंतु आपण त्याचे ऐकले नाही म्हणून आता आपणास हे भोगावे लागत आहे.” 22 मग रऊबेन त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला सांगितले की त्या लहान भावाच्या जीवाला, वाईट रीतीने वागून काही अपाय करु नका; परंतु तुम्ही ते ऐकले नाही म्हणून आता त्याच्या मृत्यूबद्दल आपण ही शिक्षा भोगीत आहोत.” 23 योसेफ दुभाष्यातर्फे आपल्या भावांशी बोलत असल्यामुळे, योसेफाला आपल्या भोषेतील बोलणे कळत असेल असे त्यांना वाटले नाही. परंतु त्यांचे सर्व बोलणे योसेफाला समजले; त्यामुळे त्याला फार दु:ख झाले व 24 म्हणून तो त्यांच्यापासून बाजूला जाऊन रडला थोडया वेळाने तो परत त्यांच्याकडे आला. आणि त्यांच्याशी बोलला इतर भाऊ पाहात असताना त्याने एका भावाला शिमोनला त्यांच्यातून काढून घेतले आणि बांधले. 25 मग आपल्या भावांच्या पोत्यात धान्य भरण्यास तसेच त्या धान्याबद्दल त्याच्या भावांनी दिलेला परंतु योसेफाने न घेतलेला पैसा गुपचूप ज्याच्या त्याच्या पोत्यात भरण्यास व त्यांच्या परतीच्या प्रवासात वाटेत खाण्यासाठी अन्नसामग्री देण्यास योसेफाने आपल्या काही सेवकांना सांगतिले. 26 तेव्हा त्या भावांनी ते धान्य आपापल्या गाढवावर लादले व तेथून ते माघारी जाण्यास निघाले. 27 ते भाऊ रात्रीच्या मुक्कामासाठी एका ठिकाणी थांबले. तेव्हा त्यांच्यापैकी एकाने त्याच्या गाढवाला थोडेसे धान्य देण्यासाठी आपली गोणी उघडली तेव्हा त्याने धान्यासाठी दिलेल पैसे त्याला त्या गोणीत आढळले. 28 तेव्हा तो आपल्या इतर भावांना म्हणाला, “पाहा! धान्यासाठी मी दिलेले हे पैसे कोणीतरी पुन्हा माझ्या गोणीत ठेवले आहेत!” तेव्हा ते भाऊ अतिशय घाबरले, ते एकमेकांस म्हणाले, “देव आपल्याला काय करत आहे.” 29 ते भाऊ कनान देशास आपला बाप याकोब याजकडे गेले आणि त्यांनी घडलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या. 30 ते म्हणाले, “त्या देशाचा (मिसरचा) अधिपति म्हणजे प्रमुख अधिकारी आमच्याशी कठोरपणाने बोलला आम्ही हेर आहोत असे त्याला वाटले; 31 परंतु आम्ही हेर नसून प्रामाणिक म्हणजे खरेपणाने वागणारे सरळ माणसे आहोत असे त्याला सांगितले. 32 आम्ही त्याला सांगितले की आम्ही बारा भाऊ एका माणसाचे मुलगे आहोत आमचा एक भाऊ वारला तसेच आमचा सर्वात धाकटा भाऊ कनान देशात आजपर्यंत आमच्या बापाजवळच असतो असेही सांगितले. 33 “तेव्हा त्या देशाचा प्रशासक म्हणजे प्रमुख अधिकारी आम्हाला म्हणाला, ‘तुम्ही प्रामाणिक व साळसूद लोक आहात हे पटवून देण्याचा एक मार्ग आहे; तो असा की तुम्ही तुम्हातील एका भावास येथे ओलीस माझ्यापाशी ठेवा; तुम्ही इतरजण तुमच्या कुटुंबातील माणसाकरिता धान्य घेऊन जा. 34 आणि नंतर तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला येथे माझ्याकडे घेऊन या; मग तुम्ही खरेच प्रामाणिक व साळसूद माणसे आहात हे मला पटेल; नाही तर मग तुम्ही तुमच्या सेनापतीच्या हुकुमाने आमचा नाश करावयास आला आहात असे मी समजेन; तुम्ही जर खरे बोलत असाल तर मग मी तुमचा भाऊ परत तुमच्या हवाली करीन आणि मग तुम्हाला आपणाकरिता आमच्या देशातून धान्य विकत घेण्यासाठी ये जा करण्याची परवानगी असेल.” 35 मग ते भाऊ आपापल्या पोत्यातून धान्य काढावयास गेले; तेव्हा प्रत्येकाच्या पोत्यात पैशाची पिशवी मिळाली. त्या पैसाच्या पिशव्या पाहून ते भाऊ व त्यांचा बाप हे अतिशय घाबरले. 36 याकोब त्यांना म्हणाला, “मी माझ्या सर्व मुलांना मुकावे अशी तुमची इच्छा आहे काय? योसेफ गेला; शिमोनही गेला; आणि आता बन्यामीनालाही माझ्यापासून घेऊन जाण्याची तुमची इच्छा आहे!” 37 मग रऊबेन आपल्या बापास म्हणाला, “बाबा, मी जर बन्यामीनाला मागे आणले नाही तर माझे दोन मुलगे तुम्ही मारुन टाका; बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा! मी खरोखर बन्यामीनाला मागे तुमच्याकडे घेऊन येईन!” 38 परंतु याकोब म्हणाला, “मी बन्यामीनाला तुमच्याबरोबर पाठविणार नाही; त्याचा भाऊ मरण पावला आणि आता माझी बायको राहेल हिचा एवढा एकच मुलगा राहिला आहे. मिसरच्या फेरीत त्याला काही अपाय झाला तर त्यामुळे मला मरण येईल; आणि अतिशय दु:खी म्हातारा माणूस म्हणून तुम्ही मला कबरेत पाठवाल.”

43:1 त्याकाळी कनान देशात फारच तीव्र दुष्काळ पडला होता. 2 याकोबाच्या मुलांनी मिसरहून आणलेले सगळे धान्य घरातील माणसांनी खाऊन संपल्यावर याकोब आपल्या मुलांना म्हणाला, “तुम्ही पुन्हा मिसरला जा व आपल्याला खाण्यासाठी आणखी धान्य विकत आणा.” 3 परंतु यहूदा याकोबास म्हणाला, “त्या देशाच्या प्रमुख अधिकाऱ्याने आम्हाला ताकीद दिली; तो म्हणाला, ‘तुम्ही जर तुमच्या धाकटया भावाला तुमच्या बरोबर माझ्याकडे आणले नाही तर मी तुमच्याशी बोलणार देखील नाहीं.’ 4 तेव्हा तुम्ही बन्यामीनाला आमच्याबरोबर पाठवत असाल तरच आम्ही जाऊन धान्य आणू. 5 पण तुम्ही बन्यामीनाला पाठवणार नाही तर मग आम्ही धान्य आणावयास जाणार नाही. तुमच्या धाकटया भावाशिवाय तुम्ही परत मागे येऊ नका असे त्या आधिकाऱ्याने आम्हास बजावून सांगितले आहे.” 6 इस्राएल (याकोब) म्हणाला, “पण तुम्हाला आणखी एक भाऊ आहे असे त्या प्रमुख अधिकाऱ्याला तुम्ही का सांगितले? आणि त्यामुळे तुम्ही मला पेचात का पाडले?” 7 त्या भावांनी उत्तर दिले, “त्या प्रमुख अधिकाऱ्याने आम्हा सर्वाविषयी काळजी व चिंता दाखवून मोठया प्रेमाने व कळकळीने आपल्या घरच्या सर्वाविषयी विचारपूस केली, कारण त्याला आपल्या घरच्या सर्वाविषयी माहिती करुन घ्यावयास पाहिजे होती. त्याने आम्हाला विचारले, ‘तुमचा बाप अजून जिवंत आहे का? तुमचा एखादा भाऊ सध्या घरी आहे का?’ आम्ही तर तुसती त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली. आम्हाला काय माहीत की तो आमच्या भावाला त्याच्याकडे घेऊन यावयास सांगेल म्हणून.” 8 मग यहुदा आपल्या बापाला म्हणाला, “बाबा बन्यामीनाला माझ्याबरोबर पाठवा. मी त्याची सगळी काळजी घेईन, कारण आम्हाला धान्य आणावयास मिसराला गेलेच पाहिजे; नाही तर आपण सर्व आपल्या मुलाबाळांसकट मरुन जाऊ. 9 त्याच्या सुरक्षिततेची हमी मी घेतो; तसेच त्याची सगळी जबाबदारीही मी घेतो. मी जर त्याला परत माघारी आणू शकलो नाही तर मग तुम्ही मला जन्माचा दोषी ठरवा. 10 तुम्ही आम्हाला अगोदरच जाऊ दिले असते तर आतापर्यंत धान्य आणण्याच्या आमच्या दोन फेऱ्या झाल्या असत्या.” 11 मग त्यांचा बाप इस्राएल म्हणाला, “हे जर अगदी खरे असेल तर मग तुम्ही बन्यामीनाला तुमच्याबरोबर घेऊन जा; परंतु त्या प्रमुख अधिकाऱ्याकरिता आपल्या देशातून आपण मिळवलेल्या काही किंमती वस्तू, काही पदार्थ म्हणजे थोडा मध, पिस्ते, बादाम, डिंक, गंधरस वगैरे देणग्या भेट म्हणून घेऊन जा. 12 यावेळी दुप्पटीपेक्षा पैसा बरोबर न्या. मागच्यावेळी तुम्ही दिलेला जो पैसा तुमच्या गोण्यामधून परत आला तोही परत घेऊन जा; कारण कदाचित त्या अधिकाऱ्याकडून काही चूक झाली असेल. 13 बन्यामीनाला घेऊन त्या अधिकाऱ्याकडे परत जा. 14 त्या अधिकाऱ्यापुढे तुम्ही जाऊन उभे राहाल तेव्हा सर्व समर्थ देव तुम्हाला सहाय्य करो अशी मी प्रार्थना करतो; तसेच तो बन्यामीनाला व शिमोनाला सुखरुपपणे परत मागे पाठवो यासाठी ही देवाची प्रार्थना करतो. असे घडले नाही तर मग माझ्या मुलांना गमावल्याबद्दल मी शोक करीन.” 15 अशा रीतीने त्या भावांनी प्रमुख अधिकाऱ्याकरिता भेट वस्तू घेतल्या व पहिल्यावेळी घेतले होते त्याच्या दुप्पट पैसे यावेळी संगती घेतले बन्यामीनाला घेऊन ते मिसर देशाला रवाना झाले. 16 मिसरमध्ये त्या भावांच्याबरोबर योसेफाने बन्यामीनास पाहिले; तेव्हा योसेफ आपल्या कारभाऱ्यास म्हणाला, “या लोकांना माझ्या घरी आण. एक चांगला पोसलेला पशू मारुन भोजन तयार कर, कारण हे सर्वजण दुपारी माझ्याबरोबर भोजन करतील.” 17 तेव्हा त्या कारभाऱ्याने त्याला सांगितल्याप्रमाणे भोजनाची सर्व तयारी केली. नंतर त्याने त्या सर्व भावांना योसेफाच्या घरी नेले. 18 योसेफाच्या घरी नेल्यावर ते भाऊ फार घाबरले. ते म्हणाले, “मागच्या वेळी आपल्या पोत्यात आपण दिलेले पैसे परत ठेवण्यात आले म्हणून आपणास येथे आणले आहे, त्यावरुन आपणास दोषी ठरवून ते आपली गाढवे घेतील व आपल्याला गुलाम करतील असे वाटते.” 19 म्हणून मग ते भाऊ योसेफाच्या कारभाऱ्याकडे गेले. 20 ते म्हणाले, “महाराज, आम्ही शपथ घेऊन खरे तेच सांगतो; मागच्या वेळी आम्ही धान्य खरेदी करण्यासाठीच आलो होतो. 21 आम्ही घरी परत जाताना एका मुक्कामाच्या ठिकाणी आमची पोती उघडली तेव्हा आमच्या पोत्यात पैसे कसे आले हे आम्हाला माहीत नाही. परंतु ते सगळे पैसे तुम्हाला परत देण्यासाठी आम्ही आमच्या सोबत आणले आहेत; आणि आता यावेळी आणखी धान्य विकत घेण्यासाठी अधिक पैसे आणले आहेत.” 22 23 परंतु योसेफाच्या घरच्या कारभाऱ्याने उत्तर दिले, “भिऊ नका; माझ्यावर विश्वास ठेवा; तुमच्या व तुमच्या पित्याच्या देवाने तुमच्या पोत्यात देणगी म्हणून ते पैसे ठेवले असतील. मागच्या खेपेच्या धान्याचे पैसे तुम्ही मला दिले याची मला पक्की आठवण आहे.”नंतर त्या कारभाऱ्याने शिमोनाला तुरुंगातून सोडवून घरी आणले. 24 मग त्या कारभाऱ्याने त्या भावांना योसेफाच्या घरी आणले; त्याने त्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिले व त्यांनी पाय धुतले. मग त्याने त्यांच्या गाढवांस वैरण दिले. 25 आपण योसेफासोबत भोजन करणार आहो हे त्या भावांना समजले. तेव्हा त्यांनी दुपारपर्यंत काम करुन योसेफाला देण्याच्या भेटीची तयारी केली. 26 योसेफ घरी आला तेव्हा त्या भावांनी त्याच्यासाठी आपल्या सोबत आणलेली भेट अर्पण केली व त्यांनी त्याला भूमिपर्यंत लवून मुजरा केला. 27 मग योसेफाने ते सर्व बरे खुशाल आहेत ना, याची विचारपूस केली. तो म्हणाला, “तुमचे म्हातारे वडील, ज्यांच्याबद्दल तुम्ही मागे मला सांगितले, ते बरे आहेत का? ते अजून जिवंत आहेत ना!”? 28 त्या भावांनी उत्तर दिले, “होय महाराज! आमचे वडील सुखरुप आहेत; ते अजून जिवंत आहेत.” आणि त्यांनी पुन्हा लवून नमन केले. 29 मग योसेफाने आपला सख्खा भाऊ बन्यामीन यास पाहिले. (योसेफ व बन्यामीन यांची आई एकच होती) तो म्हणाला, “तुम्ही मला ज्याच्याविषयी सांगितले तो हाच का तुमचा भाऊ?” नंतर योसेफ बन्यामीनास म्हणाला, “मुला! देव तुझ्यावर कृपा करो!” 30 मग योसेफ घाईघाईने खोली बाहेर निघून गेला. आपला प्रिय भाऊ बन्यामीन याला प्रेमाने घट्ट मिठी मारावी असे त्याला फार वाटले आणि त्याला खूप रडू आले; म्हणून गुपचूप तो आपल्या खोलीत गेला व खूप रडला. 31 मग तोंड धुऊन तो परत आला; मग स्वत:स सावरुन तो म्हणाला, “आता आपण भोजनास बसू या.” 32 योसेफ एकटाच एका मेजावर बसला होता. त्याचे भाऊ दुसऱ्या मेजावर एकत्र बसले; मिसरचे लोक आणखी दुसऱ्या मेजावर बसले कारण इब्री लोकांबरोबर जेवणे चुकीचे आहे असे ते मानीत. 33 योसेफाचे भाऊ त्याच्या समोरील मेजावर बसले. त्यांच्या बसण्याची व्यवस्था त्यांच्या ज्येष्ठतेप्रमाणे केली असल्यामुळे ते चकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले. 34 वाढपी, योसेफाच्या पुढच्या मेजावरील पक्वान्ने घेऊन त्यांना वाढीत होते; परंतु त्यांनी बन्यामीनास इतरापेक्षा पांचपट अधिक वाढले. ते सर्व भाऊ योसेफाबरोबर भरपूर जेवले व मनमुराद प्यायले.

44:1 मग योसेफाने आपल्या कारभाऱ्याला आज्ञा देऊन म्हटले, “या लोकांच्या पोत्यात जेवढे अधिक धान्य मावेल व त्यांना देता येईल तेवढे भर; आणि त्या सोबत प्रत्येकाचे पैसेही त्या पोत्यात ठेव. 2 सर्वात धाकट्या भावाच्या पोत्यात पैशाबरोबर माझा विशेष चांदीचा प्यालाही ठेव.” त्याच्या कारभाऱ्याने त्याच्या आज्ञाप्रमाणे सर्वकाही केले. 3 दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी त्या भावांना त्यांच्या गाढवांसहित त्यांच्या देशाला रवाना करण्यात आले. 4 त्यांनी नगर सोडल्यानंतर थोडया वेळाने योसेफ आपल्या कारभऱ्यास म्हणाला, “जा आणि त्या लोकांचा पाठलाग कर आणि त्यांना थांबवून असे म्हण, ‘आम्ही तुमच्याशी भलेपणाने वागलो! असे असता तुम्ही आमच्याशी अशा वाईट रीतीने का वागला.’ तुम्ही माझ्या स्वामीचा चांदीचा प्याला का चोरल? 5 हा प्याला खास माझा धनी पिण्याकरिता वापरतात; गुप्त गोष्टी समजून घेण्यासाठी तो वापरतात. तसेच देवाला प्रश्न विचारण्याकरिता माझा धनी हया प्यालाचा उपयोग करतात. हा प्याला चोरुन तुम्ही फार वाईट केले आहे.”‘ 6 तेव्हा तो कारभारी स्वार होऊन व त्यांना गाठून योसेफाने आज्ञा केल्याप्रमाणे बोलला. 7 परंतु ते भाऊ कारभाऱ्याला म्हणाले, “स्वामी असे का बरे बोलतात? आम्ही कधीच अशा गोष्टी करीत नाही! 8 मागे आमच्या पोत्यात मिळालेले पैसे आम्ही आता येताना आठवणीने आणले; तेव्हा खात्रीने आपल्या स्वामीच्या घरातून आम्ही सोने किंवा चांदी चोरणार नाही. 9 या उपर आम्हापैकी कोणाच्या पोत्यात तुम्हाला जर तो चांदीचा प्याला मिळाला तर तो भाऊ मरेल; तुम्ही त्याला मारून टाकावे आणि मग आम्ही सर्वजण आमच्या स्वामीचे गुलाम होऊ.” 10 कारभारी म्हणाला, “ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण करु. जर मला चांदीचा प्याला मिळाला तर मग तो माणूस माझ्या धन्याचा गुलाम होईल; इतर जण जाण्यास मोकळे राहतील.” 11 नंतर हर एक भावाने लगेच आपली गोणी जमिनीवर उतरुन उघडली. 12 कारभाऱ्याने थोरल्या भावापासून सुरवात करुन धाकटया भावाच्या गोणीपर्यंत तपासून पाहिले; तेव्हा त्याला बन्यामीनाच्या गोणीत तो चांदीचा प्याला मिळाला. 13 तेव्हा त्याभावांना भयंकर दु:ख झाले; आति दु:खामुळे त्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि आपल्या गोण्या गाढवांवर लादून ते परत नगरात आले. 14 यहूदा व त्याचे भाऊ परत योसेफाच्या घरी गेले. योसेफ अजून घरातच होता. त्या भावांनी योसेफापुढे लोटांगण घातले. 15 योसफ त्यांना म्हणाला, “तुम्ही असे का केले? मला शकून पाहून गुप्त समजण्याचे विशेष ज्ञान आहे हे तुम्हाला माहीत नाही का? आणि या बाबतीत माझ्यापेक्षा अधिक चांगले ज्ञान इतर कोणालाही नाही!” 16 यहूदा म्हणाला, “महाराज! आम्ही आता काहीच बोलू शकत नाही, व याचा उलगडा करण्याचा दुसरा मार्ग नाही. आम्ही अपराधी नाही हे पटविण्यास दुसरा कोणताच मार्ग नाही. आमच्या दुसऱ्या कोणत्यातरी अपराधाबद्दल देवाने आम्हाला दोषी ठरवले आहे. म्हणून आता बन्यामीनासकट आम्ही सर्वजण महाराजांचे गुलाम झालो आहोत.” 17 परंतु योसेफ म्हणाला, “मी तुम्हा सर्वजणांना गुलाम करणार नाही! फक्त ज्याने चांदीचा प्याला चोरला तोच माझा गुलाम होईल. बाकीचे तुम्ही शांतीने आपल्या बापाकडे जाऊ शकता.” 18 मग यहूदा योसेफाकडे जाऊन म्हणाला, “कृपा करुन माझ्यावर रागावू नका परंतु अगदी खरेपणाने व मोकळेपणाने मला आपल्याबरोबर बोलू द्या. आपण फारो राजासमान असून इतके अधिकार आपणाला आहेत हे मी जाणतो. 19 मागच्या वेळी आम्ही येथे असताना आपण आम्हाला विचारले, ‘तुम्हाला बाप किंवा भाऊ आहे का?’ 20 आणि आम्ही आपणास उत्तर दिले, ‘होय! आमचा बाप आहे, परंतु तो आता फार म्हातारा झाला आहे; तसेच आम्हाला एक धाकटा भाऊही आहे. आमच्या बापाच्या म्हातारपणी हा आमचा भाऊ जन्मला म्हणून आमच्या बापाचा त्याच्यावर फार जीव आहे; आणि त्याचा तरुण भाऊ मरण पावला; तेव्हा त्या दोघांच्या आईचा हा एकच मुलगा राहिला आहे; आणि म्हणूनच तो आमच्या बापाचा फार प्रिय व लाडका मुलगा आहे.’ 21 आपण म्हणाला, ‘मग त्या तुमच्या धाकटया भावाला माझ्याकडे घेऊन या; मला त्याला पाहावयाचे आहे.’ 22 आणि आम्ही आपणास म्हणालो, ‘तो धाकटा भाऊ येऊ शकणार नाही, कारण तो बापाला सोडून कोठे जात नाही, जर का बापापासून त्याची ताटातूट झाली तर मग आमचा बाप भयंकर दु:खी होईल व त्या दु:खाने तो मरुन जाईल.’ 23 परंतु आपण आम्हाला बजावून म्हणाला, ‘तुम्ही तुमच्या धाकटया भावला घेऊन आलाच पाहिजे नाही तर मी तुम्हाला पुन्हा धान्य विकणार नाही.’ 24 म्हणून मग आम्ही आमच्या बापाकडे परत गेलो व आपण जे बोलला ते त्याला सांगितले. 25 “काही दिवसानंतर आमचा बाप म्हणाला, ‘मुलांनो, पुन्हा जाऊन आपणासाठी धान्य विकत आणा.’ 26 आणि आम्ही म्हणालो,’ आम्ही आमच्या धाकट्या भावाला बरोबर घेतल्याशिवाय जाणार नाही कारण तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे आणल्या खेरीज मी पुन्हा तुम्हाला धान्य विकणार नाही असे त्या प्रमुख अधिकाऱ्याने आम्हास बजावले आहे.’ 27 मग आमचा बाप आम्हाला म्हणाला, ‘मुलांनो, तुम्हाला माहीत आहे की माझी बायको राहेल हिच्या पोटी मला दोन मुलगे झाले; 28 आणि त्यातल्या एकाला मी पाहिले तो वन्यपशूद्वारे मारला गेला. पुन्हा तो कोणाच्या दष्टीस पडला नाही. 29 आणि आता माझ्या ह्या दुसऱ्या मुलाला तुम्ही माझ्यापासून घेऊन गेला आणि त्याला जर काही अपाय झाला तर मी भयंकर दु:खी होऊन मरुन जाईन.’ 30 तो मुलगा आमच्या बापाच्या आयुष्यात फार महत्वाचा आहे तेव्हा आता जर का आम्ही आमच्या धाकटया भावाशिवाय घरी गेलो आणि आमच्या बापाने हे पाहिले तर 31 आमचा धाकटा भाऊ आमच्या बरोबर नाही असे पाहून आमचा बाप नक्की मरुन जाईल; आणि आपल्या बापाला भयंकर दु:ख देऊन त्याच्या मरणास आम्ही कारण झालो हा दोष सतत आमच्या माथ्यावर राहील. 32 “हया धाकट्या भावाबद्दल मी माझ्या बापास जामीन राहिलो आहे. मी माझ्या बापास सांगितले, ‘जर मी माझ्या धाकट्या भावाला तुम्हाकडे परत घेऊन आलो नाही तर मग जन्मभर मी तुमचा दोषी राहीन.’ 33 तेव्हा महाराज, मी हात जोडूत तुमची काकूळतीने विनवणी करतो; तुम्हापाशी भिक्षा मागतो, त्या घाकट्या मुलाला त्याच्या भावांबरोबर परत जाऊ द्या. मी येथे राहातो आणि तुमचा गुलाम होतो माझे स्वामी! 34 आणि त्या धाकटया भावशिवाय माझ्या बापाकडे माघारी जाण्याची माझ्यात हिंमत नाही! माझ्या बापाचे काय होईल याची मला भयंकर भीती वाटते, हो स्वामी!”

45:1 आता मात्र अधिक वेळपर्यंत योसेफाला आपले दु:ख रोखून धरता येईना. तेव्हा तेथे हजर असलेल्या सर्व लोकां देखत तो मोठ मोठयाने रडू लागला. तो म्हणाला, “येथील इतर सर्व लोकांना येथून निघून जाण्यास सांगा.” तेव्हा तेथील सर्वजण निघून गेले; केवळ त्याचे भाऊच त्याच्यापाशी राहिले; मग योसेफाने आपली ओळख दिली. 2 तो एकसारखा रडत होता. फारोच्या वाडयातील मिसरच्या लोकांनी व फारोच्या घराण्यातील लोकांनीही त्याचे रडणे ऐकले. 3 मग योसेफ हूंदके देत आपल्या भावांना म्हणाला, “प्रिय भावांनो! तुमचा भाऊ योसेफ -- मीच आहे!” मग गहिंवर आवरुन योसेफ पुढे म्हणाला, “माझा बाप खुशाल आहे ना!” परंतु त्याचे भाऊ आश्चर्याने चकित झाले; ते एवढे घाबरले व गोंधळले की त्यांच्या तोंडून शब्द फुटेना! 4 तेव्हा योसेफ आपल्या भावांना पुन्हा म्हणाला, “जरा इकडे माझ्याकडे या; कृपा करुन माझ्याजवळ या अशी मी विनंती करतो.” तेव्हा त्याचे भाऊ त्याच्या जवळ गेले; आणि योसेफ त्यांना म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ मीच आहे; होय! ज्या भावाला तुम्ही मिसरच्या लोकांना गुलाम म्हणून विकले तो योसेफ मीच आहे. 5 आता त्याविषयी काही चिंता व काळजी करु नका; किंवा तुम्ही जे केले त्याबद्दल आपल्याला संताप करुन घेऊ नका; मी येथे यावे व त्यामुळे आपणा सर्वांचे प्राण वाचावेत ही देवाचीच योजना होती. 6 हा भयंकर दुष्काळ आता दोन वर्षे पडला आहे आणि आणखी पाच वर्षे पेरणी किंवा कापणी होणार नाही. 7 अशारीतीने या देशात मी अगोदर येऊन तुमच्यासर्वांचे प्राण वाचावेत म्हणून देवाने मला तुमच्या आधी येथे पाठवले आहे. 8 मला येथे पाठवण्यात तुमचा दोष नव्हता तर ही देवाची योजना होती. देवाने मला फारोच्या बापासमान केले आहे; त्यामुळे मी फारोच्या घरदाराचा स्वामी आणि सर्व मिसर देशाचा प्रशासक झालो आहे.” 9 योसेफ म्हणाला, “तर आता तोबडतोब माझ्या बापाकडे जाण्यास निघा; माझ्या बापाला सांगा की तुमचा मुलगा योसेफ याने तुम्हाला येणे प्रमाणे संदेश पाठवला आहे.”देवाने मला अवघ्या मिसर देशाचा प्रशासक म्हणजे अधिपति केले आहे. तर आता वेळ न दवडता माझ्याकडे निघून या. 10 तुम्ही माझ्या जवळ गोशेन प्रांतात राहा; तुम्ही, तुमची मुले, नातवंडे तसेच तुमची शेरडेमेंढरे, गुरेढोरे असा तुम्हां सर्वांचे मी स्वगात करतो. 11 येणाऱ्या दुष्काळाच्या पाच वर्षात मी तुमची सर्व प्रकारची काळजी घेईन त्यामुळे तुम्हावर व तुमच्या कुटुंबावर सर्व काही गमावण्याची वेळ येणार नाही. 12 योसेफ आपल्या भावांशी बोलतच राहिला. तो म्हणाला, “मी योसेफच आहे याची आता तुम्हाला खात्री पटली असेल; तुमचा भाऊ बन्यामीन याला खात्री पटली आहे; त्याने मला ओळखले आहे; आणि तुमच्याशी बोलणारा मी खरोखर योसेफच आहे. 13 तेव्हा मिसर देशातील माझी धनदौलत व माझे वैभव आणि तुम्ही येथे जे जे पाहिले आहे त्या संबंधी माझ्या बापाला सांगा; आता लवकर जाऊन माझ्या बापाला माझ्याकडे घेऊन या.” 14 मग योसेफ आपला धाकटा भाऊ बन्यामीन याला मिठी मारुन रडला; आणि बन्यामीनही त्याच्या खांद्यावर डोके ठेऊन रडला. 15 मग योसेफाने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांचे मुके घेतले आणि तो रडला; यानंतर त्याचे भाऊ त्याज बरोबर बोलू लागले. 16 योसेफाचे भाऊ त्याजकडे आले आहेत अशी बातमी फारो, त्याच्या घरची मंडळी व त्याचे सेवक यांना समजली त्यामुळे त्या सर्वांना त्याविषयी आनंद झाला. 17 तेव्हा फारो योसेफाला म्हणाला, “तुझ्या भावांना सांग की तुम्हाला गरज असेल तेवढी अन्नसामग्री घेऊन कनान देशास जा; 18 तसेच तुमचा बाप आणि तुमच्या घरची सर्व मंडळी यांना घेऊन माझ्याकडे या; तुम्हाला राहावयास मिसरमधील सर्वात उत्तम प्रदेश मी देईन आणि तुमच्या घरातील मंडळी, यांना आमच्या येथे असलेले उत्तम पदार्थ खावयास मिळतील.” 19 मग फारो म्हणाला, “आपल्या गाड्यांपैकी सर्वात चांगल्या गाड्या तुझ्या भावांना दे व त्यांना सांग की कनान देशास जाऊन तुमचे वडील आणि तुमच्या स्त्रिया व मुले या सर्वांना गाड्यात बसवून मागे घेऊन या; 20 त्यांचे सामान सुमान व जे काही असेल ते सर्व घेऊन येण्यास संकोच धरु नका असे सांग. मिसरमधील उत्तम ते आम्ही त्यांना देऊ शकतो!” 21 तेव्हा इस्राएलाच्या मुलांनी तसे केले; योसेफाने त्यांना फारोने वचन दिल्याप्रमाणे सर्वात चांगल्या गाड्या दिल्या; आणि त्यांच्या प्रवासाकरिता भरपूर अन्नसामग्री दिली; 22 तसेच त्याने प्रत्येक भावाला एक सुंदर पोशाख दिला; व बन्यामीनाला पाच सुंदर पोशाख आणि चांदीची तीनशे नाणी दिली. 23 त्याने आपल्या बापासाठीही देणग्या पाठवल्या. मिसरमधील चांगले पदार्थ गोण्यात लादलेली दहा गाढवी आपल्या बापाकरिता परतीच्या प्रवासासाठी पाठवल्या. 24 मग योसेफाने आपल्या भावांना निरोप दिला; ते निघाले तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “सरळ घरी जा आणि रस्त्यात एकमेकांशी भांडू नका.” 25 अशा रीतीने त्याचे भाऊ मिसर सोडून कनान देशास आपल्या बापाकडे गेले. 26 त्यांनी आपल्या बापास सांगितले, “बाबा! बाबा! तुमचा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे आणि तो अवघ्या मिसर देशाचा प्रशासक म्हणजे प्रमुख अधिकारी आहे.” हे ऐकून त्यांच्या बापाला भोवळ आली.त्यांच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसेना! 27 परंतु त्यांनी त्याला योसेफाने सांगितलेल्या सर्व गोष्टी कळवल्या; मग योसेफाने त्या सर्वांना मिसरला घेऊन जाण्यासाठी पाठवलेल्या चांगल्या गाड्या पाहिल्या तेव्हा त्याच्या जीवात जीव आला व त्याला फारच फार आनंद झाला; 28 इस्राएल म्हणाला, “आता मात्र तुमच्यावर माझा विश्वास बसला आहे की माझा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे; आता मी मरण्यापूर्वी त्याला जाऊन भेटेन!”

46:1 अशा रीतीने इस्राएलाने मिसरच्या प्रवासास सुरवात केली. प्रथम तो बैरशेबास गेला. तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवाची उपासना केली व देवाला अर्पणे वाहिली. 2 रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला. तो म्हणाला, “याकोबा, याकोबा!”आणि इस्राएलाने उत्तर दिले, “हा मी आहे, काय आज्ञा?” 3 देव म्हणाला “मी देव आहे, तुझ्या बापाचा देव आहे; पाहा, मिसर देशास जाण्यास तू भिऊ नको 4 जाताना मी तुझ्याबरोबर येईन, आणि तुझ्या संततीस मी मिसरमधून पुन्हा बाहेर आणीन; तू मिसरमध्ये मरण पावशील परंतु मरण्याच्या वेळी योसेफ तुझ्याजवळ असेल; तू मरण पावशील तेव्हा तो आपल्या हातांनी तुझे डोळे झाकील.” 5 मग इस्राएल (याकोब) बैरशेबा सोडून मिसरच्या प्रवासास निघाला. त्याच्या मुलांनी आपला बाप, आपल्या बायका व मुले या सर्वांना फारोने पाठवलेल्या गाडयातून मिसरला आणले. 6 त्याच प्रमाणे त्यांनी आपली शेरडेमेंढरे गुरेढोरे आणि कनान देशात त्यांनी मिळवलेले सर्वकाही मिसरला नेले. अशा रीतीने इस्राएल आपल्या कुटुंबातील सर्वांना म्हणजे आपले मुलगे व नातू, आपल्या मुली व नाती या सर्वांना घेऊन मिसरला गेला. 7 8 इस्राएलाचे जे मुलगे आणि नातवंडे त्याच्याबरोबर मिसरला गेले त्याची नावे अशी-याकोबाचा पहिला मुलगा रऊबेन होता. 9 रऊबेनाचे मुलगे; हलोक, पल्लू, हेस्रोन, व कार्मी 10 शिमोनाचे मुलगे; यमुवेल, यामीन, ओहाद, याकोन, सोहार आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल. 11 लेवीचे मुलगे: गेर्षेन, कहाथ व मरारी. 12 यहूदाचे मुलगे; एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह; यापैकी एर व ओनान हे कनान देशात मरण पावले; पेरेसाचे मुलगे हेस्रोन व हामूल. 13 इस्साखाराचे मुलगे; तोला, पुवा, योब व शिम्रोन. 14 जबुलूनाचे मुलगे; सेरेद, एलोन व याहलेल. 15 हे सहा मुलगे व मुलगी दीना ही लेकरे याकोबापासून लेआला पदन-अरामात झाली; त्या कुटुंबात तेहतीस जण होते. 16 गाद याचे मुलगे: सिफयोन, हगी, शूनी, एसबोन, एरी, अरोदी व अरेली. 17 आशेराचे मुलगे: इम्ना, इश्बा, इश्वी व बरीया; आणि त्याची बहीण सेराह; बरीयाचे मुलगे हेबेर व मालकीएल. 18 जिल्पा ह्या बायकोपासून झालेले हे सगळे याकोबाचे मुलगे होते. (लाबानने आपली मुलगी लीआ हिला जिल्पा दिली होती.) एकंदर त्या कुटुंबात सोळा माणसे होती. 19 योसेफ व बन्यामीन हे याकोबाची बायको राहेल हिचे मुलगे होते. 20 योसेफास मिसर देशातील ओन नगराचा याजक पोटीफरा याची मुलगी आसनथ हिच्या पोटी मनश्शे व एफ्राईम हे मुलगे झाले. 21 बन्यामीनाचे मुलगे; बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द. 22 योसेफ व बन्यामीन, याकोबापासून राहेलीस झाले व त्यांना झालेली संतती मिळून ते सर्व चौदा जण ह्या कुटुंबात होते. 23 दान याचा मुलगा हुशीम होता 24 नफतालीचे मुलगे; यासहेल, गुनी, येसेर आणि शिल्लेम हे होते. 25 लाबानाने आपली मुलगी राहेल हिला दिलेल्या बिल्हेचे याकोबापासून झालेले मुलगे दान व नफताली आणि त्यांना झालेली संतती असे हे सात जण त्या कुटुम्बात होते. 26 याकोबाच्या वंशातील जी माणसे मिसरमध्ये गेली ती याकोबाच्या मुलांच्या बायका सोडून सहासष्ट जण होती. 27 योसेफास मिसर देशात झालेले दोन मुलगे मिळून एकंदर याकोबाच्या घराण्यातले सत्तर जण मिसर देशात होते. 28 याकोबाने प्रथम यहूदाला योसेफाकडे पाठवले; यहूदा गोशेन प्रांतात योसेफाकडे गेला त्यानंतर याकोब व त्याच्या परिवारातील सर्व मंडळी यहूदाच्या मागे गोशेन प्रांतात गेली. 29 आपला बाप जवळ येत आहे असे योसेफास समजले; तेव्हा तो आपला रथ तयार करुन आपला बाप इस्राएल याच्या भेटीस गोशेन प्रांतात त्याला सामोरा गेला. योसेफाने आपल्या बापास पाहिले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यास मिठी मारली व त्याच्या गळ्यातगळ घालून तो बराच वेळ रडला. 30 मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मात्र मी शांतीने मरण पावेन; मी प्रत्यक्ष तुझे तोंड पाहिले आहे आणि तू जिवंत आहेस हे मला समजले आहे.” 31 मग योसेफ आपल्या भावांना व आपल्या बापाच्या घरच्या सर्वांस म्हणाला, “मी जाऊन फारोला सांगतो की ‘माझे भाऊ व माझ्या बापाच्या घरातील सर्व मंडळी हे कनान देश सोडून येथे माझ्याकडे आले आहेत; 32 माझ्या बापाच्या घरचे सर्वजण मेंढपाळ आहेत. ते सतत शेरडेमेंढरे व गुरुढोरे पाळीत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे व गुरुढोरे पाळीत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे तेथे जे काही होते ते सर्व घेऊन आले आहेत.’ 33 जेव्हा फारो तुम्हाला बोलावून विचारील, ‘तुम्ही काय काम धंदा करता?’ 34 तेव्हा तुम्ही असे सांगा, ‘आम्ही सर्व मेंढपाळ आहोत. दुभती जनावरे पाळून आम्ही उपजिविका करतो. हा आमचा पिढीजात धंदा आहे. आमच्या आधी आमचे वाडवडील हाच धंदा करीत होते.’ मग फारो तुम्हाला गोशेन प्रातांत राहू देईल. मिसरच्या लोकांना मेंढपाळ आवडत नाहीत; म्हणून गोशेन प्रांतात राहणे तुमच्या फायद्याचे आहे.”

47:1 योसेफ फारोकडे जाऊन म्हणाला, “माझा बाप माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबातील सर्व मंडळी कनानातून त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे सर्वकाही घेऊन येथे आले आहेत. ते हल्ली गोशेन प्रांतात आहेत.” 2 योसेफाने आपल्याबरोबर फारोसमोर जाण्यासाठी आपल्या भावांपैकी पाच जणांची निवड केली. 3 फारो त्या भावांना म्हणाला, “तुम्ही काय धंदा करता?” ते भाऊ म्हणाले, “महाराज, आम्ही आपले दास मेढपाळ आहोत; आमच्या आधी आमचे पूर्वजही मेंढपाळच होते.” 4 ते फारोला पुढे म्हणाले, “कनान देशात फारच भयंकर व कडक दुष्काळ पडला आहे. तेथे एकाही शेतात आमच्या कळपासाठी हिरवे गवत किंवा हिरवा चारा नाही म्हणून आम्ही ह्या देशात राहण्यास आलो आहोत; महाराज आम्ही आपणास नम्र विनंती करतो की आम्हास कृपा करुन गोशेन प्रांतात राहू द्यावे.” 5 मग फारो योसेफाला म्हणाला, “तुझा बाप व तुझे भाऊ तुझ्याकडे आले आहेत. 6 त्यांना राहण्याकरिता तू मिसरमधील कोणतेही ठिकाण निवड; त्यांना उत्तम जमीन असलेला प्रदेश दे. त्याना गोशेन प्रांतात वस्ती करुन राहू दे; आणि ते जर तरबेज व कुशल मेंढपाळ असतील तर मग त्यांनी माझ्या गुराढोरांचीही काळजी घ्यावी.” 7 मग योसेफाने आपल्या बापाला फारोच्या समोर येण्यास सांगितले. तेव्हा याकोबाने फारोस आशीर्वाद दिला. 8 मग फारोने याकोबाला विचारले, “तुमचे वय किती आहे?” 9 9याकोबाने उत्तर दिले, “मला फक्त थोडे परंतु कठिण आणि दु:खी असे जीवन लभले आहे व ते मला त्रासदायक व दु:खदायक असे झाले; मला फक्त 130 वर्षांचे आयुष्य मिळाले परंतु माझे पूर्वज माझ्यापेक्षा अधिक वर्षांच जीवन जगले.” 10 याकोबाने फारोला आशीर्वाद दिला व मग तो फारोपुढून निघून गेला. 11 योसेफाने फारोचे म्हणणे मानले व त्याने आपल्या बापाला व भावांना मिसरमधील सर्वात उत्तम भूमीचा रामसेस नगरजवळील प्रांत त्यांना राहावयास दिला. 12 आणि त्याने आपला बाप, आपले भाऊ व त्यांच्या घरचे सर्व यांना भरपूर अन्नसामग्री पुरवली. 13 त्यावेळी दुष्काळ तर फारच कडक झाला. देशात अन्नधान्य कोठेच मिळेना; त्यामुळे मिसर व कनान देश या वाईट परिस्थितीमुळे हवालदील झाले. 14 लोकांनी अधिकात अधिक धान्य विकत घेतले; योसेफाने धान्य विक्रीचे पैसे साठवून फारोच्या वाड्यात आणले. 15 काही काळाने मिसर व कनान देशातील लोकांचे पैसे संपून गेले. त्यांच्या जवळचे सर्व पैसे अन्नधान्य विकत घेण्यात खर्च झाल्यामुळे त्यांच्याकडे शिल्लक काहीच राहिले नाही. त्यामुळे मिसरचे लोक योसेफाकडे जाऊन म्हणाले, “महाराज! कृपा करुन आम्हाला धान्य द्या! आमचे सर्व पैसे संपले आहेत; आम्हाला जर काही खावयास मिळाले नाही तर तुमच्या डोळ्यादेखत आम्ही मरुन जाऊ.” 16 परंतु योसेफ म्हणाला, “तुम्ही मला तुमची गुरेढोरे द्या म्हणजे मग मी तुम्हाला धान्य देईन.” 17 तेव्हा लोकांनी त्याच्याकडील गुरेढोरे शेरडेमेंढरे, घोडे, गाढवे आणि इतर जनावरे देऊन अन्नधान्य विकत घेतले; आणि त्या वर्षात लोकांकडून गुरेढोरे घेऊन त्यांच्या बदल्यात योसेफाने त्यांना अन्नधान्य दिले. 18 परंतु त्याच्या नंतरच्या वर्षात लोकांच्यापाशी असलेली गुरेढोरेही संपली व अन्नधान्य विकत घेण्यास त्यांच्या जवळ काहीही राहिले नाही; म्हणून मग लोक योसेफाकडे जाऊन म्हणाले, “महाराज! आपणास माहीत आहे की आमच्याकडे पैसे उरलेले नाहीत आणि आमची गुरेढोरेही तुमची झाली आहेत; तेव्हा आमच्याकडे आता आपणास दिसतात ती फक्त आमची शरीरे व आमची जमीन या शिवाय दुसरे काहीही राहिलेले नाही. 19 आता मात्र आपण बघत असताना आम्ही नक्की मरुन जाऊ; परंतु जर आपण आम्हास अन्नधान्य द्याल तर मग आम्ही आमची जमीन फारोला देऊ आणि आम्ही त्याचे गुलाम होऊ; कृपा करुन आम्हाला बियाणे द्या म्हणजे आम्ही ते पेरु; मग मात्र आम्ही जगू, मरणार नाही; आणि आमची जमीन आम्हांस धान्य देईल.” 20 तेव्हा मिसरमधील सर्व शेतजमीनी योसेफाने फारोकरिता विकत घेतल्या; मिसरच्या लोकांनी आपल्या शेतजमिनी योसेफाला विकल्या कारण दुष्काळ भयंकर तीव्र झाला होता. 21 मिसरमधील सर्व लोक फारोचे गुलाम झाले. 22 योसेफाने याजकांच्या मालकीच्या जमिनी मात्र विकत घेतल्या नाहीत. फारो याजकांना त्यांच्या कामाबद्दल पगार देत होता; त्या पैशातून ते आपणासाठी अन्नधान्य विकत घेत असत म्हणून त्यांच्यावर आपल्या जमिनी विकण्याची वेळ आली नाही. 23 तेव्हा योसेफ लोकांना म्हणाला, “पाहा, मी फारोकरिता तुम्हाला तुमच्या जमिनीसकट विकत घेतले आहे; तर मी आता तुम्हाला बियाणे देतो; ते तुम्ही शेतात पेरा; 24 मग हंगामाच्या वेळी तुमच्या उत्पन्नातील पांचवा हिस्सा फारोला दिलाच पाहिजे; बाकीचे चार हिस्से तुम्ही तुमच्याकारिता घ्यावेत. त्यातून पुढच्या वर्षाकरिता तुम्ही बियाणे ठेवावे व बाकीच्या धान्याचा तुमच्या घरातील लहानथोरांस खाण्यासाठी उपयोग करावा.” 25 लोक म्हणाले, “महाराज, आपण आम्हाला वाचवले आहे म्हणून फारोचे गुलाम होण्यात आम्हाला आनंद आहे.” 26 त्यावेळी मग योसेफाने देशासाठी एक कायदा केला, तो आजपर्यंत चालू आहे; त्या कायद्याप्रमाणे जमिनीच्या उत्पन्नचा पाचवा भाग फारोचा आहे. फारो मिसरमधील सर्व जमिनीचा मालक आहे; फक्त याजकांची जमीन फारोच्या मालकीची नाही. 27 इस्राएल (याकोब) मिसरमध्ये गोशेन प्रांतात राहिला. त्याची संतती खूप वाढली व त्यांची भरभराट झाली; त्यांना मिसरमधील जमीन मिळाली व त्यांनी वतने केली आणि तेथे त्यांचे सर्वकाही चांगले झाले. 28 याकोब मिसरमध्ये सतरा वर्षे राहिला तेव्हा तो एकशे सत्तेचाळीस वर्षांचा झाला. 29 दिवस वाढत गेले तसे इस्राएलाने (याकोबाने) जाणले की आता आपण लवकर मरणार, म्हणून मग त्याने आपला मुलगा योसेफ याला आपणाजवळ बोलावले; तो म्हणाला, “तू जर माझ्यावर प्रेम करतोस तर माझ्या मांडिखाली तुझा हात ठेवून मला वचन दे की मी जे सांगतो ते तू करशील आणि तू माझ्याशी खरेपणाने वागशील. जेव्हा मी मरेन तेव्हा मला मिसरमध्ये पुरु नको; 30 तर मला मिसरमधून बाहेर घेऊन जा व माझ्या पूर्वजांना जेथे पुरले आहे तेथे म्हणजे आपल्या वंशजांसाठी घेतलेल्या कबरस्तानात मला मूठमाती दे.” योसेफाने उत्तर दिले, “बाबा! तुम्ही मला जे करावयास सांगितले ते मी नक्की करीन असे वचन देतो.” 31 मग याकोब म्हणाला, “तू माझ्याशी तशी शपथ वाहा;” तेव्हा तसे करण्याबद्दल योसेफाने शपथ वाहिली; मग इस्राएलाने (याकोबाने) आपले डोके मागे पलंगाच्या उशाकडे नम्रतेने लववून नमन केले.

48:1 मग काही काळानंतर आपला बाप फारो आजारी असल्याचे समजले म्हणून योसेफ आपले दोन मुलगे मनश्शे व एफ्राईम यांना घेऊन आपल्या बापाला भेटावयास गेला; 2 “योसेफ आपणास भेटावयास आला आहे” असे समजल्याबरोबर इस्राएल फार अशक्त झाला होता; तरीही अगदी कष्टाने प्रयत्न करुन तो बिछान्यावर उठून बसला. 3 मग इस्राएल योसेफास म्हणाला, “सर्वसमर्थ देवाने मला कनानातील लूज येथे दर्शन देऊन आशीर्वाद दिला. 4 देव म्हणाला, ‘मी तुला खूप संतती देईन व ती वाढवीन आणि तुम्ही एक मोठे राष्ट्र व्हाल; तुझी संतती या देशाची कायमची वतनदार होईल.’ 5 आणि आता तुला दोन मुलगे आहेत. मी येथे मिसरला येण्यापूर्वी हे दोघे येथे जन्मले. तुझे हे दोन मुलगे मनश्शे व एफ्राईम मला माझ्या स्वत:च्या मुलासारखे आहेत; म्हणजे जसे मला रऊबेन व शिमोन तसेच हे दोघे आहेत. 6 ते माझे मुलगे आहेत म्हणून माझ्या सर्व मालमत्तेत वाटेकरी होतील; परंतु तुला जर आणखी मुलगे झाले तर मग ते तुझे होतील; पण ते एफ्राईम व मनश्शे यांना, त्यांच्या मुलग्यांसारखे होतील म्हणजे पुढील काळात एफ्राईम व मनश्शे यांच्या मालमत्तेचे ते वारस होतील म्हणजेच त्यांचे वतन एफ्राईम व मनश्शे ह्या त्यांच्या भावांच्या नावाने चालेल. 7 कारण पदन - अराम येथून येताना तुझी आई राहेल एफ्राथजवळ आम्ही, वाटचाल करीत असताना कनान देशात मरण पावली; त्यामुळे मी फार दु:खी झालो; तेव्हा एफ्राथच्या म्हणजे बेथलेहेमाच्या वाटेवर मी तिला मूठमाती दिली.” 8 मग इस्राएलाने योसेफाच्या मुलांना पाहिले; तेव्हा इस्राएल म्हणाला, “हे मुलगे कोणाचे आहेत?” 9 योसेफ आपल्या बापास म्हणाला, “बाबा! हे माझे मुलगे आहेत; हे मला देवाने दिले आहेत.”इस्राएल म्हणाला, “तुझ्या मुलांना माझ्याकडे आण म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.” 10 इस्राएल अतिशय म्हातारा झाला होता आणि त्याची नजर मंद झाल्यामुळे त्याला चांगले स्पष्ट दिसत नव्हते; तेव्हा इस्राएलाने त्या मुलांना कवटाळून त्यांचे मुके घेतले. 11 मग इस्राएल योसेफास म्हणाला, “मुला तुझे तोंड पुन्हा पाहावयास मिळेल असे वाटले नव्हते, पण पाहा! देवाने तुझी व माझी भेट होऊ दिली. मला तुझी मुलेही पाहू दिली.” 12 मग योसेफाने आपल्या मुलांना इस्राएलाच्या मांडीवरुन काढून घेतले; ते मुलगे इस्राएला समोर उभे राहिले व त्यांनी त्याला लवून नमन केले. 13 योसेफाने मनश्शेला आपल्या डाव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या उजव्या हाती येईल असे व एफ्राईमाला आपल्या उजव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या डाव्या हाती येईल असे उभे केले. 14 परंतु इस्राएलाने आपल्या उजव्या डाव्या हातांची घडी टाकून अदलाबदल केली आणि आपला उजवा हात त्याने धाकटया मुलाच्या म्हणजे एफ्राईमाच्या डोक्यावर ठेवला व डावा हात थोरल्याच्या म्हणजे मनश्शेच्या डोक्यावर ठेवला; 15 आणि इस्राएलाने योसेफाला आशीर्वाद दिला; तो म्हणाला,“माझे पूर्वज अब्राहाम व इसहाक यांनी आपल्या देवाची उपासना केली व त्याच देवाने मला माझ्या सर्व आयुष्यभर चालवले आहे; 16 तोच मला सर्व संकटातून सोडवणारा माझा देवदूत होता. त्यानेच ह्या मुलांना आशीर्वाद द्यावा अशी मी प्रार्थना करतो. आता ही मुले माझे व आपले पूर्वज अब्राहाम व इसहाक यांचे नाव चालवोत; ते वाढून त्यांची पृथ्वीवर अनेक कुटुंबे, कुळे व राष्ट्रे होवोत अशी मी प्रार्थना करतो.” 17 आपल्या बापाने एफ्राईमाच्या डोक्यावर आपला उजवा हात ठेवला असे पाहिले तेव्हा योसेफाला ते आवडले नाही; त्याला तो हात एफ्राईमाच्या डोक्यावरुन काढून मनश्शेच्या डोक्यावर ठेवावयास पाहिजे होता म्हणून योसेफाने आपल्या बापाचा हात धरला. 18 योसेफ आपल्या बापास म्हणाला, “बाबा! तुम्ही आपला उजवा हात चुकीच्या मुलावर ठेवला आहे. मनश्शे हा प्रथम जन्मलेला म्हणजे माझा थोला मुलगा आहे. 19 परंतु त्याचा बाप आपले म्हणणे कायम ठेवत पुढे म्हणाला, “माझ्या मुला! मला माहीत आहे; होय मला माहित आहे की मनश्शे हा प्रथम जन्मलेला आहे; आणि तो महान होईल; तो अनेक राष्ट्रांचा पिता होईल म्हणजे त्याच्यापासून अनेक राष्ट्रे उदयास येतील, परंतु धाकटा भाऊ थोरल्या पेक्षाही अधिक महान होईल आणि त्याची कुळे वाढून त्यांचा मोठा राष्ट्रसमूह निर्माण होईल.” 20 तेव्हा त्या दिवशी इस्राएलाने त्या मुलांना आशीर्वाद दिला; तो म्हणाला,“इस्राएल लोक आशीर्वाद देताना तुमची नावे उच्चारितील; ते म्हणतील, “देव तुम्हाला एफ्राईमासारखा, मनश्शेसारखा आशीर्वाद देवो.” 21 मग इस्राएल योसेफास म्हणाला, “माझे शेवटचे दिवस आता अगदी जवळ आले आहेत, आता मी मरणार; परंतु देव सतत तुमच्या बरोबर राहील, तो तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या देशात घेऊन जाईल. 22 तुझ्या भावांना मी जे दिले नाही ते मी तुला देतो; मी स्वत: तलवारीने व धनुष्याने लढून अमोरी लोकाकडून जिंकलेला पर्वत तुला देतो.”

49:1 मग याकोबाने आपल्या सर्व मुलांना आपल्याजवळ बोलावले. तो म्हणाला, “माझ्या मुलांनो, माझ्या जवळ या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल हे मी तुम्हास सांगतो.” 2 “याकोबाच्या मुलांनो! तुम्ही सर्व एकत्र या आणि तुमचा बाप इस्राएल याचे ऐका.”रऊबेन 3 “रऊबेना! तू माझा पाहिलाच म्हणजे थोरला मुलगा आहेस: पुरुष म्हणून माझ्यात असलेल्या शक्तीचा तू पाहिला पुरावा आहेस. तू सर्वापेक्षा अधिक शक्तीवान व सर्वापेक्षा अधिक अभिमान वाटावा असा आहेस; 4 परंतु तुझ्या भावना पुराच्या अनावर व बेबंद लाटांप्रमाणे आहे; तू माझा मुलांमध्ये श्रेष्ठ किंवा सर्वात अधिक महत्वाचा मुलगा होणार नाहीस कारण तू आपल्या बापाच्या एका बायकोपाशी जाऊन निजलास; तू आपल्या बापाच्या अंथरुणाचा आदर करुन मान राखला नाहीस.” 5 “हे भाऊ आहेत; या दोन भावांना तरवारींने लढण्याची आवड आहे. 6 त्यांनी गुपचूप वाईट गोष्टी करण्याचे ठरवले; त्यांचे हे बेत माझ्या जीवाला मान्य नाहीत; तसेच त्यांच्या गुप्त बैठका मला मान्य नाहीत; त्यांनी रागाच्या भरात माणसांची कत्तल केली; गंमत म्हणून त्यांनी पशूंना जखमी केले; 7 त्यांचा राग शाप आहे; ते अति रागाने वेडे होतात तेव्हा अतिशय क्रूर बनतात; याकोबाच्या जमिनीत त्यांना वाटा मिळणार नाही. ते सर्व इस्राएल देशभर पसरतील.” 8 “यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील; तू तुझ्या शत्रूंचा पराभव करशील; तुझे भाऊ तुला लवून नमन करतील. 9 यहूदा, तू आपली शिकार मारलेल्या सिंहासारखा आहेस; माझ्या मुला, आपल्या शिकारीचा पशू मारुन त्याच्यावर उभा असलेल्या सिंहासारखा तू आहेस;यहूदा विसावा घेणाऱ्या सिंहासारखा आहेआणि त्याला त्रास देण्याइतका शूर दूसरा कोणीही नाही. 10 यहूदाचे कुटुंबीय राजे होतीलआणि योग्य राजा येईपर्यंत त्याच्या कुळातील राजवेत्र जाणार नाही मग बहुतेक जण त्याच्या आज्ञेत राहतील व त्याची सेवा करतील. 11 तो आपले गाढव अगदी चांगल्याद्राक्षवेलीस बांधून ठेवील; तो उंची द्राक्षारसाने आपले कपडे धुईल; 12 द्राक्षमद्य घेतल्याने त्याचे डोळे त्या द्राक्षमद्यापेक्षा अधिक लालबुंद होतील; त्याचे दात दूधपिण्यामुळे दूधापेक्षा अधिक सफेद होतील.” 13 “जबुलून समुद्र किनाऱ्याजवळ राहिल; त्याचा समुद्र किनारा जहाजासाठी सुरक्षित बंदर असेल. त्याच्या जमिनीची हद्द सिदोन नगरपर्यंत असेल.” 14 “इस्साखार अतिशय कष्टाने काम करणाऱ्या गाढवासारखा होईल; जड वजनाचे सामान वाहून नेल्यावर तो विश्रांती घेईल. 15 आपले विसावा घेण्याचे ठिकाण चांगले आहे, आपला देश आनंददायक आहे असे तो पाहिल आणि मग जड बोजा वाहून नेण्यास व अगदी गुलामाप्रमाणे काम करण्यास तो तयार होईल.” 16 “दान इस्राएलाच्या इतर वंशाप्रामाणे आपल्या लोकांचा न्याय करील. 17 तो रस्ताच्या कडेला असणाऱ्या सापाप्रमाणे, वाटेच्या कडेला पडून असलेल्या भयंकर नागाप्रमाणे होईल; तो घोड्याच्या टाचेला दंश करील; त्यामुळे घोडेस्वार घोड्यावरुन खाली कोसळेल; 18 “हे परमेश्वरा, तुझ्या कडून उध्दार होण्याची मी वाट पाहात आहे.” 19 “लुटारुंची टोळी” गाद वर हल्ला करेल, परंतु तो त्यांना पळवून लावील.” 20 “आशेराची जमीन उत्तम अन्न भरपूर उपजवील; राजाला योग्य असे चांगले अन्नपदार्थ त्याजकडे असतील.” 21 “नफताली मोकळ्या सुटलेल्या बागडणाऱ्या हरिणीप्रमाणे होईल; त्याचे शब्द म्हणजे त्याचे बोलणे हरिणींच्या पाडसाप्रमाणे गोड व सुंदर असेल.” 22 “योसेफ अतिशय यशस्वी झाला आहे; तो ओढ्याकाठी वाढणाऱ्या द्राक्षवेलीसारखा आहे; ती कुंपणावरही पसरते. 23 पुष्कळ लोक त्याच्या विरुद्ध झाले व त्याच्याशी लढले; धनुर्धारी लोकांनी त्याचा द्धेष केला; 24 परंतु आपल्या वळकट धनुष्याच्या आणि कुशल बाहुंच्या जोरावर त्याने युद्व जिंकिले. त्याला याकोबाचा सामर्थ्यवान देव, मेंढपाळ, इस्राएलाचा खडक व तुमच्या बापाचा देव याजकडून तुम्हाला शक्ती मिळते. 25 सर्वशक्तिमान देव तुला वर आकाशातून व खाली खोल दरीतून आशीर्वाद देवो तसेच स्तनांचा व गर्भाचा आशीर्वाद तो तुला देवो. 26 माझ्या आईबापाच्या जीवनात अनेक चांगल्या घटना घडल्या व अनेक चांगल्या गोष्टी त्यांना मिळाल्या; आणि मी तुझा बाप, मला त्यांच्यापेक्षा अधिक आशीर्वाद मिळाला; तुझ्या भावांनी तुला काही ठेवले नाही. परंतु माझे सर्व आशीर्वाद तुझ्यावर पर्वता एवढे होतील.’ 27 “बन्यामीन एखाद्या भुकेलेल्या लांडग्यासारखा आहे. तो सकाळी आपले भक्ष्य मारुन खाईल व राहिलेले संध्याकाळी वाटून टाकील.” 28 हे सर्व इस्राएलाचे बारा वंश होत; आणि हया गोष्टी त्यांचा बाप त्यांच्याशी बोलला; त्याने प्रत्येक मुलाला ज्याच्या त्याच्या योग्यातेप्रमाणे आशीर्वाद दिला. 29 मग इस्राएलाने त्यांना आज्ञा दिली. तो म्हणाला, “मी मरेन तेव्हा तुम्ही मला माझ्या लोकात नेऊन ठेवावे. एफ्राम हित्ती ह्याच्या शेतातील गुहेत माझ्या पूर्वजांबरोबर मला पुरावे. 30 ती गुहा कनान देशात मम्रेच्या राईजवळील मकपेला येथील शेतात आहे. आपल्या घराण्याला कबरस्तान असावे म्हणून अब्राहामाने ते शेत एफ्रामकडून विकत घेतले. 31 अब्राहाम व त्याची बायको सारा, यांना त्या गुहेह पुरले आहे. इसहाक आणि त्याची बायको रिबेका यांनाही तेथेच पुरले आहे. आणि माझी बायको लेआ हिलाही मी तेथेच पुरले आहे. 32 ती गुहा हेथी लोकाकडून विकत घेतलेल्या शेतात आहे.” 33 आपल्या मुलांशी हे बोलणे संपवल्यानंतर इस्राएल आपले पाय पलंगावर घेऊन झोपला व मरण पावला.

50:1 इस्राएल मरण पावला तेव्हा योसेफ फार दु:खी झाला. तो आपल्या बापाला कवटाळून खूप रडला; त्याने बापाची चुंबने घेतली. 2 योसेफाने आपल्या सेवाकांतील वैद्यांना आपल्या बापाचे प्रेत मसाला लावून, व भरुन तयार ठेण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांनी खास मिसरच्या पद्धतीने इस्राएलाचे प्रेत मसाला लावून, भरुन, पुरण्यासाठी तयार केले. 3 अशा खास पद्धतीनेे प्रेत तयार केल्यानंतर ते पुरण्या पूर्वी मिसरचे लोक चाळीस दिवस थांबत असत. त्यांनतर मिसरच्या लोकांनी त्यांच्या रीतीप्रमाणे याकोबासाठी सत्तर दिवस शोक केला. 4 सत्तर दिवसानंतर शोक करण्याचा काळ संपला. तेव्हा योसेफ फारोच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, “फारोला हे सांगा, 5 ‘माझा बाप मरावयास टेकला असताना मी त्याला वचन दिले होते की मी त्याला कनान देशातील त्याने स्वत:साठी तयार केलेल्या गुहेत पुरेन. तेव्हा कृपया माझ्या बापास पुरावयास जाऊ द्या; मग मी परत आल्यावर तुम्हाला भेटेन.”‘ 6 फारोने उत्तर दिले, “तू आपल्या बापाला दिलेले वचन पूर्ण कर; तू जाऊन आपल्या बापाने सांगितल्या प्रमाणे त्याला पुरुन ये.” 7 तेव्हा योसेफ आपल्या बापाला पुरण्यासाठी गेला; तेव्हा फारोचे सर्व अधिकारी व मिसरचे नेते आणि सर्व वडीलजन योसेफाबरोबर गेले; 8 आपले कुटुंबीय, आपले भाऊ व त्यांचे कुटुंबीय तसेच आपल्या बापाचे कुटुंबीय योसेफाबरोबर होते. (फक्त लहान मुले व पशू एवढेच गोशेन प्रांतात मागे राहिले होते.) 9 तो लोकांचा खूप मोठा समूह होता. सैनिकांची एक पलटणाही घोडयावर बसून मोठया संख्येने योसेफाबरोबर गेले. 10 ते यार्देन (जॉईन) नदीच्या पूर्वेस गोरेन आताद येथील खळ्यावर गेले. या ठिकाणी इस्राएलाचा प्रेतक्रिया विधी झाला. हा प्रेतकियेचा विधी सात दिवस चालला. 11 कनान देशात राहाणाऱ्या लोकांनी गोरेन आताद येथील हे प्रेतक्रियेचे विधी व संस्कार पाहिले तेव्हा ते म्हणाले, “मिसरच्या लोकांचे प्रेतक्रिया विधी व संस्कार फारच दु:खाने भरलेले आहेत.” त्यामुळे आता त्या जागेला अबेल मिस्राईम असे नाव पडले आहे. 12 अशाप्रकारे याकोबाच्या मुलांनी आपल्या बापाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले; 13 त्यांनी त्याचे प्रेत कनान देशात नेऊन एफ्रोन हित्ती याजकडून कबरस्तान म्हणून उपयोगी पडावे यासाठी अब्राहामाने विकत घेतलेल्या मम्रे येथील शेतातील मकपेला गुहेत पुरले. 14 आपल्या बापाच्या प्रेतक्रियेनंतर योसेफ आणि त्याच्या बरोबर गेलेला सर्वसमुदाय मिसरला माघारी गेला. 15 याकोब मरण पावल्यावर योसेफाचे भाऊ चिंतेत पडले. फार पूर्वी आपण योसेफाबरोबर दुष्टपणाने वागलो त्यावरुन आता सुद्धा आपल्यावर त्याचा राग भडकेल अशी त्यांना भीती वाटली. ते स्वत:शीच म्हणाले कदाचित “योसेफ अजूनही आपला तिरस्कार करत असेल आणि आपण त्याच्याशी वाईट वागलो त्याचा तो बदला घेईल.” 16 तेव्हा त्या भावांनी योसेफाला येणे प्रमाणे निरोप पाठवला.तुझ्या बापाने मरण्यापूर्वी आम्हाला अशी आज्ञा दिली 17 तो म्हणाला, ‘योसेफाला सांगा की तुझ्या भावांनी तुझ्याशी जे वाईट वर्तन केले त्याबद्दल तू त्यांची क्षमा करावीस अशी मी विनंती करतो.’ तेव्हा हे योसेफा, आम्ही तुला अशी विनंती करतो की, आम्ही तुझ्याशी वाईट रीतीने वागलो त्याबद्दल कृपया तू आमची क्षमा कर. आम्ही देवाचे, तुझ्या बापाच्या देवाचे दास आहोत.योसेफाचे भाऊ वरीलप्रमाणे बोलले त्यामुळे योसेफाला फार दु:ख झाले व तो रडला. 18 योसेफाचे भाऊ त्यांजकडे गेले व ते त्याच्या पाया पडले, मग ते म्हणाले, “आम्ही आपले दास आहोत.” 19 मग योसेफ त्यांना म्हणाला, “भिऊ नका; मी देव नाही, म्हणजे शिक्षा करण्याचा मला अधिकार नाही! 20 तुम्ही माझे वाईट करण्याचा कट केला, पण देव माझ्यासाठी चांगली योजना करीत होता. असंख्य लोकांचे प्राण वाचविण्यासाठी माझा उपयोग करावा अशी देवाची योजना होती. आजही देवाची तीच योजना आहे. 21 तेव्हा भिऊ नका; मी तुमची व तुमच्या मुलाबाळांची काळजी घेईन, तुमचे पोषण करीन.” योसेफ त्याच्या भावाशी ममतेने बोलला त्यामुळे त्याच्या भावांना बरे वाटले. 22 योसेफ आपल्या बापाच्या कुटुंबीयासह मिसरमध्ये राहिला. तो एकशे दहा वर्षांचा असताना मरण पावला. 23 योसेफाच्या हयातीत एफ्राईमाला मुले व नातवंडे झाली; आणि त्याचा मुलगा मनश्शे याला माखीर नावाचा मुलगा झाला. योसेफाने मारखीराची मुले ही पाहिली. 24 योसेफाचे मरण जवळ आले तेव्हा तो आपल्या भावांना म्हणाला, “माझी मरण्याची वेळ जवळ आली आहे; परंतु देव तुमची काळजी घेईल हे मला माहीत आहे. तो देव तुम्हाला ह्या देशातून काढून अब्राहाम, इसहाक, व याकोब यांना जो देश देण्याचे वचन त्याने दिले होते त्या देशात घेऊन जाईल.” 25 मग योसेफाने आपल्या वंशजास वचन देण्यास सांगितले. तो म्हणाला, “देव जेव्हा तुम्हाला येथून काढून पुढे घालून त्या नवीन देशात घेऊन जाईल तेव्हा माझे शरीर तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जाल असे मला वचन द्या.” 26 योसेफ एकशेदहा वर्षांचा झाल्यावर मिसरमध्ये मरण पावला. वैद्यांनी त्याच्या शरीराला मसाला लावून ते पुरण्यासाठी तयार केले व ते शवपेटीत मिसरमध्ये ठेवले.