Jeremiah

1:1 हे यिर्मयाचे संदेश आहेत, यिर्मया हिल्कीयाचा मुलगा होता. तो अनाथोथ शहरातील याजकांच्या कुळातील होता.हे शहर बन्यामीनच्या कुटुंबाच्या मालकीच्या जमिनीवर वसले आहे. 2 योशीया यहूदाचा राजा असताना देवाने यिर्मयाशी बोलायला आरंभ केला. योशीया आमोनचा मुलगा होता. योशीयाच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षापासून देवाने यिर्मयाशी बोलायला सुरवात केली. 3 यहूदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीतही परमेश्वर यिर्मयाशी बोलत राहिला. यहोयाकीम हा योशीयाचा मुलगा होय योशीयाचा दुसरा मुलगा सिद्कीया हा यहूदाचा राजा झाल्यावर त्याच्या कारकिर्दीच्या अकरा वर्षे पाच महिने एवढ्या काळापर्यंत परमेश्वर यिर्मयाशी बोलला. सिद्कीयाच्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीच्या नंतर पाचव्या महिन्यात यरुशलेममधील लोकांना दूर नेऊन हद्दपार केले गेले. 4 यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. हा संदेश असा होता. 5 “तू आईच्या गर्भात जन्म घेण्यापूर्वीपासून मला माहीत होतास. तू जन्माला येण्यापूर्वीच मी तुझी विशेष कामगिरीसाठी निवड केली. राष्ट्रांचा संदेष्टा म्हणून मी तुझी निवड केली.” 6 मग यिर्मया म्हणाला, “पण सर्वशक्तिमान परमेश्वरा, मला कसे बोलावे ते माहीत नाही. मी तर एक लहान बाआलक आहे.” 7 पण परमेश्वर मला म्हणाला,“मी लहान बाआलक आहे’ असे म्हणू नकोस. मी तुला पाठवीन तेथे सगळीकडे तुला गेलेच पाहिजे. मी तुला सांगीन ती प्रत्येक गोष्ट तू लोकांना सांगितलीच पाहिजे. 8 कोणालाही घाबरु नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझे रक्षण करीन.” हा परमेश्वराचा संदेश होता. 9 मग परमेश्वराने हात लांब करुन माझ्या तोंडाला स्पर्श केला. मग परमेश्वर मला म्हणाला,“यिर्मया, मी माझे शब्द तुझ्या तोंडात घालीत आहे. 10 खाली ओढण्यासाठी, फाडून टाकण्यासाठी, नष्ट करुन टाकण्यासाठी आणि उलथून टाकण्यासाठी, उभारणी करण्यासाठी आणि नवीन लागवड करण्यासाठी आजपासून मी राष्ट्रे आणि राज्ये तुझ्या ताब्यात देत आहे.” 11 मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो असा होता. “यिर्मया, तुला काय दिसते?”मी परमेश्वराला सांगितले, “मला बदामाच्या झाडापासून केलेली एक काठी दिसते.” 12 परमेश्वर मला म्हणाला, “तुला उत्तम दिसत आहे. तुला पाठविलेले माझे शब्द खरे आहेत की नाही हे नक्की करण्यासाठी मी लक्ष ठेवत आहे.” 13 मग मला पुन्हा परमेश्वराचा संदेश मिळाला तो असा: “यिर्मया, तुला काय दिसते?”मी परमेश्वराला उत्तरादाखल म्हणालो, “मला उकळते पाणी असलेले एक भांडे दिसत आहे. ते उत्तरेकडे कलत आहे.” 14 परमेश्वर मला म्हणाला, “उत्तरेकडून काहीतरी भयंकर आपत्ती येईल. ती ह्या देशातील सर्व लोकांवर येईल. 15 काही काळाने मी उत्तरेकडील राज्यातील सर्व लोकांना बोलवीन.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या: “त्या देशातील राजे येतील आणि यरुशलेमच्या वेशीजवळ आपली सिहांसने स्थापन करतील. ते शहराच्या तटबंदीवर हल्ला करतील. ते यहूदातील सर्व शहरांवर चढाई करतील. 16 आणि मी माझ्या लोकांविरुद्ध निकाल घोषित करीन. ते लोक वाईट आहेत. ते माझ्याविरुद्ध फिरले आहेत. म्हणून मी असे करीन माझ्या लोकांनी माझा त्याग केला. त्यांनी दुसऱ्या देवतांना बळी अर्पण केले. त्यांनी स्वत:च्या हातांनी घडविलेल्या मूर्तीची पूजा केली. 17 “यास्तव, यिर्मया, तयार हो, उभा राहा आणि लोकांशी बोल. मी तुला सांगितलेली प्रत्येक गोष्ट तू त्यांना सांग. लोकांना घाबरु नकोस, जर तू त्यांना घाबरलास, तर तू त्यांना घाबरावेस म्हणून मी सबळ कारण काढीन. 18 माझ्या विषयी म्हणशील तर, आज मी तुला भक्कम शहराप्रमाणे वा लोखंडी खांबाप्रमाणे अथवा जस्ताच्या भिंतीप्रमाणे करीन. तू ह्या भूमीवरच्या सर्वांविरुद्ध यहूदाच्या राजाविरुध्द, यहूदाच्या नेत्यांविरुध्द, तेथील याजकांविरुध्द आणि लोकांविरुद्ध समर्थपणे उभा राहशील. 19 ते सर्व लोक तुझ्याविरुद्ध लढतील, पण ते तुझा पराभव करणार नाहीत. का? कारण मी तुझ्याबरोबर आहे. मी तुझे रक्षण करीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे.

2:1 यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. तो असा होता: 2 “यिर्मया, जा आणि यरुशलेममधील लोकांशी बोल. त्यांना सांग:“तुमचे राष्ट्र तरुण होते त्या वेळी तुम्ही माझ्याशी निष्ठावंत होता. नववधूप्रमाणे तुम्ही मला अनुसरलात. तुम्ही वाळवंटातून आणि पडिक जमिनीतून माझ्या मागे आलात. 3 इस्राएलचे लोक म्हणजे परमेश्वराला मिळालेली पवित्र देणगी होती. परमेश्वराने तोडलेले ते पहिले फळ होते. त्यांना दुखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला अपराधी ठरविले गेले. त्या पापी लोकांचे वाईट झाले.”‘ हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता. 4 याकोबच्या वंशजांनो, इस्राएलमधल्या कुळांनो, परमेश्वराचा संदेश ऐका. 5 परमेश्वर असे म्हणतो: “मी तुमच्या पूर्वजांशी न्यायीपणाने वागलो नाही असे तुम्हाला वाटते का? म्हणून ते माझ्यापासून दूर गेले का? त्यांनी कवडी मोलाच्या दैवतांना पूजले व स्वत: कवडीमोल झाले. 6 तुमचे पूर्वज असे म्हणाले नाहीत ‘परमेश्वराने आम्हाला मिसरहून आणले. परमेश्वराने आम्हाला वाळवंटातून पार नेले. त्यानेच आम्हाला ओसाड आणि खडकाळ प्रदेशातून बाहेर नेले. काळोख व धोका असलेल्या, निर्जन, जेथून कोणीही प्रवास करीत नाही अशा प्रदेशातून देवाने आम्हाला पार केले. तो परमेश्वर आता कोठे आहे?” 7 परमेश्वर म्हणतो, “मी तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टींनी भरलेल्या उत्तम प्रदेशात आणले. तुम्हाला तेथे पिकणारी फळे व धान्य खायला मिळावे म्हणून मी हे केले. पण तुम्ही माझी ही भूमी ‘गलिच्छ’ केली. मी तुम्हाला दिलेली ही भूमी तुम्ही खराब केली. 8 “याजकांनी ‘परमेश्वर कोठे आहे’ असे विचारले नाही. कायदा जाणणाऱ्यांनी मला जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. इस्राएलचे नेते माझ्याविरुद्ध गेले. संदेष्ट्यांनी खोटा देव बआल याच्या नावे भविष्य वर्तविले. त्यांनी निरुपयोगी मूर्तीची पूजा केली.” 9 परमेश्वर म्हणतो, “म्हणून आता मी तुम्हाला पुन्हा दोषी ठरवीन आणि तुमच्या नातवंडानासुद्धा दोषी ठरवीन. 10 समुद्र पार करुन कित्ती बेटावर जा. कोणाला तरी केदारला पाठवा. लक्षपूर्वक पाहा. कोणी असे कधी काही केले आहे का ते बघा! 11 कोणत्या राष्ट्राने, नवीन दैवतांची पूजा करायची म्हणून, जुन्या, दैवतांना पूजायचे थांबविले आहे का? नाही. आणि त्यांचे दैवत मुळी देवच नाही. पण माझ्या लोकांनी त्यांच्या तेजस्वी देवाची पूजा करायचे सोडून कवडीमोलाच्या मूर्तीची पूजा करणे सुरु केले. 12 “आकाशा, घडलेल्या गोष्टीबद्दल तुला आश्र्चर्याचा धक्का बसू दे. भीतीने थरथर काप.” हा परमेश्वराचा संदेश होता. 13 “माझ्या लोकांनी दोन पापे केली. ते माझ्यापासून दूर गेले. (मी जिवंत पाण्याचा झरा आहे.) आणि त्यांनी स्वत:ची पाण्याची टाकी खोदली. (ते दैवंताकडे वळले.) पण ती टाकी फुटली आहे. त्यात पाणी राहू शकत नाही. 14 “इस्राएलचे लोक गुलाम झाले आहेत का? गुलाम म्हणूनच जन्माला आलेल्या माणसाप्रमाणे ते आहेत का?इस्राएलची संपत्ती लोकांनी का लुटली? 15 तरुण सिंह (शत्रू) इस्राएलकडे बघून डरकाळ्या फोडतात व गुरगुरतात. त्यांनी इस्राएलचा नाश केला. इस्राएलमधील शहरे जाळली गेली आहेत. तेथे कोणीही मागे उरले नाही. 16 नोफ (मंमेफिस) आणि तहपन्हेस येथील लोकांनी तुमचा माथा फोडला आहे. 17 तुमच्याच चुकीने हे संकट आले आहे. परमेश्वर तुमचा देव तुम्हाला योग्य मार्गाने नेत होता. पण तुम्हीच उलटे फिरलात. 18 यहूदातील लोकांनो, पुढील गोष्टींचा विचार करा. मिसरला जाण्याने काही फायदा झाला का? शिहोराचे (नील नदीचे) पाणी पिण्याने काही लाभ झाला का? नाही. अश्शूरला जाण्याने आणि मोठ्या नदीचे (फरात नदीचे) पाणी पिण्याने काही मदत झाली का? नाही. 19 तुम्ही दुष्कृत्ये केली. त्यामुळे तुम्हाला फक्त शिक्षा मिळेल. तुमच्यावर संकट येईल. मग तुम्हाला समजेल की देवापासून दूर जाणे कीती वाईट आहे! मला न घाबरणे व मान न देणे हे चूक आहे.” माझा प्रभूचा, सर्वशक्तिमान परमेश्वराचा, हा संदेश होता. 20 “यहूदा, फार वर्षांपूर्वी तू तुझे जोखड दूर फेकलेस. मी तुझ्यावर नियंत्रण ठेवत होतो ती बंधने तोडलीस. तू मला म्हणालीस, ‘मी तुझी सेवा करणार नाही.’ प्रत्येक उंच टेकडीवरील अथवा प्रत्येक हिरव्या झाडाखालील वारांगनेप्रमाणे तू झालीस. 21 यहूदा, मी खास वेल म्हणून तुला लावले. तुम्ही सर्वजण उत्तम बीजाप्रमाणे होता. मग वाईट फळे देणाऱ्या वेलीत तुझे रुपांतर कसे झाले? 22 जरी तू स्वत:ला खारान धुतलेस, खूप साबण लावलास, तरी मला तुझ्या अपराधाचा डाग दिसू शकेल.” हा परमेश्वर देवाकडून आलेला संदेश होता. 23 “यहूदा, ‘मी अपराधी नाही. मी बआलदैवताच्या मूर्तीची पूजा केली नाही’ असे तू मला कसे म्हणू शकतेस? तू दरीमध्ये केलेल्या गोष्टींचा विचार कर. तू काय केलेस त्याबद्दल विचार कर. एका जागेवरुन दुसऱ्या जागी धावणाऱ्या चपळ उंटिणीप्रमाणे तू आहेस. 24 तू वाळवंटात राहणाऱ्या रानगाढवीप्रमाणे आहेस. समागमाच्या काळात ती वारा हुंगते. ती माजावर असताना कोणीही तिला परत आणू शकत नाही. त्या काळात ज्याला पाहिजे त्या नराला ती मिळू शकते. तिला मिळविणे सोपे असते. 25 यहूदा, मूर्तीमागे धावण्याचे थांबव. त्या दैवतांची लागलेली तहान आता पुरे़. पण तू म्हणतेस, ‘त्याचा काही उपयोग नाही. मी त्यांना सोडू शकत नाही. मला ते दैवत आवडतात. मला त्यांना अनुसरायचे आहे.’ 26 “चोराला लोकांनी पकडताच तो शरमिंदा होतो. त्याचप्रमाणे इस्राएलचे लोक झाले आहेत. राजे आणि नेते, याजक आणि संदेष्टे लज्जित झाले आहेत. 27 ते लाकडाच्या तुकड्याशी बोलतात त्याला ‘माझे वडील’ म्हणतात. ते खडकाशी बोलतात. ते म्हणतात, ‘तू मला जन्म दिलास.’ त्या सर्व लोकांना शरमेने मान खाली घालायला लागतील. ते लोक माझ्याकडे पाहत नाहीत. त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली आहे. पण जेव्हा यहूदातील लोक संकटात सापडतात, तेव्हा ते मला म्हणतात, ‘ये आणि आम्हाला वाचव.’ 28 त्या मूर्तींना येऊ देत आणि तुम्हाला वाचवू देत. तुम्ही स्वत: घडविलेल्या त्या मूर्ती कोठे आहेत? तुम्ही संकटात असताना त्या मूर्ती येऊन तुम्हाला सोडवितात का ते पाहू या. यहूदा, तुला तुझ्या शहरांइतक्या मूर्ती आहेत! 29 “तुम्ही माझ्याशी वाद का घालता? तुम्ही सर्व माझ्याविरुद्ध गेलात.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता. 30 “यहूदातील लोकांनो, मी तुम्हाला शिक्षा केली, पण त्याचा काही फायदा झाला नाही. तुम्हाला शिक्षा झाल्यावरही तुम्ही परत आला नाहीत तुमच्याकडे आलेल्या संदेष्ट्यांना तुम्ही तलवारीने मारले. तुम्ही धोकादायक सिंहासारखे होता. तुम्ही संदेष्ट्यांना ठार मारले.” 31 ह्या पिढीतील लोकांनो, परमेश्वराच्या संदेशाकडे लक्ष द्या. “इस्राएलच्या लोकांना मी वाळवंटासारखा आहे का? मी काळोखी आणि धोकादायक प्रदेशासारखा त्यांना वाटतो का? माझे लोक म्हणतात, ‘आमच्या मार्गाने जायला आम्ही स्वतंत्र आहोत. परमेश्वरा आम्ही तुझ्याकडे परत येणार नाही.’ ते असे का म्हणतात.? 32 तरुण स्त्री आपले दागिने विसरत नाही. वधू आपला कमरपट्ठा विसरत नाही. पण माझे लोक मला असंख्य वेळा विसरले आहेत. 33 “यहूदा, प्रियकरांच्या (खोट्या देवांच्या) पाठलाग कसा करायचा हे तुला बरोबर माहीत आहे. दुष्कृत्ये करायला खरोखरच तू शिकली आहेस. 34 तुझ्या हातांना रक्त लागले आहे. ते रक्त गरीब व निष्पाप माणसांचे आहे. तुझे घर फोडताना तू त्यांना पकडले नाहीस. तू कारण नसताना त्यांना ठार मारलेस. 35 पण तरी तू म्हणतेस, ‘मी निरपराध आहे. परमेश्वर माझ्यावर रागावलेला नाही.’ मी तुला खोटे बोलल्याबद्दलही दोषी ठरवीन. का? कराण तू म्हणतेस, ‘मी काहीही चूक केलेली नाही.’ 36 मन बदलणे तुला अगदी सोपे आहे. अश्शूरने तुझी निराशा केली, म्हणून तू अश्शूरला सोडले आणि मदतीसाठी तू मिसरला गेलीस. पण मिसरसुध्दा तुझी निराशा करील. 37 मग अखेरीला तुला मिसरलाही सोडावे लागेल आणि लाजेने तोंड लपवावे लागेल. तू त्या देशांवर विश्वास ठेवलास. पण परमेश्वराने त्या देशांना नाकारले. म्हणून जिंकण्यासाठी ते तुला मदत करु शकत नाहीत.

3:1 “एखाद्याने बायकोशी घटस्फोट घेतल्यास ती त्याला सोडते आणि दुसऱ्याशी लग्न करते. मग तो माणूस परत आपल्या बायकोकडे जाऊ शकतो का? नाही. जर तो माणूस त्या बाईकडे परत गेलातर तो देश ‘भ्रष्ट’ होतो. यहूदा, खूप प्रियकर (खोटे देव) असलेल्या वारांगनेप्रमाणे तू वागलीस आणि आता तुला माझ्याकडे परत यायचे आहे.” हा परमेश्वराचा संदेश होता. 2 यहूदा, टेकड्यांच्या उजाड माथ्यांकडे पाहा. अशी एक तरी जागा आहे का की जेथे तू तूझ्या प्रियकराबरोबर (खोट्या देवांबरोबर) समागम केला नाहीस? वाळवंटात वाट पाहाणाऱ्या अरबांप्रमाणे, तू प्रियकराची वाट बघत रस्त्याच्या कडेला बसलीस. तू देश ‘भ्रष्ट’ केलास. कसा? तू खूप वाईट गोष्टी केल्यास. तू माझा विश्वासघात केलास. 3 3 पाप केलेस म्हणून पाऊस पडला नाही. वळवाचा पाऊस तर अजिबात पडला नाही. पण तरी तुला लाज वाटत नाही. वारांगनेप्रमाणे तुझ्या तोंडावर निर्लज्जपणाचे भाव आहेत. तू तुझ्या कृत्यांबद्दल शरमिंदी होत नाहीस. 4 ण आता तू मला ‘पिता’ म्हणत आहेस. तू म्हणालीस, ‘मी लहान असल्यापासून तू माझा मित्र आहेस.’ 5 5 असेसुद्धा म्हणालीस, ‘देव नेहमीच माझ्यावर रागावणार नाही. देवाचा राग सतत राहणार नाही.’“यहूदा, तू असे म्हणतेस, पण तू करता येतील तेवढी दुष्कृत्ये केली आहेस.” 6 योशीया यहुदावर राज्य करीत असताना, परमेश्वर माझ्याशी बोलला. परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, इस्राएलने केलेली दुष्कृत्ये तू पाहिलीस ना? तिने माझा कसा विश्वासघात केले ते तू पाहिलेस. तिने प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्या झाडाखाली मूर्तींबरोबर व्यभिचार करुन पाप केले. 7 मी स्वत:शीच म्हणालो, ‘ही दुष्कृत्ये करुन झाल्यावर तरी इस्राएल माझ्याकडे परत येईल.’ पण ती माझ्याकडे परत आली नाही. इस्राएलने काय केले हे इस्राएलच्या विश्वासघातकी बहिणीने यहूदाने पाहिले. 8 इस्राएल विश्वासघातकी आहे आणि तिला मी दूर का पाठविले ते तिला माहीत आहे. तिने व्यभिचाराचे पाप केले म्हणून मी तिला घटस्फोट दिला हे तिला कळले आहे. पण ह्यामुळे तिची विश्वासघातकी बहीण भयभीत झाली नाही. यहूदाला भीती वाटली नाही. यहूदाने सुध्दा बाहेर जाऊन वारांगनेप्रमाणे व्यवहार केला. 9 आपण वारांगनेप्रमाणे वागत आहोत ह्याची यहूदाला पर्वा नव्हती म्हणून तिने तिचा देश ‘भ्रष्ट’ केला. दगड आणि लाकूड यांपासून तयार केलेल्या मूर्तींची पूजा करुन तिने व्यभिचाराचे पाप केले. 10 इस्राएलची विश्वासघातकी बहीण (यहूदा) मनापासून माझ्याकडे परत आली नाही. परत येण्याचे तिने फक्त ढोंग केले.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता. 11 परमेश्वर मला म्हणाला, “इस्राएल माझ्याशी निष्ठावंत नाही. पण विश्वासघातकी यहूदापेक्षा तिच्याकडे सबळ सबबी होत्या. 12 यिर्मया, उत्तरेकडे बघ आणि संदेश सांग:‘इस्राएलच्या बेइमान लोकांनो, परत या’ हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता. ‘मी तुमच्यावर संतापायचे सोडून देईने. मी दयाळू आहे. ‘हा परमेश्वराचा संदेश होता. ‘मी कायमचा तुमच्यावर रागावणार नाही.’ 13 तुम्ही पाप केले आहे एवढे तुम्हाला समजले पाहिजे. तुम्ही परमेश्वराच्या, तुमच्या देवाच्या, विरुद्ध गेलात तेच तुमचे पाप आहे. तुम्ही दुसऱ्या राष्ट्रातील मूर्तींना प्रत्येक हिरव्या झाडाखाली पूजले. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता. 14 “तुम्ही लोक विश्वासघातकी आहात. पण माझ्याकडे परत या.” हा परमेश्वराचा संदेश होता.“मी तुमचा प्रभू आहे मी प्रत्येक नगरातील एक आणि प्रत्येक कुटुंबातील दोन माणसे घेईन आणि तुम्हाला सियोनला आणीन. 15 मग मी तुम्हाला नवे मेंढपाळ (शासनकर्ते) देईन. ते माझ्याशी निष्ठावान असतील. ते ज्ञान आणि समज ह्यांच्या सहाय्याने तुम्हाला मार्गदर्शन करतील. 16 त्या काळात, देशात तुमच्यापैकी बरेचजण असतील.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता.“त्या वेळेला, लोक पुन्हा कधीही असे म्हणणार नाहीत, ‘परमेश्वराच्या कराराचा कोश आमच्याजवळ असण्याचे दिवस आम्हाला आठवतात.’ येथून पुढे ते त्या पवित्र कोशाचा विचारसुद्धा करणार नाहीत. 17 त्या वेळेला यरुशलेम नगरीला ‘परमेश्वराचे सिंहासन’ म्हटले जाईल. परमेश्वराच्या नावाचा मान राखण्यासाठी सर्व राष्ट्रे यरुशलेममध्ये एकत्र येतील. ह्या पुढे ते त्यांच्या दुरग्रही आणि दुष्ट मनांचे अनुसरण करणार नाहीत. 18 त्या दिवसांत यहूदाचे घराणे इस्राएलच्या घराण्याला येऊन मिळेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून ते गोळा होऊन येतील मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील. 19 “मी, परमेश्वर, स्वत:शी म्हणालो, ‘माझ्या स्वत:च्या मुलांप्रमाणे तुम्हाला वागवावे असे मला वाटते. इतर कोणत्याही राष्ट्रापेक्षा, तुम्हाला, सुंदर व आल्हाददायक भूमी द्यावी अशी माझी इच्छा आहे. ‘मला वाटले की तुम्ही मला ‘पिता.’ म्हणाल व नेहमीच मला अनुसरल. 20 पण तुम्ही पतीशी विश्वासघात करणाऱ्या पत्नीप्रमाणे आहात. इस्राएलच्या घराण्यातील लोकांनो, तुम्ही माझा विश्वासघात करीत आहात.” हा देवाचा संदेश होता. 21 उजाड टेकड्यांवरुन येणारा रडण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता. इस्राएले लोक रडत आहेत. ते दयेसाठी याचना करीत आहेत. ते फार पापी झाले. ते त्यांच्या परमेश्वर देवाला विसरले. 22 परमेश्वर पुढे म्हणाल, “इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही माझ्याशी विश्वसघात करता. पण माझ्याकडे परत या. माझ्याकडे परत या. जरी तुम्ही विश्वासघातकी असलात तरी मी तुम्हाला क्षमा करीन.”पण लोकांनी म्हणावे, “हो! आम्ही तुझ्याकडे येऊ तूच परमेश्वर आमचा देव आहेस!” 23 टेकड्यांवर मूर्तीची पूजा करणे मूर्खपणाचे आहे. डोंगरावर मोठ्या, दिखाऊ मेजवान्या करणे चूक आहे. इस्राएलचे पापविमोचन नक्कीच आपल्या परमेश्वर देवाकडून येईल. 24 त्या भयानक खोट्या देवाने बआल देवताने आमच्या वडिलांच्या मालकीचे सर्व काही खाल्ले आहे. त्या खोट्या दैवताने आमच्या पूर्वजांची मुले व मुली गिळली. आमच्या तारुण्यापासून हे घडले. त्या भयानक खोट्या देवाने आमच्या वडिलांच्या मेंढ्या आणि गुरे आणि त्यांची कोकरे व वासरे घेतली. 25 लज्जेचे आपण अंथरुण करु या आणि पांघरुणाने आपण शरीर झाकतो तशी लाज आपण पांघरु या. आम्ही आमच्या परमेश्वर देवाविरुद्ध जाऊन पाप केले. आम्ही आणि आमच्या वडिलांनी पाप केले. आम्ही लहान असल्यापासून परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत.

4:1 हा परमेश्वराचा संदेश आहे “इस्राएल तुला परत यायचे असेल तर माझ्याकडे परत ये. तुझ्या मूर्ती फेकून दे. माझ्यापासून दूर जाऊन भटकू नकोस. 2 तू ह्या गोष्टी केल्यास, तर तू शपथ घेण्यासाठी माझे नाव वापरु शकशील. ‘परमेश्वर असे तो पर्यंत,’ असे तू म्हणू शकशील. तू हे शब्द खऱ्या, प्रमाणिक आणि योग्य, तऱ्हेने वापरु शकशील. तू ह्या गोष्टी केल्यास परमेश्वर राष्ट्रांना आशीर्वाद देईल. ती राष्ट्रे परमेश्वराने केलेल्या कृत्यांबद्दल बढाया मारतील.” 3 परमेश्वर यहूदा व यरुशलेम मधील लोकांना म्हणतो:“तुमची शेते नांगरलेली नाहीत. तो शेते नांगरा. काट्यात बी पेरु नका. 4 परमेश्वराची माणसे व्हा. तुमची ह्रदये बदलायहुदातील आणि यरुशलेममधील लोकांनो तुम्ही बदलला नाहीत, तर मी खूप रागावेन. माझा राग आगीप्रमाणे वेगाने पसरुन तुम्हाला जाळून टाकील. असे का घडेल? तुम्ही केलेल्या दुष्कृंत्यांमुळे असे घडेल.” 5 “यहूदाच्या लोकांना हा संदेश द्या. यरुशलेममधील प्रत्येकाला सांगा:‘सर्व देशभर रणशिंगे फुंका, मोठ्याने ओरडून सांगा, “एकत्र या. सुरक्षिततेसाठी आपण सर्व मजबूत शहराकडे जाऊ या.’ 6 खुणेचे ध्वज सियोनच्या दिशेने दाखवा. जीव वाचविण्यासाठी पळा. वाट पाहू नका. कारण मी उत्तरेकडून अरिष्ट आणीत आहे. मी भयानक विध्वंस घडवून आणीत आहे.” 7 “सिंह त्याच्या गुहेतून बाहेर आला आहे. राष्ट्रांचा नाश करणाऱ्याने कूच करायला सुरवात केली आहे. तुमच्या देशाचा नाश करण्यासाठी त्याने त्याचे घर सोडले आहे. तुमच्या शहरांचा नाश होईल. तेथे कोणीही शिल्लक राहणार नाही. 8 म्हणून शोकवस्त्रे घाला आणि मोठ्याने आक्रोश करा. का? कारण परमेश्वर आमच्यावर रागावला आहे.” 9 परमेश्वर म्हणतो, “हे घडत असताना, राजा आणि त्याचे अधिकारी यांचा धीर सुटेल, याजक घाबरतील, संदेष्ट्यांना धक्का बसेल.” 10 नंतर, मी, यिर्मया, म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू तू यहुदातील आणि यरुशलेममधील लोकांना खरोखरच युक्तीने फसविलेस. ‘तू त्यांना म्हणालास की तुम्हाला शांती मिळेल.’ पण आता, तू तलवारीचे पातेच त्यांच्या नरड्याला लावीत आहेस.” 11 त्या वेळेला यहुदा व यरुशलेम येथील लोकांना एक संदेश दिला जाईल. “उजाड टेकड्यावरुन गरम वारा वाहतो. तो वाळवंटातून माझ्या लोकांकडे वाहत येतो. फोलकटापासून धान्य वेगळे करण्याकरिता शेतकरी ज्या वाऱ्याचा उपयोग करतात, तसा हा सौम्य वारा नाही.” 12 हा वारा त्यापेक्षा जोराचा आहे आणि तो माझ्याकडून येतो आता, “मी यहुदाच्या लोकांविरुद्ध माझा निकाल जाहीर करीन.” 13 पाहा! शत्रू ढगाप्रमाणे वर येतो. त्याचे रथ वावटळीप्रमाणे दिसतात, त्यांचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. हे सर्व आपल्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. आपला विध्वंस झाला! 14 यरुशलेममधील लोकांनो, तुमच्या मनातील पाप धुवून टाका. तुमची मने शुद्ध करा. मग तुम्ही वाचविले जाऊ शकता. दुष्ट बेत करीत बसू नका. 15 ऐका! दान प्रांतातून दूताचा आवाज येत आहे. एफ्राईम ह्या टेकड्यांच्या देशातून हा माणूस वाईट बातमी आणीत आहे. 16 “ही बातमी ह्या देशाला कथन करा. यरुशलेमच्या लोकांत ही बातमी पसरवा दुरवरच्या देशांतून शत्रू येत आहेत. यहुदाच्या विरुद्ध ते युद्धाची घोषण करीत आहेत. 17 शेताचे रक्षण करण्यासाठी लोक शेताभोवती कडे करतात तसा शत्रूने यरुशलेमला वेढा घातला आहे. यहूदा, तू माझ्याविरुद्ध गेलीस म्हणून शत्रू तुझ्याविरुद्ध चढाई करण्यास येत आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे. 18 “तू ज्या तऱ्हेने राहिलीस आणि जी कर्मे केलीस. त्यामुळे हे संकट तुझ्यावर आले. तुझ्या पापाने तुझे जीवन कठीण केले. तुझ्या पापी जीवनामुळे, तुझ्या अंत:करणाला खोल जखमा होऊन वेदना झाल्या.” 19 अरे रे! दु:खाने आणि काळजीने माझ्या पोटात खड्ढा पडत आहे. मी वेदनेने वाकत आहे. मी खरच खूप घाबरलो आहे. माझ्या ह्रदया धडधडत आहे. मी गप्प बसू शकत नाही का? मी रणशिंग फुंकलेले ऐकले आहे. रणशिंग सैनिकांना युद्धासाठी बोलावीत आहे. 20 अरिष्टामागून अरिष्ट येते. संपूर्ण देशाचा नाश झाला. अचानक माझ्या तंबूचा नाश झाला. कनाती फाडल्या गेल्या. 21 परमेश्वरा, युद्धाची निशाणी मला किती काळ पाहिली पाहिजे? किती वेळ मी रणशिंग ऐकले पाहिजे? 22 देव म्हणतो, “माझे लोक मूर्ख आहेत. ते मला ओळखत नाहीत. ती मूर्ख मुले आहेत त्यांना समजत नाही. दुष्कृत्ये करण्यात ते पटाईत आहेत पण सत्कृत्ये कशी करावी त्यांना माहीत नाही.” 23 मी पृथ्वीकडे पाहिले. पृथ्वी उजाड आणि अस्ताव्यस्त होती. पृथ्वीवर काहीही नव्हते. मी आकाशाकडे पाहिले त्याचा प्रकाश गेला होता. 24 मी डोंगराकडे पाहिले ते कापत होते. सर्व टेकड्या थरथरत होत्या. 25 मी पाहिले पण कोठेही माणसे नव्हती. आकाशातील सर्व पक्षी दूर उडून गेले होते. 26 मी पाहिले आणि सुपीक जमिनीचे वाळवंट झाले. त्या भूमीवरील सर्व शहरांचा नाश झाला. परमेश्वराने हे घडविले. परमेश्वराने आणि त्याच्या क्रोधाने हे घडवून आणले. 27 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: “संपूर्ण देशाचा नाश होईल. (पण मी देशाचा संपूर्ण नाश करणार नाही.) 28 म्हणून देशातील लोक मृतांसाठी शोक करतील. आकाश काळे होईल. मी बोललो आहे ते बदलणार नाही. मी निर्णय घेतला आहे आणि मी बदलणार नाही.” 29 यहुदातील लोक घोडेस्वारांचा व धनुर्धरांचा आवाज ऐकतील आणि ते पळून जातील. काही लोक गुहांतून लपतील काही झुडुपांत लपतील. काही डोंगरकड्यावर चढतील. यहुदातील सर्व शहरे ओस पडतील. तेथे कोणीही राहणार नाही. 30 यहूदा, तुझा नाश होत आला आहे. मग आता तू काय करीत आहेस? तुझा उत्तम लाल पोशाख तू का घालीत आहेस? तुझे सोन्याचे दागिने तू का घालीत आहेस? तू डोळ्यांचा साजशृंगार का करीत आहेस? तू स्वत:ला सुंदर बनवितेस पण हे वेळेचा अपव्यय करणे आहे. तुझे प्रियकर तुझा तिरस्कार करतात. ते तुला ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. 31 स्त्री प्रसूतिवेदना होताना ओरडते, तसा आवाज मी ऐकतो. पहिल्या बाळंतपणाच्या वेळेला स्त्री ज्याप्रमाणे किंकाळी फोडते, तशीच ती किंकाळी आहे. हा सियोनकन्येचा आवाज आहे. ती प्रार्थनेसाठी हात जोडत आहे. ती म्हणत आहे, “हे देवा, मी चक्कर येऊन पडण्याच्या बेतात आहे. खुन्यांनी मला घेरले आहे!”

5:1 परमेश्वर म्हणतो, “यरुशलेमच्या रस्त्यावरुन चाला. सभोवती पाहा आणि या गोष्टींचा विचार करा. नगरातील चव्हाटे शोधा. जो सत्याचा शोध घेतो, जो सच्चेपणाने वागतो असा एखादा सज्जन माणूस सापडू शकतो का ते पाहा. जर तुम्हाला एक तरी सज्जन व सत्यशील माणूस सापडला तरी मी यरुशलेमला क्षमा करीन. 2 लोक शपथ घेतात आणि म्हणतात, ‘परमेश्वर असेपर्यंत.’ पण ते काही त्यांच्या मनात नसते.” 3 हे परमेश्वरा, मला माहीत आहे की तुझ्या लोकांनी तुझ्याशी एकनिष्ठपणे वागायला हवे आहे. तू यहूदातील लोकांना चोपलेस पण त्यांना काही वेदना झाल्या नाहीत. तू त्यांचा नाश केलास, पण त्यांनी धडा शिकण्यास नकार दिला. ते फार दुराग्रही झालेत. त्यांनी केलेल्या वाईट कृत्यांबद्दल त्यांना खेद वाटला नाही. 4 पण मी (यिर्मया) मनाशी म्हणालो, “गरीब लोकच एवढे मूर्ख असले पाहिजेत. परमेश्वराच्या चालीरिती ते शिकलेले नाहीत. त्यांना, त्यांच्या देवाची शिकवण माहीत नाही. 5 म्हणून मी यहुदाच्या नेत्यांकडे जाऊन त्यांच्याशी बोलेन. नेत्यांना परमेश्वराच्या चालीरिती नक्कीच माहीत असतात. त्यांना त्यांच्या देवाचे नियम माहीत असतात. ह्याची मला खात्री आहे!” पण परमेश्वराच्या सेवेतून मुक्त होण्यासाठी सर्व नेते एकत्र जमले होते. 6 ते देवाच्या विरुद्ध गेले म्हणून जंगलातील सिंह त्यांच्यावर हल्ला करील. जंगलातील लांडगा त्यांना ठार मारील. चित्ता त्यांच्या शहराजवळ लपला आहे. शहरातून बाहेर येणाऱ्या प्रत्येकाचे तो तुकडे तुकडे करील. यहूदातील लोकांनी पुन्हा पापे केल्याने हे घडून येईल. ते, अनेक वेळा, देवापासून दूर भटकत गेले आहेत. 7 देव म्हणाला, “यहूदा, मी तुला क्षमा करावी म्हणून तू मला एक तरी सबळ कारण सांग. तुझ्या मुलांनी माझा त्याग केला. त्यांनी मूर्तींपुढे शपथा वाहिल्या. पण त्या मूर्ती म्हणजे खरे देव नव्हेत. तुझ्या मुलांना पाहिजे ते सर्व मी दिले. पण तरी त्यांनी माझा विश्वासघात केला. त्यांनी आपला बराच वेळ वारांगनेबरोबर घालविला. 8 ते लोक, भरपूर खाद्य खाणाऱ्या व समागमाला तयार असणाऱ्या घोड्यांप्रमाणे आहेत. शेजाऱ्याच्या बायकोला वासनेने हाका मारणाऱ्या घोड्यांप्रमाणे ते आहेत. 9 ह्या कर्मांबद्दल मी यहूदातील लोकांना शिक्षा करावी का?” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “हो! अशा रीतीने जीवन जगणाऱ्या राष्ट्राला मी शिक्षा करीनच, हे तू जाणतेस. त्यांच्या लायकीप्रमाणे मी त्यांना शिक्षा करीन. 10 “यहूदाच्या द्राक्षवेलींच्या रांगातून जा. वेली तोडून टाका (पण त्यांचा संपूर्ण नाश करु नका) त्यांच्या फांद्या तोडा. का? ह्या फांद्या परमेश्वराच्या मालकीच्या नाहीत. 11 यहूदा व इस्राएल येथील घराणी, प्रत्येक बाबतीत, माझा विश्वासघात करीत आली आहेत.” हा परमेश्वराचा संदेश आहे. 12 “हे लोक परमेश्वराबद्दल खोटे बोलले. ते म्हणाले आहेत, ‘परमेश्वर आम्हाला काही करणार नाही. आमचे काही वाईट होणार नाही. आमच्यावर हल्ला झालेला आम्ही कधी पाहणार नाही. आम्ही कधी उपाशी राहणार नाही.’ 13 “खोटे संदेष्टे पोकळ वाऱ्या प्रमाणे आहेत. देवाचे शब्द त्यांच्याजवळ नाहीतत्यांचे वाईट होईल.” 14 सर्वशक्तिमान परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या. “मी त्यांना शिक्षा करणार नाही असे ते लोक म्हणाले म्हणून, यिर्मया, मी जे शब्द तुला देतो, ते आगीप्रमाणे असतील, ते लोक लाकडाप्रमाणे असतील, ती आग त्यांना पूर्णपणे जाळून टाकील.” 15 इस्राएलच्या वारसांनो हा परमेश्वराचा संदेश आहे. “दूरवरच्या राष्ट्राला मी, तुमच्यावर हल्ला करण्यासाठी लवकरच आणीन. ते शक्तिशाली राष्ट्र आहे. ते प्राचीन राष्ट्र आहे. त्या राष्ट्रांतील लोक तुम्हाला माहीत नसणारी भाषा बोलतात. ते काय बोलतात ते तुम्ही समजू शकणार नाही. 16 त्यांचे भाते उघड्या थडग्यांप्रमाणे आहेत. त्यांची सर्व माणसे शक्तिशाली सैनिक आहेत. 17 तुम्ही गोळा केलेले सर्व धान्य ते खातील. ते तुमचे सर्व अन्न खाऊन टाकतील. ते तुमच्या मुलामुलींना खाऊन टाकतील. ते तुमच्या मुलामुलींना खाऊन टाकतील (त्यांचा नाश करतील) ते तुमची गुरे, शोळ्या, मेंढ्या खातील. ते तुमची द्राक्षे आणि अंजिरे फस्त करतील. त्यांच्या तलवारीच्या जोरावर ते तुमच्या मजबूत शहरांचा नाश करतील. तुम्ही ज्या शहरांवर विसंबता ती भक्क म शहरे ते नष्ट करतील.” 18 “पण जेव्हा ते भयानक दिवस येतील.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे, तेव्हा, यहूदा, मी तुझा संपूर्ण नाश करणार नाही. 19 यहूदाचे लोक तुला विचारतील, ‘यिर्मया, आमच्या परमेश्वर देवाने आमचे असे वाईट का केले?’ त्यांना पुढील उत्तर दे, ‘यहूदाच्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराला सोडले आणि तुमच्या देशात तुम्ही परक्या मूर्तींची सेवा केली. तुम्ही असे वागलात म्हणून आता तुम्ही परक्या देशात परक्यांचीच सेवा कराल.” 20 परमेश्वर म्हणाला, “याकोबच्या वंशजांना आणि यहूदातील राष्ट्रांना हा संदेश द्या. 21 ऐका! ‘तुम्हा मूर्खाना अक्कल नाही. तुम्हाला डोळे असून दिसत नाही कान असून ऐकू येत नाही. 22 खरोखर तुम्हाला माझी भिती वाटते.” हा परमेश्वराचा संदेश आहे.“माझ्यापुढे तुम्ही भीतीने थरथर कापावे. समुद्राला सीमा असावी म्हणून समुद्रकिनारे निर्माण करणारा मी एकमेव आहे. पाणी अखंड जागच्या जागी राहावे म्हणून मी असे केले. लाटा कधी किनाऱ्यावर आक्रमण करतात. पण त्या किनाऱ्याचा नाश करीत नाहीत. लाटा गर्जना करीत कधी कधी आत येतात, पण त्या किनाऱ्याच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. 23 पण यहूदाचे लोक दुराग्रही आहेत. ते नेहमीच माझ्याविरुद्ध जाण्यासाठी मार्ग आखत असतात. ते माझ्यापासून दूर गेले आणि त्यांनी माझा त्याग केला. 24 यहूदातील लोक आपल्या मनाशी असे कधीही म्हणत नाहीत ‘आपण आपल्या परमेश्वर देवाला घाबरु या आणि त्याचा मान राखू या. योग्य वेळेला तो आपल्याला आगोटीचा व वळवाचा पाऊस देतो. योग्य वेळी आपल्याला कापणी करता येईल, ह्याची तो खात्री करुन घेतो.’ 25 यहूदातील लोकांनो, तुम्ही पाप केलेत म्हणूनच पावसाळा व सुगीचा हंगाम आला नाही. तुमच्या पापांनी परमेश्वराकडून मिळणाऱ्या ह्या चांगल्या गोष्टींचा आनंद तुमच्यापासून हिरावून घेतला आहे. 26 माझ्या माणसांत काही दुष्ट आहेत. ते फासेपारध्यांप्रमाणे आहेत. हे लोक जाळे पसरवितात, पण पक्ष्यांना पकडण्या ऐवजी ते माणसांना पकडतात. 27 पक्ष्यांनी पिंजरे भरावेत तशी ह्या दुष्टांची घरे कपटांनी भरलेली असतात. त्यांच्या कपटांनी त्यांना श्रीमंत व शक्तिशाली बनविले. 28 त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांमुळे ते पुष्ट व लठ्ठ झाले आहेत. त्यांच्या दुष्कृत्यांना अंत नाही. ते अनाथांच्या वतीने बोलणार नाहीत. ते त्यांना मदत करणार नाहीत. ते गरीब लोकांना योग्य न्याय मिळवून देणार नाहीत. 29 त्यांनी केलेल्या ह्या कर्मांबद्दल मी त्यांना शिक्षा करावी का?” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.“अशा राष्ट्राला मी शिक्षा करणार हे तुम्हाला माहीत आहे. त्यांना योग्य ती शिक्षा मी करीन.” 30 परमेश्वर म्हणतो, “यहूदात भयानक व धक्कादायक गोष्ट घडली आहे. 31 संदेष्टे खोटे सांगतात, जे काम करण्यासाठी याजकांची निवड केली आहे, ते काम ते करणार नाहीत. आणि माझ्या लोकांना हे आवडते! पण तुमची शिक्षा जवळ आल्यावर तुम्ही काय कराल?”

6:1 बन्यामीनच्या लोकांनो, जीव वाचविण्यासाठी पळा. यरुशलेमपासून दूर पळा. तकोवामध्ये तुतारी फुंका. बेथ-हक्करेमवर धोक्याचा इशारा देणारे निशाण उभारा. हे सर्व करा कारण उत्तरेकडून अरिष्ट येत आहे. भयानक नाश तुमच्याकडे येत आहे. 2 सियोनच्या कन्ये, तू सुंदर कुरणासारखी आहेस. 3 मेंढपाळ आपापले कळप घेऊन यरुशलेमला येतात. ते तिच्या सर्व बाजूंना तंबू ठोकतात. प्रत्येक मेंढपाळ स्वत:च्या कळपाची काळजी घेतो. 4 “यरुशलेमविरुद्ध लढण्यास तयार व्हा. उठा! आपण दुपारी नगरावर हल्ला करु पण आधीच उशीर होत आहे. संध्याछाया लांबत आहेत. 5 म्हणून उठा! आपण रात्रीच तिच्यावर हल्लाकरु या व यरुशलेमच्या भक्कम तटबंदीचा नाश करु या.” 6 सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो, “यरुशलेमच्या भोवतालची झाडे कापा आणि तिच्याविरुद्ध मोर्चा बांधा. ह्या नगरीला शिक्षा व्हावीच ह्या नगरीच्या आत जुलुमाशिवाय काहीही नाही. 7 जशी विहीर आपले पाणी ताजे ठेवते, तशीच यरुशलेम आपला दुष्टपणा ताजा ठेवते. मी नेहमीच येथील लूटमार व हिंसाचार याबद्दल ऐकतो. मी येथे सदोदित पीडा आणी घृणा पाहतो. 8 यरुशलेम, धोक्याचा इशारा ऐक. जर तू ऐकले नाहीस तर मी तुझ्याकडे पाठ फिरवीन, तुझ्या भूमीचे ओसाड वाळवंट करीन. येथे कोणीही राहू शकणार नाही.” 9 सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो “इस्राएलमध्ये मागे उरलेल्या इस्राएली लोकांना गोळा करा. द्राक्षवेलींवरची उरलेली द्राक्षे तुम्ही जशी गोळा करता, तसे त्यांना गोळा करा.” द्राक्ष गोळा करणारा जसा प्रत्येक वेल तपासतो, तशी तुम्ही प्रत्येकाची तपासणी करा.” 10 मी कोणाशी बोलू शकतो? मी कोणाला इशारा देऊ शकतो? माझे कोण ऐकेल? इस्राएलच्या लोकांनी आपले कान बंद करुन घेतले आहेत. म्हणून ते माझा इशारा ऐकू शकत नाहीत. लोकांना परमेश्वराची शिकवण आवडत नाही. त्यांना परमेश्वराचा संदेश ऐकावासा वाटत नाही. 11 पण माझ्यात (यिर्मयात) परमेश्वराचा राग पूर्ण भरला आहे. “तो आतल्या आत दाबून धरण्याचा मला आता कंटाळा आला आहे. रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांवर, एकत्र जमलेल्या तरुणांवर परमेश्वराचा राग ओत. पुरुष व त्याची बायको असे दोघही, तसेच सर्व म्हातारे पकडले जातील. 12 त्यांची घरे दुसऱ्यांना दिली जातील. त्यांची शेते व त्यांच्या बायका दुसऱ्यांना दिल्या जातील. मी माझा हात उगारीन आणि यहूदातील लोकांना शिक्षा करीन.” हा परमेश्वराचा संदेश होता. 13 “इस्राएलमधल्या सर्व लोकांना जास्तीच जास्त पैसा पाहिजे. अति महत्वाचे व अति सामान्य, सर्व सारखेच आहेत. संदेष्ट्यांपासून याजकापर्यंत सर्व खोटे बोलतात. 14 माझे लोक अतिशय वाईटरीतीने दुखवले जात आले आहेत. संदेष्ट्यांनी आणि याजकांनी त्यांच्या जखमा बांधाव्यात. पण ते तर त्या जखमावर, किरकोळ खरचटल्यावर करतात त्याप्रमाणे इलाज करतात. ते म्हणतात, ‘ठीक आहे, ठीक आहे ‘पण हे ठीक नाही. 15 संदेष्ट्यांना आणि याजकांना त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल लाज वाटली पाहिजे. पण त्यांना अजिबात लाज वाटत नाही. आपल्या दुष्कृत्यांची शरम वाटण्याएवढीही त्यांना जाणीव नाही. म्हणून बाकीच्याबरोबर त्यांना शिक्षा होईल. मी जेव्हा लोकांना शिक्षा करीन तेव्हा हे सर्वजण जमिनीवर फेकले जातील.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या. 16 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: “चौकात उभे राहा आणि पाहा. जुना रस्ता कोणता ते विचारा. चांगल्या रस्त्याची चौकशी करा व चांगल्या रस्त्यावरुन चाला. तुम्ही असे केल्यास तुमचा तुम्हाला विश्वास सापडेल. पण तुम्ही लोक म्हणाला आहात की, ‘आम्ही चांगल्या रस्त्यावरुन चालणार नाही.’ 17 तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मी रखवालदार निवडले. मी त्यांना सांगितले, ‘रणशिंगाचा आवाज ऐका.’ पण ते म्हणाले, ‘आम्ही ऐकणार नाही.’ 18 तेव्हा सर्व राष्ट्रांनो, ऐका! त्या देशातील लोकांनो, लक्ष द्या. 19 पृथ्वीवरच्या लोकांनो, ऐका! यहुदातील लोकांवर मी अरिष्ट आणणार आहे. का? कारण त्यांनी हेतूपूर्वक दुष्कृत्ये केली. माझ्या संदेशाकडे दुर्लक्ष केले, माझ्या आज्ञांचे पालन करण्याचे नाकारले.” 20 परमेश्वर म्हणतो, “तुम्ही शेबाहून माझ्यासाठी धूप कशाला आणता? दूरवरच्या देशातून सुगंधी काड्या कशाला आणता? तुम्ही आणलेल्या ह्या अग्नीत अर्पण करण्याच्या गोष्टी मला आनंदित करीत नाहीत. तुमचे यज्ञ मला संतुष्ट करीत नाहीत.” 21 मग परमेश्वर पुढे असे म्हणतो: “मी यहूदाच्या लोकांपुढे अडचणी निर्माण करीन. त्या वाटेत असलेल्या दगडाप्रमाणे असतील. वाटेतल्या दगडाला अडखळून लोक पडतात, त्याप्रमाणे वडील व मुले अडखळून पडतील. मित्र आणि शेजारी मरतील.” 22 परमेश्वर पुढे असे म्हणतो: “उत्तरेकडून सैन्य येत आहे. पृथ्वीवरच्या अतीदूरच्या ठिकाणाहून मोठे राष्ट्र येत आहे. 23 त्या सैनिकांजवळ धनुष्यबाण आहेत. ते क्रूर आहेत. त्यांना दया माहीत नाही. ते खूप शक्तिशाली आहेत. ते घोड्यावर स्वार होऊन येतात, तेव्हा समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज येतो. ते युद्धाच्या तयारीने येत आहेत. सियोनच्या कन्ये, ते सैन्य तुझ्यावर हल्ला करण्यासाठी येत आहे. 24 त्या सैन्याची बातमी आम्ही ऐकली आहे. आम्ही भीतीने गर्भगळीत झालो आहोत. आम्ही अडचणीत सापडलो आहोत असे वाटते. प्रसूती होणाऱ्या स्त्रीप्रमाणे आमची स्थिती झाली आहे. 25 बाहेर शेतात जाऊ नका. रस्त्यावर जाऊ नका. का? कारण शत्रूजवळ तलवारी आहेत आणि सगळीकडे धोका आहे. 26 माझ्या लोकांनो, शोकवस्त्रे घाला. राखेत लोळा. मृतांसाठी आक्रोश करा. एकुलता एक मुलगा गेल्याप्रमाणे आकांत करा. कारण नाश करणारा अगदी लवकरच आपल्याकडे येईल. 27 “यिर्मया, मी (देवाने) तुला धातू पारखणाऱ्याप्रमाणे केले आहे. तू माझ्या लोकांची परीक्षा कर आणि ते कसे जगतात त्यावर नजर ठेव. 28 माझे लोक माझ्याविरुद्ध गेले आहेत आणि ते दुराग्रही आहेत. ते लोकांबद्दल खोट्या गोष्टी बोलतात. ते सर्व दुष्ट आहेत. ते गंजलेल्या व कलंकित झालेल्या जस्त वा लोखंडाप्रमाणे आहेत. 29 चांदी शुद्ध करणाऱ्या कारागिराप्रमाणे ते आहेत. फुंकणीने जोरात फुंकताच विस्तवाचा जाळ झाला आणि त्यातून शिसे बाहेर आले.चांदी शुध्द करण्याच्या प्रयत्नात त्या कारागिराने आपला वेळ वाया घालविला. त्याचप्रमाणे माझ्या लोकांमधून दुष्टपणा काढला गेला नाही. 30 माझ्या लोकांना, ‘टोकाऊ चांदी’ असे म्हटले जाईल. देवाने त्यांचा स्वीकार केला नाही म्हणून त्यांना हे नाव दिले जाईल.”

7:1 यिर्मयासाठी परमेश्वराचा संदेश: 2 यिर्मया, परमेश्वराच्या घराच्या दाराजवळ उभा राहा आणि हा उपदेश कर:“यहूदातील सर्व लोकांनो, परमेश्वराचा संदेश ऐका. देवाची पूजा करण्यासाठी आत येणाऱ्या सर्व लोकांनो, ऐका! 3 परमेश्वर हा इस्राएलच्या लोकांचा देव आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो ‘तुमची जगण्याची पद्धत बदला आणि सत्कृत्ये करा. तुम्ही असे केल्यास मी तुम्हाला या ठिकाणी राहू देईन 4 काही लोक खोटे बोलतात त्यावर विश्वास ठेवू नका. ते म्हणतात “हे परमेश्वराचे मंदिर आहे. परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर.” 5 तुम्ही तुमचा जीवनमार्ग बदललात आणि सत्कृत्ये केलीत तर मी तुम्हाला येथे राहू देईन. तुम्ही एकमेकांशी प्रामाणिक असले पाहिजे. 6 तुम्ही अपरिचिताशीसुध्दा प्रामाणिकपणे वागले पाहिजे. विधवांसाठी आणि अनाथांसाठी तुम्ही योग्य गोष्टी केल्या पाहिजेत. निरपराध्यांना मारु नका. दुसऱ्या देवांना अनुसरु नका. का? कारण ह्या गोष्टी तुमच्या आयुष्याचा नाश करतील. 7 तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्यात, तर मी तुम्हाला येथे राहू देईन. मी ही भूमी कायमची तुमच्या पूर्वजांना दिली. 8 “पण तुम्ही ज्या लबाड्यांवर विश्वास ठेवत आहात, त्या लबाड्या कवडीमोलाच्या आहेत. 9 तुम्ही चोरी आणि खून कराल का? तुम्ही व्यभिचाराचे पाप कराल का? तुम्ही दुसऱ्यांवर खोटे आरोप कराल का? तुम्ही बआल देवाची पूजा कराल का? तुम्हाला माहीत नसणाऱ्या इतर दैवतांना अनुसराल का? 10 तुम्ही ही अशी पापे केलीत तर तुम्ही माझ्या नावाच्या या घरात माझ्यासमोर उभे राहू शकाल असे तुम्हाला वाटते का? अशा भयंकर गोष्टी करुन तुम्ही माझ्यासमोर उभे राहून म्हणू शकाल का “आम्ही सुरक्षित आहोत?” 11 हे मंदिर माझ्या नावाचे आहे. तुमच्या दृष्टीने हे मंदिर म्हणजे दुसरे काही नसून लुटांरुनी लपण्याची जागा आहे का? मी तुमच्यावर नजर ठेवून आहे.”‘ हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. 12 “यहूदातील लोकांनो, आता तुम्ही शीलो गावात जा. माझ्या नावाचे पहिले घर मी जेथे बांधले, तेथे जा. इस्राएलमधील लोकांनीसुध्दा दुष्कृत्ये केली. त्याबद्दल मी काय केले, ते जाऊन पाहा. 13 इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही ही सर्व दुष्कृत्ये करीत होता.” हा परमेश्वराचा संदेश आहे.! ‘मी पुन्हा पुन्हा तुमच्याशी बोललो, पण तुम्ही माझे ऐकण्यास नकार दिला. मी तुम्हाला बोलाविले, पण तुम्ही ओ दिली नाही. 14 म्हणून, ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता व जे मी तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिले ते यरुशलेममधील माझ्या नावाचे घर मी नष्ट करीन. शिलोतील मंदिराप्रमाणे मी ह्या मंदिराचा नाश करीन. शिलोतील मंदिराप्रमाणे मी ह्या मंदिराचा नाश करीन. 15 एफ्राईममधील तुमच्या भावांना मी माझ्यापासून जसे दूर फेकले, तसे मी तुम्हाला फेकीन.’ 16 “यिर्मया, तुला सांगतो, यहूदाच्या लोकांसाठी प्रार्थना करु नकोस. त्यांच्यासाठी याचना व आळवणी करु नकोस. त्यांच्या मदतीकरिता मला विनवू नकोस. तू त्यांच्याकरिता केलेली प्रार्थना मी ऐकणार नाही. 17 ते लोक यहूदांच्या गावांतून काय करीत आहेत, हे तू पाहतोस, हे मला माहीत आहे. यरुशलेमच्या रस्त्यावर ते काय करीत आहेत हे तुला दिसू शकते. 18 यहूदातील लोक काय करीत आहेत ते पाहा. मुले लाकडे गोळा करतात. वडील त्याचा उपयोग सरपण म्हणून करतात. ते विस्तव पेटवितात. बायका स्वर्गातील राणीला अर्पण करण्यासाठी भाकर तयार करतात. यहूदातील हे लोक इतर दैवतांची पूजा करताना दैवतांना अर्पण करण्यासाठी म्हणून पेय ओततात. ते मला संताप आणण्यासाठी हे करतात. 19 पण यहूदातील लोक खरोखर ज्याला दुखवीत आहेत, तो मी नाही.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “ते फक्त स्वत:ला दुखवीत आहेत. ते स्वत:लाच लज्जित करीत आहेत.” 20 म्हणून परमेश्वर असे म्हणतो, “मी ह्या जागेवर माझा राग काढीन. मी माणसांना, प्राण्यांना, रानातील झाडांना आणि पिकांना शिक्षा करीन. माझा राग तप्त अग्नीप्रमाणे असेल. कोणीही तो विझवू शकणार नाही.” 21 सर्वशक्तिमान परमेश्वरा, इस्राएलचा देव म्हणतो, “जा आणि तुम्हाला हवी तितकी होमार्पणे करा. तुम्हाला पाहिजे तितके यज्ञ द्या. त्या यज्ञ दिलेल्या पशूंचे मांस तुम्हीच खा. 22 मी तुमच्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले. मी त्यांच्याशी बोललो. पण अर्पण करण्याच्या गोष्टींबद्दल व बळींबद्दल मी त्यांना आज्ञा दिली नाही. 23 मी त्यांना फक्त पुढील आज्ञा दिली. ‘माझी आज्ञा पाळा मग मी तुमचा देव होईन व तुम्ही माझी माणसे व्हाल. मी आज्ञा करीन ते करा म्हणजे तुमचे भले होईल.’ 24 “पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. ते दुराग्रही होते आणि त्यांना पाहिजे त्याच गोष्टी त्यांनी केल्या. ते सज्जन झाले नाहीत. उलट जास्तच दुष्ट झाले. पुढे येण्याऐवजी ते मागे गेले. 25 तुमच्या पूर्वजांनी मिसर सोडला त्या दिवसापासून आजपावेतो मी माझे सेवक तुमच्याकडे पाठविले आहेत. माझे सेवक संदेष्टे आहेत. मी पुन्हा पुन्हा त्यांना तुमच्याकडे पाठविले. 26 पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. ते खूप दुराग्रही होते. त्यांनी त्यांच्या वडिलांपेक्षा वाईट कृत्ये केली. 27 “यिर्मया, यहूदाच्या लोकांना तू ह्या सर्व गोष्टी सांग पण ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना बोलाविलेस तरी ते तुला ओ देणार नाहीत. 28 म्हणून तू त्यांना पुढील गोष्टी सांगितल्या पाहिजेस. ह्या राष्ट्रांने परमेश्वराच्या म्हणजेच त्यांच्या देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्या राष्ट्रांतील लोकांनी देवाची शिकवण ऐकली नाही. त्यांना खरी शिकवण माहीत नाही. 29 “यिर्मया, तुझे केस कापून दूर फेकून दे.उजाड डोंगरमाथ्यावर जा आणि रड. का? परमेश्वराने माणसांच्या ह्या पिढीला नाकारले आहे. परमेश्वराने ह्या लोकांकडे पाठ फिरविली आहे. रागाच्या भरात तो त्यांना शिक्षा करील. 30 हे असे कर कारण यहूदाच्या लोकांना पापे करताना मी पाहिले आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “त्यांनी त्यांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. मी त्या मूर्तीचा तिरस्कार करतो. माझ्या नावाच्या मंदिरात त्यांनी त्या मूर्ती स्थापिल्या आहेत. त्यांनी माझे घर ‘अपवित्र’ केले आहे. 31 यहूदाच्या लोकांनी बेन हिन्नोमच्या दरीत तोफेतची उच्चस्थाने बांधली आहेत. त्या ठिकाणी लोक स्वत:च्या मुलामुलींना ठार मारतात आणि दैवताला अर्पण करण्यासाठी म्हणून जाळतात. अशी आज्ञा मी कधीही दिलेली नाही. असे काही माझ्या मनातही कधी आलेले नाही. 32 म्हणून मी तुम्हाला ताकीद देतो. असे दिवस येत आहेत.” हा परमेश्वराचा संदेश आहे, “लोक ह्या जागेला पुन्हा कधीही तोफेत वा बेन हिन्नोमची दरी असे म्हणणार नाहीत, तर तिला ते संहाराची दरी म्हणतील. असे नाव देण्याचे कारण हेच की आणखी एका मृतालाही पुरण्यास जागा राहणार नाही इतकी वेळ येईपर्यंत ते तोफेतमध्ये मृतांना पुरतील. 33 मग बाकी मृत शरीरे उघडीच जमिनीवर पडतील आणि गिधाडांचे भक्ष्य होतील. वन्य पशू ती शरीरे खातील. त्या गिधाडांना अथवा वन्य पशूंना हाकलायला तेथे कोणीही जिवंत राहणार नाही. 34 यहूदाच्या गावांतील व यरुशलेमच्या रस्तांवरील उल्हासाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. यहूदात किंवा यरुशलेममध्ये पुन्हा कधीही वधू वरांचा शब्द उमटणार नाही. ती भूमी ओसाड वाळवंट होईल.”

8:1 हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे: “त्या वेळी, लोक यहूदाच्या राजाची प्रमुख नेत्यांची, याजकांची, संदेष्ट्यांची आणि यरुशलेममधील सर्व लोकांची हाडे कबरीतून बाहेर काढतील. ते ती हाडे चंद्र सूर्य तारे यांच्या खाली जमिनीवर पसरती. यरुशलेमच्या लोकांना चंद्र सूर्य तारे यांच्यावर प्रेम करायला, त्यांना अनुसरायला, त्यांचा सल्ला घ्यायला आणि त्यांची पूजा करायला आवडते. कोणीही ती हाडे गोळा करुन परत पुरणार नाही. ती हाडे जमिनीवर पसरलेल्या शेणखतासारखी असतील. 2 3 “मी यहूदातील लोकांना सक्तीने त्यांची घरे व त्यांचा देश सोडायला लावीन. लोकांना परक्या प्रदेशात नेले जाईल. यहूदातील जे दुष्टलोक युध्दात मारले गेले नाहीत, त्यांना आपण मारले गेलो असतो तर बरे झाले असते असे वाटेल,” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. 4 यिर्मया, यहूदाच्या लोकांना हे सांग:परमेश्वर असे म्हणतो: “माणूस जमिनीवर पडल्यास पुन्हा उठतो व जर माणूस चुकीच्या मार्गाने गेला तर फिरुन मागे येतो, हे तुम्हाला माहीत आहे. 5 यहूदाचे लोक चुकीच्या मार्गाने गेले (जगले) पण यरुशलेममधील लोक चुकीच्या मार्गाने सतत का जात आहेत? ते त्यांच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. ते वळून परत येण्याचे नाकारतात. 6 मी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आहे. ते योग्य ते बोलत नाहीत. त्यांना त्यांच्या पापाबद्दल पश्र्चाताप वाटत नाही. त्यांनी केलेल्या वाईट कर्मांचा ते विचार करीत नाहीत. विचार केल्याशिवाय ते गोष्टी करतात. युद्धात दौडणाऱ्या घोड्यांसारखे ते आहेत. 7 आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांनासुद्धा वेळेची योग्य जाणीव असते. करकोचे, पारवे, निळवी व सारस ह्यांना नवीन घरट्यात केव्हा यायचे ते समजते. पण माझ्या लोकांना, देवाला त्यांच्याकडून काय हवे आहे ते कळत नाही. 8 “आमच्याजवळ परमेश्वराची शिकवण आहे म्हणून आम्ही शहाणे आहोत!’ असे तुम्ही म्हणत राहता. पण ते खरे नाही. का? कारण लेखक लेखण्यांच्या साहाय्याने खोटे बोलले आहेत. 9 त्या ‘शहाण्या लोकांनी’ परमेश्वराची शिकवण ऐकण्याचे नाकारले म्हणूनच ते अजिबात खरे शहाणे नाहीत. ते ‘शहाणे लोक’ सापळ्यात सापडले गेले. त्यांना धक्का बसला. त्यांची अप्रतिष्ठा झाली. 10 म्हणून मी त्यांच्या बायका दुसऱ्यांना देईन. त्यांची शेते नव्या मालकांना देईन. इस्राएलमधल्या सर्व लोकांना जास्तीच जास्त पैसा पाहिजे. अती महत्वाचे व अति सामान्य सर्व सारखेच आहेत. संदेष्ट्यांपासून याजकांपर्यंत सर्व खोटे बोलतात. 11 माझे लोक अतिशय वाईट रीतीने दुखावले जात आले आहेत. संदेष्ट्यांनी आणि याजकांनी त्यांच्या जखमा बांधाव्यात पण ते तर त्या जखमांवर, किरकोळ खरचटल्यावर करतात, त्याप्रमाणे इलाज करतात. ते म्हणतात, ‘ठीक आहे. ठीक आहेत.’ पण हे ठीक नाही. 12 संदेष्ट्यांना आणि याजकांना त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल लाज वाटली पाहिजे. पण त्यांना अजिबात लाज वाटत नाही. आपल्या दुष्कृत्यांची शरम वाटण्याएवढीही त्यांना जाणीव नाही. म्हणून बाकीच्यांबरोबर त्यांना शिक्षा होईल. मी जेव्हा लोकांना शिक्षा करीन तेव्हा हे सर्वजण जमिनीवर फेकले जातील. परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या. 13 “मी त्यांची फळे व पिके काढून घेईन. मग तेथे सुगीचा हंगाम होणार नाही. “हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “वेलीवंर एकही द्राक्ष नसेल. अंजिराच्या झाडांवर एकही अंजिर नसेल. एवढेच नाही तर झाडांची पानेही सुकतील व गळतील. मी त्यांना दिलेल्या गोष्टी काढून घेईन. 14 “आपण येथे नुसतेच का बसलो आहोत? या भक्कम शहराकडे पळून जाऊ या, जर परमेश्वर आपला देव, आपल्याला मारणारच असेल तर आपण तेथेच मरु या. आपण परमेश्वराविरुद्ध वागून पाप केले. म्हणून देवाने आपल्याला विषारी पाणी प्यायला दिले. 15 आम्ही शांतीची आशा केली पण आम्हाला काहीच चांगले मिळाले नाही. तो आम्हाला क्षमा करील असे आम्हाला वाटले पण अरिष्टच आले. 16 दानच्या कुळाच्या मालकीच्या भूमीवरुन येणाऱ्या शत्रूंच्या घोड्यांच्या फुरफुरण्याचा आवाज आम्ही ऐकतो. त्यांच्या खुरांच्या दणदणाटाने जमीन हादरते. ते ही भूमी व त्यावरील प्रत्येक गोष्टीचा नाश करण्यासाठी आले आहेत. ते नगराचा व त्यात राहणाऱ्या सर्व लोकांना नाश करण्यासाठी आले आहेत. 17 “यहूदाच्या लोकांनो, मी विषारी सर्प तुमच्यावर हल्ला करण्यासाठी पाठवीत आहे. त्यांना आवरणे अशक्य आहे. ते तुम्हाला दंश करतील.” हा देवाकडून आलेला संदेश आहे. 18 देवा मी फार दु:खी आहे. मी फार घाबरलो आहे. 19 माझ्या लोकांचे रडणे ऐक. ह्या देशात सगळीकडे लोक मदतीसाठी आक्रोश करीत आहेत. ते म्हणतात, “परमेश्वर अजून सियोनला आहे का? सियोनचा राजा अजून तेथेच आहे का?” पण देव म्हणतो, “यहूदाच्या लोकांनी परक्या कवडीमोलाच्या मूर्तीची पूजा केली. त्याने मला खूप राग आला. त्यांनी असे का केले? 20 लोक म्हणतात, “सुगीचा हंगाम संपला, उन्हाळा गेला, आणि तरीही आम्हाला वाचवण्यात आले नाही.” 21 माझे लोक दुखावले म्हणजे मी दुखावलो. मी दु:खातिरेकाने बोलू शकत नाही. 22 गिलादमध्ये नक्कीच काही औषध आहे. तेथे नक्कीच वैद्य आहे. मग माझ्या लोकांच्या जखमा का भरुन येत नाहीत?

9:1 जर माझे मस्तक पाण्याने भरलेले असते आणि माझे डोळे अश्रूंचे झरे असते तर मी माझ्या नाश पावलेल्या लोकांसाठी अहोरात्र रडलो असतो. 2 जर वाळवंटात माझी धर्मशाळा असती तर मी माझ्या लोकांना सोडून त्यांच्यापासून खूप दूर जाऊ शकलो असतो. का? कारण त्यांनी सर्वांनी देवाचा विश्वासघात केला आहे. ते देवाच्या विरुद्ध गेले आहेत. 3 “ते त्यांच्या जिभा धनुष्यासारख्या वापरतात. त्यातून खोट्याचे बाण उडतात. ह्या भूमीवर, सत्य नव्हे, तर असत्य, खोटे बलवान झाले आहे, हे लोक एका पापाकडून दुसऱ्या पापाकडे जातात. त्यांना माझे ज्ञान नाही.” परमेश्वर असे म्हणाला आहे. 4 “तुमच्या शेजाऱ्यावर नजर ठेवा. तुमच्या स्वत:च्या भावावरसुध्दा विश्वास ठेवू नका का? कारण प्रत्येक भाऊ लबाड आहे. प्रत्येक शेजारी चहाडखोर आहे. 5 प्रत्येकजण आपल्या शेजाऱ्याशी खोटे बोलतो, कोणीही खरे बोलत नाही. यहूदाच्या लोकांनी आपल्या जिभांना खोटे बोलण्यास शिकविले आहे त्यांना परत येणे अशक्य होईपर्यंत त्यांनी पाप केले. 6 एका वाईट गोष्टीमागून दुसरी वाईट गोष्ट आली. खोट्यामागून खोटे आले. लोकांनी मला जाणून घ्यायचे नाकारले.” परमेश्वराने ह्या सर्व गोष्टी सांगितल्या. 7 म्हणून, सर्वशाक्तिमान परमेश्वर म्हणतो: “धातू शुद्ध आहे की नाही हे बघण्यासाठी कामगार तो तापवितो.” त्याप्रमाणे मी यहूदाच्या लोकांची परीक्षा घेईन. मला दुसरा पर्याय नाही. माझ्या लोकांनी पाप केले. 8 यहूदाच्या लोकांच्या जिभा टोकदार बाणाप्रमाणे आहेत. ते खोटे बोलतात. प्रत्येकजण शेजाऱ्याशी वरवर चांगले बोलतो. पण गुप्तपणे तो शेजाऱ्यावर हल्ला करण्याचा बेत आखत आहे. 9 “मी आता यहूदाच्या लोकांना शिक्षा करावी.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी शिक्षा करावी अशा प्रकारचे ते लोक आहेत हे तुम्हाला माहीत आहे. त्यांना योग्य ती शिक्षा मी करावी.” 10 मी, यिर्मया, डोंगरासाठी आकांत करीन. मी वैराण शेतांसाठी शोकगीत गाईन. का? कारण सजीव सृष्टी नाहीशी केली गेली आहे. तेथून आता कोणीही प्रवास करीत नाही. गुरांचे हंबरणे ऐकू येत नाही. पक्षी दूर उडून गेले आहेत. प्राणी निघून गेले आहेत. 11 “मी, परमेश्वर, यरुशलेम नगरी म्हणजे कचऱ्याचा ढीग करीन. मी कोल्ह्यांचे वसतिस्थान होईल. मी यहूदातील नगरे नष्ट करीन. मग तेथे कोणीही राहणार नाही.” 12 ह्या गोष्टी समजू शकण्याइतका सुज्ञ कोणी आहे का? परमेश्वराकडून शिकविला गेलेला कोणी आहे का? परमेश्वराच्या संदेशाचे स्पष्टीकरण कोणी करु शकेल का? ह्या भूमीचा नाश का झाला? जेथे कोणीही जात नाही अशा वाळवंटासारखी ती का केली गेली? 13 परमेश्वराने ह्या प्रश्नांची उत्तरे दिली. तो म्हणाला, “माझ्या शिकवणुकीला अनुसरायचे यहूदाच्या लोकांनी सोडून दिले. मी त्यांना पाठ दिले. पण त्यानी ऐकायचे नाकारले. ते माझ्या शिकवणुकीप्रमाणे वागले नाहीत. 14 यहूदातील लोक त्यांच्या मर्जीप्रमाणे जगले ते दुराग्रही होते. बआल या खोट्या देवाला ते अनुसरले. त्यांच्या वडिलांनी त्यांना खोट्या देवांना अनुसरायला शिकविले.” 15 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “लवकरच मी यहूदाच्या लोकांना कडू अन्न खायला लावीन, विषारी पाणी प्यायला लावीन. 16 मी यहूदाच्या लोकांना दुसऱ्या राष्ट्रांतून विखरु टाकीन त्यांनी किंवा त्यांच्या वडिलांनी पूर्वी कधीही ज्यांच्याबद्दल ऐकले नव्हते अशा परक्या देशांत ते राहतील. मी तलवारी घेतलेले लोक पाठवीन. ते यहूदाच्या लोकांना ठार मारतील. सर्व लोकांचा नाश होईपर्यंत ते संहार करतील.” 17 सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो, “आता या गोष्टींचा विचार करा. प्रेतयात्रेच्या वेळी रडणाऱ्या भाडोत्री बायकांना बोलवा. त्या कामात वाकबगार असलेल्या स्त्रियांना बोलवा. 18 लोक म्हणतात, ‘त्या बायकांना लवकर येऊन आमच्यासाठी रडू द्या मग आमचे डोळे भरुन येतील आणि अश्रूंचा पूर येईल.’ 19 “सियोन मधून मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकायला येतो आहे. ‘आपला खरोखरच नाश झाला आपली खरोखरच अप्रतिष्ठा झाली. आता आपण आपली भूमी सोडलीच पाहिजे. कारण आपली घरे नष्ट केली गेली. आता ती दगडधोंड्यांचा ढिगारा झाली आहेत.”‘ 20 आता, यहूदातील स्त्रियांनो, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐका. परमेश्वराच्या तोंडचे शब्द ऐका. देव म्हणतो, “तुमच्या मुलींना मोठ्याने रडायला शिकवा. प्रत्येक बाईला शोकगीत गाता आलेच पाहिजे. 21 ‘मृत्यू आला आहे. तो चढून खिडक्यातून आना आला. मृत्यू राजवाड्यात आला. रस्त्यांवर खेळणाऱ्या आमच्या मुलांकडे आला. सार्वजनिक ठिकाणी जमणाऱ्या तरुणांकडे तो आला.’ 22 “यिर्मया, या गोष्टी सांग: परमेश्वर म्हणतो, ‘मृत शरीरे खताप्रमाणे शेतांत पडतील. शेतकऱ्यांनी कापलेल्या धान्याप्रमाणे ती जमिनीवर पडतील. पण त्यांना गोळा करणारे कोणीही नसेल.”‘ 23 परमेश्वर म्हणतो, “शहाण्यांनी त्यांच्या शहाणपणाबद्दल, बलवानांनी त्यांच्या बळाबद्दल व श्रीमंतांनी त्यांच्या पैशाबद्दल बढाई मारु नये.” असे परमेश्वर म्हणतो. 24 पण कोणाला बढाईच मारायची असेल तर त्याला ह्या गोष्टीसाठी मारु द्या. तो मला ओळखायला शिकला म्हणून बढाई मारु द्या. मी परमेश्वर आहे, मी कृपाळू व न्यायी आहे, जगात चांगल्या गोष्टी मी करतो आणि त्या गोष्टी मला आवडतात हे कळल्याबद्दल त्याला बढाई मारु द्या.” हा परमेश्वराचा संदेश आहे. 25 परमेश्वराचा संदेश असा आहे “ज्यांची फक्त शारीरिक सुंता झाली आहे, अशांना शिक्षा करण्याची वेळ येत आहे. 26 मिसर, यहुदा, अदोम, अम्मोन, मवाब यातील व वाळवंटात राहणाऱ्या इतर लोकांबद्दल मी बोलत आहे. ह्या देशातील लोकांची शारीरिक सुंताही खरोखरी झालेली नाही. पण इस्राएलच्या घराण्यातील लोकांच्या ह्दयाची सुंताही झालेली नाही.”

10:1 इस्राएलच्या वंशजांनो, परमेश्वर तुमच्याविषयी काय म्हणतो ते ऐका. 2 परमेश्वर असे म्हणतो,“दुसऱ्या देशांतील लोकांचे अनुकरण करु नका. आकाशात दिसणाऱ्या काही खास गोष्टींना घाबरु नका. या आकाशातील गोष्टी बघून दुसरे देश घाबरतात. परंतु तुम्ही अजिबात घाबरु नका. 3 त्या लोकांच्या चालीरीती अर्थशून्य आहेत. त्यांच्या मूर्ती म्हणजे दुसरे काही नसून जंगलातील लाकडे आहेत कामगार लाकूड पटाशीने छिनून त्या मूर्ती बनवितो. 4 ते लोक, त्या मूर्ती चांदीसोन्याने मढवून त्यांना सुंदर रुप देतात. त्या खाली पडू नयेत म्हणून हातोड्याने खिळे मारुन घट्ट बसवितात. 5 इतर देशांतील अशा मूर्ती काकडीच्या मळ्यातील बुजगावण्यासारख्या आहेत. त्या बोलू शकत नाहीत वा चालू शकत नाहीत. लोकांनाच त्या वाहून न्याव्या लागतात. तेव्हा त्यांना घाबरु नका. त्या मूर्ती तुमचे वाईटही करु शकत नाहीत व चांगलेही करु शकत नाहीत.” 6 परमेश्वर तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. तू महान आहेस. तुझ्या नावातच मोठेपण व सामर्थ्य आहे. 7 परमेश्वर, प्रत्येक माणसाने तुझा आदर केला पाहिजे. तू सर्व राष्ट्रांचा राजा आहेस. म्हणूनच सर्वाना आदरणीय आहेस त्या राष्ट्रांमध्ये काही शहाणी माणसे जरुर आहेत पण तुझ्या इतके सुज्ञ कोणीही नाही. 8 दुसऱ्या देशातील लोक मतिमंद आणि मूर्ख आहेत. दीड दमडीच्या लाकडाच्या मूर्ती त्यांना उपदेश करतात. 9 ते लोक तार्शिशहून आणलेल्या चांदीचा आणि उफाजहून आणलेल्या सोन्याचा वापर करुन पुतळे बनवितात. ह्या मूर्ती सुतार आणि सोनार घडवितातत्या मूर्तीवर ते निळ्या आणि जांभळ्या रंगाचे कपडे चढवितात ‘शहाणे लोक’ असे ‘देव’ तयार करतात. 10 पण परमेश्वरच फक्त खरा देव आहे. खरा सजीव असा केवळ देवच आहें शाश्वत शासन करणारा असा तो राजा आहें त्याला राग आल्यास पृथ्वी कंप पावते. त्याचा कोप देशांतील लोक सहन करु शकत नाहीत. 11 परमेश्वर म्हणतो, “त्या लोकांना पुढील संदेश द्या. ‘त्या खोट्या देवांनी पृथ्वीची आणि स्वर्गाची निर्मिती केली नाही. ते स्वर्ग आणि पृथ्वीवरुन नाहीसे होतील.“ 12 ज्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी निर्माण केली असा एकमेव देवच आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग करुन त्याने जग निर्माण केलें आपल्या समंजसपणाच्या आधारे पृथ्वीवर आकाश पांघरले. 13 ढगांचा गडगडाट आणि आकाशातून पडणारा मुसळधार पाऊस ही देवाचीच करणी आहे. पृथ्वीच्या प्रत्येक भागावरील आकाशात तो मेघ पाठवितो. पावसाबरोबर वीज पाठवितो. आपल्या भांडारातून वारा आणतो. 14 लोक अगदी मूर्ख आहेत. आपण निर्माण केलेल्या मूर्तीमुळेच सोनार मूर्ख बनविले जातात. त्या मूर्ती म्हणजे फक्त असत्य आहे. ते फक्त थोतांडचआहे 15 त्या मूर्ती शून्य किंमतीच्या आहेत. त्या खोट्या आहेत, न्यायदानाच्या वेळी त्यांचा नाश होईल. 16 पण याकोबचा देव त्या मूर्तीसारखा नाही. त्याने सर्व गोष्टींची निर्मिती केली आणि इस्राएलच्या वंशजांची, स्वत:चे खास लोक म्हणून निवड केली. “सर्वशक्तिमान परमेश्वर” हेच देवाचे नाव. 17 आपल्या मालकीच्या सर्व चीजवस्तू घेऊन पळून जाण्याच्या तयारीत राहा. यहूदाच्या लोकांनो, शत्रूने तुमच्या शहराला वेढले असून तुम्ही आता अडकला आहात. 18 परमेश्वर म्हणतो, “यावेळी, मी यहूदाच्या लोकांना ह्या देशा बाहेर घालवून देईन. मी त्यांना त्रास देऊन दु:ख भोगण्यास भाग पाडीन म्हणजे त्यांना धडा मिळेल.” 19 अरेरे, मी (यिर्मया) फारच जखमी झालो. माझ्या जखमा भरुन येण्यासारख्या नाहीत. तरीसुद्धा मी स्वत:लाच सांगतो, “हे माझे दु:ख मला पूर्णपणे भोगलेच पाहिजे.” 20 माझ्या तंबूचा नाश झाला. तंबूचे सर्व दोर तुटले आहेत. माझी मुले मला सोडून निघून गेली आहेत. माझा तंबू उभारायला एकही माणूस उरला नाही. माझा निवारा बांधायला एकही माणूस शिल्लक नाही. 21 मेंढपाळ (नेते) मूर्ख आहेत. ते परमेश्वराचा शोध घेण्याचा प्रयत्नच करीत नाहीत. ते शहाणे नाहीत. त्यामुळे त्यांचे कळप (लोक) इतस्तत: विखरुन हरवले आहेत. 22 मोठा आवाज ऐका! तो आवाज उत्तरेकडून येत आहे; यहुदातील शहरांचा तो नाश करील. युहदाचे निर्जन वाळवंट होईल. तेथे कोल्ह्यांची वस्ती होईल. 23 परमेश्वरा, माणसाच्या आयुष्यावर त्याचा स्वत:चा खरा हक्क नसतो, हे मला माहीत आहे. लोक भविष्याच्या योजना खरोखरच ठरवू शकत नाहीत. 24 परमेश्वरा, आम्हाला सुधार!पण न्याय्य रीतीने सुधार! रागाच्या भरात आम्हांला शिक्षा करु नकोस. नाही तर तू कदाचित् आमचा नाश करशील. 25 तुला राग आला असेल, तर दुसऱ्या राष्ट्रांना शिक्षा कर. ते तुला जाणत नाहीत वा मान देत नाहीत. ते तुझी उपासना करीत नाहीत. त्या राष्ट्रांनी याकोबच्या कुटुंबाचा विनाश केला. त्यांनी इस्राएल नेस्तनाबूत केले आणि इस्राएलच्या भूमीचा नाश केला.

11:1 यिर्मयाला मिळालेला संदेश असा होता: हा संदेश परमेश्वराचा होता: 2 “यिर्मया, या कराराची कलमे ऐक यहूदाच्या लोकांना या कलमांबद्दल सांग. यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांनाही सांग. 3 परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो ‘जे कोणी या कराराचे पालन करणार नाहीत. त्यांचे वाईट होईल.’ 4 तुमच्या पूर्वजांशी केलेल्या कराराबद्दल मी बोलत आहे. त्यांची मिसर देशातून सुटका करताना मी त्यांच्याशी हा करार केला होता. त्या वेळी मिसर देश म्हणजे पुष्कळ संकटांची भूमी होती. लोखंडालाही वितळवू शकणाऱ्या भट्टीप्रमाणे तो देश होता. मी त्या लोकांना सांगितले की तुम्ही माझी आज्ञा पाळलीत, तर तुम्ही माझे व्हाल व मी तुमचा देव होईन. 5 “तुमच्या पूर्वजांना दिलेल्या वचनाकरिता मी हे केले. दूध व मध यांची रेलचेल असलेली सुपीक भूमी द्यायचे मी त्यांना कबूल केले होते. त्याच भूमीवर तुम्ही आता राहत आहात.”मी (यिर्मयाने) ‘होय, परमेश्वरा!’ म्हणून पुष्टी दिली. 6 परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, यहूदाच्या शहरांतून व यरुशलेमच्या रस्त्यांतून हा संदेश शिकव. संदेश असा आहे. कराराच्या शर्ती ऐका आणि त्यांचे पालन करा. 7 मिसरच्या बाहेर येताना म्हणजेच मिसरमधून सुटका करताना मी तुमच्या पूर्वजांना इशारा देत आलो आहे की माझी आज्ञा पाळा. 8 पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. ते दुराग्रही बनले आणि त्यांच्या दुष्ट प्रवृत्तीला आवडेल तेच त्यांनी केले. माझ्या आज्ञा न पाळल्यास त्यांचे वाईट होईल असे करार सांगतो. मी त्यांना माझ्या आज्ञा पाळण्यास सांगितले, पण त्यांनी ते ऐकले नाही, म्हणून करारात उल्लेखलेल्या सर्व वाईट गोष्टी मला त्यांच्याबाबत कराव्या लागल्या.” 9 परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, यहुदातील आणि यरुशलेममधील लोकांनी गुप्त योजना आखल्याचे मला माहीत आहे. 10 त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या पापांची ते पुनरावृत्ती करीत आहेत. त्यांच्या पूर्वजांनी माझे संदेश ऐकण्याचे नाकारले. त्यांनी दुसऱ्या देवांचे अनुसरण केले. त्यांची पूजा केली. इस्राएल व यहूदाच्या वंशजांनी, त्यांच्या पूर्वजांनी माझ्याशी केलेल्या, कराराचा भंग केला आहे.” 11 म्हणू परमेश्वर म्हणतो, “मी यहूदाच्या लोकांना कसल्यातरी भयंकर संकटात टाकीन. त्यातून त्यांना त्यांची सुटका करुन घेता येणार नाही. त्यांना दु:ख होईल आणि मदतीसाठी ते माझा धावा करतील. पण मी त्यांचे ऐकणार नाही. 12 यहूदातील व यरुशलेममधील लोक त्या मूर्तीकडे जातील. त्यांची प्रार्थना करुन मदत मागतील ते त्या मूर्तीपुढे धूप जाळतात. पण त्या भयंकर संकटकाळी लोकांना मदत करणे त्या मूर्तीना शक्य होणार नाही. 13 “यहूदावासीयांनो, तुमच्याकडे बऱ्याच मूर्ती आहेत. यहूदामध्ये जेवढी नगरे आहेत, जवळजवळ तेवढ्याच मूर्ती असतील. तिरस्करणीय बआल देवाची पूजा करण्यासाठी तुम्ही ज्या वेदी बांधल्या आहेत, त्याही जवळजवळ यरुशलेममधील रस्त्यांच्या संख्येइतक्या असतील. 14 “यिर्मया, तुझ्यापुरते बोलायचे झाल्यास, तू यहूदाच्या लोकांसाठी प्रार्थना करु नकोस. त्यांच्यासाठी आळवणी करु नकोस. मी काही ऐकणार नाही. जेव्हा ते दु:ख भोगायला लागतील, तेव्हा माझा धावा करतील, पण ती त्यांचे ऐकणार नाही. 15 “माझी प्रेमिका (यहूदा) माझ्या घरात (मंदिरात) का? तिला तेथे येण्याचा काही अधिकार नाही. तिने बरीच पापे केली आहेत. यहूदा, तुझी विशेष वचने आणि प्राण्यांचे बळी तुला विनाशापासून तारतील, असे तुला वाटते का? मला यज्ञ अर्पण करुन तू शिक्षा टाळू शकशील असे तुला वाटते का?” 16 “दिसावयास देखणे असणाऱ्या हिरव्यागार जैतुन झाडाचे’ नाव परमेश्वराने तुला दिले. पण जोराच्या वादळाने देव त्या झाडाला आग लावील आणि त्याच्या फांद्या जाळून टाकील. 17 सर्वशक्तिमान परमेश्वराने तुझे रोपटे लावले, आणि आता तोच तुझ्यावर संकटे येणार असे म्हणतो. का? कारण इस्राएल आणि यहूदाच्या लोकांनी कुकर्मे केली. त्यांनी ‘बआल’ देवाला यज्ञ अर्पण केले म्हणून मला राग आला.” 18 अनाथोथचे लोक माझ्याविरुद्ध कट करीत असल्याचे परमेश्वराने मला दाखविले. परमेश्वराने मला ते करीत असलेल्या गोष्टी दाखविल्या, त्यावरुन ते माझ्याविरुद्ध असल्याचे कळले. 19 लोक माझ्याविरुद्ध असल्याचे समजण्यापूर्वी मी कत्तल होण्याची वाट पाहणाऱ्या गरीब कोकरासारखा होतो. ते माझ्याविरुद्ध आहेत याची मला कल्पना नव्हती. “आपण या झाडाचा आणि त्याच्या फळांचा नाश करु. आपण त्याला मारुन टाकू म्हणजे लोक त्याला विसरतील” असे ते माझ्याबद्दल म्हणत. 20 पण परमेश्वरा तू खरा न्यायी आहेस. लोकांच्या ह्दयांची व मनांची कशी परीक्षा करावयाची हे तू जाणतोस. मी तुला माझे मुद्दे सांगेन आणि त्यांना योग्य शिक्षा देण्याचे तुझ्यावर सोपवीन. 21 अनाथोथचे लोक यिर्मयाला मारायचे ठरवीत होते. ते लोक यिर्मयाला म्हणाले, “परमेश्वराच्या नावावर भविष्यकथन करु नकोस, नाहीतर आम्ही तुला ठार करु” देवाने अनाथोथच्या लोकांबद्दल निर्णय घेऊन टाकला. 22 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणाला, “लवकरच अनाथोथच्या त्या लोकांना मी शिक्षा करीन. त्यांचे तरुण युद्धात कामी येतील. त्यांची मुलेमुली भुकेने मरतील. 23 अनाथोथमधील एकही माणूस शिल्लक राहणार नाही. कोणीही वाचणार नाही. मी त्यांना शिक्षा करीन. मी त्यांचे वाईट घडवून आणीन”

12:1 परमेश्वरा, जेव्हा मी तुझ्याशी वाद घालतो, तेव्हा तुझेच म्हणणे बरोबर ठरते. पण काही गोष्टी बरोबर वाटत नाहीत. त्याबद्दल मला तुला विचारावेसे वाटते. दुष्ट लोकच यशस्वी का होतात? तू ज्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाहीस, अशांना सुखाचे आयुष्य का मिळते? 2 त्या दुष्टांना तूच इथे वसविलेस ती माणसे मजबूत मुळे असलेल्या झाडांप्रमाणे आहेत. ती वाढतात आणि फळे देतात. तोंडाने, तू त्यांना जवळचा व प्रिय असल्याचे, ते सांगतात. पण मनाने ते तुझ्यापासून फार दूर आहेत. 3 पण, परमेश्वरा, तू माझे मन जाणतोस. तू मला पाहतोस आणि माझ्या मनाची परीक्षा घेतोस. कत्तल करण्यासाठी मेंढ्यांना जसे फरपटत आणतात, तसे त्यांना फरपटत आण. कत्तलीच्या दिवसासाठी त्यांची निवड कर. 4 किती काळ जमीन कोरडी राहणार? किती काळ गवत वाळून मरणार? त्या दुष्ट लोकांच्या चुकीमुळे प्राणी आणि पक्षी मरुन गेले. तरीसुद्धा ते लोक म्हणतात, “आमचे काय होईल हे पाहण्याइतक्या दीर्घकाळ यिर्मया जगणार नाही.” 5 “यिर्मया, माणसांबरोबर धावण्याच्या शर्यतीत जर तू दमतोस, तर मग घोड्यांशी तू कशी स्पर्धा करणार? जर तू सुरक्षित ठिकाणी कंटाळलास, तर धोकादायक ठिकाणी काय करशील? यार्देन नदीकिनारी वाढणाऱ्या कंाटेरी झुडुंपात तू काय करशील? 6 ही सर्व माणसे तुझेच भाऊबंद आहेत. तुझ्याच कुटुंबातील माणसे तुझ्याविरुद्ध कट करीत आहेत. तुझ्याच घरातील माणसे तुझ्याविरुद्ध आवाज उठवीत आहे. जरी ते तुझ्याशी मित्रांसारखे बोलत असले, तरी तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस.” 7 “मी परमेश्वराचा माझ्या घराचा त्याग केला आहे. मी माझी मालमत्तासोडली आहे. मी माझी प्रियतमा (यहूदा) तिच्या वैऱ्यांच्या ताब्यात दिली आहे. 8 माझे स्वत:चेच लोक जंगली सिंहाप्रमाणे माझ्याविरुद्ध उलटले. ते माझ्याकडे पाहून डरकाळ्या फोडू लागल्याने मी त्यांच्याकडे पाठ फिरविली. 9 मरायला टेकल्यामुळे गिधाडांनी घेरलेल्या प्राण्याप्रमाणे माझ्या लोकांची स्थिती आहे. गिधाडे तिच्याभोवती (यहूदाभोवती) घिरट्या घालतात. वन्य प्राण्यांनो, तुम्हीसुध्दा या आणि काही खाद्य मिळवा. 10 पुष्कळ मेंढपाळांनी (नेत्यांनी) माझ्या द्राक्षमळ्याचा नाश केला आहे. त्यांनी द्राक्षेवेली पायदळी तुडविल्या. त्यांनी माझ्या द्राक्षमळ्याचे वैराण वाळवंट केले. 11 त्यांनी माझा मळा उजाड केला. तो सुकून मरुन गेला. तेथे कोणीही राहत नाही. सर्व देश म्हणजे एक निर्जन वाळवंट झाले आहे. त्या मळ्याची काळजी घेण्यासाठी एकही माणूस उरला नाही. 12 त्या रिकाम्या वाळवंटाच्या हिरवळीतून लूट करण्याकरिता सैन्य आले. परमेश्वराने त्या सैन्याचा उपयोग त्या देशाला शिक्षा करण्यासाठी केला. देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत राहणाऱ्या सर्वांना शिक्षा केली. कोणीही वाचला नाही. 13 लोकांनी गहू पेरला, तर तिथे काटे उगवतील. लोक दमेपर्यंत खूप कष्ट करतील, पण या अफाट मेहनतीचे फळ त्यांना मिळणार नाही. त्यांच्या पिकाबाबत ते खजिल होतील. परमेश्वराच्या कोपामुळे या गोष्टी घडतील.” 14 देव काय म्हणतो ते पाहा: “इस्राएलच्या भोवती राहणाऱ्या लोकांसाठी मी काय करणार आहे, ते ती तुम्हाला सांगतो. ते लोक फार दुष्ट आहेत. मी इस्राएलच्या लोकांना दिलेल्या जमिनीचा त्या लोकांनी नाश केला. त्या पापी लोकांना, मी, खेचून काढीन व त्यांच्या देशाबाहेर त्यांना हाकलून देईन. त्यांच्याबरोबर यहूदाच्या लोकांनाही मी बाहेर खेचीन. 15 पण अशा रीतीने त्या लोकांना देशाबाहेर हाकलल्यावर मला त्यांची कणव येईल. मी प्रत्येक कुटुंब परत त्यांच्या देशात आणीन आणि त्यांची जमीन परत देईल. 16 ह्यातून त्या लोकांनी योग्य तो बोध घ्यावा असे मला वाटते. पूर्वी त्या लोकांनी, माझ्या माणसांना, बआलच्या नावाने वचन घ्यायला शिकविले होते. आता मी त्याच रीतीने त्यांना धडा शिकविणार. वचन घेताना माझे नाव घेण्यास त्यांनी शिकावे असे मला वाटते. ‘देव नक्कीच असेपर्यंत’ अशी सुरवात त्यांनी करावी अशी माझी इच्छा आहे. त्यांनी असे केले तर मी त्यांना यशस्वी करीन आणि माझ्या लोकांत राहू देईन. 17 पण जर एखाद्या राष्ट्राने माझा आदेश मानला नाही, तर त्या राष्ट्राचा मी समूळ नाश करीन. त्या राष्ट्राला मेलेल्या झाडाप्रमाणे उपटीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे.

13:1 परमेश्वर मला असे म्हणाला: “यिर्मया, जा आणि तागाचा घागरा विकत घे. नंतर तो नेस. तो ओला होऊ देऊ नकोस.” 2 परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मी एक तागाचा घागरा विकत आणला व नेसला. 3 नंतर मला परमेश्वराकडून दुसऱ्यांदा संदेश आला. 4 तो असा होता: “यिर्मया, तू विकत आणून नेसलेला घागरा घेऊन फरातलाजा. तिथे तो खडकाला पडलेल्या चिरेत लपवून ठेव.” 5 त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि अगदी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे घागरा लपवून ठेवला. 6 पुष्कळ दिवसांनी देव मला म्हणाला, “यिर्मया, फरातला जा व लपवून ठेवायला सांगितलेला घागरा परत घे.” 7 त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि घागरा उकरुन काढला. मी दगडाच्या चिरेत लपविलेला घागरा बाहेर काढला. पण आता तो इतका खराब झाला होता की मी तो नेसू शकत नव्हतो. तो अगदी निरुपयोगी झाला होता. 8 मग मला परमेश्वराचा संदेश आला. 9 परमेश्वर मला म्हणाला, “ज्याप्रमाणे घागरा अगदी खराब आणि निरुपयोगी झाला, त्याचप्रमाणे यहूदातील आणि यरुशलेमधील अहंकारी लोकांचा नाश होईल. 10 मी यहुदाच्या उद्दाम आणि पापी लोकांचा नाश करीन. ते लोक माझा संदेश ऐकण्याचे नाकारतात. ते दुराग्रही असून आपल्याला पाहिजे त्याच गोष्टी करतात. ते दुसऱ्या देवांना अनुसरतात व त्यांची पूजा करतात. यहूदाच्या अशा लोकांची गत ह्या तागाच्या घागऱ्याप्रमाणे होईल. त्यांचा नाश होऊन ते निरुपयोगी ठरतील. 11 घागरा जसा माणसाच्या कमरेभोवती घट्ठ लपेटला जातो, त्याप्रमाणे मी यहूदाची आणि इस्राएलची कुटुंबे माझ्या कमरेला लपेटली.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “त्या लोकांनी माझे व्हावे, मला कीर्ती, प्रशंसा आणि मान मिळवून द्यावा म्हणून मी असे केले. पण माझ्या लोकांना माझे ऐकावयाचे नाही.” 12 “यिर्मया, यहूदाच्या लोकांना सांग की परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘प्रत्येक चामड्याचा बुधला दारुने भरावा.’ ते लोक तुला हसतील आणि म्हणतील ‘प्रत्येक चामड्याचा बुधला दारुने भरावा हे आम्हाला माहीत आहे.’ 13 मग तू त्यांना सांग, ‘परमेश्वराचे म्हणणे असे आहे की या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मी दारुड्याप्रमाणे असहाय करीन. मी हे दावीदच्या सिंहासनावर बसलेल्या राजांबद्दल, याजकांबद्दल, संदेष्ट्यांबद्दल आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्या यच्चयावत लोकांबद्दल बोलत आहे. 14 यहूदाच्या लोकांना मी धडपडायला भाग पाडीन. ते धडपडून एकमेकांच्या अंगावर पडतील. पिता पुत्र एकमेकांवर पडतील. हा परमेश्वराचा संदेश आहे. “‘मला त्याबद्दल वाईटही वाटणार नाही. आणि त्यांची दयाही येणार नाही. अनुकंपा येऊन मी यहूदाच्या लोकांचे पारिपत्य थांबविणार नाही.”‘ 15 ऐका आणि लक्ष द्या. परमेश्वर तुमच्याशी बोलला आहे. उन्मत्त बनू नका. 16 परमेश्वराचा, तुमच्या देवाचा मान राखा. त्याचे स्तवन करा, नाहीतर तो अंधकार पसरवील. अंधकारमय टेकड्यांवर पडण्याआधीच त्याचे स्तुतिस्तोत्र गा. तुम्ही यहूदाचे लोक प्रकाशाची वाट पाहता, पण परमेश्वर प्रकाशाचे गाढ अंधकारात रुपांतर करेल. तो प्रकाशाला दाट अंधारात बदलेल. 17 यहूदाच्या लोकांनो, तुम्ही जर परमेश्वराचे ऐकणार नसाल, तर मी एकांतात आक्रोश करीन. तुमचा उन्मत्तपणा मला आक्रोश करायला भाग पाडेल. मी दारुण आकांत करीन. माझे डोळे अश्रूंनी डबडबतील. का? कारण परमेश्वराच्या मेंढरांचा कळप (यहूदाचे लोक) पकडला जाईल. 18 राजा आणि राणीला या गोष्टी सांगा, “तुमचे सुंदर मुकुट तुमच्या डोक्यांवरुन खाली पडलेत. तुम्ही आता तुमच्या सिंहासनावरुन खाली उतरा.” 19 नेगेवच्या वाळवंटातील शहरे बंद केली गेली आहेत. कोणीही ती उघडू शकत नाही. यहूदाच्या सर्व लोकांना कैद करुन परागंदा करण्यात आले आहे. 20 यरुशलेम, तो पाहा! उत्तरेकडून शत्रू चाल करुन येत आहे. तुझा कळप कोठे आहे? देवाने तुला या सुंदर कळपाचे दान दिले. त्याची तू काळजी घ्यावीस अशी अपेक्षा होती. 21 आता त्या कळपाबद्दल परमेश्वराने जाब विचारल्यास तू काय उत्तर देणार? तू लोकांना देवाबद्दल ज्ञान देशील अशी अपेक्षा होती. तुझे नेते लोकांना मार्गदर्शन करतील असे वाटत होते. पण त्यांनी त्यांचे कर्तव्य केले नाही. तेव्हा आता तुला प्रसुतिवेदनांप्रमाणे वेदना व त्रास भोगावा लागेल. 22 तू कदाचित् स्वत:ला विचारशील, “माझ्यावरच असा वाईट प्रसंग का आला?” तुझ्या अनेक पापांमुळे असे झाले. तुझ्या पापाबद्दल तुझा घागरा फाडला गेला आणि तुझी पादत्राणे काढून घेण्यात आली. तुझी मानहानी करण्यासाठी हे करण्यात आले. 23 काळा माणूस आपल्या कातडीचा रंग बदलू शकत नाही. किंवा चित्ता आपल्या अंगावरील ठिपके बदलू शकत नाही. त्याचप्रमाणे यरुशलेम, तू सुद्धा बदलणार नाहीस आणि चांगल्या गोष्टी करणार नाहीस तू नेहमीच वाईट गोष्टी करशील. 24 “मी तुम्हाला तुमची घरे सोडून जाण्यास भाग पाडीन. तुम्ही दाही दिशांना सैरावैरा पळत सुटाल, वाळवंटातील वाऱ्याने दूर उडून जाणाऱ्या फोलकटाप्रमाणे तुमची गत होईल. 25 तुमच्याबाबत माझी योजना ही अशी आहे आणि त्याचप्रमाणे गोष्टी घडतील.” हा परमेश्वराचा संदेश आहे.“हे असे का घडेल? कारण तुम्हाला माझा विसर पडला. तुम्ही खोट्या देवावर विश्वास ठेवला. 26 यरुशलेम, मी तुझा घागरा डोक्याकडून खेचीन. प्रत्येकजण तुला पाहील आणि तुझी बेअब्रू होईल. 27 मी तू केलेली भयानक कृत्ये पाहिली आहेत.जारांशी हसताना आणि संभोग करताना मी तुला पाहिले आहे. वेश्या बनायचेच तुझ्या मनात दिसते आहे. मी तुला डोंगरकपारीत आणि मैदानात पाहिले आहे. यरुशलेम, हे तुझ्या दृष्टीने वाईट आहे. या घृणास्पद पापें तू किती काळ करणार याचे मला नवल वाटते.”

14:1 अवर्षणाबद्दल यिर्मयाला परमेश्वराने पुढील संदेश दिला. 2 “यहूदा हे राष्ट्र, मेलेल्या लोकांकरिता आक्रंदत आहे. यहूदाच्या शहरामधील लोक अधिकाधिक क्षीण होत चालले आहेत ते जमिनीवर पडून आहेत. यरुशलेमधील लोक देवाकडे मदतीसाठी टाहो फोडत आहेत. 3 नेते मंडळी आपल्या नोकरांना पाणी आणण्यासाठी पाठवितात. नोकर पाण्याच्या टाक्यांकडे जातात, पण त्यांना थोडेसुद्धा पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना रिकामी भांडी घेऊन परत यावे लागते. म्हणून ते लज्जित व खजील होऊन आपले चेहरे झाकून घेतात. 4 कोठेही पाऊस न पडल्यामुळे कोणीही पिकांसाठी जमिनीची मशागत करीत नाही.शेतकरी हवालदिल झाले आहेत त्यामुळे त्यांनी आपले चेहरे झाकून घेतले आहेत. 5 कोठेही गवत नसल्यामुळे हरीणी आपल्या नवजात पाडसाला एकटेच सोडून देते. 6 उघड्या डोंगरावर उभी राहून, जंगली गाढवे कोल्ह्यांप्रमाणे हवा हुंगतात. पण त्यांना कोठेही काहीही खाण्यालायक दिसत नाही. कारण खाण्यालायक एकही झुडूप शिल्लक नाही.” 7 या गोष्टींना आम्हीच जबाबदार आहोत, हे आम्हाला माहीत आहे. आम्ही आमच्याच पापाचे भोग भोगत आहोत. परमेश्वरा, तुझे नाव राखण्यासाठी आम्हाला मदत कर. कारण आम्ही तुझ्याशी खूप वेळा प्रतारणा केली, हे आम्हाला कबूल आहे. आम्ही तुझ्याशी पापाचरण केले, 8 देवा, तू इस्राएलचे आशास्थान आहेस. संकटकाळी तू इस्राएलला वाचवितोस. पण, आता, तू, फक्त रात्री मुक्काम करुन पुढे जाणाऱ्या प्रवाशासारखा वाटतोस. 9 अचानकपणे हल्ला झाल्यावर चकित झालेल्या माणसाप्रमाणे तू वाटतोस. कोणालाही वाचविण्यास असमर्थ असलेल्या हतबल सैनिकासारखा तू दिसतोस. पण परमेश्वरा, तू आमच्याबरोबर आहेस. आम्ही तुझ्या नावाने ओळखले जातो तेव्हा आम्हाला मदत न करता जाऊ नकोस.” 10 यहूदाच्या लोकांबद्दल देवाचे म्हणणे असे आहे: “यहूदाच्या लोकांना माझा त्याग करणे आवडते. माझा त्याग करण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. तेव्हा आता परमेश्वर त्यांचा स्वीकार करणार नाही. तो त्यांची दुष्कृत्ये लक्षात ठेवून त्यांच्या पापांबद्दल त्यांना शिक्षा करील.” 11 नंतर परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, यहूदाच्या लोकांच्या भल्यासाठी तू विनवणी करु नकोस. 12 यहूदाचे लोक कदाचित् उपवास करुन माझी प्रार्थना करतील. पण ती त्यांची प्रार्थना ऐकणार नाही. जरी त्यांनी मला होमार्पण व धान्यार्पणचा नैवेद्य दाखविला, तरी मी त्या लोकांचा स्वीकार करणार नाही. मी युद्धात यहूदाच्या लोकांचा नाश करीन. अन्न तोडून मी त्यांची उपासमार करीन. भयंकर रोगराई पसरवून मी त्यांना नष्ट करीन.” 13 पण मी परमेश्वराला म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, संदेष्टे तर लोकांना काही वेगळेच सांगत होते. ते लोकांना सांगत होते, ‘शत्रू कधीच तुमच्यावर हल्ला करणार नाही. तुमची कधीही उपासमार होणार नाही. परमेश्वर तुमच्या देशात शांती राखेल.” 14 मग परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, माझ्या नावावर हे संदेष्टे असत्य कथन करतात. मी त्यांना पाठविलेले नाही. मी त्यांना आज्ञा केली नाही वा त्यांच्याशी बोललोही नाही. ते लोकांपुढे खोटे दृष्टान्त सांगतात, त्यांना मोहजालात फसवितात व स्वत:चे स्वप्नरंजन करतात. 15 माझ्या नावावर प्रवचने देणाऱ्या संदेष्ट्यांबद्दल बोलायचे झालेच तर, मी त्यांना पाठविले नाही. ते म्हणतात ‘या देशावर कोणीही हल्ला करणार नाही.’ ह्या देशाची कधीही उपासमार होणार नाही.’ पण ते संदेष्टेच उपासमारीने मरतील. शत्रू त्यांना ठार करील. 16 आणि ज्या लोकांशी ते संदेष्टे बोलले, ते लोक रस्त्यावर उघडे पडतील. उपासमार व शत्रू यांचे ते बळी ठरतील. त्यांचे वा त्यांच्या बायकामुलांचे दफन करण्यास कोणीही असणार नाही. मी त्यांना शिक्षा करीन. 17 “यिर्मया, यहूदाच्या लोकांना माझा संदेश सांग: ‘माझ्या डोळ्यांत अश्रू दाटून आलेत. माझ्या कुमारी मुलीसाठी मी रात्रंदिवस अव्याहतपणे आक्रोश करीन. माझ्या लोकांसाठी मी न थांबता आक्रोश करीन. का? कारण कोणीतरी त्यांच्यावर वार करुन त्यांना चिरडले आहे. ते लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. 18 मी जर त्या देशात गेलो, तर मला तलवारीने मारले गेलेले लोक दिसतील. मी जर शहरात गेलो, तर मला सर्वत्र दौर्बल्य आढळेल. कारण लोकांच्याजवळ अन्न नाही. याजकांना आणि संदेष्ट्यांना परदेशात नेले आहे.”‘ 19 “परमेश्वरा, तू यहूदाला पूर्णपणे त्याज्य ठरविले आहेस का? सियोनचा तुला तिरस्कार वाटतो का? आमची स्थिती परत न सुधारण्याइतके तू आमचे नुकसान केले आहेस. तू असे का केलेस? आम्हाला शांती पाहिजे होती. पण आमच्या वाट्याला काहीच चांगले आले नाही. जखमा भरुन येण्याची आम्ही आशा केली, पण आमच्या वाट्याला फक्त भीती आली. 20 परमेश्वरा, आम्ही पापी आहोत, ह्याची आम्हाला जाणीव आहे. आमच्या पूर्वजांनी दुष्कृत्ये केली. आम्ही तुझे अपराध केले. 21 परमेश्वरा, तुझ्या नावाचा लौकिक राखण्याकरिता, आम्हाला दूर लोटू नकोस तुझ्या वैभवशाली सिंहासनाचा मान राख. आमच्याशी केलेला करार आठव. त्या कराराचा भंग करु नकोस. 22 परदेशातील मूर्तींत पाऊस पाडण्याचे सामर्थ्य नाही. पावसाच्या सरी पाडण्याची ताकद आकाशात नाही. तूच एक आमचे आशास्थान आहेस. या सर्व गोष्टी करणारा तूच एकमेव आहेस.”

15:1 परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, मोशे आणि शमुवेल जरी यहूदासाठी विनवणी करण्याकरिता माझ्याकडे आले असते तरी यहूदाची मला दया येणार नाही. यहूदाच्या लोकांची मला कीव वाटणार नाही. त्या लोकांना माझ्यापासून दूर ठेव. त्यांना निघून जाण्यास सांग. 2 ते लोक कदाचित् तुला विचारतील, ‘आम्ही कोठे जाऊ?’ तेव्हा तू त्यांना माझा पुढील संदेश दे परमेश्वर म्हणतो,‘काही लोकांना मी मरणासाठी निवडले आहे, ते मरतीलच. काही लोकांची निवड मी लढाईत मरण्यासाठी केली आहे, त्यांना तसेच मरण येईल. काहीना मी उपासमारीने मरण्यासाठी निवडले आहे; ते अन्नावाचून मरतील. काहीची निवड मी देशोधडीला लावण्यासाठीच केली आहे; त्यांना परदेशात कैदी म्हणून पाठविले जाईल.’ 3 मी त्यांच्यावर ‘चार प्रकारचे संहारक सोडीन.’ हा परमेश्वराचा संदेश आहे. ‘मी त्यांना मारण्यासाठी तलवारधारी शत्रू पाठवीन. त्यांची शवे खेचून नेण्यासाठी मी कुत्र्यांना पाठवीन. त्यांची प्रेते खाण्यासाठी मी पक्षी व हिंस्र प्राणी सोडीन. 4 पृथ्वीवरच्या सर्व लोकांना, एखाद्या भयंकर गोष्टीसाठी देण्याचे उदाहरण म्हणून मी यहूदाच्या लोकांचा उपयोग करीन. मनश्शेने यरुशलेममध्ये जे काय केले, त्यासाठी मी यहूदातील लोकांना शिक्षा करीन. कारण मनश्शे हा हिज्कीया राजाचा मुलगा व यहूदाचा राजा होता.’ 5 “यरुशलेम नगरी, तुझ्याबद्दल कोणालाही वाईट वाटणार नाही. कोणीही दु:खाने आक्रोश करणार नाही. तुझे कसे काय चालले आहे याची कोणीही विचारपूस करणार नाही. 6 यरुशलेम, तू मला सोडून गेलीस!” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “तू पुन्हा पुन्हा माझा त्याग केलास म्हणून मी तुला शिक्षा करीन. तुझा नाश करीन. तुझी शिक्षा पुढे ढकलण्याचा आता मला वीट आला आहे. 7 मी माझ्या खुरपणीने यहूदाच्या लोकांना वेगळे काढीन आणि देशाच्या सीमेबाहेर पसरवून देईन माझे लोक सुधारले नाहीत म्हणून मी त्यांचा नाश करीन. मी त्यांच्या मुलांना घेऊन जाईन. 8 पुष्कळ स्त्रिया विधवा होतील. समुद्रातील वाळूच्यापेक्षा त्यांची संख्या जास्त असेल. भर मध्यान्ही मी संहारक आणीन. यहूद्यांच्या तरुण मुलांच्या आयांवर तो हल्ला करील. मी यहूदामधील लोकांना क्लेश देईन आणि त्यांच्यात घबराट निर्माण करीन. लवकरच मी हे घडवून आणीन. 9 जे कोणी संहारातून बचावले असतील. त्यांना शत्रू हल्ला करुन आपल्या तलवारींनी ठार मारेल. एखाद्या स्त्रीला जरी सात मुले असतील, तरी ती सर्व मरतील. त्या दु:खाने ती एवढा आक्रांत करील की अशक्त होऊन तिला श्वास घेणे कठीण होईल. ती उदास होईल व गोंधळून जाईल. दु:खाने तिला दिवसा, उजेडीही अंधार पसरल्यासारखे वाटेल.” 10 माते, तू मला (यिर्मयाला) जन्म दिलास याचा मला खेद वाटतो. वाईट गोष्टीबद्दल सर्व देशावर दोषारोप व टीका करणे माझ्यासारख्याला भाग पडते. काहीही देणे घेणे नसताना, मला प्रत्येकजण शिव्याशाप देतो. 11 खरे म्हणजे परमेश्वरा, मी तुझी चांगली सेवा केली. संकटाच्या वेळी मी शत्रूंबद्दल तुझ्याकडे विनवणी केली. 12 “यिर्मया, लोखंडाच्या तुकड्याचे कोणीही शतशा तुकडे करु शकत नाही, हे तुला माहीत आहे. येथे लोखंड वा पोलाद हा शब्द मी उत्तरेकडून येणाऱ्या पोलादासाठी वापरत आहे. तसेच कोणीही काशाचे पण तुकडे तुकडे करु शकत नाही. 13 यहूदाच्या लोकांकडे बरीच संपत्ती आहे ती संपत्ती मी दूसऱ्या लोकांना देईन. ती त्या लोकांना विकत घ्यावी लागणार नाही. मीच ती त्यांना देईन. का? कारण यहूदाच्या लोकांनी खूप पापे केली. यहूदाच्या प्रत्येक भागात त्यांनी पापे केली. 14 यहूदातील लोकांनो, मी तुम्हाला तुमच्या शत्रूचे गुलाम करीन. तुम्हाला अनोळखी असलेल्या प्रदेशात तुम्ही गुलाम व्हाल. मी खूप रागावलो आहे. माझा राग प्रखर अग्नीसारखा आहे. त्यात तुम्ही जाळले जाल.” 15 परमेश्वरा, तू मला जाणतोस माझी आठवण ठेव व माझी काळजी घे. लोक मला दुखवत आहेत त्यांना योग्य ती शिक्षा कर. त्या लोकांशी तू संयमाने वागतोस. पण त्यांना संयम दाखविताना, माझा, मी तुझ्यासाठी भोगत असलेल्या दु:खाचा परमेश्वरा विचार कर. 16 मला तुझा संदेश मिळाला व मी तो खाल्ला (आत्मसात केला.) तुझ्या संदेशाने मला खूप आनंद झाला. तुझ्या नावाने ओळखले जाण्यात मला आनंद वाटतो कारण तुझे नावच ‘सर्वशक्तिमान परमेश्वर’ असे आहे. 17 लोकंाच्या हसण्याखिदळण्यात आणि जल्लोशांत मी कधीच सामील झालो नाही. माझ्यावर तुझा प्रभाव असल्याने मी एकटाच बसून राहिलो. आजूबाजूला असलेल्या दुष्टाईबद्दल तू माझ्यात क्रोध भरलास. 18 पण तरीसुद्धा मी दुखावला का जातो? माझ्या जखमा भरुन येऊन बऱ्या का होत नाहीत, ते मला समजत नाही. देवा, मला वाटते तू बदललास पाणी आटून गेलेल्या झऱ्याप्रमाणे तू झालास. ज्यातून पाणी वाहायचे थांबले आहे अशा प्रवाहाप्रमाणे तू झालास. 19 मग परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, तू बदललास आणि माझ्याकडे परत आलास, तर मी शिक्षा करणार नाही. मगच तू माझी सेवा करु शकतोस वायफळ बडबड न करता, महत्वाचे तेवढेच बोललास, तर तू माझे शब्द बोलू शकतोस. यहूदातील लोकांनी बदलावे व तुझ्याकडे परत यावे. यिर्मया! पण तू मात्र त्यांच्यासारखा होऊ नकोस. 20 त्या लोकांना तू काश्याची भिंत वाटशील, एवढा मी तुला बलवान करीन. ते तुझ्याविरुद्ध लढतील, पण ते तुझा पराभव करु शकणार नाहीत. का? कारण मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला मदत करीन आणि तुझे रक्षण करीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. 21 “त्या दुष्ट लोकांपासून मी तुझे रक्षण करीन. ते लोक तुला घाबरवितात. पण त्यांच्यापासून मी तुला वाचवीन.”

16:1 मला परमेश्वराचा संदेश आला: 2 “यिर्मया, तू लग्न करता कामा नये. या ठिकाणी तुला मुले होता कामा नयेत” 3 यहूदामध्ये जन्मणाऱ्या मुलांबद्दल आणि त्यांच्या आईवडिलांबद्दल परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, 4 “त्या लोकांना भयंकर वाईट प्रकारे मृत्यू येईल. त्यांच्यासाठी कोणीही शोक करणार नाही. त्यांचे कोणीही दफन करणार नाही. त्यांची प्रेते शेणाप्रमाणे जमिनीवर उघडी पडतील. ते लोक शत्रूकडून मारले जातील वा उपासमारीने मरतील. त्यांची प्रेते पक्षी व वन्य प्राणी ह्यांचे भक्ष्य होतील.” 5 म्हणून परमेश्वर म्हणतो, “यिर्मया, ज्या घरी लोक अंत्यसंस्कारानंतर जेवण करीत असतील, त्या घरी तू जाऊ नकोस. तेथे गेलेल्यासाठी शोक वा दु:ख प्रदर्शित करायला जाऊ नकोस. ह्या गोष्टी तू करु नकोस. का? कारण मी माझा आशीर्वाद मागे घेतला आहे. ह्या लोकांबद्दल मला दया वाटणार नाही. मला त्यांच्याबद्दल दु:ख होणार नाही.” हा परमेश्वराचा संदेश आहे. 6 “यहूदामध्ये महत्वाचे आणि सामान्य दोघेही मरतील. त्यांचे कोणी दफन करणार नाही. अथवा त्यांच्याबद्दल शोक करणार नाही. कोणीही दाढी करुन वा मुंडन करुन त्यांच्यासाठी शोक प्रदर्शित करणार नाही. 7 मृतांबद्दल शोक करणाऱ्यांसाठी कोणीही अन्न आणणार नाही. ज्यांचे आईवडील गेले आहेत, त्यांचे कोणी सांत्वन करणार नाही. मृतांसाठी शोक करणाऱ्यांसाठी, कोणीही पेये आणून सांत्वन करणार नाही. 8 “यिर्मया, ज्या घरात मेजवानी सुरु आहे, अशा घरात तू जाऊ, नकोस, अशा घरात खाऊ पिऊ नकोस. 9 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘मी लवकरच लोकांचा जल्लोश बंद पाडीन. लग्नसमारंभातील आनंदकल्लोळ मी बंद करीन. तुझ्या आयुष्यातच हे घडेल, इतक्या लवकर मी हे सर्व करीन.’ 10 “यिर्मया, यहूदाच्या लोकांना तू ह्या गोष्टी सांग लोक तुला विचारतील ‘परमेश्वराने आमच्याबद्दल या भयंकर गोष्टी का सांगितल्या? आम्ही काय चूक केली? आम्ही आमच्या परमेश्वर देवाचे काय पाप केले?’ 11 तेव्हा तू त्यांना हे सांगितलेच पाहिजेस, ‘तुमच्या पूर्वजांनी परमेश्वराला अनुसरायचे सोडल्याबद्दल ह्या भयंकर गोष्टी घडतील.’ हा देवाचा संदेश आहे. ‘त्यांनी दैवतांची पूजा केली. तुमच्या पूर्वजांनी माझा त्याग केला आणि माझ्या आदेशांचे पालन करणे सोडले. 12 पण तुमच्या पूर्वजांपेक्षा तुम्ही वाईट पापे केलीत. तुम्ही फार हटवादी आहात. तुम्हाला वाटेल ते तुम्ही करता. माझ्या आज्ञा पाळत नाही. तुमचेच खरे करता. 13 म्हणून मी तुम्हाला देशाबाहेर हाकलीन. तुम्हाला परदेशात जाणे भाग पाडीन, तुम्हाला किंवा तुमच्या पूर्वजांनासुद्धा माहीत नसलेल्या देशांत तुम्ही जाल. त्या देशात, तुमच्या इच्छेप्रमाणे शत्रदिवस खोट्या देवांची सेवा तुम्ही करु शकाल, मी तुम्हाला मदतही करणार नाही किंवा तुमच्यावर कृपाही करणार नाही.’ 14 “आपल्या वचनाची खात्री देताना लोक म्हणतात ‘परमेश्वराचे अस्तित्व जेवढे खरे आहे, तेवढे आपले वचन पक्के आहे. मिसरच्या भूमीतून इस्राएलच्या लोकांची सुटका त्या परमेश्वरानेच केली आहे.’ पण आता देवाचा असा संदेश आहे, ‘लोक वर म्हटल्याप्रमाणे म्हणणार नाहीत. असा काळ येऊ घातलेला आहे. 15 लोक काहीतरी नवीनच म्हणतील, ‘त्या परमेश्वराचे अस्तित्व खात्रीचे आहे, ज्याने इस्राएलच्या लोकांची उत्तरेतील प्रदेशातून सुटका केली.’ त्यांना निरनिराळ्या प्रदेशांत पाठवून तेथून त्यांना परत आणणारा तोच एकमेव आहे’ ते असे का म्हणतील? कारण इस्राएलच्या लोकांना मी त्याच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत परत आणीन. 16 “लवकरच मी पुष्कळ कोळ्यांना येथे बोलावीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “ते कोळी यहूदाच्या लोकांना पकडतील असे झाल्यावर मी पुष्कळ शिकाऱ्यांना आणीन. ते शिकारी प्रत्येक डोंगर, टेकड्या व कपारी यांमधून यहूदाच्या लोकांची शिकार करतील. 17 त्यांची प्रत्येक कृती मला दिसते. यहूदाचे लोक त्यांची कृत्ये माझ्यापासून लपवू शकत नाहीत. त्यांचे पाप माझ्यापासून लपून राहात नाही. 18 ती यहूदाच्या लोकांना त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल परत फेड करीन. मी यहूदाच्या लोकांना त्याच्या पापांची किंमत दामदुपटीने मोजायला लावीन. त्यांनी माझी भूमी ‘अपवित्र’ केली म्हणून मी असे करीन. त्यांनी भयानक मूर्ती स्थापून माझी भूमी कलंकित केली. मी त्या मूर्तींचा तिरस्कार करतो. पण त्यांनी माझा देशच त्या मूर्तींनी भरुन टाकला.” 19 परमेश्वरा, तूच माझे सामर्थ्य आहेस आणि माझे संरक्षण आहेस. संकटकाळी धावत जाऊन आश्रय घ्यावा असे सुरक्षित स्थान तू आहेस. जगाच्या सर्व भागांतून राष्ट्रे तुझ्याकडे येतील. ते म्हणतील, “आमच्या वाडवडिलांनी खोटे देव जवळ बाळगले. त्या दीडदमडीच्या मूर्तींची पूजा केली. पण त्या मूर्तींनी त्यांना काहीही मदत केली नाही.” 20 लोक स्वत:साठी खरा देव निर्माण करु शकतात का? नाही. ते फक्त मूर्ती तयार करु शकतात. पण त्या मूर्ती म्हणजे खरे देव नव्हेत. 21 परमेश्वर म्हणतो “म्हणून त्या मूर्ती बनविणाऱ्या लोकांना मी धडा शिकवीन. प्रथम मी त्यांना माझ्या शक्तीची व सामर्थ्याची जाणीव करुन देईन. मग त्यांना कळेल की मीच खरा देव, मीच खरा परमेश्वर आहे.”

17:1 “यहूदी लोकांची पापे, खोडता येणे शक्य नाही, अशा ठिकाणी लिहिली आहेत. ती लोखंडी लेखणीने दगडावर कोरली आहेत. हिरकणीचे टोक असलेल्या लेखणीने ती पाषाणावर कोरली आहेत. तो पाषाण म्हणजेच त्यांचे ह्दय होय. ती पापे वेदीच्या शिंगांवर कोरली आहेत. 2 खोट्या देवांना अर्पण केलेल्या त्या वेदी त्यांच्या मुलांना आठवतात. अशेरला अर्पण केलेले कालकडी खांब त्यांना आठवतात. टेकडीवरच्या व हिरव्या झाडाखालच्या त्या वस्तू त्यांना स्मरतात. 3 विस्तीर्ण प्रदेशातील डोंगरावरील त्या वस्तू त्यांना आठवतात यहूदी लोकांकडे बरीच संपत्ती आहे ती सर्व मी दुसऱ्या देशांना देईन. तुम्ही जेथे पूजाआर्चा करता आणि जे पाप आहे, अशी उच्च स्थाने दुसरे लोक नष्ट करतील. 4 मी तुम्हाला दिलेली भूमी तुम्ही गमवाल. मी तुमच्या शत्रूंना तुम्हाला गुलाम म्हणून अज्ञान भूमीत नेऊ देईन. का? कारण मी खूप संतापलो आहे. माझा संताप प्रखर अग्नीप्रमाणे आहे, त्यात तुम्ही कायमचे जळून भस्म व्हाल.” 5 परमेश्वर म्हणतो, “जे दुसऱ्या लोकांवर विश्वास ठेवतात, त्यांचे वाईट होईल. सामर्थ्यासाठी जे दुसऱ्यावर विसंबतात, त्याचे भले होणार नाही. का? कारण त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवणे सोडून दिले. 6 ते लोक वाळवंटातील झुडुपाप्रमाणे होत. निर्जन, उष्ण आणि कोरड्या व वाईट जमिनीवरील झुडुपाप्रमाणे ते आहेत. देव किती भले करु शकतो, ह्याची त्या झुडुपाला जाणीव नाही. 7 परंतु परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यावर कृपादृष्टी होईल. का? कारण परमेश्वर विश्वासास प्रात्र आहे, ह्याची देव त्याला प्रचिती देईल. 8 तो माणूस पाण्याजवळ असलेल्या वृक्षाप्रमाणे बळकट होईल. त्या झाडाची मुळे लांब असल्याने त्याला पाणी मिळतेच. उष्ण दिवसांचे त्याला भय नसते. त्याची पाने नेहमीच हिरवी असतात. एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही, तरी त्याला चिंता नसते. त्याला नेहमीच फळे धरतात. 9 “माणसाचे मन फार कपटी असते. त्याच्यावर काही औषध नाही. म्हणूनच कोणालाही मनाचे खरे आकलन होत नाही. 10 पण मी प्रत्यक्ष परमेश्वर असल्याने, मी माणसाच्या मनात डोकावू शकतो मी माणसाच्या मनाची परीक्षा घेऊ शकतो. प्रत्येकाला काय हवे ते मी ठरवू शकतो प्रत्येकाला त्याच्या कर्माचे योग्य फळ मी देऊ शकतो. 11 काही वेळा, एकादी पक्षीण स्वत: न घातलेले अंडे उबविते. धनासाठी जो माणूस फसवणूक करतो, तो ह्या पक्षिणी सारखाच असतो. अर्ध्या आयुष्यातच हा माणूस धन गमावेल. त्याच्या आयुष्याच्या सरत्या काळात तो दुष्ट म्हणून ओळखला जाईल.” 12 आरंभीपासून आमचे मंदिर म्हणजे देवासाठी एक भव्य आसन झाले आहे. ती महत्वाची वास्तू आहे. 13 परमेश्वरा, तू इस्राएलचे आशास्थान आहेस. तू पाण्याच्या जिवंत झऱ्याप्रमाणे आहेस. जो परमेश्वराला अनुसरणे सोडेल, त्याला लाजवले जाईल आणि त्याचे आयुष्य अल्प असेल. 14 परमेश्वरा, तू मला बरे केलेस, तर मी पूर्ण बरा होईन. तू मला वाचविलेस, तर मी खरोखच वाचेन. देवा, मी तुझी स्तुती करतो. 15 यहूदातील लोक मला सतत प्रश्र्न विचारतात. ते विचारतात, “यिर्मया, परमेश्वराच्या संदेशाचे काय? तो खरोखरीच खरा ठरतो का ते पाहू या.” 16 परमेश्वरा, मी तुला सोडून पळून गेलो नाही. मी तुला अनुसरलो. मी तुला पाहिजे तसा मेंढपाळ बनलो. तो भयंकर दिवस उजाडावा असे मला वाटत नव्हते. मी सांगितलेल्या गोष्टी परमेश्वरा तुला माहीतच आहेत. काय घडत आहे, ते तू पाहतोसच. 17 परमेश्वरा, माझा नाश करु नकोस. संकटकाळी, मला तुझा आधार वाटतो. 18 लोक मला त्रास देतात. त्यांना तू खजील कर. पण माझी निराशा करु नकोस. त्यांना धाक दाखव पण मला घाबरवू नकोस तो भयंकर अरिष्टाचा दिवस माझ्या शत्रूंवर आण आणि त्यांचा पुन्हा पुन्हा बिमोड कर. 19 परमेश्वराने मला पुढील गोष्टी सांगितल्या: “यिर्मया, यहूदाचे राजे यरुशलेमच्या ज्या प्रवेशद्वारातून ये - जा करतात, त्या लोकद्वारात जाऊन उभा राहा आणि लोकांना माझा सदेश सांग. मग यरुशलेमच्या इतर प्रवेशद्वारापाशी जाऊन हेच कर. 20 “त्या लोकांना सांग, ‘परमेश्वराचा संदेश ऐका. यहूदाच्या राजांनो आणि लोकांनो व यरुशलेमच्या प्रवेशद्वारांतून प्रवेश करणाऱ्या सर्वांनो, माझे ऐका.” 21 परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या आहेत: शब्बाथच्या दिवशी तुम्ही ओझे वाहणार नाही याची काळजी घ्या. त्या दिवशी, यरुशलेमच्या प्रवेशद्वारातून ओझी वाहून आणू नका. 22 त्या दिवशी, तुमच्या घरांतून ओझी बाहेर आणू नका. त्या दिवशी कोणतेही काम करु नका. तुम्ही शब्बाथचा दिवस एक पवित्र म्हणून पाळा. तुमच्या पूर्वजांना मी हीच आज्ञा केली होती. 23 पण त्यांनी ती पाळली नाही. त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. तुमचे पूर्वज हटवादी होते. मी त्यांना शिक्षा केली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यांनी माझे ऐकले नाही. 24 पण तुम्ही माझी आज्ञा पाळण्याची काळजी घ्या.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “शब्बाथच्या दिवशी, यरुशलेमच्या प्रदेशद्वारातून, तुम्ही ओझी आणता कामा नये; शब्बाथचे पावित्र्य राखा. कोणतेही काम न करता तुम्ही हे करु शकता. 25 “तुम्ही जर ही आज्ञा पाळलीत, तर दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे यरुशलेमच्या प्रदेशद्वारांतून येतील. ते रथांतून आणि घोड्यावरुन येतील. यहूदाचे आणि यरुशलेमचे नेते त्यांच्याबरोबर असतील. यरुशलेममध्ये लोक कायमचे वास्तव्य करतील. 26 यहूदाच्या शहरांतून लोक यरुशलेमला येतील, यरुशलेमच्या आजूबाजूच्या खेड्यातून, बन्यामीनच्या कुळातील लोक ज्या प्रदेशात राहतात,त्या प्रदेशातून, पश्र्चिमेच्या डोंगरपायथ्याच्या भागातून, डोंगराळ प्रदेशातून आणि नेगेवमधून लोक यरुशलेमला येतील, हे सर्व लोक होमार्पण, धान्यार्पण, धूप आणतील आणि कृतज्ञता व्यक्त करतील. ते हे सर्व परमेश्वराच्या मंदिरात आणतील. 27 “पण तुम्ही जर माझे ऐकले नाही अथवा माझी आज्ञा पाळली नाही, तर वाईट गोष्टी घडतील. जर तुम्ही शब्बाथच्या दिवशी ओझे वाहिले, तर तुम्ही त्या दिवसाचे पावित्र्य राखले नाही, असे होईल. मग कधींही विझू न शकणारी आग मी लावीन. यरुशलेमच्या प्रवेशद्वारापासून सुरु झालेली ही आग राजवाडे जाळेपर्यंत जळत राहील.”

18:1 हा संदेश यिर्मयाला परमेश्वराकडून आलेला आहे: 2 “यिर्मया, कुंभाराच्या घरी जा. मी तेथे तुला माझा संदेश देईन.” 3 म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो, मी त्याला चाकावर चिखल ठेवून काम करताना पाहिले. 4 तो चिखलापासून भांडे बनवीत होता. पण त्यात काहीतरी चुकले म्हणून कुंभाराने त्याच चिखलाचा उपयोग करुन दुसरे भांडे बनविले. आपल्या हाताने त्याला पाहिजे तसा आकार दिला. 5 मग मला परमेश्वराचा संदेश मिळाला: 6 “इस्राएलच्या कुंटुंबीयांनो, मी (देव) अगदी असेच तुमच्या बाबतीत करु शकतो. तुम्ही जणू काही कुंभाराच्या हातातील चिखल आहात आणि मी कुंभार आहे. 7 मी राष्ट्र व राज्य ह्याबद्दल बोलण्याची वेळ येण्याचा संभव आहे. मी कदाचित् त्या राष्ट्राला वर ओढीन असे म्हणेन वा त्या राष्ट्रांला खाली खेचून त्या राष्ट्राचा वा राज्याचा नाश करीन असेही म्हणेन. 8 पण त्या राष्ट्रातील लोकांचे हृदयपरिवर्तन झाल्यास ते जगतील. त्या राष्ट्रातील लोक दुष्कृत्ये करण्याचे कदाचित थांबवतील. मग माझे मतपरिवर्तन होईल. त्या राष्ट्राचा नाश करण्याचा बेत मी अंमलात आणणार नाही. 9 मी राष्ट्राबद्दल बोलण्याची आणखी एकदा वेळ, कदाचित् येईल. मी ते राष्ट्र उभारीन आणि वसवेन असे मी म्हणेन. 10 पण ते राष्ट्र पापे करीत आहे आणि माझी आज्ञा पाळत नाही, असेही मला दिसण्याचा संभव आहे. मग मात्र त्या राष्ट्राच्या भल्यासाठी योजलेल्या योजनांचा मला फेरविचार करावा लागले. 11 “म्हणून, यिर्मया, यरुशलेम आणि यहूदा येथे राहणाऱ्या लोकांना सांग की परमेश्वर असे म्हणतो: ‘आताच्या आता तुमच्यावर संकटे आणण्याची मी तयारी करीत आहे. मी तुमच्याविरुद्ध बेत आखत आहे. तेव्हा तुम्ही पापे करण्याचे थांबवा. प्रत्येकाने बदलावे व सत्कृत्ये करावीत.” 12 पण यहूदातील लोक म्हणतील, ‘असा प्रयत्न करुन काही भले होणार नाही. आम्हाला पाहिजे तेच आम्ही करीत राहू आमच्यातील प्रत्येकाच्या हट्ठी आणि दुष्ट मनाला वाटेल तेच आम्ही करु.” 13 परमेश्वर सांगत असलेल्या गोष्टी ऐका: “दुसऱ्या राष्ट्रांना हा प्रश्न विचारा. ‘इस्राएलने केलेल्या पापाप्रमाणे, पापे आणखी कोणी केल्याचे तुम्ही ऐकले आहे का?’ आणि इस्राएल तर देवाच्या दृष्टीने विशेष आहे. ती देवाच्या वधूप्रमाणे आहे. 14 तुम्हाला हेही माहीत आहे की लबानोनमधील पर्वतांवरचे बर्फ कधीच वितळत नाही व थंड व सतत वाहणारे झरे कधीच सुकत नाहीत. 15 पण माझे लोक मला विसरले आहेत. ते कवडी मोलाच्या मूर्तींना वस्तू अर्पण करतात. ते जे काय करतात, त्यालाच अडखळतात त्यांच्या पूर्वजांच्या जुन्या रस्त्यांपाशी ते अडखळतात माझी माणसे, माझ्यामागून चांगल्या मार्गाने येण्याऐवजी, आडवळणाने व वाईट मार्गाने जाणे पसंत करतील. 16 म्हणून यहूदाचा देश म्हणजे एक निर्जन वाळवंट होईल. ह्या देशाच्या जवळून जाताना, प्रत्येकवेळी लोक धक्क्याने मान हलवून नि:श्वास सोडतील. ह्या देशाचा, अशा रीतीने, नाश झालेला पाहून त्यांना धक्का बसेल. 17 मी यहूदाच्या लोकांची फाटाफूट करीन. ते त्यांच्या शत्रूंपासून पळ काढतील. पूर्वेकडचा वारा ज्याप्रमाणे सर्व वस्तू दूर उडवून देतो, त्याप्रमाणे मी यहूदातील लोकांना दूर पसरवून देईन. मी त्या लोकांचा नाश करीन. मी त्यांच्या मदतीला येत आहे, असे त्यांना दिसण्याऐवजी, मी त्यांना सोडून जाताना दिसेन.” 18 नंतर यिर्मयाचे शत्रू म्हणाले, “या आपण यिर्मयाविरुध्द कट करु या. नियमांची शिकवण याजकंाकडून नक्कीच विसरली जाणार नाही. सुज्ञांचा सल्ला अजूनही आमच्याजवळ असेल. आमच्यापाशी संदेष्ट्याचे शब्द असतील. म्हणून त्याच्याबद्दल खोटे सांगू या. त्यामुळे त्याचा नाश होईल. तो सांगत असलेल्या कोणत्याही गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचे नाही.” 19 परमेश्वरा, माझे ऐक! माझे म्हणणे ऐकून घे आणि कोण बरोबर आहे ते ठरव. 20 चांगल्याची परतफेड लोकांनी दुष्टाव्याने करावी का? नाही! देवा, मी केलेल्या गोष्टी तुला आठवतात का? मी तुझ्यासमोर उभा राहिलो आणि ह्या लोकांना तू शिक्षा करु नये म्हणून त्यांच्याविषयी चांगल्या गोष्टी मी तुला सांगितल्या. पण ते मला सापळ्यात पकडून ठार मारायला बघत आहेत. 21 म्हणून दुष्काळात त्यांच्या मुलांची उपासमार होऊ देत. त्यांचे शत्रू तलवारीने त्यांचा पराभव करु देत. त्यांच्या बायका वांझ होऊ देत. यहूदातील पुरुषांना मृत्यू येऊ देत. त्यांच्या बायकांना विधवा कर युद्धात तेथील तरुण मारले जाऊ देत. 22 त्यांच्या घरांत शोककळा पसरु देत. शत्रूला, अचानक, त्यांच्यावर आक्रमण करायला लावून त्यांना रडव. माझ्या शत्रूंनी मला सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला, म्हणून हे सर्व घडू देत. मी सापळ्यात अडकावे म्हणून त्यांनी आपला सापळा लपवून ठेवला आहे. 23 परमेश्वरा, मला मारण्यासाठी त्यांनी रचलेले बेत तुला माहीत आहेतच. त्यांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करु नकोस. त्यांची पापे पुसून टाकू नकोस. माझ्या शत्रूंचा नाश कर. तू रागावला असतानाच त्या लोकांना शिक्षा कर.

19:1 परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, जा आणि कुंभारकडून एक मातीचे मडके विकत घे. 2 खापराच्या प्रवेशद्वाराजवळच्या बेन हिन्नोनच्या दरीकडे जा. काही वडीलधाऱ्यांना नेत्यांना आणि याजकांना तुझ्या बरोबर घे. मी तुला सांगतो त्या गोष्टी तेथे तू त्यांना सांग. 3 तुझ्याबरोबर असलेल्या लोकांना सांग, ‘यहूदाच्या राजांनो आणि यरुशलेमच्या लोकांनो, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐका. सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएल लोकांचा देव म्हणतो, “मी ह्या ठिकाणी लवकरच काहीतरी भयंकर घडवून आणि हे ऐकणारा प्रत्येकजण विस्मत होईल व घाबरुन जाईल. 4 यहूदातील लोकांनी मला अनुसरायचे सोडल्यामुळे मी हे घडवून आणीन. त्यांनी ही जागा परक्या दैवतांना दिली. त्यांनी येथे दुसऱ्या दैवतांना होमबली अर्पण केले. पूर्वी हे लोक त्या दैवतांना पूजत नव्हते. त्यांच्या पूर्वजांनीही ह्या दैवतांची पूजा केली नाही. हे दुसऱ्या देशातून आलेले दैवते आहेत. यहूदाच्या राजाने हे ठिकाण अश्राप बआलकांच्या रक्ताने भिजवून टाकले आहे. 5 यहूदाच्या राजाने बआल दैवतासाठी उच्चासने बांधली. लोक ह्या जागांचा उपयोग आपल्या मुलांना अग्नीत जाळण्यासाठी करतात. बआल दैवताला होमबली अर्पण केल्याप्रमाणे ते आपली मुले जाळतात. मी त्यांना असे करायला सांगितलेले नाही. मी तुमच्याजवळ तुमच्या मुलांचे बळी मागितलेले नाहीत. अशा कधीही माझ्या मनातही आल्या नाहीत. 6 हल्ली हिन्नोनच्या दरीला तोफेत म्हणतात. पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की अशी वेळ येईल की, हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे, त्या वेळी ह्या दरीला लोक कत्तलीची दरी म्हणून ओळखतील. 7 येथेच मी यहूदातील व यरुशलेममधील रचलेले बेत हाणून पाडीन. त्या लोकांचा शत्रू पाठलाग करतील. मी ह्या ठिकाणी यहूदातील लोकांना तलवारीच्या घावांनी मरु देईन. त्यांची प्रेते गिधाडे व वन्य पशू ह्यांचे भक्ष्य होईल. 8 ह्या नगरीचा मी पूर्णपणे नाश करीन. यरुशलेम जवळून जाताना लोक निराशेने माना हलवतील व सुस्कारे सोडतील अशा तऱ्हेने नगरीचा नाश झालेला पाहून त्यांना धक्का बसेल. 9 नगरीला शत्रूसैन्याचा वेढा पडेल. ते सैन्य नगरीची रसद तोडेल. मग नगरीतील लोकांची उपासमार सुरु होईल. लोकांना एवढी भूक लागेल की ते स्वत:च्याच मुलांना खातील आणि एकमेकांना खायला लागतील.’ 10 “यिर्मया, ह्या गोष्टी तू लोकांना सांग आणि लोक पाहत असतानाच हे मडके फोड. 11 त्या वेळी पुढील गोष्टी सांग: सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, ‘कोणीतरी मातीचे मडके फोडावे त्याप्रमाणे मी यहूदा व यरुशलेमला फोडीन; हे मडके परत जोडता येणार नाही. यहूदाच्या बाबतही असेच होईल. तोफेतमध्ये इतक्या मृतांना पुरण्यात येईल की आणखी प्रेतांना पुरण्यास तेथे जागाच राहणार नाही. 12 मी हे ह्या लोकांच्या बाबतीत ह्याच जागेवर घडवून आणीन. मी ह्या नगरीला तोफेतप्रमाणे करीन.’ हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. 13 ‘यरुशलेममधील घरे तोफेतप्रमाणे अपवित्र होतील. राजांचे राजवाडे पण तोफेतप्रमाणेच होतील. का? कारण लोकांनी त्या घराच्या छपरांवर खोट्या देवांची पूजा केली. त्यांनी ताऱ्यांना पूजले आणि त्यांच्याबद्दल आदर दाखविण्यासाठी हवी अर्पण केले. दैवतांना त्यांनी पेयेही अर्पण केली.” 14 परमेश्वराने यिर्मयाला ज्या जागी प्रवचन देण्यास सांगितले होते ती जागा म्हणजे तोफेत यिर्मयाने सोडली. तो मग परमेश्वराच्या मंदिराकडे गेला आणि मंदिराच्या प्रांगणात उभा राहिला. यिर्मया सर्व लोकांना म्हणाला, 15 “सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव काय म्हणतो पाहा: ‘मी यरुशलेमवर आणि त्याच्या आजूबाजूच्या खेड्यांवर खूप अरिष्टे आणीन. लवकरच मी हे घडवून आणीन. का? कारण लोक फार हट्टी झाले आहेत. ते माझे ऐकत नाहीत आणि माझ्या आज्ञा पाळण्याचे नाकारतात.”

20:1 पशहूर नावाचा एक याजक होता. परमेश्वराच्या मंदिरातील तो मुख्य अधिकारी होता. तो इम्मेरचा मुलगा होता. यिर्मयाने मंदिराच्या प्रांगणात केलेल्या भविष्यकथनात, ज्या सर्व गोष्टी सांगितल्या, त्या पशहूरने ऐकल्या. 2 म्हणून त्यांने यिर्मया या संदेष्ट्याला मारले व लाकडाच्या मोठ्या ठोकळ्यात त्याचे हातपाय अडकविले. मंदिराच्या वरच्या प्रवेशद्वाराजवळ बन्यामीनच्या प्रवेशद्वाराजवळ हे घडले. 3 दुसऱ्या दिवशी पशहूरने यिर्मयाला खोड्यातून मोकळे केले, तेव्हा यिर्मया पशहूरला म्हणाला, “तुझे परमेश्वराने ठेवलेले नाव पशहूर नाही, तर ‘प्रत्येक बाजूला भय’ असे आहे. 4 हेच तुझे नाव कारण परमेश्वर म्हणतो, ‘मी तुलाच तुझे भय करीन तुझ्या सर्व मित्रांना तू भीतिदायक होशील. तुझ्या मित्रांना शत्रू तलवारीने मारताना पाहशील. मी यहूदातील सर्व माणसांना बाबेलच्या राजाच्या स्वाधीन करीन. तो त्यांना बाबेल देशात घेऊन जाईल आणि त्याचे सैन्य त्यांना तलवारीने कापून काढील. 5 यरुशलेमच्या लोकांनी खूप कष्ट करुन वस्तू गोळा केल्या आणि ते श्रीमंत झाले. पण मी त्यांच्या सर्व गोष्टी शत्रूला देईन. यरुशलेमच्या राजाकडे पुष्कळ संपत्ती आहे. पण ती सर्व संपत्ती मी शत्रूला देईन. शत्रू ती सर्व संपत्ती बाबेल देशात नेईल. 6 पशहूर, तुला आणि तुझ्या घरातील सर्व लोकांना घरातून नेले जाईल. तुम्हाला जबरदस्तीने नेले जाईल. तुम्हाला बाबेल देशात राहावे लागेल. तू तेथेच मरशील आणि त्या परक्या देशातच तुला पुरतील. तू तुझ्या प्रवचनात खोट्या गोष्टी सांगितल्यास. ह्या गोष्टी घडणार नाहीत. असे खोटे सांगितलेस. तुझे सर्व मित्रही बाबेलमध्येच मरतील आणि त्यांना तिथेच पुरले जाईल.” 7 परमेश्वरा, तू मला मोहित केलेस आणि मी पण मोहित झालोतू माझ्यापेक्षा समर्थ असल्याने तू जिंकलास मी हास्यास्पद ठरलो. लोक माझ्याकडे पाहून हसतात आणि माझी चेष्टा करतात. 8 प्रत्येक वेळी मी बोलतो, ओरडतो मी हिंसा आणि विध्वंस ह्याबद्दल आरडाओरड करतो. मी मला परमेश्राकडून आलेला संदेश लोकांना सांगतो. पण लोक माझा फक्त अपमान करतात आणि माझी चेष्टा करतात. 9 कधी कधी मी स्वत:शीच म्हणतो, “मी परमेश्वराला विसरुन जाईन. मी परमेश्वराच्यायावतीने ह्यापुढे बोलणार नाही.” पण मी असे म्हणताच परमेश्वराचा संदेश माझ्या मनात अग्नीप्रमाणे दाह निर्माण करतो. त्या वेळी, माझ्या हाडांच्या आत आत काही जळत आहे, असे मला वाटते. मी परमेश्वराचा संदेश माझ्या मनात फार वेळ दाबून ठेवू शकत नाही आणि शेवटी तो मनात ठेवणे मला अशक्य होते. 10 लोक माझ्याबद्दल कुजबुजताना मी ऐकतो. सगळीकडून ज्या गोष्टी मी ऐकतो, त्याने मी घाबरतो इतकेच नाही, तर माझे मित्रही माझ्याविरुद्ध बोलतात. मी काहीतरी चूक करावी म्हणून लोक वाट पाहात आहेत. ते म्हणत आहेत, “आपण खोटे बोलू या आणि त्याने वाईट कृत्य केल्याचे सांगू या. यिर्मयाला फसविणे कदाचित् शक्य आहे. मग तो आपल्या हातात सापडेल व आपली त्याच्यापासून सुटका होईल. मग आपण त्याला पकडू आणि सूड घेऊ.” 11 पण परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. परमेश्वर बलवान सैनिकाप्रमाणे आहे. म्हणून माझा पाठलाग करणारे पडतील. ते माझा पराभव करु शकणार नाहीत. ते पडतील, त्यांची निराश होईल. त्यांची नामुष्की होईल आणि ही त्यांची नामुष्की इतर लोक कधीही विसरणार नाहीत. 12 सर्व शक्तिमान परमेश्वरा तू चांगल्या लोकांची परीक्षा घेतोस. तू माणसाच्या मनात खोलवर पाहतोस. मी त्या लोकांविरुद्धचे माझे मुद्दे तुला सांगितले. मग आता तू त्यांना योग्य शिक्षा करताना मला पाहायला मिळू देत. 13 परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वर गरिबांचे रक्षण करतो. तो दुष्टापासून त्यांना वाचवितो. 14 माझ्या जन्मदिवसाला शाप द्या. ज्या दिवशी मी आईच्या पोटी जन्माला आलो, त्या दिवसाला शुभ मानू नका. 15 माझ्या जन्माची बातमी माझ्या वडिलाना देणाऱ्या माणसाला शाप द्या. “तुम्हाला मुलगा झाला” असे त्याने सांगताच माझ्या वडिलांना खूप आनंद झाला. 16 परमेश्वराने नगरांचा जसा नाश केला,तसाच त्या माणसांचाही होवो. परमेश्वराला त्या नगरांबद्दल अजिबात दया नाही. त्या माणसाला सकाळ दुपार युद्धाचा गदारोळ ऐकू येऊ देत. 17 का? कारण त्या माणसाने, मी आईच्या पोटात असतानाच, मला मारले नाही. त्याने मला मारले असते, तर आईच माझी कबर झाली असती व माझा जन्मच झाला नसता. 18 मी कशाला जन्मलो? मी फक्त क्लेश व दु:ख पाहिले आणि माझे जीवन नामुष्कीत संपणार.

21:1 यहूदाचा राजा सिद्कीया याने पशूहरला आणि सफन्या नावाच्या याजकाला यिर्मयाकडे पाठविले. त्याच वेळी यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. पशहूर हा मल्कीयाचा मुलगा होता, तर सफन्या मासेचा मुलगा होता. पशहूर व सफन्या ह्यांनी यिर्मयासाठी निरोप आणला. 2 पशहूर आणि सफन्या यिर्मयाला म्हणाले, “आमच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना कर. काय घडणार आहेत ते परमेश्वराला विचार. कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्यावर स्वारी करीत आहे, म्हणून आम्हाला भविष्यात काय घडणार हे जाणून घ्यायचे आहे. कदाचित् परमेश्वर पूर्वीप्रमाणे काही विस्मयकारक घटना घडवून आणील. कदाचित् परमेश्वर नबुखद्नेस्सरला स्वारी करण्यापासून परावृत्त करील व परतवून लावेल.” 3 नंतर पशूहर व सफन्या यांना यिर्मया म्हणाला, “सिद्कीया राजाला सांगा, 4 परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो “तुमच्याजवळ युद्धोपयोगी शस्त्रे आहेत. तुम्ही त्याचा उपयोग बाबेलचा राजा व खास्दी यांच्यापासून तुमचे रक्षण करण्यासाठी करीत आहात. मी ती शस्त्रे निरुपयोगी करीन.“बाबेलचे सैन्य नगरीच्या तटबंदीबाहेर सगळीकडे पसरले आहे. लवकरच त्या सैन्याला मी यरुशलेममध्ये आणीन. 5 मी स्वत: यहूदाच्या लोकांविरुद्ध म्हणजे तुमच्याविरुद्ध लढेन. मी माझ्या सामर्थ्यवान हाताने तुमच्याशी युद्ध करीन. कारण मी तुमच्यावर फार रागावलो आहे. मी तुमच्याविरुद्ध जोरदार युद्ध करुन माझ्या तुमच्यावरील रागाची तीव्रता सिद्ध करीन. 6 यरुशलेममध्ये राहाणाऱ्या लोकांना मी ठार मारीन. सर्व शहरात रोगराई पसरवून मी माणसांना व प्राण्यांना मारीन. 7 असे घडल्यावर,” हा परमेश्वराचा संदेश आहे, ‘मी यहूदाचा राजा सिद्कीया याला, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या स्वाधीन करीन. मी सिद्कीयाच्या अधिकाऱ्यानासुद्धा नबुखदनेस्सरच्या हवाली करीन. यरुशलेममधील काही लोक भयंकर रोगराई अथवा लढाई वा उपासमार याने मरणार नाहीत. पण त्या सर्वांना मी नबुखद्नेस्सरच्या ताब्यात देईन. मी यहूदाच्या शत्रूला विजयी करीन. नबुखद्नेस्सरच्या सैन्याला यहूदातील लोकांना ठार मारायचे आहे म्हणून यहूदातील व यरुशलेममधील लोक तलवरीच्या घावाने मारले जातील. नबुखद्नेस्सर त्या लोकांना अजिबात दया दाखविणार नाही व त्यांच्याबद्दल त्याला दु:खही वाटणार नाही.’ 8 “यरुशलेममधील लोकांना असेही सांग, असे म्हणून परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या, ‘मी तुम्हाला जीवन मरण ह्यात निवड करण्याचे स्वातंत्र्य देईन. मी काय म्हणतो ते समजावून घ्या. 9 जो यरुशलेममध्ये राहील तो लढाईत, उपासमारीने वा भयंकर रोगराईने मरेल, पण जो कोणी यरुशलेमच्या बाहेर जाऊन बाबेलच्या सैन्याला शरण जाईल, तो जागेल. त्या सैन्याने नगरीला वेढा घातला आहे म्हणून नगरीला रसद मिळू शकत नाही. पण जो कोणी नगर सोडून जाईल, त्याचा जीव वाचेल. 10 यरुशलेम नगरीवर संकट आणण्याचे मी ठरविले आहे. मी तिला मदत करणार नाही.” हा परमेश्वराचा संदेश आहे, “मी बाबेलच्या राजाला यरुशलेम देऊन टाकीन. तो ती आगीत भस्मसात करील.’ 11 यहूदाच्या राजघराण्याला हे सांगा: परमेश्वराकडून आलेला संदेश ऐका. 12 दावीदाच्या घराण्यातील लोकानो, परमेश्वर असे म्हणतो, ‘तुम्ही दररोज न्याय्यपणे लोकांचा निवाडा केला पाहिजे. गुन्हेगारांपासून बळींचे रक्षण करा. तुम्ही असे केले नाही, तर मी खूप रागावेन. माझा राग, कोणीही विझवू न शकणाऱ्या अग्नीप्रमाणे असेल. तुम्ही दुष्कृत्ये केली म्हणून असे होईल.’ 13 यरुशलेम, मी तुझ्याविरुद्ध आहे. तू डोंगराच्या शिखरावर बसतेस. तू ह्या दरीच्यावर राणीप्रमाणे बसतेस. तुम्ही, यरुशलेममध्ये राहणारे लोक म्हणता, ‘कोणीही आमच्यावर हल्ला करु शकणार नाही. कोणीही आमच्या भक्कम नगरीत येणार नाही.’ पण परमेश्वराकडून आलेला हा संदेश ऐका: 14 “तुम्हाला योग्य अशी शिक्षा मिळेल. तुमच्या रानास मी आग लावेन ती आग तुमच्याभोवतीचे सर्व काही जाळून टाकील.”‘

22:1 परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, राजवाड्यात जा आणि यहूदाच्या राजाला हा संदेश आवर्जून सांग: 2 ‘यहुदाच्या राजा, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐक. तू दावीदच्या सिंहासनावर बसून राज्य करतोस म्हणून हे ऐक, राजा, तू आणि तुझ्या अधिकाऱ्यांनी माझे म्हणणे ऐकलेच पाहिजे. यरुशलेमच्या प्रवेशद्वारावरुन जाणाऱ्या सर्व लोकांनी माझा संदेश ऐकलाच पाहिजे. 3 परमेश्वर म्हणतो, “फक्त योग्य व न्याय्य गोष्टीच करा. लुटल्या जात असलेल्या लोकांचे लुटारुपासून रक्षण करा. अनाथ मुलाशी अथवा विधवांशी वाईट वागू नका अथवा त्यांना दुखवू नका. निरपराध्यांना मारु नका. 4 तुम्ही माझ्या ह्या आज्ञा पाळल्यात, तर काय होईल? दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे यरुशलेममध्ये, त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर व लोकांबरोबर, रथांतून आणि घोड्यावर स्वार होऊन आत येत राहतील. 5 पण जर तुम्ही आज्ञा पाळल्या नाहीत, तर परमेश्वर काय म्हणतो पाहा, मी, परमेश्वर, वचन देतो की राजवाड्याचा नाश होऊन येथे दगडविटांचा ढिगारा होईल.” 6 यहूदाचा राजा राहत असलेल्या राजावाड्याबद्दल परमेश्वराने पुढील उद्गार काढले.“गिलादच्या जंगलाप्रमाणे वा लबानोनच्या पर्वताप्रमाणे राजवाडा उंच आहे. पण ती त्याला वाळवंटाप्रमाणे करीन. निर्जन शहराप्रमाणे तो ओसाड होईल. 7 मी राजवाड्याचा नाश करण्यास माणसे पाठवीन. त्या प्रत्येकाच्या हातात शस्त्र असेल. त्यांचा उपयोग ते राजवाडा नष्ट करण्यासाठी करतील. ही माणसे, गंधसरुपासून बनविलेल्या भक्कम व सुंदर तुळया कापून जाळून टाकतील. 8 “अनेक राष्ट्रांतील लोक या नगरीजवळून जाताना एकमेकांना विचारतील ‘यरुशलेम ह्या भव्य नगरीच्या बाबतीत परमेश्वराने असे भयंकर कृत्य का केले?’ 9 ह्या प्रश्र्नाचे उत्तर पुढीलप्रमाणे असेल: ‘यहूदातील लोक परमेश्वर देवाबरोबर झालेल्या कराराप्रमाणे वागले नाहीत. त्यांनी अन्य दैवतांना पूजले आणि त्यांची सेवा केली, म्हणून देवाने यरुशलेमचा नाश केला.” 10 मेलेल्या राजाकरितारडू नका. त्याच्यासाठी शोक करु नका. पण हे ठिकाण सोडून जावे लागणाऱ्या राजासाठी मात्र मोठ्याने रडाकारण तो परत येणार नाही. यहोआहाज त्याची जन्मभूमी पुन्हा कधीही पाहणार नाही. 11 योशीयाचा मुलगा शल्लूम (यहोआहाज) ह्याच्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो: (राजा योशीया यांच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शल्लूम यहूदाचा राजा झाला) “यहोआहाज यरुशलेम सोडून दूर गेला आहे. तो पुन्हा यरुशलेममध्ये येणार नाही. 12 मिसरच्या लोकांनी यहोआहाजला पकडून नेले आहे. तो तेथेच मरेल. त्याला परत ही भूमी दिसणार नाही.” 13 राजा यहोयाकीमचे वाईट होईल. तो वाईट गोष्टी करीत आहे. आपला महाल तो बांधू शकेल. लोकांना फसवून त्यावर माड्या चढवू शकेल. तो लोकांना काहीही न देता त्यांच्याकडून काम करवून घेतो, त्यांना कामाची मजुरी देत नाही. 14 यहोयाकीम म्हणतो, “मी माझ्यासाठी मोठा वाडा बांधीन. त्याला खूप मोठे मजले असतील.” तो मोठ्या खिडक्या असलेले घर बांधतो. तो तक्तपोशीसाठी गंधसरु वापरतो आणि तक्तपोशीला लाल रंग देतो. 15 यहोयाकीम, तुझ्या घरात खूप गंधसरु आहे म्हणून त्यामुळे काही तू मोठा राजा होत नाहीस. तुझे वडील योशीया अन्नपाण्यावरच समाधानी होते. त्यांनी फक्त योग्य व न्याय्य गोष्टीच केल्या. त्यांच्या ह्या कृत्यांमुळे त्यांच्याबाबतीत सर्व सुरळीत झाले. 16 योशीयाने गरीब व गरजू अशा लोकांना मदत केली. त्यामुळे त्यांचे सर्व व्यवस्थित झाले. यहोयाकीम, ‘देवाला ओळखणे ह्याचा अर्थ काय?’ ह्याचा अर्थ योग्य रीतीने जगणे व न्यायीपणाने वागणे. मला ओळखणे ह्याचा अर्थ हाच होय. हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. 17 यहोयाकीम, तुला फक्त तुझा फायदाच दिसतो. तू तुझ्यासाठी जास्तीत जास्त मिळविण्याचाच फक्त विचार करतोस. निरापराध्यांना ठार मारण्यात व दुसऱ्याकडून वस्तू चोरण्यातच तुझे मन जडले असते. 18 योशीयाचा मुलगा राजा यहोयाकीम ह्यास परमेश्वर असे म्हणतो की “यहोयाकीमसाठी यहूदातील लोक राहणार नाहीत. ‘हे माझ्या बंधू, मला यहोयाकीमबद्दल वाईट वाटते.’ असे ते एकमेकांना म्हणणार नाहीत. यहोयाकीमबद्दल ते शोक करणार नाहीत. “हे स्वामी! हे राजा! मला खूप वाईट वाटते! मला खूप दु:ख होते!’ असे ते म्हणणार नाहीत. 19 एखाद्या गाढवाला पुरावे तसे यरुशलेममधील लोक यहोयाकीमचे दफन करतील. ते त्याचा मृत देह फरपटत नेऊन यरुशलेमच्या वेशीबाहेर फेकून देतील. 20 “यहूदा, लबानोनच्या डोंगरावर जाऊन मोठ्याने ओरड. बाशानच्या डोंगरात तुझा आवाज ऐकू जाऊ देत. अबारीमच्या डोंगरात तुझा आवाज ऐकू जाऊ देत. अबारीमच्या डोंगरात जाऊन मोठ्याने ओरड. का? कारण तुझ्या सर्व “प्रियकराचा’ नाश केला जाईल. 21 “यहूदा, तुला सुरक्षित वाटले. पण मी तुला इशारा दिला होता. पण तू माझे ऐकण्याचे नाकारलेस. तू तरुण असल्यापासून अशीच वागत आलीस. तू तरुण असल्यापासून माझ्या आज्ञा पाळल्या नाहीस, यहूदा! 22 म्हणून मी दिलेली शिक्षा झंझावाताप्रमाणे येईल. ती तुझ्या सर्व मेंढपाळांना लांब उडवून देईल. तुला वाटले की दुसरी राष्ट्रे तुला मदत करतील. पण त्या राष्ट्रांचाही पराभव होईल. मग खरोखरच तू निराश होशील. तू केलेल्या वाईट गोष्टींची तुला लाज वाटेल. 23 “राजा, तू तुझ्या उंच डोंगरावरच्या गंधसरुच्या लाकडापासून बनविलेल्या वाड्यात राहतोस! म्हणजेच जणू काही जेथून हे लाकूड येते त्या लबानोनमध्येच राहतोस तुला वाटते की तू सुरक्षित आहेस! कारण तू उंच डोंगरावर मोठ्या घरात राहतोस पण तुला शिक्षा झाल्यावर तू खरोखर विव्हळशील. तुला प्रसूतिवेदनांप्रमाणे वेदना होतील.” 24 “मी निश्र्चितपणे आहे म्हणूनच हे तुझ्याबाबत घडेल” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे, “यहोयाकीन, यहोयाकीमच्या मुला, यहूदाच्या राजा, जरी तू माझ्या उजव्या हातातील मुद्रा असलास, तरीही मी तुला उखडून टाकले असते. तुझ्याबाबतीत असेच घडेल. 25 यहोयाकीन, मी तुला बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व खास्दी लोक ह्यांच्या हवाली करीन. तू त्या लोकांना घाबरतोस. ते तुला ठार मारु इच्छितात. 26 तुझी व तुझ्या आईची जन्मभूमी नसलेल्या देशात, मी, तुला व तुझ्या आईला फेकून देईन. तेथेच तुम्ही दोघे मराल. 27 यहोयाकीन, तू ह्या भूमीत परत यायला बघशील. पण तुला येथे परत येऊ दिले जाणार नाही.” 28 कोणीतरी फेकून दिलेल्या, फुटक्या भांड्याप्रमाणे कोन्या (यहोयाकीन) आहे. कोणालाही नको असलेल्या भांड्याप्रमाणे तो आहे. यहोयाकीन व त्याची मुले ह्यांना बाहेर का फेकले जाईल? परक्या देशात त्यांना का फेकून देण्यात येईल? 29 यहूदाच्या हे भूमी, भूमी, भूमी, परमेश्वराचा संदेश ऐक! 30 परमेश्वर म्हणतो, “यहोयाकीनबद्दल हे लिहून घे. तो नि:संतान आहे, ‘तो त्याच्या आयुष्यात यशस्वी होणार नाही. त्याचा कोणताही मुलगा दावीदच्या सिंहासनावर बसणार नाही कोणताही मुलगा यहूदावर राज्य करणार नाही.”

23:1 “यहूदातील लोकांच्या मेंढपाळांचे (नेत्यांचे) वाईट होईल, ते मेंढ्यांचा नाश करीत आहेत. ते माझ्या कुरणातून त्यांना चहूबाजूना पळवून लावीत आहेत.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. 2 ते मेंढपाळ (नेते) माझ्या लोकांना जबाबदार आहेत, आणि परमेश्वर, इस्राएलचा देव त्या मेंढपाळांना पुढील गोष्टी सागंतो “तुम्ही मेंढपाळांनी (नेत्यांनी) माझ्या मेंढ्यांना चारी दिशांना पळून जाण्यात भाग पाडले आहे. त्यांना तुम्ही जबरदस्तीने लांब जायला लावले. तुम्ही त्यांची काळजी घेतली नाही. पण मी तुमची काळजी घेईन. मी तुम्हाला तुमच्या वाईट कृत्यांबद्दल शिक्षा करीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. 3 “मी माझ्या मेंढ्या (लोक) दुसऱ्या देशांत पाठविल्या पण ज्या मेंढ्या (लोक दुसऱ्या देशात गेल्या आहेत, त्यांना मी गोळा करीन. मी त्यांना त्यांच्या कुरणात परत आणीन. त्या मेंढ्या (लोक) त्यांच्या कुरणात (देशात) परत आल्यावर, त्यांना पुष्कळ संतती होऊन त्यांची संख्या वाढेल. 4 मी माझ्या मेंढ्यांसाठी नवीन मेंढपाळ (नेते) नेमीन. ते मेंढपाळ (नेते) माझ्या मेंढ्यांची (लोकांची) काळजी घेतील व माझ्या मेंढ्या (लोक) घाबरणार नाहीत वा भयभीत होणार नाहीत. माझी एकही मेंढी (माणूस) हरवणार नाही.” हा परमेश्वरातडून आलेला संदेश आहे. 5 हा परमेश्वराचा संदेश आहे. “मी चांगला अंकुर निर्माण करण्याची वेळ येत आहे.” तो चांगला अंकुर सुज्ञपणे राज्य करणारा राजा असेल. देशात योग्य व न्याय्य गोष्टी तो करेल. 6 त्या चांगल्या ‘अंकुराच्या’ काळात यहूदातील लोक वाचतील आणि इस्राएल सुरक्षित राहील. त्याचे नाव असेल परमेश्वर आमचा चांगुलपणा. 7 “चिरंजीव असणाऱ्या, एकमेव असणाऱ्या परमेश्वराने इस्राएलच्या लोकांना मिसर देशातून बाहेर आणले’ हे जुने वचन लोक पुन्हा उच्चारणार नाहीत, असे दिवस येत आहेत.” हा परमेश्वराचा संदेश आहे. 8 पण लोक काही नवीनच बोलतील. ‘परमेश्वर चिरंजीव आहे परमेश्वर एकमेव आहे. त्याने इस्राएलच्या लोकांना उत्तरेकडील देशातून बाहेर आणले. त्याने त्या लोकांना ज्या ज्या देशात पाठविले होते, त्या त्या देशांतून बाहेर आणले.’ मग इस्राएलचे लोक त्यांच्या स्वत:च्या देशात राहतील.” 9 संदेष्ट्यांना संदेश: मी फार दु:खी आहे. माझे हृदय विदीर्ण झाले आहे. माझी सर्व हाडे धरधरत आहेत. माझी (यिर्मयाची) स्थिती मद्यप्यासारखी झाली आहे. का? परमेश्वरामुळे व त्याच्या पवित्र शब्दांमुळे. 10 व्यभिचाराचे पाप केलेल्या लोकांनी यहूदा भरुन गेला आहे. लोकांनी अनेक मार्गांनी निष्ठेचा त्याग केला आहे. परमेश्वराने शाप दिला आणि ही भूमी ओसाड झाली. कुरणातील हिरवळ वाळून मरत आहे. शेते वाळवंटाप्रमाणे झाली आहेत. संदेष्टे दुष्ट आहेत ते त्यांचे बळ (वजन) व शक्ती चुकीच्या पद्धतीने वापरतात. 11 “संदेष्टेच काय, पण याजकसुद्धा पापी आहेत. माझ्या मंदिरात दुष्कृत्ये करताना मी त्यांना पाहिले आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे. 12 “मी माझा संदेश त्यांच्याकडे पाठविण्याचे बंद करीन. मग त्यांची स्थिती अंधारात चालणाऱ्यांसारखी होईल. मी असे केल्यास संदेष्टे व याजक ह्यांच्यासाठी वाट जणू निसरडी होईल. ते त्या अंधारात पडतील मी त्यांच्यावर अरीष्ट आणीन. मी त्यांना शिक्षा करीन.” हा देवाकडून आलेला संदेश आहे. 13 “शोमरोनच्या संदेष्ट्यांनी चुकीच्या गोष्टी केल्याचे मी पाहिले. मी त्यांना बआल या खोट्या दैवताच्या नावाने भविष्य वर्तविताना पाहिले. त्यांनी इस्राएलच्या लोकांना परमेश्वरापासून दूर नेले. 14 आता मी यहूदाच्या संदेष्ट्यांना यरुशलेममध्ये भयंकर गोष्टी करताना पाहिले आहे. ते व्यभिचाराचे पाप करतात. ते खोट्या गोष्टी एकतात आणि खोट्या शिकवणुकीचे पालन करतात. ते दुष्टांना दुष्कृत्ये करायला प्रोत्साहन देतात. म्हणून लोक पाप करीतच राहतात. ते सदोममधील माणसाप्रमाणे आहेत. यरुशलेम आता मला गमोऱ्यासारखे वाटते.” 15 सर्वशक्तिमान परमेश्वर संदेष्ट्यांबद्दल म्हणतो, “मी त्या संदेष्ट्यांना शिक्षा करीन. विषमिश्रित अन्न खाण्यासाखी वा जहरमिश्रित पाणी पिण्यासारखी ती शिक्षा असेल. संदेष्ट्यांनी हा आध्यात्मिक आजार आणला व तो सर्व देशात पसरला म्हणून मी त्यांना शिक्षा करीन. हा आजार यरुशलेममधील संदेष्ट्यांकडून आला.” 16 सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगतो: “हे संदेष्टे तुम्हाला जे काय सांगतात त्याकडे लक्ष देऊ नका. ते तुम्हाला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करतात. ते दृष्टांन्ताबद्दल बोलतात. पण हे दृष्टांन्त त्यांना माझ्याकडून घडत नाहीत, तर ते त्यांच्या मनाचेच असतात. 17 काही लोक परमेश्वराकडून आलेल्या खऱ्या संदेशाला नाके मुरडतात म्हणून हे संदेष्टे त्या लोकांना निराळ्याच गोष्टी सांगतात. ते म्हणतात, ‘तुम्हाला शांती लाभेल’ काही लोक फार हट्टी आहेत. ते त्यांना पाहिजे त्याच गोष्टी करतात. मग ते संदेष्टे त्याना म्हणतात, ‘तुमच्यावर कोणतीच आपत्ती येणार नाही.’ 18 पण ह्या संदेष्ट्यांमधील कोणीही स्वर्गातील देवांच्या सभेतउभा राहिलेला नाही. त्यांच्यापैकी कोणीही परमेश्वराचा संदेश पाहिला वा ऐकला नाही. कोणीही परमेश्वराच्या संदेशाकडे बारकाईने लक्ष दिलेले नाही. 19 आता परमेश्वराकडून वादळाप्रमाणे शिक्षा येईल. परमेश्वराचा राग तुफानाप्रमाणे असेल. तो त्या दुष्ट लोकांच्या डोक्यावर आदळून त्यांच्या डोक्यांचा चेंदामेंदा करील. 20 परमेश्वराने जे करण्याचे ठरविले आहे, ते पूर्ण होईपर्यंत परमेश्वराचा राग शांत होणार नाही. पुढील दिवसांत तुम्हाला हे स्पष्टपणे समजेल. 21 मी त्या संदेष्ट्यांना पाठविले नाही, पण तेच संदेश द्यायला धावले. मी त्यांच्याशी बोललो नाही, पण तेच माझ्यावतीने उपदेश करतात. 22 जर ते माझ्या स्वर्गीय सभेत उभे राहिले असते, तर त्यांनी माझा संदेश यहूदाच्या लोकापर्यंत पोहोचविला असता. त्यांनी लोकांना दुष्कृत्ये करण्यापासून परावृत्त केले असते. त्यांनी लोकांना पाप करु दिले नसते.” 23 हा परमेश्वराचा संदेश आहे, “मी देव येथे आहे पण मीच देव दूरवरच्या स्थळीही असतो.” 24 एखादा माणूस माझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करीलही, पण त्याला शोधणे मला अगदी सोपे आहे. का? कारण मी स्वर्ग आणि पृथ्वी ह्यांमध्ये सगळीकडे आहे.” परमेश्वर असे म्हणाला. 25 “काही संदेष्टे माझ्या नावाने खोटा उपदेश करतात. ते म्हणतात, ‘मला स्वप्न पडले आहे! मला स्वप्न पडले आहे!’ मी त्याना असे म्हणताना ऐकले आहे. 26 हे किती काळ चालणार? ते खोट्याचाच विचार करतात आणि त्याच खोट्या, असत्य गोष्टी लोकांना शिकवितात. 27 हे संदेष्टे, यहूदाच्या लोकांना माझे विस्मरण व्हावे असा प्रयत्न करीत आहेत. एकमेकांना खोट्या स्वप्नाबद्दल सांगून ते हे करीत आहेत. त्याचे पूर्वज जसे माझे नाव विसरले, तसेच आता ह्या लोकांनी मला विसरावे म्हणून ते प्रयत्न करीत आहेत. ह्यांचे पूर्वज मला विसरले आणि त्यांनी खोटे दैवत बआलची पूजा केली, 28 काडी म्हणजे गहू नव्हे. जर एखाद्या माणसाला त्याच्या स्वप्राबद्दल सांगायचे असेल, तर सांगू द्या. पण जो कोणी माझा संदेश ऐकतो, त्याला सत्य सांगू द्यावे. 29 माझा संदेश अग्नीप्रमाणे आहे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “तो खडक फोडणाऱ्या हातोड्याप्रमाणे आहे. 30 “म्हणून मी खोट्या संदेष्ट्यांविरुध्द आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “हे संदेष्टे एकमेकांकडून माझे शब्द चोरतात. 31 मी त्यांच्याविरुद्ध आहे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “ते त्यांचे स्वत:चे शब्द वापरतात आणि ते माझेच शब्द आहेत असे भासवितात. 32 खोट्या स्वप्नांबद्दल सांगणाऱ्या खोट्या संदेष्ट्यांच्या मी विरुद्ध आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “ते त्यांच्या खोट्या बोलण्याने व चुकीच्या शिकवणुकीने माझ्या लोकांना चुकीच्या मार्गांने नेतात. लोकांना शिकविण्यासाठी मी त्यांना पाठविलेले नाही. मी त्यांना माझ्यासाठी काही करण्याची आज्ञा कधीही दिलेली नाही. ते यहूदाच्या लोकांना मुळीच मदत करु शकत नाहीत.” हा परमेश्वराचा संदेश आहे. 33 “यहूदातील लोक वा संदेष्टे किंवा याजक कदाचित् तुला विचारतील ‘यिर्मया, परमेश्वराने काय घोषणा केली आहे?’ तू त्यांना उत्तर दे, ‘तुम्ही म्हणजेच परमेश्वराला फार मोठे ओझे आहात. मी हे ओझे खाली टाकून देईन”‘ हा परमेश्वराचा संदेश आहे. 34 कदाचित् एखादा संदेष्टा वा एखादा याजक किंवा एखादा माणूस म्हणेल ‘परमेश्वराची घोषणा ही आहे.’ तो खोटे बोलला. मी त्याला व त्याच्या सर्व कुटुंबाआला शिक्षा करीन. 35 तुम्ही एकमेकांना असे विचारु शकता, ‘परमेश्वराने काय उत्तर दिले?’ किंवा ‘परमेश्वर काय म्हणाला?’ 36 पण तुम्ही कधीही ‘परमेश्वराची घोषणा (भारी बोजा) असा वाक्‌प्रचार वापरु नये.’ कारण परमेश्वराचा संदेश हा कोणालाही भारी बोजा वाटता कामा नये. पण तुम्ही आमच्या देवाचे शब्द बदलता. तो जीवंत, सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. 37 “तुम्हाला जर देवाच्या संदेशाबद्दल जाणून घ्यायचे आसेल, तर संदेष्ट्याला विचारा ‘परमेश्वराने तुला काय उत्तर दिले’ किवा ‘परमेश्वर काय म्हणाला?’ 38 पण ‘परमेश्वराची घोषणा (भारी बोजा) काय आहे?’ असे म्हणून नका. जर तुम्ही असे शब्द वापराल, तर परमेश्वर तुम्हाला म्हणेल, ‘तुम्ही माझ्या संदेशाला ‘परमेश्वराची घोषणा (भारी बोजा) असे म्हणू नेय.’ हे शब्द वापरु नका असे मी बजावले. 39 पण तुम्ही माझ्या संदेशाला ‘भारी बोजाच’ म्हणालात. म्हणून मी तुम्हाला. मोठ्या ओझ्याप्रमाणे वर उचलून माझ्यापासून लांब फेकून देईन. मी तुमच्या पूर्वजांना यरुशलेम नगरी दिली. पण मी तुम्हाला आणि त्या नगरीला माझ्यापासून दूर फेकीन. 40 मी तुम्हाला अप्रतिष्ठित करीन आणि ही बदनामी (हा ओशाळवाणेपणा) तुम्ही कधीही विसरु शकणार नाही.”

24:1 परमेश्वराने मला पुढील गोष्टींचा दृष्टांन्त दिला: परमेश्वराच्या मंदिरासमोर दोन अंजिराच्या टोपल्या व्यवस्थित मांडलेल्या मी पाहिल्या. (बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यकोन्याला कैद करुन नेले, त्यांनंतर हा दृष्टांन्त झाला. यकोन्या हा यहोयाकीम राजाचा मुलगा होता. यकोन्या आणि त्याचे महत्वाचे अधिकारी ह्यांना यरुशलेममधून दूर नेले गेले. त्यांना बाबेलला नेले गेले. नबुखद्नेस्सरने यहूदातील सर्व सुतार व लोहार यांनाही नेले.) 2 एका टोपलीत खूप चांगली अंजिरे होती. ती मोसमाच्या सुरवातीला पिकलेल्या अंजिरासारखी होती. पण दुसऱ्या टोपलीत नासकी अंजिरे होती. ती खाण्यालायक नव्हती. 3 परमेश्वराने मला विचारले, “यिर्मया, तू काय पाहिलेस?” मी म्हणालो, “मी अंजिरे पाहिली. चांगली अंजिरे फारच उत्तम आहेत. पण वाईट अंजिरे फारच नासकी आहेत. ती खाण्यासाखी नाहीत.” 4 नंतर परमेश्वराचा संदेश मला मिळाला. 5 परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणाला, “यहूदातील लोकांना त्यांच्या देशापासून दूर नेले गेले आहे. त्यांच्या शत्रूने त्यांना बाबेलला नेले. ते लोक ह्या चांगल्या अंजिरासारखे आहेत. मी त्यांच्यावर दया करीन. 6 मी त्यांचे रक्षण करीन. मी त्यांना यहूदाला परत आणीन. मी त्यांचा नाश होऊ देणार नाही मी त्यांना परत उभे करीन. मी नुसतेच त्यांना वर काढणार नाही, तर त्यांना रुजवीन म्हणजे ते वाढू शकतील. 7 मला ओळखण्याची इच्छा मी त्यांच्यात निर्माण करीन. मग मी परमेश्वर आहे हे त्यांना समजेल. ते माझे होतील व मी त्यांचा देव होईन. बाबेलमधील हे सर्व कैदी अंत:करणापासून माझ्याकडे परत आले आहेत म्हणून मी त्यांच्यासाठी हे करीन. 8 “पण यहूदाचा राजा सिद्कीया हा त्या अतिशय नासल्यामुळे खाण्यालायक न राहिलेल्या अंजिरासारखा असेल. सिद्कीया त्याचे उच्चपदस्थ अधिकारी, यरुशलेममध्ये उरलेले लोक व मिसरमध्ये राहत असलेले यहूदी हे सर्व त्या नासक्या अंजिरासारखे असतील. 9 “मी त्यांना शिक्षा करीन. त्या शिक्षेने पृथ्वीवरील सर्व लोकांना धक्का बसेल. यहूदातील ह्या लोकांची इतर लोक चेष्टा करतील लोक एकमेकांना त्यांच्याबद्दलचे विनोदी किस्से सांगतील. मी त्यांना जेथे पाठवीन, तेथे तेथे लोक त्यांना शाप देतील. 10 मी त्यांच्यावर लढाई, उपासमार आणि रोगराई ह्या आपत्ती पाठवीन. ते सर्व ठार होईपर्यंत मी त्यांच्यावर हल्ला करीन. मग मी त्यांना आणि त्याच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीवर ते अजिबात शिल्लक राहणार नाहीत.”

25:1 यहूदातील सर्व लोकांबद्दल यिर्मयाला मिळालेला देवाचा संदेश असा आहे. यहोयाकीम राजाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षीहा संदेश आला. यहोयाकीम योशीयाचा मुलगा होता. यहोयाकीम राजाच्या कारकिर्दींचे चौथे वर्ष हे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या कारकिर्दीचे पाहिलेच वर्ष होते. 2 यहूदा आणि यरुशलेम येथील लोकांना यिर्मयाने पुढील संदेश ऐकविला: 3 गेली 23 वर्षे मी परमेश्वराचे संदेश पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत आहे. यहूदाचा राजा आमोन ह्याचा मुलगा योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या 13 व्या वर्षापासून मी संदेष्टा आहे. मी तेव्हापासून आजपावेतो तुम्हाला परमेश्वराकडून आलेले संदेश ऐकविले आहेत. पण तुम्ही ऐकले नाही. 4 परमेश्वराने, त्याच्या सेवकांना संदेष्ट्यांना पुन्हा पुन्हा तुमच्याकडे पाठविले पण तुम्ही त्यांचे ऐकले नाही. तुम्ही त्यांच्याकडे लक्षसुद्धा दिले नाही. 5 ते संदेष्टे म्हणाले, “तुमची राहणी बदला. त्या वाईट गोष्टी करु नका. तुम्ही तुमचे वागणे बदललेत, तर तुम्ही, परमेश्वराने तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना दिलेल्या देशात, परत जाऊ शकाल. त्याने तुम्हाला ही भूमी कायमची राहण्यास दिली होती. 6 दुसऱ्या दैवतांना अनुसरु नका. त्यांची सेवा वा पूजा करु नका. एखाद्या माणसाने तयार केलेल्या मूर्तींची पूजा करु नका. त्यामुळे मला तुमचा रागच येतो. असे करुन तुम्ही स्वत:लाच दुखविता. 7 “पण तुम्ही माझे ऐकले नाही.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “माणासाने घडविलेल्या मूर्तीची तुम्ही पूजा केली. त्यामुळे मला राग आला त्यामुळे तुम्ही दुखविले जाता एवढेच.” 8 सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला, “तुम्ही माझ्या संदेशाकडे लक्ष दिले नाही. 9 म्हणून मी लवकरच उत्तरेकडील कुळांना बोलावून घेईन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “मी लवकरच बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याला निरोप पाठवीन. तो माझा सेवक आहे. मी त्यांना यहूदा व यहूदातील लोक यांच्याविरुध्द उठवीन. तुमच्या देशाभोवतालच्या राष्ट्रांच्यासुद्धा विरोधात मी त्यांना आणीन. मी त्या सर्व देशांचा नाश करीन. मी त्या भूमीचे कायमचे ओसाड वाळवंट बनवीन. लोक ते देश व त्याचा वाईट प्रकारे झालेला नाश पाहतील व हळहळतील. 10 त्या ठिकाणच्या सुखाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. तेथे नव वर वधूंचा सुखाचा शब्द उमटणार नाही, जात्यांचा आवाज येणार नाही आणि दिव्यातला प्रकाश नाहीसा होईल. 11 ती सगळी भूमी वैराण वाळवंट होईल तेथील सर्व लोक, 70 वर्षांपर्यत बाबेलच्या राजाचे दास होतील. 12 “पण 70 वर्षांनंतर मी बाबेलच्या राजाला शिक्षा करीन. मी बाबेल राष्ट्रालाही शिक्षा करीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी खास्द्यांनी केलेल्या पापाबद्दल त्यांच्या देशाला शिक्षा करीन. मी त्या भूमीचे रुपांतर कायमच्या वाळवंटात करीन. 13 बाबेलमध्ये खूप वाईट गोष्टी घडतील हे मी सांगितले आहेच त्या सर्व गोष्टी घडतीलच. यिर्मयाने त्या परक्या देशाबद्दल भविष्यकथन केलेच आहे आणि या पुस्तकात सर्व थोक्याचे इशारे लिहिले आहेत. 14 हो! बाबेलच्या लोकांना खूप राष्ट्रांचे आणि मोठ्या राजांचे दास्य करावे लागेल. त्यांच्या कृत्यांबद्दल योग्य अशीच शिक्षा त्यांना मी देईन.” 15 परमेश्वराने, इस्राएलच्या देवाने मला या गोष्टी सांगितल्या: “यिर्मया, माझ्या हातातील द्राक्षरसाचा प्याला घे. तो माझ्या क्रोधाचा द्राक्षरस आहे. मी तुला वेगवेगळ्या राष्ट्रात पाठवीत आहे. त्या सर्व राष्ट्रांना हा द्राक्षरस प्यायला लाव. 16 ते हा द्राक्षरस पितील. मग ते वांत्या करतील आणि वेड्याप्रमाणे वागतील. मी लवकरच त्यांच्यावर शत्रूला हल्ला करायला लावणार असल्याने ते असे वागतील.” 17 मग मी देवाच्या हातातून द्राक्षरसाचा प्याला घेतला. देवाने मला पाठवलेल्या त्या सर्व राष्ट्रांत मी गेलो आणि तेथील लोकांना त्यातील द्राक्षरस प्यायला लावला. 18 मी यहूदा आणि यरुशलेम यामधील लोकांसाठी तो द्राक्षरस ओतला. यहूदातील राजे आणि नेते ह्यांना मी द्राक्षरस प्यायला लावला. ते वैराण वाळवंट व्हावेत, त्या ठिकाणाचा सर्वनाश व्हावा, तो नाश पाहून लोकांनी हायहाय करावे व त्याबद्दल कोसावे म्हणून मी असे केले आणि तसेच घडले. यहूदाचे आता तेच झाले आहे! 19 मी मिसरच्या फारोलाही द्राक्षरस प्यायला भाग पाडले. परमेश्वराच्या क्रोधाने भरलेल्या प्याल्यातून मी मिसरच्या अधिकाऱ्यांना, महत्वाच्या नेत्यांना आणि लोकांना द्राक्षरस प्यायला लावला. 20 मी सर्व अरब व ऊस देशातील राजे यांनाही द्राक्षरस पिण्यास दिला. मी पलिष्ट्यांच्या देशातील अश्कलोन, गज्जा, एक्रोन या शहरांतील व अश्दोद शहरामधील उरलेले अशा सर्व राजांना त्या प्याल्यातून द्राक्षरस पिण्यास भाग पाडले. 21 मग मी अदोम, मवाब व अम्मोन यामधील राजांनाही द्राक्षरस प्यायला लावले. 22 सोरच्या व सीदोनच्या सर्व राजांनाही मी द्राक्षरस पाजला. खूप दूरच्या देशातील सर्व राजांनाही मी द्राक्षरस दिला. 23 ददान, तेमा व बूज येथील लोकांनाही मी त्या प्याल्यातून प्यायला लावले. मंदिरात दाढीच्या कडा कापणाऱ्या सर्व लोकांना मी द्राक्षरस पिण्यास भाग पाडले. 24 अरबस्तानातील सर्व राजांनाही मी द्राक्षरस प्यायला दिला. हे राजे वाळवंटात राहतात. 25 जिमरी, एलाम व मेदी येथील सर्व राजांना मी द्राक्षरस पाजला. 26 उत्तरेकडील सर्व, दूरच्या व जवळच्या राजांना मी ही द्राक्षरस पिण्यास भाग पाडले. एकामागून एकाला मी तो प्यायला लावला. पृथ्वीवरील सर्व राज्यांना मी परमेश्वरच्या क्रोधाने भरलेल्या प्याल्यातून प्यायला लावले. पण बाबेलचा राजा, सर्व राष्ट्रांच्या नंतर या प्याल्यातून पिईल. 27 “यिर्मया, तू त्या राष्ट्रांना सांग की सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘माझ्या क्रोधाच्या प्याल्यातून प्या. त्यामुळे झिंगा आणि वांत्या करा. पडा आणि परत उठू नका. उठू नका कारण तुम्हाला ठार करण्यासाठी मी तलवार पाठवीत आहे.’ 28 “ते लोक तुझ्या हातातून प्याला घेण्याचे नाकारतील. ते त्यातील द्राक्षरस पिण्यास नकार देतील पण तू त्यांना सांग ‘सर्वशक्तिमान परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो. तुम्ही खरोखरच ह्या प्याल्यातून प्यावे. 29 माझ्या नावाने प्रसिध्द असलेल्या यरुशलेम नगरीत वाईट गोष्टी घडवून आणण्यास मी अगोदरच सुरवात केली आहे. आपल्याला शिक्षा होणार नाही असे तुम्हाला वाटण्याचा संभव आहे. पण तुम्ही चुकता आहात. तुम्हाला शिक्षा होईलच. मी पृथ्वीवरील सर्व माणसांना मारण्यासाठी तलवारीला साद घालीत आहे.”‘ हा परमेश्वराचा संदेश आहे. 30 “यिर्मया, तू त्यांना पुढील संदेश दे: ‘परमेश्वर वरुन गर्जना करीत. आहे तो त्याच्या पवित्र मंदिरातून गर्जना करीत आहे. तो त्याच्या कुरणाला (लोकांना) ओरडतो. द्राक्षरस काढताना, द्राक्षे तुडविताना, लोक ज्याप्रमाणे मोठ्याने गातात, त्याप्रमाणे देवाच्या आरोळ्या मोठ्या आहेत. 31 तो आवाज पृथ्वीवरील सर्व लोकांपर्यंत पसरतो. हा सगळा गोंगाट कशासाठी आहे? परमेश्वर सर्व राष्ट्रांतील लोकांना शिक्षा करीत आहे. परमेश्वराने लोकांच्याविरुद्ध आपले म्हणणे मांडले. त्यांने लोकांचा न्यायनिवाडा केला. आणि तो आता तलवारीने दुष्ट लोकांना ठार मारीत आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे. 32 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “अरिष्ट एका देशातून दुसऱ्या देशात लवकरच पसरेल. तो पृथ्वीवरच्या अती दूरच्या ठिकाणाहून वादळाप्रमाणे येईल.” 33 त्या लोकांची प्रेते पृथ्वीच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे पोहोचतील. त्यांच्यासाठी कोणीही रडणार नाही. कोणीही ती गोळा करुन पुरणार नाही. शेणाप्रमाणे ती जमिनीवर पडतील. 34 मेंढपाळांनो (नेत्यानो) तुम्ही मेंढ्यांना (लोकांना) वळवावे. प्रमुख नेत्यांनो, रडायला सुरवात करा. मेंढ्यांच्या (लोकांच्या) नेत्यांनो, जमिनीवर दु:खाने लोळा. का? कारण ही तुमच्या कत्तलीची वेळ आहे. परमेश्वर तुम्हाला मोडील आणि सगळीकडे पसरवील. तुम्ही फुटक्या मडक्याच्या तुकड्याप्रमाणे सगळीकडे पसराल. 35 मेंढपाळांना लपायला कोठेही जागा राहणार नाही. ते नेते पळून जाऊ शकणार नाहीत. 36 मग मेंढपाळांच्या (नेत्यांचा) आरोळ्या ऐकू येतात. त्यांचे रडणे ऐकून परमेश्वर त्यांची कुरणें (देश) नष्ट करीत आहे. 37 त्या शांत कुरणांचा (जागांचा) नाश केला जाईल आणि ती ओसाड वाळवटे होतील. परमेश्वर रागावल्याने असे घडले. 38 परमेश्वर गुहेत राहाणाऱ्या भयंकर सिंहाप्रमाणे आहे. परमेश्वर रागावला आहे आणि त्याचा क्रोध त्या लोकांना इजा करील. त्यांचा देश ओसाड वाळवंट होईल.

26:1 यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या पाहिल्याच वर्षी परमेश्वराकडून हा संदेश आला. यहोयकीम हा योशीया राजाचा मुलगा होता. 2 परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, परमेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात उभा राहा आणि परमेश्वराच्या मंदिरात उपासना करण्यास येणाऱ्यांना हा संदेश दे. मी तुला सांगितलेले सर्व यहूदातील सगळ्या लोकांना सांग. माझ्या संदेशातील कोणताही भाग गाळू नकोस. 3 कदाचित् ते ऐकतीलही आणि माझ्या संदेशाचे पालन करतील. पापी जीवन जगण्याचे ते कदाचित् सोडून देतील. त्यांचे परिवर्तन झाल्यास, त्यांना शिक्षा करण्याच्या माझ्या बेतांबद्दल मीही कदाचित् पुनर्विचार करीन. त्यांनी खूप वाईट कृत्ये केली. त्याबद्दल त्यांना शिक्षा करण्याची योजना मी आखत आहे. 4 तू त्यांना सांग ‘परमेश्वर काय म्हणतो ते ऐका: मी तुम्हाला माझी शिकवण दिली. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्याच पाहिजेत आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे वागलेच पाहिजे. 5 माझ्या सेवकांनी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी तुम्ही ऐकल्याच पाहिजेत. (संदेष्टे माझे सेवक आहेत) मी पुन्हा पुन्हा माझे सेवक पाठविले. पण तुम्ही त्यांचे ऐकले नाही. 6 तुम्ही माझे ऐकले नाही तर मी माझे यरुशलेममधील मंदिर शीलोमधील माझ्या पवित्र तंबूप्रमाणेकरीन दुसऱ्या शहरांवर अरिष्ट यावे असे वाटणाऱ्या लोकांना यरुशलेम जरुर आठवेल.” 7 परमेश्वराच्या मंदिरातील यिर्मयाचे हे बोलणे याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि सगळ्या लोकांनी ऐकले. 8 परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे, यिर्मयाने, परमेश्वराने सांगितलेली प्रत्येक गोष्ट सांगितली, नंतर याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि लोकांनी यिर्मयाला धरले. ते म्हणाले, “अशा भयंकर गोष्टी सांगितल्याबद्दल तू मरशील! 9 परमेश्वराच्या नावावर अशा भयंकर गोष्टी सांगण्याचे धाडस तू कसे काय करु शकतोस! शिलोच्या मंदिराप्रमाणे ह्या मंदिराचा नाश होईल, असे म्हणण्याचे साहस तू कसे काय करु शकतोस. यरुशलेम निर्जन वाळवंटाप्रमाणे होईल असे तू कसे काय म्हणू शकतोस!” परमेश्वराच्या मंदिरात सर्व लोक यिर्मयाभोवती जमले. 10 यहूदातील राज्यकर्त्यांना ही सर्व हकिगत कळली, म्हणून ते राजवाड्यातून बाहेर आले व देवाच्या मंदिरात गेले. तेथे ते नव्या प्रवेशद्वाराजवळ आपापल्या स्थानांवर बसले. ‘नवे प्रवेशद्वार’ परमेश्वराच्या मंदिरात जाण्याचे दार होते. 11 नंतर याजक व संदेष्टे राज्यकर्त्यांशी व लोकाशी बोलले. ते म्हणाले “यिर्मयाला ठार करावे. यरुशलेमबद्दल तो वाईट भविष्यकथन करतो तुम्ही त्याचे बोलणे ऐकलेच आहे.” 12 मग यिर्मया यहूदाच्या राज्यकर्त्यांशी व इतर लोकांशी बोलला तो म्हणाला, “ह्या नगरीबद्दल व ह्या मंदिराबद्दल ह्या गोष्टी सांगण्यासाठी परमेश्वरानेच मला पाठविले. तुम्ही ऐकलेला प्रत्येक शब्द परमेश्वराच्या तोंडचा आहे. 13 तुम्ही तुमची वागणूक बदला. तुम्ही सत्कृत्ये करायला सुरवात केलीच पाहिजे. तुम्ही परमेश्वराचे, तुमच्या देवाचे ऐकलेच पाहिजे. तुम्ही असे वागलात, तर परमेश्वराचे हृदयपरिवर्तन होईल. त्याने सांगितलेल्या वाईट गोष्टी तो करणार नाही. 14 माझ्याबद्दल म्हणाल, तर मी तुमच्या हातात आहे. तुम्हाला योग्य व बरोबर वाटेल ते करा. 15 पण तुम्ही मला ठार मारलेत, तर एका गोष्टीची खात्री बाळगा. निरपराध माणसाला मारल्याबद्दल तुम्ही अपराधी ठराल. तुम्ही ह्या नगरीला आणि तिच्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसालाही अपराधी बनवाल. परमेश्वराने खरोखरीच मला तुमच्याकडे पाठविले आहे. तुम्ही ऐकलेला संदेश खरेच परमेश्वराकडूनच आलेला आहे.” 16 मग राज्यकर्ते व सर्व लोक बोलले, त्या लोकांनी याजकांना व संदेष्ट्यांना सांगितले, “यिर्मयाला अजिबात मारु नका. त्याने आपल्याला सांगितलेल्या गोष्टी परमेश्वराकडून आपल्या देवाकडून येतात.” 17 नंतर काही वडीलधारी (नेते) उभे राहिले. ते सर्व लोकांना उद्देशून म्हणाले, 18 “संदेष्टा मीखा हा मोरष्टचा राहणारा होता. हिज्कीया यहूदाचा राजा असताना मीखा संदेष्टा होता. मीखाने यहूदाच्या लोकांना पुढील गोष्टी सांगितल्या.सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “सियोनेचा नाश होईल सियोन नांगरलेले शेत होईल. यरुशलेम दगडांची रास होईल. मंदिर असलेल्या टेकडीवर रान माजेल.” 19 “हिज्कीया यहूदाचा राजा होता. पण हिज्कीयाने मीखाला ठार मारले नाही. यहूदातील कोणीही मीखाला ठार मारले नाही. हिज्कीयाला परमेश्वराबद्दल आदर होता, हे तुम्हाला माहीतच आहे. त्याला परमेश्वराला प्रसन्न ठेवण्याची इच्छा होती. हिज्कीया यहूदाचे वाईट करील असे परमेश्वराने सांगितले होते. पण हिज्कीयाने परमेश्वराची करुणा भाकली आणि परमेश्वराचे हृदयपरिवर्तन झाले. परमेश्वराने त्या वाईट गोष्टी घडू दिल्या नाहीत. आपण जर यिर्मयाला इजा केली, तर आपण स्वत:वरच खूप संकटे ओढवून घेऊन ती आपलीच चूक ठरेल.” 20 पूर्वी आणखी एकाने परमेश्वराचा संदेश ऐकविला होता. त्याचे नाव उरीया तो शमायाचा मुलगा होता. उरीया किर्याथ यारीमचा रहिवासी होता. त्याने ह्या नगरीच्या विरोधात आणि या भूमीच्याही विरोधात, यिर्मयाप्रमाणेच गोष्टी सांगितल्या होत्या. 21 राजा यहोयाकीम, त्याचे सैन्याधिकारी व यहूदातील नेते ह्यांनी उरीयाला संदेश देताना ऐकले. ते रागावले. यहोयाकीम राजा उरीयाला मारु इच्छित होता. हे उरीयाला कळले. तो घाबरला व मिसर देशात पळाला. 22 पण यहोयाकीम राजाने एलनाथान नावाच्या माणसाबरोबर आणखी काही माणसे देऊन त्यांना मिसरला पाठविले. एलनाथान अखबोरचा मुलगा होता, 23 त्या माणसांनी उरीयाला मिसरहून परत आणले. ते त्याला यहोयाकीम राजाकडे घेऊन गेले. यहोयाकीमने उरीयाला तलवारीने मारण्याचा हुकूम दिला. नंतर गरीब लोकांच्या दफनभूमीत त्याचे प्रेत फेकण्यात आले. 24 पण अहीकाम या प्रतिष्ठित व्यक्तीने यिर्मयाला पाठिंबा दिला अहीकाम शाफानचा मुलगा होता. त्याने यिर्मयाला याजक व संदेष्टे यांच्यापासून वाचविले.

27:1 यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्यावर्षी हा संदेश आला. सिद्कीया योशीया राजाचा मुलगा होता. 2 परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, पट्ट्या आणि बांबू यांच्यापासून जोखड तयार कर. ते तुझ्या मानेवर ठेव. 3 मग यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला भेटण्यासाठी यरुशलेमला अदोम, मवाब, अम्मोन, सोरा व सीदोन ह्या राजांचे जे दूत येतात, त्यांच्या हाती ह्या सर्व राजांना निरोप पाठव. 4 त्या दूतांना त्यांच्या स्वामींना असा निरोप द्यायला सांग की सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘तुमच्या राजांना सांगा 5 मी ही पृथ्वी व त्यावरील सर्व माणसे निर्माण केली. मी पृथ्वीवर सर्व प्राणी निर्माण केले. मी माझ्या प्रचंड सामर्थ्याच्या साहाय्याने आणि बळकट हाताने हे निर्माण केले. मी मला पाहिजे त्याला ही पृथ्वी देईन. 6 सध्या मी तुमचे सर्व देश बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या स्वाधीन केले आहेत. तो माझा सेवक आहे. मी वन्य प्राण्यांनासुद्धा त्याचा हूकूम पाळायला लावीन. 7 सर्व राष्ट्रे, नबुखद्नेस्सर, त्याचा मुलगा आणि नातू ह्यांचे दास्य करतील. मग बाबेलच्या पराभवाची वेळ येईल. खूप राष्ट्रे आणि मोठे राजे बाबेलला त्याचा दास करतील. 8 “पण आता, काही राष्ट्रे वा राज्ये बाबेलच्या राजा नबुखद्नेस्सर ह्याचे दास्य करण्यास कदाचित् नकार देतील. ते त्याचे जोखड आपल्या मानेवर ठेवण्यास कदाचित् तयार होणार नाहीत. असे झाल्यास मी काय करीन माहीत आहे? मी त्या राष्ट्रांवर युद्ध, उपासमार व भयंकर रोगराई ह्या आपत्ती आणून त्यांना शिक्षा करीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “त्या राष्ट्रांचा नाश होईपर्यंत मी हे करीन. नबुखद्नेस्सरच्या विरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रांचा नाश मी त्याच्याच हातून करीन. 9 तेव्हा तुम्ही तुमच्या संदेष्ट्यांचे ऐकू नका. भविष्य सांगण्यासाठी जादूचा उपयोग करणाऱ्या लोकांचे ऐकू नका. स्वप्नांचे अर्थ लावणाऱ्या लोकांचे ऐकू नका. मृतांशी बोलणाऱ्या व जादू करणाऱ्या लोकांचे ऐकू नका. हे सर्वजण तुम्हाला “तुम्ही बाबेलच्या राजाचे दास होणार नाही’ असे सांगतात.” 10 पण ते खोटे बोलत आहेत. तुमच्या जन्मभूमीपासून तुम्हाला दूर नेण्यास ते कारणीभूत होतील. मी तुम्हाला तुमची घरे सोडायला भाग पाडीन. तुम्ही दुसऱ्या देशात मराल. 11 “‘पण बाबेलच्या राजाच्या जोखडात आपल्या माना अडकविणारी व त्याचा हूकूम मानणारी राष्ट्रे जगतील. मी त्या राष्ट्रांना त्यांच्याच भूमीवर राहू देईन आणि बाबेलच्या राजाची सेवा करु देईन.”‘ हा देवाकडून आलेला संदेश आहे. “त्या राष्ट्रांतील लोक त्यांच्याच भूमीत राहून ती पिकवतील. 12 “‘यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला मी असाच संदेश दिला. मी म्हणालो, “सिद्कीया, तुला तुझी मान बाबेलच्या राजाच्या जोखडात अडकवलीच पाहिजे आणि त्याचा हुकूम मानला पाहिजे. तू, बाबेलचा राजा आणि त्याची प्रजा, ह्यांची सेवा केलीस, तरच तू जगशील. 13 जर तू बाबेलच्या राजाची सेवा करण्यास तयार झाला नाहीस, तर तू आणि तुझी प्रजा शत्रूचा हल्ला, उपासमार व रोगराई ह्यांनी मराल. परमेश्वर म्हणतो की जे बाबेलच्या राजाची सेवा करण्याचे नाकारतील त्यांच्याबाबातीत ह्या गोष्टी घडतीलच. 14 पण खोटे संदेष्टे सांगतात की तुम्हाला कधीच बाबेलचे गुलाम व्हावे लागणार नाही.“त्यांचे मुळीचे ऐकू नका. कारण ते तुम्हाला खोटा उपदेश करतात. 15 मी त्या संदेष्ट्यांना पाठविलेले नाही.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “ते खोटे सांगतात व तो माझा संदेश आहे असे म्हणतात म्हणून मी तुम्हा लोकांना दूर पाठवीन. तुम्ही मराल आणि तुम्हाला खोटे सांगणारे ते संदेष्टेही मरतील.” 16 नंतर मी (यिर्मया) याजकांना व सर्व लोकांना म्हणालो, “परमेश्वर म्हणतो ते खोटे संदेष्टे म्हणतात ‘खास्द्यांनी परमेश्वराच्या मंदिरातून खूप गोष्टी घेतल्या आहेत. त्या सर्व लवकरच परत आणल्या जातील. ते संदेष्टे खोटे सांगतात.’ म्हणून त्यांचे ऐकू नका. 17 त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. बाबेलच्या राजाची सेवा करा. तुमच्या शिक्षेचा स्वीकार करा म्हणजे तुम्ही जगाल. या यरुशलेम नगरीच्या नाशास तुम्ही कारणीभूत होण्याचे काहीच कारण नाही. 18 ते जर खरेच संदेष्टे असतील आणि त्यांना परमेश्वराकडून खराच संदेश मिळाला असेल, तर त्यांना प्रार्थना करु द्या. ज्या गोष्टी अजूनही परमेश्वराच्या मंदिरात आहेत, त्यासाठी त्यांना आळवणी करु द्या. राजवाड्यात अजूनही शाबूत असलेल्या गोष्टींसाठी त्यांना विनवणी करु द्या. यरुशलेममध्ये अजूनही शिल्लक असलेल्या गोष्टींसाठी त्या याजकांना प्रार्थना करु द्या. ह्या सर्व गोष्टी बाबेलला नेल्या जाऊ नयेत म्हणून त्यांना आळवणी करु द्या.” 19 यरुशलेम मध्ये अजूनही शिल्लक असलेल्या गोष्टींबद्दल सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो की मंदिरात अजूनही स्तंभ, काशाचे गंगाळ, हलविता येणाऱ्या बैठकी आणि इतर गोष्टी आहेत. 20 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने ह्या गोष्टीयरुशलेममध्येच सोडून दिल्या. त्याने यहूदाचा राजा यकन्या ह्याला कैद करुन नेले, तेव्हा ह्या गोष्टी नेल्या नाहीत. यकन्या हा यहोयाकीम राजाचा मुलगा होता. नबुखद्नेस्सरने यहूदातील व यरुशलेममधील इतर महत्वाच्या व्यक्तींनासुद्धा नेले. 21 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव, परमेश्वराच्या मंदिरात राजवाड्यात आणि यरुशलेममध्ये अजून शिल्लक राहिलेल्या वस्तूंच्याबद्दल पुढीलप्रमाणे भाकीत करतो, “ह्या सर्व वस्तूसुध्दा बाबेलला नेल्या जातील. 22 मी त्या वस्तू परत आणायला जाईपर्यंत त्या बाबेलमध्येच राहीतल.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “नंतर त्या गोष्टी मी परत आणीन. मी त्या पुन्हा ह्याच जागेवर ठेवीन.”

28:1 यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दींच्या चौथ्या वर्षाच्या पाचव्या महिन्यातहनन्या हा संदेष्टा माझ्याशी बोलला. हनन्या हा अज्जूरचा मुलगा होता. तो गिबोन गावचा रहिवासी होता. परमेश्वराच्या मंदिरात तो माझ्याशी बोलला. तेव्हा याजक व इतर सर्व लोक तेथे उपस्थित होते. हनन्या म्हणाला, 2 “सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो ‘यहूदाच्या लोकांच्या मानेवर बाबेलच्या राजाने ठेवलेले जोखड मी मोडीन. 3 दोन वर्षांच्या आत, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने परमेश्वराच्या मंदिरातून नेलेल्या वस्तू मी परत आणीन. नबुखद्नेस्सरने त्या वस्तू बाबेलमध्ये नेल्या आहेत. पण मी त्या यरुशलेमला परत आणीन. 4 यहूदाचा राजा यकन्या यालासुद्धा मी येथे परत आणीन. यकन्या यहोयाकीमचा मुलगा आहे. नबुखद्नेस्सरने यहूदातील ज्या लोकांना बळजबरीने घरे सोडून बाबेलला नेले, त्या सर्व लोकांनाही मी परत आणीन.’ हा परमेश्वराचा संदेश आहे. ‘अशा रीतीने बाबेलच्या राजाने यहूदाच्या लोकांवर लादलेले जोखड मी मोडीन.”‘ 5 संदेष्टा हनन्याच्या ह्या वक्तव्यानंतर यिर्मया बोलला. ते परमेश्वराच्या मंदिरात उभे होते. याजक व सर्व लोक यिर्मयाचे बोलणे ऐकू शकत होते. 6 यिर्मया हनन्याला म्हणाला, ‘तथास्तु! (आमेन) परमेश्वर खरोखरच असे करो! परमेश्वर तुझा संदेश खरा करील, अशी मी आशा करतो. परमेश्वर खरोखरच त्याच्या मंदिरातील बाबेलला नेलेल्या वस्तू परत येथे आणो आणि बळजबरीने घरे सोडण्यास भाग पाडलेल्या लोकांना परमेश्वर येथे परत आणो! 7 “पण हनन्या, मला जे सर्व लोकांना सांगितले पाहिजे, ते तूही ऐक. 8 तू आणि मी संदेष्टा होण्याच्या खूप पूर्वी अनेक संदेष्टे होऊन गेले, हनन्या त्यांनी पुष्कळ देशांत आणि राज्यांत युद्ध, उपासमार आणि रोगराई येईल असे भाकीत केले. 9 पण जे संदेष्टे शांतीचा उपदेश करतात, ते खरोखरच परमेश्वराने पाठविलेले आहेत का, ते तपासून पाहिलेच पाहिजे. जर त्यांचा संदेश खरा ठरला, तर तो खरोखरच परमेश्वराने पाठविलेला संदेष्टा आहे हे लोकांना समजेल.” 10 यिर्मयाच्या मानेवर जोखड होते, ते याजक हनन्याने काढून टाकले, व तोडून टाकले. 11 मग सगळ्या लोकांना ऐकू जावे म्हणून हनन्या मोठ्याने म्हणाला, “परमेश्वर म्हणतो ‘ह्याप्रमाणेच मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याचे जोखड तोडीन. त्याने ते जगातील सर्व राष्ट्रांच्या मानेवर ठेवले आहे. पण दोन वर्षांच्या आतच मी ते तोडून टाकीन.”हनन्या असे म्हणताच, यिर्मया मंदिरातून निघून गेला. 12 जेव्हा यिर्मयच्या मानेवरचे जोखड हनन्याने काढून तोडल्यानंतर यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. 13 परमेश्वर यिर्मयाला म्हणाला, “हनन्याला जाऊन सांग ‘परमेश्वर असे म्हणतो की तू लाकडाचे जोखड तोडलेस. पण त्यांच्या जागी मी लोखंडाचे बनवीन.’ 14 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘मी सर्व राष्ट्रांच्या मानेवर लोखंडाचे जोखड ठेवीन. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याची त्यांनी सेवा करावी, म्हणून मी असे करीन. ते त्याचे गुलाम होतील. मी नबुखद्नेस्सरला वन्यपशूंवरही अंकुश ठेवायला लावीन.”‘ 15 नंतर संदेष्टा यिर्मया संदेष्टा हनन्याला म्हणाला, “हनन्या! ऐक! परमेश्वराने तुला पाठविलेले नाही पण तू यहूदाच्या लोकांना लबाडीवर विश्वास ठेवावयास लावले. 16 म्हणून परमेश्वर म्हणतो, ‘हनन्या, लवकरच मी तुला ह्या जगातून उचलीन. ह्या वर्षी तू मरशील. का? कारण तू लोकांना परमेश्वराच्याविरुद्ध वागण्यास शिकविलेस.” 17 त्याच वर्षाच्या सातव्या महिन्यात हनन्या मेला.

30:1 यिर्मयाला परमेश्वराकडून पुढील संदेश आला. 2 परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव म्हणाला, “मी तुझ्याशी बोललेले शब्द ग्रंथात लिहून ठेव. ते तुझ्यासाठी लिहून ठेव. 3 असे करण्याचे कारण असा काळ येईल.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे, “तेव्हा मी इस्राएल आणि यहूदा येथील माझ्या हद्दपार केलेल्या लोकांना परत आणीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत मी त्यांना परत वस्ती करु देईन. मग ती भूमी पुन्हा त्यांच्या मालकीची होईल.” 4 इस्राएल व यहूदा येथील लोकांबद्दल परमेश्वराने हा संदेश दिला. 5 परमेश्वर म्हणाला,“लोकांचे भीतीने रडणे आम्हाला ऐकू येते. लोक घाबरले आहेत. कोठेही शांती नाही. 6 “पुढील प्रश्न विचारा व त्यांचा विचार करा. पुरुषाला मूल होऊ शकेल का? अर्थात् नाही मग प्रत्येक पुरुष प्रसूतिवेदना होणाऱ्या बाई प्रमाणे पोट धरताना का दिसत आहे? प्रत्येकाचा चेहरा मृताप्रमाणे पांढराफटक का पडला आहे? का? कारण ते फार घाबरले आहेत. 7 “याकोबाच्या दृष्टीने हा फार महत्वाचा काळ आहे. हा अतिशय संकटाचा काळ आहे. पुन्हा असा काळ कधीच येणार नाही. पण याकोबाचे रक्षण होईल. 8 “त्या वेळी,” हा सर्वशक्तिमान परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी इस्राएल व यहूदा ह्यांच्यामधील लोकांच्या मानेवरील जोखड तोडीन. तुमची बंधने तोडीन. परक्या देशातील लोक पुन्हा माझ्या माणसांना गुलाम होण्यास भाग पाडणार नाहीत. 9 इस्राएल आणि यहूदा यांच्यामधील लोक परक्या देशांची सेवा करणार नाहीत. नाही! ते परमेश्वराची, त्यांच्या देवाची सेवा करतील. मी त्यांच्यासाठी पाठवणार असलेल्या त्याच्या दावीद राजाचीही ते सेवा करतील. 10 “तेव्हा, याकोब, माझ्या सेवका, घाबरु नकोस,” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “इस्राएल, भीऊ नकोस मी त्या दूरच्या ठिकाणाहून तुझे रक्षण करीन. तुम्ही त्या दूरच्या प्रदेशात कैदी आहात. पण मी तुमच्या वंशजांना वाचवीन. मी त्यांना तेथून परत आणीन. याकोबला पुन्हा शांती लाभेल. लोक त्याला त्रास देणार नाहीत. माझ्या माणसांना घाबरविणारा कोणीही शत्रू नसेल. 11 इस्राएलच्या व यहूदाच्या लोकांनो, मी तुमच्याबरोबर आहे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी तुमचे रक्षण करीन. मी तुम्हाला त्या राष्ट्रांमध्ये पाठविले. पण त्या सर्व राष्ट्रांचा मी नाश करीन. खरंच! मी त्या राष्ट्रांचा नाश करीन. पण मी तुमचा नाश करणार नाही. तुम्ही केलेल्या पापांची शिक्षा तुम्हाला झालीच पाहिजे. पण मी न्याय्यबुद्धीने तुम्हाला शिक्षा करीन.” 12 परमेश्वर म्हणतो, “इस्राएलच्या व यहूदाच्या लोकांनो, तुम्हाला कधीही बरी न होणारी जखम झाली आहे, कधीही भरुन न येणारी हानी पोहोचली आहे. 13 तुमच्या व्रणांची काळजी घेणारा कोणीही नाही, म्हणून तुम्ही बरे होणार नाही. 14 तुम्ही बऱ्याच राष्ट्रांचे मित्र झालात पण ती राष्ट्रे तुमची पर्वा करीत नाहीत. तुमचे ‘मित्र’ तुम्हाला विसरले आहेत. मी शत्रूला दुखवावे, तसे तुम्हाला दुखविले आहे. मी तुम्हाला कडक शिक्षा केली. तुमच्या भयंकर अपराधांसाठी मी हे केले. तुम्ही खूप पापे केलीत, म्हणून मी असे केले. 15 इस्राएल आणि यहूदा, तुमच्या जखमेबद्दल तुम्ही आरडाओरड का करता? तुमची जखम यातना देणारी आहे. पण त्यावर काही इलाज नाही. मी, परमेश्वराने, तुमच्या भयंकर अपराधांबद्दल ह्या गोष्टी घडवून आणल्या. तुमची पापे खूप वाढली. म्हणून मी असे केले. 16 त्या राष्ट्रांनी तुमचा नाश केला. पण आता त्या राष्ट्रांचा नाश केला जाईल. इस्राएल व यहूदा, तुमच्या शत्रूंना कैद केले जाईल. त्या लोकांनी तुमच्या वस्तू चोरल्या. पण आता दुसरे लोक त्यांच्या वस्तू चोरतील. युद्धात त्यांनी तुम्हाला लुटले. आता लढाईत इतर लोक त्यांना लुटतील. 17 मी तुम्हाला पुन्हा तंदुरस्त करीन. तुमच्या जखमा मी बऱ्या करीन. हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “का? कारण दुसरे लोक म्हणतात तू बहिष्कृत आहेस. ते म्हणतात, सियोनची काळजी करणारे कोणीही नाही.” 18 परमेश्वर म्हणतो, “सध्या याकोबाची माणसे बंदिवासात आहेत. पण ती परत येतील. याकोबाच्या घरांची मला दया येईल. सध्या नगरी म्हणजे पडक्या इमारतींनी भरलेली टेकडी आहे. पण नगरी पुन्हा बांधली जाईल. राजाचा राजवाडाही योग्य जागी बांधला जाईल. 19 “तेथील लोक स्तुतिस्तोत्रे गातील. तेथे हास्याच्या लहरी उठतील. त्यांना मी पुष्कळ संतती देईन इस्राएल व यहूदा यांचा आकार लहान राहणार नाही मी त्यांना मान मिळवून देईन. कोणीही त्यांना खाली पाहणार नाही. 20 “याकोबाचे घराणे पूर्वीच्या इस्राएलच्या घराण्याप्रमाणे होईल. मी, इस्राएल आणि यहूदा, यांना सामर्थ्यशाली करीन आणि त्यांना इजा करणाऱ्यांना मी शिक्षा करीन. 21 त्यांच्यातीलच एक त्यांचे नेतृत्व करील. तो माझ्या माणसांपैकीच एक असेल. मी सांगितल्यावरच लोक माझ्याजवळ येऊ शकतील. मग मी त्या नेत्याला माझ्याजवळ यायला सांगीन आणि तो माझ्याजवळ येईल. तो मला जवळचा होईल. 22 तुम्ही लोक माझे व्हाल आणि ती तुमचा देव होईन.” 23 “परमेश्वर खूप रागावला होता. त्याने लोकांना शिक्षा केली. शिक्षा वादळाप्रमाणे आली. त्या दुष्ट माणसांविरुद्ध शिक्षा तुफानाप्रमाणे आली. 24 लोकांची शिक्षा पूर्ण होईपर्यंत परमेश्वराचा राग राहील. परमेश्वराने ठरविलेली शिक्षा पूर्ण होईपर्यंत तो शांत होणार नाही. यहूदाच्या लोकांनो, तो दिवस उजाडल्यावरच तुम्हाला हे समजेल.”

31:1 परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या: “त्या वेळी मी इस्राएलमधील सर्व कुळांचा देव असेन आणि ती सर्व माझी माणसे असतील.” 2 परमेश्वर म्हणतो: “काही लोक शत्रूकडून मारले गेले नव्हते. ते लोक वाळवंटात आश्रय घेतील. इस्राएल विश्रांतीच्या उपेक्षेने तेथे जाईल.” 3 खूप लांबून परमेश्वर लोकांना दर्शन देईल. परमेश्वर म्हणतो, “लोकांनो, मी तुमच्यावर प्रेम करतो आणि ते चिरंतर राहील. तुमची निष्ठ मी कायमची सांभाळीन. 4 “इस्राएल, माझ्या वधू, मी तुझी पुन्हा निर्मिती करीन. तुझ्यातून देश निर्माण करीन. तू तुझी खंजिरी उचलशील आणि मौजमजा करणाऱ्या इतर लोकांबरोबर नृत्यात सामील होशील. 5 इस्राएलमधील शेतकऱ्यांनो, तुम्ही पुन्हा द्राक्षाच्या बागा लावाल. शोमरोन शहराच्या भोवतालच्या टेकडीवर तुम्ही द्राक्षवेलींची लागवड कराल. त्या द्राक्षमळ्यातील पिकांचा तुम्ही आस्वाद घ्याल. 6 अशी एक वेळ येईल की पहारेकरी ओरडून पुढील आदेश देतील. ‘या, आपण परमेश्वर देवाची उपासना करण्यासाठी वर सियोनला जाऊ या.’ एफ्राईम या डोंगराळ प्रदेशातील पहारेकरीसुद्धा ओरडून हा संदेश देतील.” 7 परमेश्वर म्हणतो, “आनंदित व्हा आणि याकोबासाठी गा. सर्व राष्ट्रांत अग्रेसर असलेल्या इस्राएलचा जयघोष करा. स्तुतिस्तोत्रे गा व ‘परमेश्वराने त्याच्या लोकांना वाचविलेअसे जाहीर करा. इस्राएलच्या जिवंत राहिलेल्या लोकांचे देवाने रक्षण केले.’ 8 लक्षात ठेवा, मी त्या उत्तरेकडच्या देशातून इस्राएलला आणीन. जगातील दूरदूरच्या ठिकाणाहून मी इस्राएलच्या लोकांना एकत्र करीन. काही लोक आंधळे आणि पंगू असतील. काही बायका गर्भवती असतील आणि त्यांच्या प्रसूतींची वेळ आली असेल. पण खूप खूप लोक परत येतील. 9 ते लोक रडत परत येतील. पण मी त्यांचे नेतृत्व करीन व त्यांचे सांत्वन करीन. मी त्यांना सोप्या वाटेने नेईन म्हणजे ते अडखळणार नाहीत. मी त्याना अशाच मार्गाने नेईन कारण मी इस्राएलचा पिता आहे आणि एफ्राईम माझा पहिला मुलगा आहे. 10 “राष्ट्रांनो, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐका! समुद्राकडील दूरच्या देशांत हा संदेश पोहोचवा. ‘देवाने इस्राएलच्या लोकांना पांगविले. पण देव त्यांना पुन्हा गोळा करील आणि तो आपल्या कळपावर (लोकांवर) मेंढपाळाप्रमाणे लक्ष ठेवील.’ 11 परमेश्वर याकोबला परत आणील. परमेश्वराच्या लोकांपेक्षा बलवान असलेल्या लोकांपासून परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करील. 12 इस्राएलचे लोक सियोनच्या शिखरावर येतील आणि आनंदाने आरोळ्या ठोकतील. परमेश्वराने दिलेल्या चांगल्या गोष्टींमुळे त्यांचे चेहरे आनंदाने उजळतील. परमेश्वर त्यांना धान्य, ताजा द्राक्षरस, ताजे तेल, कोकरे आणि गाई देईल. भरपूर पाणी मिळालेल्या बागेप्रमाणे त्यांची स्थिती होईल. इस्राएलच्या लोकांना पुन्हा कधीही त्रास होणार नाही. 13 मग इस्राएलमधील तरुणी आनंदित होऊन नाचतील आणि तरुण व वृद्ध त्यांच्या नाचात सामील होतील. मी त्यांचे दु:खाचे सुखात रुपांतर करीन. मी इस्राएलच्या लोकांना समाधानात ठेवीन. मी त्यांच्या दु:खाचे सुखात रुपांतर करीन. 14 मी याजकांना भरपूर अन्न देईन. मी दिलेल्या चांगल्याचुंगल्या गोष्टींमुळे माझ्या लोकांचे समाधान होईल.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. 15 परमेश्वर म्हणतो, “रामामधून आवाज ऐकू येईल. तो भयंकर आकांत असेल खूप शोक असेल. राहेल आपल्या मुलांसाठी रडेल तिची मुले मेल्यामुळे ती कोणाकडूनही सांत्वन करुन घेणार नाही.” 16 पण परमेश्वर म्हणतो, “रडू नकोस! तुझे डोळे आसवांनी भरु नकोस तुझ्या कामाबद्दल तुला बक्षीस मिळेल” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “इस्राएलचे लोक त्यांच्या शत्रूंच्या देशातून परत येतील. 17 इस्राएल, तुला आशा आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “तुझी मुले त्यांच्या स्वत:च्या देशात परत येतील. 18 एफ्राईमला रडताना मी ऐकले आहे. एफ्राईमला मी पुढील गोष्टी बोलताना ऐकले आहे. ‘परमेश्वर तू खरोखरच मला शिक्षा केलीस आणि मी धडा शिकलो. मी बेबंद वासराप्रमाणे होतो. कृपा करुन मला शिक्षा करण्याचे थांबव. मी तुझ्याकडे परत येईन. तू खरोखरच, परमेश्वर, माझा देव आहेस. 19 परमेश्वरा, मी तुझ्यापासून भटकले होते. पण मी केलेली पापे मला कळली, म्हणून मी माझे मन आणि जीवन बदलले. मी तरुण असताना केलेल्या मूर्खपणाच्या गोष्टींची मला लाज वाटते. त्यामुळे मला ओशाळे वाटते.” 20 देव म्हणतो, “एफ्राईम माझा लाडका मुलगा आहे, हे तुम्हांला माहीतच आहे मी त्याच्यावर प्रेम करतो. हो! मी नेहमीच एफ्राईमवर टीका केली. पण तरीही मला त्याची आठवण येते. तो मला अतिशय प्रिय आहे आणि मी खरोखरच त्यांच्यावर दया करतो.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. 21 “इस्राएलच्या लोकानो, रस्त्यांवर खुणांचे फलक लावा. घराकडे जाणाऱ्या वाटेवर खूण करा. वाटेवर लक्ष ठेवा. तुम्ही ज्या रस्त्यावरुन जात आहात. त्याचे स्मरण ठेवा. इस्राएल माझ्या पत्नी, घरी ये. तुझ्या गावांना परत ये. 22 तू विश्वासघातकी मुलगी होतीस. पण तू बदलशील. तू घरी येण्याआधी किती वेळ वाट बघशील?” “परमेश्वराने अघटित निर्माण केले आहे. स्त्रीला पुरुषाभोवती फिरु दिले.“ 23 “सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “यहूदाच्या लोकांसाठी मी पुन्हा चांगल्या गोष्टी करीन. कैदी म्हणून नेलेल्या लोकांना परत आणीन. त्या वेळी, यहूदाच्या शहरांत व गावांत राहणारे सर्व लोक म्हणतील, ‘सदगृह, पवित्र पर्वतावर, परमेश्वर तुझे कल्याण करो!“ 24 “यहूदातील सर्व गावांतील लोक एकत्र येतील व तेथे शांतता नांदेल. यहुदामधील शेतकरी आणि (मेंढ्यांचे) कळप घेऊन फिरणारे सर्वजण शांतीने राहतील. 25 दुबळ्या आणि थकलेल्या लोकांना मी आराम आणि शक्ती देईन. मी दु:खितांच्या इच्छा पुऱ्या करीन.” 26 हे ऐकल्यानंतर, मी (यिर्मया) उठलो, आणि आजूबाजूला पाहिले. ती खरोखरच फार सुखद निद्रा होती. 27 “असे दिवस येतील,” हा परमेश्वराचा संदेश आहे. “की तेव्हा मी यहूदाच्या व इस्राएलच्या घराण्यांची वृद्धी होण्यास मदत करीन. मी त्यांच्या मुलांची व गुराढोरांचीही वृद्धी होण्यास मदत करीन. हे सर्व जणू काही झाडे लावून त्याची निगा राखण्यासारखे असेल. 28 पूर्वी मी यहूदा आणि इस्राएल यांच्यावर लक्ष ठेवले. व त्यांना उपटून काढण्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट पाहिली मी त्यांना फाडून काढले. मी त्यांचा नाश केला. मी त्यांच्यावर खूप संकटे आणली. पण आता, त्यांनी पुन्हा उभे राहावे व सामर्थ्यवान व्हावे म्हणून लक्ष ठेवीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. 29 “आई-वडिलांनी आंबट द्राक्षे खाल्ली,पण त्याची चव मात्र मुलांना चाखावी लागली.ही म्हण लोक पुन्हा कधीही वापरणार नाहीत. 30 प्रत्येकजण आपल्या पापाने मरेल. जो आंबट द्राक्षे खाईल, तोच त्याची चव चाखील.” 31 परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या: “मी इस्राएलच्या व यहूदाच्या घराण्याशी नवा करार करण्याची वेळ येत आहे. 32 मी त्यांच्या पूर्वजांशी केलेल्या कराराप्रमाणे तो असणार नाही. जेव्हा मी त्यांना हाताला धरुन मिसरच्या बाहेर आणले होते, तेव्हा तो करार केला होता. तेव्हा मी त्यांचा स्वामी होतो. पण त्यांनी त्या कराराचा भंग केला.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. 33 “भविष्यात, मी इस्राएलच्या लोकांबरोबर पुढीलप्रमाणे करार करीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी माझी शिकवण त्यांच्या मनावर बिंबवीन आणि त्यांच्या हृदयावर कोरीन. मी त्यांचा देव असेन व ते माझे लोक असतील. 34 लोकांना, त्यांच्या शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना परमेश्वराची ओळख करुन द्यावी लागणार नाही. का? कारण सर्वजण, लहानापासून थोरापर्यंत राजापासून रंकापर्यंत, मला ओळखत असतील.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी त्यांना क्षमा करीन. मी त्यांच्या पापांचे स्मरण ठेवणार नाही.” 35 परमेश्वर म्हणतो, “परमेश्वर दिवसा सूर्याला प्रकाशित करतो आणि रात्री चंद्र व तारे यांना प्रकाशित करतो. परमेश्वर समुद्र घुसळतो म्हणून समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळतात. सर्वशक्तिमान परमेश्वर असे त्याला म्हणतात.” 36 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “इस्राएलचे वंशज कधीही राष्ट्र बनल्याखेरीज राहणार नाहीत. सूर्य, चंद्र, तारे व समुद्र ह्यांच्यावरील माझे नियंत्रण ढळले, तरच असे होणे शक्य आहे.” 37 परमेश्वरा म्हणतो, “मी इस्राएलच्या वंशजांना कधीही नाकारणार नाही. लोक जर आकाशाचे मोजमाप करु शकले किवा पृथ्वीच्या पोटातील सर्व रहस्ये जाणू शकले, तरच हे घडणे शक्य आहे. तरच मी इस्राएलच्या वंशजाना नाकारीन. त्यानी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मगच मी त्यांना दूर करीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. 38 “असे दिवस येत आहेत की, हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे परमेश्वरासाठी यरुशलेम नगरी पुन्हा उभारली जाईल. हानानेलच्या बुरुजापासून कोपऱ्याच्या दारापर्यंत सगळी नगरी पुन्हा उभारली जाईल. 39 ओळंबा कोपऱ्याच्या दारापासून थेट गारेबच्या टेकडीपर्यंत जाईल आणि तेथून गवाथकडे वळेल. 40 ज्या दरीत प्रेते व राख टाकली जाते, ती परमेश्वराला पवित्र वाटेल. ह्यात पूर्वेकडच्या किद्रोन दरीपासून घोडे दाराच्या कोपऱ्यापर्यंतच्या पठाराचा समावेश असेल. हा सर्व प्रदेश परमेश्वराला पवित्र वाटेल. यरुशलेमचा पुन्हा कधीही विध्वंस केला जाणार नाही वा तिचा नाश होणार नाही.”

32:1 सिद्कीया यहूदाचा राजा होता त्याच्या कारकिर्दीचा दहाव्या वर्षीयिर्मयाला परमेश्वराकडून एक संदेश आला. सिद्कीया राजाच्या कारकिर्दीचे दहावे वर्ष म्हणजेच नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीचे अठरावे वर्ष होय. 2 त्यावेळी बाबेलच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातला होता आणि यिर्मया चौकीदारांच्या पहाऱ्यात असलेल्या यहूदाच्या राजवाड्याच्या चौकात कैद केला गेला होता. 3 (यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला यिर्मयाने केलेले भविष्यकथन आवडले नाही. म्हणून त्याने यिर्मयाला कैद केले होते. यिर्मयाने सांगितले होते “परमेश्वर म्हणतो, ‘मी लवकरच यरुशलेम बाबेलच्या राजाच्या ताब्यात देईन. नबुखद्नेस्सर ही नगरी जिंकेल यहूदाचा राजा सिद्कीया खास्द्यांच्या सैन्यापासून पळून जाऊ शकणार नाही. त्याला बाबेलच्या राजाच्या ताब्यात दिले जाईल सिद्कीया बाबेलच्या राजाशी प्रत्यक्ष समोरासमोर बोलेल. 4 5 बाबेलचा राजा सिद्कीयाला बाबेलला नेईल. मी त्याला शिक्षा करेपर्यत तो तेथेच राहील.’ हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. ‘तुम्ही जर बाबेलच्या सैन्याबरोबर युद्ध केलेत, तरी तुम्ही त्यात विजयी होणार नाही.”.) 6 यिर्मया कैदेत असताना म्हणाला, “मला परमेश्वराचा संदेश मिळाला आहे. तो पुढीलप्रमाणे आहे. 7 यिर्मया, तुझे काका शल्लूम यांचा मुलगा हानामेल लवकरच तुझ्याकडे येईल आणि तुला म्हणेल ‘अनाथोथजवळचे माझे शेत, यिर्मया, तू विकत घे. तू माझा अगदी निकटचा नातेवाईक असल्याने, तूच ते विकत घे. तो तुझाच हक्क आणि तुझीच जबाबदारी आहे.’ 8 “मग परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच घडले. माझा चुलतभाऊ हानामेल पहारेकऱ्यांच्या चौकात मला भेटला आणि म्हणाला, ‘यिर्मया, अनाथोथ गावाजवळचे माझे शेत तू विकत घे. अनाथोथ हे गाव बन्यामीनच्या कुळाच्या मालकीच्या प्रदेशात होते. तूच ते तुझ्यासाठी विकत घे. कारण ते विकत घेऊन त्याचा मालक होण्याचा तुझा हक्क आणि जबाबदारी आहे.’“तेव्हा मला कळले की हाच देवाचा संदेश होता. देवाचा संदेश असाच आहे हे मला माहीत होतेच. 9 म्हणून मी माझा चुलतभाऊ हानामेल याच्याकडून ते शेत विकत घेतले. त्याबद्दल मी त्याला 17 चांदीची नाणीदिली. 10 मी खरेदीखतावर सही केली आणि त्याची एक मोहोरबंद प्रत माझ्याजवळ ठेवली काही लोकांना साक्षीला ठेवून मी सर्व गोष्टी केल्या, मी ताजव्यात चांदी मोजली. 11 मग मी माझ्याजवळची मोहोरबंद खरेदीखताची प्रत आणि दुसरी उघडी प्रत अशा दोन्ही प्रती घेतल्या व. 12 त्या बारुखला दिल्या, बारुख हा नरीयाचा व नरीया हा महसेयाचा मुलगा होता. मोहोरबंद खरेदीखतात खरेदीच्या सर्व शर्ती नमूद केलेल्या होत्या. माझा चुलत भाऊ हानामेल व इतर साक्षीदार तेथे असतानाच मी खरेदीखत बारुखला दिले. त्यावर इतर साक्षीदारांनीही सह्या केल्या. ते खरेदीखत मी बारुखला देताना चौकात बसलेल्या यहूदाच्या पुष्कळ लोकांनी पाहिले. 13 “लोक सर्व पाहत असतानाच, मी बारुखला म्हणालो, 14 “सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘खरेदीखताच्या, मोहोरबंद व उघड, अशा दोन्ही प्रती मातीच्या मडक्यात ठेव म्हणजे त्या दीर्घ काळ चांगल्या टिकून राहतील. 15 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “भविष्यकाळात माझी माणसे इस्राएलमध्ये पुन्हा एकदा घरे, शेते आणि द्राक्षमळे विकत घेतील.” 16 “नरीयाचा मुलगा बारुख ह्याला खरेदीखत दिल्यावर मी परमेश्वराची प्रार्थना केली. मी म्हणालो, 17 “परमेश्वर देवा, तू आकाश आणि पृथ्वी निर्माण केलीस. तुझ्या सामर्थ्याच्या बळावर आणि पसरलेल्या हातामुळे तू ते निर्माण केलेस. तुला आश्र्चर्य कारक वाटण्याजोगे काहीही नाही. तुला काहीही असाध्य नाही. 18 परमेश्वर, तू हजारो लोकांची निष्ठा सांभाळणारा व त्यांच्यावर कृपा करणारा आहेस. पण तूच वडिलांच्या पापांची शिक्षा मुलांना करतोस. सर्वश्रेष्ठ व सामर्थ्यवान देवा, तुझे नाव आहे सर्वशक्तिमान परमेश्वर. 19 परमेश्वर, फार मोठ्या योजना आखतो आणि त्या पार पाडतो. लोक करीत असलेली प्रत्येक कृती तू पाहतोस. तू सत्कृत्ये करणाऱ्यांना बक्षिस देतोस व दुष्कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतोस. म्हणजेच प्रत्येकाला त्याच्या पात्रतेप्रमाणे फळ देतोस. 20 परमेश्वरा, तू मिसर देशात अद्भुत चमत्कार केलास. आजपावेतोसुद्धा तू अद्भूत चमत्कार केले आहेस. तू हे चमत्कार इस्राएलमध्ये तर केलेच पण जेथे जेथे लोक आहेत तेथे तेथे केलेस. त्यामुळेच तुझी कीर्ती झाली. 21 परमेश्वरा, अद्भूत चमत्कारांच्याआधारे तू इस्राएलच्या लोकांना मिसरमधून बाहेर आणलेस. ह्या गोष्टी तू स्वत:च्या सामर्थ्यवान हाताच्या बळावर केल्यास. तुझे सामर्थ्य विस्मयकारक आहे.! 22 “परमेश्वरा, ही भूमी तू इस्राएलच्या लोकांना दिलीस. फार पूर्वी हीच भूमी तू त्यांच्या पूर्वजांना द्यायचे कबूल केले होतेस. ही फार चांगली भूमी आहे. ह्या चांगल्या भूमीवर अनेक चांगल्या गोष्टी आहेत. 23 इस्राएलचे लोक ह्या देशात आले आणि त्यांनी तो देश आपल्या मालकीचा केला. पण त्या लोकांनी तुझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांनी तुझ्या शिकवणुकीचा स्वीकार केला नाही. तुझ्या आज्ञेप्रमाणे ते वागले नाहीत. म्हणून तू इस्राएलच्या लोकांच्याबाबत भयंकर गोष्टी घडवून आणल्यास. 24 “आणि आता, शत्रूने नगरीला वेढा घातला आहे. यरुशलेमची तटबंदी ओलांडून जाण्यासाठी व नगरी हस्तगत करण्यासाठी ते उतरंडी रचीत आहेत. युद्ध उपासमार व भयंकर रोगराई यांच्या जोरावर बाबेलचे सैन्य यरुशलेम नगरीचा पराभव करील. आता बाबेलचे सैन्य यरुशलेमवर हल्ला करीत आहे. परमेश्वरा, असे होईल असे तू म्हणाला होतास आणि पाहा आता तसेच घडत आहे. 25 “परमेश्वरा, माझ्या स्वामी, त्या सर्व वाईट गोष्टी घडत आहेत. पण तू मला सांगत आहेस, “यिर्मया, चांदी देऊन शेत विकत घे आणि खरेदीचे साक्षीदार म्हणून काही लोकांना निवड’ बाबेलचे सैन्य नगरी जिंकण्याच्या बेतात असताना, तू मला हे सांगत आहेस. मी माझा पैसा अशा रीतीने वाया का घालवावा?” 26 मग यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. 27 “यिर्मया, मी परमेश्वर आहे पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाचा मी देव आहे. यिर्मया, मला काहीच अशक्य नाही, हे तुला माहीत आहेच.” 28 परमेश्वर असेही म्हणाला, “मी लवकरच यरुशलेम नगरी बाबेलचे सैन्य आणि बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्यांच्या ताब्यात देईन. ते सैन्य नगरी जिंकेल. 29 बाबेलच्या सैन्याने नगरीवर हल्ला करण्यास अगोदरच सुरवात केली आहे. ते लवकरच नगरीत प्रवेश करतील व आग लावतील. ते नगरी बेचिराख करतील. यरुशलेममधील लोकांनी घरांच्या धाब्यावर दैवत बआल याला नैवेद्य दाखवून मला संतापवले. लोकांनी इतर मूर्तीना पेये अर्पण केली. बाबेलचे सैन्य ती सर्व घरे जाळून टाकेल. 30 मी इस्राएल आणि यहूदा येथील लोकांवर नजर ठेवली. ते करीत असलेली प्रत्येक गोष्ट वाईट आहे. ते लहान असल्यापासून दुष्कृत्ये करीत आहेत. इस्राएलच्या लोकांनी मला फार संतापविले. त्यांनी स्वत:च्या हाताने तयार केलेल्या मूर्तींची पूजा केल्याने मला अतिशय राग आला.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. 31 “यरुशलेमच्या उभारणीपासून आतापर्यंत ह्या नगरीतल्या लोकांनी मला संतापविले आहे. त्यांनी मला इतके संतापविले की मला ती नगरी नजरे पुढून नाहीशी केलीच पाहिजे. 32 इस्राएल व यहूदा येथील लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांमुळे मी यरुशलेमचा नाश करीन. लोक, त्यांचे राजे, नेते, त्यांचे याजक आणि संदेष्टे, यहूदातील व यरुशलेममधील लोक यांनी मला फार संतापविले आहे. 33 “त्या लोकांनी मदतीसाठी माझ्याकडे यावे पण त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली. मी त्यांना शिकविण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण त्यांनी माझे ऐकले नाही. मी त्यांना नीती शिकवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी लक्ष दिले नाही. 34 त्या लोकांनी त्यांच्या मूर्ती तयार केल्या, मला त्या मूर्तीची चीड येते. त्यानी त्या मूर्ती माझ्या नावावर असलेल्या मंदिरात ठेवल्या. त्यामुळे माझे मंदिर ‘अपवित्र झाले. 35 “बेन-हिन्नोमच्या दरीत त्यांना बआल या दैवतासाठी उच्चस्थाने बांधली. ही पूजास्थाने त्यांनी आपल्या मुलामुलींना जाळून मोलेखला बआलबळी देण्यासाठी बांधली. अशा भयंकर गोष्टी करण्याची आज्ञा मी त्यांना कधीच दिली नव्हती. यहूदातील लोक अशा भयंकर गोष्टी करतील, असे माझ्या कधीही मनातसुद्धा आले नव्हते. 36 “तुम्ही लोक म्हणत आहात ‘बाबेलचा राजा यरुशलेम जिंकेल ह्या नगरीचा पराभव करण्यासाठी तो युद्ध, उपासमार आणि भयंकर रोगराई ह्यांचा उपयोग करील’ पण परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, 37 “मी इस्राएल व यहूदा यामधील लोकांना त्यांचा देश सोडण्यास बळजबरीने भाग पाडले आहे. मी त्यांच्यावर भयंकर रागावलो आहे. पण मी त्यांना या ठिकाणी परत आणीन. मी त्यांना जेथे जेथे जायला भाग पाडले, तेथून तेथून मी त्यांना गोळा करीन. मी त्यांना येथे परत आणीन. मी त्यांना शांततेत व सुखरुप राहू देईन. 38 इस्राएलमधील आणि यहूदातील लोक माझे होतील आणि मी त्यांचा देव होईन. 39 त्यांनी खरोखरच एक व्हावे म्हणून मी त्यांच्या मनात तशी इच्छा उत्पन्न करीन. त्यांच्या आयुष्यभर माझ्या उपासनेची खरोखरीची इच्छा हेच त्यांचे एकमेव ध्येय असेल. माझी उपासना आणि आदर केल्याने त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे खरोखरच भले होईल. 40 “‘यहूदातील आणि इस्राएलमधील लोकांबरोबर मी एक करार करीन. तो करार चिरंतन राहील. ह्या कराराप्रमाणे, मी ह्या लोकांकडे कधी पाठ फिरविणार नाही. मी त्यांच्याशी नेहमी चांगला वागेन. मी त्यांना माझा आदर करायची भावना देईन. मग ते माझ्यापासून कधीही दूर जाणार नाहीत. 41 ते मला प्रसन्न ठेवतील. त्यांचे भले करण्यात मला मौज वाटेल. मी त्यांना ह्या भूमीत रुजवीन आणि वाढवीन. मी माझ्या अंत:करणापासून हे करीन.”‘ 42 परमेश्वर असे म्हणतो, “मी इस्राएलमधील आणि यहूदातील लोकांवर मोठे अरिष्टही आणीन. मी त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी करण्याचे कबूल केले आहे. 43 तुम्ही लोक म्हणत आहात, ‘ही जमीन म्हणजे ओसाड वाळवंट आहे. तेथे कोणी मनुष्यप्राणी वा पशू नाहीत. बाबेलच्या सैन्याने या देशाचा पराभव केला.’ पण भविष्यकाळात, ह्या देशात लोक पुन्हा एकदा शेते खरेदी करतील. 44 लोक आपले धन वापरुन शेते खरेदी करतील. ते करारावर सह्या करतील आणि ते मोहोरबंद करतील. लोक खरेदीखतांवर सह्या करतील, तेव्हा इतर लोक साक्षी असतील. बन्यामीनच्या देशात, लोक पुन्हा जमीन विकत घेतील, यरुशलेम भोवतीच्या प्रदेशातील जमीन ते खरेदी करतील. यहूदातील शहरांत ते शेते विकत घेतील. त्याचप्रमाणे लोक डोगराळ प्रदेश पश्र्चिमेकडील डोंगरपायथा व दक्षिणेकडील वाळवंट येथेही लोक जमीन विकत घेतील. मी तुमच्या लोकांना परत घरी आणीन. मग असे घडून येईन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

33:1 यिर्मयाला दुसऱ्यांदा परमेश्वराचा संदेश आला. यिर्मया अजूनही पहारेकऱ्यांच्या चौकात कैद होता. 2 परमेश्वराने पृथ्वी निर्माण केली आणि तो तिचे रक्षण करतो, परमेश्वर हेच त्याचे नाव. परमेश्वर म्हणतो, 3 “यहूदा, माझा धावा कर. मी ओ देईन. मी तुला महत्वाची रहस्ये सांगीन. ह्या गोष्टी तू पूर्वी कधीच ऐकल्या नसशील. 4 परमेश्वर इस्राएलचा देव आहे. परमेश्वर यरुशलेममधील घरांविषयी व यहूदातील राजांच्या राजवाड्यांविषयी पुढील गोष्टी सांगतो, शत्रू ती घरे पाडील. नगरांच्या तटबंदीपर्यंत तो उतरंडी बांधील. शत्रू शहरांतील लोकांशी तलवारीने लढेल. 5 “यरुशलेमच्या लोकांनी खूप वाईट गोष्टी केल्या. म्हणून मला त्या लोकांचा खूप राग आला. मी त्यांच्याविरुद्ध गेलो. मी तेथे पुष्कळ माणसे मारीन. बाबेलचे सैन्य यरुशलेमविरुद्ध लढण्यास येईल. यरुशलेमच्या घरांत खूप मृतदेह असतील. 6 “पण मग मी त्या नगरीतील लोकांना बरे करीन. मी त्यांना शांती आणि सुरक्षा ह्यांचा आनंद लुटू देईन. 7 यहूदा आणि इस्राएल यांना मी परत आणीन पूर्वीप्रमाणेच मी त्या लोकांना शक्तिशाली करीन. 8 त्यांनी माझ्याशी पापे केली. पण मी ती पापे धुवून टाकीन. ते माझ्याविरुद्ध लढले पण मी त्यांना क्षमा करीन. 9 मग यरुशलेम एक सुंदर ठिकाण होईल. लोक सुखी असतील दुसऱ्या राष्ट्रांतील लोक त्या नगरीची स्तुती करतील. यरुशलेममध्ये चांगल्या गोष्टी घडत असल्याचे ऐकून इतर लोक प्रशंसा करतील. मी इस्राएलला शांतता आणि हित प्राप्त करुन दिल्यामुळे त्यांना माझ्याबद्दल आदरयुक्त दरारा वाटेल व त्यामुळे ते कापतील. 10 “तुम्ही लोक म्हणत आहात “आमचा देश म्हणजे ओसाड वाळवंट आहे. तेथे कोणी माणसे वा प्राणी राहत नाहीत.’ यरुशलेमच्या रस्त्यांवर व यहूदाच्या शहरात सध्या शांतता आहे. पण लवकरच तेथे कोलाहल सुरु होईल. 11 तेथे सुखाचे व आनंदाचे कल्लोळ उठतील. नव-वर-वधूंचे सुखसंवाद ऐकू येतील. परमेश्वराला अर्पण करण्यासाठी भेटी घेऊन परमेश्वराच्या मंदिरात येणाऱ्या लोकांचे आवाज ऐकू येतील. ते लोक म्हणतील, ‘परमेश्वर देवाची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे. परमेश्वराची कृपा चिरंतन आहे!’ मी यहूदासाठी चांगल्या गोष्टी करीन. म्हणून लोक असे म्हणतील. ते सर्व सुरुवातीला जसे होते तसे असेल.” देवाने ह्या गोष्टी सांगितल्या. 12 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “आता ही जागा निर्जन आहे. तेथे मनुष्य वा प्राणी कोणीही नाही. पण यहूदातील गावे माणसांनी गजबजतील. तेथे मेंढपाळ असतील आणि त्यांच्या मेंढ्यांना रवंथ करण्यासाठी कुरणेही असतील. 13 मेंढ्या मेंढपाळांच्या पुढे चालत असताना. मेंढपाळ त्या मोजतील. सर्व देशातील लोक-डोंगराळ प्रदेशातील, पश्र्चिमेकडच्या डोंगरपायथ्याचे व नेगेव मधील लोक आणि यहूदातील इतर शहरांतील माणसे मेंढ्यांची मोजदाद करतील. 14 हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी इस्राएल आणि यहूदा येथील लोकांना विशेष वचन दिले आहे मी कबूल केलेल्या गोष्टी करण्याची वेळ येत आहे. 15 त्यावेळी दावीदाच्या वंशवृक्षाची एक चांगली शाखा मी वाढवीन ती ‘शाखा’ देशासाठी चांगल्या आणि योग्य गोष्टी करील. 16 ह्या ‘शाखेच्या’ काळात यहूदातील लोकांचे रक्षण केले जाईल. लोक यरुशलेममध्ये सुखरुप राहतील. त्या शाखेचे नाव ‘परमेश्वर चांगला आहे” असे आहे. 17 परमेश्वर म्हणतो, “दावीदाच्या घराण्यातील माणूस नेहमीच सिंहासनावर बसेल व इस्राएलवर राज्य करील. 18 आणि याजक नेहमी लेवी घराण्यातील असतील. ते याजक नेहमी माझ्यासमोर उभे राहतील आणि ते मला होमार्पण, धान्य अर्पण करतील आणि बळीही अर्पण करतील.” 19 यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. 20 परमेश्वर म्हणतो, “दिवस आणि रात्र यांच्याबरोबर मी करार केला आहे. ते निरंतर राहतील असे मी मान्य केले, तुम्ही तो करार बदलू शकत नाही. दिवस आणि रात्र नेहमी योग्य वेळेलाच येतील. तुम्ही जर हा करार बदलू शकला, 21 तरच तुम्ही माझा दावीद व लेवी यांच्याबरोबर झालेला करार बदलू शकाल. मग दावीदाचे वंशज राजे होणार नाहीत आणि लेवीच्या घराण्यातून याजक येणार नाहीत. 22 पण मी माझा सेवक दावीद आणि लेवीचे कूळ यांना मोठा वंश देईल. आकाशातील ताऱ्यांएवढी त्यांच्या वंशजांची संख्या असेल कोणीही आकाशातील तारे मोजू शकत नाही. अथवा समुद्रकाठच्या वाळूच्या कणांएवढी त्यांची संख्या असेल. कोणीही वाळूचे कण मोजू शकत नाही.” 23 यिर्मयाला परमेश्वराचा पुढील संदेश मिळाला 24 “यिर्मया, लोक काय बोलतात, ते तू ऐकलेस का? ते लोक म्हणतात ‘परमेश्वर इस्राएल आणि यहूदा या घराण्यापासून दूर गेला. परमेश्वराने त्या लोकांची निवड केली होती.’ पण आता तो त्यांचा राष्ट्र म्हणून सुद्धा स्वीकार करीत नाही.” 25 परमेश्वर म्हणतो, “माझा दिवस व रात्र यांच्याबरोबरच्या कराराचा जर भंग झाला आणि मी जर आकाश आणि पृथ्वी ह्यांच्यासाठी नियम केले नसते, तर कदाचित् मी त्या लोकांना सोडले असते. 26 मग कदाचित् याकोबच्या वंशजांचा मी त्याग केला असता आणि दावीदच्या वंशजांना, अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या वंशजांवर राज्य करु दिले नसते. पण दावीद माझा सेवक आहे आणि मला त्या लोकांची दया येईल आणि प्रेम वाटेल. मी कैद्यांना पुन्हा त्यांच्या मायभूमीत परत आणीन.”

34:1 यिर्मयाला देवाचा संदेश आला. नबुखद्नेस्सर ह्या बाबेलच्या राजाने यरुशलेम व तिच्या आजूबाजूची गावे ह्यांच्याविरुध्द जेव्हा युद्ध पुकारले तेव्हा यिर्मयाला हा संदेश मिळाला. नबुखद्नेस्सरकडे त्याचे स्वत:चे सैन्य व त्याच्या साम्राज्यातील इतर राज्यांची सैन्ये व लोक होते. 2 संदेश असा होता, परमेश्वर इस्राएलचा देव म्हणतो, “यिर्मया, यहूदाचा राजा सिद्कीया याच्याकडे जा व पुढील निरोप दे. ‘सिद्कीया, परमेश्वर असे म्हणतो की मी लवकरच यरुशलेम बाबेलच्या राजाच्या ताब्यात देईन व ती तो भस्मसात करील. 3 सिद्कीया, तू बाबेलच्या राजाच्या तावडीतून सुटणार नाहीस. तुला पकडून निश्र्चितपणे त्याच्या ताब्यात दिले जाईल. तू बाबेलच्या राजाला प्रत्यक्ष पाहशील. तुम्ही समोरासमोर येऊन एकमेकांशी बोलाल व तू बाबेलला जाशील. 4 सिद्कीया, यहूदाच्या राजा, परमेश्वराचे वचन ऐक. परमेश्वर तुझ्याबद्दल असे म्हणतो तुला तलवारीने मृत्यू येणार नाही. 5 तुला शांतपणे मरण येईल. तुझ्या आधी जे तुझे पूर्वज राजे झाले व ज्यांनी राज्य केले, त्यांना मान देण्यासाठी लोकांनी ज्याप्रमाणे दफनाच्या वेळी अग्नी पेटविला, तसाच लोक तुला मान देण्यासाठी पेटवतील. ते तुझ्याकरिता शोक करतील व म्हणतील “हाय रे माझ्या धन्या!” मी स्वत: तुला हे वचन देत आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे. 6 यिर्मयाने परमेश्वराचा संदेश यरुशलेममध्ये सिद्कीयाला दिला. 7 तेव्हा बाबेलच्या राजाचे सैन्य यरुशलेमविरुद्ध लढत होते. यहूदातील ज्या शहरांचा पाडाव झाला नव्हता, त्यांच्याशीही बाबेलचे सैन्य लढत होते. ती शहरे म्हणजे लाखीश व अजेका ही होत. यहूदामध्ये तटबंदी असलेली फक्त ही दोनच शहरे राहिली होती. 8 सर्व इब्री गुलांमांना स्वातंत्र्य देण्याचा करार सिद्कीया राजाने यरुशलेमच्या सर्व लोकांबरोबर केला होता. हा करार झाल्यावर यिर्मयाला देवाचा संदेश आला. 9 प्रत्येकाने आपल्या इब्री गुलामांना बंधमुक्त करावे अशी अपेक्षा होती. सर्व इब्री गुलामांना पुरुष व स्त्री यांना बंधमुक्त करायचे होते. कोणीही यहुदी कुळातील माणसाला गुलामगिरीत ठेवू नये, अशी अपेक्षा होती. 10 यहूदातील सर्व नेत्यांनी व सर्व लोकांनी या कराराला मान्यता दिली. प्रत्येकजण आपल्याकडील स्त्री वा पुरुष गुलामांना ह्यापुढे गुलाम म्हणून न ठेवता मुक्त करणार होता. प्रत्येकजण कबूल झाला आणि सगळे गुलाम मुक्त झाले. 11 पण त्यानंतरज्या लोकांकडे गुलाम होते, त्या लोकांनी आपला विचार बदलला आणि त्यांनी मुक्त केलेल्यांना पकडून पुन्हा गुलाम केले. 12 मग यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. 13 यिर्मया, परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव असे म्हणतो: “तुमचे पूर्वज मिसरमध्ये गुलाम होते. मी त्यांना तेथून सोडविले हे करताना मी त्यांच्याबरोबर एक करार केला. 14 मी तुमच्या पूर्वजांना म्हणालो: ‘प्रत्येक सात वर्षाच्या अखेरीला प्रत्येकाने आपल्याकडील इब्री गुलामांना मुक्त केलेच पाहिजे. तुमच्या एखाद्या इब्री बांधवाने स्वत:ला तुम्हाला विकले असेल, तर त्याने सहा वर्षे तुमची गुलामी केल्यावर तुम्ही त्याला जाऊ दिलेच पाहिजे.’ पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही वा माझ्याकडे लक्ष दिले नाही. 15 काही वेळा पूर्वी, योग्य ते करण्यापासून तुम्हीही विचलित झालात. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्याकडे गुलाम असलेल्या इब्री बांधवाला स्वातंत्र्य दिले आणि माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंदिरात, माझ्यापुढे एक करारही केलात. 16 पण आता, तुमचे मन बदलले. तुम्ही माझ्या नावाचा मान राखीत नाही, हे तुम्ही दाखवून दिलेत. तुम्ही हे कसे काय केले? तुम्ही प्रत्येकाने मुक्त केलेल्या गुलामांना स्त्रिया व पुरुष दोघांनाही परत पकडले. त्यांना बळजबरीने पुन्हा गुलाम केलेत. 17 “म्हणून परमेश्वर असे म्हणतो, ‘तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही. तुम्ही तुमच्या इब्री गुलामांना स्वातंत्र्य दिले नाही. तुम्ही कराराचे पालन केले नाही, म्हणून आता ‘मी “स्वातंत्र्य” देईन. हा परमेश्वराचा संदेश आहे. युद्धात, भयंकर रोगराईने अथवा उपासमारीने मरण्याचे “स्वातंत्र्य” (मी तुम्हाला देईन) मी तुमच्याबाबतीत असे काहीतरी करीन की त्याबद्दल ऐकून पृथ्वीवरची राज्ये भीतीने चळाचळा कापतील. 18 कराराचा भंग करणाऱ्या आणि माझ्यासमोर दिलेले वचन न पाळणाऱ्या लोकांना मी शत्रूच्या हवाली करीन. ह्या लोकांनी वासराचे दोन तुकडे केले व ते त्यामधून चालत गेले. 19 माझ्यासमोर करार करुन, वासराच्या दोन तुकड्यांमधून चालत जाणारे हे लोक म्हणजे यहूदा आणि यरुशलेमचे नेते, न्यायालयातील महत्वाचे अधिकारी, याजक आणि या देशातील लोक होत. 20 मी ह्या सर्व लोकांना त्यांच्या शत्रूंच्या अथवा त्यांना मारु इच्छिणाऱ्या कोणाही व्यक्तीच्या हवाली करीन. त्यांची प्रेते म्हणजे पक्षी व वन्य पशूंचे भक्ष्य होतील. 21 मी यहूदाचा राजा सिद्कीया व तेथील नेते ह्यांना त्यांच्या शत्रूंच्या अथवा त्यांना मारु इच्छिणाऱ्या लोकांच्या स्वाधीन करीन. जरी बाबेलच्या सैन्याने यरुशलेम सोडलेअसले, तरी मी सिद्कीया आणि त्याच्या लोकांना बाबेलच्या राजाच्या सैन्याच्या हवाली करीन. 22 मी बाबेलच्या सैन्याला ‘हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे’ ‘परत यरुशलेममध्ये येण्याची आज्ञा देईन.” ते सैन्य यरुशलेमच्याविरुद्ध लढेल. ते ती नगरी ताब्यात घेतील, तिला आग लावतील आणि ती बेचिराख करतील. मी यहूदातील शहरांचा नाश करीन. ती शहरे म्हणजे ओसाड वाळवंट होईल ती निर्जन होईल.”

35:1 यहोयाकीम यहूदावर राज्य करीत असताना, यिर्मयाला देवाचा संदेश आला. यहोयाकीम हा योशीया राजाचा मुलगा होता. परमेश्वराकडून आलेला संदेश असा होता. 2 “यिर्मया, रेखाब्यांकडे जा त्यांना देवाच्या मंदिरातील एका बाजूच्या खोलीत बोलाव. त्यांना पिण्यास मद्य दे.” 3 म्हणून मी (यिर्मया) याजनाकडे गेलो. याजना हा यिर्मयाचामुलगा होता आणि यिर्मया हबसिन्याचा मुलगा होता. मी याजनाच्या सर्व भावांना व मुलांना आणि 4 रेखाबी कुटुंबीयांना एकत्र केले आणि त्यांना परमेश्वराच्या मंदिरात आणले. आम्ही सर्व हानानच्या मुलांच्या खोलीत गेलो. हानान हा इग्दल्याचा मुलगा होता व तो ‘देवाचा माणूस’ होता. ही खोली यहूदाच्या राजपुत्रांच्या खोली शेजारी होती. द्वारपाळ मासेया याच्या खोलीच्या वर ही खोली होती. मंदिराचा द्वारपाळ मासेया हा शल्लूमचा मुलगा होता. 5 नंतर मी (यिर्मयाने) त्या रेखाबे कुटुंबीयांसमोर मद्य भरलेले वाडगे व पेले ठेवले. मी म्हणालो, “थोडे मद्य प्या” 6 पण ते म्हणाले, “आम्ही कधीच मद्य पीत नाही कारण आमचे पूर्वज रेखाब यांचा मुलगा योनादाब यांनी आम्हाला तशी आज्ञा दिली आहे ‘तुम्ही आणि तुमच्या वंशजांनी कधीही दारु घेऊ नये’ असे त्यांनी सांगितले आहे. 7 शिवाय त्यांनी असेही सांगितले आहे की तुम्ही कधीही घरे बांधू नका. बी पेरु नका वा द्राक्षमळे लावू नका. ह्यातील कोणतीच गोष्ट तुम्ही कधीही करु नका. तुम्ही फक्त तंबूतच राहिले पाहिजे. तुम्ही असे केलेत तरच स्थलांतर करीत तुम्ही ज्या जागी आला आहात, तेथे दीर्घ काळ राहाल.’ 8 आमचे पूर्वज योनादाब यांनी घालून दिलेले निर्बंध आम्ही रेखाबे घराण्यातील लोक पाळत आलो आहोत. आम्ही कधीच मद्य घेत नाही. आमच्या बायका वा मुलेमुलीही मद्य घेत नाहीत. 9 आम्ही आम्हाला राहण्यासाठी घरे बांधीत नाही. आमची स्वत:च्या मालकीची शेते वा द्राक्षमळे नाहीत. आम्ही कधीही शेती करीत नाही. 10 आम्ही फक्त तंबूत राहत आलो आणि आमचे पूर्वज योनादाब यांनी सांगितल्याप्रमाणे वागत आलो. 11 पण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यहूदावर हल्ला केल्यावर. आम्हाला यरुशलेमला जावेच लागले. आम्ही एकमेकांना म्हणालो, ‘चला, आपण यरुशलेमला गेलेच पाहिजे. तरच खास्द्यांच्या आणि अराम्यांच्या सैन्यापासून आपला बचाव होईल.’ म्हणून आम्ही यरुशलेममध्ये राहिलो.” 12 मग यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. 13 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “यहूदातील व यरुशलेममधील लोकांना हा संदेश ऐकव. तुम्ही लोकांनी धडा शिकावा व माझ्या संदेशाचे पालन करावे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. 14 “रेखाबचा मुलगा योनादाब याने आपल्या मुलांना मद्य ‘पिऊ नका’ असे सांगितले आणि त्यांनी त्याचे ऐकले. आजपर्यंत त्यांच्या वंशजांनी आपल्या पूर्वजांच्या आज्ञेचे पालन केले. त्यांनी मद्य घेतले नाही. पण मी परमेश्वराने स्वत: तुम्हाला पुन्हा पुन्हा संदेश दिले, तरी यहूदाच्या लोकांनो, तुम्ही माझे ऐकले नाही. 15 इस्राएल आणि यहूदा येथील लोकांकडे मी माझे सेवक-संदेष्टे पाठविले. मी त्यांना तुमच्याकडे पुन्हा पुन्हा पाठविले. ते संदेष्टे म्हणाले ‘इस्राएल आणि यहूदा येथील प्रत्येक माणसाने दुष्कृत्ये करणे बंद करावे. तुम्ही चांगलेच असले पाहिजे. दुसऱ्या दैवतांना अनुसरु नका. त्यांची पूजा वा सेवा करु नका. तुम्ही माझे ऐकलेत, तर तुमच्या पूर्वजांना व तुम्हाला दिलेल्या देशात तुम्ही राहाल.’ पण तुम्ही माझ्या संदेशाकडे लक्ष दिले नाही. 16 योनादाबच्या वंशजांनी त्यांच्या पूर्वजांनी दिलेल्या आज्ञा पाळल्या. पण यहूदाच्या लोकांनी माझेही ऐकले नाही.” 17 म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “मी सांगतो, यहूदाचे आणि यरुशलेमचे वाईट होईल. लवकरच मी त्यांचे वाईट करीन. मी त्या लोकांशी बोललो, पण त्यांनी ऐकण्याचे नाकारले. मी त्यांना हाका मारल्या, पण त्यांनी ओ दिली नाही.” 18 नंतर यिर्मया रेखाब कुटुंबीयांना म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वर इस्राएलचा देव असे म्हणतो ‘तुम्ही तुमचे पूर्वज योनादाब ह्यांच्या आज्ञा पाळल्यात. त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे वागलात, त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट केलीत. 19 म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, रेखाबचा मुलगा योनादाब याच्या वंशजांपैकी एक नेहमीच माझ्या सेवेत राहील.”

36:1 यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. योशीयाचा मुलगा यहोयाकीम हा यहूदाचा राजा असताना त्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी यिर्मयाला परमेश्वराचा हा संदेश मिळाला. तो असा होता. 2 “यिर्मया, मोठा पट घे आणि मी तुला दिलेले सर्व संदेश त्यावर लिही. यहूदा, इस्राएल आणि इतर राष्ट्रे ह्यांच्याविषयी मी तुला सांगितले आहे. योशीयाच्या कारकिर्दीपासून आतापर्यंत मी तुला सांगितलेले सर्व लिही. 3 न जाणो यहूदाच्या घराण्याबाबत मी ज्या योजना आखल्या आहेत, त्या ऐकून ते दुष्कर्मे करण्याचे सोडून देतील. त्यांनी असे केल्यास, मी त्यांनी केलेल्या वाईट पापांबद्दल त्यांना क्षमा करीन.” 4 मग यिर्ययाने बारुख नावाच्या माणसाला बोलाविले. बारुख नेरीयाचा मुलगा होता. यिर्मयाने, त्याला परमेश्वराकडून आलेले संदेश, सांगितले व ते बारुखने पटावर लिहून काढले. 5 मग यिर्मया बारुखाला म्हणाला, “मी परमेश्वराच्या मंदिरात जाऊ शकत नाही. मला तेथे जाण्याची परवानगी नाही. 6 म्हणून तू परमेश्वराच्या मंदिरात जावेस असे मला वाटते. उपवासाच्या दिवशी तेथे जा आणि लोकांना पट वाचून दाखव. मला आलेले परमेश्वराचे संदेश मी तुला सांगितले व ते तू लिहून घेतलेस. ते तू सर्व लोकांना वाचून दाखव. यहूदाच्या शहरांतून यरुशलेममध्ये आलेल्या सर्व लोकांना तू ते संदेश वाचून दाखव. 7 कदाचित् ते लोक देवाकडे मदतीसाठी धावा करतील. कदाचित् प्रत्येकजण दुष्कर्मे करण्याचे सोडून देईल. परमेश्वर त्या लोकांवर फार रागावल्याचे परमेश्वराने जाहीर केलेच आहे!” 8 नेरीयाचा मुलगा बारुख याने, यिर्मयाने त्याला सांगितले होते त्याप्रमाणे केले. परमेश्वराचे संदेश लिहिलेला पट बारुखने मोठ्याने वाचला. तो त्याने परमेश्वराच्या मंदिरात वाचला. 9 यहोयाकीम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षाच्या नवव्या महिन्यात उपास ठरविल्याचे जाहीर करण्यात आले. यरुशलेममध्ये राहणारे व यहूदातील इतर शहरांतून यरुशलेममध्ये आलेले अशा सर्वांनी परमेश्वरासमोर उपास करावा अशी अपेक्षा होती. 10 त्याच वेळी यिर्मयाच्या शब्दातील पट बारुखने वाचून दाखविला. त्याने तो परमेश्वराच्या मंदिरात वाचून दाखविला. हा पट वाचताना बारुख गमऱ्याच्या घरच्या चौकातील खोलीत होता. ही खोली मंदिराच्या ‘नवीन प्रवेशद्वारा’ जवळ होती. गमऱ्या शाफानचा मुलगा होता. गमऱ्या मंदिरातील लेखनिक होता. 11 बारुखने वाचलेले पटावरचे परमेश्वराचे संदेश मीखाया नावाच्या माणसाने ऐकले. शाफानचा मुलगा गमऱ्या ह्याचा मीखाया मुलगा होता. 12 पटावरील संदेश ऐकताच, मीखाया राजावाड्यातील राजाच्या खासगी चिटणीसाच्या खोलीत गेला. तेथे सर्व वरिष्ठ अधिकारी बसलेले होते. त्यांची नावे पुढीलप्रमाणे: खाजगी चिटणीस अलीशामा, शमायाचा मुलगा दलाया, अखबोरचा मुलगा एलनाथान, शाफानचा मुलगा गमऱ्या, हनन्याचा मुलगा सिद्कीया. आणखीही काही वरिष्ठ अधिकारी तेथे होते. 13 बारुख पट वाचत असताना ऐकलेली प्रत्येक गोष्ट मीखायाने त्यांना सांगितली. 14 मग त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यहूदी नावाच्या माणसाला बारुखकडे पाठविले. यहूदी नथन्याचा व नथन्या शलेम्याचा मुलगा होता. शलेम्याच्या वडिलांचे नाव कुशी. यहूदी बारुखला म्हणाला, “ज्या पटावरुन तू वाचलेस तो घेऊन माझ्याबरोबर चल.”नेरीयाचा मुलगा बारुख याने पट घेतला व तो यहूदीबरोबर अधिकाऱ्यांकडे गेला. 15 मग ते अधिकारी बारुखला म्हणाले, “बस आणि आम्हाला तो पट वाचून दाखव.”मग बारुखने तो पट त्यांना वाचून दाखविला. 16 त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या पटावरील सर्व संदेश ऐकले. मग ते घाबरुन एकमेकांकडे पाहू लागले. ते बारुखला म्हणाले, “पटावरील संदेशाबाबत आपण राजा यहोयाकीम ह्याला सांगितलेच पाहिजे.” 17 मग त्या अधिकाऱ्यांनी बारुखला विचारले, “बारुख, ह्या पटावर लिहिलेले संदेश तुला कोठून मिळाले? यिर्मयाने तुला सांगितलेल्या गोष्टी तू लिहून घेतल्यास का ते आम्हाला सांग.” 18 बारुख म्हणाला, “हो! यिर्मयाने सांगितले व मी ते सर्व शाईने पटावर लिहिले.” 19 मग ते वरिष्ठ अधिकारी बारुखला म्हणाले, “तुला आणि यिर्मयाला कोठेतरी जाऊन लपलेच पाहिजे. तुमच्या लपण्याची जागा कोणालाही कळू देऊ नका.” 20 मग त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो पट अलीशामा लेखनिकाच्या खोलीत ठेवला. ते राजा यहोयाकीम याच्याकडे गेले व त्यांनी त्याला पटाबद्दल सर्व काही सांगितले. 21 यहोयाकीम राजाने यहूदीला तो पट आणण्यासाठी पाठविले. यहूदीने अलीशामा लेखनिकाच्या खोलीतून पट आणला. नंतर यहूदीने तो पट राजाला व तेथे उभ्या असलेल्या सेवकांना वचून दाखविला. हे सर्व वर्षांच्या नवव्या महिन्यात घडले. तेव्हा राजा यहोयाकीम त्याच्या हिवाळी निवासात होता. समोरच्या चुलवणात शेकोटी पेटलेली होती. 22 23 यहूदीने पट वाचायला सुरवात केली. पण त्याने पटावरील दोन-तीन रकाने वाचताच, राजाने तो पट खेचून घेतला. त्याने लहान चाकूने ते पटावरील रकाने कापले आणि शेकोटीत फेकून दिले. शेवटी सगळाच पट त्याने जाळून टाकला. 24 राजा यहोयाकीम व त्याचे सेवक पटावरील मजकूर ऐकून घाबरले नाहीत. आपल्या चुकांबद्दल दु:ख प्रदर्शित करण्यासाठी त्यांनी आपले कपडे फाडले नाहीत. 25 राजाने तो पट जाळू नये म्हणून एलनाथान, दलाया व गमऱ्या यांनी विनंती केली, पण राजाने त्यांचे ऐकले नाही. 26 यहोयाकीम राजाने लेखनिक बारुख व संदेष्ट यिर्मया यांना अटक करण्याचा काही लोकांना हूकूम दिला. ते लोक म्हणजे राजपुत्र यमेल, अरहज्रीएलचा मुलगा सराया व अब्देलचा मुलगा शलेम्या हे होत, पण त्यांना बारुख व यिर्मया सापडले नाहीत कारण त्यांना देवाने लपविले होते. 27 यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला परमेश्वराचे सर्व संदेश लिहिलेला पट यहोयाकीमने जाळला, त्यानंतर हा संदेश आला. यिर्मयाने बारुखला सांगितले व बारुखने लिहून घेतले. तो संदेश असा होता. 28 “यिर्मया, दुसरा पट घे. पहिल्या पटावर लिहिलेले सर्व संदेश दुसऱ्या पटावर लिही. पहिला पट यहूदाचा राजा यहोयाकीम याने जाळला. 29 यिर्मया, यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला असेही सांग ‘परमेश्वर काय म्हणतो पाहा यहोयाकीम, तू तो पट जाळलास. तू म्हणालास “बाबेलचा राजा नक्की येईल आणि या देशाचा नाश करील असे यिर्मयाने का लिहिले? बाबेलचा राजा माणसे व पशू ह्या दोघांचाही नाश करील असे तो का म्हणाला?” 30 म्हणून, यहोयाकीमचे वंशज दावीदाच्या सिंहासनावर बसणार नाहीत. जेव्हा यहोयाकीम मरेल, तेव्हा त्याचे राजाच्या इतमामाने अंत्यसंस्कार होणार नाहीत, तर त्याचा मृतेदेह जमिनीवर फेकून दिला जाईल. दिवसाची उष्णता आणि रात्रीचे थंड दव ह्यात तो मृतदेह पडून राहील. 31 मी, परमेश्वर, यहोयाकीम व त्यांची मुले यांना शिक्षा करीन. मी त्याच्या अधिकाऱ्यांनाही शिक्षा करीन. कारण ते सर्व दुष्ट आहेत. मी त्यांच्यावर, यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांवर व यहूदाच्या सर्व लोकांवर भयंकर अरिष्ट आणण्याचे निश्र्चित केले आहे. मी ठरविल्यामप्रमाणे, त्यांचे वाईट करीन, कारण त्यांनी माझे ऐकले नाही.” 32 मग यिर्मयाने दुसरा पट घेतला व तो नेरियाचा मुलगा बारुख या लेखनिकाला दिला. यिर्मयाने सांगितले आणि बारुखने या पटावर लिहिले. या दुसऱ्या पटावरील संदेश, यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याने जाळलेल्या पटावरील संदेशाप्रमाणेच होते. पण ह्या दुसऱ्या पटात त्या संदेशा बरोबरच त्या संदेशातील शब्दांप्रमाणे आणखी पुष्कळ शब्दांची भर घातलेली होती.

37:1 नबुखद्नेस्सर बाबेलचा राजा होता. नबुखद्नेस्सरने, यहोयाकीमचा मुलगा यहोयाकीन उर्फ यकोन्या याच्याऐवजी, सिद्कीयाला यहूदाचा राजा केले. सिद्कीया योशीयाचा मुलगा होता. 2 पण, परमेश्वराने यिर्मया या संदेष्ट्यातर्फे दिलेल्या संदेशाकडे सिद्कीयाने लक्ष दिले नाही. सिद्कीयाच्या सेवकांनी व यहूदाच्या लोकांनीही परमेश्वराच्या संदेशांकडे दुर्लक्षच केले. 3 राजा सिद्कीयाने यहूकल व याजक सफन्या ह्यांना आपला निरोप देऊन यिर्मया संदेष्ट्याकडे पाठविले, यहूकल शलेम्याचा व याजक सफन्या मासेयाचा मुलगा होता. त्यांनी यिर्मयासाठी आणलेला निरोप असा होता “यिर्मया, आमच्यासाठी परमेश्वर देवाजवळ प्रार्थना कर.” 4 (त्यावेळी, यिर्मयाला कैद केलेले नव्हते, त्यामुळे तो कोठेही जाण्यास मोकळा होता. 5 नेमके ह्याच वेळी मिसर देशातून फारोचे सैन्य यहूदाकडे आले. यरुशलेम जिंकून घेण्यासाठी खास्द्यांच्या सैन्याने त्या नगरीला वेढा घातला होता. त्यांच्यावर मिसरचे सैन्य चालून येत आहे हे त्याने ऐकले. म्हणून मिसरच्या सैन्याशी दोन हात करण्यासाठी खास्द्याच्या सैन्याने यरुशलेम सोडले. 6 संदेष्टा यिर्मयाला देवाचा संदेश आला. 7 “परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव असे म्हणतो, ‘यहूकल व सफन्या, यहूदाचा राजा सिद्कीया याने तुम्हाला मला काही प्रश्न विचारण्यासाठी माझ्याकडे पाठविले आहे, हे मला माहीत आहे. सिद्कीयाला सांगा की बाबेलच्या सैन्यापासून तुम्हाला वाचविण्यासाठी फारोचे सैन्य मिसरमधून निघाले आहे. पण त्या सैन्याला मिसरला परत जावे लागेल. 8 मग बाबेलचे सैन्य परत येईल. ते यरुशलेमवर हल्ला करील. ते यरुशलेमचा पाडाव करुन यरुशलेम जाळील.’ 9 परमेश्वर पुढे असे म्हणतो, ‘यरुशलेमच्या लोकांनो, स्वत:ची फसवणूक करुन घेऊ नका. “बाबेलचे सैन्य नक्कीच आपल्याला सोडून माघारी फिरेल, असे समजू नका.” तसे होणार नाही. 10 यरुशलेमच्या लोकांनो, समजा, जरी तुम्ही, तुमच्यावर चाल करुन आलेल्या खास्द्यांच्या सैन्याचा पराभव करु शकला, तरी काही जखमी सैनिक त्यांच्या तंबूत राहतील. ते येऊन यरुशलेम जाळतील.” 11 जेव्हा खास्द्यांच्या सैन्याने, मिसरचा राजा फारो याच्या सैन्याबरोबर युद्ध करण्यासाठी, यरुशलेम सोडले, 12 तेव्हा यिर्मयाला, यरुशलेमहून मालमत्तेची वाटणी व्हायची होती म्हणून यिर्मया तेथे जाणार होता. 13 पण यिर्मयाला यरुशलेमच्या बन्यामीन प्रवेशद्वाराजवळ जाताच, तेथील पहारेकऱ्यांच्या प्रमुखाने त्याला अटक केले. त्या प्रमुखाचे नाव इरीया होते. इरीया शलेम्याचा मुलगा होता. व शलेम्या हनन्याचा मुलगा होता. इरीयाने यिर्मयाला अटक केले व तो म्हणाला, “यिर्मया, तू आम्हाला सोडून खास्द्यांच्या बाजूला जात आहेत.” 14 यिर्मया इरीयाला म्हणाला, “हे खरे नाही मी तुम्हाला सोडून खास्द्यांकडे जात नाही” पण यिर्मयाचे म्हणणे इरीयाने ऐकले नाही. त्यांनी यिर्मयाला अटक करुन यरुशलेमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नेले. 15 ते अधिकारी यिर्मयावर खूप रागावले. त्याने यिर्मयाला चोपून काढण्याचा हुकूम दिला. मग त्यांनी यिर्मयाला तुरुंगात ठेवले, तुरुंग योनाथान नावाच्या माणसाच्या घरात होता. योनाथान यहूदाच्या राजाचा लेखनिक होता. त्याच्या घराचाच तुरुंग केला होता. 16 त्या लोकांनी योनाथानच्या घराच्या तळघराच्या अंधार कोठडीतयिर्मयाला ठेवले. यिर्मया तेथे बराच काळ होता. 17 मग सिद्कीया राजाने यिर्मयाला बोलाविणे पाठविले आणि त्याला राजावाड्यात आणले. सिद्कीया एकांतात यिर्मयाशी बोलला. त्याने यिर्मयाला विचारले, “परमेश्वराकडून काही संदेश आला आहे का?”यिर्मयाने उत्तर दिले, “हो! परमेश्वराकडून संदेश आला आहे. सिद्कीया, तुला बाबेलच्या राजाच्या स्वाधीन केले जाईल.” 18 मग यिर्मया सिद्कीया राजाला म्हणाला, “माझे काय चुकले! मी तुझ्याविरुद्ध अथवा तुझ्या अधिकाऱ्यांविरुद्ध वा यरुशलेमच्या लोकांविरुद्ध काय गुन्हा केला? मला तुरुंगात का टाकलेस? 19 राजा सिद्कीया, तुझे संदेष्टे कोठे आहेत? त्यांनी तुला खोटा संदेश दिला. ते म्हणाले ‘बाबेलचा राजा तुझ्यावर किंवा यहूदावर हल्ला करणार नाही.’ 20 पण आता, माझ्या धन्या, यहूदाच्या राजा, कृपया माझे ऐक. माझी विनंती तुला मान्य होवो. योनाथान लेखनिकाच्या घरी मला परत पाठवू नये एवढेच माझे मागणे आहे. तू मला परत पाठविलेस, तर मी तेथे मरेन.” 21 म्हणून सिद्कीया राजाने यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या चौकात ठेवण्याचा हुकूम दिला व यिर्मयाला रस्त्यावरील रोटीवाल्याकडून रोटी द्यावी असे ही सांगितले. नगरातील रोट्या संपेपर्यंत यिर्ममाला रोटी दिली गेली. अशा रीतीने यिर्मयाल चौकात पहारेकऱ्याच्या नजरेखाली राहिला.

38:1 यिर्ममाचे संदेशाबद्दलचे बोलणे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऐकले. मत्तानचा मुलगा शफाट्या, पशहूरचा मुलगा गदल्या, शलेम्याचा मुलगा युकाल व मल्कीयाचा मुलगा पशहूर हे ते राजाचे अधिकारी होत. यिर्मया सर्व लोकांना पुढील संदेश सांगत होता. 2 “परमेश्वर असे म्हणतो ‘यरुशलेममध्ये राहणारा प्रत्येकजण युद्ध, उपासमार वा भयंकर रोगाराई ह्यांनी मरेल. पण बाबेलच्या सैन्याला शरण जाणारा वाचेल, तो जिवानिशी सुटेल.’ 3 परमेश्वर पुठे असे म्हणतो ‘यरुशलेम नगरी निश्र्चितपणे बाबेलच्या राजाच्या सैन्याच्या ताब्यात दिली जाईल. तो ती हस्तगत करेल.” 4 यिर्मयला जे हे लोकांना सांगत होता, ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऐकले व ते सिद्कीया राजाकडे गेले. राजाला म्हणाले, ‘यिर्मयाला ठार मारलेच पाहिजे. अजूनही शहरात असलेल्या सैनिकांना तो नाउमेद करीत आहे. तो जे काय सांगत आहे, त्यामुळे प्रत्येकाचे धैर्य गळत आहे. आपले चांगले व्हावे असे यिर्मयाला वाटत नाही. यरुशलेमच्या लोकांचे वाईट होण्याची त्याची इच्छा आहे.’ 5 सिद्कीया राजा त्या अधिकाऱ्यांना म्हणाला, “यिर्मया तुमच्या हातात आहे. मी तुम्हाला थोपवू शकत नाही.” 6 मग त्या अधिकाऱ्यांनी यिर्मयाला मल्कीयाच्या पाण्याच्या टाकीत टाकले, (मल्कीया राजपुत्र होता) राजाचे पहारेकरी राहत असलेल्या मंदिराच्या चौकात ही टाकी होती. त्या अधिकाऱ्यांनी दोरांच्या साहाय्याने यिर्मयाला पाण्याचा टाकीत उतरविले. त्या टाकीत पाणी अजिबात नव्हते, फक्त चिखल होता. यिर्मया त्या चिखलात रुतला. 7 यिर्मयाला त्या अधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीत टाकले हे एबद-मलेख याने ऐकले. एबद-मलेख कुश देशाचा होता. तो राजाच्या पदरी एक प्रतिहारीम्हणून होता. सिद्कीया राजा बन्यामीनच्या प्रवेशद्वाराशी बसला होता. म्हणून एबद-मलेख राजवाड्यातून निघाला आणि राजाशी बोलण्यासाठी त्या प्रवेशद्वाराजवळ गेला. 8 एबद-मलेख राजाला म्हणाला, “राजा, माझ्या धन्या, ते अधिकारी दुष्टपणे वागले आहेत. त्यांनी संदेष्टा यिर्मयाला दुष्टपणे वागविले. त्यांनी त्याला पाण्याच्या टाकीत टाकले आहे. तो मरावा म्हणून त्यांनी त्याला तेथे टाकले आहे!’ 9 10 नंतर एबद-मलेख या कुशीला राजाने हूकूम दिला, “एबद-मलेख, राजवाड्यातून तीन माणसे तुझ्याबरोबर घे. जा आणि यिर्मया मरायच्या आधी त्याला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढ.” 11 एबद-मलेख याने आपल्याबरोबर माणसे घेतली. प्रथम तो राजवाड्यातील कोठाराच्या खालच्या खोलीत गेला. त्याने काही चिंध्या व जुने पुराणे कपडे तेथून घेतले. त्या चिंध्या त्याने दोराच्या साहाय्याने यिर्मयाकडे सोडल्या. 12 एबद-मलेख हा कुशी यिर्मयाला म्हणाला, “त्या चिंध्या आणि जुने पुराणे कपडे तुझ्या काखेत ठेव. आम्ही तुला वर ओढू तेव्हा त्या चिंध्यांचा गादीप्रमाणे उपयोग होईल व दोऱ्या तुला लागणार नाहीत.” एबद-मलेखने सांगितल्याप्रमाणे यिर्मयाने केले. 13 त्या लोकांनी यिर्मयाला दोरांनी ओढून पाण्याच्या टाकीबाहेर काढले, मग यिर्मया मंदिराच्या चौकात पहाऱ्यात राहिला. 14 नंतर सिद्कीया राजाने यिर्मयाला बोलवायला कोणाला तरी पाठविले. त्याने यिर्मयाला परमेश्वराच्या मंदिराच्या तिसऱ्या प्रवेशद्वाराजवळ आणविले मग राजा म्हणाला, “यिर्मया, मी तुला काही विचारतो माझ्यापासून काही लपवू नकोस. मला प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे सांग!” 15 यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “मी तुला काही सांगितले, तर तू बहुधा मला मारशील मी तुला जरी सल्ला दिला, तरी तू माझे ऐकणार नाहीस!” 16 पण सिद्कीया राजाने गुप्तपणे शपथ घेतली. सिद्कीया म्हणाला, परमेश्वराने आम्हाला जीव व जीवन दिले. परमेश्वर नक्कीच आहे म्हणून मी वचन देतो की यिर्मया मी तुला मारणार नाही. तुला मारु इच्छिणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हातात मी तुला देणार नाही, असेही मी तुला वचन देतो. 17 मग यिर्मया सिद्कीया राजाला म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वर हा इस्राएलचा देव आहे. तोच म्हणतो ‘तुम्ही जर बाबेलच्या राजाला शरण गेलात, तर तुमच्या जिविताचे रक्षण होईल. यरुशलेम जाळले जाणार नाही. तू आणि तुझे कुटुंबीयही जगाल. 18 पण तू शरण जाण्यास नकार दिलास, तर यरुशलेम खास्द्यांच्या सैन्याच्या ताब्यात दिली जाईल. ते यरुशलेम जाळून भस्मसात करतील आणि तू त्यांच्या तावडीतून सुटणार नाहीस.” 19 पण सिद्कीया राजा यिर्मयाला म्हणाला, “खास्द्यांच्या सैन्याला जाऊन मिळालेल्या यहूदाच्या लोकांची मला भीती वाटते. सैनिक मला त्या यहूदाच्या लोकांच्या ताब्यात देतील व ते लोक माझ्याशी अत्यंत वाईट वागतील, मला मारतील म्हणून मी घाबरतो.” 20 पण यिर्मया म्हणाला, “सैनिक तुला त्या यहूदाच्या लोकांच्या स्वाधीन करणार नाहीत. राजा सिद्कीया, माझ्या सांगण्याप्रमाणे वागून परमेश्वराची आज्ञा पाळ. मग तुझ्यासाठी सर्व सुरळीत होईल आणि तुझा जीवही वाचेल. 21 पण तू बाबेलच्या राजाला शरण जाण्यास नकार दिलास, तर काय होईल, हे परमेश्वराने मला दाखविले आहे. परमेश्वराने मला पुढीलप्रमाणे सांगितले. 22 यहूदाच्या राजवाड्यात मागे राहिलेल्या सर्व स्त्रियांना बाबेलच्या राजाच्या मुख्य अधिकाऱ्यांपुढे आणले जाईल. त्या स्त्रिया पुढील गाणे गाऊन तुमची चेष्टा करतील.तुमच्या चांगल्या मित्रांनी तुम्हाला चुकीच्या मार्गाने नेले, आणि ते तुमच्याहून बलवान झाले, तेच ते मित्र ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला. तुमचे पाय चिखलात रुतलेत. तुमच्या मित्रांनी तुम्हाला सोडले.’ 23 “तुमच्या बायका मुलांना बाहेर काढले जाईल. त्यांना बाबेलच्या सैन्याच्या स्वाधीन केले जाईल. तू स्वत:ही त्या सैन्याच्या तावडीतून सुटणार नाहीस. तुला बाबेलचा राजा पकडेल आणि यरुशलेम जाळले जाईल.” 24 मग सिद्कीया यिर्मयाला म्हणाला, “मी तुझ्याशी बोललो हे कोणालाही सांगू नकोस. तसे केलेस, तर मरशील. 25 कदाचित्. मी तुझ्याशी बोललो हे त्या अधिकाऱ्यांना कळेल. मग ते तुझ्याकडे येतील आणि म्हणतील, ‘यिर्मया, तू सिद्कीया राजाला काय सांगितलेस ते आम्हाला सांग तसेच सिद्कीया तुला काय म्हणाला तेही सांग. आमच्याशी खरे बोल व प्रत्येक गोष्ट सांग नाहीतर आम्ही तुला ठार मारु’ 26 जर ते असे म्हणाले तर तू त्यांना सांग ‘मी राजाकडे मला योनाथानच्या घरातील अंधार कोठडीत परत पाठवू नका.’ अशी गयावया केली. मी तेथे परत गेलो, तर मी मरेन.” 27 ते वरिष्ठ अधिकारी यिर्मयाकडे येऊन प्रश्न विचारु लागले. खरेच असे घडले? मग राजाने हुकूम केल्याप्रमाणे यिर्मयाने सांगितले. मग त्या अधिकाऱ्यांनी यिर्मयाला सोडले. यिर्मया व राजा यांच्यात झालेले बोलणे कोणालाही कळले नाही. 28 मग यिर्मया, यरुशलेम जिंकले जाईपर्यंत, मंदिराच्या चौकात पहाऱ्यात राहिला.

39:1 अशा रितीने यरुशलेमचा पाडाव झाला. यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यात बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपले संपूर्ण सैन्य घेऊन यरुशलेमवर चालून आला. नगरीचा पाडाव करण्यासाठी त्याने नगरीला वेढा घातला. 2 आणि सिद्कीयाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षाच्या चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी यरुशलेमच्या तटबंदीला भगदाड पडले. 3 मग बाबेलच्या राजाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यरुशलेम नगरीत शिरले आणि मधल्या प्रवेशद्वाराजवळ बसले. समगारचा राज्यपाल नेर्गलशरेसर व नबो सर्सखीम हे मोठे अधिकारी आणि इतर महत्वाचे अधिकारी ह्यांचा त्यात समावेश होता. 4 सिद्कीया राजाने बाबेलच्या ह्या अधिकाऱ्यांना पाहिले आणि तो सैनिकांबरोबर पळून गेला. त्यांनी रात्री यरुशलेम सोडले ते राजाच्या बागेतून आणि तटबंदीच्या दोन भिंतीमधल्या दारातून बाहेर पळाले. ते वाळवंटाकडे गेले. 5 खास्द्यांच्या सैन्याने सिद्कीयाचा व त्याच्याबरोबर असलेल्या सैनिकांचा पाठलाग केला आणि यरिहोच्या मैदानात त्याना त्यांनी पकडले. त्यांनी सिद्कीयाला पकडून बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्याकडे नेले तेव्हा नबुखद्नेस्सर हमाथ प्रांतातील रिब्ला येथे होता. सिद्कीयाचे काय करायचे हे नबुखद्नेस्सरने ठरविले. 6 रिब्लामध्ये, सिद्कीयाच्या डोळ्यांदेखत, बाबेलच्या राजाने सिद्कीयाच्या मुलांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना मारले. 7 मग नबुखद्नेस्सरने सिद्कीयाचे डोळे काढले आणि साखळ्यांनी बांधून बाबेलला नेले. 8 बाबेलच्या सैन्याने राजवाड्याला व यरुशलेम मधील घरांना आग लावली त्यांनी यरुशलेमची तटबंदी फोडली. 9 बाबेलच्या राजाच्या विशेष संरक्षकांचा प्रमुख नबूजरदान हा होता. त्याने यरुशलेममध्ये राहिलेल्या लोकांना कैद केले. व बाबेलला नेले. त्याला अगोदरच शरण आलेल्यांना त्याने कैद केले. एकंदरीत त्याने येरुशलेममधील सर्व लोकांनाच कैद केले. 10 पण नबूजरदानने यहूदातील काही गरीब लोकांना सोडले. ह्या लोकांजवळ काहीही नव्हते म्हणून नबूजरदानने त्यांना द्राक्षमळे व जमीन दिली. 11 पण नबुखद्नेस्सरने यिर्मयाच्या बाबतीत, नबूजरदानला ताकीद दिली होती. नबूजरदान बाबेलच्या राजाच्या खास संरक्षकांचा प्रमुख होता. नबुखद्नेस्सरने अशी ताकीद दिली होती की. 12 “यिर्मयाला शोधून काढा व त्याची काळजी घ्या. त्याला इजा करु नका. तो मागेल ते त्याला द्या.” 13 म्हणून राजाच्या खास संरक्षकांचा प्रमुख नबूजरदान याने नबूशजबान या प्रमुख सेनाधिकाऱ्याला, नेर्गल सरेसर या मोठ्या अधिकाऱ्याला आणि सैन्यातील इतर अधिकाऱ्यांना यिर्मयाला शोधण्यासाठी पाठविले. 14 मंदिराच्या चौकात, यहूदाच्या राजाच्या पाहऱ्यात असलेल्या यिर्मयाला त्या लोकांनी सोडविले आणि गदल्याकडे सोपविले. गदल्या अहिकामचा व अहिकाम शाफानचा मुलगा होता. यिर्मयाला घरी पाठवावे असा गदल्याला हूकूम होता. म्हणून यिर्मयाला घरी नेले गेले व तो त्याच्या आप्तांमध्ये राहू लागला. 15 यिर्मया मंदिराच्या चौकात पहाऱ्यात असताना त्याला परमेश्वराचा संदेश आला. तो असा होता: 16 “यिर्मया मूळ कुशचा रहिवासी असलेल्या एबद-मलेखला संदेश दे ‘सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांना देव म्हणतो: माझे यरुशलेमबद्दलचे भाकीत मी लवकरच खरे ठरवीन. माझे संदेश अरिष्टावरुन खरे ठरतील, चांगल्या गोष्टी घडून नाही. सर्व गोष्टी खऱ्या ठरत असताना तू तुझ्या डोळ्यांनी पाहशील. 17 पण, एबद-मलेख, मी तुला त्या दिवशी वाचवीन.’ हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. तू ज्या लोकांना घाबरतोस, त्यांच्या स्वाधीन मी तुला करणार नाही. 18 तू युध्दात मरणार नाहीस, तर तू निसटशील आणि जगशील. तू माझ्यावर विश्वास ठेवलास, म्हणून हे घडेल.” हा परमेश्वराचा संदेश आहे.

40:1 यिर्मयाची रामा येथे, सुटका झाल्यावर परमेश्वराकडून संदेश आला. बाबेलच्या राजाच्या खास सैनिकांचा प्रमुख नबूजरदान ह्याला रामा शहरात यिर्मया सापडला. यिर्मयाला बेड्या घातल्या होत्या. यरुशलेम व यहूदा येथील सर्व कैद्यांबरोबरच तो होता. त्या सर्वांना कैद करुन बाबेलला नेले होते. 2 नबूजरदानला यिर्मया सापडताच, तो त्याच्याशी बोलला तो म्हणाला, “यिर्मया, परमेश्वराने, तुझ्या देवानेच हे अरिष्ट ह्या स्थळी येणार म्हणून भाकीत केले होते. 3 आणि आता परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच सर्व घडले आहे. तुम्ही यहूदातील लोकांनी परमेश्वराविरुध्द पाप केल्यानेच हे अरिष्ट आले. तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळली नाही. 4 यिर्मया, आता मी तुझी सुटका करीन. मी तुझ्या बेड्या काढतो तुझी इच्छा असल्यास तू माझ्याबरोबर बाबेलला ये. मी तुझी चांगली काळजी घेईन. पण, तुझी इच्छा नसल्यास, तू माझ्याबरोबर येऊ नको. सर्व देश तुझ्यापुढे मोकळा आहे तुला पाहिजे तेथे जा. 5 किंवा शाफानपुत्र अहीकाम याचा मुलगा गदल्या ह्याच्याकडे परत जा. बाबेलच्या राजाने त्याला यहूदातील शहरांचा राज्यपाल म्हणून नेमले आहे. परत जा आणि गदल्याबरोबर लोकांमध्ये राहा. नाहीतर तुला पाहिजे तेथे तू जा.”नंतर नबूजरदानने त्याला अन्न व बक्षीस देऊन सोडून दिले. 6 मग यिर्मया, मिस्पा येथे अहीकामचा मुलगा गदल्या ह्याच्याकडे गेला. तो गदल्याबरोबर यहूदात मागे राहिलेल्या लोकांमध्ये राहिला. 7 यरुशलेमचा नाश झाला तेव्हा यहूदाच्या सैन्यातील काही सैनिक, अधिकारी आणि त्यांची काही माणसे रानात राहात होती. बाबेलच्या राजाने अहीकामचा मुलगा गदल्या ह्यास, मागे राहिलेल्या लोकांचा अधिपती म्हणून नेमले आहे, हे त्यांना कळले. अगदी गरीब स्त्री पुरुष व मुले ह्यांना कैद करुन बाबेलला नेले नव्हते हे लोक मागेच राहिले होते. 8 मग ते सैनिक मिस्पा येथे गदल्याकडे आले. ते सैनिक म्हणजे नथन्याचा मुलगा इश्माएल, कारेहाचा मुलगा योहानान व त्याचा भाऊ योनाथान तान्हुमेथचा मुलगा सराया, नटोफाथी एफै याचे मुलगे, माकाथाचा मुलगा याजन्या व ह्यांच्याबरोबरचे काही लोक होत. 9 शाफनाचा मुलगा अहीकाम व अहीकामचा मुलगा गदल्या ह्या गदल्याने त्या सैनिकांना अधिक सुरक्षित वाटेल असे करण्याची शपथ घेतली. गदल्या त्यांना म्हणाला “खास्द्यांची सेवा करण्यास तुम्ही घाबरु नका. (इस्राएलमध्ये) देशात वस्ती करा आणि बाबेलच्या राजाची सेवा करा. असे केल्याने तुमचे भले होईल. 10 मी स्वत: मिस्पात राहीन. मी येथे येणाऱ्या खास्द्यांशी तुमच्यावतीने बोलीन. तुम्ही हे काम माझ्यावर सोपवा. तुम्ही द्राक्षरस, ग्रीष्मातील फळे व तेल यांचे उत्पादन करुन रांजणात साठवून ठेवावे तुम्ही ताबा मिळविलेल्या शहरात तुम्ही राहा.” 11 बाबेलच्या राजाने यहूदातील काही लोकांना त्यांच्या स्वत:च्या देशात राहू दिले आहे हे मवाब, अम्मोन, अदोम व इतर देशात राहणाऱ्या सर्व यहूदी लोकांना समजले. ह्या मागे राहिलेल्या लोकांसाठी शाफानपुत्र अहीकाम याचा मुलगा गदल्या ह्यास बाबेलच्या राजाने, राज्यपाल म्हणून नेमले असल्याचेही त्यांना कळले. 12 ही बातमी कळताच यहूदाचे लोक यहूदात परतले ते सर्व ज्या ज्या देशांत पसरले गेले होते, तेथून ते गदल्याकडे मिस्पाला परतले, ते परत आले व त्यांनी द्राक्षरस व ग्रीष्मातील फळे यांचा पुष्कळ साठा केला. 13 कारेहाचा मुलगा योहानान व अजूनही रानात राहात असलेले यहूदाच्या सैन्यातील सर्व अधिकारी गदल्याकडे आले. गदल्या मिस्पामध्ये होता. 14 योहानान व त्याच्या बरोबरचे आधिकारी गदल्याला म्हणाले, “अम्मोनी लोकांचा राजा बआलीस ह्याला तुला ठार मारायचे आहे, हे तुला माहीत आहे का? त्याने नथन्याचा मुलगा इश्माएल ह्याला तुला मारण्यासाठी पाठविले आहे” पण अहीकामचा मुलगा गदल्या ह्याचा ह्यावर विश्वास बसला नाही. 15 मग मिस्पा येथे, एकांतात कारेहाचा मुलगा योहानान हा गदल्याशी बोलला तो गदल्याला म्हणाला, “मी नथन्याचा मुलगा इश्माएल ह्याला मारतो तू मला परवानगी दे. ही गोष्ट कोणालाही कळणार नाही. इश्माएल तुला मारणार आहे, पण आम्ही त्याला तसे करु देणार नाही. कारण तसे झाल्यास तुझ्याभोवती गोळा झालेल्या सर्व यहूदी लोकांना पुन्हा इतर देशात पांगावे लागेल. ह्याचाच अर्थ यहूदाचे उरलेले थोडे शिल्लक राहणार नाही.” 16 पण अहीकामचा मुलगा गदल्या हा कारेहाचा मुलगा योहानान ह्यास म्हणाला “इश्माएलला मारु नको, तू त्याच्याबद्दल जे सांगत आहेस ते खरे नाही.”

41:1 सातव्या महिन्यात नथन्याचा मुलगा इश्माएल हा अहीकामचा मुलगा गदल्या ह्याच्याकडे आला. नथन्या हा अलीशामाचा मुलगा होता. इश्माएल त्याच्याबरोबर त्याच्या दहा माणसांना घेऊन आला. ते सर्वजण मिस्पाला आले. इश्माएल राजघराण्यातील होता. यहूदाच्या राजाच्या अधिकाऱ्यांपैकी तो एक होता इश्माएल व त्याच्या बरोबरची माणसे गदल्याबरोबर जेवावयास बसली. 2 ते जेवत असतानाच, इश्माएल व त्याची दहा माणसे उठली व त्यांनी अहीकामाचा मुलगा गदल्या ह्यास तलवारीने ठार मारले. बाबेलच्या राजाने यहूदाचा राज्यपाल म्हणून गदल्याची निवड केली होती. 3 गदल्याबरोबर मिस्पा येथे असलेल्या सर्व यहुद्यांनासुद्धा इश्माएलने ठार मारले. एवढेच नाही तर, गदल्याबरोबर असलेल्या खास्दी सैनिकांनासुद्धा त्याने ठार केले. 4 गदल्याला मारल्याच्या दुसऱ्या दिवशी 80 लोक मिस्पाला आले ते परमेश्वराच्या मंदिरात अर्पण करण्यासाठी धान्य व धूप आणीत होते. त्या सर्वांनी दाढ्या कापलेल्या होत्या अंगावर जखमा केलेल्या होत्या त्यांचे कपडे फाटलेले होते, त्यांनी मुंडन केले होते.ते शखेम, शिलो व शोमरोन येथून आले होते. त्यातील कोणालाही गदल्याच्या वधाविषयी माहिती नव्हती. 5 6 इश्माएलने मिस्पा सोडले व तो त्या माणसांना भेटायला गेला. तो त्यांना भेटायला जाताना रडला.तो त्या माणसांना म्हणाला, “अहीकामचा मुलगा गदल्या ह्याला भेटण्यास माझ्याबरोबर चला.” 7 ती 80 माणसे मिस्पाला गेली. इश्माएलने व त्याच्या माणसांनी त्यातील 70 जणांना मारले. आणि त्यांची प्रेते खूप खोल असलेल्या पाण्याच्या टाकीत टाकली. 8 पण राहिलेली दहा माणसे इश्माएलला म्हणाली, “आम्हाला मारु नको. आमच्याजवळ गहू व सातू आहेत. तसेच तेल व मधही आहे आम्ही ह्या गोष्टी शेतात लपवून ठेवल्या आहे.” म्हणून इश्माएलने ह्या दहा माणसांना सोडले. इतरांसारखे त्यांना मारले नाही. 9 (ती पाण्याची टाकी खूप मोठी होती. ती यहूदाचा राजा आसा याने, युद्धाच्या वेळी नगराला पाणी मिळावे म्हणून बांधली होती.इस्राएलचा राजा बाश ह्याच्यापासून आपल्या नगराचा बचाव करण्यासाठी आसाने असे केले होते. ती टाकी भरुन जाईपर्यंत इश्माएलने त्यात प्रेते टाकली. 10 मिस्पामधील इतर सर्व लोकांना इश्माएलने पकडले ह्या लोकांत राजाच्या मुली व इतर मागे राहिलेले लोक होते. हे लोक म्हणजे नबूजरदानने गदल्याला ज्या लोकांवर लक्ष ठेवण्यास नेमले होते, तेच होते नबूजर दान हा बाबेलच्या राजाच्या खास रक्षकांचा प्रमुख होता. इश्माएलने त्या सर्व लोकांना कैद केले व तो अम्मोनी लोकांचा देश पार करुन जाण्यास निघाला. 11 त्याच्याबरोबर असलेल्या कारेहचा मुलगा योहानानला व इतर सैन्याधिकाऱ्याना त्याने केलेली दुष्कृत्ये कळली. 12 म्हणून योहानान व इतर सैन्याधिकारी आपल्या लोकांना घेऊन नथल्याचा मुलगा इश्माएल ह्याच्याशी इश्माएलला पकडले. 13 इश्माएलने ज्यांना कैद करुन नेले होते, त्या कैद्यांनी योहानानला व सैन्याधिकाऱ्यांना पाहिले. त्यांना मग खूप आनंद झाला. 14 नंतर इश्माएलने पकडलेले सर्व लोक मिस्पा येथून कारेहचा मुलगा योहानान ह्याच्याकडे धावले. 15 पण इश्माएल व त्याची आठ माणसे योहानानच्या हातातून निसटली. ते अम्मोनच्या लोकांकडे पळाले. 16 मग कारेहचा मुलगा योहानान व इतर सर्व सैन्याधिकारी यांनी सर्व कैद्यांना सोडविले. गदल्याला ठार मारल्यानंतर इश्माएलने ह्या लोकांना मिस्पा येथून आणले होते. त्या वाचलेल्या लोकांत सैनिक, स्त्रिया, मुले व दरबारातील अधिकारी होते. योहानानने त्यांना गिबोनमधून परत आणले. 17 योहानान व इतर सैन्याधिकारी खास्द्यांना भीत होते. बाबेलच्या राजाने गदल्याला यहूदाचा राज्यपाल म्हणून निवडले होते. पण इश्माएलने गदल्याचा खून केला, म्हणून खास्दी रागावले असतील अशी भीती योहानानला वाटत होती. म्हणून त्यांनी मिसरला पळून जाण्याचे ठरविले मिसरच्या वाटेवर ते गेरुथ किम्हाम येथे राहिले. गेरुथ किम्हाम बेथलेहेमनजीक आहे. 18

42:1 ते गेरुथ किम्हाम येथे राहत असताना योहानान व होशायाचा मुलगा यजन्या यिर्मया संदेष्ट्याकडे गेले. त्यांच्याबरोब सर्व सेनाधिकारीही होते. सर्वजण राजापासून रंकापर्यंत यिर्मयाकडे गेले. 2 ते सर्वजण यिर्मयाला म्हणाले, “यिर्मया, कृपया आमची विनंती मान्य कर. यहूदाच्या कुळातील वाचलेल्या सर्व लोकांसाठी परमेश्वराकडे तुझ्या परमेश्वराकडे प्रार्थना कर. यिर्मया, आमच्यापैकी फारच थोडे वाचले आहेत, हे तुला दिसतेच आहे. एकेकाळी आम्ही संख्येने जास्त होतो. 3 यिर्मया, आम्ही कोठे जावे व काय कराव हे तुझ्या परमेश्वर देवाने आम्हाला सांगावे म्हणून तू प्रभूचा, तुझ्या देवाचा धावा कर.” 4 मग संदेष्टा यिर्मया म्हणाला, “तुमची विनंती मी ऐकली तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी प्रभूची, तुमच्या देवाची करुणा भागीन. देवाचे सर्व म्हणणे मी तुम्हाला सांगीन. मी तुमच्यापासून काहीही लपविणार नाही.” 5 मग ते लोक यिर्मयाला म्हणाले, “जर परमेश्वर देव तुझ्याकडून जसे सांगतो तसे आम्ही वागलो नाही, तर तुझा परमेश्वर देवच आमच्याविरुद्धचा खरा व प्रामाणिक साक्षीदार असेल. 6 आम्हाला त्याचा संदेश आवडला का नाही हा पश्र्नच उद्भवत नाही. आम्ही परमेश्वराची, आमच्या देवाची, आज्ञा पाळू. त्याच्याकडून संदेश आणण्यासाठी आम्ही तुला पाठवीत आहोत. तो सांगेल ते आम्ही ऐकू. मग आमचे कल्याण होईल खरंच, आम्ही परमेश्वराची आमच्या देवाची आज्ञा पाळू.” 7 दहा दिवसानंतर यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. 8 मग यिर्मयाने कारेहचा मुलगा योहानान, त्याच्याबरोबर असलेले सेनाधिकारी व राजापासून रंकापर्यंत सर्व लोक यांना एकत्र केले. 9 मग तो त्यांना म्हणाला, “परमेश्वर, इस्राएलच्या लोकांच्या देव काय म्हणतो पाहा तुम्ही मला त्याच्याकडे पाठविले तुम्ही मला केलेली विनंती मी त्याला सांगितली. परमेश्वर असे म्हणतो: 10 “जर तुम्ही यहूदात राहिलात, तर मी तुमचा नाश करणार नाही. उलट मी तुम्हाला सामर्थ्यशाली करीन. मी तुम्हाला रुजवीन, उपटून टाकणार नाही. मी असे करण्याचे कारण म्हणजे तुमच्यावर मला आणाव्या लागलेल्या वाईट प्रसंगामुळे मला वाईट वाटते. 11 सध्या तुम्ही बाबेलच्या राजाला भीत आहात. पण त्याला भिऊ नका. बाबेलच्या राजाची अजिबात भीती बाळगू नका.’ हा परमेश्वराचा संदेश आहे. ‘कारण मी तुमच्याबरोबर आहे. मी तुमचे रक्षण करीन. मी तुमची सुटका करीन. त्याचे हात तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. 12 मी तुमच्यावर कृपा करीन आणि बाबेलचा राजाही तुमच्याशी दयाळूपणाने वागेल. तो तुम्हाला तुमच्या देशात परत आणील.’ 13 पण कदाचित् ‘आम्ही यहूदात राहणार नाही.’ असे तुम्ही म्हणाल. तुम्ही असे म्हणाल्यास, तुम्ही परमेश्वराची, तुमच्या देवाची अवज्ञा केल्यासारखे होईल. 14 तुम्ही कदाचित् असेही म्हणाल ‘नाही, आम्ही मिसरमध्ये जाऊन राहू. तेथे युध्द आम्हाला दिसणार नाही किंवा रणशिंगाचा आवाज ऐकू येणार नाही तेथे आमची उपासमार होणार नाही.’ 15 तुम्ही असे म्हणत असाल तर यहूदातील वाचलेल्या लोकांनो, परमेश्वराचा संदेश ऐका. सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांना देव म्हणतो, ‘तुम्ही मिसरमध्ये जाऊन राहण्याचे निश्र्चित केल्यास पुढील गोष्टी घडतील. 16 ज्या तलवारीची तुम्हाला भीती वाटत आहे, ती तुमचा तेथे पराभव करील. ज्या उपासमारीची तुम्ही काळजी करीत आहा, ती तेथे तुम्हाला गाठील. तुम्ही मिसरमध्ये मराल. 17 जो कोणी मिसरमध्ये जाऊन राहण्याचे निश्र्चित करील, तो युद्धात, वा उपासमारीने किंवा भयंकर रोगराईने मरेल. मिसरमध्ये जाणारा एकही जण वाचणार नाही. मी घडवून आणणार असलेल्या भयंकर संकटातून कोणीही वाचणार नाही.’ 18 “मग सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव पुढे म्हणतो, ‘मी यरुशलेमवरचा माझा राग व्यक्त करुन दाखविला. यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांना मी शिक्षा केली. त्याचप्रमाणे मिसरमध्ये जाणाऱ्या प्रत्येकावर मी राग प्रकट करीन. दुसऱ्यांना शाप देताना लोक उदाहरण म्हणून तुमचे नाव घेतील. तुम्ही म्हणजे जणू शिवी व्हाल. लोकांना तुमची लाज वाटेल, लोक तुमचा अपमान करतील, तुम्हाला पुन्हा कधीही यहूदा दिसणार नाही.’ 19 “यहूदातील वाचलेल्या लोकांनो, ‘मिसरला जाऊ नका.’ असे परमेश्वराने तुम्हाला सांगितले आहे, मी आताच तुम्हाला ताकीद देतो. 20 तुम्ही तुमच्या मृत्यूला कारण होईल, अशी चूक करीत आहात तुम्ही मला परमेश्वराकडे, तुमच्या देवाकडे, पाठविले तुम्ही मला म्हणाला, ‘आमच्यासाठी आपल्या परमेश्वराकडे प्रार्थना कर. परमेश्वराने करायला सांगितलेली प्रत्येक गोष्ट आम्हाला सांग आम्ही परमेश्वराचे ऐकू.’ 21 म्हणून आज मी तुम्हाला परमेश्वराचा संदेश सांगितला आहे. पण तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाची आज्ञा पाळली नाही. परमेश्वराने ज्या गोष्टी तुम्ही कराव्या हे सांगण्यासाठी मला तुमच्याकडे पाठवले होते, त्या गोष्टी तुम्ही केल्या नाहीत. 22 तुम्ही मिसरमध्ये जाऊन राहू इच्छिता. पण मग तुम्ही युद्धात वा उपासमारीने अथवा भयंकर रोगराईने मराल. ह्या गोष्टी तुमच्याबाबत घडतील, ह्याची खात्री बाळगा.”

43:1 अशा रीतीने यिर्मयाने परमेश्वराकडून, त्यांच्या देवाकडून आलेला संदेश लोकांना सांगितला. परमेश्वराने लोकांना सांगण्यास सांगितलेली प्रत्येक गोष्ट यिर्मयाने लोकांना ऐकविली. 2 होशायाचा मुलगा अजऱ्या, कारेहचा मुलगा योहानान व इतर काही लोक गर्विष्ठ व दुराग्रही होते. ते सर्व यिर्मयावर रागावले. ते यिर्मयाला म्हणाले, “यिर्मया, तू खोटे बोलत आहेस. ‘तुम्ही मुळीच मिसरला जाऊन राहू नये.’ असे सांगण्यासाठी आमच्या परमेश्वर देवाने तुला आमच्याकडे पाठविले नाही. 3 “यिर्मया, नेरीयाचा मुलगा बारुख तुला आमच्याविरुद्ध भडकावीत आहे असे आम्हाला वाटते. आम्हाला खास्द्यांच्या हाती देण्याची त्याची इच्छा आहे त्यांनी आम्हाला मारावे अथवा कैदी म्हणून बाबेलला न्यावे म्हणून तो तुझ्यामार्फत असे सांगत आहे.” 4 म्हणून योहानान, सेनाधिकारी व इतर सर्व लोक ह्यांनी परमेश्वराच्या आज्ञांचे उल्लंघन केले परमेश्वराने त्यांना यहूदात राहण्याची आज्ञा दिली होती. 5 पण परमेश्वराचे ऐकण्याऐवजी, योहानान व सेनाधिकारी वाचलेल्या लोकांना इतर देशांत नेले होते. पण ते यहूदाला परत आले होते. 6 आता, योहानान व सेनाधिकारी यांनी, पुरुष, स्त्रिया व मुले ह्यांना गोळा करुन मिसरला नेले. ह्या लोकांत राजकन्याही होत्या (नबूजरदानने गदल्याला ह्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमले होते. बाबेलच्या राजाच्या खास रक्षकांचा नबूजरदान प्रमुख होता) योहानानने संदेष्टा यिर्मया व नेरीयाचा मुलगा बारुख ह्यांनाही बरोबर नेले. 7 त्या लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही, ते सर्व लोक मिसरला गेले, ते तहपन्हेस येथे गेले. 8 तहपन्हेस येथे यिर्मयाला परमेश्वराचा पुढीलप्रमाणे संदेश मिळाला: 9 “यिर्मया, काही मोठे धोंडे घे. ते तहपन्हेस येथील फारोच्या कचेरीसमोरच्या विटामातीच्या पादचारीमार्गावर पुर. तू यहूदातील लोक पाहत असताना, कर. 10 मग हे सर्व पाहत असलेल्या यहूदी लोकांना सांग ‘सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “मी बाबेलचा राजा, नबुखद्नेस्सर, यास येथे पाठवीन, तो माझा सेवक आहे. मी पुरलेल्या ह्या दगडांवर मी त्याचे सिंहासन ठेवीन, तो ह्या दगडावर त्याचे छत्र उभारील. 11 नबुखद्नेस्सर येथे येईल व मिसरवर चढाई करील. ज्यांचे मरण आहे, त्यांना तो ठार मारील. ज्यांना कैद व्हायची आहे, त्यांना तो कैद करील. ज्यांचे मरण तलवारीने आहे, त्यांना तो तलवारीने ठार करील. 12 तो मिसरच्या दैवतांच्या देवळांना आग लावील. तो देऊळे जाळील व मूर्ती काढून नेईल. मेंढपाळ ज्याप्रमाणे त्याच्या कपड्यावरील पिसवा व काटे ओढून काढून आपले कपडे स्वच्छ करतो, त्याप्रमाणे नबुखद्नेस्सर मिसर साफ करील. मग तो निर्धास्तपणे मिसर सोडून जाईल. 13 तो मिसरमधील सूर्य देवतेच्या देवळातील स्मृती शिलांचा नाश करील आणि तेथील दैवतांची देऊळे जाळून टाकील.”

44:1 यिर्मयाला परमेश्वराचा संदेश मिळाला. मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व यहूदी लोकांसाठी तो होता. हे लोक मिग्दोल, तहपनहेस, मेमफिस व दक्षिण मिसर येथे राहत होते. संदेश असा होता: 2 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “यरुशलेम नगरीवर व यहूदाच्या इतर नगरांवर मी जी भयंकर संकटे आणली, ती तुम्ही पाहिलीत. आता ती नगरे म्हणजे नुसती दगडधोंड्यांची रास झाली आहेत. 3 तेथे राहणाऱ्या लोकांनी पाप केल्यामुळे मी त्यांचा नाश केला. त्यांनी अनेक दैवतांना बळी अर्पण केले. त्यामुळे मला राग आला. तुमच्या लोकांनी व पूर्वजांनी, पूर्वी कधी, त्या दैवतांना पुजले नव्हते. 4 मी त्या लोकांकडे माझे संदेष्टे पुन्हा पुन्हा पाठविले ते माझे सेवक होते. त्या संदेष्ट्यांनी माझा संदेश सांगितला आणि ते लोकांना म्हणाले, ‘अशी भयंकर कृत्ये करु नका. परमेश्वर मूर्तीपूजेचा तिरस्कार करतो.’ 5 पण त्यांनी संदेष्ट्यांचे ऐकले नाही. त्यांनी संदेष्ट्यांकडे लक्ष दिले नाही. ते दुष्कृत्ये करीतच राहिले ते दैवतांना बळी अर्पण करीतच राहिले. 6 म्हणून त्यांच्यावरचा माझा राग मी व्यक्त केला. मी यहूदातील नगरांना व यरुशलेमच्या मार्गांना शिक्षा केली. माझ्या रागामुळेच आज यरुशलेम व यहूदातील नगरे नुसती दगडविटांच्या राशी झाली आहेत.” 7 म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “मूर्तीची पूजा करीत राहून तुम्ही स्वत:लाच इजा का करुन घेत आहात? तुम्ही पुरुष व स्त्रिया, मुले व बाआलके यांना यहूदाच्या कुळापासून तोडत आहात. त्यामुळे यहूदाच्या कुळातील कोणीही शिल्लक राहणार नाही. 8 मूर्तीपूजा कुरुन तुम्ही मला का संतापवता? आता तुम्ही मिसरमध्ये राहात आहात आणि मिसरच्या दैवतांना बळी अर्पण करुन तुम्ही मला संतापवत आहात. तुम्ही तुमचाच नाश करुन घ्याल. ती तुमचीच चूक असेल. तुमचे वागणेच असे असेल की दुसऱ्या राष्ट्रांतील लोक तुमच्याबद्दल वाईटच बोलतील. जगातील इतर राष्ट्रे तुमची चेष्टा करतील. 9 तुमच्या पूर्वजांनी केलेली दुष्कृत्ये तुम्ही विसरलात का? यहूदाच्या राजा राण्यांनी केलेली वाईट कृत्ये तुम्हाला आठवत नाहीत का? तुम्ही आणि तुमच्या बायकांनी यहूदात व यरुशलेमच्या रस्त्यावर केलेली पापे तुम्ही विसरलात का? 10 आजतागायत यहूदातील लोक नम्र झालेले नाहीत त्यांनी माझ्याबद्दल आदर दाखविलेला नाही. ते, माझ्या शिकणुकीप्रमाणे वागले नाहीत. मी तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना घालून दिलेले नियम त्यांनी पाळले नाही.” 11 म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “मी तुमच्यावर भयंकर संकटे आणण्याचे ठरविले आहे. मी यहूदाच्या कुळाचा संपूर्ण नाश करीन. 12 यहूदातील अगदी थोडे लोक वाचले आहेत. ते येथे मिसरला आले आहेत. पण यहूदातील कुळातल्या त्या वाचलेल्या लोकांचा मी नाश करीन. अती महत्वाच्या व्यक्तीपासून अती सामान्यपर्यंत सर्वच्या सर्व युद्धात ठार होतील वा उपासमारीने मरतील. इतर राष्ट्रांतील लोक त्यांची निंदा करतील. त्या लोकांच्या बाबतीत जे घडले, ते पाहून इतर राष्ट्रांतील लोक घाबरतील. ते लोक म्हणजे जणू काय शिवी बनतील, दुसरी राष्ट्रे त्यांचा अपमान करतील. 13 मिसरमध्ये राहण्यास गेलेल्या त्या लोकांना मी शिक्षा करीन. त्यासाठी मी तलवार, उपासमार व भयंकर रोगराई या गोष्टींचा उपयोग करीन. यरुशलेम नगरीला जशी मी शिक्षा केली, तशीच त्यांना शिक्षा करीन. 14 यहूदातून वाचून मिसरमध्ये राहण्यास गेलेला एकही जण माझ्या शिक्षेतून सुटणार नाही. त्यांच्यातील कोणीही यहूदास परतणार नाही. त्या लोकांची यहूदात परत येऊन राहण्याची इच्छा आहे, पण काही निसटून गेलेले लोक सोडून कोणीही यहूदात परत जाणार नाही.” 15 मिसरमध्ये राहणाऱ्या यहूदी स्त्रिया, दैवतांना बळी अर्पण करीत होत्या, त्यांच्या पतींना ते माहीत होते. पण त्यांनी त्या स्त्रियांना असे करण्यापासून परावृत्त केले नाही. तेथे असलेल्या यहूदी लोकांचा एक मोठा समुदाय एकत्र येत होता. हे लोक मिसरच्या दक्षिण भागात राहात होते. ज्या स्त्रिया दैवतांना बळी अर्पण करीत होत्या, त्यांचे पती यिर्मयाला म्हणाले. 16 “तू आम्हाला सांगितलेला परमेश्वराचा संदेश आम्ही मानणार नाही 17 आम्ही स्वर्गातील राणीला बळी अर्पण करण्याचे वचन दिले आहे, तेव्हा आम्ही त्याप्रमाणेच करु. आम्ही बळी व पेयार्पण करुन तिची पूजा करु. आम्ही पूर्वीही हे केले आहे. आमच्या पूर्वजांनी, राजांनी व अधिकाऱ्यांनीही पूर्वी असेच केले. आम्ही सर्वांनी यहूदाच्या नगरांत आणि यरुशलेमच्या रस्त्यावर हेच केले. आम्ही स्वर्गातील राणीची पूजा केली तेव्हा आम्हाला अन्नाची कमतरता नव्हती, आम्हाला यश होते, आमचे काहीही वाईट झाले नाही. 18 पण आम्ही स्वर्गातील राणीला बळी व पेयार्पणे करुन तिची पूजा करण्याचे सोडून देताच आम्हाला अडचणी आल्या, आमचे लोक तलवारीने व उपासमारीने मारले गेले.” 19 मग स्त्रिया बोलू लागल्या, त्या यिर्मयाला म्हणाल्या, “जे काही आम्ही करीत होतो, ते आमच्या पतींना माहीत होते. स्वर्गातील राणीला बळी व पेयार्पण करण्याची त्यांची आम्हाला परवानगी होती. आम्ही पुऱ्यांमधून तिच्या प्रतिमा घडवीत होतो, हेही त्यांना माहीत होते.” 20 मग ह्या सर्व गोष्टी सांगणाऱ्या स्त्री पुरुषांशी यिर्मया बोलला 21 तो त्या लोकांना म्हणाला, “तुम्ही यहूदाच्या नगरांत आणि यरुशलेमच्या रस्त्यांवर बळी दिले हे परमेश्वराच्या लक्षात आहे. तुम्ही, तुमच्या पूर्वजांनी, राजांनी, अधिकाऱ्यांनी व देशातील लोकांनी असेच केले परमेश्वराच्या लक्षात हे सर्व होते. त्याने त्याबद्दल विचार केला. 22 मग परमेश्वराची सहनशक्ती संपली. तुम्ही केलेल्या वाईट आणि भयंकर कृत्यांचा परमेश्वराला तिरस्कार वाटला. म्हणून त्याने तुमच्या देशाचे ओसाड वाळवंट केले. तेथे आता कोणीही राहत नाही. तो देश आता शापरुप झाला आहे. 23 तुम्ही दैवतांना बळी अर्पण केले, म्हणूनच असे वाईट घडले, तुम्ही परमेश्वराविरुध्द वागून पाप केले. तुम्ही परमेश्वराचे ऐकले नाही. त्याच्या शिकवणुकीप्रमाणे तुम्ही वागला नाहीत अथवा त्याने घालून दिलेले नियम तुम्ही पाळले नाहीत करारातील तुमच्या शर्ती तुम्ही पाळल्या नाहीत.” 24 यिर्मया त्या सर्वांना म्हणाला, “यहूदातून येऊन मिसरमध्ये राहणाऱ्या तुम्ही सर्वांनी परमेश्वराचा संदेश ऐका: 25 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव म्हणतो, ‘तुम्ही आणि तुमच्या स्त्रियांनी तुमच्या म्हणण्याप्रमाणे केले. तुम्ही म्हणाला “आम्ही दिलेले वचन पाळू. आम्ही स्वर्गातील राणीला बळी व पेये अर्पण करण्याचे वचन दिले आहे.” तर मग जा दिलेल्या वचनाप्रमाणे वागा दिलेले वचन पाळा. 26 पण मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व यहूदी लोकांनो परमेश्वराचा संदेश ऐका मी माझ्या महान नावाची शपथ घेऊन वचन देतो की मिसरमध्ये राहणाऱ्या यहूदी लोकांपैकी कोणीही पुन्हा कधीही वचन देताना, माझी शपथ घेणार नाहीत ते पुन्हा कधीही “देवा शपथ.” असे म्हणणार नाही. 27 “‘मी त्या यहूदाच्या लोकांवर लक्ष ठेवत आहे, पण ते काळजी घेण्यासाठी म्हणून नाही, तर त्यांना इजा व्हावी म्हणून. मिसरमध्ये राहणारे यहूदी लोक उपासमारीने मरतील वा तलवारीने मारले जातील. त्यांचा संपूर्ण नाश होईपर्यंत हे मरणाचे सत्र चालूच राहील. 28 काही लोक तलवारीच्या वारातून निसटतील ते मिसरमधून यहूदाला परत येतील पण असे लोक फारच थोडे असतील. मग वाचलेल्या व मिसरमध्ये राहायला आलेल्या लोकांना कोणाचे शब्द खरे ठरले ते कळेल. ‘माझे शब्द खरे ठरले की त्यांचे’ ते त्यांना समजेल. 29 मी तुम्हाला ह्याचा पुरावा देईन.’ हा परमेश्वराचा संदेश आहे, ‘मी मिसरमध्येच तुम्हाला शिक्षा करीन. मग तुम्हाला दुखविण्याची वचने दिली होती ती खरी ठरतात, ह्याची तुम्हाला खात्री पटेल. 30 मी म्हटल्याप्रमाणे करतो हाच तुमच्यासाठी पुरावा असेल.’ परमेश्वर पुढे म्हणतो, ‘फारो हफ्रा हा मिसरचा राजा आहे. त्याचे शत्रू त्याला मारायला टपले आहेत. मी फारो हफ्राला त्याच्या शत्रूंच्या ताब्यात देईन. सिद्कीया यहूदाचा राजा होता नबुखदनेस्सर त्याचा शत्रू होता, मी सिद्कीयाला त्याच्या शत्रूच्या ताब्यात दिले त्याचप्रमाणे फारो हफ्राला मी त्याच्या शत्रूच्या ताब्यात देईल.”

45:1 यहोयाकीम हा योशीयाचा मुलगा होता. यहोयाकीम यहूदावर राज्य करीत असताना, त्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी यिर्मया या संदेष्ट्याने नेरीयाचा मुलगा बारुख यास पुढील गोष्टी सांगितल्या. बारुखने त्या पटावर लिहिल्या, यिर्मयाने बारुखला सांगितलेल्या गोष्टी पुढीलप्रमाणे होत्या. 2 “परमेश्वर, इस्राएलचा देव तुला असे म्हणतो 3 ‘बारुख, तू असे म्हणालास की, माझ्या दुष्टीने हे फार वाईट आहे. परमेश्वराने मला यातनांबरोबर दु:ख दिले आहे. मी फार कंटाळलो आहे. माझ्या दु:खाने मी हैराण झालो आहे. मी विश्रांती घेऊ शकत नाही.” 4 “यिर्मया, बारुखला असे सांग की परमेश्वर म्हणतो, ‘मी बांधलेले मीच तोडून टाकीन. मी पेरलेले मीच उपटून टाकीन. मी सर्व यहूदात असेच करीन. 5 बारुख, तू स्वत:साठी मोठ्या गोष्टींची अपेक्षा करतोस तशी अपेक्षा करु नकोस. कारण मी सर्वांवर संकट आणीन.’ परमेश्वरानेच ह्या गोष्टी सांगितल्या ‘तुला खूप ठिकाणी जावे लागेल पण तू जेथे जाशील, तेथून मी तुझी जिवंतपणे सुटका करीन.”

46:1 यिर्मया या संदेष्ट्याला जो संदेश मिळाला, तो वेगवेगळ्या राष्ट्रांसाठी होता. 2 हा संदेश मिसर देशासाठी आहे. फारो नखो ह्याच्या सैन्याविषयी हा संदेश आहे. नखो मिसरचा राजा होता. कर्कमीश शहराजवळ त्याच्या सैन्याचा पराभव झाला. कर्कंमीश फरात नदीच्या काठी आहे. योशीयाचा मुलगा योहयाकीम यहूदाचा राजा असताना त्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने फारो नखोच्या सैन्याचा कर्कमीश येथे पराभव केला. परमेश्वराचा मिसरला पुढीलप्रमाणे संदेश आहे: 3 “तुमच्या लहान मोठ्या ढाली तयार ठेवा. लढण्यासाठी कूच करा 4 घोडे तयार ठेवा. सैनिकांनो, घोड्यावर स्वार व्हा, युद्धासाठी आपापल्या जागा धरा. शिरस्त्राण घाला. भाल्यांना धार करा. चिलखत घाला. 5 हे मी काय पाहतो? ते सैन्य भयभीत झाले आहे, सैनिक दूर पळून जात आहेत त्यांच्या शूर वीरांचा पराभव झाला आहे. ते घाईने पळून जात आहेत. ते मागे वळून पाहत नाहीत. सगळीकडे धोका आहे.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या. 6 चपळ लोक दूर पळून जाऊ शकणार नाहीत. बलवान सैनिक निसटू शकणार नाहीत. ते सगळे अडखळून पडतील. हे सगळे फरात नदीच्या उत्तरेस घडेल. 7 नील नदीप्रमाणे हा कोण येत आहे? त्या मोठ्या, वेगवान नदीप्रमाणे कोण बरे येत आहे? 8 उसळणाऱ्या नील नदीप्रमाणे मिसर येत आहे. प्रचंड, वेगवान नदीप्रमाणे तो येत आहे. मिसर म्हणतो, ‘मी येऊन पृथ्वीला व्यापून टाकीन. मी शहरे व त्यात राहणाऱ्या लोकांचा नाश करीन.’ 9 घोडेस्वारांनो, चढाई करा. सारथ्यांनो, रथ वेगाने हाका. शूर सैनिकांनो, कूच करा. कूश व फूट येथील सैनिकांनो, ढाली सांभाळा. लूदच्या सैनिकांनो, धनुष्याचा उपयोग करा. 10 “पण त्या वेळी, आमच्या प्रभूचा, सर्वशक्तिमान परमेश्वराचाच जय होईल. तो त्यांना योग्य ती शिक्षा करील. परमेश्वराच्या शत्रूंना योग्य अशीच शिक्षा मिळेल. सर्वनाश होईपर्यंत तलवार वार करील. तलवारीला लागलेली रक्ताची तहान भागेपर्यंत ती लोकांना ठार करील. आमच्या प्रभूला, सर्वशक्तिमान परमेश्वराला बळी मिळावा म्हणून असे घडेल. हा बळी म्हणजे फरात नदीच्या काठी उत्तरेच्या प्रदेशात असलेले मिसरचे सैन्य होय. 11 “मिसर, गिलादला जा आणि काही औषध मिळव. तू खूप औषधे मिळवशील, पण त्याचा उपयोग होणार नाही तू बरा होणार नाहीस. 12 इतर राष्ट्रे तुझा आक्रोश ऐकतील. सर्व पृथ्वीवर तो ऐकू जाईल. एक ‘शूर योद्धा’ दुसऱ्या ‘शूर योधध्द्याला’ भिडेल. आणि दोघेही ‘शूर योद्धे’ बरोबरच खाली पडतील.” 13 परमेश्वराने यिर्मया या संदेष्ट्याला जो संदेश दिला, तो मिसरवर स्वारी करुन येणाऱ्या बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरबद्दल होता. 14 “मिसरमध्ये ह्या संदेशाची घोषणा कर. मिग्दोल, नोफ व तहपन्हेस येथे जाहीर कर ‘युद्धाला तयार व्हा. का? कारण तुमच्या भोवतालचे लोक तलवारीने मारले जात आहेत.’ 15 “मिसर, तुझे बलवान सैनिक मारले जातील. ते उभेच राहू शकणार नाहीत कारण परमेश्वरच त्यांना खाली पाडेल. 16 ते पुन्हा पुन्हा धडपडतील. ते एकमेकावर पडतील ते म्हणतील, ‘उठा! आपण माघारी, आपल्या लोकांमध्ये जाऊ या आपण माय भूमीला परत जाऊ. या आपला शत्रू आपला पराभव करीत आहे. आपण दूर गेलेच पाहिजे.’ 17 त्यांच्या मायभूमीत, ते सैनिक म्हणतील, ‘मिसरचा राजा फारो म्हणजे नुसताच राजावाजा आहे. त्याच्या वैभवाचा काळ संपला आहे.” 18 हा राजाकडून आलेला संदेश आहे. तो राजा म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वरच होय. “मी शपथपूर्वक वचन देतो की सामर्थ्यवान नेता येईल. तो ताबोर आणि समुद्राजवळील कर्मेल पर्वताप्रमाणे महान असेल. 19 मिसरच्या लोकांनो, गाशा गुंडाळा कैदेस तयार व्हा. का? कारण नोफचा नाश होऊन ते निर्जन होईल. त्या शहरांचा नाश केला जाईल. ती निर्जन होतील. 20 “मिसर सुंदर गायीप्रमाणे आहे. पण उत्तरेकडून एक गोमाशी तिला त्रास देण्यास येत आहे. 21 मिसरच्या सैन्यातील भाडोत्री सैनिक हे लठ्ठ वासराप्रमाणे आहेत. ते पाठ फिरवून पळून जातील. ते चढाईला समर्थपणे तोंड देणार नाहीत त्यांच्या नाशाची वेळ येत आहे. त्यांना लवकरच शिक्षा होईल. 22 मिसर, फूत्कारणाऱ्या व निसटून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सापाप्रमाणे आहे. शत्रू जवळ जवळ येत आहे आणि मिसरचे सैन्य पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. शत्रू मिसरवर कुऱ्हाडीने हल्ला करतील. ते लाकूडतोड्यां प्रमाणे असतील.” 23 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: “ते मिसरचे जंगल (सैन्य) तोडून टाकतील जंगलात (सैन्यात) खूप झाडे (सैनिक) आहेत. पण ती सर्व तोडली जातील. टोळापेक्षा तेथे जास्त सैनिक आहेत. कोणीही मोजू शकणार नाही एवढे सैनिक येथे आहेत. 24 मिसरची स्थिती लज्जास्पद होईल. उत्तरेचा शत्रू तिचा पराभव करील.” 25 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “लवकरच मी नोच्या आमोन देवतेला शिक्षा करीन. मी फारो, मिसर आणि तिचे दैवत यांनाही शिक्षा करीन. मी मिसरच्या राजाला सजा देईन आणि फारोवर अवलंबून असलेल्या लोकांना शिक्षा करीन. 26 मी ह्या सर्व लोकांचा त्यांच्या शत्रूंच्या हातून पराभव करीन. त्या शत्रूंची त्यांना मारण्याची इच्छा आहे. मी त्या लोकांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सेवक ह्यांच्या हवाली करीन.”“फार पूर्वी, मिसरला, शांतता होती. ह्या संकटकाळानंतरही मिसरला शांतता नांदेल.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या. 27 “याकोब, माझ्या सेवका, घाबरु नकोस. इस्राएल, भिऊ नकोस. दुरच्या ठिकाणाहून मी तुला वाचवीन. निरनिराळ्या देशांत कैदी म्हणून नेलेल्या तुझ्या मुलांचे मी रक्षण करीन. याकोबला पुन्हा शांतता व संरक्षण लाभेल. कोणीही त्याला भीती दाखविणार नाही.” 28 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “याकोब, माझ्या सेवका घाबरु नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला खूप निरनिराळ्या ठिकाणी पाठविले पण मी तुझा संपूर्ण नाश करणार नाही. इतर राष्ट्रांचा मात्र मी नाश करीन. तुझ्या दुष्कृत्यांबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे. म्हणून तुझ्या शिक्षेतून मी तुला सूट देणार नाही. मी तुला शिस्त लावीन हे खरे! पण ती न्याय्यपणाने लावीन.”

47:1 यिर्मया या सदेष्ट्याला परमेश्वराकडून पुढील संदेश आला. तो पालिष्ट्यांबाबत होता. फारोने गज्जा शहरावर हल्ला करण्यापूर्वी हा संदेश आला. 2 परमेश्वर म्हणतो, “पाहा! उत्तरेला शत्रू-सैनिक एकत्र आले आहेत वेगाने वाहून काठावर पसरणाऱ्या नदीप्रमाणे ते येतील. पूर ज्याप्रमाणे जमीन व्यापतो, तसेच ते सर्व देशांत पसरतील शहरे आणि त्यातील रहिवासी यांना ते गिळतील. त्या देशात राहणारा प्रत्येकजण मदतीसाठी आक्रोश करील. 3 “त्यांना घोड्याच्या टापांचे आवाज ऐकू येईल रथांचा गडगडाट व चाकांचा खडखडाट त्यांना ऐकू येईल. वडील आपल्या मुलांचे रक्षण करु शकणार नाहीत. ते इतके दुबळे होतील की ते मदत करु शकणार नाहीत. 4 सर्व पलिष्ट्यांच्या नाशाची वेळ आली आहे. सोर आणि सीदोन यांच्या उरलेल्या साहाय्यकांच्या नाशाची वेळ आली आहे. लवकरच परमेश्वर पलिष्ट्यांचा नाश करील. कपतोर द्विपातील वाचलेल्यांचाही तो नाश करील. 5 गज्जाचे लोक दु:खी होतील आणि आपले मुंडन करतील. अष्कलोनचे लोक शांत होतील. दरीतील वाचलेल्या लोकांनो तुम्ही कीती काळ स्वत:ला जखमा करणार? 6 “परमेश्वराच्या तलवारी, तू अजून थांबली नाहीस! किती काळ तू लढत राहणार? परत आपल्या म्यानात जा. थाब! शांत रहा! 7 पण परमेश्वराची तलवार विश्रांती कशी घेऊ शकेल? परमेश्वराने तिला आज्ञा दिली की अष्कलोन व समुद्रकिनारा ह्यावर हल्ला कर.”

48:1 हा संदेश मवाब देशासाठी आहे सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव असे म्हणतो:“नबो पर्वताला वाईट काळ येईल. त्याचा नाश होईल किर्याथाईमचा गर्व उत्तरेल ते काबीज केले जाईल मजबूत ठिकाणे वाकतील त्यांचे शतश: तुकडे होतील. 2 पुन्हा कधीही मवाबची स्तुती ऐकू येणार नाही. हेशबोनमधील लोक मवाबच्या पाडावाचा बेत आखतील ते म्हणतील, ‘या, आपण त्या देशाचा शेवट करु या.’ मदमेना, तू सुद्धा शांत होशील, तलवार तुझा पाठलाग करील. 3 होरोनाईमचा आक्रोश ऐका. तो गोंधळाचा व प्रंचड नाशाचा आवाज आहे. 4 मवाबचा नाश होईल. तिची लहान मुले मदतीसाठी आक्रोश करतील. 5 मवाबचे लोक लूहीथच्या रस्त्याने वर जाताना मोठ्याने रडत आहेत. खाली, होरोनाईमच्या रस्त्यांवर यातनांचे व दु:खाचे विव्हळणे ऐकू येते. 6 पळा! जीव वाचविण्यासाठी पळा! वाळवंटातून उडणाऱ्या झुडुपाप्रमाणे पळा! 7 तुम्ही घडविलेल्या गोष्टी व तुमची संपत्ती यावर तुम्ही भिस्त ठेवता, म्हणून तुम्ही पकडले जाल. कमोश दैवत कैद केले जाईल आणि त्याच्याबरोबर त्याचे पुरोहित व अधिकारी यांनाही नेले जाईल. 8 प्रत्येक गावावर विध्वंसक येईल. त्यातून एकही गाव सुटणार नाही. दरीचा नाश होईल. पठाराचाही नाश केला जाईल परमेश्वराने हे घडणार म्हणून सांगितले आहे, तेव्हा तसे घडणारच. 9 मवाबच्या शेतांवर मीठ पसरा. देशाचे ओसाड वाळवंट होईल. मवाबची शहरे निर्जन होतील. तेथे कोणीही राहणार नाही. 10 जो कोणी ‘त्या’ लोकांना मारण्यासाठी आपल्या तलवारीचा उपयोग करीत नसेल, त्याचे वाईट होईल. 11 मवाबला त्रास माहीत नाही मवाब मुरायला ठेवलेल्या मद्याप्राणे आहे. त्याला कधी एका रांजणातून दुसऱ्या रांजणात ओतलेले नाही. त्याला कधी कैद झालेली नाही. म्हणून त्याची चव कायम आहे आणि त्याच्या वासात फरक नाही.” 12 देव असे म्हणतो, “तुझ्या रांजणातून तुला ओतून टाकण्यासाठी मी लवकरच माणसे पाठवीन. ते रांजण रिकामे करुन त्याचे तुकडे करतील.” 13 मग दैवत कमोश याची मवाबच्या लोकांना लाज वाटेल इस्राएलच्या लोकांनी बेथेलयेथील दैवतांवर भिस्त ठेवली आणि त्याने त्यांना काहीच मदत केली नाही. म्हणून ते खजील झाले मवाबचेही तसेच होईल. 14 “आम्ही चांगले सैनिक व शूरवीर आहोत’ असे तुम्ही म्हणू शकत नाही. 15 शत्रू मवाबवर हल्ला करील. तो शहरात शिरुन त्यांचा नाश करील. कत्तलीत तिचे उत्तम तरुण मारले जातील.” हा राजाचा संदेश आहे, आणि राजाचे नाव आहे सर्वशक्तिमान परमेश्वर. 16 “मवाबचा शेवट जवळ आला आहे लवकरच तिचा नाश होईल. 17 त्या देशाभोवती राहणाऱ्यांनी त्यासाठी शोक करावा. तुम्हाला मवाबची किर्ती माहीत आहे. म्हणून त्याच्यासाठी शोक करा. म्हणा, ‘राजाची सत्ता संपली मवाबचे सामर्थ्य व वैभव गेले’ 18 “दोबोनच्या रहिवाशांनो, आपापल्या मानाच्या जागा खाली करा. जमिनीवर धुळीत बसा. का? कारण मवाबचा विनाश करणारा येत आहे, आणि तो तुमची मजबूत शहेर नष्ट करील. 19 “अरोएरच्या रहिवाशांनो, रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहा! पाहा! माणसे पळून जात आहेत पाहा! स्त्रियाही पळून जात आहेत त्यांना काय झाले ते विचारा 20 “मवाबचा नाश होईल त्याची फजिती होईल. मवाब आक्रोश करील. मवाबचा नाश झाला असे आर्णोन नदीकाठच्या प्रदेशात जाहीर करा. 21 उंच पठारावरील लोकांना शिक्षा केली जाईल. होलोन, याहस व मेफाथ ह्या शहरांचा न्यायनिवाडा झाला आहे. 22 दीबोन, नबे, बेथ-दिबलाथाईम ह्याही शहरांचा निवाडा झाला आहे. 23 किर्याथाईम, बेथ-गामूल व बेथ मौन यांचा निकाल लागला आहे. 24 करीयोथ, बसरा व मवाबमधील दूरची व जवळची शहरे यांचा न्यायनिवाडा झाला आहे. 25 मवाबची शक्ती तोडण्यात आली आहे. मवाबचे हात मोडले आहेत.” परमेश्वरानेच ह्या गोष्टी सांगितल्या. 26 “मवाब परमेश्वरापेक्षा स्वत:ला श्रेष्ठ समजला म्हणून, तो, मद्यप्याप्रमाणे झोकांड्या खाईपर्यंत त्याला शिक्षा करा. तो स्वत:च्याच वांतीत पडून लोळेल. लोक त्याची टर उडवतील. 27 “मवाब, तू इस्राएलची चेष्टा केलीस इस्राएल चोरांमध्ये पकडला गेला का? इस्राएलबद्दल बोलताना, प्रत्येक वेळी, तू मान हलवून, स्वत: इस्राएलपेक्षा चांगला असल्याचा अभिनय केलास. 28 मवाबवासीयांनो, तुमची गावे सोडा, जाऊन कडेकपारीत राहा गुहेच्या तोंडाशी घरटे करणाऱ्या पारव्यांप्रमाणे व्हा.” 29 “आम्ही मवाबच्या गर्वाविषयी ऐकले आहे. तो फारच गर्विष्ठ होता. तो स्वत:ला विशेष समजे. तो नेहमी बढाया मारीत असे. तो फारच दुराभिमानी होता.” 30 परमेश्वर म्हणतो, “मवाबला अकारण राग येतो आणि तो स्वत:बद्दल बढाया मारतो हे मला ठाऊक आहे. पण त्याच्या फुशारक्या खोट्या आहेत. तो बोलल्याप्रमाणे करु शकत नाही. 31 म्हणून मला मवाबसाठी रडू येते. मला त्या देशातील प्रत्येकाबद्दल वाईट वाटते. कीर हरेसमधील लोकांबद्दल मला वाईट वाटते. 32 याजेरसाठी मी तेथील लोकांबरोबर शोक करतो. सिबा, पूर्वी तुझ्या द्राक्षवेली पार समुद्रापर्यंत पसरल्या होत्या त्या पार याजेरपर्यंत पोहोचल्या होत्या; पण विनाशकाने तुझी फळे व द्राक्षे नेली आहेत. 33 मवाबच्या विस्तीर्ण द्राक्षमळ्यातून आनंद व सुख निघून गेले. द्राक्षकुंडातील द्राक्षरसाचा प्रवाह मी अडविला आहे. द्राक्षरस काढण्यासाठी द्राक्षे तुडविताना लोक गात वा नाचत नाहीत. तेथे हर्षकल्लोळ नाहीत. 34 “हेशबोन एलाले येथील लोक रडत आहेत. त्यांचे रडणे पार याहसपर्यंत, सोअरपासून होरानाईम व एग्लाथशलिशीयापर्यंत ऐकू येते. एवढेच नव्हे तर, निर्मीमचे पाणी सुद्धा आटले आहे. 35 मी मवाबला उच्चासनी त्याच्या दैवताला अर्पण करु देणार नाही.” परमेश्वराने असे सांगितले. 36 “मला मवाबचे फार वाईट वाटते. बासरीतून शोकसंगीताचे सूर बाहेर पडावेत, त्याप्रमाणे माझे मन रडते. मला कीर हरेसच्या लोकांबद्दल दु:ख वाटते. त्यांचा पैसा, संपत्ती सर्व काही हिरावून घेतले गेले. 37 प्रत्येकाने मुंडन व दाढी केली आहे. प्रत्येकाचा हात कापला आहे व त्यातून रक्त वाहत आहे.प्रत्येकजण शोकप्रवर्तक वस्त्रे कमरे भोवती गुंडाळत आहे. 38 मवाबमध्ये प्रत्येक घराच्या धाब्यावर आणि प्रत्येक सार्वजनिक स्थानी, लोक मृतांसाठी शोक करीत आहेत. मी रिकामा रांजण फोडावा त्याप्रमाणे मवाबला फोडले, म्हणून सर्वत्र दु:ख झाले आहे.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या. 39 “मवाबचे तुकडे केले गेले. लोक रडत आहेत. मवाब शरण आला. आता तो खजील झाला आहे. लोक त्याची खिल्ली उडवितात खरे, पण घडलेल्या गोष्टीमुळे ते भयभीतही होतात.” 40 परमेश्वर म्हणतो, “पाहा! शत्रू गरुडाप्रमाणे खाली झेपावत आहे. तो त्याचे पंख मवाबवर पसरवीत आहे. 41 मवाबची शहरे काबीज केली जातील. लपण्याच्या भक्कम जागांचा पाडाव होईल. त्या वेळी, मवाबचे सैनिक, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे भयभीत होतील. 42 मवाब या राष्ट्राचा नाश होईल. का? कारण त्याने स्वत:ला परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ मानले.” 43 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: “मवाबवासीयांनो, भीती, गर्ता आणि सापळे तुमची वाट पाहात आहेत. 44 लोक घाबरुन पळतील ते गर्तेत पडतील एखादा त्यातून वर आलाच, तर तो सापळ्यात सापडेल मी मवाबवर शिक्षेचे वर्ष आणीन.” परमेश्वराने असे सांगितले. 45 “लोक शक्तिशाली शत्रूपासून पळाले आहेत ते सुरक्षेतेसाठी हेशबोनला पळाले पण तेथे सुरक्षा नव्हती. हेशबोनमध्ये आग लागली सीहोनच्या गावात आग लागली आणि ती मवाबच्या नेत्यांचा नाश करीत आहे. ती त्या गर्विष्ठ लोकांचा नाश करीत आहे. 46 मवाब, तुझे वाईट होणार. कमोशच्या लोकांचा नाश होत आहे. तुझी मुलेमुली बंदिवान म्हणून वा कैदीम्हणून नेली जात आहेत. 47 “मवाबचे लोक कैदी म्हणून नेले जातील पण पुढील दिवसांत मी त्यांना परत आणीन.” हा परमेश्वराचा संदेश होता.येथे मवाबचा न्यायनिवाडा संपतो

49:1 हा संदेश अम्मोनी लोकांसाठी आहे. परमेश्वर म्हणतो, “अम्मोनी लोकांनो, इस्राएली लोकांना मुले नाहीत असे तुम्हाला वाटते का? आईवडील गेल्यावर तेथील जमिनीला कोणी वारस नाही असे तुम्ही समजता का? म्हणूनच कदाचित् मिलकोमने गादची भूमी घेतली का?” 2 परमेश्वर म्हणतो, “अम्मोनीच्या राब्बातून युद्धाचा खणखणाट ऐकण्याची वेळ येईल. राब्बाचा नाश होईल. ते पडझड झालेल्या इमारतींनी झाकलेली ओसाड टेकडी होईल. त्याच्या भोवतीची गावे जाळली जातील. ज्या लोकांनी, इस्राएलच्या लोकांना इस्राएलची भूमी बळजबरीने सोडायला लावली, त्यांच्याकडून इस्राएलचे लोक आपल्या भूमीचा ताबा घेतील. पण भविष्यात, इस्राएल त्यांना बळजबरीने हाकलून लावेल.” परमेश्वराने हे सांगितले. 3 “हेशबोनच्या लोकांनो, रडा का? कारण आयचा नाश झाला आहे. अम्मोनच्या राब्बातील स्त्रियांनो, शोक करा. शोकप्रदर्शक कपडे घालून रडा! सुरक्षेसाठी शहराकडे पळा! का? कारण शत्रू येत आहे. ते मिलकोम दैवताला, त्याच्या पुजाऱ्याला व इतर अधिकाऱ्यांना नेतील. 4 तुम्ही तुमच्या सामर्थ्याबद्दल बढाया मारता. पण तुम्ही दुर्बल होत आहात. तुमचा पैसा तुम्हाला वाचवील असा तुम्हाला विश्वास वाटतो तुमच्यावर हल्ला करण्याचा कोणी विचारही करणार नाही असे तुम्ही समजता.” 5 पण सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो: “मी सर्व बाजूंनी तुमच्यावर संकटे आणीन. तुम्ही सर्व पळून जाल आणि कोणीही तुम्हाला एकत्र आणू शकणार नाही.” 6 “अम्मोनी लोकांना कैदी करुन नेले जाईल. पण एक वेळ अशी येईल की मी त्यांना परत आणीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. 7 हा संदेश अदोमसाठी आहेसर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो: “तेमानमध्ये जरासुद्धा शहाणपण उरले नाही का? अदोमचे सुज्ञ लोक चांगला सल्ला देऊ शकत नाहीत का? त्यांनी त्यांचे शहाणपण गमावले का? 8 ददानच्या लोकांनो, पळा! लपा! का? कारण मी एसावाला त्याने केलेल्या दुष्कृत्याबद्दल शिक्षा करीन. 9 “मजूर द्राक्षमळ्यातून द्राक्षे तोडतात पण ते काही द्राक्षे झाडावरच ठेवतात. चोरसुद्धा सर्व नेत नाही. 10 पण एसावातील सर्व काही मी काढून घेईन, मी त्याच्या सर्व लपायच्या जागा शोधून काढीन. तो माझ्यापासून लपून राहू शकणार नाही. त्याची मुले, नातेवाईक, शेजारी सर्व मरतील. 11 त्याच्या मुलांची काळजी घ्यायला कोणीही शिल्लक राहणार नाही. त्याच्या बायका निराधार होतील.” पण मी (देव) तुमच्या अनाथ मुलांच्या जीवाचे रक्षण करीन. तुमच्या विधवा माझ्यावर विश्वास ठेऊ शकतात.” 12 परमेश्वर म्हणतो: “काही लोक शिक्षेला पात्र नाहीत. पण त्यांना सोसावे लागते. पण अदोम, तू शिक्षेला पात्र आहेस. म्हणून तुला खरोखरीच शिक्षा होईल. तुझ्या शिक्षेतून तुझी सुटका होणार नाही. तुला शिक्षा होईलच.” 13 परमेश्वर म्हणतो, “माझ्या अधिकारात मी वचन देतो की बसऱ्याचा नाश होईल. ते शहर पडझड झालेल्या दगडांची रास होईल. दुसऱ्या शहरांना शाप देताना लोक बसऱ्याचे नाव उच्चारतील. लोक त्याचा अपमान करतील आणि त्याभोवतालची गावेसुद्धा कायमची नाश पावतील.” 14 मी परमेश्वराकडून आलेला संदेश ऐकला परमेश्वराने राष्ट्रांकडे दूत पाठविला. तो असा “तुमची सैन्ये गोळा करा. लढायला सज्ज व्हा. अदोमकडे कूच करा. 15 “अदोम, मी तुला राष्ट्रांमध्ये क्षुद्र बनवीन. प्रत्येकजण तुझा तिरस्कार करील. 16 अदोम, तू दुसऱ्या राष्ट्रांना घाबरविलेस! म्हणून तू स्वत:ला श्रेष्ठ समजलास! पण तू मूर्ख बनलास! तुझ्या गर्वाने तुला फसविले. अदोम, तू डोंगरात उंचावर राहतोस मोठ्या दगड धोंड्यांनी सुरक्षित केलेल्या जागी तू राहतोस पण जरी तू गरुडाच्या घरट्याप्रमाणे उंच घर बांधलेस तरी मी तुला पकडून खाली खेचून आणीन.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या. 17 अदोमचा नाश होईल. लोकांना ते पाहून धक्का बसेल. नाश झालेली शहरे पाहून लोक चकित होऊन सुस्कारे सोडतील. 18 सदोम, गमोरा त्याभोवतालची गावे यांच्याप्रमाणे अदोमचा नाश होईल. तेथे कोणीही राहणार नाही.” देव असे म्हणाला, 19 “यार्देन नदीजवळच्या दाट झुडुपातून कधीतरी सिंह येईल व तो लोक शेतात जेथे मेंढ्या व गुरे ठेवतात, तेथे जाईल. मी त्या सिंहा सारखाच आहे. मी अदोमला जाईन आणि त्या लोकांना घाबरवीन. मी त्यांना पळून जायला भाग पाडीन, त्यांचा एकही तरुण मला थांबवू शकणार नाही. कोणीही माझ्यासारखा नाही. कोणीही मला आव्हान देणार नाही. त्यांचा कोणीही मेंढपाळ (नेता) माझ्या विरोधात उभा राहणार नाही.” 20 म्हणून अदोमच्या लोकांसाठी परमेश्वराने आखलेला बेत काय आहे तो ऐका: तेमानच्या लोकांचे काय करायचे ते परमेश्वराने ठरविले आहे. ते काय ठरविले आहे तेही ऐका. शत्रू अदोमच्या कळपातून (लोकांतून) लहान लेकरांना ओढून नेईल. त्यांनी केलेल्या कृत्यांमुळे अदोमची कुरणे ओसाड बनतील. 21 अदोमच्या पडण्याच्या आवाजाने धरणी हादरेल. त्याचा आक्रोश तांबड्या समुद्रापर्येत ऐकू जाईल. 22 हेरलेल्या सावजावर घिरटया घालणाऱ्या गरुडाप्रमाणे परमेश्वर आहे. परमेश्वर, गरुडाप्रमाणे, आपले पंख बसऱ्यावर पसरेल. त्या वेळी अदोमचे सैनिक फार भयभीत होतील प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे शूर सैनिक भीतीने रडतील. 23 हा संदेश दिमिष्क शहरासाठी आहे.‘हमाथ व अर्पाद ही गावे घाबरली आहेत वाईट बातमी ऐकल्याने ती घाबरलीत. त्यांचा धीर खचला आहे. ते चिंताग्रस्त झाले आहेत आणि भयभीतही 24 दिमीष्क दुबळे झाले आहे. लोकांना पळून जायचे आहे. लोक भीतिग्रस्त होण्याच्या बेतात आहेत. प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे लोकांना यातना व वेदना होत आहेत. 25 “दिमिष्क एक सुखी नगरी होती. लोकांनी अजून ती ‘मौजेची नगरी’ सोडलेली नाही. 26 म्हणून तरुण त्या नगरीतील सार्वजनिक स्थळी मरतील. त्या वेळी तिचे सर्व सैनिक मारले जातील.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या. 27 “मी दिमिष्काच्या तटबंदीला आग लावीन. ती बेन-हदादचे मजबूत गड पूर्णपणे बेचिराख करील.” 28 हा संदेश केदारच्या कुळांसाठी व हासोरच्या राज्यकर्त्यांसाठी आहे. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने त्यांचा पराभव केला.परमेश्वर म्हणतो, “जा आणि केदारच्या कुळांवर चढाई करा. पूर्वेच्या लोकांचा नाश करा. 29 त्यांचे तंबू व कळप नेले जातील. त्यांचे तंबू व संपत्ती घेतली जाईल त्यांचा शत्रू त्यांचे उंट नेईल. लोक त्यांना ओरडून सांगतील. ‘आमच्याभोवती काहीतरी भयंकर घडत आहे.’ 30 लवकर पळा! हासोरवासीयांनो, लपायला चांगली जागा शोधा.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “नबुखद्नेस्सरने तुमच्याविरुद्ध कट केला आहे. तुमचा पराभव करण्यासाठी त्याने हुशारीने बेत रचला आहे. 31 आपण सुरक्षित आहोत अशी भावना असलेले एक राष्ट्र आहे. त्याला अतिशय सुरक्षित वाटते त्याच्या रक्षणसाठी दरवाजे वा कुंपण नाही. त्यांच्याजवळ कोणी माणसे राहात नाहीत. परमेश्वर म्हणतो, ‘त्या राष्ट्रांवर हल्ला करा.’ 32 शत्रू त्यांचे उंट व गुरांचे मोठे कळप चोरेल. ते लोक त्यांच्या दाढीच्या कडा कापतात.मी त्यांना जगाच्या लांबच्या कोपऱ्यात पळून जायला लावीन. मी, त्यांच्यावर, सगळीकडून संकटे आणीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. 33 “हासोरला फक्त कोल्ह्यांची वस्ती होईल. तेथे कोणीही मनुष्यप्राणी राहणार नाही. ती जागा निर्जन होईल. तेथे कायमचे ओसाड वाळवंट होईल.” 34 यहूदाचा राजा सिद्कीया ह्याचा कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात यिर्मया या संदेष्ट्याला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो एलाम या राष्ट्राबाबत होता. 35 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “मी लवकरच एलामचे धनुष्य मोडीन. धनुष्य हे त्याचे सर्वांत सामर्थ्यशाली शस्त्र आहे. 36 मी एलामच्या विरुद्ध चार वारे सोडीन. मी त्यांना आकाशाच्या चार कोपऱ्यातून सोडीन. जगाच्या पाठीवर जेथे चारी वारे पोहोचतील अशा ठिकाणी मी त्यांना पाठवीन. एलामचे लोक कैदी म्हणून प्रत्येक राष्ट्रांतून नेले जातील. 37 एलामचे त्याच्या शत्रूसमोर मी तुकडे तुकडे करीन. जे लोक त्याला ठार करु इच्छितात, त्यांच्यासमोर मी एलामला मोडीन. मी त्यांच्यावर भयंकर संकटे आणीन. मी कित्ती रागावलो आहे, हे त्यांना दाखवून देईल.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.“एलामचा पाठलाग करायला मी तलवार पाठवीन. मी त्या सर्वांना ठार करेपर्यंत, ती त्यांचा पाठलाग करील. 38 नियंत्रण करणे माझ्या हातात आहे, हे मी एलामला दाखवून देईन. मी राजा व त्याचे अधिकारी यांना ठार करीन.” हा देवाचा संदेश आहे. 39 “पण भविष्यात, मी एलामला परत आणीन आणि तिच्याबाबतीत चांगल्या गोष्टी घडतील असे करीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

50:1 बाबेल व खास्दी ह्यंच्यासाठी परमेश्वराने पुढील संदेश दिला हा संदेश देवाने यिर्मयामार्फत दिला. 2 “सर्व राष्ट्रांत घोषणा कर! झेंडा उंच उभारुन संदेश दे. माझा सगळा संदेश दे आणि सांग ‘बाबेल काबीज केला जाईल. बेल दैवताची फजिती होईल. मरदोख घाबरुन जाईल. बाबेलच्या मूर्तींची विटंबना केली जाईल. त्या भयभीत होतील.’ 3 उत्तरेकडचे राष्ट्र बाबेलवर चढाई करील. ते राष्ट्र बाबेलचे ओसाड वाळवंट करील. तेथे कोणीही राहणार नाही. माणसे व प्राणी, दोघेही, तेथून पळ काढतील” 4 परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी इस्राएलचे व यहूदाचे लोक एकत्र येतील. ते एकत्र येऊन रडतील, आणि एकत्रितपणेच त्यांच्या परमेश्वर देवाचा शोध घेतील. 5 ते सियोनची वाट विचारतील, व ते त्या दिशेने चालायला सुरवात करतील. लोक म्हणतील, ‘चला, आपण स्वत: परमेश्वराला जाऊन मिळू या, अखंड राहणारा एक करार करु या. आपण कधीही विसरणार नाही असा करार करु या.’ 6 “माझे लोक चुकलेल्या मेंढराप्रमाणे आहेत. त्यांच्या मेंढपाळांनी (नेत्यांनी) त्यांना चुकीच्या मार्गाने नेले. त्यांना डोंगर टेकड्यांतून भटकायला लावले. ते त्यांच्या विश्रांतीची जागा विसरले. 7 ज्यांना माझे लोक सापडले, त्यांनी त्यांना दुखवले, आणि ते शत्रू म्हणाले, ‘आम्ही काहीही चूक केली नाही.’ त्या लोकांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले. परमेश्वरच खरा त्यांचे विश्रांतिस्थान होता. त्यांच्या वडिलांनी परमेश्वर देवावरच विश्वास ठेवला. 8 “बाबेलपासून दूर पळा खास्द्यांची भूमी सोडा कळपाच्या पुढे चालणाऱ्या एडक्याप्रमाणे व्हा. 9 मी उत्तरेकडून खूप राष्ट्रांना एकत्र आणीन. ते बाबेलविरुद्ध लढायला सज्ज होतील. उत्तरेकडचे लोक बाबेल काबीज करतील. ते बाबेलवर बाणांचा वर्षाव करतील. ते बाण, युद्धावरुन रिकाम्या हाताने कधीच न परतणाऱ्या, सैनिकांप्रमाणे असतील. 10 शत्रू खास्द्यांची सर्व संपत्ती घेतील. सैनिक त्यांना पाहिजे ते लुटून नेतील.” परमेश्वरानेच ह्या गोष्टी सांगितल्या. 11 “बाबेल, तू आनंदी व उल्हसित आहेस तू माझी भूमी घेतलीस. धान्यात शिरलेल्या गायीप्रमाणे तू नाचतेस. तू आनंदाने घोड्याप्रमाणे खिंकाळतेस. 12 “आता तुझी आई खजील होईल. तुला जन्म देणारी ओशाळवाणी होईल. बाबेल सर्व राष्ट्रांत क्षुद्र ठरेल. ती म्हणजे ओसाड, निर्जन वाळवंट होईल. 13 परमेश्वर आपला क्रोध प्रकट करील, म्हणून तेथे कोणीही राहणार नाही. बाबेल संपूर्ण निर्जन होईल.“बाबेल जवळून जाणारा प्रत्येकजण भयभीत होईल. बाबेलचा असा वाईट रीतीने नाश झालेला पाहून ते हळहळतील. 14 “बाबेलविरुद्ध लढण्यास सज्ज व्हा. धनुर्धाऱ्यांनो बाबेलवर बाणांचा वर्षाव करा. त्यात कमतरता करु नका. बाबेलने परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे. 15 बाबेलला वेढा घातलेल्या सैनिकांनो जयघोष करा. बाबेलने शरणागती पत्करली आहे. तिची तटबंदी व बुरुज पाडले आहेत. परमेश्वर त्यांना योग्य तीच शिक्षा करीत आहे. तिच्या लायकीप्रमाणे, तुम्ही राष्ट्रांनी तिला शिक्षा द्यावी. तिने जसे इतर राष्ट्रांशी वर्तन, केले, तसेच तिच्याशी करा. 16 बाबेलमधील लोकांना धान्य पेरु देऊ नका. त्यांना पीक काढू देऊ नका. बाबेलच्या सैनिकांनी खूप कैद्यांना त्यांच्या शहरात आणले. पण आता शत्रू सैनिक आले आहेत, त्यामुळे कैदी आपापल्या घरी परत जात आहेत. ते आपल्या देशांकडे धाव घेत आहेत. 17 “सर्व देशभर पसरलेल्या मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे इस्राएल आहे. सिंहाने पाठलाग करुन दूर पळवून लावलेल्या मेंढराप्रमाणे इस्राएल आहे. त्यांच्यावर प्रथम हल्ला करणारा सिंह म्हणजे अश्शूरचा राजा आणि त्याची हाडे मोडणारा अखेरच सिंह म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर होय.” 18 म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “मी लवकरच बाबेलच्या राजाला व त्याच्या देशाला शिक्षा करीन. अश्शुरच्या राजाला केली तशीच बाबेलच्या राजाला मी शिक्षा करीन. 19 “मी इस्राएलला त्याच्या भूमीत परत आणीन. कर्मेलच्या डोंगरावर व बाशानच्या भूमीत वाढलेले धान्य तो खाईल व तृप्त होईल. एफ्राईम व गिलाद येथील टेकड्यांवर तो चरेल.” 20 परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी, लोक, इस्राएलचे अपराध शोधण्याचे कसून प्रयत्न करतील. पण अपराध असणारच नाही. लोक यहूदाची पापे शोधण्याचे प्रयत्न करतील. पण त्यांना एकही पाप सापडणार नाही. का? कारण मी इस्राएलमधील व यहूदातील काही वाचलेल्या लोकांचे रक्षण करीन आणि त्यांनी पाप केले असले तरी त्यांना क्षमा करीन.” 21 परमेश्वर म्हणतो, “मराथाईमवर हल्ला करा. पकोडच्या लोकांवर चढाई करा. त्यांच्यावर हल्ला करा. त्यांना ठार करा. त्यांचा संपूर्ण नाश करा. माझ्या आज्ञेप्रमाणे करा. 22 “युध्दाचा खणखणाट सर्व देशातू ऐकू जाऊ शकेल. तो मोठ्या नाशाचा आवाज असेल. 23 बाबेलला ‘सर्व जगाचा हातोडा’ असे म्हटले गेले. पण आता ‘हातोड्याचे तुकडे तुकडे झाले आहेत इतर राष्ट्रापेक्षा बाबेलचा सर्वाधिक नाश झाला आहे. 24 बाबेल, मी तुझ्यासाठी सापळा रचला, आणि तुला समजण्याआधीच तू पकडला गेलास. तू परमेश्वराविरुद्ध लढलास, म्हणून तू सापडलास व पकडला गेलास. 25 परमेश्वराने आपले कोठार उघडले आहे. त्यांच्या क्रोधाची हत्यारे परमेश्वराने बाहेर आणली आहेत. खास्द्यांच्या देशात सर्वशक्तिमान परमेश्वर देवाला काम करायचे असल्याने त्याने ती हत्यारे बाहेर काढली आहेत. 26 दूरवरुन बाबेलवर चालून या. तिची धान्याची कोठारे फोडा. बाबेलचा संपूर्ण नाश करा. कोणालाही जिवंत सोडू नका. धान्याच्या राशीप्रमाणे प्रेतांच्या राशी घाला. 27 बाबेलमधल्या सर्व तरुण बैलांना (पुरुषांना) ठार करा. त्यांची कत्तल होऊ द्या. त्यांच्या पराभवाची वेळ आली आहे. त्यांचे फार वाईट होईल. ही त्यांच्या शिक्षेची वेळ आहे. 28 लोक बाबेलमधून बाहेर धावत आहेत. ते त्या देशातून सुटका करुन घेत आहेत. ते सियोनला येत आहेत. परमेश्वराच्या कृत्याबद्दल ते प्रत्येकाला सांगत आहेत. बाबेलला योग्य अशी शिक्षा परमेश्वर करीत असल्याबद्दल ते सांगत आहेत. बाबेलने परमेश्वराचे मंदिर उद्ध्वस्त केले म्हणून आता परमेश्वर बाबेलचा नाश करीत आहे. 29 “धनुर्धाऱ्यांना बोलवा. त्यांना बाबेलवर हल्ला करायला सांगा. त्यांना शहराला वेढा घालायला सांगा. कोणालाही पळू देऊ नका. तिने केलेल्या दुष्कृत्यांची परतफेड करा. तिने इतर राष्ट्रांशी जसे वर्तन केले, तसेच तिच्याशी करा. बाबेलने परमेश्वराला मान दिला नाही. इस्राएलच्या पवित्र परमेश्वराशी तिने उध्दटपणा केला. म्हणून बाबेलला शिक्षा करा. 30 बाबेलच्या तरुणांना रस्त्यांत ठार केले जाईल. त्याच दिवशी तिचे सर्व सैनिक मरतील.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या. 31 “बाबेल, तू फार गर्विष्ठ आहेस, आणि मी तुझ्या विरुद्ध आहे” आमचा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगतो. “मी तुझ्या विरुद्ध आहे, आणि तुझी शिक्षेची वेळ आली आहे. 32 गर्विष्ठे बाबेल अडखळून पडेल आणि तिला उठायला कोणीही मदत करणार नाही. तिच्यातील गावांत मी आग लावीन. ती आग तिच्याभोवतालच्या प्रत्येकाला भस्मसात करील.” 33 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “इस्राएल व यहूदा येथील लोक गुलाम झाले आहेत. शत्रूने त्यांना पकडून नेले व तो इस्राएलला सोडणार नाही. 34 पण परमेश्वर त्या लोकांना परत आणेल. त्याचे नाव आहे ‘सर्वशक्तिमान परमेश्वर देव’ तो समर्थपणे त्या लोकांचे रक्षण करील. त्यामुळे त्या देशाला विश्रांती मिळू शकेल. पण बाबेलच्या लोकांना विश्रांती मिळणार नाही.” 35 देव म्हणतो, “तलवारी, बाबेलवासीयांना ठार कर. बाबेलमधील राजाच्या अधिकाऱ्यांना व ज्ञानी लोकांना ठार कर. 36 तलवारी, बाबेलच्या याजकांना आणि खोट्या संदेष्ट्यांना ठार मार, ते मूर्ख माणंसांसारखे होतील. बाबेलच्या सैनिकांना ठार मार, ते सैनिक भीतीने गर्भगळीत झाले आहेत. 37 तलवारी, बाबेलचे घोडे व रथ नष्ट कर. दुसऱ्या देशांतून आणलेल्या भाडोत्री सैनिकांना मार. ते सैनिक अतिशय घाबरलेल्या स्त्रियांप्रमाणे भयभीत होतील. तलवारी, बाबेलच्या संपत्तीचा नाश कर. ती संपत्ती लुटली जाईल. 38 तलवारी, बाबेलच्या पाण्याला झळ पोहोचव, तेथील सर्व पाणी सुकून जाईल. बाबेलमध्ये पुष्कळ मूर्ती आहेत त्या मूर्ती बाबेलचे लोक मूर्ख असल्यांचे दर्शवितात म्हणून त्या लोकांचे वाटोळे होईल. 39 “पुन्हा कधीही बाबेलमध्ये मनुष्यवस्ती होणार नाही. जंगली, कुत्रे, शहामृग, आणि वाळवंटातील इतर प्राणी तेथे राहतील. पण कोणीही मनुष्याप्राणी तेथे पुन्हा कधीही राहणार नाही. 40 देवाने सदोम, गमोरा आणि त्या भोवतालच्या गावांचा संपूर्ण नाश केला. ती ठिकाणे आता निर्जन झाली आहेत. त्याचप्रमाणे, बाबेलमध्येही कोणी राहणार नाही, आणि तेथे कोणीही वस्ती करायला जाणार नाही. 41 “पाहा! उत्तरेकडून लोक येत आहेत. ते एका शक्तिशाली राष्ट्रांतून येत आहेत. सर्व जगातील पुष्कळ राजे एकत्र येत आहेत. 42 त्यांच्या सैन्यांजवळ धनुष्यबाण व भाले आहेत. ते सैनिक क्रूर आहेत. त्यांच्याजवळ दया नाही. ते घोड्यांवर स्वार होऊन येतात. त्या घोड्यांच्या टापांचा आवाज समुद्राच्या गर्जनेप्रमाणे असतो. ते आपापल्या जागा घेऊन लढाईसाठी उभे ठाकतात. बाबेल नगरावर हल्ला करण्यासाठी ते सज्ज आहेत. 43 बाबेलच्या राजाने ह्या सैन्याबद्दल ऐकले, आणि तो फारच घाबरला. भीतीने त्याचे हातपाय गळून गेले. प्रसून्न होणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्याला कष्ट झाले.” 44 परमेश्वर म्हणतो, “कधीतरी, यार्देन नदीजवळच्या दाट झुडुपांतून सिंह येईल, व तो शेतांतील गोठ्यांमध्ये जाईल. मग सर्व गुरे दूर पळून जातील. मी त्या सिंहासारखाच असेन. बाबेलच्या भूमीपासूनच मी बाबेलला हुसकून लावीन. ह्यासाठी मी कोणाची निवड करावी बरे? कोणीही माझ्यासारखा नाही. मला आव्हान देणाराही कोणी नाही. म्हणून मीच हे करीन. मला पळवून लावण्यास कोणीही मेंढपाळ येणार नाही. मी बाबेलच्या लोकांचा पाठलाग करीन.” 45 बाबेलसाठी परमेश्वराने काय बेत केला आहे तो ऐका. खास्द्यांसाठी परमेश्वराने काय करायचे निश्र्च्ति केले आहे ते ऐका. बाबेलच्या कळपातील (लोकांतील) लहान मुलांना शत्रू फरपटत नेईल. मग बाबेलच्या कुरणांचा संपूर्ण नाश होईल. ह्या घटनेमुळे बाबेलला धक्का बसेल. 46 बाबेल पडेल, आणि त्यामुळे पृथ्वी हादरेल राष्ट्रांतील लोक बाबेलचा आक्रोश ऐकतील.

51:1 परमेश्वर म्हणतो, “मी जोरदार वादळ निर्माण करीन. त्या वादळाचा तडाखा बाबेलला व तिच्या लोकांना देईन. 2 मी बाबेलची उफाणणी करण्यासाठी परदेशी लोक पाठवीन. ते बाबेलला पाखडून काढतील. ते बाबेलमधून सर्व काही नेतील सैन्य बाबेलला वेढा देईल. बाबेलमध्ये भयंकर संहार होईल. 3 बाबेलच्या सैन्याला त्यांच्या धनुष्यबाणांचा उपयोग करता येणार नाही. त्यांना चिलखते चढवायलाही वेळ मिळणार नाही. बाबेलच्या तरुण पिढीबद्दल खेद करु नका. बाबेलच्या सैन्याचा नाश करा. 4 बाबेलचे सैनिक खास्द्यांच्या भूमीत गारद केले जातील. बाबेलच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात जखमी केले जातील.” 5 सर्वशक्तिमान परमेश्वराने इस्राएलला व यहूदास, विधवेप्रमाणे टाकून दिलेले नाही. देवाने त्या लोकांचा त्याग केलेला नाही. उलटपक्षी, त्याच लोकांनी इस्राएलच्या एकमेव पवित्र परमेश्वराला सोडण्याचा गुन्हा केला आहे. लोकांनी परमेश्वराला सोडले. पण देवाने काही त्या लोकांना दूर लोटले नाही. 6 स्वत:चा जीव वाचविण्यासाठी बाबेलमधून दूर पळून जा. बाबेलच्या पापांबद्दल, मागे राहून, स्वत:वर मरण ओढवून घेऊ नका. त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना परमेश्वराने सजा देण्याची वेळ आता आली आहे. बाबेलला योग्य अशीच सजा मिळेल. 7 बाबेल म्हणजे जणू काही परमेश्वराच्या हातातील सोन्याचा प्याला होता. बाबेलने सर्व जगाला मद्य पाजले. राष्ट्रांनी बाबेलचे मद्य प्यायले आणि ते खुळे झाले. 8 पण बाबेलचे अकस्मात पतन होईल आणि त्याची शकले पडतील. तिच्यासाठी शोक करा. तिच्या दु:खावर इलाज करा. कदाचित् तिच्या जखमा भरुन येतील. 9 आम्ही बाबेलला सुधारण्याचा प्रयत्न केला, पण ती पूर्वपदावर येणे शक्य नाही, तेव्हा आपण तिला सोडून आपापल्या देशात जाऊ या. स्वर्गातील देव बाबेलच्या शिक्षेबद्दल आणि भवितव्याबद्दल निर्णय घेईल. 10 परमेश्वराने आपल्याला न्याय दिला. आपण त्याबद्दल सियोनमध्ये सांगू या. आपल्या परमेश्वर देवाने घडवून आणलेल्या गोष्टींबद्दल आपण बोलू या. 11 बाण धारदार करा! ढाली घ्या. परमेश्वराला मेद्यांच्या राजाकडून बाबेल नष्ट करायचे होते, म्हणून त्याने त्यांना स्फूर्ती दिली. बाबेलच्या लोकांना योग्य अशी शिक्षा परमेश्वर करील. बाबेलच्या सैन्याने यरुशलेममधील परमेश्वराचे मंदिर उध्वस्त केले. त्याबद्दल परमेश्वर त्यांना यथायोग्य शिक्षा करील. 12 बाबेलच्या तटासमोर झेंडा उभारा. जास्ती रक्षक आणा. पहारेकऱ्यांना त्यांच्या जागी उभे करा. छुपा हल्ला करण्याची तयारी करा. परमेश्वर, त्याने ठरविल्याप्रमाणे करील. बाबेलच्या लोकांविरुद्ध, त्याने सांगितल्याप्रमाणे, तो कारवाई करील. 13 बाबेल, तू भरपूर पाण्याच्या ठिकाणी वसली आहेस. तुझ्याकडे भरपूर संपत्ती आहे. पण राष्ट्र म्हणून तुझा शेवट जवळ आला आहे. तुझा नाश करण्याची हीच वेळ आहे. 14 सर्वशक्तिमान परमेश्वराने स्वत:च्या नावाने पुढील वचन दिले, “बाबेल, मी तुझ्यात मोठ्या प्रमाणात शत्रू सैन्य पेरीन. एखाद्या टोळ धाडीप्रमाणे असणारे हे सैन्य तुझ्याविरुध्दची लढाई जिंकले. आणि तुझ्या भूमीवर उभे राहून ते जयघोष करील.” 15 परमेश्वराने आपली महान शक्ती वापरुन ही पृथ्वी निर्माण केली. त्याने आपले ज्ञान वापरुन जगाची उभारणी केली. आपल्या आकलन शक्तीने त्यावर आकाश पांघरले. 16 जेव्हा परमेश्वर गरजतो, तेव्हा आकाशात ढगांचा गडगडाट होतो तो पृथ्वीवर सर्वत्र ढग पाठवितो पावसाबरोबर वीज पाठवित तो आपल्या कोठारातून वारा आणतो. 17 पण लोक इतके मूर्ख असतात की देवाने काय केले ते जाणत नाहीत. कुशाल कारागीर खोट्या दैवतांच्या मूर्ती करतात. त्या मूर्ती खोट्याच असतात. त्या म्हणजे कारगिराच्या मूर्खपणाचे प्रतीक होय. त्या मूर्ती काही जिवंत नसतात. 18 त्या मूर्ती कवडीमोलाच्या आहेत. लोकांनी घडविलेल्या त्या मूर्ती म्हणजे भ्रम आहे. त्यांच्या न्यायनिवाड्याचा दिवस उजाडेल आणि त्यांचा नाश केला जाईल. 19 पण याकोबाचा अंश (देव) त्या टाकाऊ पुतळ्यांसारखा नाही. लोकांनी देवाला निर्माण केले नसून, देवाने त्या लोकांना निर्माण केले. प्रत्येक गोष्टीचा निर्माता तोच एकमेव आहे. त्याचे नाव आहे सर्वशक्तिमान परमेश्वर. 20 परमेश्वर म्हणतो, “बाबेल, तू माझा दंडुका आहेस. तुझा उपयोग मी राष्ट्रांची शकले व राज्यांचा नाश करण्यासाठी केला. 21 तुझा उपयोग मी घोडे आणि स्वार, रथ आणि सारथी ह्यांचा नाश करण्यासाठी केला. 22 पुरुष आणि स्त्रिया वृद्ध आणि तरुण, तरुणी यांचा नाश करण्यासाठी मी तुझा उपयोग केला. 23 मेंढपाळ व कळप, शेतकरी आणि गाई, राज्यकर्ते व महत्वाचे अधिकारी यांचा नाश करण्यासाठी मी तुझा उपयोग केला. 24 पण मी बाबेलचे व तेथील लोकांचे उट्ठे काढीन. त्यांनी सियोनमध्ये जी दुष्कृत्ये केली, त्याचे परिणाम मी त्यांना भोगायला लावीन. यहूदा, तुझ्या लक्षात येईल, असे शासन मी त्यांना करीन.” असे परमेश्वर म्हणाला, 25 परमेश्वर म्हणतो, “बाबेल तू एखाद्या विनाशकारी पर्वताप्रमाणे आहेस, आणि मी तुझ्याविरुद्ध आहे. तू सर्व देशाचा नाश केलास, आणि मला ते आवडले नाही. मी माझ्या हाताच्या बळाने तुला कड्यांवरुन लोटून देईन. आणि बेचिराख झालेल्या पर्वताप्रमाणे मी तुझी स्थिती करीन. 26 इमारतींच्या पायासाठी लोक बाबेलमधून एकही दगड घेणार नाहीत. कोनाशिलेला लागणारा मोठा चिरा लोकांना मिळणार नाही. का? कारण तुमची नगरी म्हणजे पडीक दगडधोंड्यांचा कायमचा खच असेल.” परमेश्वराने हे सांगितले. 27 “देशात युद्धाचे निशाण उभारा! सर्व राष्ट्रांमध्ये कर्णा फुंका. बाबेलविरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रांना सज्ज करा. अरारात, मिन्नी, आष्कनाज या राज्यांना बाबेलवर चढाई करण्यासाठी बोलवा. तिच्याविरुद्ध लढणाऱ्या सैन्याच्या सेनापतीची निवड करा. टोळधाडीप्रमाणे घोडे पाठवा. 28 बाबेलविरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रांची सिद्धता करा. मेद्यांच्या राजांना सज्ज करा. त्यांच्या अधिपतींना आणि अधिकाऱ्यांना लढण्यासाठी तयार करा. बाबेलच्या अंमलाखालच्या सर्व देशांना बाबेलच्या विरुद्ध लढण्यास सिद्ध करा. 29 वेदना होत असल्याप्रमाणे भूमी कापते व हालते. बाबेलबद्दल परमेश्वराने ठरविलेला बेत परमेश्वराने सिद्धीस नेताच भूमी कंप पावेल. बाबेलचे निर्जन वाळवंटात रुपांतर करण्याचा देवाचा बेत आहे. तेथे कोणीही राहणार नाही. 30 बाबेलच्या सैनिकांनी लढाई थांबवली आहे. ते त्यांच्या किल्ल्यांतच राहिले आहेत. त्यांची शक्ती संपली आहे ते बायकांप्रमाणे घाबरुन गेले आहेत. बाबेलमधील घरे जळत आहेत. तिच्या वेशीच्या दारांचे अडसर मोडले आहेत. 31 एका दूतामागून दुसरा दूत येतो. दूतामागून दूत येतात. ते बाबेलच्या राजाला संपूर्ण शहर काबीज केले गेल्याचे सांगतात. 32 नदीचे उतार शत्रूच्या ताब्यात गेले आहेत. पाणथळ प्रदेश जळत आहेत. बाबेलचे सर्व सैनिक घाबरले आहेत.” 33 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव म्हणतो, “बाबेल म्हणजे जणू काही खळे आहे. सुगीच्या वेळी लोक फोलकटापासून दाणे वेगळे करण्यासाठी धान्य झोडपतात आणि बाबेलला झोडपण्याची वेळ लवकरच येत आहे.” 34 सियोनचे लोक म्हणतील, “बाबेलच्या राजा नबुखद्नेस्सरने पूर्वी आमचा नाश केला. पूर्वी त्याने आम्हाला दुखावले. त्याने आमचे लोक नेले, व त्यामुळे आमची स्थिती रिकाम्या रांजणासारखी झाली. आमच्याजवळचे जेवढे चांगले, तेवढे त्याने नेले, आणि आम्हाला दूर फेकून दिले. तो पोट भरेपर्यंत आम्हाला खाणाऱ्या एखाद्या प्रचंड राक्षसासारखा होता. 35 आम्हाला दुखविण्यासाठी बाबेलने भंयकर गोष्टी केल्या. आता त्याची परतफेड करण्याची आमची इच्छा आहे.” सियोन मध्ये राहणारे लोक असे म्हणाले.“आमच्या लोकांना मारण्याचा अपराध बाबेलच्या लोकांनी केला आहे. त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना आता सजा मिळत आहे.” यरुशलेम नगरी अशी म्हणाली. 36 म्हणून परमेश्वर म्हणतो, “यहूदा, मी तुझे रक्षण करीन. बाबेलला शिक्षा होईल ह्याची मी दक्षता घेईन. मी बाबेलचा समुद्र आटवीन आणि तिचे जलस्रोत सुकवून टाकीन. 37 बाबेल म्हणजे पडक्या इमारतींची रास होईल. जंगली कुत्रेच तेथे राहतील. लोक ती दगडधोंड्यांची रास पाहून चकित होतील. बाबेलचा विचार त्यांच्या मनात येताच ते हळहळतील. बाबेल अगदी निर्जन होईल. 38 “बाबेलचे लोक गुरगुरणाऱ्या सिंहाच्या छाव्यासारखे आहेत. ते छाव्याप्रमाणे गुरगुरतात. 39 ते शक्तिवान सिंहासारखे वागत आहेत. मी त्यांना मेजवानी देईन. मी त्यांना मद्य प्यायला लावीन. ते हसतील व मजा करतील. मग मात्र ते कायमचे झोपी जातील. ते पुन्हा कधीच उठणार नाहीत.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या. 40 “बाबेल, मरणाची वाट पाहणाऱ्या शेळ्या, मेंढ्या, एडके ह्यांच्याप्रमाणे, असेल. मी त्यांना त्यांची कत्तल करण्यासाठी घेऊन जाईन. 41 “शेशखचा” पराभव होईल. सर्व जगातील अत्युत्तम व गर्विष्ठ देशाला कैदी बनवले जाईल. दुसऱ्या राष्ट्रांतील लोक बाबेलकडे पाहून भयभीत होतील. कारण बाबेलला उध्वस्त होताना त्यांनी पाहिले होते. 42 समुद्र बाबेलवर पसरेल. त्याच्या गरजणाऱ्या लाटा बाबेलला झाकून टाकतील. 43 बाबेलमधील गावांचा नाश होईल आणि ती ओसाड बनतील. बाबेल एक रुक्ष वाळवंट होईल. तो निर्जन होईल. लोक ह्या भूमीतून नुसता प्रवाससुध्दा करणार नाहीत. 44 बाबलेमधील बेल या दैवताला मी शिक्षा करीन. मी, त्यांने गिळलेल्यांना, त्याला ओकायला लावीन. बाबेलची तटबंदी पडेल, आणि इतर राष्ट्रे बाबेलकडे येणार नाहीत. 45 माझ्या लोकांनो, बाबेलच्या शहरातून बाहेर या. जीव वाचविण्यासाठी पळा. परमेश्वराच्या कोपापासून दूर पळा. 46 “माझ्या माणसांनो, भिऊ नका. अफवा पसरतील, पण घाबरु नका. एक अफवा ह्या वर्षी तर दुसरी पुढल्या वर्षी येईल. देशातील भयानक युध्दाबद्दल अफवा पसरतील. राजांच्या एकमेकांविरुद्ध चाललेच्या लढाईबद्दल वावड्या उठतील. 47 बाबेलच्या दैवतांना शिक्षा करण्याची व संपूर्ण बाबेल देशाला लज्जित होण्याची, वेळ नक्कीच येईल. त्या शहराच्या रस्त्यांवर खूप प्रेते पडलेली असतील. 48 मग आकाश व पृथ्वी जयघोष करील. कारण उत्तरेकडून बाबेलविरुद्ध लढण्यासाठी सैन्य येईल.” परमेश्वरच असे म्हणाला, 49 “बाबेलने इस्राएलच्या लोकांना ठार केले. पृथ्वीवरच्या प्रत्येक प्रदेशातील लोकांना बाबेल देशाने ठार मारले. म्हणून बाबेलचे पतन झालेच पाहिजे. 50 तुम्ही लोकांनी तलवारीला चुकविले. तुम्ही घाई करुन बाबेल सोडला पाहिजे. वाट पाहू नका.तुम्ही दूरदेशी आहात. पण तुम्ही जेथे आहात, तेथून परमेश्वराचे स्मरण करा, आणि यरुशलेमची आठवण ठेवा. 51 “आम्ही, यहूदाचे लोक लज्जित झालो आहोत. आमचा अपमान झाला आहे. का? कारण परके परमेश्वराच्या मंदिरातील पवित्र ठिकाणी गेले आहेत.” 52 परमेश्वर म्हणतो, “बाबेलमधील मूर्तींना शिक्षा करण्याची वेळ येत आहे. त्या वेळी, देशात सर्व ठिकाणी जखमी लोक यातनेने तळमळतील. 53 कदाचित् बाबेल आकाशाला टेकेपर्यंत वाढली असती. बाबेलने आपले किल्ले मजबूत केले असते. पण मी तिच्याविरुद्ध लढण्यास माणसे पाठवीन, आणि ते तिचा नाश करतील.” परमेश्वर असे म्हणाला, 54 “बाबेलमध्ये लोक रडताना आपण ऐकू शकतो. लोक तेथील वस्तूंचा नाश करीत असल्याचे आपण ऐकतो. 55 लवकरच परमेश्वर बाबेलचा नाश करील. त्या शहरातील कोलाहल तो शांत करील. लाटांच्या गर्जनेप्रमाणे गर्जना करीत शत्रू येतील. आजूबाजूचे लोक त्या गर्जना ऐकतील. 56 सैन्य येईल व बाबेलचा नाश करील. बाबेलचे सैनिक पकडले जातील. त्यांची धनुष्ये मोडली जातील. का? कारण लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल परमेश्वर त्यांना शिक्षा करतो. त्यांच्या पात्रतेनुसार परमेश्वर त्यांना पूर्ण शिक्षा करतो. 57 बाबेलमधील ज्ञानी, महत्वाचे अधिकारी, राज्यपाल, इतर अधिकारी आणि सैनिक यांना मी मद्य पाजून झिंगायला भाग पाडीन. मग ते कायमचे झोपी जातील. परत कधीही उठणार नाहीत.” राजा असे म्हणाला. त्या राजाचे नाव सर्वशक्तिमान परमेश्वर. 58 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “बाबेलची जाड मजबूत तटबंदी जमीनदोस्त केली जाईल. तिची उंच प्रवेशद्वारे जाळली जातील. बाबेलचे लोक खूप मेहनत करतील. पण त्याचा काही उपयोग होणार नाही. शहर वाचविण्याच्या प्रयत्नात ते पार दमून जातील. ते सरपणाप्रमाणे होतील.” 59 सारया ह्या अधिकाऱ्याला यिर्मयाने पुढील संदेश दिला. सारया नेरीयाचा मुलगा होय व नेरीया हा मासेयाचा मुलगा होय. यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याबरोबर सारया, सिद्कीयाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, बाबेलला गेला. त्याच वेळी, सारयाला यिर्मयाने संदेश दिला. 60 यिर्मयाने बाबेलमध्ये घडून येणाऱ्या सर्व भयानक गोष्टी एका पटावर लिहिल्या होत्या. 61 यिर्मया सारयाला म्हणाला, “सारया, बाबेलला जा. सर्व लोक हा संदेश ऐकतील अशी खात्री करुन घेऊन तो वाच. 62 मग म्हण, ‘हे देवा, बाबेलचा नाश करीन असे तू म्हणालास, तू तिचा नाश करशील. मग तेथे कोणी मनुष्यप्राणी वा पशू राहणार नाही. ती जागा सदाकरिता ओसाड भग्नावशेष होईल.’ 63 हा संदेश वाचून संपताच पटाला एक दगड बांध. नंतर हा पट फरात नदीत फेकून दे. 64 मग असे म्हण ‘बाबेल बुडेल पुन्हा ती कधीही वर येणार नाही. कारण मी तिच्यावर भयंकर संकटे आणीन.’ आणि बाबेलचे लोक थकून जातील.”येथे यिर्मयाचे बोलणे संपले.

52:1 सिद्कीया त्याच्या वयाच्या 21 व्या वर्षी यहूदाचा राजा झाला. त्याने 11 वर्षे यरुशलेमवर राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल. ती यिर्मयाची मुलगी होती. तिचे घराणे लिब्ना येथील होते. 2 यहोयाकिम राजाप्रमाणेच सिद्कीयाने दुष्कृत्ये केली. हे परमेश्वराला आवडले नाही. 3 परमेश्वराचा कोप ओढवून घेतल्याने यरुशलेम व यहूदामध्ये भयंकर गोष्टी घडल्या. शेवटी परमेश्वराने यरुशलेम व यहूदा येथील लोकांना आपल्या दृष्टीसमोरुन दूर केले.सिद्कीया बाबेलच्या राजाच्या विरोधात गेला. 4 म्हणून सिद्कीयाच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने यरुशलेमवर चाल केली. त्याने आपले सर्वच्या सर्व सैन्य बरोबर घेतले. त्या सैन्याने यरुशलेमच्या बाहेर तळ ठोकला. मग यरुशलेमचा तट ओलांडून जाण्यासाठी त्यांनी तटाभोवती उतरंडी तयार केल्या. 5 सिद्कीया राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षापर्यंत बाबेलच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातला. 6 सहाव्या वर्षाच्या चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी उपासमारीचा कहर झाला. नगरीतल्या लोकांसाठी अन्नाचा कण नव्हता. 7 सातव्या दिवशी, बाबेलचे सैन्य यरुशलेममध्ये घुसले. यरुशलेमचे सैनिक पळून गेले. त्यांनी रात्रीच्या वेळी नगर सोडले. दोन भिंतींच्या मधल्या दारातून ते पळून गेले. ते दार राजाच्या बागेजवळ होते. बाबेलच्या सैन्याने वेढा घातला असतानासुद्धा ते सैनिक वाळवंटाकडे पळाले. 8 पण बाबेलच्या सैन्याने सिद्कीया राजाचा पाठलाग केला. त्यांनी सिद्कीयास यरीहोच्या मैदानात गाठले. सिद्कीयाचे सर्व सैनिक पळून गेले. 9 बाबेलच्या सैन्याने सिद्कीयाला पकडले मग त्यांनी त्यास रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे नेले. रिब्ला शहर हमाथ देशात आहे. बाबेलच्या राजाने, रिब्ला येथे, सिद्कीया राजाला शिक्षा ठोठावली. 10 रिब्लामध्येच बाबेलच्या राजाने सिद्कीयाच्या मुलांना मारले आणि सिद्कीयाला मुद्दाम ते पाहायला लावले. यहूदाच्या सर्व अधिकाऱ्यांनाही त्याने ठार केले. 11 मग बाबेलच्या राजाने सिद्कीयाचे डोळे काढले. मग त्याला बेड्या घालून बाबेलला नेले. तेथे त्याने सिद्कीयाला तुरुंगात टाकले. सिद्कीया मरेपर्यंत तुरुंगातच होता. 12 बाबेलच्या राजाच्या खास रक्षकांचा प्रमुख नबूजरदान हा, नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 19 व्या वर्षीच्या पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, यरुशलेमला आला. नबूजरदान बाबेलमधील एक महत्वाचा अधिकारी होता. 13 नबूजरदानने परमेश्वराचे मंदिर जाळले. त्याने राजवाडा व यरुशलेममधील इतर घरेही जाळली. त्याने तेथील सर्व महत्वाच्या इमारती बेचिराख केल्या. 14 बाबेलच्या सैन्याने यरुशलेमची तटबंदी पाडली. त्या सैन्याचा सेनापती राजाच्या खास रक्षकांचा प्रमुख होता. 15 सेनापती नबूजरदानने यरुशलेममध्ये अजूनही राहत असलेल्यासर्व लोकांना कैदी म्हणून नेले. बाबेलच्या राजाला आधीच शरण आलेल्यांनाही तो घेऊन गेला. यरुशलेममध्ये मागे राहिलेले कुशल कारागीरही त्याने बरोबर नेले. 16 पण नबूजरदानने काही अगदी गरीब लोकांना द्राक्षमळ्यांत व शेतांत काम करण्यासाठी मागेच ठेवले. 17 बाबेलच्या सैन्याने मंदिरातील पितळी खांब, घंगाळ व बैठकीमोडल्या. त्यांनी ते सर्व पितळ बाबेलला नेले. त्याच्याबरोबर पात्रे, फावडी, वात सारखी करण्याच्या कात्र्या, वाडगे, तसराळी आणि मंदिरातील पूजेची उपकरणेही नेली. 18 19 9राजाच्या खास रक्षकांच्या प्रमुखाने कुंडे, विस्तव ठेवण्याची पात्रे, वाडगे, पात्रे, दीपदाने. तसराळी आणि अर्पण केलेली पेयार्पणे ठेवण्याचे प्याले अशा सर्व वस्तू नेल्या. थोडक्यात त्याने चांदी सोन्याच्या सर्व वस्तू नेल्या. 20 दोन खांब, घंगाळ, त्याखालील बारा बैल व सरकत्या बैठकी अतिशप जड होत्या. शलमोन राजाने त्या परमेश्वराच्या मंदिरासाठी बनविल्या होत्या. ह्या वस्तूंसाठी वापरलेल्या पितळाचे वजन करणे अशक्य होते. 21 प्रत्येक खांब 31 फूट उंच होता. त्याचा घेर 21 फूट होता-हे खांब पोकळ होते. खांबाचा पत्रा 4 इंच जाडीचा होता. 22 पहिल्या खांबाचा पितळेचा कळस 8 फूट उंच होता. जाळीकाम व चारी बांजूनी डाळिंबे कोरुन तो सुशोभित केलेला होता. दुसऱ्या खांबावरही डाळिंबे कोरलेली होती. तो पहिल्या खांबासारखाच होता. 23 खांबांच्या बाजूंवर 96 डाळिंबे कोरलेली होती. खांबाच्या भोवती असलेल्या जाळीकामावर सर्व मिळून 100 डाळिंबे होती. 24 राजाच्या खास रक्षकांच्या प्रमुखाने सराया व सफन्या यांना कैद करुन नेले. सराया महायाजक होता, तर सफन्या दुय्यम महायाजक होता. तीन द्वारपालांनाही कैदी म्हणून नेले 25 राजाच्या खास रक्षकांच्या प्रमुखाने सैनिकांवर नेमलेला अधिकारी, तोपर्यंत नगरात असलेले राजाचे सात सल्लागार, सैन्यात भरती होणाऱ्यांची नोंद ठेवणारा लेखनिक, आणि नगरात असलेले साठ सामान्य लोक यांना कैद केले. 26 सेनापती नबूजरदानने ह्या सर्व अधिकाऱ्यांना बाबेलच्या राजाकडे आणले बाबेलचा राजा तेव्हा रिब्ला शहरात होता. रिब्ला हमाथ देशात आहे. रिब्लामध्ये राजाने त्या सर्वांना ठार करण्याचा हुकूम दिला.अशा तऱ्हेने यहूदी लोकांना त्यांच्या देशातून नेले गेले. 27 28 आणि अशाप्रकारे नबुखद्नेस्सरने त्यांना कैद केलेनबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 7 व्या वर्षी 3023 यहूदी लोकांना यहूदातून पकडून नेले. 29 नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 18 व्या वर्षी 832 लोकांना यरुशलेममधून नेले. 30 नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 23 व्या वर्षी नबूजरदानने 745 लोकांना कैद केले. तो राजाच्या खास रक्षकांचा प्रमुख होता. एकूण 4600 लोकांना कैदी म्हणून नेण्यात आले. 31 यहूदाचा राजा यहोयाकीन हा 37 वर्षे बाबेलच्या तुरुंगात होता. त्याच्या तुरुंगवासाच्या 37 व्या वर्षी बाबेलचा राजा अवीलमरदोख ह्यास त्याची दया आली व त्याने त्याची मुक्तता केली. त्याच वर्षी अवील-मरदोख गादीवर बसला होता. त्याने 12व्या महिन्याच्या 25व्या दिवशी यहोयाकीमची सुटका केली. 32 अवील-मरदोख यहोयाकीमशी गोड बोलला. त्याच्याबरोबर बाबेलमध्ये असलेल्या इतर राजांहून त्याने यहोयाकीमला सन्मानाची जाग दिली. 33 म्हणून यहोयाकीनने कैद्याचा पोशाख उतरविला उरलेल्या आयुष्यात त्याने नेमाने राजाबरोबर भोजन केले. 34 यहोयाकीनच्या मृत्यूपर्यंत प्रत्येक दिवशी बाबेलचा राजा त्याला भत्ता देत असे.