Proverbs

1:1 हे शब्द म्हणजे दावीदाचा मुलगा शलमोन याची शहाणपणाची शिकवण आहे. तो इस्राएलचा राजा होता. 2 लोक शहाणे व्हावेत आणि त्यांना योग्य गोष्ट कोणती ते कळावे म्हणून हे शब्द लिहिले गेले. या शब्दांमुळे लोकांना खरे शिक्षण समजण्यास मदत होईल. 3 हे शब्द लोकांना जगण्याची सर्वोत्कृष्ट पध्दत शिकवतील. लोक न्यायी, इमानी आणि चांगले राहाण्याचा योग्य मार्ग शिकतील. 4 ज्या लोकांना शहाणपण शिकण्याची गरज आहे, त्यांना हे शब्द शहाणपण शिकवतील. तरुण माणसे या शब्दांपासून शिकू शकतील. 5 या शब्दांतली शिकवण शहाण्या माणसांनी सुध्दा अतिशय काळजीपूर्वक ऐकली पाहिजे, तरच ते अधिक शिकू शकतील आणि अधिक शहाणे होतील. आणि जे लोक चांगले वाईट ओळखण्यात तरबेज आहेत त्यांना अधिक चांगले समजू शकेल. त्या 6 नंतरच लोकांना शहाणपणाच्या गोष्टींचा आणि म्हणींचा अर्थ समजू शकेल. शहाणे लोक ज्या गोष्टी सांगतात त्या लोकांना समजू शकतील. 7 पहिली गोष्ट म्हणजे माणसाने परमेश्वराला मान दिला पाहिजे आणि त्याची आज्ञा पाळली पाहिजे. नंतर त्याला खरे ज्ञान मिळायला सुरुवात होईल. पण ज्या लोकांना पाप आवडते ते शहाणपणाचा आणि योग्य शिकवणीचा तिरस्कार करतात. 8 मुला,तू तुझ्या वडिलांची शिकवण पाळली पाहिजेस. आणि तू तुझ्या आईची शिकवणही पाळायला हवीस. 9 तुझ्या आईचे आणि वडिलांचे शब्द म्हणजे तुझे मस्तक सुशोभित करणारा फुलांचा मुकुट आहे. ते शब्द म्हणजे तुझ्या गळ्याभोवती असलेली सुंदर माळ आहे. 10 मुला, ज्या लोकांना पाप आवडते ते लोक तुला प्रलोभने दाखवतील. तू त्यांचे ऐकू नकोस. 11 ते पापी म्हणतील, “आमच्याबरोबर चल. आपण लपू आणि कोणाला तरी मारण्याची वाट बघू. 12 आपण कोणत्या तरी निरपराध माणसावर हल्ला करु आपण त्या माणसाला मारु आणि त्याला मृत्युलोकात पाठवू 13 आपण किमती वस्तूंची चोरी करु. आपण त्या माणसाचा सर्वनाश करु व त्याला कबरेत पाठवू. आपण अशा वस्तूंनी आपले घर भरु. 14 तेव्हा आमच्याबरोबर ये आणि या गोष्टी करायला आम्हाला मदत कर. आपल्याला ज्या गोष्टी मिळतील त्या आपण वाटून घेऊ.” 15 मुला, ज्या लोकांना पाप आवडते त्यांच्या मागे जाऊ नकोस. ते ज्या रस्त्यावर राहातात त्या रस्त्यावर एक पाऊलही टाकू नकोस. 16 ते लोक दुष्कृत्य करायला नेहमी तयार असतात. त्यांची नेहमी लोकांना ठार मारण्याची इच्छा असते. 17 लोक पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळे पसरतात. पण पक्षी जेव्हा तुम्हाला बघत असतो तेव्हा त्याला पकडण्यासाठी जाळे टाकण्यात अर्थ नसतो. 18 ते वाईट लोक लपतात व कोणाला तरी मारण्यासाठी वाट बघतात पण खरोखर तेच त्या सापळ्यात अडकतील. त्यांच्या सापळ्यामुळे त्यांचाच नाश होईल. 19 आधाशी लोकांचे असेच असते. ते नेहमी दुसऱ्यांच्या वस्तू घेतात. त्या वस्तूंनीच त्यांचा नाश होतो. 20 ऐक! ज्ञान (रुपी स्त्री) लोकांना शिकवायचा प्रयत्न करीत आहे. ती रस्त्यात आणि बाजारात ओरडत आहे. 21 ती गजबजलेल्या रस्त्याच्या कोपऱ्यावरुन बोलावत आहे. लोकांनी तिचे ऐकावे म्हणून शहाच्या दरवाजाशी प्रयत्न करीत आहे. ज्ञान(रुपी स्त्री) म्हणते. 22 “तुम्ही लोक मूर्ख आहात. तुम्ही आणखी किती काळ मूर्ख गोष्टी करीत राहाणार आहात? तुम्ही ज्ञानाची थट्टा किती काळ करीत राहाणार आहात? तुम्ही ज्ञानाचा किती काळ तिरस्कार करणार आहात? 23 तुम्ही माझ्या सल्ल्याकडे आणि शिकवणुकीकडे लक्ष दिले असते तर मला जे माहित आहे ते सर्व मी तुम्हाला सांगितले असते. मला जे सर्व माहित आहे ते तुम्हाला सांगितले असते. मी माझे सर्व ज्ञान तुम्हाला दिले असते. 24 “परंतु तुम्ही माझे ऐकायला नकार दिला. मी मदत करायचा प्रयत्न केला. मी माझा हात दिला. पण तुम्ही माझी मदत झिडकारली. 25 तुम्ही दूर गेलात आणि माझ्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले. तुम्ही माझे शब्द स्वीकारायला नकार दिलात. 26 म्हणून मी तुमच्या संकटांना हसेन. तुमच्यावर संकटे आलेली पाहून मला आनंद होईल. 27 मोठ्या वादळांप्रमाणे तुमच्यावर मोठी संकटे येतील. जोरदार वाऱ्याप्रमाणे तुमच्यावर समस्या आघात करतील. तुमची संकटे आणि दु:ख तुम्हाला खूप मोठ्या ओइयासारखे वाटेल. 28 “या सर्व गोष्टी घडतील तेव्हा तुम्ही माझी मदत मागाल. पण मी तुम्हाला मदत करणार नाही. तुम्ही मला शोधाल पण मी तुम्हाला सापडणार नाही. 29 मी मदत करणार नाही कारण तुम्हाला माझे ज्ञान नको होते. तुम्ही परमेश्वराची भीती बाळगायला आणि त्याला मान द्यायला नकार दिला. 30 तुम्ही माझा सल्ला ऐकायला नकार दिलात. मी तुम्हाला योग्य मार्ग दाखवला तेव्हा तुम्ही माझे ऐकले नाही. 31 म्हणून आता तुम्ही तुमच्या मार्गाने चला. तुम्ही तुमच्या वाईट मार्गाने जीवन जगलात म्हणून तुम्ही तुमचा सर्वनाश करुन घेणार आहात. 32 “मूर्ख लोक मरतात कारण त्यांनी ज्ञानाचा मार्ग चोखाळायला नकार दिलेला असतो. त्यांचा मूर्ख मार्ग चोखाळण्यात त्यांना आनंद मिळतो. आणि त्यानेच त्यांचा नाश होतो. 33 परंतु जो माझी आज्ञा पाळतो तो सुरक्षित राहातो. तो समाधानी असतो. त्याला वाईट गोष्टींची भीती बाळगायचे कारण उरत नाही.”

2:1 मुला, मी ज्या गोष्टी सांगतो त्याचा स्वीकार कर. माझ्या आज्ञा लक्षात ठेव. 2 ज्ञानाचे ऐक. आणि ते समजून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर. 3 ज्ञानासाठी ओरड आणि समजून घेण्यासाठी आवाज चढव. 4 ज्ञानाचा चांदीसारखा शोध घे. गुप्तधनाप्रमाणे त्याचा शोध घे. 5 जर तू या गोष्टी केल्यास तर तू परमेश्वराला मान द्यायला शिकशील. तू खरोखरच देवाविषयी शिकशील. 6 परमेश्वर ज्ञान देतो. ज्ञान आणि समज त्याच्या मुखातून येते. 7 तो चांगल्या आणि प्रामाणिक माणसांना मदत करतो. सरळ मार्गावर चालणाऱ्या लोकांसाठी तो ढालीसारखा आहे. 8 जे लोक इतरांशी न्यायाने वागतात त्यांचे तो रक्षण करतो. त्याच्या पवित्र लोकांचे तो रक्षण करतो. 9 म्हणून परमेश्वर तुला त्याचे ज्ञान देईल. नंतर तुला चांगल्या न्यायाच्या आणि योग्य गोष्टी कळतील. 10 ज्ञान तुझ्या हृदयात येईल. आणि तुझा आत्मा ज्ञानामुळे आनंदित होईल. 11 ज्ञान तुझे रक्षण करील. आणि समज तुला सांभाळेल. 12 ज्ञान आणि समज तुला दुष्ट लोकांसारखे चुकीचे जीवन जगण्यापासून परावृत्त करतील. ते लोक बोलतानाही दुष्टपणा करतात. 13 त्यांनी चांगुलपणा सोडला आणि आता ते पापाच्या अंधकारात राहात आहेत. 14 त्यांना चूक करण्यात आनंद वाटतो. आणि त्यांना पापाचे वाईट मार्ग आनंदित करतात. 15 त्या लोकांवर विश्वास टाकणे शक्य नाही. ते खोटं बोलतात आणि फसवतात. पण तुझे ज्ञान आणि तुझी समज तुला या सर्व गोष्टींपासून दूर ठेवेल. 16 ज्ञान तुला अनोळखी स्त्रीपासून वाचवील. दुसऱ्या देशातली एखादी स्त्री गोड शब्दांनी तुला तिच्याबरोबर पाप करायला प्रवृत्त करेल. त्या स्त्रीने तरुणपणी लग्न केले. पण तिने नवऱ्याला सोडले. तिने देवासमोर तिचे लग्नाचे वचन पाळले नाही. पण ज्ञान तुला तिला ‘नाही’ म्हणायला मदत करील. 17 18 तिच्या बरोबर घरात जाणे म्हणजे विनाशाकडे नेणारे पहिले पाऊल उचलणे. जर तू तिच्या मागे गेलास तर ती तुला तुझ्या कबरेकडे घेऊन जाईल. 19 ती उघड्या कबरेसारखी आहे. जे लोक तिच्याकडे आत जातात ते जीवनाला मुकतात आणि पुन्हा कधीच परत येत नाहीत. 20 ज्ञान तुला चांगल्या लोकांचे उदाहरण पुढे ठेवून चालायला व त्यांच्याप्रमाणे जगायला मदत करील. 21 चांगले प्रमाणिक लोक स्वत:च्या जमीनीवर राहातील. साधे प्रमाणिक लोक स्वत:ची जमीन राखतील. 22 परंतु दुष्ट लोक त्यांच्या जमीनीला मुकतील. जे लोक खोटे बोलतात व फसवतात त्यांना त्यांच्या जमिनीपासून दूर नेले जाईल.

3:1 मुला, माझी शिकवण विसरु नकोस. मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या लक्षात ठेव. 2 मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या तुला अधिक दीर्घ आणि अधिक सुखी आयुष्य देतील. 3 प्रेम करणे कधी सोडू नकोस. नेहमी इमानदार आणि प्रामाणिक राहा. या गोष्टी तुझाच एक घटक बनव. त्यांना तुझ्या मानेभोवती बांध. त्या गोष्टी तुझ्या हृदयावर कोर. 4 म्हणजे तू शहाणा होशील व देवाला व लोकांना तुझ्याबद्दल आनंद वाटेल. 5 परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस. 6 तू जी प्रत्येक गोष्ट करशील ती करताना देवाचा विचार कर. म्हणजे तो तुला मदत करील. 7 तुझ्या स्वत:च्या शहाणपणावर अवलंबून राहू नकोस. पण परमेश्वराला मान दे आणि वाईट गोष्टींपासून दूर राहा. 8 तू जर हे केलेस तर ते तुझ्या शरीराला औषधाप्रमाणे बरे करील किंवा पेयाप्रमाणे तुझ्या हाडांना ताजेतवाने करील. 9 तुझ्या संपत्तीने परमेश्वराला मान दे. तुझ्या जवळच्या सर्वांत चांगल्या गोष्टी त्याला दे. 10 नंतर तुझ्या सर्व गरजा पूर्ण होतील. तुझे कोठार धान्याने भरेल. आणि तुझी पिंपे द्राक्षारसाने भरुन वाहातील. 11 मुला, परमेश्वर तुला कधी कधी तू चूक करीत आहेस हे दाखवून देईल. पण या शिक्षेमुळे तू रागावू नकोस. त्यापासून शिकायचा प्रयत्न कर. 12 का? कारण परमेश्वर ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांनाच सुधारतो. होय, मुलावर प्रेम करणाऱ्या व त्याला शिक्षा करणाऱ्या बापासारखा देव आहे. 13 ज्या माणसाला ज्ञान मिळेल तो खूप सुखी होईल. त्याला जेव्हा समजायला लागते तेव्हाच त्याला आशीर्वाद मिळतात. 14 ज्ञानामुळे जे लाभ होतात ते रुप्यापेक्षा चांगले आहेत. ज्ञानापासून मिळणारे लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा चांगले आहेत. 15 ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यावान आहे. तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्यापैकी कोणतीही गोष्ट ज्ञानाइतकी मौल्यवान असणार नाही. 16 ज्ञान तुम्हाला मोठे आयुष्य संपत्ती आणि मानसन्मान देते. 17 ज्ञान असलेले लोक शांतीत आणि समाधानात जगतात. 18 ज्ञान जीवनाच्या वृक्षाप्रमाणे आहे. जे लोक त्याचा स्वीकार करतात त्यांना संपूर्ण आयुष्य लाभते. जे लोक ज्ञान धारण करतात ते खरोखरच सुखी होतात. 19 परमेश्वराने पृथ्वी निर्माण करण्यासाठी ज्ञानाचा वापर केला. परमेश्वराने आकाश निर्माण करण्यासाठी ज्ञान वापरले. 20 परमेश्वराने समुद्र निर्माण करण्यासाठी त्याचे ज्ञान वापरले. आणि पावसाचे ढग तयार करण्यासाठी ज्ञान वापरले. 21 मुला, तुझे ज्ञान आणि समज ही नेहमी सांभाळून ठेव. या गोष्टी सोडू नकोस. 22 ज्ञान आणि समज तुला जीवन देतील. आणि ते अधिक सुंदर करतील. 23 नंतर तू सुरक्षिततेचे जीवन जगशील आणि कधीही पडणार नाहीस. 24 तू जेव्हा झोपशील तेव्हा घाबरणार नाहीस. तू विश्रांती घेशील तेव्हा तुझी झोप शांत असेल. 25 अचानक येणाऱ्या संकटास घाबरु नकोस. परमेश्वर तुला शक्ती देईन. आणि वाईट लोक तुला काय करतील ह्याला घाबरु नको. परमेश्वर तुझे रक्षण करील व तुझा जीव वाचवील. 26 27 जेव्हा शक्य होईल तेव्हा ज्यांना मदतीची गरज असते त्यांच्यासाठी चांगली गोष्ट करा. 28 जर तुमच्या शेजाऱ्याने काही मागितले आणि ते तुमच्याजवळ असले तर त्याला ते लगेच द्या. “त्याला उद्या यायला सांगू नका.” 29 तुमचा शेजारी विश्वासाने तुमच्याजवळ राहातो तेव्हा शेजाऱ्याला त्रास देण्याच्या योजना आखू नका. तुम्ही स्वत:च्या सुरक्षिततेसाठी एकमेकांच्या जवळ राहता. 30 योग्य कारणाशिवाय एखाद्याला कोर्टात नेऊ नका. जर त्याने तुम्हाला काही केले नसेल तर तसे करु नका. 31 काही लोकांना चटकन् राग येतो. आणि ते लगेच वाईट गोष्ट करतात. तुम्ही तसे करु नका. 32 का? कारण परमेश्वर वाईट लोकांचा तिरस्कार करतो. परंतु परमेश्वर चांगल्या लोकांचा पाठीराखा असतो. 33 परमेश्वर वाईट लोकांच्या कुटुंबाविरुध्द असतो. परंतु जे लोक योग्य रीतीने जगतात त्यांच्या कुटुंबांना तो आशीर्वाद देतो. 34 जर एखादा माणूस गर्विष्ठ असला आणि दुसऱ्यांची चेष्टा करत असला तर परमेश्वर त्याला शिक्षा करील आणि त्याची चेष्टा करील. पण परमेश्वर नम्र लोकांशी दयाळू असतो. 35 शहाणे लोक सन्मान प्राप्त होईल असे जीवन जगतात परंतु मूर्ख लोक लाज वाटण्यासारखे जीवन जगतात.

4:1 मुलांनो, तुमच्या वडिलांच्या शिकवणुकीकडे लक्ष द्या. लक्ष दिले की तुम्हाला कळेल. 2 का? कारण मी जे सांगतो ते महत्वाचे आहे आणि चांगले आहे. म्हणून माझी शिकवण कधीही विसरु नका. 3 एकेकाळी मी सुध्दा लहान होतो. मी माझ्या वडिलांचा लहान मुलगा होतो. आणि माझ्या आईचा एकुलता एक. 4 आणि माझ्या वडिलांनी मला शिकवले. ते मला म्हणाने, “मी जे सांगतो ते लक्षात ठेव. माझ्या आज्ञा पाळ. म्हणजे तू जिवंत राहाशील. 5 ज्ञान आणि समजूतदारपणा मिळव. माझे शब्द विसरु नकोस. माझ्या शिकवणुकीप्रमाणे वाग. 6 ज्ञानापासून दूर जाऊ नकोस. ज्ञान तुझे रक्षण करील. ज्ञानावर प्रेम कर म्हणजे ते तुझे रक्षण करील.” 7 तुम्ही ज्ञान मिळवण्याचा निश्चय करता तेव्हाच ज्ञानाची सुरुवात होते. म्हणून तुमच्याकडे जे काही आहे त्याचा उपयोग करुन ज्ञान मिळवा. म्हणजे तुम्ही ज्ञानी व्हाल. 8 ज्ञानावर प्रेम करा म्हणजे ते तुम्हाला मोठे करील. तुम्ही ज्ञानाला महान करा म्हणजे ते तुम्हाला मान मिळवून देईल. 9 ज्ञान तुमच्यासाठी सौंदर्य आणि वैभव यांचा मुकुट आहे. ते तुम्हाला मुक्त करते. 10 मुला, माझे ऐक. मी जे सांगतो ते कर म्हणजे तू खूप जगशील. 11 मी तुला ज्ञानाविषयी शिकवत आहे. मी तुला सरळ मार्गाने नेत आहे. 12 तू जर याच मार्गाने गेलास तर तू सापळ्यात अडकणार नाहीस. तू पळू शकशील पण अडखळणार नाहीस. तू ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करशील त्यात सुरक्षित राहाशील. 13 या धड्यांची नेहमी आठवण ठेवा. हे धडे विसरु नका. ते तुमचे जीवन आहे. 14 दुष्ट लोक जो मार्ग आचरतात त्यावरुन जाऊ नका. तसे जगू नका. त्यांच्यासारखे व्हायचा प्रयत्न करु नका. 15 वाईटापासून दूर राहा. त्याच्या जवळ जाऊ नका. त्याच्या जवळून सरळ निघून जा. 16 वाईट लोक कोणते तरी वाईट कृत्य केल्याशिवाय झोपू शकत नाहीत. त्यांना दुसऱ्यांना त्रास दिल्याशिवाय झोप येत नाही. 17 ते दुष्टपणापासून बनवलेली भाकर खातात आणि हिंसेचे मद्य पितात. (दुष्टपणा केल्याशिवाय ते राहू शकत नाहीत.) 18 चांगले लोक पहाटेच्या प्रकाशासारखे असतात. सूर्य उगवतो आणि दिवस प्रकाशित आणि आनंदमय होतो. 19 पण वाईट लोक रात्रीसारखे असतात. ते काळोखात हरवून जातात आणि दिसू न शकणाऱ्या वस्तूंना अडखळून पडतात. 20 मुला, मी जे सांगितले त्याक़डे लक्ष दे. माझे शब्द लक्षपूर्वक ऐक. 21 तू माझ्या शब्दांना तुला सोडून जायला लावू नकोस. मी सांगतो ते लक्षात ठेव. 22 जे माझी शिकवण ऐकतील त्यांना जीवन मिळेल. माझे शब्द शरीराला आरोग्यासारखे आहेत. 23 तुझ्या हृदयाला काळजीपूर्वक जप. कारण तेथूनच जीवनप्रवाह वाहतात. 24 सत्याला वाकवू नकोस आणि खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगू नकोस. खोटे बोलू नकोस. 25 तुझ्या समोर असलेल्या चांगल्या आणि शहाण्या ध्येयांपासून दूर जाऊ नकोस. 26 तू जे करशील त्या बाबतीत सावध राहा. चांगले आयुष्य जग. 27 सरळ मार्ग सोडू नकोस. चांगला आणि योग्य मार्ग धर पण वाईटा पासून नेहमी दूर राहा.

5:1 मुला, माझ्या शहाणपणाच्या शिकवणुकीकडे लक्ष दे. माझ्या समजूत निर्माण करणाऱ्या शब्दाकडे लक्ष दे. 2 नंतर तुला जगण्याचा योग्य मार्ग कळेल. तुझे शब्द तू शहाणा आहेस हे दाखवून देतील. 3 दुसन्या माणसाची बायको खूप मोहक असेल. तीच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द खूप गोड व आकर्षक असतील. 4 पण शेवटी त्यामुळे कटुता व दु:खच मिळेल. ते दु:ख विषापेक्षाही कडवट असले. आणि तलवारीपेक्षी धारदार असेल. 5 तिचे पाय मृत्यूलाच जाऊन भिडतात. ती तुला सरळ कबरेत नेईल. 6 तिच्या मागे जाऊ नकोस. तिने योग्य मार्ग सोडला आहे आणि ते तिला माहीत नाही. काळजीपूर्वक राहा. जीवनाचा योग्य मार्ग आचर. 7 मुलांनो, आता माझे ऐका. मी जे सांगतो ते विसरु नका. 8 जी स्त्री व्यभिचार करते तिच्यापासून दूर राहा. तिच्या घराच्या दाराजवळ सुध्दा जाऊ नका. 9 जर तुम्ही गेलात तर तुम्ही लोकांच्या मनातल्या तुमच्या विषयीच्या आदराला मुकाल. तुमचा गेलेला मान दुसरे लोक घेतील. शेवटी तुम्ही तुमच्या जीवनाला मुकाल. दुष्ट लोक ते तुमच्यापासून हिरावून घेतील. 10 तुम्हाला माहीत नसलेले लोक तुमची संपत्ती संपत्ती घेतील. तुम्ही ज्या गोष्टी मिळवण्यासाठी कष्ट केलेत त्या गोष्टी ते लोक घेतील. 11 तुम्ही आयुष्याच्या शेवटी कष्टी व्हाल. तुमचे शरीर आणि मन सर्व काही नाश पावेल. 12 नंतर तुम्ही म्हणाल, “मी माझ्या आई - वडिलांचे का ऐकले नाही? मी शिस्त पाळायला नकार दिला. मी सुधारायला नकार दिला. 13 14 आता शेवटी मला दिसते की माझे आयुष्य वाया गेले आहे. आणि सगळ्या लोकांना माझी लाज दिसते आहे.” 15 तुझ्या विहिरीतून वाहणारे पाणीच फक्त पी. आणि तुझे पाणी रस्त्यावर वाहून जाऊ देऊ नकोस. तू फक्त तुझ्या बायको बरोबरच लैगिक संबंध ठेवायला हवेस. तुझ्या घराबाहेरच्या मुलांचा बाप होऊ नकोस. 16 17 तुझी मुले फक्त तुझीच असायला हवीत. घराबाहेरच्या इतर लोकांबरोबर त्यांची भागीदारी असायला नको. 18 म्हणून तुझ्या बायकोबरोबर सुखी राहा. तरुणपणी जिच्याबरोबर लग्न केलेस तिलाच उपभोग. 19 ती सुंदर हरिणीसारखी आहे. गोजिरवाण्या हरिणाच्या पाडसासारखी आहे. तिचे प्रेम तुझे समाधान करो. तू तिच्या प्रेमात बंदीवान हो. 20 दुसऱ्याच्या बायकोकडून तू असा बंदीवान होऊ नकोस. तुला दुसऱ्याच्या बायकोच्या प्रेमाची गरज नाही. 21 तू जे काही करतोस ते परमेश्वराला स्पष्ट दिसते तू कुठे जातोस ते परमेश्वर बघतो. 22 दुष्ट माणसाची पापे त्याला जाळ्यात पकडतील त्याची पापे दोरीप्रमाणे त्याला पकडतील. 23 तो दुष्ट माणूस मरेल कारण त्याने शिस्त नाकारली. तो स्वत: च्या मूर्खपणामुळेच अडकला जाईल.

6:1 मुला, दुसन्याच्या कर्जाला जामीन राहू नकोस. त्या माणसाला कर्जांची परतफेड करता आली नाही तर तू ते परत करण्याचे वचन का दिलेस? तू दुसऱ्याच्या कर्जाची हमी घेतलीस का? 2 तर मग तू अडकलास. तुला तुझ्या शब्दांनीच अडकवले. 3 तू त्या माणसाच्या शक्तीखाली आलास. मग त्याच्याकडे जा आणि स्वत:ला सोडव. त्याच्या कर्जापासून तुझी सुटका करण्यासाठी त्याची भीक माग. 4 विश्रांतीसाठी वा झोपण्यासाठी सुध्दा थांबू नकोस. 5 शिकाऱ्यापासून हरिण जसे दूर पळते तसा तू सापळ्यापासून दूर राहा. जाळ्यातून उडून जाणान्या पक्ष्याप्रमाणे स्वत:ला सोडव. 6 आळशी माणसा, तुला मुंगी सारखे व्हायला हवे. मुंगी काय करते ते बघ. मुंगी पासून शीक. 7 मुंगीला राजा नाही, वरिष्ठ नाही की नेता नाही. 8 पण उन्हाळ्यात ती सगळे अन्न गोळा करते. मुंगी तिचे अन्न साठवते आणि हिवाळ्यात तिच्याजवळ भरपूर अन्न असते. 9 आळशी माणसा, तू किती वेळ झोपून राहाणार आहेस? तू विश्रांतीतून केव्हा उठणार आहेस? 10 आळशी माणूस म्हणतो, “मला थोडी झोप हवी. मी हथे थोड्या वेळासाठी पडतो.” 11 परंतु तो झोपतच राहातो. आणि गरीब होत राहातो. लवकरच त्याच्याजवळ काहीही नसेल. चोर अचानक येऊन सर्व काही घेऊन जातो त्याचप्रमाणे त्याला अचानक गरीबी येईल. 12 दुष्ट आणि कवडीमोल माणूस खोटे बोलतो. आणि वाईट गोष्टी सांगतो. 13 तो डोळे मिचकावतो आणि लोकांना मूर्ख बनविण्यासाठी खुणा करतो. 14 तो माणूस दुष्ट असतो, तो नेहमी वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतो. तो सगळीकडे संकटे आणतो. 15 पण त्याला शिक्षा होईल. त्याच्यावर अचानक संकट येईल. त्याचा त्वरित नाश होईल. आणि त्याला काहीही मदत मिळू शकणार नाही. 16 परमेश्वर या सहा, नाही सात गोष्टींचा तिरस्कार करतो. 17 डोळे, जे माणूस गर्विष्ठ आहे हे दाखवतात. जीभ, जी खोटे बोलते, हात, जे निरपराध्यांना ठार मारतात. 18 ह्रदय जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते. पाय जे वाईट गोष्टी करायला धाव घेतात. 19 माणूस जो खोटे बोलतो आणि कोर्टात खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतो. माणूस जो वादविवादाला सुरुवात करतो आणि दुसऱ्यांमध्ये भांडणे लावून देतो. 20 माझ्या मुला, तुझ्या वडिलांची आज्ञा लक्षात ठेव. आणि तुझ्या आईची शिकवण विसरु नकोस. 21 त्याचे शब्द नेहमी लक्षात ठेव. त्यांच्या शिकवणीला तुझ्या आयुष्याचाच एक भाग बनव. 22 त्यांची शिकवण तुला जिथे जायचे असेल तिथे नेईल. तू झोपलास की ती तुझ्यावर लक्ष ठेवेल आणि तू जेव्हा उठशील तेव्हा ती तुझ्याशी बोलेल आणि तुला मार्ग दाखवील. 23 तुझ्या आईवडिलांची शिकवण आणि आज्ञा प्रकाशाप्रमाणे असून त्या तुला योग्य मार्ग दाखवतात. ते तुला योग्य मार्ग दाखवतात आणि जीवनाचा मार्ग आचरायला शिकवतात. 24 त्यांची शिकवण तुला दुष्ट स्त्रीकडे जाण्यापासून परावृत्त करते. नवऱ्याला सोडून आलेल्या बाईच्या भुरळ पाडणाऱ्या बोलण्यापासून ते शब्द तुझे रक्षण करतात. 25 ती स्त्री सुंदर असेल. पण ते सौंदर्य तुझ्यात जळू देऊ नकोस आणि तुला त्याची भुरळ पडू देऊ नकोस. तू तिच्या डोळ्यांनी जायबंदी होऊ नकोस. 26 वेश्येचा मोबदला एक भाकरीचा असेल. पण दुसऱ्याच्या बायकोची किंमत म्हणून तुला तुझे जीवित द्यावे लागेल. 27 जर एखाद्याने स्वत:वर निखारे ओतले तर त्याचे कपडेसुध्दा जळतील. 28 जरा एखादा माणूस निखाऱ्यांवर चालला तर त्याचे पाय भाजतील. 29 दुसऱ्या माणसाच्या बायकोबरोबर झोपणाऱ्याचेही असेच होते. त्या माणसाला दु:ख भोगावे लागते. 30 माणूस भुकेला असला तर तो अन्नाची चोरी करतो. जर तो पकडला गेला तर त्याला चोरलेल्या अन्नाच्या सात पट अन्न द्यावे लागते. त्याच्या जवळ असेल नसेल ते सर्व त्याला त्याबद्दल द्यावे लागते. पण इतर लोक समजून घेतात. ते त्याच्या बद्दलचा आदर घालवत नाहीत. 31 32 पण जो माणूस व्यभिचाराचे पाप करतो तो मूर्ख असतो. तो स्वत:चा नाश करीत असतो. तो स्वत:च त्याच्या नाशाला कारणीभूत असतो. 33 लोकांना त्याच्याबद्दल वाटणारा आदर नाहीसा होतो. आणि त्याच्यावरचा लज्जेचा डाग कधीही धुतला जाणार नाही. 34 त्या स्त्रीचा नवरा मत्सरी होईल, त्या नवऱ्याला खूप राग येईल. त्या दुसऱ्या माणसाला शिक्षा करण्यासाठी तो काय वाट्टेल ते करेल. 35 त्याचा राग शांत करण्यासाठी कितीही पैसा दिला तरी तो पुरेसा ठरणार नाही.

7:1 मुला, माझे शब्द लक्षात ठेव. मी देतो त्या आज्ञा विसरु नकोस. 2 माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तुला जीवन मिळेल. माझ्या शिकवणुकीला तुझ्या आयुष्यातली एक महत्वाची गोष्ट बनव. 3 माझ्या आज्ञा आणि माझी शिकवण सदैव तुझ्याजवळ राहू दे. त्यांना तुझ्या बोटांभोवती बांध. तुझ्या हृदयावर ते कोरुन ठेव. 4 शहाणपणाला बहिणीसारखे वागव. समजुतदारपणाला तुझ्या कुटुंबाचाच एक घटक बनव. 5 नंतर ते तुझा दुसऱ्या स्त्रीपासून बचाव करतील. ते तुला तिच्या पापाकडे नेणाऱ्या गोड शब्दांपासून वाचवतील. 6 एक दिवस मी माझ्या खिडकीतून पाहिले आणि मला 7 बरेच मूर्ख तरुण दिसले. मला एक तरुण दिसला जो खूपच मूर्ख होता. 8 त्याने वाईट स्त्रीच्या घराचा रस्ता धरला. त्याला भेटण्यासाठी ती घरातून बाहेर आली. 9 तेव्हा अंधार होत होता - सूर्य मावळत होता व रात्र पडायला सुरुवात झाली होती. 10 ती स्त्री त्याला भेटायला घरातून बाहेर आली. तिने वेश्येसारखा पोशाख केला होता. तिने त्याच्याबरोबर पाप करायचे ठरवले. 11 तिला पापाची पर्वा नव्हती. तिला चांगल्या वाईटाची पर्वा नव्हती. ती कधीच घरी राहात नसे. 12 ती नेहमी रस्त्यातून हिंडे. ती संकटांना बोलावत सर्वत्र हिंडे. 13 तिने त्या तरुणाला पकडले आणि त्याचे चुंबन घेतले. लाज न वाटता ती म्हणाली, 14 “आज मी (शांत्यर्पणाची) मेजवानी दिली. मी जे द्यायचे वचन दिले होते ते सर्व मी दिले आणि अजूनही माझ्याकडे खूप अन्न उरले आहे. 15 म्हणून मी तुला माझ्याकडे येण्याचे आमंत्रण देण्यासाठी बाहेर आले. मी तुलाच शोधत होते. आणि आता तू मला सापडलास. 16 मी माझ्या अंथरुणावर स्वच्छ चादर टाकली आहे. त्या मिसर देशातल्या सुंदर चादरी आहेत. 17 मी माझ्या अंथरुणावर अत्तर शिंपडले आहे. मी बोळ, अगरु आणि दालचिनीचा वापर केला आहे. 18 चल, आपण सकाळ होईपर्यंत प्रेम करु या. आपण रात्रभर उपभोग घेऊ. 19 माझा नवरा दूर गेला आहे. तो व्यवसायासाठी बाहेरगावी गेला आहे. 20 त्याने दूरच्या प्रवासासाठी पुरेसे पैसे बरोबर घेतले आहेत. तो दोन आठवडे घरी येणार नाही.” 21 त्या बाईने त्या तरुणाला भुलविण्यासाठी हे शब्द वापरले. तिच्या गोड बोलण्याला तो भुलला. 22 आणि तो तरुण तिच्या मागोमाग जाळ्यात गेला. तो कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या बैलाप्रमाणे होता. शिकारी ज्याच्या हृदयात बाण सोडायला. 23 तयार आहेत अशा हरिणाप्रमाणे तो होता. तो ज्या संकटात होता ते त्याला कळले नाही. 24 मुलांनो आता माझे ऐका. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. 25 दुष्ट स्त्रीला तुमचा कब्जा घेऊ देऊ नका. तिच्या मार्गावरुन जाऊ नका. 26 तिने खूप माणसांना पाडले आहे. तिने खूप जणांचा नाश केला आहे. 27 तिचे घर म्हणजे मृत्यूचा सापळा आहे. तिचा मार्ग सरळ मरणातच जातो.

8:1 ऐक, ज्ञान आणि समजूतदारपणा तुला तू एकावेस म्हणून तुला बोलावत आहेत. 2 ते टेकडीच्या माथ्यावर जिथे रस्ते मिळतात, तिथे उभे आहेत. 3 ते शहराच्या दरवाजाशी आहेत. ते उघड्या दरवाजातून बोलावत आहेत. 4 ज्ञान (रुपी स्त्री) म्हणते, “लोक हो! मी तुम्हाला बोलावत आहे. मी सगळ्या लोकांना बोलावत आहे. 5 तुम्ही जर मूर्ख असाल, तर शहाणे व्हायला शिका. मूर्ख माणसांनो समजून घ्यायला शिका. 6 लक्ष द्या! ज्या गोष्टी शिकवतो त्या महत्वाच्या आहेत. मी तुम्हाला फक्त योग्य असलेल्या गोष्टीच सांगतो. 7 माझे शब्द खरे आहेत. मला वाईटाचा, खोट्याचा तिरस्कार वाटतो. 8 मी ज्या गोष्टी सांगतो त्या न्याय्य आहेत. माझ्या शब्दांत काहीही चुकीचे अथवा खोटे नाही. 9 जो माणूस समजूतदार आहे त्याला या गोष्टी स्पष्ट दिसतात. ज्ञानी माणूस या गोष्टी समजू शकतो. 10 माझ्या शिस्तीचा स्वीकार करा. ती रुप्यापेक्षाही मौल्यवान आहे. ती शुध्द सोन्यापेक्षाही मौल्यावान आहे. 11 ज्ञान मोत्यापेक्षा, अधिक मौल्यवान आहे. ते माणसाला हव्या असलेल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा मौल्यवान आहे.” 12 “मी ज्ञान आहे. मी चांगल्या न्यायाने जगते. तुम्ही मला ज्ञानाबरोबर आणि चांगल्या योजनांबरोबर पाहू शकता. 13 जर एखादा माणूस परमेश्वराला मान देत असला तर तो वाईटाचा तिरस्कार करेल. मी (ज्ञान) गर्वाचा आणि जे लोक इतरांपेक्षा स्वत:ला मोठे समजतात अशा लोकांचा तिरस्कार करते. मी वाईट मार्ग आणि खोटे बोलणाऱ्या तोंडांचा तिरस्कार करते. 14 परंतु मी लोकांना योग्य निर्णय घेण्याचे सामर्थ्य देते आणि योग्य चांगला न्याय देते. मी समजूतदारपणा आणि शक्ती देते. 15 राजे राज्य करताना माझा उपयोग करतात. राज्यकर्ते चांगले कायदे करण्यासाठी माझा उपयोग करतात. 16 प्रत्येक चांगला राज्यकर्ता त्याच्या अंमलाखाली असलेल्या लोकांवर राज्य करण्यासाठी माझा उपयोग करुन घेतो. 17 मी (ज्ञान), माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करते. आणि जे लोक मला शोधायचा खूप प्रयत्न करतात त्यांना मी हटकून सापडते. 18 माझ्याजवळही देण्यासाठी श्रीमंती आणि मानमरातब आहेत. मी खरी संपत्ती आणि यश देते. 19 मी ज्या गोष्टी देते त्या शुध्द सोन्यापेक्षा चांगल्या असतात. आणि माझे नजराणे शुद्ध चांदीपेक्षा चांगले असतात. 20 मी लोकांना योग्य मार्गावर आणते. मी तयांना योग्य न्यायाच्या मार्गाने नेते. 21 जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी संपत्ती देते. होय, मी त्यांची घरे खजिन्यांनी भरुन टाकीन. 22 खूप पूर्वी सुरुवातीला परमेश्वराने प्रथम माझीच निर्मिती केली. 23 आरंभीला मला निर्माण केले गेले. जगाची सुरुवात होण्यापूर्वी मी निर्माण झाले. 24 महासागराच्या आधी माझा जन्म झाला. पाणी उत्पन्न होण्या आधी मी होते. 25 पर्वतांच्या आधी माझा (ज्ञानाचा) जन्म झाला. डोंगरांच्या आधी माझा जन्म झाला. 26 परमेश्वराने पृथ्वी निर्माण करण्याआधीच मी जन्मले. शेतांच्या आधी माझा जन्म झाला. देवाने पृथ्वीवरची पहिली धूळ निर्माण करण्याआधीच माझा जन्म झाला होता. 27 परमेश्वराने आकाशाची निर्मिती केली तेव्हा मी तिथे होते. परमेश्वराने कोरड्या भूमीभोवती सीमा आखण्यासाठी वर्तूळ काढले तेव्हा मी तिथे होते. त्याने सागराला सीमित केले तेव्हा मी तिथे होते. 28 परमेश्वराने आकाशात ढग ठेवण्याआधी माझा जन्म झाला. आणि परमेश्वराने समुद्रात पाणी ठेवले तेव्हाही मी तिथे होते. 29 परमेश्वराने सागराच्या पाण्याला सीमाबध्द केले तेव्हा ही मी होते. पाणी परमेश्वराच्या संमती शिवाय चढू शकत नाही. परमेश्वराने पृथ्वीचा पाया घातला तेव्हा मी तिथे होते. 30 एखाद्या कसलेल्या कामगारासारखी मी त्याच्या बाजूला होते. माझ्यामुळे परमेश्वर रोज आनंदी असे. मी त्याचा आनंद होते. 31 त्याने निर्माण केलेल्या जगाविषयी परमेश्वर उत्सुक होता. तो तिथे निर्माण केलेल्या लोकांबद्दल आनंदी होता. 32 “मुलांनो, आता माझे ऐका, जर तुम्ही माझा मार्ग अनुसरला तर तुम्हीही आनंदी व्हाल. 33 माझी शिकवण ऐका आणि शहाणे व्हा. ऐकायला नकार देऊ नका. 34 जो माझे ऐकतो तो सुखी होतो. तो रोज माझ्या दारावर पाहारा देतो. तो माझ्या दाराजवळ थांबतो. 35 ज्या माणसाला मी सापडते. त्याला जीवन सापडते. त्याला परमेश्वराकडून चांगल्या गोष्टी मिळतील. 36 पण जो माझ्याविरुध्द पाप करतो तो स्वत:लाच इजा करुन घेतो. जे लोक माझा तिरस्कार करतात ते मरणाला कवटाळतात.”

9:1 ज्ञानरुपी स्त्रीने आपले घर बांधले, त्यात तिने सात खांबठेवले. 2 तिने (ज्ञानरुपी स्त्रीने) मांस शिजवले आणि द्राक्षारस तयार केला. तिने अन्न तिच्या टेबलावर ठेवले. 3 नंतर तिने आपल्या नोकरांकरवी शहरातील लोकांना तिच्याबरोबर टेकडीवर भोजन करण्यासाठी येण्याचे आमंत्रण पाठविले. ती म्हणाली, 4 “ज्या लोकांना शिकण्याची आवश्यकता वाटते त्यांनी यावे.” तिने मूर्ख लोकांनाही बोलावले. ती म्हणाली, 5 “या माझ्या ज्ञानाचे अन्न खा. आणि मी तयार केलेला द्राक्षारस प्या. 6 तुमचे जुने, मूर्खपणाचे मार्ग सोडून द्या. मग तुम्हाला आयुष्य मिळेल. समजूतदारपणाचा मार्ग अनुसरा.” 7 जर तुम्ही गर्विष्ठ माणसाला तो चुकत आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला तर तो तुमच्यावर केवळ टीका करेल. तो माणूस देवाच्या शहाणपणाची चेष्टा करतो. जर तुम्ही दुष्ट माणसाला तो चुकत आहे असे सांगितले तर तो तुमची चेष्टा करेल. 8 म्हणून जर एखादा माणूस तो इतरांपेक्षा चांगला आहे असे म्हणत असेल तर त्याला तो चुकतो आहे असे सांगू नका. तो त्या बद्दल तुमचा तिरस्कार करेल. पण जर तुम्ही शहाण्या माणसाला मदत करण्याचा प्रयत्न केलात तर तो तुमचा आदर करेल. 9 जर तुम्ही शहाण्या माणसाला शिकवलेत तर तो अधिक शहाणा होईल. जर तुम्ही शहाण्या माणसाला शिकवलेत तर तो अधिक शिकेल. 10 परमेश्वराचा आदर करणे ही ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी आहे. परमेश्वराविषयी ज्ञान मिळवणे ही समजूतदारपणा मिळवणाची पहिली पायरी आहे. 11 जर तुम्ही शहाणे असाल तर तुमचे आयुष्य अधिक वाढेल. 12 जर तुम्ही शहाणे होत असाल तर तुमच्या भल्यासाठीच शहाणे होत असता. पण तर तुम्ही गर्विष्ठ झालात आणि दुसऱ्या लोकांची चेष्टा करु लागलात तर तुमच्यावर येणाऱ्या संकटांबद्दल तुम्हीच जबाबदार ठरता. 13 मूर्ख माणूस हा कर्कश बोलणाऱ्या वाईट स्त्रीसारखा असतो. तिच्याजवळ ज्ञान नसते. 14 ती तिच्या घराच्या दाराजवळ बसते. ती शहारातल्या टेकडीवर तिच्या खुर्चीवर बसते. 15 आणि जेव्हा लोक निघून जातात तेव्हा ती त्यांना बोलावते. त्या लोकांना तिच्यात काही रस नसतो. तरीही ती म्हणते, 16 “या ज्या लोकांना शिकणे आवश्यक आहे त्यांनी या.” तिने मूर्ख लोकांनाही बोलावले. 17 पण ती (मूर्खता) म्हणते, “जर तुम्ही पाणी चोरले तर ते पाणी तुमच्या पाण्यापेक्षा अधिक चवदार लागते. जर तुम्ही भाकर चोरली तर ती तुम्ही केलेल्या भाकरीपेक्षा अधिक चवदार लागते.” 18 आणि त्या मूर्ख गरीब लोकांना हे माहीत नव्हते की तिचे घर फक्त भूतांनी भरलेले आहे. तिने (मूर्खता) त्यांना मृत्युलोकातल्या अगदी खोल भागात बोलावले होते.

10:1 ही शलमोनाची नीतिसूत्रे (शहाणपणाच्या गोष्टी) आहेत शहाणा मुलगा त्याच्या वडिलांना सुखी करतो. पण मूर्ख मुलगा त्याच्या आईला अतिशय दु:खी करतो. 2 जर एखाद्याने वाईट गोष्टी करुन पैसे मिळवले तर ते पैसे कवडी मोलाचे असतात. पण सत्कर्म तुम्हाला मरणापासून वाचवू शकते. 3 परमेश्वर चांगल्या लोकांची काळजी घेतो. तो त्यांना हवे असलेले अन्न देतो. परंतु परमेश्वर वाईट लोकाक़डून त्यांना हव्या असलेल्या गोष्टी काढून घेतो. 4 आळशी माणूस गरीब राहील. पण जो माणूस कष्ट करील तो श्रीमंत होईल. 5 हुशार मुलगा योग्य वेळी धान्य गोळा करतो. पण हंगामाच्या वेळी झोपणारा आणि धान्य गोळा न करणारा मुलगा लाज आणतो. 6 लोक देवाला चांगल्या माणसाला आशीर्वाद द्यायला सांगतात. वाईट लोक त्या चांगल्या गोष्टी म्हणतील परंतु त्याचे शब्द त्यांच्या वाईट योजनाफक्त लपवतात. 7 चांगली माणसे चांगल्या आठवणी मागे ठेवतात. पण वाईट माणसे लवकर विसरली जातात. 8 चांगला, इमानी माणूस सुरक्षित असतो. परंतु कुटिल, फसवणारा माणूस मात्र पकडला जातो. 9 शहाण्या माणसाला जर एखाद्याने काही करायला सांगितले तर तो त्या आज्ञा पाळतो. परंतु मूर्ख माणूस वाद घालतो आणि स्वत:वर संकट ओढवून घेतो. 10 जो माणूस सत्य लपवतो तो संकटे निर्माण करतो. जो माणूस उघडपणे बोलतो तो शांतीनिर्माण करतो. 11 चांगल्या माणसाच्या शब्दांमुळे आयुष्य चांगले होते. पण दुष्टाच्या शब्दांतून त्याच्या मनातला वाईटपणा तेव्वढा दिसतो. 12 मत्सरमुळे वादविवाद होतात. पण प्रेम लोकांनी केलेल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला क्षमा करते. 13 शहाणे लोक ऐकायला योग्य अशा गोष्टी बोलतात. पण मूर्ख लोकांनी सुधारावे म्हणून त्यांना शिक्षा करायला हवी. 14 शहाणे लोक शांत असतात आणि नवीन गोष्टी शिकतात. पण मूर्ख लोक बोलतात आणि संकटे ओढवून घेतात. 15 संपत्ती श्रीमंत माणसाचे रक्षण करते आणि गरिबी गरिबांचा नाश करते. 16 जर एखाद्याने चांगले कृत्य केले तर त्याला बक्षीस मिळते. त्याला आयुष्य दिले जाते. पण दुष्टावा केवळ शिक्षा आणतो. 17 जो माणूस शिक्षेपासून काही शिकतो तो इतरांनासुध्दा जगायला शिकवू शकतो. पण जो माणूस शिकायला नकार देतो तो लोकांना चुकीच्या मार्गाने नेतो. 18 जो माणूस त्याचा मत्सर लपवतो तो खोटे बोलत असतो. पण केवळ मूर्खच पसरवता येण्यासारख्या अफवा शोधण्याचा प्रयत्न करतो. 19 जो माणूस खूप बडबड करतो तो संकंटांना आमंत्रण देतो. शहाणा माणूस गप्प राहायला शिकतो. 20 चांगल्या माणसाचे शब्द शुध्द चांदीसारखे असतात. पण दुष्ट माणसाचे विचार कवडीमोलाचे असतात. 21 चांगल्या माणसांच्या शब्दामुळे अनेकांना मदत होते. पण मूर्खाची मूर्खता त्यालाच मारु शकते. 22 परमेश्वराच्या आशीर्वादाने तुला खरी संपत्ती मिळेल. आणि ती आपल्याबरोबर संकटे आणणार नाही. 23 मूर्ख माणसाला चुका करायला आवडते. परंतु शहाणा माणूस ज्ञानाने खुश होतो. 24 दुष्ट माणसाला ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टींकडूनच त्याचा पराभव होतो. पण चांगल्या माणसाला मात्र हव्या असलेल्या गोष्टी मिळतात. 25 दुष्टांचा नाश त्यांच्या संकटांमुळे होतो. पण चांगली माणसे नेहमी बलवान राहातात. 26 आळशी माणसाला तुमच्यासाठी, काहीही करायला सांगू नका. तुमच्या तोंडात शिरलेल्या आंबेप्रमाणे किंवा डोळ्यांत गेलेल्या धुराप्रमाणे तो तुम्हाला चीड आणील. 27 जर तुम्ही परमेश्वराचा आदर करीत असाल तर तुम्ही खूप जगाल. पण दुष्टाची त्याच्या आयुष्यातली अनेक वर्ष कमी होतील. 28 चांगले लोक ज्या गोष्टींची आशा करतात त्या त्यांना आनंद मिळवून देतात. ज्या गोष्टींची आशा वाईट लोक करतात त्या त्यांना विनाश आणतात. 29 परमेश्वर चांगल्या माणसांचे रक्षण करतो. पण जे लोक चुका करतात त्यांचा परमेश्वर नाश करतो. 30 चांगले लोक नेहमी सुरक्षित असतात. पण दुष्टांना जबरदस्तीने देश सोडणे भाग पडते. 31 चांगले लोक शहाणपणाच्या गोष्टी सांगतात. पण जो संकटे आणणाऱ्या गोष्टी सांगतो त्याचे ऐकणे लोक बंद करतात. 32 चांगले लोक बोलण्याच्या योग्य गोष्टी जाणतात. पण वाईट लोक संकटे आणणाऱ्या गोष्टीच बोलतात.

11:1 काही लोक नीट वजन न करणारा तराजू वापरतात. ते लोकांना फसविण्यासाठी असा तराजू वापरतात. परमेश्वराला असले खोटे तराजू आवडत नाही. पण खरा असलेल्या तराजूमुळे परमेश्वराला आनंद होतो. 2 जे लोक गर्विष्ठ आहेत ते बिनमहत्वाचे ठरतील. पण जे लोक विनम्र आहेत ते शहाणेही होतील. 3 चांगल्या, इमानदार लोकांना प्रामाणिकपणा मार्गदर्शन करतो. पण दुष्ट लोक जेव्हा दुसऱ्यांना फसवतात तेव्हा ते स्वत:चाच नाश करुन घेतात. 4 ज्या दिवशी देव लोकांचा न्याय करतो त्या दिवशी पैशाला काही किंमत नसते. परंतु चांगुलपणा लोकांना त्यांच्या मरणापासून वाचवतो. 5 जर चांगला माणूस इमानी असला तर त्याचे आयुष्य सोपे असेल. पण दुष्ट माणसाचा मात्र त्याने केलेल्या वाईट गोष्टीमुळे नाश होईल. 6 इमानी माणसाला चांगुलपणा वाचवतो. पण दुष्ट मात्र त्यांनी केलेल्या वाईट गोष्टींच्या सापळ्यात अडकतात. 7 दुष्ट माणूस मेल्यानंतर त्याला आशेला जागा नसते. तो ज्या ज्या गोष्टींची आशा ठेवतो त्या सर्व कवडीमोल असतात. 8 चांगल्या माणसांचा संकटापासून बचाव होईल. आणि ती संकटे दुष्ट माणसांवर येतील. 9 दुष्ट माणूस काहीतरी बोलून लोकांना दुखवू शकतो. पण चांगल्या माणसांचे त्यांच्या शहाणपणामुळे रक्षण होते. 10 चांगली माणसे जेव्हा यशस्वी होतात तेव्हा सर्व शहर आनंदी होते. जेव्हा दुष्टांचा नाश होतो तेव्हा लोक आनंदाने ओरडू लागतात. 11 इमानदार लोक त्यांचे आशीर्वाद देतात तेव्हा शहर मोठे होते. पण दुष्टांचा बोलण्यामुळे शहराचा नाश होऊ शकतो. 12 ज्या माणसाला चांगली समज बुध्दी नसते तो त्याच्या शेझाऱ्याबद्दल वाईट बोलतो. परंतु शहाण्या माणसाला केव्हा गप्प बसायचे ते कळते. 13 जो माणूस दुसऱ्या लोकांबद्दल काही गुप्त गोष्टी सांगतो तो गुप्तता पाळत नाही. (म्हणून त्याच्यावर विश्वास टाकणे शक्य नसते.) पण जो माणूस विश्वासू असतो तो अफवा पसरवत नाही. 14 कमजोर नेत्यांमुळे देश गर्तेत जातो. पण बरोच चांगले उपदेशक असले तर तो देश सुरक्षित असतो. 15 जर तुम्ही दुसऱ्या माणसाचे कर्ज फेडण्याची हमी घेतलीत तर तुम्हाला त्या बद्दल पश्चात्ताप करावा लागेल. पण जर तुम्ही त्याला तसे व्यवहार करायला नकार दिलात तर तुम्ही सुरक्षित राहाल. 16 .दयाळू आणि कोमल स्त्री आदराला पात्र होते. जे लोक जुलमी आहेत ते केवळ पैसा मिळवतात. 17 दयाळू माणसाला लाभ होईल. पण जो माणूस उलट्या काळजाचा असतो तो स्वत:वर संकटे ओढवून घेतो. 18 दुष्ट माणूस दुसऱ्यांना फसवतो आणि त्यांचे पैसे घेतो. पण जो माणूस न्याची आहे आणि जो योग्य गोष्टी करतो त्याला फलप्राप्ती होते. 19 चांगुलपणा खरोखरच जीवन आणतो. पण दुष्ट माणसे दुष्टपणाकडे वळतात आणि मरण मिळवतात. 20 जे लोक आनंदाने दुष्टपणा करतात त्यांचा परमेश्वर तिरस्कार करतो. पण जे लोक योग्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याबद्दल परमेश्वर आनंदी असतो. 21 दुष्टांना खरोखरच शासन होईल. ही गोष्ट खरी आहे. आणि चांगल्या लोकांना सोडून देण्यात येईल. 22 जर स्त्री सुंदर असून मूर्ख असली तर ते डुकराच्या नाकात सुंदर सोन्याची नथ असल्यासारखे असते. 23 चांगल्या लोकांना च्यांच्या इच्छेप्रमाणे गोष्टी मिळाल्या तर त्यांतून अधिक चांगले निर्माण होते. पण दुष्टांना जर त्यांच्या इच्छेप्रमाणे गोष्टी मिळाल्या तर त्यामुळे संकटेच येतात. 24 जर एखादा माणूस उदारहस्ते देत असेल तर त्याला अधिक मिळेल. पण एखाद्याने द्यायला नकार दिला तर तो गरीब होईल. 25 जो उदार होऊन देतो त्याला लाभ होतो. जर तुम्ही दुसऱ्याना मदत केली तर तुम्हाला अधिक फायदा होईल. 26 जो अधाशी माणूस त्याचे धान्य विकायला नकार देतो त्याच्यावर लोक रागावतात. पण जो माणूस दुसऱ्यांना खायला मिळावे म्हणून आपले धान्य विकतो त्याच्याबद्दल लोकांना आनंद वाटतो. 27 जो माणूस दुसऱ्यांचे भले करायचा प्रयत्न करतो त्याचा लोक आदर करतात. जो माणूस वाईट गोष्टी करतो त्याच्या वाटेला फक्त संकटे येतात. 28 जो माणूस आपल्या श्रीमंतीवर विश्वास ठेवतो तो पिवळ्या झालेल्या पानासारखा खाली पडतो. परंतु चांगला माणूस नव्या हिरव्या पानाप्रमाणे वाढत राहील. 29 जर एखाद्याने त्याच्या कुटुंबावर संकटे आणली तर त्याला काहीही मिळणार नाही आणि शेवटी मूर्खाला शहाण्या माणसाची जबरदस्तीने सेवा करावी लागेल. 30 चांगला माणूस ज्या गोष्टी करतो त्या जीवनवृक्षासारख्या असतात. शहाणा माणूस लोकांना नवे आयुष्य देतो. 31 जर पृथ्वीवर चांगल्या माणसांना बक्षीस मिळाले तर दुष्टांनासुध्दा त्याच्या पात्रतेनुसार काही तरी मिळेल.

12:1 जर एखाद्याला चांगले व्हायचे असेल तर त्याची चूक दाखवल्यावर त्याला राग यायला नको. ज्याला चूक दाखवलेली आवडत नाही तो मूर्ख असतो. 2 परमेश्वर चांगल्या माणसांबरोबर आनंदी असतो. पण परमेश्वर दुष्ट माणसाला अपराधी ठरवतो. 3 दुष्ट माणसे कधीही सुरक्षित नसतात. पण चांगली माणसे सुरक्षित आणि निर्धास्त असतात. 4 नवरा चांगल्या बायकोबद्दल आनंदी आणि अभिमानी असतो. पण जर बाई आपल्या नवऱ्याला लाज आणत असेल. तर ती त्याच्या शरीरातल्या आजारा सारखी असते. 5 चांगले लोक त्यांनी ज्या योजना आखलेल्या असतात त्यात न्यायी आणि इमानी असतात. पण दुष्टांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. 6 दुष्ट लोक दुसऱ्यांना दु:ख देण्यासाठी आपल्या शब्दांचा वापर करतात. पण चांगल्या माणसाचे शब्द एखाद्याला संकटापासून वाचवू शकतात. 7 दुष्ट माणसांचा नाश होतो आणि त्यांचा मागमूसही राहात नाही. पण चांगल्या माणसाची आठवण मात्र तो गेल्यानंतरही येत राहाते. 8 लोक विद्वानाची स्तुती करतात पण ते मूर्खांचा आदर करीत नाहीत. 9 खूप मोठा माणूस नसूनही खूप काम करणे हे खायला काही नसताना मोठेपणाचा आव आणण्यापेक्षा चांगले असते. 10 चांगला माणूस त्याच्या प्राण्यांची काळजी घेतो. पण दुष्ट माणूस दयाळू असू शकत नाही. 11 जो शेतकरी आपल्या शेतात कष्ट करतो त्याच्याकडे पुरेसे अन्न असते. पण जो माणूस फालतू गोष्टीत वेळ घालवतो तो मूर्ख असतो. 12 दुष्ट माणसाजवळ नेहमी चुकीच्या गोष्टी करायला असतात. पण चांगल्या माणसाजवळ जी शक्ती असते ती मुळाप्रमाणे खोल गेलेली असते. 13 दुष्ट माणूस मूर्ख गोष्टी करतो. स्वत:च शब्दात अडकतो. पण चांगला माणूस त्या प्रकारच्या संकटातून सुटतो. 14 जो चांगल्या गोष्टी सांगतो त्याबद्दल त्याला बक्षीस मिळते. त्याचप्रमाणे तो जे काम करतो ते त्याला लाभ मिळवून देते. 15 मूर्ख माणसाला नेहमी स्वत:ची पध्दत सर्वश्रेष्ठ वाटते. पण विद्वान माणूस दुसरे लोक जे सांगतात तेही ऐकतो. 16 मूर्ख माणसाला फार लवकर राग येतो. पण हुशार माणूस कुणी काही चुकीचे बोलले तर चटकन् क्षमा करतो. 17 जर एखादा माणूस खरे बोलत असेल तर तो ज्या गोष्टी सांगतो त्यातही तो प्रामाणिक असतो. पण जर एखादा खोटं बोलत असेल तर त्याचे बोलणे संकटाकडे नेते. 18 जर एखादा माणूस विचार न करता बोलत असेल तर ते शब्द तलवारीसारखे लागतात. पण शहाणा माणूस काळजी पूर्वक बोलतो. त्याचे शब्द दु:खावर फुंकर मारतात. 19 जर माणूस खोटे बोलला तर त्याचे शब्द लगेचच वाया जातात. पण सत्य मात्र सदैव राहाते. 20 दुष्ट लोक नेहमी संकटे आणतात. पण जे लोक शांततेसाठी काम करतात ते आनंदी असतात. 21 चांगल्या लोकांवर दुदैंव कोसळत नाही. पण दुष्टांवर मात्र अनेक संकटे येतात. 22 परमेश्वर खोटं बोलणाऱ्यांचा तिरस्कार करतो. पण परमेश्वर खरे बोलणाऱ्या लोकांबरोबर आनंदी असतो. 23 हुशार माणूस त्याला जे माहीत आहे ते सर्व सांगत नाही. पण मूर्ख माणूस त्याला जे माहीत आहे ते सर्व सांगतो आणि तो मूर्ख आहे हे दाखवतो. 24 जे लोक खूप काम करतात त्यांना इतर कामगारांवर देखरेख करण्याचे काम देतात. पण आळशी माणसाला गुलामासारखे राबावे लागते. 25 काळजी माणसाचे सुख हिरावून घेते. पण प्रेमळ शब्द त्याला आनंदी करु शकतात. 26 चांगला माणूस आपले मित्र काळजीपूर्वक निवडतो. पण दुष्ट माणूस नेहमी चुकीचे मित्र निवडतो. 27 आळशी माणूस त्याला हव्या असलेल्या गोष्टी मागे जाणार नाही पण जो माणूस खूप कष्ट करतो त्याच्याकडे श्रीमंती येते. 28 जर तुम्ही योग्य रीतीने जगलात तर तुम्हाला खरे जीवन मिळेल. सदैव जगण्याचा तोच मार्ग आहे.

13:1 शहाण्या माणसाला त्याचे वडील काही सांगत असले तर तो लक्षपूर्वक ऐकतो. पण अभिमानी माणूस लोक त्याला योग्य ते सांगायला लागले तर तो ते ऐकत नाही. 2 चांगल्या माणसांना चांगले बोलल्याबद्दल फळ मिळते. पण दुष्ट माणसांना नेहमी चुकाच करायच्या असतात. 3 जो माणूस आपल्या बोलण्याबद्दल काळजी घेतो तो त्याचा जीव वाचवतो. पण जो विचार न करता बोलतो त्याचा नाश होतो. 4 आळशी माणसाला गोष्टी हव्या असतात पण त्या त्याला कधीही मिळणार नाहीत. पणे ते खूप कष्ट करतात त्यांना हव्या असलेल्या गोष्टी मिळतील. 5 चांगले लोक खोट्याचा तिरस्कार करतात. दुष्टांना लाज वाटायला लावली जाईल. 6 चांगुलपण चांगल्या, इमानी माणसाचे रक्षण करतो. पण ज्या माणसाला पाप करायला आवडते त्याचा दुष्टपणा नाश करतो. 7 काही लोक श्रीमंतीचा आव आणतात पण त्यांच्या जवळ मात्र काहीच नसते. दुसरे लोक आपण गरीब आहोत असे भासवतात पण ते खरोखरच श्रीमंत असतात. 8 श्रीमंत माणसाला जीव वाचवण्यासाठी पैसे मोजावे लागतात पण गरीबांना अशा धमक्या कधीच मिळत नाहीत. 9 चांगला माणूस हा दैदीप्यमान दिव्यासारखा असतो. पण दुष्ट माणूस चटकन् विझणाऱ्या दिव्यासारखा असतो. 10 जे लोक स्वत:ला इतरांपेक्षा शहाणे समजतात ते संकटे ओढवून घेतात. पण जे लोक दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून घेतात ते शहाणे असतात. 11 जर एखादा माणूस पैसे मिळवण्यासाठी फसवाफसवी करील तर त्याचे पैसे लवकरच जातील. पण जो माणूस कष्ट करुन पैसे मिळवतो त्याचे पैसे वाढतात. 12 आशा नसली की ह्दय दु:खी असते. तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळाली की तुम्हाला खूप आनंद होतो. 13 जर एखाद्या माणसाने इतर लोक त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत असतील तेव्हा त्यांचे ऐकले नाही तर त्याच्यावर संकटे येतील पण जो माणूस दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा मान राखतो त्याला त्याचे फळ मिळते. 14 शहाण्या माणसाची शिकवण आयुष्य देते. ते शब्द तुम्हाला मृत्यूचा फास चुकवायला मदत करतील. 15 लोकांना चांगली अक्कल असलेला माणूस आवडतो. पण ज्या माणसावर विश्वास टाकणे शक्य नसते त्याचे आयुष्य कठीण असते. 16 शहाणा माणूस कृती करण्याआधी विचार करतो. परंतु मूर्ख माणूस त्याच्या कृतीने तो मूर्ख आहे हे दर्शवितो. 17 जर दूतावर विश्वास ठेवणे शक्य नसेल तर त्याच्याभोवती संकटे येतील. पण जर माणसावर विश्वास ठेवणे शक्य झाले तर तिथे शांती नांदेल. 18 जर एखाद्याने त्याच्या चुकांपासून शिकायला नकार दिला तर तो गरीब आणि लाज वाटणारा होईल. पण जर एखाद्याने त्याच्या वरील टीकेकडे लक्ष दिले तर त्याला त्याचा फायदा होईल. 19 जर एखाद्या माणसाला काही हवे असले आणि नंतर ते त्याला मिळाले तर त्याला खूप आनंद होईल. पण मूर्खांना फक्त दुष्टावा हवा असतो. ते बदलायला तयार नसतात. 20 शहाण्या लोकांशी मैत्री करा म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल. पण जर तुम्ही मूर्खांशी मैत्री केली तर तुम्ही संकटात सापडाल. 21 पापी जिथे जातील तिथे संकटे त्यांचा पाठलाग करतात. पण चांगल्या माणसांच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतात. 22 चांगल्या माणसाकडे त्याच्या मुलांना आणि नातवंडांना द्यायला संपत्ती असेल. आणि शेवटी चांगल्या माणसाला दुष्ट लोकांकडचे सर्व काही मिळेल. 23 गरीब माणसाकडे खूप धान्य पिकवणारी चांगली जमीन असू शकते. पण तो वाईट निर्णय घेतो आणि उपाशी राहातो. 24 जर एखाद्याचे आपल्या मुलांवर खरोखच प्रेम असेल तर तो त्यांचे चुकल्यावर त्यांना काठीने मारायलाही कमी करणार नाही. ते चुकीने वागल्यावर तो त्यांना शिस्त लावेल. जर तुमचे तुमच्या मुलावर प्रेम असेल तर तुम्ही त्याला योग्य वेळी काळजीपूर्वक शिकवाल. 25 चांगल्या लोकांना समाधान होईपर्यंत खायला मिळेल. चांगल्या लोकांना त्यांना हव्या असलेल्या गोष्टी खरोखरच मिळतील. पण दुष्ट लोकांचे पोट रिकामेच राहील. दुष्ट लोकांना महत्वाच्या गोष्टींशिवाय राहावे लागेल.

14:1 शहाणी स्त्री तिच्या शहाणपणाचा उपयोग तिचे घर जसे असायला हवे तसे करण्यासाठी करते. पण मूर्ख बाई तिच्या मूर्खपणामुळे घराचा सत्यानाश करते. 2 जो माणूस योग्य रीतीने जगतो तो परमेश्वराला मान देतो. पण जो माणूस इमानदार नसतो तो परमेश्वराचा तिरस्कार करतो. 3 मूर्ख व गर्विष्ठ माणसाचे शब्द त्याच्यावर संकटे आणतात. पण शहाण्या माणसाचे शब्द त्याला वाचवतात. 4 जर काम करायला गायी नसल्या तर धान्याचे कोठार रिकामे राहील. लोक गायीच्या शक्तीचा उपयोग चांगले पीक काढण्यासाठी करुन घेऊ शकतात. 5 सत्यावादी माणूस खोटे बोलत नाही. तो चांगला साक्षीदार असतो. पण ज्या माणसावर विश्वास टाकणे शक्य नसते तो कधीच खरे सांगत नाही. तो वाईट साक्षीदार असतो. 6 जे लोक देवाची थट्टा करतात ते ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते कधीच मिळत नाही. ज्यांचा देवावर विश्वास आहे ते खरोखर शहाणे आहेत. त्यांच्याजवळ ज्ञान सहजपणे येते. 7 मूर्खाशी मैत्री करु नका. तो तुम्हाला काहीही शिकवू शकणार नाही. 8 हुशार लोक शहाणे असतात. कारण ते ज्या गोष्टी करतात त्याचा काळजीपूर्वक विचार करतात. पण मूर्ख लोक मूर्ख असतात कराण आपण दुसऱ्यांना फसवून जगू शकतो असे त्यांना वाटत असते. 9 मूर्ख माणूस त्याने केलेल्या वाईट गोष्टींसाठी किंमत मोजण्याच्या कल्पनेला हसतो. पण चांगले लोक त्यासाठी क्षमा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतात. 10 जर एखादा माणूस दु:खी असला तर फक्त त्यालाच ते दु:ख जाणवत असते. त्याचप्रमाणे जर माणूस आनंदी असला तर तो आनंद जाणवू शकेल असा तो एकटाच असतो. 11 वाईट माणसाच्या घराचा नाश होईल. पण चांगल्या माणसाचे घर सदैव राहील. 12 लोकांना वाटत असते हाच मार्ग बरोबर आहे. पण तो मार्ग फक्त मरणाकडे नेतो. 13 माणूस जरी हसत असला तरी तो मनातून दु:खी असू शकतो. आणि हसल्यावरही खिन्नता तिथे तशीच राहाते. 14 दुष्ट माणसांना त्यांनी केलेल्या चुकांबद्दल पूर्ण किंमत मोजावी लागेल. आणि चांगल्या माणसांना चांगल्या कृत्यांबद्दल बक्षीस मिळेल. 15 मूर्ख जे ऐकतो त्यावर विश्वास ठेवतो. पण शहाणा माणूस प्रत्येक गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करतो. 16 शहाणा माणूस परमेश्वराचा आदर करतो आणि वाईटापासून दूर राहतो. पण मूर्ख विचार न करता गोष्टी करतो. तो लक्षपूर्वक गोष्टी करत नाही. 17 जो माणूस चटकन् रागावतो तो मूर्खासारख्या गोष्टी करतो. शहाणा मनुष्य सहनशील असतो. 18 मूर्खांना त्यांच्या मूर्खपणाबद्दल शिक्षा होते. पण शहाण्यांना ज्ञानाचा लाभ होतो. 19 चांगले लोक वाईटांबरोबर लढताना जिंकतील, वाईटांना त्यांच्यापुढे नतमस्तक होणे भाग पडेल. 20 गरीबाला मित्र नसतात, शेजारीही नसतो. पण श्रीमंताला खूप मित्र असतात. 21 जो शेजाऱ्याला पाण्यात पाहातो, तो पाप करतो. जर सुखी व्हायचे असेल तर त्या गरीबांशी दयाळू राहा. 22 जो दुष्ट गोष्टींच्या योजना आखतो तो चूक करतो. पण जो चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो त्याच्याजवळ प्रेम करणारे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे मित्र असतात. 23 जर तुम्ही कष्ट केलेत तर तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी तुमच्या जवळ असतील. पण जर तुम्ही काही न करता फक्त बोलतच राहिलात तर तुम्ही गरीबच राहाल. 24 शहाण्यांना संपत्तीचे बक्षीस मिळते. पण मूर्खांना मूर्खपणाचे बक्षीस मिळते. 25 जो माणूस खरे सांगतो तो इतरांना मदत करतो. जो खोटे बोलतो तो इतरांना दु:ख देतो. 26 जो परमेश्वराचा आदर करतो तो सुरक्षित असतो आणि त्याची मुलेही सुरक्षितपणे जगतात. 27 परमेश्वराबद्दलची आदर युक्त भीती खरे जीवन देते. त्यामुळे माणूस मरणाच्या जाळ्यातून वाचतो. 28 जर राजा खूप लोकांवर राज्य करत असला तर तो महान असतो. पण जर तिथे लोकच नसले तर त्या राजाची काहीच किंमत नसते. 29 सहनशील माणूस खूप हुशार असतो. ज्या माणसाला चटकन् राग येतो तो आपण मूर्ख आहोत, हे सिध्द करतो. 30 जर एखाद्याच्या मनात शांती असली तर त्याचे शरीर निरोगी असते. पण मत्सर त्याच्या शरीरात आजार निर्माण करतो. 31 जो माणूस गरीबांवर संकटे आणतो तो आपण देवाचा आदर करीत नाही हे दाखवतो. देवानेच दोघांनाही निर्माण केले आहे. पण जर एखादा गरीबांशी कनवाळूपणे वागला तर तो देवाचा आदर करतो हे दिसून येते. 32 संकटाच्यावेळी दुष्ट माणसाचा पराभव होतो. पण चांगली माणसे मरणाच्या दारातही विजयी होतात. 33 शहाणा माणूस नेहमी शहाण्या गोष्टींचा विचार करतो. पण मूर्खाला शहाणपणाबद्दल काहीही माहिती नसते. 34 चांगलपणा देशाला महान बनवतो. पण पाप कुठल्याही लोकांना लाज आणते. 35 राजाजवळ जेव्हा शहाणे नेते असतात तेव्हा राजा आनंदी असतो. पण मूर्ख नेत्यांवर राजा रागावतो.

15:1 शांतपणे दिलेल्या उत्तरामुळे राग निघून जातो. पण तिखट उत्तरामुळे राग वाढतो. 2 शहाणा माणूस बोलतो तेव्हा इतरांना ऐकावेसे वाटते. पण मूर्ख माणूस केवळ मूर्खताच बडबडतो. 3 सगळीकडे काय चालले आहे ते परमेश्वर बघतो. परमेश्वर सगळ्या माणसांना बघत असतो. चांगल्या आणि वाईट. 4 दयेचे मायेचे शब्द म्हणजे जणू जीवनवृक्ष. पण खोट्या शब्दांमुळे माणसाची उमेद खचते. 5 मूर्ख माणूस त्याच्या वडिलांच्या उपदेशाकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा लोक शहाण्या माणसाला शिकवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो लक्षपूर्वक ऐकतो. 6 चांगले लोक पुष्कळ बाबतीत श्रीमंत असतात. पण दुष्टाकडे ज्या गोष्टी असतात त्यामुळे त्याच्यावर संकटे येतात. 7 शहाणे लोक बोलतात तेव्हा नवीन माहिती मिळते. पण मूर्ख लोक ऐकण्यासारखे काही बोलत नाहीत. 8 दुष्ट माणसे ज्या गोष्टी अर्पण करतात त्या परमेश्वराला आवडत नाहीत. पण परमेश्वर चांगल्या माणसाची प्रार्थना ऐकून आनंदी होतो. 9 दुष्ट लोक ज्या प्रकारे जगतात ते परमेश्वराला आवडत नाही. जे लोक सत्कृत्य करायचा प्रयत्न करतात त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो. 10 जर एखाद्या माणसाने चुकीने जगायला सुरुवात केली तर त्याला शिक्षा होईल. आणि ज्या माणसाला योग्य अयोग्य सांगितलेले आवडत नाही त्याचा नाश होईल. 11 परमेश्वराला सर्व माहीत असते. मृत्युलोकांत काय घडते ते देखील त्याला माहीत असते. म्हणून लोकांच्या मनात आणि हृदयात काय चालले आहे ते परमेश्वराला नक्कीच ठाऊक असेल. 12 मूर्खाला तो चुकत आहे हे सांगितलेले आवडत नाही. आणि तो माणूस शहाण्या माणसाला माहिती विचारायला नकार देतो. 13 माणूस जर आनंदी असला तर त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. पण जर एखादा मनातून दु:खी असला तर त्याचा आत्मा ते दु:ख दाखवेल. 14 शहाणा माणूस अधिक ज्ञान मिळवायता प्रयत्न करतो. पण मूर्खाला अधिक मूर्खताच हवी असते. 15 काही गरीब लोक नेहमी खिन्न असतात. पण मनातून आनंदी असलेल्या लोकांसाठी जीवन म्हणजे एक मोठा समारंभ असतो. 16 गरीब राहून परमेश्वराचा आदर करणे हे श्रीमंत होऊन खूप संकटे भोगण्यापेक्षा चांगले असते. 17 प्रेम असते त्या ठिकाणी थोडेसे खाणे हे तिरस्कार असलेल्या ठिकाणी भरपूर खाण्यापेक्षा चांगले असते. 18 लवकर रागावणारे लोक संकटे आणतात. पण संयमी माणूस शांतता आणतो. 19 आळशी माणसाला सगळीकडे संकटे मिळतील पण इमानदार माणसासाठी आयुष्य सोपे असेल. 20 शहाणा मुलगा त्याच्या वडिलांना सुखी करतो. पण मूर्ख माणूस त्याच्या आईला लाज आणतो. 21 मूर्ख गोष्टी करण्यात मूर्खाला आनंद मिळतो. पण चांगला माणूस योग्य गोष्टी काळजीपूर्वक करतो. 22 जर एखाद्याला पुरेशी माहिती मिळाली नाही तर त्याच्या योजना कोसळतील. पण जर एखाद्याने शहाण्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिले तर तो यशस्वी होईल. 23 चांगले उत्तर दिल्यावर माणूस आनंदी होतो. आणि योग्य वेळी योग्य शब्द फारच चांगला असतो. 24 शहाण्या माणसाने केलेली गोष्ट यशाकडे नेते आणि त्या गोष्टी त्याला मृत्यूकडे जाण्यापासून वाचवतात. 25 गर्विष्ठ माणसाकडे असलेल्या सगळ्या गोष्टींचा परमेश्वर नाश करील. पण विधवेकडे असलेल्या गोष्टीचे परमेश्वर रक्षण करतो. 26 परमेश्वराला दुष्ट विचार आवडत नाहीत. पण परमेश्वर मायेच्या शब्दांनी आनंदी होतो. 27 जर एखद्याने काही वस्तू मिळवण्यासाठी फसवणूक केली तर तो त्याच्या कुटुंबावर संकटे आणतो. पण जर एखादा माणूस खरा असला आणि लाच घेण्याविषयी त्याच्या मनात घृणा असेल तर तो जगू शकेल. 28 चांगले लोक उत्तर देण्याआधी विचार करतात. पण दुष्ट लोक विचार करण्याआधी बोलतात आणि त्यामुळे त्यांच्यावर संकटे येतात. 29 परमेश्वर दुष्टांपासून खूप दूर आहे. पण तो चांगल्या माणसांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो. 30 जो माणूस हसतो तो इतरांना आनंद देतो आणि चांगली बातमी ऐकून लोकांना अधिक चांगले वाटते. 31 जो माणूस त्याचे चुकते आहे असे सांगितल्यावर ऐकतो तो शहाणा असतो. 32 जर एखाद्याने शिकायला नकार दिला तर तो स्वत:लाच इजा करुन घेतो. तू चुकतो आहेस असे सांगितलेले जो ऐकून घेतो तो अधिकाधिक गोष्टी समजू शकतो. 33 जो माणूस परमेश्वराचा आदर करतो तो शहाणे व्हायला शिकतो. परमेश्वराचा आदर करण्यासाठी माणसाने खरोखरच विनम्र व्हायला हवे.

16:1 लोक त्यांच्या योजना तयार करतात. पण परमेश्वरच त्या योजना प्रत्यक्षात आणतो. 2 माणसाला तो जे करतो ते बरोबर आहे असे वाटते. पण माणसाने केलेल्या गोष्टी मागच्या खऱ्या कारणांचा न्यायनिवाडा परमेश्वरच करतो. 3 तुम्ही जे जे करता त्या सगळ्याच्या मदतीसाठी परमेश्वराकडे वळा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. 4 परमेश्वराकडे सगळ्यासाठी योजना आहेत. आणि परमेश्वराच्या योजनेत दुष्ट माणसांचा नाश होईल. 5 जो माणूस आपण इतरांपेक्षा चांगले आहोत, असा विचार करतो त्याचा परमेश्वर तिरस्कार करतो. परमेश्वर त्या सर्व गर्विष्ठ लोकांना नक्कीच शिक्षा करील. 6 खरे प्रेम आणि इमानदारी तुम्हाला शुध्दकरील. परमेश्वराचा आदर करा म्हणजे तुम्ही वाईटापासून खूप दूर राहाल. 7 जर एखादा माणूस चांगले आयुष्य जगत असेल, परमेश्वराला खुष करत असेल तर त्या माणसाचे शत्रूदेखील त्याच्याबरोबर शांतता राखतील. 8 योग्य मार्गाने थोडेसे मिळवणे हे फसवणूक करुन खूप मिळवण्यापेक्षा चांगले आहे. 9 माणूस त्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दलच्या योजना करु शकतो. पण काय घडेल ते मात्र परमेश्वरच ठरवतो. 10 राजा बोलतो तेव्हा त्याचे म्हणजे कायदा असतो. त्याचे निर्णय नेहमी योग्य असायला हवेत 11 परमेश्वराला सर्व काटे आणि तराजू योग्य असायला हवे असतात. त्याला सर्व व्यापारातील करार न्यायी असायला हवे असतात. 12 राजे लोक वाईट गोष्टी करणाऱ्यांचा तिरस्कार करतात. चांगुलपणा त्याच्या राज्याला मजबूत करील. 13 राजाला सत्य ऐकायचे असते. राजांना खोटे ने बोलणारे लोक आवडतात. 14 जेव्हा राजा रागावतो तेव्हा तो कुणालाही ठार मारु शकतो. आणि शहाणा माणूस राजाला आनंदी ठेवायचा प्रयत्न करतो. 15 राजा जेव्हा आनंदी असतो तेव्हा जीवन सगळ्यांसाठी चांगले असते. राजा जर तुमच्यावर खुष असला तर ते वसंतात ढगातून पडणाऱ्या पावसासारखे असते. 16 ज्ञान हे सोन्यापेक्षा अधिक किंमती आहे. समजुतदारपणा चांदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. 17 चांगले लोक वाईटापासून दूर राहाण्याचा प्रयत्न करीत आपले आयुष्य जगतात. जो माणूस जीवनात काळजी घेतो तो आपल्या आत्म्याचे रक्षण करतो. 18 जर माणूस गर्विष्ठ असला तर तो सर्वनाशाच्या संकटात असतो. जर एखादा माणूस आपण इतरांपेक्षा चांगले आहोत, असा विचार करत असला तर तो पराभवाच्या संकटात असतो. 19 विनम्र राहून गरीब लोकांबरोबर राहणे हे जे लोक स्वत:ला इतरांपेक्षा चांगले समजतात, त्यांच्याबरोबर राहून श्रीमंतीचे वाटेकरी होण्यापेक्षा चांगले असते. 20 जर एखादा माणूस लोकांच्या शिकवण्याकडे लक्ष देईल तर त्याचा फायदा होईल. आणि जो माणूस परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याला आशीर्वाद मिळतो. 21 माणूस शहाणा आहे की नाही ते लोकांना कळेल. आणि जो माणूस अतिशय काळजीपूर्वक आपले शब्द निवडतो तो ज्ञानात भर घालतो. 22 ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्या लोकांना ते खरेखरे आयुष्य देते. पण मूर्ख अधिक मूर्ख व्हायला शिकतात. 23 शहाणा माणूस नेहमी बोलण्याआधी विचार करतो आणि तो जे शब्द बोलतो ते चांगले आणि ऐकण्यायोग्य असतात. 24 मायेच शब्द मद्यासारखे असतात. त्यांचा स्वीकार करणे सोपे असते आणि ते प्रकृतीसाठी चांगले असतात. 25 एखादा मार्ग लोकांना योग्य वाटतो. पण तो मार्ग मृत्यूकडे नेतो. 26 कामगाराची भूक त्याला काम करायला लावते. त्याची भूक त्याला खाण्यासाठी काम करायला लावते. 27 कवडीमोल माणूस वाईट गोष्टींच्या योजना आखतो. त्याचा उपदेश आगीप्रमाणे नाश करतो. 28 संकट आणणारे लोक नेहमी समस्या निर्माण करतात. आणि जो माणूस अफवा पसरवतो तो जवळच्या मित्रात समस्या निर्माण करतो. 29 जो माणूस लवकर रागावतो तो त्याच्या शेजाऱ्याला आमिष दाखवून वळवतो. तो त्यांना वाईट मार्गाने नेतो. 30 जो माणूस डोळे मिचकावतो आणि हसतो तो चुकीच्या आणि वाईट गोष्टींच्या योजना आखतो. 31 जी माणसे चांगले आयुष्य जगली त्यांचे पांढरे केस म्हणजे वैभवाचा मुकुट आहे. 32 सहनशील असणे हे शक्तिमान सैनिक असण्यापेक्षा चांगले आहे. स्वत:च्या रागाला काबूत ठेवणे हे सबंध शहर आपल्या काबूत आणण्यापेक्षा चांगले आहे. 33 लोक निर्णय घेण्यासाठी फासे टाकतात. पण निर्णय नेहमी देवाकडून येतात.

17:1 मुबलक अन्नाने भरलेल्या भांडणयुक्त घरापेक्षा कोरड्या भाकरीच्या तुकडा शांतीने खाणे बरे! 2 सेवकाचा हुशार मुलगा मालकाच्या आळशी मुलावर ताबा मिळवील. तो हुशार मुलगा मालकाचे सर्व काही घेईल. 3 सोने आणि चांदी शुध्द करण्यासाठी आगीत टाकतात. लोकांची मने मात्र परमेश्वर शुध्द करतो. 4 दुष्ट माणूस इतर लोक वाईट गोष्टी सांगतात त्या ऐकतो. जे लोक खोटे बोलतात ते खोटे ऐकतात सुध्दा. 5 काही लोक गरीबांची थट्टी करतात. ज्यांच्यापुढे समस्या असतात त्यांना ते हसतात. या वरुन असे दिसते की ते वाईट लोक, ज्या देवाने त्यांची निर्मिती केली त्या देवाचा आदर करीत नाहीत. त्यांना शिक्षा होईल. 6 नातवंडे म्हाताऱ्या माणसांना आनंदी बनवतात. आणि मुलांना त्यांच्या आईवडिलांचा अभिमान असतो. 7 मूर्खाने खूप बोलणे शहाणपणाचे नसते. तसेच राज्यकर्त्याने खोटे बोलणे शहाणपणाचे नसते. 8 काही लोकांना कुठेही गेले तरी लाच म्हणजे दैवी मंत्र वाटते आणि ती कामही करते असे वाटते. 9 एखाद्याने तुमचे काही वाईट केल्यानंतर जर तुम्ही त्याला क्षमा करु शकला तर तुम्ही मित्र बनू शकता. पण जर तुम्ही त्याची करणी सतत मनात ठेवली तर त्यामुळे मैत्रीत बाधा येईल. 10 हुशार माणूस तंबी दिल्या बरोबर शिकतो. परंतु मूर्ख माणूस शंभर फटके मारल्यावरही शिकत नाही. 11 वाईट माणसाला केवळ चुकाच करायच्या असतात. शेवटी देव त्याला शिक्षा करायला देवदूत पाठवेल. 12 मूर्खाला भेटण्यापेक्षा, जीची पिल्ले चोरीला गेलीत अशा चवताळलेल्या अस्वलाच्या मादीला तोंड देणे बरे! 13 जे लोक तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतात त्यांच्यासाठी तुम्ही वाईट गोष्टी करु नका. तुम्ही जर तसे केलेत तर तुम्हाला आयुष्यभर संकटांना सामोर जावे लागेल. 14 वादाला तोंड फोडणे हे धरणात भोक करण्यासारखे आहे. वाद मोठा होण्याच्या आतच तो बंद करा. 15 दोषी नसणाऱ्याला शिक्षा करणे आणि दोषी असणाऱ्यांचे समर्थन करणे या दोन गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत. 16 मूर्खाकडचा पैसा वाया जातो. का? कराण तो मूर्ख पैशाचा वापर शहाणा होण्यासाठी करत नाही. 17 मित्र नेहमी प्रेम करतो. खरा भाऊ संकटाच्या वेळीसुध्दा मदत करतो. 18 केवळ मूर्खच दुसऱ्या माणसाच्या कर्जाची हमी देईल. 19 ज्या माणसाला वाद घालायला आवडतो त्याला पाप करायलाही आवडते. जर तुम्ही स्वत:चीच भलावण केली तर तुम्ही संकटांना आमंत्रण देता. 20 वाईट माणसाला नफा होणार नाही. जो माणूस खोटे बोलतो त्याच्यावर संकटे येतील. 21 मूर्ख मुलगा असलेले वडील दु:खी होतील. मूर्खाचे वडील सुखी नसतील. 22 आनंद चांगल्या औषधासारखा असतो. पण दु:ख हे आजारासारखे असते. 23 वाईट माणूस दुसऱ्यांना फसवण्यासाठी गुप्ततेने पैसे घेतो. 24 शहाणा माणूस नेहमी सर्वांत चांगली गोष्ट करण्याचा विचार करतो. पण मूर्ख माणूस दूरच्या जगाचे स्वप्न पाहातो. 25 मूर्ख मुलगा वडिलांसाठी दु:ख आणतो आणि जिने त्याला जन्म दिला त्या आईसाठी वेदना आणतो. 26 काहीही चूक केली नसताना एखाद्याला शिक्षा करणे चूक आहे. जे नेते प्रामाणिक असतात त्यांना शिक्षा करणे चूक आहे. 27 शहाणा माणूस शब्द काळजीपूर्वक वापरतो. शहाणा माणूस लवकर रागावत नाही. 28 मूर्ख माणूस जर गप्प बसला तर तो सुध्दा शहाणा वाटतो. जर तो काही बोलला नाही तर तो शहाणा आहे असे लोकांना वाटते.

18:1 काही लोकांना इतरांभोवती राहायला आवडत नाही. त्यांना जे पाहिजे तेच ते करतात. आणि त्यांना जर कुणी उपदेश केला तर ते अस्वस्थ होतात. 2 मूर्खाला इतरांपासून शिकायची इच्छा नसते. त्याला फक्त स्वत:च्याच कल्पना सांगायच्या असतात. 3 लोकांना वाईट माणूस आवडत नाही. लोक त्या मूर्खाची चेष्टा करतात. 4 शहाण्या माणसाचे शब्द शहाणपणाच्या खोल विहिरीतून उसळून वर येणाऱ्या पाण्यासारखे असतात. 5 लोकांचा न्यायनिवाडा करताना तुम्ही न्यायी असायला हवे. जर तुम्ही दोषी माणसाला सोडून दिले तर ते चांगल्या लोकांवर अन्याय केल्यासारखे होईल. 6 मूर्ख माणूस त्याच्या बोलण्यामुळे स्वत:वर संकट ओढवून घेतो. त्याचे शब्द भांडण सुरु करु शकतात. 7 मूर्ख माणूस बोलतो तेव्हा स्वत:चाच नाश करुन घेतो. त्याचेच शब्द त्याला अडचणीत आणतात. 8 लोकांना नेहमी अफवा ऐकायला आवडतात. ते पोटात जाणाऱ्या चांगल्या अन्नासारखे असते. 9 जो माणूस कामात ढिला आणि मंद असतो. तो त्या गोष्टींचा कामाचा नाश करणाऱ्या माणसाइतकाच वाईट असतो. 10 परमेश्वराच्या नावात खूप शक्ती आहे. तो बळकट बुरुजाप्रमाणे आहे. चांगले लोक त्यांच्याकडे जाऊ शकतात आणि सुरक्षित होतात. 11 श्रीमंती आपले रक्षण करेल असे श्रीमंतांना वाटते. ती बळकट किल्ल्याप्रमाणे आहे असे त्यांना वाटते. 12 गर्विष्ठ माणसाचा लवकरच नाश होईल. पण विनम्र माणसाचा गौरव होईल. 13 तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी इतरांना त्यांचे बोलणे संपवू द्या. त्यामुळे तुम्ही गोंधळणार नाही आणि मूर्खही ठरणार नाही. 14 आजारपणात माणसाचे मन त्याला जिवंत ठेवू शकते. पण जर आता सारे काही व्यर्थ आहे असे त्याला वाटत असेल तर सारीच आशा संपते. 15 शहाण्या माणसाला नेहमी अधिक शिकायची इच्छा असते. तो माणूस नेहमी अधिक ज्ञान मिळवण्यासाठी लक्षपूर्वक ऐकत असतो. 16 जर तुम्हाला महत्वाच्या माणसाला भेटायची इच्छा असेल तर त्याला नजराणा द्या. नंतर तुम्ही त्याला सहजपणे भेटू शकता. 17 सुरुवातीला बोलणारा माणूस नेहमी बरोबर आहे असे तोपर्यंत वाटत असते, जोपर्यंत कुणीतरी येऊन त्याला प्रश्र विचारीत नाही. 18 दोन बलवान माणसे वाद घातल असली तर तो वाद चिठ्ठ्या टाकून सोडवणे चांगले. 19 जर तुम्ही मित्राचा अपमान केलात तर त्याला परत जिंकणे हे बळकट तटबंदी असलेले शहर जिंकण्यापेक्षा कठीण असते. आणि वादविवाद लोकांना एकमेकांपासून राजवाड्याच्या प्रवेशद्वारांवरील आडव्या बळकट खांबांइतके दूर नेतात. 20 तुम्ही जे बोलता त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो. जर तुम्ही चांगले बोललात तर तुमच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतील. जर तुम्ही वाईट बोललात तर वाईट गोष्टी घडतील. 21 जीवन किंवा मरणही देणारे शब्द जीभ बोलू शकते. आणि ज्यांना बोलायला आवडते त्यांनी त्यांच्या बोलण्याच्या परिणामाचा स्वीकार करायची तयारी ठेवली पाहिजे. 22 जर तुम्हाला बायको मिळाली, तर तुम्हाला चांगली गोष्ट मिळाली असे होईल. परमेवर तुमच्यावर खुश आहे असे ते दर्शवते. 23 गरीब माणूस मातीची भीक मागेल. पण श्रीमंत माणूस उत्तर देतानासुध्दा मग्रूर असतो. 24 काही मित्रांबरोबर असणे आनंददायी असते. पण जवळचा मित्र भावापेक्षाही चांगला असतो.

19:1 गरीब आणि प्रामाणिक असणे हे खोटे बोलणारा आणि लोकांना फसवणारा मूर्ख माणूस असण्यापेक्षा चांगले असते. 2 काही गोष्टींविषयी खूप उत्साह दाखविणे एवढेच पुरेसे नसते. तुम्ही काय करीत आहात ते तुम्हाला कळले पाहिजे. एखादी गोष्ट करण्यासाठी एकदम् पुढे घुसू नये, नाही तर तुम्ही ती चुकीची कराल. 3 माणसाचा स्वत:चा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो पण तो दोष मात्र परमेश्वराला देतो. 4 जर एखादा माणूस श्रीमंत असेल त्याची संपत्ती त्याला खूप मित्र देते. पण जर माणूस गरीब असेल तर त्याचे सर्व मित्र त्याला सोडून जातात. 5 जो माणूस दुसऱ्याबद्दल खोटे सांगेल त्याला शिक्षा होईल. तो माणूस खोटे सांगतो तो सुरक्षित राहाणार नाही. 6 पुष्कळांना राज्यकर्त्यांबरोबर मैत्री करायची असते आणि जो माणूस नजराणे देतो त्याच्याबरोबर तर सर्वांनाच मैत्री करायची असते. 7 माणूस जर गरीब असला तर त्याचे कुटुंबही त्याच्याविरुध्द असते आणि त्याचे सगळे मित्र त्याच्यापासून दूर जातात. तो गरीब माणूस मदतीची याचना करतो. पण ते त्याच्या जवळपासही फिरकत नाहीत. 8 जर एखाद्याचे स्वत:वर खूपच प्रेम असेल तर तो शहाणा होण्याचा प्रयत्न करील, तो समजून घेण्याचा खूप प्रयत्न करील आणि त्याला त्याचे बक्षिस मिळेल. 9 जो माणूस खोटे बोलतो त्याला शिक्षा होईल. आणि जो खोटे बोलणे चालूच ठेवतो त्याचा सत्यानाश होईल. 10 मूर्ख माणूस श्रीमंत असायला नको. ते गुलामाने राजपुत्रांवर राज्य करण्यासारखे आहे. 11 जर माणूस शहाणा असला तर त्याचा शहाणपणा त्याला सहनशीलता देतो. आणि तो जेव्हा चूक करणाऱ्यांना क्षमा करतो. तेव्हा तर ते खूपच चांगले असते. 12 राजा रागावतो तेव्हा ते सिंहाच्या गर्जनेसारखे वाटते. पण तो जर तुमच्यावर खुश असला तर ते हळुवार पावसासारखे वाटते. 13 मूर्ख मुलगा त्याच्या वडिलांचा सर्वनाश करु शकतो आणि वाद घालणारी बायको सतत टपटप पडणाऱ्या पाण्यासारखी चीड आणणारी असते. 14 लोकांना त्यांच्या आई-वडिलांकडून घरे आणि पैसा मिळतो. पण चांगली बायको परमेश्वराकडून मिळालेला नजराणा आहे. 15 आळशी माणसाला भरपूर झोप मिळेल पण तो खूप उपाशीही असेल. 16 जर माणसाने कायद्याचे पालन केले तर तो स्वत:चेच रक्षण करतो. पण जर तो या गोष्टीला महत्व देत नसेल तर तो मारला जातो. 17 गरीब माणसांना पैसे देणे हे परमेश्वराला कर्ज देण्यासारखे आहे. त्यांच्याशी दयेने वागल्याबद्दल परमेश्वर परतफेड करील. 18 तुमच्या मुलाला शिकवा व तो चुकत असेल तर त्याला शिक्षा करा. तीच एक आशा आहे. तुम्ही जर हे करायला नकार दिला तर तुम्ही त्याला स्वत:चा नाश करायला मदत करीत आहात. 19 जर एखाद्याला चटकन् राग येत असेल तर त्याची किंमत त्याला चुकवावी लागते. जर तुम्ही त्याला त्याच्या संकटातून वाचवत राहिलात तर तो पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करील. 20 उपदेश ऐका आणि शिका. नंतर तुम्ही शहाणे व्हाल. 21 माणूस बऱ्याच योजना आखतो. पण फक्त परमेश्वराच्याच योजना प्रत्यक्षात येतात. 22 लोक खरे आणि प्रामाणिक असावेत अशी इच्छा केली जाते, म्हणून खोटे असण्यापेक्षा गरीब असणे चांगले. 23 जो माणूस परमेश्वराचा आदर करतो त्याचे आयुष्य चांगले असते. आयुष्यात समाधानी असतो आणि त्याला संकटांची चिंता नसते. 24 आळशी माणूस स्वत:च्या भूकेसाठी करायच्या गोष्टी देखील करणार नाही. तो ताटातले अन्न तोंडात टाकायचे कामसुध्द करीत नाही. 25 जर एखादा माणूस स्वत:ला इतरांपेक्षा चांगला समजत असेल तर त्याला शिक्षा करायला पाहिजे. नंतर मूर्ख धडा शिकतील. शहाण्या माणसावर टीका केली तर तो शिकतो. 26 एखाद्याने वडिलांची चोरी केली आणि आईला घर सोडायला लावले तर तो खूप वाईट आहे. तो माणूस स्वत:ला लाज आणतो आणि स्वत:चा अनादर करतो. 27 तुम्ही जर सुचना ऐकायला नकार दिलात तर तुम्ही मूर्खासारख्या चुका करत राहाल. 28 जर साक्षीदार प्रमाणिक नसला तर योग्य न्याय असणार नाही. दुष्ट माणसांच्या बोलण्याने गोष्टी अधिक वाईट होतील. 29 जो माणूस स्वत:ला इतरांपेक्षा चांगला समजतो त्याला इतर लोक शिक्षा करतील. मूर्ख माणसासाठी जी शिक्षा राखून ठेवली होती ती त्याला मिळेल.

20:1 द्राक्षारस आणि मद्य यामुळे लोकांचा स्वत:वरचा ताबा जातो. ते खूप जोरात बोलतात आणि फुशारकी मारायला लागतात. ते झिंगलेले असतात आणि मूर्खासारख्या गोष्टी करायला लागतात. 2 राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो. तुम्ही जर राजाला राग येऊ दिला तर तुम्ही तुमचे प्राणदेखील गमावू शकता. 3 कुठलाही मूर्ख वादविवादाला सुरुवात करु शकतो. म्हणून जो वादविवादाला नकार देतो त्याचा तुम्ही आदर करु शकता. 4 आळशी मनुष्य बी पेरायचादेखील आळस करतो. म्हणून हंगामाच्या वेळी तो अन्न शोधतो, पण त्याला काहीही मिळत नाही. 5 चांगला उपदेश हा खोल विहिरीतून घेतलेल्या पाण्यासारखा असतो. परंतु शहाणा माणूस दुसऱ्याकडून शिकण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. 6 बरेच लोक आपण प्रामाणिक आणि प्रेमळ आहोत असे सांगतात. पण खरोखरच असा माणूस सापडणे कठीण असते. 7 चांगला माणूस चांगले आयुष्य जगतो आणि त्याच्या मुलांना आशीर्वाद मिळतात. 8 जेव्हा राजा बसून लोकांचा न्यायनिवाडा करतो तेव्हा त्याला स्वत:च्या डोळ्यांनी वाईट गोष्टी बघता येतात. 9 कुठलाही माणूस आपण प्रयत्नांची पराकाष्टा केली असे खरोखरच म्हणू शकेल का? मी पाप केले नाही असे कुणी खरोखर सांगू शकेल का? नाही. 10 जे लोक चुकीची वजने आणि तराजू वापरुन लोकांना फसवतात त्यांचा परमेश्वर तिरस्कार करतो. 11 लहान मूल सुध्दा आपल्या कृतीने आपण चांगले आहोत की वाईट ते दाखवू शकते. त्या मुलाकडे लक्षपूर्वक पाहून तो प्रामाणिक आणि चांगला आहे की नाही ते तुम्ही समजू शकता. 12 आपल्याला बघायला डोळे आणि ऐकायला कान आहेत आणि ते परमेश्वरानेच आपल्यासाठी केले आहेत. 13 जर तुम्हाला झोपायला आवडत असेल तर तुम्ही गरीब व्हाल. पण तुमच्या वेळेचा काम करुन उपयोग करा आणि तुम्हाला भरपूर खायला मिळेल. 14 एखादा माणूस तुमच्याकडून काही विकत घेतो तेव्हा तो म्हणतो, “हे योग्य नाही, याची किंमत फार आहे.” नंतर तोच माणूस इतरांना जाऊन सांगतो की त्याने फार चांगला व्यवहार केला. 15 सोने आणि हिरे माणसाला श्रीमंत बनवतात. परंतु जर एखाद्याला तो काय बोलतो आहे हे कळत असेल तर त्याची किंमत खूपच जास्त असते. 16 तुम्ही जर दुसऱ्या माणसाच्या कर्जासाठी स्वत:ला जामीन ठेवलेत तर तुम्ही तुमचे कपडे सुध्दा घालवून बसाल. 17 तुम्ही जर फसवून कुठली गोष्ट घेतलीत तर ती चांगली आहे असे तुम्हाला कदाचित् वाटेल. पण शेवटी ती कवडीमोलाचीच ठरेल. 18 योजना आखण्या आधी चांगला सल्ला घ्या. तुम्हाला जर युध्द सुरु करायचे असेल तर मार्गदर्शनासाठी चांगल्या लोकांना शोधा. 19 जो माणूस इतरांबद्दल काही गोष्टी सांगतो, त्यांच्यावर विश्वास ठेवणे शक्य नसते. म्हणून जो खूप बोलतो त्याच्याशी मैत्री करु नका. 20 जर एखादा माणूस त्याच्या आईविरुध्द किंवा वडिलांविरुध्द बोलला तर तो अंधार होणारा प्रकाश आहे. 21 जर तुम्हाला सहज संपत्ती मिळाली असेल तर तिची तुम्हाला किंमत नसते. 22 जर कुणी तुमच्याविरुद्व काही केले तर त्याला शिक्षा करायचा तुम्हीच प्रयत्न करु नका. परमेश्वरासाठी थांबा. शेवटी तोच तुम्हाला विजयी बनवेल. 23 काही लोक फसवी वजने आणि मापे वापरतात. ते त्याचा उपयोग लोकांना फसवण्यासाठी करतात. ते परमेश्वराला आवडत नाही. त्यामुळे त्याला आनंद होत नाही. 24 प्रत्येकाच्या बाबतीत जे काय घडते ते परमेश्वर ठरवतो. म्हणून आपल्या आयुष्यात काय घडणार आहे ते माणासाला कसे काय कळेल? 25 देवाला काही वस्तू देण्याचे वचन देण्याआधी विचार करा. नंतर तुम्ही तसे वचन द्याला नको होते असे तुम्हाला वाटू शकेल. 26 दुष्ट लोक कोणते ते शहाणा राजाच ठरवील. आणि तो राजाच त्या लोकांना शिक्षा करील. 27 मनुष्याचा आत्मा परमेश्वराचा दीप होय. माणसाच्या मनात काय आहे ते परमेश्वराला कळू शकते. 28 राजा जरा प्रामाणिक आणि सत्यवचनी असला, तर तो त्याची सत्ता राखू शकतो. त्याचे खरे प्रेम त्याचे राज्य बलकट ठेवते. 29 आपण तरुण माणसाचे त्याच्या शक्तीबद्दल कौतुक करतो. पण आपण वृध्दाला त्याच्या पांढऱ्या केसांमुळे मान देतो. त्यावरुन तो पूर्ण आयुष्य जगाला हे दिसते. 30 आपल्याला शिक्षा झाली तर आपण चुका करणे थांबवू. दु:ख माणसाला बदलू शकते.

21:1 शेतकरी शेताला पाणी देण्यासाठी खड्डे खणतात. पाण्याला दिशा देण्यासाठी ते वेगवेगळे खड्डे बुजवतात. त्याच रीतीने परमेश्वर राजाच्या मनावर ताबा मिळवतो. राजाने जिथे जावे असे परमेश्वराला वाटते तिथे परमेश्वर त्याला नेतो. 2 माणूस जे जे करतो ते सर्व बरोबर आहे असे त्याला वाटते. पण लोक काही गोष्टी करतात या मागची खरी कारणे योग्य की अयोग्य ते परमेश्वरच ठरवतो. 3 ज्या गोष्टी योग्य व न्यायी आहेत त्याच करा. बळी अर्पण करण्यापेक्षा अशा गोष्टीच परमेश्वराला आवडतात. 4 गर्विष्ठ दृष्टी व गर्विष्ठ विचार पापरुप आहेत. माणूस पातकी आहे हेच ते दर्शवितात. 5 काळजीपूर्वक केलेल्या योजनांमुळे फायदा होतो. पण जर तुम्ही काळजी घेतली नाही आणि घाई घाईत गोष्टी केल्या तर तुम्ही गरीब व्हाल. 6 जर तुम्ही श्रीमंत होण्यासाठी लबाडी केलीत तर तुमची संपत्ती लवकरच नाहीशी होईल आणि तुमची संपत्तीच तुम्हाला मरणाचा मार्ग दाखवील. 7 दुष्ट लोक ज्या वाईट गोष्टी करतात त्या त्यांचा नाश करतील. ते लोक योग्य गोष्टी गोष्टी करायला नकार देतात. 8 वाईट लोक नेहमी दुसऱ्यांना फसवायचा प्रयत्न करतात. पण चांगले लोक विश्वासू आणि न्यायी असतात. 9 सतत वाद घालणाऱ्या बायकोबरोबर घरात राहाण्यापेक्षा घराच्या छतावर राहाणे अधिक चांगले. 10 दुष्ट लोकांना नेहमी वाईट गोष्टी करायच्या असतात आणि ते लोक त्यांच्या भोवतालच्या लोकांना दया दाखवत नाहीत. 11 जे लोक देवाची चेष्टा करतात त्यांना शिक्षा करा म्हणजे मूर्ख लोक धडा शिकतील. ते शहाणे होतील आणि नंतर त्यांना अधिकाधिक ज्ञान मिळेल. 12 देव चांगला आहे. दुष्ट लोक काय करतात ते देवाला माहीत आहे आणि तो त्यांना शिक्षा करील. 13 जर एखाद्याने गरीब लोकांना मदत करायला नकार दिला तर जेव्हा त्याला मदतीची गरज भासेल तेव्हा त्याला ती मिळणार नाही. 14 जर एखादा माणूस तुमच्यावर रागावला असला तर त्याला खाजगीरित्या एक भेट द्या. गुप्त भेट राग थोपवते. 15 योग्य न्याय चांगल्या लोकांना आनंदी बनवतो. पण तोच दुष्ट लोकांना घाबरतो. 16 जर एखाद्याने शहाणपणाचा मार्ग सोडला तर तो विनाशाकडे जातो. 17 जर एखाद्याला मजा करणे हेच अत्यंत महत्वाचे वाटत असेल तर तो गरीब होईल. जर त्या माणसाला द्राक्षारस आणि अन्न खूप आवडत असेल तर तो कधीही श्रीमंत होणार नाही. 18 दुष्ट लोक चांगल्या माणसांवर जे अत्याचार करतात त्याची किंमत त्यांना मोजावी लागते. जे लोक अप्रामाणिक असतात त्यांना प्रामाणिक लोकांवर केलेल्या अत्याचाराची किंमत मोजावी लागते. 19 वाद घालणाऱ्या रागीट बायकोबरोबर राहाण्यापेक्षा वाळवंटात राहाणे अधिक चांगले. 20 शहाणा माणूस त्याला लागणाऱ्या गोष्टी साठवून ठेवतो. पण मूर्ख माणूस त्याला मिळालेल्या वस्तू लगेच संपवून टाकतो. 21 जो माणूस नेहमी प्रेम आणि दया दाखवायचा प्रयत्न करतो त्याला चांगले आयुष्य, संपत्ती आणि मान मिळेल. 22 शहाण्या माणसाला जवळ जवळ सगळ्या गोष्टी येतात. बलदंड माणसे ज्याचा बचाव करीत आहेत अशा शहरावर तो हल्ला करु शकतो आणि जी भिंत त्यांचे रक्षण करील असा त्यांना विश्वास वाटतो, तिचाही तो नाश करु शकतो. 23 माणसाने जर आपण काय बोलतो याची काळजी घेतली तर तो बऱ्याच संकटांतून सुटू शकेल. 24 गर्विष्ठ माणसाला आपण इतरांपेक्षा चांगले आहोत असे वाटत असते. तो वाईट आहे हे तो आपल्या करणीने दाखवतो. 25 आळशी माणूस अधिकाचा हव्यास धरुन आपला नाश करुन घेतो. तो स्वत:चा नाश करतो कारण तो त्या गोष्टींसाठी कष्ट करायला नकार देतो पण चांगला माणूस दान देतो कारण त्याच्याकडे भरपूर असते. 26 27 वाईट लोक जेव्हा, त्याला बळी अर्पण करतात तेव्हा परमेश्वर आनंदी नसतो. खास करुन त्यावेळी, ज्यावेळी वाईट लोक त्याच्याकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतात. 28 जो माणूस खोटे बोलतो त्याचा सर्वनाश होतो. जो कोणी ते खोटे बोलणे ऐकेल त्याचा पण नाश होईल. 29 चांगल्या माणसाला त्याचे नेहमी बरोबर असते हे माहीत असते. पण दुष्ट माणसाला तसा आव आणावा लागतो. 30 परमेश्वर ज्याच्या विरुद्व आहे अशी योजना यशस्वी करुन दाखविणारा एकही शहाणा माणूस नाही. 31 लोक युध्दासाठी घोड्यांसकट सर्व तयारी करु शकतात, पण परमेश्वराने त्यांना विजय मिळवून दिल्याखेरीज ते युध्द जिंकू शकत नाहीत.

22:1 आदरणीय असणे हे श्रीमंत असण्यापेक्षा अधिक चांगले. चांगले नाव असणे हे सोन्या चांदीपेक्षा अधिक महत्वाचे आहे. 2 गरीब लोक आणि श्रीमंत लोक सारखेच असतात. सर्वांना परमेश्वरानेच निर्माण केले आहे. 3 शहाण्या लोकांना संकट येताना दिसते आणि ते वाटेतून बाजूला होतात. पण मूर्ख लोक सरळ संकटात जातात आणि त्यामुळे सोसत राहातात. 4 परमेश्वराला मान द्या आणि विनम्र राहा. नंतर तुम्हाला संपत्ती, मान आणि खरे जीवन मिळेल. 5 वाईट लोक अनेक संकटांच्या जाळ्यात अडकले आहेत. पण जो माणूस आपल्या आत्म्याची काळजी करतो तो संकटांपासून दूर राहातो. 6 लहान मुलाला जगण्याचा योग्य मार्ग लहानपणीच शिकवा. मग तो जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याच मार्गांने जगेल. 7 गरीब लोक श्रीमंतांचे गुलाम असतात. जो माणूस कर्ज घेतो तो जो कर्ज देतो त्याचा गुलाम असतो. 8 जो माणूस संकटे पसरवतो तो संकटांचे पीक घेतो. आणि शेवटी त्या माणसाचा नाश होईल त्याने इतरांना दिलेल्या त्रासांमुळेच त्या माणसाचा नाश होईल. 9 जो मनुष्य स्वखुशीने आनंदाने देतो त्याला आशीर्वाद मिळेल. कारण तो आपले अन्न गरिबांबरोबर वाटून खातो. 10 जर एखादा माणूस स्वत:ला इतरांपेक्षा चांगला समजत असेल तर त्याला जबरदस्तीने जायला भाग पाडा. जेव्हा तो माणूस जाईल तेव्हा त्याच्याबरोबर संकटही जाईल. नंतर वाद आणि फुशारक्याही बंद होतील. 11 जर तुम्ही शुध्द मनावर आणि प्रेमळ शब्दांवर प्रेम करीत असाल तर राजाही तुमचा मित्र होईल. 12 जे लोक परमेश्वराला ओळखतात त्यांच्यावर तो नजर ठेवतो आणि त्यांचे रक्षण करतो. पण जे त्याच्याविरुध्द जातात त्यांचा तो नाश करतो. 13 आळशी माणूस म्हणतो, “मी आता कामाला जाऊ शकत नाही. बाहेर सिंह आहे आणि तो मला खाईल.” 14 व्यभिचाराचे पाप हा एक सापळा आहे. जो माणूस या सापळ्यात अडकतो त्याच्यावर परमेश्वर खूप रागावतो. 15 मुले मूर्खपणाच्या गोष्टी करीत असतात. पण तुम्ही जर त्यांना शिक्षा केली तर त्या गोष्टी न करायलाही ते शिकतील. 16 या दोन गोष्टी तुम्हाला गरीब बनवतील. स्वत:ला श्रीमंत बनवण्यासाठी गरीबांना त्रास देणे आणि श्रीमंतांना नजराणे देणे. 17 मी काय सांगतो ते ऐका. मी तुम्हाला विद्वानांनी जे सांगितले ते शिकवतो. या शिकवणीपासून शिका. 18 तुम्ही जर या म्हणी लक्षात ठेवल्या तर ते तुमच्या दृष्टीने फार चांगले होईल. तुम्ही जर हे शब्द म्हणू शकलात तर तुम्हाला त्यांची मदत होईल. 19 मी तुम्हाला आता या गोष्टी शिकवेन. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवावा अशी माझी इच्छा आहे. 20 मी तुमच्यासाठी तीस म्हणी लिहिल्या. हे शब्द म्हणजे उपदेश आणि शहाणपण आहे. 21 हे शब्द तुम्हाला खऱ्या आणि महत्वाच्या गोष्टी सांगतील. नंतर तुम्ही तुमच्याकडे पाठवलेल्यांना ज्यांनी तुम्हाला विचारले त्यांना तुम्ही चांगली उत्तरे देऊ शकता. 22 गरिबांची चोरी करणे सोपे असते. पण ते करु नका आणि न्यायालयात या गरीब लोकांचा फायदा घेऊ नका. 23 परमेश्वर त्यांच्या बाजूला आहे. तो त्यांना साहाय्य करतो आणि त्यांच्याकडून ज्यांनी वस्तू घेतल्या त्या वस्तू तो परत घेईल. 24 जो खूप लवकर रागावतो त्या माणसाशी मैत्री करु नका. जो पटकन् वेडा होतो त्या माणसाजवळ जाऊ नका. 25 जर तुम्ही गेलात तर तुम्ही त्याच्यासारखेच व्हायला शिकाल. आणि तुमच्यावरही त्याच्यावर येतात तशीच संकटे येतील. 26 दुसऱ्याच्या कर्जासाठी जामीन राहाण्याचे वचन देऊ नका. 27 जर तुम्ही त्याचे कर्ज फेडू शकला नाही, तर तुम्ही तुमच्या जवळचे सर्व घालवून बसाल. तुमचे झोपायचे अंथरुण तुम्ही का घालवता? 28 खूप पूर्वी तुमच्या पूर्वजांनी जामीन - जायदादीची आखून दिलेली रेषा पुसू नका. 29 जर एखादा माणूस त्याच्या कामात तरबेज असला तर तो राजांची चाकरी करण्यायोग्य असतो. त्याला बिनमहत्वाच्या लोकांसाठी काम करावे लागणार नाही.

23:1 जेव्हा तुम्ही महत्वाच्या लोकांबरोबर बसता आणि खाता तेव्हा तुम्ही कुणाबरोबर आहात याचे भान ठेवा. 2 जरी तुम्हाला खूप भूक लागलेली असली तरी कधीही जास्त खाऊ नका. 3 आणि तो जे चांगले पदार्थ वाढतो तेही जास्त खाऊ नका. तो कदाचित् एखादा डाव असू शकेल. 4 श्रीमंत होण्याचा प्रयत्न करताना तब्येतीची हेळसांड करु नका. तुम्ही शहाणे असाल तर धीर धराल. 5 पैसा फार लवकर जातो. जणूकाही त्याला पंख फुटतात आणि तो पक्ष्यासारखा उडून जातो. 6 स्वार्थी माणसाबरोबर खाऊ नका. आणि त्याला जे खास भोजन आवडते त्यापासून दूर राहा. 7 जो नेहमी किंमतीचा विचार करणारा माणूस आहे. तो कदाचित् तुम्हाला म्हणेल, ‘खा आणि प्या’ पण त्याला ते खरोखरच हवे आहे असे नाही. 8 आणि तुम्ही जर त्याचे अन्न खाल्ले तर तुम्ही आजारी पडाल आणि तुम्हाला शरम वाटेल. 9 मूर्खाला शिकवायचा प्रयत्न करु नका. तो तुमच्या शहाणपणाच्या शब्दांची थट्टा करील. 10 जुनी जमीन जायदादीची रेषा कधीही सरकवू नका. आणि निराधार मुलाची जमीन कधीही बळकावू नका. 11 परमेश्वर तुमच्या विरुध्द जाईल. परमेश्वर शक्तिशाली आहे आणि तो त्या निराधार मुलाचे रक्षण करील. 12 तुमच्या शिक्षकाचे ऐका आणि जेवढे शिकता येईल तेवढे शिका. 13 गरज पडेल तेव्हा मुलाला नेहमी शिक्षा करा. तुम्ही त्याला चापट मारली तर त्याला ती लागणार नाही. 14 चापटी मारुन तुम्ही त्याला मृत्यूपासून वाचवू शकाल. 15 मुला, तू जर शहाणा झालास तर मी खूप आनंदी होईन. 16 तू योग्य गोष्टी बोलू लागलास, तू योग्य गोष्टी बोलताना मी ऐकले तर मला खूप आनंद होईल. 17 दुष्ट लोकांचा मत्सर करु नका. पण परमेश्वराचा आदर करण्यासाठी नेहमीच प्रयत्नांची परकाष्ठा करा. 18 आशेला नेहमीच जागा असते. आणि ती आशा अमर आहे. 19 म्हणून मुला, लक्ष दे आणि शहाणा हो. योग्य रीतीने जगण्याची काळजी घे. 20 खूप खाणाऱ्या आणि खूप द्राक्षारस पिणाऱ्या लोकांशी मैत्री करु नकोस. 21 जे लोक खूप खातात आणि पितात ते गरीब होतात. ते फक्त खातात, पितात आणि झोपतात आणि लवकरच त्यांच्याजवळ काहीही उरत नाही. 22 तुझे वडील तुला ज्या गोष्टी सांगतात त्या ऐक. तुझ्या वडिलांशिवाय तू कधीही जन्माला आला नसतास. तुझी आई म्हातारी झाली तरी तिचा आदर कर. 23 सत्य, शहाणपण, शिक्षण आणि समजूतदारपणा या गोष्टी पैसे मोजून घेण्याइतक्या मौल्यवान आहेत. आणि त्यांचे मूल्य त्या विकून टाकता न येण्याइतके अधिक आहे. 24 चांगल्या माणसाचे वडील खूप आनंदी असतात. एखाद्याचे मूल जर शहाणे असेल तर ते खूप आनंद देते. 25 म्हणून तुमच्या आई - वडिलांना तुमच्याबरोबर आनंदी होऊ द्या. तुमच्या आईला आनंद घेऊ द्या. 26 मुला, मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. माझे आयुष्य तुुझ्यासमोर उदाहरणादाखल राहू दे. 27 वेश्या आणि वाईट स्त्रिया म्हणजे सापळे आहेत. त्या खोल विहिरीसारख्या आहेत. त्यातून कधीही बाहेर पडता येत नाही. 28 वाईट स्त्री चोरासारखी तुमची वाट बघत असते. आणि ती पुष्कळ पुरुषांना पाप करायला लावते. 29 जे लोक खूप द्राक्षारस पितात आणि कडक मद्य घेतात, त्यांच्याकरता ते खूप वाईट आहे. ते लोक खूप भांडणे आणि वाद - विवाद करतात. त्यांचे डोळे पण लाल असतात. ते अडखळतात आणि पडतात. ही सगळी संकटे त्यांना टाळता आली असती. 30 31 म्हणून द्राक्षारसापासून सावध राहा. तो सुंदर आणि लाल दिसतो. तो पोल्यात चकाकतो आणि तुम्ही पिता तेव्हा तो अगदी सरळपणे जातो. 32 पण शेवटी तो सापासारखा चावतो. 33 द्राक्षारसामुळे तुम्ही चित्रविचित्र गोष्टी बघायला लागता. तुमचे मन गोंधळून जाते. 34 तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुम्ही खवळलेल्या समुद्रावर आहात असे तुम्हाला वाटेल आपण जहाजावर झोपलो आहोत असे तुम्हाला वाटेल. 35 तुम्ही म्हणाल, “त्यांना मला मारले पण मला ते कळलेसुध्दा नाही. त्यांनी मला खूप मारले पण मला ते आठवत नाही. आता मी जागा होऊ शकत नाही. मला आणखी प्यायला द्या.”

24:1 वाईट लोकांचा मत्सर करु नका. त्यांच्याबरोबर तुमचा वेळ वाया घालवू नका. 2 ते त्यांच्या मनात वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत असतात. ते फक्त त्रास देण्याच्या गोष्टी बोलत असतात. 3 चांगली घरे शहाणपण आणि समजूतदारपणा यावर आधारलेली असतात. 4 आणि सर्व मौल्यवान आणि प्रसन्न करणाऱ्या संपत्तीने खोल्या भरल्या जातात. 5 शहाणपण माणसाला अधिक सामर्थ्यवान बनवते. ज्ञान माणसाला शक्ती देते. 6 युध्द सुरु करण्याआधी तुम्ही काळजीपूर्वक योजना आखली पाहिजे. तुम्हाला जर (युध्द) जिंकायचे असेल तर तुम्हाला अनेक चांगले मार्गदर्शक हवेत. 7 मूर्ख लोकांना शहाणपण कळू शकत नाही. आणि लोक जेव्हा महत्वाच्या गोष्टींची चर्चा करतात तेव्हा मूर्ख माणूस काहीही बोलू शकत नाही. 8 जर तुम्ही नेहमी त्रास देण्याच्याच योजना आखत असाल तर लोकांना तुम्हीच त्रास देणारे आहात हे कळेल आणि ते तुमचे ऐकणार नाहीत. 9 मूर्ख माणूस ज्या गोष्टी करायच्या ठरवतो ते पाप असते. जो स्वत: ला इतरांपेक्षा चांगला समजतो त्याचा लोक तिरस्कार करतात. 10 जर तुम्ही संकटाच्या वेळी दुर्बल असाल तर तुम्ही खरोखरच दुर्बल आहात. 11 जर लोक एखाद्याला ठार मारण्याचे ठरवीत असतील तर तुम्ही त्याला वाचवायला हवे. 12 “माझा त्याच्याशी काही संबंध नाही” असे तुम्ही म्हणू शकत नाही. परमेश्वराला सर्व माहीत असते. आणि तुम्ही काही गोष्टी का करता ते त्याला माहीत असते. परमेश्वर तुमच्यावर लक्ष ठेवतो. त्याला सर्व कळते. आणि तुम्ही ज्या गोष्टी करता त्याबद्दल परमेश्वर तुम्हाला बक्षीस देईल. 13 मुला, मध खा, तो चांगला असतो. मधाच्या पोळ्यामधला मध गोड असतो. 14 त्याचप्रमाणे शहाणपण तुमच्या आत्म्यासाठी चांगले असते. तुमच्या जवळ शहाणपण असेल तर तुमच्या जवळ आशाही असेल आणि तुमची आशा कधीही मावळणार नाही. 15 चांगल्या माणसाकडून काही चोरु पाहणाऱ्या किंवा त्याचे घर बळकावू पहाणाऱ्या चोरासारखे होऊ नका. 16 चांगला माणूस जर सात वेळा पडला तर तो पुन्हा उभा राहतो. पण वाईट लोकांचा संकटात नेहमी पराभव होईल. 17 तुमचा शत्रू संकटात असतो तेव्हा आनंद मानू नका. तो पडतो तेव्हा आनंदून जाऊ नका. 18 जर तुम्ही तसे केलेत तर परमेश्वर ते बघेल आणि परमेश्वराला तुमच्याविषयी आनंद वाटणार नाही. नंतर परमेश्वर कदाचित् तुमच्या शत्रूला मदत करील. 19 दुष्ट लोकांना तुम्हाला तुम्हाला काळजीत पडायला लावू देऊ नका आणि दुष्टांचा मत्सर करु नका. 20 या दुष्ट लोकांना आशा नसते. त्यांचा प्रकाश काळोख होईल. 21 मुला, परमेश्वराचा आणि राजाचा आदर कर. आणि जे लोक त्यांच्या विरुध्द आहेत त्यांच्यात सामील होऊ नकोस. 22 का? कारण त्या प्रकारच्या माणसांचा लगेच नाश होऊ शकतो. देव आणि राजा त्यांच्या शत्रूंसाठी किती संकटे निर्माण करु शकतात हे तुम्हाला माहीत नाही. 23 हे शहाण्या माणसाचे शब्द आहेत. न्यायाधीशाने अगदी न्यायी असले पाहिजे. एखादा माणूस त्याच्या माहितीतला आहे म्हणून त्याला त्याने पाठिंबा देऊ नये. 24 जर न्यायाधीशाने अपराधी माणसाला ‘तू जाऊ शकतोस’ असे सांगितले तर लोक त्याच्याविरुध्द जातील. आणि राष्ट्रे त्याच्याविरुध्द वाईट गोष्टी बोलतील. 25 पण जर न्यायाधीशाने अपराध्याला शासन केले तर सर्व लोक आनंदी होतील. 26 खरे उत्तर सर्वांना आनंदी करते. ते ओठावरच्या चुंबनासारखे वाटते. 27 शेतात पेरणी करण्याआधी तुमचे घर बांधू नका. धान्य पिकवण्याची तुमची तयारी आहे याची आधी खात्री करा. मग घर बांधा. 28 काही चांगले कारण असल्याशिवाय कुणाच्याही विरुध्द बोलू नका. खोटे सांगू नका. 29 “त्याने मला दु:ख दिले म्हणून मीही त्याला तसेच करीन. त्याने मला त्रास दिला म्हणून मी त्याला शिक्षा करीन.” असे म्हणू नका. 30 मी आळशी माणसाच्या शेताजवळून जात होतो. मी शहाणा नसलेल्या माणसाच्या द्राक्षाच्या मळ्याजवळून जात होतो. त्या 31 शेतात सगळीकडे तण माजले होते. क्षुल्लक वनस्पती तिथे वाढत होत्या. आणि शेताभोवतालची भिंत तुटली होती आणि पडायला आली होती. 32 मी ते बघितले आणि त्याचा विचार करु लागलो. व नंतर त्या गोष्टींपासून मी धडा शिकलो. 33 “थोडीशी झोप, थोडी विश्रांती, हाताची घडी आणि वामकुक्षी.” 34 या गोष्टी तुम्हाला लवकरच गरीब करतील. तुमच्याकडे काहीही नसेल चोर घर फोडून घरात आला आणि सारे काही घेऊन गेल्यासारखे ते असेल.

25:1 ही शलमोनाची आणखी काही नीतिसूत्रे आहेत. यहुदाचा राजा हिज्कीया याच्या नोकरांनी या शब्दांची नक्कल केली. 2 काही गोष्टी आपल्याला माहीत नसाव्यात अशी देवाची इच्छा असते. या गोष्टी आपल्यापासून लपवून ठेवायचा देवाला हक्क आहे. पण राजा ज्या गोष्टी शोधून काढतो त्याबद्दल त्याला मान मिळतो. 3 आकाश उंच आपल्या डोक्यावर आहे आणि जमीन आपल्या पायाखाली. राजांच्या मनाचेही तसेच आहे. आपण ते समजू शकत नाही. 4 चांदीतल्या निरुपयोगी वस्तू काढून ती शुध्द केली तर कामगार त्यापासून सुंदर वस्तू बनवू शकतो. 5 त्याचप्रमाणे राजापासून त्याचे दुष्ट उपदेशक दूर केले तर चांगुलपणा त्याचे राज्य भक्कम करील. 6 राजासमोर स्वत:ची फुशारकी मारु नका. आपण प्रसिध्द आहोत असे म्हणू नका. 7 राजाने स्वत:च तुम्हाला आमंत्रण दिलेले अधिक चांगले. पण तुम्ही स्वत: होऊनच गेलात तर इतर लोकांसमोर तुम्हाला गोंधळल्यासारखे होईल. 8 तुम्ही काही बघितले असेल तर त्याबद्दल न्यायाधीशाला सांगण्याची घाई करु नका. तुम्ही चुकत आहात हे दुसऱ्याने सिध्द केले तर तुम्ही गोंधळून जाल. 9 जर तुमचे आणि दुसऱ्या माणसाचे एकमत होत नसेल तर काय करायचे ते आपसात ठरवा आणि दुसऱ्याच्या गुप्त गोष्टी कुणाला सांगू नका. 10 तुम्ही जर त्या सांगितल्या तर तुम्हाला लाज वाटेल. आणि तुमचे वाईट झालेले नाव तुम्ही कधीही घालवू शकणार नाही. 11 तुम्ही जर योग्य वेळी चांगली गोष्ट संगितली तर ते चांदीच्या तबकातले सोन्याचे सफरचंद असेल. 12 जर शहाण्या माणसाने तुम्हाला समज दिली असेल तर ती शुध्द सोन्याच्या अंगठ्यापेक्षा किंवा दागिन्यांपेक्षा अधिक किंमती असल. 13 विश्वासू दूताची किंमत ज्यांनी त्याला पाठविले असेल त्यांच्या इतकीच असते. तो उन्हाळ्यातील हंगामाच्या दिवसांतल्या थंडगार पाण्यासारखा आहे. 14 जे लोक भेटी देण्याचे वचन देतात पण देत मात्र कधीच नाहीत ते पाऊस न आणणारे ढग आणि वारा यांसारखे आहेत. 15 धीराचे बोलणे माणसाच्याच काय पण राजाच्या विचारातही बदल करु शकते. हळूवार बोलणे फार परिणामकारक असते. 16 मध चांगला असतो पण तो खूप खाऊ नका. तुम्ही जर तो खूप खाल्लात तर तुम्हाला त्याचा तिटकारा येईल. 17 त्याचप्रमाणे तुमच्या शेजाऱ्याच्या घरात सारखे जाऊ नका. जर तुम्ही सारखे गेलात तर तो तुमचा तिरस्कार करायला लागेल. 18 जो माणूस खरे सांगत नाही तो धोकादायक असतो. तो सोटा, तलवार किंवा तीक्षण बाण यांसारखा असतो. 19 खोटे बोलणाऱ्यावर संकटकाळी विश्वास टाकू नका. तो माणूस दुखणाऱ्या दातासारखा वा जायबंदी झालेल्या पायासारखा असतो. तुम्हाला त्याची तेव्हा सर्वांत जास्त गरज असते तेव्हाच तो तुम्हाला इजा करत असतो. 20 दु:खी माणसासमोर आनंदी गीत गाणे हे त्याला थंडी वाजत असताना त्याच्या अंगावरील कपडे काढून टाकण्यासारखे आहे. ते सोड्यात शिरका मिसळण्यासारखे आहे. 21 तुमचा शत्रू जर भुकेला असला तर त्याला खायला अन्न द्या. तो जर तहानेला असला तर त्याला प्यायला पाणी द्या. 22 तुम्ही जर असे केलेत तर त्याला लाज वाटेल. त्याच्या डोक्यावर जळते निखारे टाकल्यासारखे ते असेल. आणि परमेश्वर तुम्हाला बक्षीस देईल कारण तुम्ही तुमच्या शत्रूशी चांगले वागलात. 23 उत्तरेकडून वाहणारा वारा पाऊस आणतो त्याचप्रमाणे चुगल्या राग आणतात. 24 वाद घालणाऱ्या बायकोबरोबर घरात राहाण्यापेक्षा छपरावर राहाणे अधिक चांगले. 25 खूप लांबच्या स्थळाहून आलेली, चांगली बातमी ही तुमच्या नहानलेल्या जीवाला थंडगार पाण्यासारखी असते. 26 जर चांगला माणूस दुबळा झाला आणि वाईट माणसाचा मार्ग आक्रमू लागला तर ते चांगल्या पाण्यात माती कालवल्यासारखे असते. 27 जर तुम्ही खूप मध खाल्लात तर तो तुमच्यासाठी योग्य नाही. त्याचप्रमाणे स्वत:साठी खूप मानमरातब घेण्याचा प्रयत्न करु नका. 28 जर माणूस स्वत:वर ताबा मिळवू शकत नसेल तर तो तटबंदी मोडून पडलेल्या शहरासारखा आहे.

26:1 उन्हाळ्यात बर्फ पडायला नको आणि पीक कापणीच्यावेळी पाऊस पडायला नको असतो. त्याचप्रमाणे लोकांनी मूर्खांचा आदर करायला नको. 2 एखाद्याने तुमच्या बाबतीत काही वाईट घडावे असे म्हटले तर काही काळजी करु नका. तुम्ही जर काही चूक केली नसेल तर काहीच वाईट घडणार नाही. अशा माणसाचे शब्द तुमच्या जवळून उडून जाणाऱ्या व कधीच न थांबणाऱ्या पक्ष्याप्रमाणे असतात. 3 घोड्याला चाबकाचे फटकारे लागतात. बैलाच्या नाकात वेसण घालावी लागते आणि मूर्खाला खरपूस मार द्यावा लागतो. 4 एक वाईट परिस्थिती: मूर्खाने जर तुम्हाला मूर्खासारखा प्रश्र विचारला तर मूर्खासारखे उत्तर देऊ नका. नाहीतर तुम्ही सुध्दा मूर्खासारखेच दिसाल. 5 पण मूर्खाने जर मूर्ख प्रश्र विचारला तर तुम्हीही त्याला मूर्ख उत्तर द्या. नाहीतर तो मूर्ख आपण खूप हुशार आहोत असे समजेल. 6 तुमचा निरोप द्यायला मूर्खाला कधीही सांगू नका. तुम्ही जर तसे केलेत तर ते तुमचे पाय कापून टाकल्यासारखे होईल. संकटाला आमंत्रण दिल्यासारखे होईल. 7 मूर्ख जेव्हा शहाण्यासारखे बोलायचा प्रयत्न करतो तेव्हा ते लंगड्याने प्रयत्न केल्यासारखे वाटते. 8 मूर्खाला आदर दाखवणे हे गोफणीला दगड बांधण्यासारखे आहे. 9 मूर्ख जेव्हा काहीतरी शहाणपणाचे बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते झिंगलेल्या माणसाने हातात रुतलेला काटा काढण्याचा प्रयत्न केल्यासारखे वाटते. 10 मूर्खाला किंवा वाटेवरच्या कोणालाही मोलाने काम करायला सांगणे धोकादायक असू शकते. त्यामुळे कोणाला इजा होईल ते सांगता येणार नाही. 11 कुत्रा अन्न खातो. नंतर त्याला बरे वाटेनासे होते आणि तो उलटी करतो. कुत्रा नंतरही ते ओकलेले पुन्हा खातो. मूर्ख माणूसही असाच असतो. तो मूर्खांसारख्या गोष्टी पुन्हा पुन्हा करतो. 12 जर एखादा माणूस शहाणा नसताना स्वत:ला शहाणा समजत असेल तर तो मूर्खापेक्षाही वाईट आहे. 13 आळशी माणूस म्हणतो, “मी माझे घर सोडू शकत नाही. रस्त्यात सिंह आहे.” 14 आळशी माणूस दारासारखा असतो. दार जसे बिजागरीवर मागे पुढे हलते तसा तो अंथरुणावर हलत असतो. तो इकडे तिकडे कुठेही जात नाही. 15 आळशी माणूस स्वत:चे अन्न उचलून तोंडात घालण्यातदेखील आळशीपणा करतो. 16 आळश्याला आपण खूप हुशार आहोत असे वाटते. सात माणसे त्यांच्या कल्पनांसाठी योग्य कारणे देऊ शकतात. त्यांच्यापेक्षाही आपण हुशार आहोत असे त्याला वाटते. 17 दोन माणसांच्या वादातला भाग बनणे हे फार धोकादायक असते. ते रसत्याने चालताना कुत्र्याला त्याचे कान धरुन पकडण्यासारखेच असते. 18 जो माणूस एखाद्याला फसवतो आणि नंतर तो केवळ गंमत करीत होता असे म्हणतो तेव्हा ते वेड्याने अग्नीबाण हवेत फेकून कुणाला तरी अपघाती करण्यासारखेच आहे. 19 20 शेकोटीत जर लाकडे नसतील तर ती शेकोटी विझून जाते. त्याचप्रमाणे अफवा नसतील तर वाद संपून जातात. 21 लोणारी कोळसा कोळश्याला पेटता ठेवतो आणि लाकूड शेकोटी पेटती ठेवते. त्याचप्रमाणे जे लोक संकटे निर्माण करतात तेच वाद चालू ठेवतात. 22 लोकांना गप्पा-टप्पा आवडतात. ते चांगले अन्न खाल्ल्यासारखे असेत. 23 दुष्ट योजना लपवण्यासाठी वापरलेले चांगले शब्द हे मातीच्या भांड्यावर चांदीचा मुलामा चढवल्यासारखे असते. 24 दुष्ट मनुष्य आपल्या बोलण्याने चांगले दिसण्याचा प्रयत्न करतो. पण तो आपल्या दुष्ट योजना आपल्या मनात लपवण्याचा प्रयत्न करतो. 25 तो ज्या गोष्टी सांगतो त्या जरी चांगल्या वाटल्या तरी त्यावर विश्वास ठेवू नका. त्याचे मन दुष्ट कल्पनांनी भरलेले आहे. 26 तो त्याच्या दुष्ट योजना चांगल्या शब्दांनी लपवतो. पण तो फारच नीच असतो आणि शेवटी तो ज्या वाईट गोष्टी करतो त्या सर्वांना दिसतील. 27 जर एखाद्याने दुसऱ्याला जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केला तर तो स्वत:च त्यात अडकतो जर एखाद्याने दुसऱ्यावर दरड टाकण्याचा प्रयत्न केला तर तो स्वत:च त्या दरडीखाली चिरडून जाईल. 28 जो माणूस खोटे बोलून ज्या लोकांना दु:ख देतो त्यांचा तो तिरस्कार करीत असतो. आणि तो जर त्याच्या मनात नसताना काही बोलला तर तो स्वत:लाच दु:खी करीत असतो.

27:1 भविष्यात काय घडेल याबद्दलच्या फुशारक्या मारु नका. उद्या काय घडेल ते तुम्हाला माहीत नसते. 2 स्वत:चीच स्तुती कधीही करु नका. ती दुसऱ्यांना करु द्या. 3 दगड खूप वजनदार असतो आणि वाळू वाहून न्यायला कठीण असते. पण मूर्खांनी आणलेली संकटे सहन करणे या दोन्ही पेक्षा कठीण असते. 4 राग क्रूर आणि नीच असतो त्यामुळे सर्वनाश होतो. पण मत्सर त्याहीपेक्षा वाईट असतो. 5 उघड टीका ही गुप्त प्रेमापेक्षा चांगली असते. 6 मित्र तुम्हाला कधीतरी दु:ख देईल पण त्याची तसे करायची इच्छा नसते. शत्रू वेगळा असतो. शत्रू जरी तुमच्याशी कधी दयाबुध्दीने वागला तरी त्याला तुम्हाला दु:ख द्यायचीच इच्छा असते. 7 तुम्हाला जर भूक नसेल तर तुम्ही मधदेखील खाणार नाही. पण जर तुम्ही भुकेले असाल तर तुम्ही काहीही खाल. ते चवीला वाईट असले तरीही. 8 घरापासून दूर असलेला माणूस म्हणजे घरट्यापासून दूर असलेला पक्षी. 9 अत्तर आणि गोड वास असलेल्या वस्तू तुम्हाला आनंद देतात. पण संकटे तुमच्या मनाची शांती घालवतात. 10 तुमच्या आणि तुमच्या वडिलांच्या मित्रांना विसरु नका. आणि तुम्ही संकटात असाल तर मदतीसाठी दूरच्या तुमच्या भावाच्या घरी जाऊ नका. जवळच्या शेजाऱ्याला विचारणे हे दूरवरच्या तुमच्या भावाकडे जाण्यापेक्षा चांगले असते. 11 मुला शहाणा हो. त्यामुळे मला आनंद वाटेल. नंतर जो कुणी माझ्यावर टीका करेल त्याला मी उत्तर देऊ शकेन. 12 शहाण्या लोकांना संकटांचा सुगावा लागला आणि ते त्यांच्या मार्गांतून बाजूला होतात. पण मूर्ख सरळ संकटात जातात आणि त्यामुळे दु:खी होतात. 13 जर तुम्ही दुसऱ्याच्या कर्जाबद्दल स्वत: जामीन राहिलात तर तुम्हाला तुमचे कपडेदेखील गमवावे लागतील. 14 “सुप्रभात” च्या आरोळीने तुमच्या शेजाऱ्याला भल्या पहाटे उठवू नका. तो त्याला आशीर्वादाऐवजी शाप समजेल. 15 सतत वाद घालण्याची इच्छी धरणारी बायको पावसाळ्याच्या दिवसात सतत गळणाऱ्या दिवसात सतत गळणाऱ्या पाण्यासारखी असते. 16 त्या बाईला थांबवणे हे वाऱ्याला थांबवण्यासारखे आहे. हाताने तेल पकडण्यासारखे असते. 17 लोखंडाच्या सुरीला धार करण्यासाठी लोखंडाचेच तुकडे वापरतात. त्याचप्रमाणे लोक एकमेकांना धारदार बनविणे एकमेकापासूनच शिकतात. 18 जो माणूस अंजिराच्या झाडाची निगा राखतो तो त्याची फळे खाऊ शकतो. तसेच जो माणूस त्याच्या धन्याची काळजी घेतो त्याला बक्षीस मिळते. त्याचा मालक त्याची काळजी घेईल. 19 माणसाने पाण्यात पाहिले तर त्याला स्वत:चा चेहरा दिसेल. त्याचप्रमाणे माणसाचे हृदय तो माणूस खरा कसा आहे ते दाखविते. 20 मृतलोक आणि नाश ह्यांची कधीही तृप्ती होत नाही. त्याचप्रमाणे माणसाच्या डोळ्यांतील वासना कधी शमत नाही. 21 सोने आणि चांदी शुध्द करण्यासाठी लोक अग्नीचा वापर करतात. त्याच रीतीने माणसाची परीक्षा लोक त्याची स्तुती करतात त्यावरुन होते. 22 मूर्खाला दळून तुम्ही त्याचे पीठ केले तरी त्याचा मूर्खपणा तुम्ही घालवू शकणार नाही. 23 तुमच्या मेंढ्यांची आणि पशुधनाची काळजी घ्या. त्यांची तुम्ही उत्तम प्रकारे निगा राखत आहात याची खात्री करा. 24 संपत्ती कायम टिकत नाही. राष्ट्रेसुध्दा कायम राहात नसतात. 25 गवत कापल्यानंतर पुन्हा नवीन उगवते. टेकडीवर उगवणारे गवत कापा. 26 तुमच्या मेंढ्यांवरची लोकर कापा आणि तुमचे कपडे करा. तुमच्या काही बकऱ्या विका आणि जमीन विकत घ्या. 27 तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी शेळीचे बरेच दूध असेल. त्यामुळे तुमच्या सेवकमुली निरोगी राहतील.

28:1 वाईट लोकांना सगळ्याचीच भीती वाटते. कोणी त्यांचा पाठलाग करत नसले तरी ते दूर पळतात. पण चांगला माणूस सिंहासाखा शूर असतो. 2 जर देशाने आज्ञा पाळायला नकार दिला तर तिथले बरेचसे वाईट नेते केवळ थोड्या काळापुरतेच राज्य करु शकतील. पण जर देशाला एकच शहाणा नेता असला तर देश खूप काळापर्यंत राहील. 3 राजाने जर गरीब लोकांवर संकटे आणली तर तो पीक उद्ध्वस्त करणाऱ्या जोरदार पावसासारखा असतो. 4 तुम्ही जर कायदा पाळायला नकार दिलात तर तुम्ही वाईट लोकांच्या बाजूचे होत. पण तुम्ही कायदा पाळलात तर तुम्ही त्यांच्या विरुध्द असता. 5 वाईट लोकांना न्याय कळत नाही. पण जे परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना सर्वकाही कळते. 6 गरीब असून प्रामाणिक असणे हे श्रीमंत असून वाईट असण्यापेक्षा चांगले असते. 7 जो माणूस कायद्याचे पालन करतो तो हुशार असतो. पण जो माणूस क्षुल्लक माणसांशी मैत्री करतो तो त्याच्या वडिलांना लाज आणतो. 8 जर तुम्ही गरीबांना फसवून श्रीमंत झालात तर तुम्ही लवकरच संपत्ती गमवाल. जो माणूस त्यांच्याशी दयाळू असतो त्याच्याकडे ती जाईल. 9 जर एखाद्याने देवाच्या शिकवणुकीकडे लक्ष द्यायला नकार दिला तर देव त्याची प्रार्थना ऐकायला नकार देईल. 10 वाईट माणूस चांगल्या माणसांना दु:ख देण्याच्या योजना आखतो. परंतु वाईट माणूस त्याच्याच जाळ्यात अडकेल आणि चांगल्या माणसाच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील. 11 श्रीमंत लोकांना नेहमी आपण खूप शहाणे आहोत असे वाटत असते. पण शहाणा असलेला गरीब माणूस खरे काय ते पाहू शकतो. 12 चांगले लोक नेते बनले की सर्वजण आनंदी असतात. पण वाईट माणूस निवडून आला की सर्व लपून बसतात. 13 माणसाने जर त्याची पापे लपवायचा प्रयत्न केला तर तो कधीही याशस्वी होणार नाही. पण जर त्याने त्याच्या पापांची कबुली दिली आणि लोकांना सांगितले की त्याचे चुकले तर देव आणि इतर लोक त्याला दया दाखवतील. 14 जर एखाद्याने नेहमी परमेश्वराचा आदर केला तर त्याला आशीर्वाद मिळेल. पण जर तो हट्टी असला आणि त्याने परमेश्वराचा आदर करायला नकार दिला तर त्याच्यावर संकटे येतील. 15 दुष्ट माणूस जेव्हा दुबळ्या लोकांवर राज्य करतो तेव्हा तो रागावलेल्या सिंहासारखा किंवा अस्वलासारखा लढाईला तयार असतो. 16 जर राज्यकर्ता शहाणा नसला तर तो त्याच्या हाताखालच्या लोकांना दु:ख देतो. पण जर राज्यकर्ता प्रामाणिक असला आणि त्याला फसवणे आवडत नसले तर तो खूप काळपर्यंत राज्य करेल. 17 जर एखाद्याने कुणाला ठार मारण्याचा अपराध केला असेल. तर त्याला कधीही मन:शांती लाभणार नाही. त्या माणसाला कधीही आधार देऊ नका. 18 माणूस जर योग्य जीवन जगत असला तर तो सुरक्षित असेल. पण जर तो दुष्ट असेल तर तो त्याची शक्ती घालवून बसेल. 19 जो माणूस खूप काम करतो त्याला भरपूर खायला मिळेल. पण जो स्वप्ने बघण्यात वेळ घालवतो तो गरीबच राहील. 20 जो देवाची भक्ती करतो त्याला देव आशीर्वाद देईल. पण जो माणूस फक्त श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो त्याला शिक्षा होईल. 21 न्यायाधीशाने नेहमी न्यायी असले पाहिजे. एखाद्याला तो चांगला ओळखतो म्हणून त्याला मदत करता कामा नये. पण काही न्यायाधीश थोड्याशा पैशांसाठी त्यांचे निर्णय बदलतात. 22 स्वार्थी माणसाला फक्त श्रीमंत व्हायचे असते. त्याला हे कळत नाही की तो गरीब होण्याच्या मार्गाला लागला आहे. 23 जर तुम्ही एखाद्याला तो चुकतो आहे असे सांगून मदत केलीत तर तो नंतर तुमच्याबद्दल आनंदी होईल. लोकांबरोबर नेहमी गोडगोड बोलण्यापेक्षा हे खूप चांगले. 24 काही लोक त्यांच्या आई वडिलांची चोरी करतात. “ह्यात काही चूक नाही” असे ते म्हणतात. पण तो माणूस घरात येऊन सगळ्याचा नाश करणाऱ्या माणसाइतकाच दोषी आहे. 25 स्वार्थी. माणूस संकटे निर्माण करतो. पण जो परमेवरावर विश्वास ठेवतो त्याला बक्षीस मिळते. 26 जर एखादा माणूस स्वत:वरच विश्वास ठेवेल तर तो मूर्ख आहे. पण जर तो शहाणा असेल तर तो संकटातून सुटेल. 27 जर एखाद्याने गरीब लोकांना दिले तर त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील. पण जर एखाद्याने गरीबांना मदत करायला नकार दिला तर त्याच्यावर खूप संकटे येतील. 28 दुष्ट माणूस जर राज्य करण्यासाठी निवडून आला तर लोक लपून बसतील. पण त्या दुष्टाचा जर पराभव झाला तर चांगले लोक पुन्हा राज्य करतील.

29:1 जर एखादा माणूस हट्टी असेल आणि प्रत्येक वेळी त्याला ‘तू चुकतो आहेस’ असे कुणी सांगितल्यावर खूप राग येत असेल, तर त्या माणसाचा नाश होईल. तिथे आशेला जागा नाही. 2 राज्यकर्ता जर चांगला असेल तर सगळे लोक आनंदी असतात. पण वाईट माणूस राज्य करत असेल तर सगळेजण तक्रार करतात. 3 जर एखाद्या माणसाला शहाणपण आवडत असेल तर त्याच्या वडिलांना आनंद वाटतो. पण जर एखादा माणूस वेश्येवर पैसा खर्च करत असेल तर तो त्याची संपत्ती गमावून बसेल. 4 राजा जर न्यायी असला तर राष्ट्र बलशाली होते. पण राजा स्वार्थी असला आणि लोकांना त्यांच्या गोष्टी करुन घेण्यासाठी त्याला पैसे द्यावे लागत असले तर ते राष्ट्र कमजोर होईल. 5 जर एखादा माणूस गोड बोलून आपले काम करुन घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो स्वत:साठीच सापळा तयार करीत असतो. 6 वाईट लोकांचा त्यांच्याच पापामुळे पराभव होतो पण चांगला माणूस गाणे गाऊन आनंदी राहातो. 7 चांगल्या माणसांना गरीबांसाठी योग्य गोष्टी करायची इच्छा असते पण दुष्ट लोक मात्र पर्वा करीत नाहीत. 8 जे लोक स्वत:ला इतर लोकांपेक्षा चांगले समजतात ते संकटे आणू शकतात. ते सगळ्या शहरांना गोंधळात टाकू शकतात. पण जे शहाणे असतात ते शांती राखतात. 9 शहाणा माणूस जर मूर्खाबरोबर त्याच्या समस्या सोडवायला लागला तर तो मूर्ख वाद घालेल व मूर्खासारख्या गोष्टी करेल आणि त्या दोघांचे कधीही एकमत होणार नाही. 10 खुनी लोक नेहमी प्रामाणिक माणसांचा तिरस्कार करतात. त्या दुष्टांना प्रामाणिक आणि चांगल्या लोकांनाठार मारायचे असते. 11 मूर्खाला चटकन् राग येतो पण शहाणा माणूस धीर धरतो आणि स्वत:ला काबूत ठेवतो. 12 राजाने जर खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवला तर त्याचे सगळे अधिकारी वाईट ठरतील. 13 गरीब माणूस आणि जो गरीबांची चोरी करतो तो माणूस एका दृष्टीने सारखेच आहेत. त्या दोघांना परमेश्वरानेच केले. 14 राजा जर गरीबांच्या बाबातीत न्यायी असला तर तो खूप काळ राज्य करेल. 15 मार आणि शिकवण मुलासाठी चांगली असते. जर आईवडिलांनी मुलांना त्यांना हवे ते करु दिले तर तो त्याच्या आईला लाज आणेल. 16 जर देशावर वाईट लोक राज्य करीत असतील, तर सगळीकडे पाप नांदेल पण शेवटी चांगल्या माणसांचा जय होईल. 17 तुमचा मुलगा जर चुकत असेल तर त्याला शिक्षा करा नंतर तुम्हाला त्याच्याबद्दल गर्व वाटेल. तो तुम्हाला कधीही लाज आणणार नाही. 18 जर देवाने देशाला मार्ग दाखवला नाही तर त्या देशात शांतता नांदणार नाही. पण जर देशाने देवाचे कायदे पाळले तर तो सुखी होईल. 19 जर तुम्ही फक्त सेवकाशी बोललात तर तो त्याचा धडा शिकणार नाही. तो सेवक तुमचे शब्द समजू शकेल पण तो ते पाळणार नाही. 20 जर एखादा माणूस विचार न करता बोलत असेल तर त्याच्या बाबतीत आशेला जागा नाही. जो विचार न करता बोलतो त्याच्यापेक्षा मूर्खाच्या बाबतीत आशेला अधिक जागा आहे. 21 जर तुम्ही तुमच्या सेवकाला तो जे जे मागेल ते ते सर्व दिले तर शेवटी तो चांगला सेवक होणार नाही. 22 रागावलेला माणूस संकटे आणतो आणि जो माणूस पटकन् रागावतो तो अनेक पापांचा अपराधी असतो. 23 माणसाचा गर्व त्याला खाली आणतो. जर एखाद्याला तो इतरापेक्षा चांगला आहे असे वाटत असेल तर त्यामुळे त्याचा नाश होईल. पण जर एखादा माणूस विनम्र असेल तर इतर लोक त्याचा आदर करतील. 24 बरोबर काम करणारे दोन चोर एकमेकांचे शत्रू असतात. एक चोर दुसऱ्याला धमकी देईल त्यामुळे जर त्याला जबरदस्तीने कोर्टात खरे बोलावे लागले तर तो बोलायाला खूपच घाबरेल. 25 भीती ही सापळ्यासारखी असते. पण जर तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर तुम्ही सुरक्षित असाल. 26 खूप लोकांना राज्यकर्त्यांशी मैत्री करायची असते. पण फक्त परमेश्वरच लोकांना योग्य न्याय करतो. 27 चांगले लोक प्रामाणिक नसलेल्यांचा तिरस्कार करतात. आणि दुष्ट लोक प्रामाणिक असलेल्यांचा तिरस्कार करतात.

30:1 ही याकोहचा मुलगा अगूर याची नीतिसूत्रे आहेत. हा त्याचा इथिएल आणि युकालयांना निरोप आहे. 2 मी पृथ्वीवरचा सगळ्यात वाईट माणूस आहे, मी जितके समजून घ्यायला हवे होते तितके मी समजू शकत नाही. 3 मी शहाणा व्हायला शिकलो नाही, आणि मला देवाबद्दल काहीही माहीत नाही. 4 स्वार्गातल्या गोष्टीबद्दल आजपर्यंत कोणीही काहीही शिकला नाही. कोणीही वाऱ्याला कधी हातात पकडू शकला नाही. कोणीही पाण्याला कपड्यात पकडू शकला नाही. पृथ्वीच्या सीमा कोणालाही माहीत नाहीत. जर कोणी ह्या गोष्टी करु शकला तर तो कोण असेल? त्याचे कुटुंब कुठे असेल.? 5 देवाने म्हटलेला प्रत्येक शब्द परिपूर्ण असतो. जे लोक देवाकडे जातात त्यांच्यासाठी देव म्हणजे एक सुरक्षित जागा असते. 6 म्हणून देव ज्या गोष्टी सांगतो त्या बदलण्याचा प्रयत्न करु नका. तुम्ही जर तसे केलेत तर तो तुम्हाला शिक्षा करेल आणि तुम्ही खोटे बोलता हे सिध्द करेल. 7 देवा मी मरण्यासाठी तुला दोन गोष्टी करायला सांगणार आहे. 8 खोटे न बोलण्यासाठी मला मदत कर आणि मला खूप श्रीमंत वा खूप गरीब करु नकोस. मला रोज लागणाऱ्या गोष्टीच फक्त दे. 9 माझ्याकडे जर गरजेपेक्षा जास्त असेल तर तुझी मला गरज नाही असे मला वाटायला लागेल. पण मी जर गरीब असलो तर मी कदाचित् चोरी करेन. त्यामुळे मी देवाच्या नावाला लाज आणेन. 10 सेवकाजवळ त्याच्या धन्याबद्दल कधीही वाईट गोष्टी सांगू नका. जर तुम्ही सांगितल्या तर धनी तुमच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही. तुम्हीच अपराधी आहात असे त्याला वाटेल. 11 काही लोक त्यांच्या वडिलांविरुध्द बोलतात आणि ते त्यांच्या आईबद्दल आदर दाखवीत नाहीत. 12 काही लोकांना आपण चांगले आहोत असे वाटत असते पण ते खरोखरच वाईट असतात. 13 काही लोक स्वत:ला फार चांगले समजतात. आपण दुसऱ्यांपेक्षा खूप चांगले आहोत असे त्यांना वाटते. 14 असे काही लोक असतात ज्यांचे दात तलवारीसारखे असतात त्यांचे जबडे सुरी सारखे असतात. ते गरीबांकडून सर्व काही हिसकावण्यात त्यांचा वेळ खर्ची घालतात. 15 काही लोकांना जे जे घेणे शक्य असते ते ते घ्यायाला आवडते. ते फक्त ‘मला दे,’ ‘मला दे’ एवढेच म्हणत असतात. तीन गोष्टी कधीही समाधानी नसतात, खरे म्हणजे चार, ज्याना कधीही पुरेसे मिळत नाही. 16 मृत्यूची जागा, वांझ स्त्री, पाऊस हवा असलेली कोरडी जमीन आणि रुद्र भीषण, न विझवता येणारी आग. 17 जो माणूस त्याच्या वडिलांची चेष्टा करतो वा त्याचा आईचे ऐकत नाही त्याला शिक्षा होईल. त्याचे डोळे गिधाडाने वा एखाद्या रानटी पक्ष्याने खाण्याइतके वाईट त्याच्या बाबतीत घडेल. 18 तीन गोष्टी माझ्या समजण्यापलिकडे आहेत, खरं म्हणजे चार गोष्टी, ज्या मी समजू शकत नाही. 19 आकाशात उडणारा गरुड, दगडावर चालणारा साप, समुद्रात जाणारे जहाज आणि स्त्रीच्या प्रेमात पडलेला पुरुष 20 जी स्त्री नवऱ्याशी एकनिष्ठ नसते ती तिने काहीही चूक केलेली नाही असे वागते. ती खाते, आंघोळ करते आणि तिने काहीही चूक केली नाही असे म्हणते. 21 तीन गोष्टी पृथ्वीवर संकटे आणतात, खरे म्हणजे चार गोष्टी, ज्यांचा भार पृथ्वी पेलू शकत नाही. 22 राजा होणारा सेवक, मूर्ख माणूस ज्याच्याकडे त्याला लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत. 23 प्रेम न मिळालेली तरीही नवरा मिळवणारी स्त्री आणि मालकिणीवर सत्ता गाजवणारी नोकर असलेली मुलगी 24 पृथ्वीवरच्या चार गोष्टी अगदी लहान आहेत पण त्या अतिशय शहाणपणाच्या आहेत. 25 मुंग्या अगदी लहान आणि दुर्बल असतात पण तरी ही त्या उन्हाळाभर अन्न साठवतात. 26 ससा अगदी लहान प्राणी आहे. पण ते खडकात आपले घर करतात. 27 टोळांना राजा नसतो पण तरीही ते एकत्र काम करु शकतात. 28 पाली हाताने पकडण्याइतक्या लहान असतात. पण तुम्ही त्यांना राजाच्या घरातदेखील पाहू शकता. 29 तीन गोष्टी चालताना फार महत्वाच्या वाटतात, खरे म्हणजे चार. 30 सिंह सर्व प्राण्यात सगळ्यात बलवान आहे. त्याला कशाचीही भीती वाटत नाही. 31 गर्वाने चालणारा कोंबडा, बकरी आणि त्याच्या लोकांमध्ये असलेला राजा. 32 जर तुम्ही मूर्ख असाल आणि इतरांपेक्षा आपण चांगले आहोत असे तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही वाईट गोष्टींच्या योजना आखत असाल तर तुम्ही ते थांबवा आणि तुम्ही काय करीत आहात याचा विचार करा. 33 जर एखादा माणूस दूध घुसळत असेल तर तो लोणी काढतो. जर एखाद्याने कुणाला नाकावर ठोसा मारला, तर त्यातून रक्त येईल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही लोकांना राग येण्यासारखे काही केले तर तुम्ही संकटे निर्माण कराल.

31:1 ही लमुएल राजाची नीतिसूत्रे आहेत त्याच्या आईने त्याला या गोष्टी शिकवल्या. 2 तू माझा मुलगा आहेस. मी प्रेम करत असलेला मुलगा. ज्यासाठी मी प्रार्थना केली होती तोच मुलगा तू आहेस. 3 तुझी शक्ती स्त्रियांवर खर्च करु नकोस. स्त्रियामुळेच राजांचा नाश होतो त्यांच्यापायी स्वत:चा नाश करु नकोस. 4 लमुएला, द्राक्षारस पिणे हे राजांच्या दृष्टीने शहाणपणाचे नसते. मद्याची इच्छा धरणे हे राज्यकर्त्यांच्या दृष्टीने शहाणपणाचे नसते. 5 ते कदाचित् खूप पितील आणि कायदा काय म्हणतो ते विसरुन जातील. नंतर ते गरीबांचे सर्व हक्क काढून घेतील. 6 गरीब लोकांना मद्य द्या. जे लोक संकटात आहेत त्यांना द्राक्षारस द्या. 7 ते नंतर पितील आणि ते गरीब आहेत हे विसरुन जातील. ते पितील आणि त्यांची सर्व संकटे विसरतील. 8 जर एखादा माणूस स्वत:ला मदत करु शकत नसेल तर तुम्ही त्याला मदत करा. जे लोक संकटात आहेत त्या सर्वांना तुम्ही मदत केली पाहिजे. 9 ज्या गोष्टी योग्य आहेत हे तुम्हाला माहीत आहे त्या गोष्टीसाठी लढा आणि सर्वांना योग्य रीतीने न्याय द्या. गरीबांच्या आणि ज्या लोकांना तुमची गरज आहे अशा लोकांच्या न्यायाचे रक्षण करा. 10 सर्वगुणसंपन्न स्त्री शोधणे खूप कठीण आहे. पण तिचे मोल जड-जवाहिऱ्यापेक्षा अधिक आहे. 11 तिचा नवरा तिच्यावर अवलंबून असतो. तो कधीही गरीब होणार नाही. 12 ती तिच्या आयुष्यभर नवऱ्याचे कल्याण करते. ती त्याच्यावर कधीही संकटे आणीत नाही. 13 ती नेहमी लोकर आणि कापड तयार करण्यात मग्न असते. 14 ती दूरच्या प्रदेशातील मेंढीसारखी असते. ती सर्व ठिकाणाहून घरी अन्न आणते. 15 ती भल्या पहाटे उठते तिच्या कुटुंबासाठी अन्न शिजवते आणि नोकर मुलींना काय करायचे ते सांगते. 16 ती जमिनी बघते आणि विकत घेते. तिने साठवलेल्या पैशांचा उपयोग करुन ती द्राक्षाचे मळे लावते. 17 ती खूप काम करते. ती खूप शक्तिवान आहे. आणि सर्व काम करण्यात तरबेज आहे. 18 तिने केलेल्या गोष्टी जेव्हा ती विकते तेव्हा तिला नेहमी नफा होतो. आणि ती रात्री उशीरापर्यंत काम करते. 19 ती स्वत:चे सूत स्वत: कातते आणि स्वत:चे कपडे विणते. 20 ती नेहमी गरीबांना देते आणि ज्यांना गराज असते अशांना मदत करते. 21 जेव्हा बर्फ पडतो (म्हणजेच फार थंडी असते) तेव्हा ती आपल्या कुटुंबाची काळजी करत नाही. तिने त्या सर्वाना चांगले, गरम कपडे दिलेले असतात. 22 ती अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला पांघरुणे तयार करते. चांगल्या कापडापासून केलेले कपडे ती वापरते. 23 लोक तिच्या नवऱ्याचा आदर करतात. तो देशाचा एक नेता असतो. 24 ती खूप चांगली उद्योगी - स्त्री असते. ती कपडे आणि पट्टे तयार करते आणि ती त्या वस्तू त्या व्यापाऱ्यांना विकते. 25 ती खूप ताकतवान आहे आणि लोक तिला मान देतात ती भविष्याबद्दल विश्वास आहे. 26 ती शहाणपणाचे बोल बोलते. ती लोकांना प्रेमळ व दयाळू असावे असे शिकविते. 27 ती कधीही आळशी नसते. ती तिच्या घरातील गोष्टींची काळजी घेते. 28 तिची मुले तिच्याबद्दल चांगले बोलतात. तिचा नवरा तिच्याबद्दल अभिमान बाळगतो आणि म्हणतो, 29 “चांगल्या स्त्रिया खूप आहेत. पण तू सर्वांत चांगली आहेस.” 30 मोहकता आणि सौंदर्य तुम्हाला फसवू शकेल. पण जी स्त्री परमेश्वराचा आदर करते तिची प्रशांसा केली पाहिजे. 31 तिला साजेसे बक्षीस तिला द्या. लोकांमध्ये तिची प्रशंसा करा. तिने ज्या गोष्टी केल्या आहेत त्याबद्दल तिची स्तुती करा.